आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा
आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा
“प्रियजनहो, . . . सार्वकालिक जीवनासाठी . . . आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.”—यहूदा २०, २१.
१, २. तुम्ही देवाच्या प्रीतीत कसे राहू शकाल?
यहोवा देवाचे मानवजातीवर इतके प्रेम आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (योहान ३:१६) देवाचे हे प्रेम अनुभवणे किती मोठा सुहक्क आहे! तुम्ही जर यहोवाचा एक सेवक असाल तर, हे प्रेम सदासर्वकाळ अनुभवत राहावेसे तुम्हाला वाटेल.
२ तुम्ही देवाच्या प्रीतीत कसे राहू शकाल हे शिष्य यहुदाने दाखवून दिले. त्याने असे लिहिले: “तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २०, २१) देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे व सुवार्तेचा प्रचार करीत राहिल्यामुळे तुम्हाला, “परमपवित्र विश्वासावर” अर्थात ख्रिस्ती शिकवणींवर स्वतःची रचना करता येईल. देवाच्या प्रीतीत राहण्याकरता तुम्ही “पवित्र आत्म्याने” अर्थात पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना केली पाहिजे. सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद मिळण्याकरता तुम्ही येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर देखील विश्वास केला पाहिजे.—१ योहान ४:१०.
३. काही जण यहोवाचे साक्षीदार का राहिले नाहीत?
३ एकेकाळी विश्वासात असलेले काही जण देवाच्या प्रीतीत कायम राहिले नाहीत. पापी मार्गाक्रमण निवडल्यामुळे ते आता यहोवाचे साक्षीदार राहिले नाहीत. तुमच्याबाबतीत असे होऊ नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी टाळू शकता? पुढील मुद्द्यांवर मनन केल्यास तुम्हाला पापापासून परावृत्त होण्यास व स्वतःला देवाच्या प्रीतीत राहण्यास मदत मिळू शकेल.
देवावर असलेले प्रेम कार्यांतून दाखवा
४. देवाच्या आज्ञा पाळणे किती महत्त्वाचे आहे?
४ देवाच्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला देवावर प्रेम आहे हे दाखवा. (मत्तय २२:३७) प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) देवाच्या आज्ञांकित राहण्याची मनोवृत्ती तुम्हाला मोहांचा प्रतिकार करण्याचे बळ देईल व तुम्हाला आनंदी बनवेल. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; . . . तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, . . . तो धन्य.”—स्तोत्र १:१, २.
५. यहोवाबद्दलचे प्रेम तुम्हाला कशाप्रकारे वागण्यास प्रवृत्त करेल?
५ यहोवावर असलेले प्रेम तुम्हाला, यहोवाच्या नावावर कलंक लागेल असे गंभीर पाप करण्यापासून परावृत्त करेल. आगुराने अशी प्रार्थना केली: “दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ति झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि परमेश्वर कोण आहे, असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.” (नीतिसूत्रे ३०:१, ८, ९) यहोवाच्या नावावर ठपका आणून त्याच्या “नामाची निंदा” न करण्याचा दृढनिश्चय करा. उलट, नेहमी त्याचे गौरव होईल अशी प्रामाणिक कार्ये करण्याचा प्रयत्न करा.—स्तोत्र ८६:१२.
६. तुम्ही जर जाणूनबुजून पाप करीत राहिलात तर काय होऊ शकते?
६ पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या मोहांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळावी म्हणून आपल्या स्वर्गीय पित्याला नियमितरीत्या प्रार्थना करा. (मत्तय ६:१३; रोमकर १२:१२) देवाने दिलेल्या मार्गदर्शनाचे सतत अनुसरण करीत राहा. यामुळे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही. (१ पेत्र ३:७) तुम्ही जर जाणूनबुजून पाप करीत राहिलात तर त्याचे परिणाम अतिशय दुःखद ठरू शकतात. कारण, यहोवा जणू काय स्वतःस अभ्राने आच्छादतो ज्यामुळे बंडखोर लोकांच्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहंचत नाहीत. (विलापगीत ३:४२-४४) यास्तव, नम्र मनोवृत्ती दाखवा आणि प्रार्थना करीत राहा जेणेकरून तुम्ही असे काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाता येणार नाही.—२ करिंथकर १३:७.
देवाच्या पुत्रावर तुमचे प्रेम आहे ते दाखवा
७, ८. येशूच्या सल्ल्याचे अनुकरण केल्यास एखाद्याला पापी मार्गाक्रमण टाळण्यास मदत कशी मिळू शकेल?
७ येशू ख्रिस्ताच्या आज्ञांचे पालन करून तुम्ही, त्याच्यावर तुमचे प्रेम आहे हे दाखवू शकता. कारण, यामुळे तुम्हाला पाप न करण्याचे धैर्य मिळेल. येशूने म्हटले: “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:१०) येशूच्या शब्दांचे अनुसरण केल्यास तुम्हाला देवाच्या प्रीतीत कसे काय राहता येईल?
८ येशूच्या शब्दांचे अनुसरण केल्यास तुम्हाला नैतिक तत्त्वांना जडून राहण्याचे धैर्य मिळेल. इस्राएलांना देवाने दिलेल्या नियमशास्त्रात असे म्हटले होते: “व्यभिचार करू नको.” (निर्गम २०:१४) परंतु येशूने या आज्ञेचे तत्त्व सांगितले. तो म्हणाला: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२७, २८) प्रेषित पेत्राने म्हटले, की पहिल्या शतकातील मंडळीतील काहींच्या “डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली” होती व “पाप केल्यावाचून त्यांना राहवत” नव्हते. (२ पेत्र २:१४) आपण या लोकांप्रमाणे नाही. आपले जर यहोवावर व ख्रिस्तावर प्रेम असेल आणि आपण जर त्यांच्या आज्ञांचे पालन केले व त्यांच्याबरोबर असलेला नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा दृढनिश्चय केला तर आपण सर्वप्रकारची लैंगिक पातके टाळू शकू.
यहोवाचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवो
९. पवित्र आत्म्याच्या बाबतीत सांगायचे तर, एक व्यक्ती पाप करीत राहिली तर काय होईल?
९ देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा आणि तो तुम्हाला मार्ग दाखवेल. (लूक ११:१३; गलतीकर ५:१९-२५) तुम्ही जर पाप करीत राहिलात तर देव त्याचा पवित्र आत्मा तुमच्याकडून काढून घेईल. बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर दाविदाने देवाला अशी भीक मागितली: “तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” (स्तोत्र ५१:११) राजा शाऊल अपश्चात्तापीपणे पाप करीत राहिला त्यामुळे त्याने देवाचा आत्मा गमावला. होमबली अर्पण करण्याद्वारे व शेरडे, मेंढरे, गुरे आणि अमालेकींचा राजा यांना वाचवण्याद्वारे त्याने पाप केले. यानंतर यहोवाने शौलावरून आपला आत्मा काढून घेतला.—१ शमुवेल १३:१-१४; १५:१-३५; १६:१४-२३.
१०. पाप करत राहण्याचा विचारसुद्धा आपण मनातून का झटकून टाकला पाहिजे?
१० तेव्हा, पाप करत राहण्याचा विचारसुद्धा मनातून झटकून टाका. प्रेषित पौलाने लिहिले: “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही.” (इब्री लोकांस १०:२६-३१) तुम्ही जर जाणूनबुजून पाप करीत राहिलात, तर तुम्हाला किती दुःखद परिणामाला तोंड द्यावे लागेल!
इतरांवर मनापासून प्रेम करा
११, १२. प्रेम आणि आदर हे गुण एखाद्याला, लैंगिक गैरवर्तनापासून दूर राहण्यास कशाप्रकारे मदत करू शकतात?
११ सहमानवांबद्दलचे प्रेम तुम्हाला लैंगिक गैरवर्तनापासून दूर राहण्यास प्रवृत्त करेल. (मत्तय २२:३९) अशाप्रकारचे प्रेम तुम्हाला आपल्या हृदयाचे रक्षण करण्यास प्रवृत्त करेल जेणेकरून ते तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक सोबत्याच्या प्रेमभावना मिळवण्यास मोहित करणार नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक सोबत्याच्या प्रेमभावना चोरल्यामुळे तुमच्या हातून जारकर्मासारखे पाप घडू शकेल. (नीतिसूत्रे ४:२३; यिर्मया ४:१४; १७:९, १०) तेव्हा, धार्मिक ईयोबासारखे व्हा ज्याने आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीचा विचार आपल्या मनात न आणण्याचा निश्चय केला होता.—ईयोब ३१:१.
१२ विवाहाच्या पावित्र्याचा आदर मनात बाळगल्यास तुम्ही गंभीर पातके करण्याचे टाळू शकाल. आदरणीय विवाहसंस्था आणि लैंगिक संबंध हे जीवनाची पुनरुत्पत्तीसाठी देवाने उद्देशिले होते. (उत्पत्ति १:२६-२८) लैंगिक अवयव जीवन निर्माण करण्यासाठी आहेत; आणि जीवन हे पवित्र आहे, हे लक्षात ठेवा. व्यभिचार व जारकर्म करणारे देवाच्या आज्ञा मोडतात, लैंगिक कार्यांची अप्रतिष्ठा करतात, विवाहाच्या पावित्र्याचा अनादर करतात आणि स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतात. (१ करिंथकर ६:१८) परंतु एखाद्या व्यक्तीला देवाबद्दल व शेजाऱ्याबद्दल प्रेम असेल आणि देवाच्या आज्ञा पाळण्याची मनोवृत्ती असेल तर ती व्यक्ती अशा सर्व कार्यांपासून दूर राहील ज्यांमुळे तिला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते.
१३. अनैतिक व्यक्ती कशाप्रकारे “मोलवान गोष्टींची धूळधाण” करिते?
१३ आपल्या मनात पापी विचार येतात तेव्हा आपण ते विचार लगेच झटकून टाकले पाहिजेत जेणेकरून आपल्या प्रिय जनांना आपण दुःखी करणार नाही. नीतिसूत्रे २९:३ म्हणते: “वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची [“मोलवान गोष्टींची,” NW] धूळधाण करितो.” अपश्चात्तापीपणे जारकर्म करणारा मनुष्य देवाबरोबर आपला नातेसंबंध बिघडवतो आणि कुटुंबातील बंधनाचा नाश करतो. त्याच्या पत्नीजवळ घटस्फोट घेण्याचे रास्त कारण असते. (मत्तय १९:९) अपराध करणारा पती असो अथवा पत्नी असो; पण या वैवाहिक विभक्तीमुळे, निष्पाप सोबत्याला, मुलांना आणि इतरांना बऱ्याच मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. अनैतिक वर्तन किती हानीकारक आहे ही जाणीवच आपल्याला हे पाप करण्याच्या मोहात पडण्यापासून परावृत्त करत नाही का?
१४. नीतिसूत्रे ६:३०-३५ मधून पाप करण्याविषयी कोणता धडा शिकता येतो?
१४ जारकर्माची कोणत्याही प्रकारे भरपाई करता येत नाही, या वस्तुस्थितीने, हे घोर स्वार्थी कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्यापासून परावृत्त होण्यास भाग पाडले पाहिजे. नीतिसूत्रे ६:३०-३५ मध्ये दाखवले आहे, की चोर भुकेला असल्यामुळे तो चोरी करतो हे एकवेळेला लोक समजून घेतील पण जो जारकर्म करतो त्याला लोक तुच्छ लेखतील कारण त्याच्या मनात वाईट हेतू असतो. जो “आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करितो.” मोशेच्या नियमशास्त्रानुसार अशा मनुष्याला जिवे मारले जायचे. (लेवीय २०:१०) आपली कामवासना तृप्त करण्यासाठी जारकर्म करणारी व्यक्ती इतरांना दुःख देते आणि अपश्चात्तापीपणे जारकर्म करणारा देवाच्या प्रीतीत राहत नाही तर त्याला शुद्ध ख्रिस्ती मंडळीतून काढून टाकले जाते.
शुद्ध विवेक राखा
१५. ‘डाग दिल्यासारख्या’ विवेकाची काय अवस्था असते?
१५ देवाच्या प्रीतीत राहायचे आहे तर पापाच्या बाबतीत, आपण आपला विवेक कोडगा बनवून चालणार नाही. हे स्पष्ट आहे की आपण जगाचे खालावलेले नैतिक दर्जे स्वीकारू नयेत शिवाय, आपण कोणते मित्र निवडतो, कोणते साहित्य वाचतो, कोणत्या प्रकारचे मनोरंजन करतो याबाबतीत देखील खबरदारी बाळगली पाहिजे. पौलाने अशी ताकीद दिली: “पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; ज्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धि तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१, २) ‘डाग दिल्यासारखा’ विवेक, भाजलेल्या त्वचेसारखा असतो ज्यावर व्रण असतात पण त्या ठिकाणी कसल्याही संवेदना नसतात. अशाप्रकारचा भावनाहीन विवेक आपल्याला, धर्मत्यागी लोकांपासून किंवा मग विश्वासापासून बहकवू शकणाऱ्या परिस्थितींपासून सावध राहण्याचा इशारा देणार नाही.
१६. शुद्ध विवेक बाळगणे महत्त्वाचे का आहे?
१६ शुद्ध विवेक बाळगण्यावरच आपले तारण आधारलेले आहे. (१ पेत्र ३:२१) येशूने वाहिलेल्या रक्तावरील विश्वासाच्या आधारावरच आपला विवेक निर्जीव कृत्यांपासून शुद्ध करण्यात आला होता जेणेकरून आपल्याला ‘जिवंत देवाची सेवा’ करता येईल. (इब्री लोकांस ९:१३, १४) आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो तर आपला विवेक अशुद्ध होईल आणि आपण देवाची सेवा करण्याच्या योग्यतेचे राहणार नाही. (तीत १:१५) पण यहोवाच्या मदतीने आपण शुद्ध विवेक बाळगू शकतो.
गैरवर्तन टाळण्याचे इतर मार्ग
१७. ‘यहोवाला पूर्णपणे अनुसरल्याने’ कोणता फायदा होऊ शकतो?
१७ प्राचीन इस्राएलमधील कालेबप्रमाणे ‘परमेश्वराला पूर्णपणे अनुसरा.’ (अनुवाद १:३४-३६) देव तुमच्याकडून जे काही अपेक्षितो ते पूर्ण करा आणि ‘भुतांच्या मेजावरचे’ खाण्याचा विचार देखील मनात आणू नका. (१ करिंथकर १०:२१) धर्मत्यागाचा धिक्कार करा. केवळ यहोवाच्या मेजावर वाढण्यात येणारे आध्यात्मिक अन्न कृतज्ञ मनोवृत्तीने सेवन करा. असे केल्यास तुमची, खोट्या शिक्षकांमुळे किंवा दुरात्म्यांमुळे केव्हाही फसगत होणार नाही. (इफिसकर ६:१२; यहुदा ३, ४) आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, जसे की बायबलचा अभ्यास करा, सभांना नियमित उपस्थित राहा, क्षेत्र सेवेत भाग घ्या. तुम्ही जर पूर्णपणे यहोवाला अनुसरले तर तुम्ही खचित आनंदी व्हाल. शिवाय प्रभूच्या कामात तुमच्याजवळ पुष्कळ काम असेल.—१ करिंथकर १५:५८.
१८. तुमच्या वागणुकीवर यहोवाच्या भयाचे परिणाम कसा होतो?
१८ ‘देवाची सेवा, आदर व भय धरून करण्याचा’ दृढनिश्चय करा. (इब्री लोकांस १२:२८) यहोवाबद्दलचे आदरयुक्त भय तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चुकीचे मार्गाक्रमण टाळण्यास प्रवृत्त करेल. देवाबद्दलचे भय तुम्हाला, पेत्राने आपल्या सहअभिषिक्त जनांना दिलेल्या सल्ल्याच्या अनुषंगाने कार्य करण्यासही साहाय्य करेल. पेत्राने असा सल्ला दिला: “जो तोंडदेखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करितो त्याला जर तुम्ही पिता, म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.”—१ पेत्र १:१७.
१९. देवाच्या वचनातून तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी तुम्ही सतत आपल्या जीवनात आचरणात का आणल्या पाहिजेत?
१९ देवाच्या वचनातून तुम्ही जे काही शिकता ते आपल्या जीवनात सदा आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही गंभीर पातके टाळू शकाल कारण तुम्ही हे शाबीत करून दाखवाल की तुम्ही, “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे” अशांपैकी एक आहात. (इब्री लोकांस ५:१४) आपली भाषा आणि आपले वर्तन यांत निष्काळजीपणा दाखवण्याऐवजी सतर्क राहा जेणेकरून तुम्ही या दुष्ट दिवसांत “वेळेचा सदुपयोग” करणाऱ्या सुज्ञ लोकांप्रमाणे व्हाल. “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घ्या आणि ती पूर्ण करीत राहा.—इफिसकर ५:१५-१७; २ पेत्र ३:१७.
२०. आपण लोभीपणा का टाळला पाहिजे?
२० इतरांचा ज्यावर हक्क आहे अशा गोष्टींच्या अभिलाषेला अर्थात लोभी इच्छेला मनात मुळीच थारा देऊ नका. दहा आज्ञांतील एक आज्ञा अशी आहे: “आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीहि वस्तु ह्यांचा लोभ धरू नको.” (निर्गम २०:१७) या आज्ञेमुळे, एखाद्याचे घर, त्याची पत्नी, त्याचे सेवक, त्याची गुरेढोरे इत्यादी सुरक्षित होते. परंतु याहूनही महत्त्वाचे येशूचे उद्गार आहेत. तो म्हणाला, की लोभीपणामुळे माणूस भ्रष्ट होतो.—मार्क ७:२०-२३.
२१, २२. पाप करण्याचे टाळण्याकरता एक ख्रिस्ती व्यक्ती कोणती प्रतिबंधक पावले उचलू शकते?
२१ चुकीच्या इच्छा तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाहीत म्हणून प्रतिबंधक पावले उचला. शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” (याकोब १:१४, १५) एखाद्याला पूर्वी पिण्याची सवय होती तर तो आपल्या घरात मादक पेये न ठेवण्याचे ठरवेल. विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबरचे गैरवर्तन टाळण्यासाठी एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीला कदाचित आपल्या कामाचे ठिकाण अथवा आपली नोकरी बदलावी लागेल.—नीतिसूत्रे ६:२३-२८.
२२ ज्यामुळे पाप घडू शकते असे पहिले पाऊलही उचलू नका. प्रणयचेष्टा व मनात अश्लील विचार घोळत राहू दिल्यास व्यभिचार किंवा जारकर्म यासारखी पातके घडू शकतात. लहानसहान लबाडींमुळे एखाद्याला मोठ्या लबाडी करण्याची धिटाई मिळू शकते आणि हळूहळू त्या व्यक्तीला लबाड बोलण्याची वाईट सवय लागू शकते. भुरट्या चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीचा विवेक हळूहळू इतका बोथट होऊन जातो की त्याला पुढे मोठमोठ्या चोऱ्या करण्याचे धाडस होते. एखादी व्यक्ती, धर्मत्यागी विचारसरणी जराही खपवून घेऊ लागली तर ती हळूहळू स्वतः धर्मत्यागी बनण्याच्या मार्गावर जणूकाय वाटचाल करू शकते.—नीतिसूत्रे ११:९; प्रकटीकरण २१:८.
तुमच्या हातून पाप झाले असेल तर?
२३, २४. २ इतिहास ६:२९, ३० आणि नीतिसूत्रे २८:१३ मधून कोणते सांत्वन मिळते?
२३ सर्व मानव अपरिपूर्ण आहेत. (उपदेशक ७:२०) पण तुमच्या हातून जर गंभीर पाप झाले असेल तर तुम्ही यहोवाच्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी राजा शलमोनाने केलेल्या प्रार्थनेतून बरेच सांत्वन मिळवू शकता. त्याने अशी प्रार्थना केली: “एखादा इस्राएली किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपणास होणारे क्लेश किंवा दु:ख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात या मंदिराकडे पसरून करितील, ती तू स्वर्गांतील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर; प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्यास फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस.”—२ इतिहास ६:२९, ३०.
२४ यहोवा आपले हृदय ओळखतो आणि तो क्षमाशील आहे. नीतिसूत्रे २८:१३ मध्ये म्हटले आहे: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाहीं, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” पश्चात्तापीपणे पाप कबूल करून ते सोडून दिल्यास एक व्यक्ती देवाची दया प्राप्त करू शकते. पण तुम्ही जर आध्यात्मिकरीत्या कमजोर झाला असाल तर आणखी कोणती गोष्ट तुम्हाला देवाच्या प्रीतीत राहण्यास मदत करू शकेल? (w०६ ११/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आपण स्वतःला देवाच्या प्रीतीत कसे राखू शकतो?
• देवाबद्दल व ख्रिस्ताबद्दलचे प्रेम आपल्याला पापी मार्गाक्रमण टाळण्यास कशाप्रकारे मदत करते?
• इतरांबद्दल खरे प्रेम बाळगल्यास आपण लैंगिक गैरवर्तनापासून परावृत्त का होतो?
• गैरवर्तन टाळण्याचे काही मार्ग कोणते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[७ पानांवरील चित्र]
देवाच्या प्रीतीत कसे राहायचे हे यहुदा आपल्याला दाखवून देतो
[९ पानांवरील चित्र]
विभक्त झालेल्या विवाहामुळे, निष्पाप सोबत्याला व मुलांना खूप मानसिक यातना सहन कराव्या लागतात
[१० पानांवरील चित्र]
कालेबप्रमाणे तुम्ही देखील ‘यहोवाला पूर्णपणे अनुसरण्याचा’ निश्चय केला आहे का?
[११ पानांवरील चित्र]
मोहाचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळावी म्हणून सतत प्रार्थना करा