व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे

गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे

“काटेरी झुडुपामध्ये जसे भुईकमळ, तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.” “वनवृक्षामध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणामध्ये माझा वल्लभ.” “ही प्रभातीसारखी आरक्‍त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, . . . ती कोण?” (गीतरत्न २:२, ३; ६:१०) बायबलमधील गीतरत्न या पुस्तकातील ही वचने खरोखर किती उत्कृष्ट आहेत! हे सबंध पुस्तकच कवितेच्या रूपात असून ते इतके अर्थभरीत व सुरेख आहे की त्याकरता “गीतरत्न” हे नाव अगदी योग्य आहे.—गीतरत्न १:१.

हे गीत शलमोन राजाने सा.यु.पू. १०२० च्या सुमारास, त्याच्या ४० वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीला रचलेले असून, यात एक मेंढपाळ व शुलेमकरिणीची प्रेमकथा आहे. या गीतात शुलेमकरिणीची आई, तिचे भाऊ, ‘यरुशलेमेच्या कन्या [दरबारातील स्त्रिया]’ आणि ‘सियोनवासी कन्या [जेरुसलेमेत राहणाऱ्‍या स्त्रिया]’ यांचाही उल्लेख आढळतो. (गीतरत्न १:५; ३:११) गीतरत्न वाचताना काही ठिकाणी, हे शब्द कोणी उद्‌गारले आहेत हे चट्‌कन लक्षात येत नाही. पण शब्दांचा आशय लक्षात घेतल्यास ते शब्द कोणी उद्‌गारले आहेत हे ठरवता येते.

गीतरत्न हे पुस्तक देवाच्या वचनाचा भाग आहे व यातील माहिती दोन मुख्य कारणांमुळे अतिशय मोलवान आहे. (इब्री लोकांस ४:१२) सर्वप्रथम, स्त्री व पुरुषातले खरे प्रेम काय असते हे यावरून आपल्याला शिकायला मिळते. दुसरे म्हणजे, येशू ख्रिस्त व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीत असणारे प्रेम या कवितेतून लाक्षणिक रूपाने दिसून येते.—२ करिंथकर ११:२; इफिसकर ५:२५-३१.

“माझ्या मनात प्रेम जागृत” करू नका

(गीतरत्न १:१–३:५)

“तो मला मुखचुंबन देवो; तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे.” (गीतरत्न १:२) या शब्दांनी गीतरत्न या पुस्तकात वर्णन केलेले संभाषण सुरू होते. हे शब्द एका साध्या गावकरी मुलीचे आहेत. या मुलीला शलमोनाच्या शाही तंबूत आणण्यात आलेले आहे. ती येथे कशी काय पोचली?

ती सांगते, “माझे सहोदर बंधु मजवर संतप्त झाले. त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करावयास ठेविले.” तिचे भाऊ तिच्यावर संतप्त झाले होते कारण तिचे ज्या मेंढपाळ तरुणावर प्रेम आहे, त्याने तिला वसंतऋतूत एके दिवशी आपल्यासोबत रानात फिरायला बोलावले. तिने त्याच्यासोबत जाऊ नये म्हणून तिच्या भावांनी तिला ‘द्राक्षींच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्‍या लहान कोल्ह्यांपासून’ राखण करण्याकरता ठेवले. यामुळे ती शलमोनाच्या छावणीच्या आसपासच्या क्षेत्रात आली. ती “अक्रोडाच्या बागेत” गेली असता कोणाचीतरी या सुंदर मुलीवर नजर पडते आणि अशारितीने तिला छावणीत आणले जाते.—गीतरत्न १:६; २:१०-१५; ६:११.

शुलेमकरीण आपल्या प्रिय मेंढपाळाच्या आठवणीने व्याकूळ होते तेव्हा दरबारातील स्त्रिया तिला त्याचा शोध घेण्याकरता “शेरडामेंढरांच्या पावलांमागे पाऊल टाकून जा,” असे सांगतात. पण शलमोन तिला जाण्याची परवानगी देत नाही. तिच्या सौंदर्याची प्रशंसा करीत, तो तिला “चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे गोफ” देण्याचे वचन देतो. पण ती बाला या सर्व गोष्टींच्या मोहात पडत नाही. मेंढपाळ तरुण तिला शोधत शलमोनाच्या छावणीपर्यंत येतो आणि ती सापडल्यावर म्हणतो: “माझ्या सखे, तू सुंदर आहेस! अगे, तू सुंदर आहेस!” शुलेमकरीण दरबारातील स्त्रियांना अशी शपथ घालते की, “माझ्या मनात प्रेम जागृत करू नका.”—गीतरत्न १:८-११, १५; २:७, ३:५, NW.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:२, ३, पं.र.भा.—शुलेमकरिणीला आपल्या प्रियकराच्या प्रेमाची आठवण द्राक्षारसासारखी आणि त्याचे नाव सुवासिक तेलासारखे का वाटते? ज्याप्रमाणे द्राक्षारस मनुष्याचे अंतःकरण आनंदित करतो आणि डोक्यावर तेलाचा अभ्यंग केल्याने शरीर व मन शांत होते त्याचप्रमाणे आपल्या प्रियकराच्या प्रेमाच्या व त्याच्या नावाच्या आठवणीने शुलेमकरिणीला सांत्वन व दिलासा मिळतो. (स्तोत्र २३:५; १०४:१५) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही, विशेषतः अभिषिक्‍त जनांना येशू ख्रिस्ताने त्यांच्याबद्दल व्यक्‍त केलेल्या प्रेमाविषयी मनन केल्यावर धैर्य व सांत्वन मिळते.

१:५—ही गावकरी मुलगी आपल्या काळ्यासावळ्या रूपाची तुलना ‘केदाराच्या तंबूशी’ का करते? बकऱ्‍याच्या केसापासून तयार केलेल्या कापडाचा त्याकाळी बऱ्‍याच गोष्टींकरता उपयोग केला जात असे. (गणना ३१:२०) उदाहरणार्थ, “निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्‍याच्या केसाचे पडदे” करण्यात आले होते. (निर्गम २६:७) केदाराचे तंबू बहुधा काळ्या बकऱ्‍याच्या केसांपासून बनवलेले असण्याची शक्यता आहे. किंबहुना आजही बेदूइन लोकांचे तंबू याच कापडापासून बनवलेले असतात.

१:१५—“तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत” असे मेंढपाळ का म्हणतो? मेंढपाळ तरुण असे म्हणू इच्छितो की त्याच्या प्रेयसीच्या डोळ्यांत कबुतरांसारखा सौम्य व निर्दोष भाव दिसतो.

२:७; ३:५—दरबारातील स्त्रियांना शुलेमकरीण “वनांतील मृगींची, हरिणींची शपथ” का घालते? मृग व हरीण यांचे नाजूक सौंदर्य सर्वज्ञात आहे. तेव्हा, शुलेमकरीण दरबारातील स्त्रियांना जे जे काही सुंदर व नाजूक आहे त्या सर्व वस्तूंची शपथ घालून सांगते की त्यांनी तिच्या मनात प्रेम जागृत करू नये.

आपल्याकरता धडे:

१:२; २:६. एखादे जोडपे प्रणयराधन करत असते तेव्हा ते एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम शुद्ध मार्गांनी व्यक्‍त करू शकतात. पण खरे प्रेम व्यक्‍त करताना त्यांच्या कृती अशुद्ध वासनेचे रूप घेणार नाहीत आणि ओघाओघाने त्याचे पर्यवसान लैंगिक अनैतिकतेत होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे.—गलतीकर ५:१९.

१:६; २:१०-१५. शुलेमकरिणीच्या भावांनी आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत डोंगरांतल्या एकांत स्थळी जाऊ दिले नाही, याचा अर्थ ती वाईट चालीची होती किंवा तिचा हेतू वाईट होता असे नाही. उलट, मोहात पडण्यासारखी परिस्थितीच निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. प्रणयराधन करणाऱ्‍या जोडप्यांनी यावरून धडा घ्यावा व एकांतात एकमेकांना भेटण्याचे टाळावे.

२:१-३, ८, ९. शुलेमकरीण बाला सुंदर होती तरीसुद्धा तिने विनम्रपणे “मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे, मी खोऱ्‍यातले भुईकमळ [एक सर्वसामान्य फुल] आहे” असे म्हटले. तिच्या सौंदर्यामुळे व यहोवाला तिच्या विश्‍वासूपणामुळे मेंढपाळाने तिचे वर्णन “काटेरी झुडुपांमध्ये जसे भुईकमळ” असे केले. आणि त्याच्याविषयी काय म्हणता येईल? तो देखणा असल्यामुळे तिने त्याची तुलना ‘हरिणाशी’ केली. निश्‍चितच तो आध्यात्मिक मनोवृत्तीचा आणि यहोवाचा उपासक असेल. ती म्हणते, “वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ.” जीवनाचा साथीदार निवडताना विश्‍वासूपणा आणि सुभक्‍ती हे गुण असलेली व्यक्‍ती शोधणे श्रेयस्कर ठरणार नाही का?

२:७; ३:५. शुलेमकरिणीला शलमोनाबद्दल अजिबातच आकर्षण नव्हते. तिने दरबारातील स्त्रियांना अशी शपथही घातली होती की मेंढपाळाला सोडून दुसऱ्‍या कोणाबद्दलही त्यांनी तिच्या मनात प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करू नये. असेच कोणत्याही व्यक्‍तीबद्दल प्रणयभावना मनात येणे शक्य नाही आणि हे योग्यही नाही. अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तीने लग्नाचा विचार करताना, केवळ यहोवाच्या एकनिष्ठ उपासकाबद्दलच विचार करावा.—१ करिंथकर ७:३९.

“शुलेमकरिणीचे तुम्ही काय पाहू इच्छिता?”

(गीतरत्न ३:६–८:४)

“धुराच्या स्तंभांसारखे रानातून” काहीतरी येताना दिसत आहे. (गीतरत्न ३:६) जेरूसलेमच्या स्त्रिया बाहेर येऊन पाहतात तेव्हा त्यांना काय दिसते? शलमोन व त्याची माणसे शहराकडे परत येत आहेत! आणि राजाने आपल्यासोबत शुलेमकरीण कन्येला आणले आहे.

मेंढपाळ तरुणही आपल्या प्रेयसीच्या मागोमाग आला आहे आणि लवकरच तो तिची भेट घेण्याचा मार्ग शोधून काढतो. तो तिला आपल्या प्रेमाचे आश्‍वासन देतो तेव्हा ती शहर सोडून जाण्याची इच्छा व्यक्‍त करत म्हणते: “शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन.” ती मेंढपाळाला “आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन” करण्यास सांगते. तो तिला उत्तर देऊन म्हणतो, “हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे.” जेरूसलेमच्या स्त्रिया त्यांना म्हणतात: “मित्रहो, खा! प्रियजनहो प्या, मनमुराद प्या!”—गीतरत्न ४:६, १६; ५:१.

आपल्याला पडलेले एक स्वप्न दरबारातील स्त्रियांना सांगताना शुलेमकरीण त्यांना म्हणते: “मला प्रेमज्वर लागला आहे.” त्या तिला विचारतात, “तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे?” ती त्यांना उत्तर देते: “माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.” (गीतरत्न ५:२-१०) शलमोन तिची भरभरून स्तुती करतो तेव्हा ती नम्रपणे उत्तर देते: “शुलेमकरिणीचे तुम्ही काय पाहू इच्छिता?” (गीतरत्न ६:४-१३) तिचे मन जिंकण्याची ही एक संधी समजून राजा तिच्यावर आणखीनच स्तुतीसुमनांचा वर्षाव करतो. पण तिचे मन बदलत नाही; मेंढपाळाबद्दल तिच्या मनातले प्रेम कायम राहते. शेवटी, शलमोन तिला जाऊ देतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४:१; ६:५—शुलेमकरिणीच्या केसांची तुलना ‘शेरडांच्या कळपांशी’ का केलेली आहे? यावरून असे दिसते की तिचे केस बकऱ्‍यांच्या काळ्या केसांप्रमाणे काळेभोर व दाट होते.

४:११—शुलेमकरिणीच्या “ओठातून मध स्रवतो” आणि तिच्या “जिव्हेखाली मधु व दुग्ध ही आहेत” याचा काय अर्थ होतो? शुलेमकरिणीच्या ओठातून मध स्रवत असल्याच्या तुलनेतून, तसेच तिच्या जिव्हेखाली मध व दूध आहे या शब्दांवरून असे सूचित होते की तिचे बोलणे अतिशय लाघवी व मधुर आहे.

५:१२—“त्याचे डोळे ओढ्याच्या काठावरील होल्यांसारखे आहेत; ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत” या वाक्यांचा काय अर्थ आहे? येथे शुलेमकरीण आपल्या प्रियकराच्या सुंदर डोळ्यांचे वर्णन करत आहे. कदाचित त्याच्या डोळ्यांतील पांढऱ्‍या भागात उठून दिसणाऱ्‍या बुब्बुळाची तुलना ती जणू दुधात डुंबत असलेल्या करड्या रंगाच्या कबुतरांशी करत असावी.

५:१४, १५—मेंढपाळ तरुणाच्या हातांचे व पायांचे अशारितीने वर्णन का करण्यात आले आहे? शुलेमकरीण मेंढपाळाच्या बोटांची तुलना सुवर्ण नलिकांशी आणि त्याच्या नखांची तुलना पुष्परागाशी करते. त्याचे पाय बलवान व सुडौल असल्यामुळे ते “संगमरवरी स्तंभांसारखे” आहेत असे ती म्हणते.

६:४—शुलेमकरिणीची तुलना तिरसा नगरीशी का करण्यात आली आहे? हे यहोशवाने काबीज केलेल्या एका कनानी शहराचे नाव असून शलमोनाच्या काळानंतर हे शहर इस्राएलच्या दहा गोत्रांच्या उत्तर राज्याची पहिली राजधानी बनली. (यहोशवा १२:७, २४; १ राजे १६:५, ६, ८, १५) एका संदर्भ ग्रंथानुसार, “हे शहर नक्कीच अतिशय सुंदर असावे. म्हणूनच तर त्याचा येथे उल्लेख करण्यात आला आहे.”

६:१३—‘महनाईम येथील नृत्य’ म्हणजे काय? महनाईम नावाचे शहर यार्देन नदीच्या पूर्वेकडे यब्बोक नदीच्या खोऱ्‍याजवळ वसलेले होते. (उत्पत्ति ३२:२, २२; २ शमुवेल २:२९) ‘महमाईम येथील नृत्य’ या शहरात होणाऱ्‍या सणात जे नृत्य केले जात होते, त्याच्या संदर्भात म्हटलेले असावे.

७:४—शलमोनाने शुलेमकरिणीच्या मानेची तुलना ‘हस्तदंती मनोऱ्‍याशी’ का केली आहे? याआधी शुलेमकरिणीच्या प्रशंसेत असे म्हणण्यात आले होते, की ‘तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजासारखी आहे.’ (गीतरत्न ४:४) मनोरा अथवा बुरूज सहसा उंच व निमुळता असतो, शिवाय हस्तदंती अतिशय मुलायम असते. शलमोन शुलेमकरिणीच्या नाजूक, मुलायम मानेची येथे प्रशंसा करत आहे.

आपल्याकरता धडे:

४:१-७. शुलेमकरीण शलमोनाने दाखवलेल्या कोणत्याही आमिषाला बळी पडली नाही. यावरून तिने दाखवले की अपरिपूर्ण असूनही ती नैतिकदृष्ट्या निर्दोष होती. तिच्या नैतिक बळामुळे तिच्या शारीरिक सौंदर्यात भर पडली. ख्रिस्ती स्त्रियांनी तिचे अनुकरण करावे.

४:१२. कुंपण घातलेल्या सुंदर बागेप्रमाणे, जिच्यात केवळ कुलूप लावलेले दार उघडूनच प्रवेश करता येतो त्या बागेप्रमाणे शुलेमकरिणीने आपले प्रेम केवळ आपल्या भावी पतीकरता राखून ठेवलेले होते. अविवाहित ख्रिस्ती स्त्रिया व पुरुषांकरता हे किती उत्तम उदाहरण आहे!

‘परमेशाने प्रदीप्त केलेला अग्नी’

(गीतरत्न ८:५-१४)

शुलेमकरिणीला घरी परतताना पाहून तिचे भाऊ म्हणतात, “आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण?” यापूर्वी त्यांच्यापैकी एकाने असे म्हटले होते: “ती तटासारखी असली तर तिजवर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू.” पण आता तिच्या प्रेमाची परीक्षा झाली आहे आणि तिचे प्रेम कसोटीस खरे उतरले आहे. त्यामुळे ती म्हणते: “मी तटासारखी होते, माझे कुच बुरूजांसारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले.”—गीतरत्न ८:५, ९, १०.

खरे प्रेम हे यहोवाने ‘प्रदीप्त केलेला अग्नी आहे.’ का? कारण अशाप्रकारच्या प्रेमाचा उगम स्वतः यहोवा आहे. त्यानेच आपल्याला प्रेम करण्याची कुवत दिली आहे. या अग्नीच्या ज्वाला विझवता न येणाऱ्‍या आहेत. गीतरत्नातून स्पष्टपणे हे दिसून येते की स्त्रीपुरुषांतले प्रेम “मृत्यूसारखे प्रबळ” किंवा अटळ असू शकते.—गीतरत्न ८:६.

शलमोनाचे श्रेष्ठ गीत येशू ख्रिस्त व त्याची स्वर्गीय ‘वधू’ म्हटलेल्या वर्गात ज्यांचा समावेश होतो त्यांच्यामध्ये असलेल्या बंधनावरही प्रकाश टाकते. (प्रकटीकरण २१:२, ९) येशूला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल वाटणारे प्रेम हे कोणत्याही स्त्रीपुरुषाच्या प्रेमापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. वधू वर्गातील सदस्यांची निष्ठा देखील अढळ आहे. येशूने ‘दुसऱ्‍या मेंढरांकरताही’ प्रेमळपणे आपल्या जीवनाचे बलिदान दिले. (योहान १०:१६) त्याअर्थी सर्व खऱ्‍या उपासकांनी शुलेमकरिणीच्या अढळ प्रेमाचे व निष्ठेचे अनुकरण केले पाहिजे. (w०६ ११/१५)

[३, ४ पानांवरील चित्र]

जीवनाचा साथीदार शोधताना कोणत्या गुणांना महत्त्व द्यावे याविषयी गीतरत्नातून काय शिकायला मिळते?