व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?

आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?

आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?

“तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.”—मत्तय २२:३९.

१. आपले देवावर प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो?

 यहोवाची उपासना करणाऱ्‍यांकडून तो काय अपेक्षितो? मोजक्याच परंतु अतिशय अर्थभरीत शब्दांत येशूने या प्रश्‍नाचे सार दिले. तो म्हणाला, की यहोवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीती कर, ही सर्वात मोठी आज्ञा आहे. (मत्तय २२:३७; मार्क १२:३०) आपण मागच्या लेखात पाहिले, की देवावर प्रेम करण्यात, त्याने सांगितलेल्या गोष्टी आचरणे व त्याने दाखवलेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून त्याच्या आज्ञांचे पालन करणे समाविष्ट आहे. जे देवावर प्रेम करतात त्यांना त्याची इच्छा पूर्ण करायला जड जात नाही उलट आनंद होतो.—स्तोत्र ४०:८; १ योहान ५:२, ३.

२, ३. आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याबाबत असलेल्या आज्ञेकडे आपण लक्ष का दिले पाहिजे आणि कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

दुसरी मोठी आज्ञा पहिल्या आज्ञेशी जोडलेली आहे, असे सांगून येशू म्हणाला: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) आता आपण या आज्ञेकडे लक्ष देणार आहोत; तेही चांगल्या कारणासाठी. स्वार्थीपणा, प्रेमाचा विपर्यास केलेले रुप, ही आजच्या काळाची गुणलक्षणे आहेत. प्रेषित पौलाने लिहिले, की ‘शेवटल्या काळात’ लोक, एकमेकांवर नव्हे तर पैशावर, सुखविलासावर प्रेम करणारे होतील. अनेक लोक “ममताहीन” होतील किंवा एका बायबल भाषांतरानुसार “कुटुंबातील आपलेपणाची भावना नाहीशी होईल.” (२ तीमथ्य ३:१-४) येशू ख्रिस्ताने असे भाकीत केले: “पुष्कळ जण . . . एकमेकांस धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करितील; आणि . . . पुष्कळांची प्रीति थंडावेल.”—मत्तय २४:१०, १२.

परंतु, सर्वांचीच प्रीती थंडावेल असे येशूने म्हटले नाही, याकडे लक्ष द्या. यहोवा ज्या प्रकारची प्रीती अपेक्षितो आणि ज्या प्रकारचे प्रेम मिळण्याचा त्याचा हक्क आहे त्या प्रकारचे प्रेम दाखवणारे लोक पूर्वीपासून होते व पुढेही राहतील. यहोवावर खरोखर प्रेम करणारे, यहोवा ज्याप्रकारे लोकांकडे पाहतो त्याचप्रकारे त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. पण आपले शेजारी कोण आहेत ज्यांच्यावर आपण प्रेम केले पाहिजे? आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कसे केले पाहिजे? शास्त्रवचने आपल्याला या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे देतात.

माझा शेजारी कोण?

४. लेवीय अध्याय १९ नुसार यहुद्यांना कोणावर प्रेम करायचे होते?

स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर, ही दुसरी सर्वात मोठी आज्ञा आहे, असे त्या परुशाला सांगताना येशू इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेला एक विशिष्ट नियम सुचवत होता. तो लेवीय १९:१८ मध्ये लिहिण्यात आला आहे. त्याच अध्यायात यहुद्यांना आपल्या सहइस्राएली बांधवांव्यतिरिक्‍त असलेल्या इतरांना आपले शेजारी समजले पाहिजे, असे सांगण्यात आले होते. वचन ३४ यात म्हटले आहे: “तुमच्याबरोबर राहणाऱ्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा; कारण तुम्हीहि मिसर देशात परदेशीय होता.” यास्तव, गैरयहुदी असलेल्यांना व खासकरून यहूदीयमतानुसारी असलेल्यांना देखील इस्राएलांनी प्रेमाने वागवायचे होते.

५. शेजाऱ्‍यावर प्रीती कर, याचा यहुद्यांनी कसा अर्थ लावला?

पण येशूच्या दिवसांतील यहुदी धर्मपुढाऱ्‍यांचे वेगळे मत होते. काही धर्मपुढारी असे शिकवत होते, की “मित्र” आणि “शेजारी” या संज्ञा केवळ यहुद्यांना लागू होत होत्या. गैरयहुद्यांचा द्वेष केला पाहिजे. या शिक्षकांच्या मते, देवाची भक्‍ती करणाऱ्‍यांनी देवाची भक्‍ती न करणाऱ्‍यांना तुच्छ लेखले पाहिजे. “अशा वातावरणामुळे लोकांच्या मनातील द्वेषभावना कमी होणे अशक्यच होते. द्वेषभावनेला खतपाणी घालणाऱ्‍या पुष्कळ गोष्टी होत्या,” असे एक संदर्भ ग्रंथ म्हणतो.

६. शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याविषयी बोलताना येशूने कोणते दोन मुद्दे सांगितले?

डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने या मुद्द्‌याला हात घातला. कोणावर प्रेम केले पाहिजे या मुद्द्‌यावर त्याने प्रकाश टाकला. तो म्हणाला: “‘आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर व आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४३-४५) येथे येशूने दोन मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा, यहोवा चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना उदारतेने व दयाळुपणे वागतो. दुसरा मुद्दा, आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे.

७. प्रेमळ शोमरोन्याच्या दृष्टांतावरून आपण कोणता धडा शिकतो?

दुसऱ्‍या एका प्रसंगी, नियमशास्त्रात पारंगत असलेल्या एका यहुद्याने येशूला विचारले: “माझा शेजारी कोण?” तेव्हा येशूने त्याला एक दृष्टांत दिला. एक शोमरोनी रस्त्यावर चालला असताना तो, यहुदी असलेल्या एका माणसाला पाहतो ज्याला लुटारुंनी मारहाण करून त्याचे होते नव्हते ते सर्व लुटून नेले होते. यहुदी लोक सहसा शोमरोन्यांना तुच्छ लेखत. पण या शोमरोनी मनुष्याने अर्धमेला झालेल्या या यहुद्याच्या जखमांवर पट्टी बांधली आणि त्याला एका उतारशाळेत आणले जेथे तो बरा होऊ शकेल. या दृष्टांताचा धडा काय होता? शेजाऱ्‍यावरील आपल्या प्रेमाला कसल्याही सीमा असू नयेत; आपल्या जातीच्या, राष्ट्राच्या किंवा धर्माच्या नसलेल्या लोकांनाही आपण अशाप्रकारचे प्रेम दाखवले पाहिजे.—लूक १०:२५, २९, ३०, ३३-३७.

आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?

८. शेजाऱ्‍यावर प्रेम कसे करायचे, याबाबतीत लेवीय अध्याय १९ काय सांगतो?

देवावर प्रेम करणे ही जशी केवळ एक भावना नाही तर त्यात कार्य समाविष्ट आहे त्याचप्रकारे शेजाऱ्‍यावर प्रेम करणे ही देखील केवळ एक भावना नव्हे. लेवीय पुस्तकाच्या १९ व्या अध्यायात, देवाच्या लोकांना स्वतःसारखे आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्याचा आर्जव करणाऱ्‍या आज्ञेचा मागचा पुढचा संदर्भ पाहणे महत्त्वाचे आहे. तेथे आपण वाचतो, की इस्राएलांना, पीडित लोकांना व परदेशी लोकांनाही कापणीतील हिस्सा द्यावा अशी आज्ञा देण्यात आली होती. त्यामुळे येथे चोरी, फसवाफसवी किंवा खोटा व्यवहार करण्याचा प्रश्‍नच नव्हता. न्यायिक बाबतीत इस्राएली लोकांना निःपक्षपातीपणा दाखवायचा होता. आवश्‍यकता भासते तेव्हा ते सुधारणूक करू शकत असले तरीसुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते: “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको.” या आणि इतर अनेक आज्ञांचे सार पुढील शब्दांत देण्यात आले होते: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.”—लेवीय १९:९-११, १५, १७, १८.

९. यहोवाने इस्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून वेगळे राहण्याची आज्ञा का दिली?

इस्राएली लोकांनी एकमेकांवर प्रीती करायची होती तरीपण त्यांनी, जे खोट्या दैवतांची उपासना करीत होते अशा लोकांपासून वेगळे राहायचे होते. यहोवाने वाईट संगतीचे धोके आणि परिणाम यांविषयी त्यांना आधीच ताकीद दिली होती. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांनी ज्या राष्ट्रांना हाकलून लावायचे होते त्यांच्याविषयी यहोवाने अशी आज्ञा दिली: “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको; कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील; त्यामुळे तुमच्यावर परमेश्‍वराचा कोप भडकेल.”—अनुवाद ७:३, ४.

१०. आपण कोणत्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे?

१० अशाचप्रकारे, ख्रिश्‍चनांनी अशा सर्व लोकांबरोबर नातेसंबंध जोडण्याचे टाळले पाहिजे ज्यांच्यामुळे त्यांचा विश्‍वास कमकुवत होऊ शकेल. (१ करिंथकर १५:३३) आपल्याला असा सल्ला देण्यात येतो: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” विश्‍वास न ठेवणारे म्हणजे जे ख्रिस्ती मंडळीचा भाग नाहीत असे लोक. (२ करिंथकर ६:१४) शिवाय, ख्रिश्‍चनांना “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्यास आर्जवण्यात आले होते. (१ करिंथकर ७:३९) परंतु आपल्याप्रमाणे जे यहोवावर विश्‍वास ठेवत नाहीत अशा लोकांना आपण कदापि तुच्छ लेखू नये. ख्रिस्त पापी जनांसाठी मरण पावला व एकेकाळी दुष्कृत्ये करणाऱ्‍या अनेकांनी आपला मार्ग बदलला व देवाबरोबर त्यांचा समेट झाला.—रोमकर ५:८; १ करिंथकर ६:९-११.

११. यहोवाची सेवा न करणाऱ्‍यांवर प्रेम करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, व का?

११ देवाची सेवा न करणाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याच्या बाबतीत आपल्यापुढे खुद्द यहोवाचे उत्तम उदाहरण आहे ज्याचे आपण अनुकरण करू शकतो. त्याला वाईटाचा द्वेष असला तरी, वाईट मार्गांपासून मागे वळून सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी देऊन तो सर्वांना प्रेमळ-दया दाखवतो. (यहेज्केल १८:२३) “सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी” यहोवाची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) म्हणूनच येशूने आपल्या अनुयायांना प्रचार करण्याची, शिकवण्याची व “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” करण्याची आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) या कामात भाग घेऊन आपण दाखवतो, की आपण देव आणि शेजारी, या दोघांवर प्रेम करतो. आणि शेजाऱ्‍यांमध्ये आपल्या शत्रूंचा देखील समावेश होतो!

आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल प्रेम

१२. प्रेषित योहानाने आपल्या बांधवावर प्रेम करण्याविषयी काय लिहिले?

१२ प्रेषित पौलाने लिहिले: “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) ख्रिस्ती या नात्याने आपले एक कर्तव्य आहे. विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांवर अर्थात आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींवर प्रेम करण्याचे आपले कर्तव्य आहे. हे किती महत्त्वपूर्ण आहे? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजावताना प्रेषित योहानाने लिहिले: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे. . . . मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहान ३:१५; ४:२०) हे खरोखरच अतिशय जबरदस्त शब्द आहेत. येशू ख्रिस्ताने “नरहिंसक” अर्थात “मनुष्यघातक” आणि “लबाड” हे शब्द दियाबल सैतानासाठी उपयोगात आणले. (योहान ८:४४) आपल्यापैकी कोणालाही हे शब्द स्वतःला लागू व्हावेत असे वाटणार नाही!

१३. आपण आपल्या सहबांधवाना कशाप्रकारे प्रेम दाखवू शकतो?

१३ खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ‘एकमेकांवर प्रीति करावी, असे देवाने शिकविले आहे.’ (१ थेस्सलनीकाकर ४:९) आपण केवळ ‘आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने प्रीती’ केली पाहिजे. (१ योहान ३:१८) आपल्या “प्रीतीमध्ये ढोंग नसावे.” (रोमकर १२:९) प्रेम आपल्याला ईर्षावान, बढाईखोर, घमेंडी किंवा स्वार्थी न होता, दयाळु, कनवाळू, क्षमाशील, आणि सहनशील असण्यास प्रवृत्त करते. (१ करिंथकर १३:४, ५; इफिसकर ४:३२) ते आपल्याला “एकमेकांचे दास” होण्यास भाग पाडते. (गलतीकर ५:१३) येशूने आपल्या शिष्यांना, जसे त्याने त्यांच्यावर प्रेम केले तसे एकमेकांवर प्रेम करण्यास सांगितले. (योहान १३:३४) यास्तव, वेळ आलीच तर एका ख्रिश्‍चनाने आपल्या सहबांधवांसाठी आपला प्राण देखील देण्यास तयार असले पाहिजे.

१४. आपण कुटुंबात प्रेम कसे दाखवू शकतो?

१४ एका ख्रिस्ती कुटुंबात आणि विशेषकरून पती व पत्नीत प्रेम दिसून आले पाहिजे. विवाहबंधन इतके मजबूत असते की पौलाने म्हटले: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वत:वरच प्रीति करितो.” (इफिसकर ५:२८) पाच वचनांनंतर पौल पुन्हा हा सल्ला देतो. आपल्या पत्नीवर जिवापाड प्रेम करणारा पती मलाखीच्या दिवसांतील इस्राएली पुरुषांसारखा वागणार नाही ज्यांनी आपल्या सोबत्याशी विश्‍वासघात केला. (मलाखी २:१४) तो तिचा सांभाळ करील. ख्रिस्ताने मंडळीवर ज्याप्रकारे प्रेम केले त्याप्रकारे तो तिच्यावर प्रेम करेल. त्याचप्रकारे प्रेम, पत्नीला आपल्या पतीचा आदर करण्यास प्रवृत्त करेल.—इफिसकर ५:२५, २९-३३.

१५. बांधवांमधील प्रेम कार्यांत पाहून काही लोक काय म्हणायला व करायला प्रवृत्त झाले?

१५ अशाप्रकारचे प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे ओळखचिन्ह आहे, हे स्पष्ट झाले आहे. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) आपण एकमेकांवर प्रेम करतो हे पाहून लोक, आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि ज्याचे प्रतिनिधीत्व करतो त्या देवाकडे आकर्षित होतील. उदाहरणार्थ, मोझांबिकहून एका साक्षीदार कुटुंबाचा हा एक अहवाल आला आहे. “आम्ही असं पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. दुपारच्या वेळी जोराचा वारा आणि त्यानंतर गारांचा पाऊस सुरू झाला. सुसाट्याच्या वाऱ्‍यामुळे आमचं गवताचं घर नाश झालं आणि घरावरील पत्रे उडून गेले. जवळपासच्या मंडळ्यांतील बांधव येऊन आम्हाला पुन्हा आमचं घरं उभं करायला मदत करू लागले तेव्हा आश्‍चर्यचकीत झालेले आमचे शेजारी म्हणू लागले: ‘तुमचा धर्म खूपच चांगला आहे. आमच्या चर्चकडून आम्हाला कधीच अशी मदत मिळाली नाही.’ मग आम्ही त्यांना बायबलमधून योहान १३:३४, ३५ वाचून दाखवलं. आमचे पुष्कळ शेजारी आता बायबलचा अभ्यास करत आहेत.”

प्रत्येक व्यक्‍तीवर प्रेम

१६. सरसकट सर्वांना प्रेम दाखवण्यात व एकेका व्यक्‍तीला प्रेम दाखवण्यात काय फरक आहे?

१६ सरसकट सर्व शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवणे कठीण नाही. परंतु एकेका व्यक्‍तीला प्रेम दाखवण्याची गोष्ट वेगळी आहे. उदाहरणार्थ, काही लोक शेजाऱ्‍यांवरील प्रेम, एखाद्या धर्मादाय संस्थेला देणगी देऊन व्यक्‍त करतात. यापलिकडे ते आणखी प्रेम दाखवू शकत नाहीत. आम्ही शेजाऱ्‍यांवर प्रेम करतो असे केवळ म्हणणे सोपे आहे परंतु ज्याला आपली काळजी नाही अशा सहकर्मचाऱ्‍याला, शेजारी राहणाऱ्‍या एका वाईट व्यक्‍तीला किंवा आपले मन दुखावणाऱ्‍या आपल्या मित्राला वास्तविकतेत प्रेम दाखवणे तितके सोपे नाही.

१७, १८. येशूने लोकांबद्दल प्रेम कसे व्यक्‍त केले, आणि हे सर्व करण्यामागे त्याचा हेतू काय होता?

१७ एकेका व्यक्‍तीला प्रेम दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूकडून काही शिकू शकतो ज्याने हुबेहूब देवाचे गुण दाखवले. तो या जगाचे पाप हरण करण्यासाठी पृथ्वीवर आला असला तरी, त्याने एकेका व्यक्‍तीबद्दल—एका आजारी स्त्रीला, एका कुष्ठरोग्याला, एका मुलाला प्रेम दाखवले. (मत्तय ९:२०-२२; मार्क १:४०-४२; ७:२६, २९, ३०; योहान १:२९) तसेच आपणही, दैनंदिन जीवनात ज्या व्यक्‍तींबरोबर आपले उठणे-बसणे होते अशा व्यक्‍तींशी ज्याप्रकारे व्यवहार करतो त्याद्वारे त्यांच्यावर आपल्याला मनापासून प्रेम आहे हे दाखवतो.

१८ परंतु, शेजाऱ्‍यावरील प्रेम देवावरील प्रेमाशी संबंधित आहे, हे आपण केव्हाही विसरता कामा नये. येशूने गरीबांना मदत केली असली, रोग्यांना बरे केले असले आणि उपाशी लोकांना जेवू घातले असले तरी, या सर्व गोष्टी करण्यामागचा आणि लोकांच्या समूहाला शिकवण्यामागचा त्याचा हेतू, लोकांनी यहोवाबरोबर समेट करावा हाच होता. (२ करिंथकर ५:१९) येशूने सर्वकाही देवाच्या गौरवासाठी केले. आपण देवाचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या देवाचे हुबेहूब प्रतिबिंब आहोत, ही गोष्ट त्याने कधीही नजरेआड होऊ दिली नाही. (१ करिंथकर १०:३१) येशूचे अनुकरण करण्याद्वारे आपणही शेजाऱ्‍यांवर मनापासून प्रेम करू शकतो आणि त्याचबरोबर दुष्ट मानवांनी भरलेल्या जगापासून अलिप्त राहू शकतो.

स्वतःसारखे आपण शेजाऱ्‍यावर प्रेम कसे करतो?

१९, २०. स्वतःसारखे आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्याचा अर्थ काय होतो?

१९ येशूने म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” स्वतःची काळजी घेणे व उचितप्रकारचा स्वाभिमान बाळगणे हे स्वाभाविक आहे. असे नसते तर या आज्ञेला काही अर्थ राहिला नसता. परंतु आपण, स्वतःवर प्रेम करण्याची कल्पना आणि २ तीमथ्य ३:२ मध्ये प्रेषित पौलाने उल्लेखलेला स्वार्थीपणा यांत गल्लत करू नये. तर हे प्रेम स्वतःविषयीचा उचित अभिमान आहे. एका बायबल विद्वानाने या प्रेमाचे वर्णन अशा शब्दांत केले: “हे अहंकारी किंवा स्वतःला पीडा करून घेणारे प्रेम नव्हे तर संतुलित आत्म-प्रेम आहे.”

२० स्वतःसारखे इतरांवर प्रेम करणे म्हणजे, आपल्याबद्दल लोकांचे जसे मत असले पाहिजे असे आपल्याला वाटते व आपल्याला जसे लोकांनी वागवले पाहिजे असे वाटते तसेच इतरांनाही लेखणे व वागवणे. येशूने म्हटले: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) इतरजण आपल्याशी कसे वागले त्याचा विचार करत बसून मग त्यांच्याशी त्याप्रकारे वागायचे, असे येशूने सांगितले नाही. तर, लोकांनी आपल्याशी कसे वागलेले आपल्याला आवडेल याचा विचार करून त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी वागायचे. आणि येशूने, मित्रांनी व बांधवांनी असे शब्द वापरले नाहीत, याकडेही लक्ष द्या. त्याने “लोकांनी” हा शब्द वापरला. आपण सर्व लोकांबरोबर अर्थात आपल्याला भेटणाऱ्‍या सर्व लोकांबरोबर असे वागावे, हे सूचित करण्यासाठी कदाचित त्याने हा शब्द वापरला असावा.

२१. इतरांवर प्रेम करण्याद्वारे आपण काय दाखवतो?

२१ शेजाऱ्‍यावरील प्रेम आपल्याला वाईट गोष्टी करण्यापासून रोखेल. प्रेषित पौलाने लिहिले: “‘व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खून करू नको, लोभ धरू नको,’ ह्‍या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीहि आज्ञा असली तर तिचाहि सारांश, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर,’ ह्‍या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्‍यांचे काही वाईट करीत नाही.” (रोमकर १३:९, १०) प्रेम आपल्याला, इतरांचे भले होईल अशा गोष्टी करण्याची संधी शोधण्यास प्रवृत्त करेल. सहमानवांवर प्रेम करण्याद्वारे आपण दाखवून देऊ की ज्याने मानवाला आपल्या प्रतिरुपात बनवले त्या देवावर अर्थात यहोवावरही आपण प्रेम करतो.—उत्पत्ति १:२६. (w०६ १२/०१)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण कोणावर प्रेम केले पाहिजे व का?

• जे यहोवाची सेवा करीत नाहीत अशांवर आपण प्रेम करतो हे आपण कसे दाखवू शकतो?

• आपल्या बांधवांवर आपल्याला कोणत्याप्रकारचे प्रेम असले पाहिजे याचे बायबलमध्ये कशाप्रकारे वर्णन करण्यात आले आहे?

• आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम करण्याचा काय अर्थ होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

“माझा शेजारी कोण?”

[३० पानांवरील चित्र]

येशूने प्रत्येक व्यक्‍तीवर प्रेम केले