व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा

तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा

तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा

“तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.”—मत्तय २२:३७.

१, २. सर्वात मोठी आज्ञा कोणती, हा प्रश्‍न का उद्‌भवला असावा?

 येशूच्या दिवसांतील परुशांमध्ये एका प्रश्‍नावर खूप वादविवाद चालला होता. मोशेच्या नियमशास्त्रातील ६०० पेक्षा अधिक नियमांपैकी कोणता नियम सर्वात महत्त्वपूर्ण होता? बलिदानाविषयी असलेला नियम सर्वात महत्त्वाचा होता का? कारण, पापांची क्षमा मिळण्यासाठी आणि देवाची उपकारस्तुती करण्यासाठी या दोन्ही कारणांसाठी बलिदाने अर्पिली जात होती. की, सुंतेविषयीचा नियम सर्वात महत्त्वाचा होता? हा विषय देखील महत्त्वाचाच होता कारण, सुंता हे यहोवाने अब्राहामाबरोबर केलेल्या कराराचे एक चिन्ह होते.—उत्पत्ति १७:९-१३.

दुसरीकडे पाहता, पुराणमतवाद्यांनी असा तर्क केला, की देवाने दिलेला प्रत्येक नियम महत्त्वाचा असल्यामुळे—त्यातील काही नियम कमी महत्त्वाचे वाटत असले तरी—कोणता तरी एक नियम इतरांपेक्षा उच्च किंवा महत्त्वाचा समजणे चूक ठरेल. त्यामुळे परुशांनी येशूचे या बाबतीत काय मत होते ते त्याला विचारले. ते त्याला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करीत होते. एक परुशी येशूजवळ आला आणि त्याने त्याला विचारले: “नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?”—मत्तय २२:३४-३६.

३. सर्वात मोठी आज्ञा कोणती असे येशूने म्हटले?

येशूने दिलेले उत्तर आज आपल्या दिवसांत अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तर देताना त्याने, खऱ्‍या उपासनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती आणि पुढेही काय राहील याचे सार दिले. अनुवाद ६:५ चा उल्लेख करीत त्याने म्हटले: “‘तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” परुशाने त्याला केवळ एका आज्ञेविषयी विचारले होते तरी येशूने त्याला आणखी एका आज्ञेविषयी सांगितले. लेवीय १९:१८ चा उल्लेख करीत तो म्हणाला: “हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.’” या दोन्ही आज्ञा शुद्ध उपासनेचे सार आहेत, असे येशूने मग सूचित केले. नियमांच्या यादीतील एका आज्ञेला दुसऱ्‍या आज्ञांपेक्षा कमीजास्त लेखल्याबद्दल त्याला कात्रीत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याकरता त्याने शेवटी असे म्हटले: “ह्‍या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” (मत्तय २२:३७-४०) या लेखात आपण या दोन्ही आज्ञांतील सर्वात मोठ्या आज्ञेवर चर्चा करणार आहोत. आपण देवावर प्रेम का केले पाहिजे? आपले देवावर प्रेम आहे हे आपण कसे व्यक्‍त करतो? आणि हे प्रेम आपण कसे विकसित करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे माहीत होणे महत्त्वाचे आहे कारण यहोवाला संतुष्ट करण्याकरता आपण संपूर्ण हृदयाने, जिवाने व मनाने त्याच्यावर प्रेम केले पाहिजे.

प्रीतीचे महत्त्व

४, ५. (क) येशूचे उत्तर ऐकून त्या परुशाला आश्‍चर्य का वाटले नाही? (ख) होमार्पणे व यज्ञ यांपेक्षा कोणती गोष्ट देवाला अधिक मोलाची वाटते?

येशूला प्रश्‍न विचारणाऱ्‍या परुशाला येशूचे उत्तर ऐकून धक्का बसला नाही किंवा आश्‍चर्यही वाटले नाही. त्याला माहीत होते, की देवावर प्रेम करणे हा खऱ्‍या उपासनेतील सर्वात महत्त्वाचा पैलू असला तरी पुष्कळ लोक तो पूर्ण करण्यात उणे पडत होते. प्रार्थना मंदिरांमध्ये, मोठ्याने शेमा [एक हिब्रू प्रार्थना] अर्थात विश्‍वासाचा अंगीकार, म्हणण्याची प्रथा होती आणि यात, येशूने ज्यातून उल्लेख केला त्या अनुवाद ६:४-९ मधील उताऱ्‍याचा समावेश होता. मार्कमधील समांतर अहवालानुसार येशूला प्रश्‍न विचारणारा परुशी मग त्याला म्हणतो: “गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’ आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने त्याच्यावर प्रीति करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति करणे हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्‍यापेक्षा अधिक आहे.”—मार्क १२:३२, ३३.

नियमशास्त्रानुसार होमार्पणे व यज्ञ करण्याची आवश्‍यकता असली तरी, आपल्या सेवकांनी हे सर्व प्रीतीने प्रवृत्त होऊन करण्याला यहोवा महत्त्व देतो. चुकीचा हेतू मनी बाळगून हजारो एडक्यांच्या बलिदानापेक्षा प्रेमाने व भक्‍तीने अर्पिलेली चिमणी यहोवाच्या नजरेत अधिक मोलाची होती. (मीखा ६:६-८) जेरुसलेमच्या मंदिरात येशूचे जिच्याकडे लक्ष गेले होते, त्या गरीब विधवेच्या अहवालाची आठवण करा. दानपेटीत तिने टाकलेल्या दोन दमड्यांनी एक चिमणीसुद्धा विकत घेता येत नव्हती. तरीपण, यहोवाला श्रीमंत लोकांनी टाकलेल्या दानापेक्षा या गरीब विधवेचे दान अधिक मोलाचे वाटले. कारण या गरीब विधवेने अगदी आपल्या हृदयापासून यहोवावर प्रेमाने प्रवृत्त होऊन दान टाकले होते, तर श्रीमंत लोकांनी आपल्या कमाईतून विपुलतेत मिळालेले धन टाकले होते. (मार्क १२:४१-४४) आपल्या सर्वांची परिस्थिती काहीही असो, तरीपण आपण सर्व जे त्याला देऊ शकतो, अर्थात आपण त्याच्यावर जे प्रेम दाखवतो ते त्याला मोलाचे वाटते, ही गोष्ट किती उत्तेजनदायक आहे!

६. प्रीतीच्या महत्त्वाविषयी पौलाने काय लिहिले?

खऱ्‍या उपासनेत प्रेम दाखवणे महत्त्वाचे आहे यावर जोर देताना प्रेषित पौलाने असे लिहिले: “मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्‍ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्‍वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्‍नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.” (१ करिंथकर १३:१-३) होय, आपली उपासना यहोवाने स्वीकारावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मग आपण यहोवावर आपले प्रेम आहे हे कसे दाखवू शकतो?

यहोवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो?

७, ८. यहोवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

पुष्कळ लोकांचा असा विश्‍वास आहे, की प्रेम ही एक अशी भावना आहे जिच्यावर आपण पूर्ण नियंत्रण करू शकत नाही; लोक प्रेमात पडण्याविषयी बोलतात. पण खरे प्रेम ही निव्वळ एक भावना नव्हे. तर ते आपल्याला कार्य करायला प्रवृत्त करते. बायबल प्रीतीचा उल्लेख “सर्वोत्कृष्ट मार्ग” असा करते ज्याला आपण आपले “ध्येय” बनवले पाहिजे. (१ करिंथकर १२:३१; १४:१) केवळ “शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी,” असे ख्रिश्‍चनांना उत्तेजन देण्यात आले आहे.—१ योहान ३:१८.

देवावर आपले प्रेम असेल तर आपण आपल्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे त्याला जे आवडते ते करण्यास, त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करून ते उंचावून धरण्यास प्रवृत्त होतो. जग आणि त्याच्या अभक्‍त मार्गांवर प्रेम न करण्यास ते आपल्याला प्रेरणा देते. (१ योहान २:१५, १६) जे देवावर प्रेम करतात ते वाईटाचा द्वेष करतात. (स्तोत्र ९७:१०) देवावर प्रेम करण्यात, शेजाऱ्‍यांवर प्रेम करणे देखील समाविष्ट आहे. याविषयी आपण पुढच्या लेखात आणखी सविस्तर पाहणार आहोत. तसेच, देवावर प्रेम करणे म्हणजे आज्ञाधारकता दाखवणे. बायबल म्हणते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.”—१ योहान ५:३.

९. येशूने देवावर त्याला असलेले प्रेम कसे प्रदर्शित केले?

देवावर प्रेम करण्याचा काय अर्थ होतो हे येशूने अतिशय उत्तमरीत्या दाखवून दिले. देवावर प्रेम असल्यामुळेच तर तो आपले स्वर्गीय निवासस्थान सोडून पृथ्वीवर मानव म्हणून आला. या प्रेमाने प्रवृत्त होऊन त्याने आपल्या कार्यांद्वारे व आपल्या शिकवणुकींद्वारे देवाचे गौरव केले. देवावर प्रेम असल्यामुळेच तर त्याने ‘आज्ञाधारकपणे मरण सोसले.’ (फिलिप्पैकर २:८) त्याच्या प्रेमाची अभिव्यक्‍ती असलेल्या या आज्ञाधारकतेमुळे विश्‍वासू मानवांना देवासमोर धार्मिक भूमिकेत उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला. पौलाने असे लिहिले: “जसे त्या एकाच मनुष्याच्या [आदामाच्या] आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्‍या एकाच मनुष्याच्या [येशू ख्रिस्ताच्या] आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.”—रोमकर ५:१९.

१०. देवावर प्रेम करण्यात आज्ञाधारकपणा कसा गोवलेला आहे?

१० येशूप्रमाणे आपणही देवाच्या आज्ञांचे पालन करून देवावर आपले प्रेम आहे हे दाखवून देतो. येशूचा प्रिय प्रेषित योहान याने असे लिहिले: “प्रीति हीच आहे, की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे.” (२ योहान ६) जे देवावर खरोखरच प्रेम करतात ते त्याच्याकडून मार्गदर्शनाची आतुरतेने अपेक्षा करतात. आपण स्वतःच्या बुद्धीने पावले नीट टाकू शकत नाही ही जाणीव असल्यामुळे ते देवाच्या बुद्धीवर भरवसा ठेवतात आणि त्याच्या प्रेमळ मार्गदर्शनाच्या अधीन होतात. (यिर्मया १०:२३) ते प्राचीन काळातल्या बिरुयातील प्रांजळ मनाच्या लोकांप्रमाणे आहेत ज्यांनी, देवाची इच्छा पूर्ण करण्याची उत्कट इच्छा असल्यामुळे “मोठ्या उत्सुकतेने” देवाच्या वचनाचा स्वीकार केला. (प्रेषितांची कृत्ये १७:११) देवाची इच्छा काय आहे हे चांगल्याप्रकारे समजण्याकरता त्यांनी शास्त्रवचनांचे बारकाईने परीक्षण केले. यामुळे त्यांना आज्ञाधारक राहून इतरही बाबतीत आपले प्रेम दाखवता येणार होते.

११. देवावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रेम करण्याचा काय अर्थ होतो?

११ येशूने म्हटल्याप्रमाणे, देवावर प्रेम करण्यात आपले संपूर्ण अंतःकरण, आपला जीव, आपली बुद्धी आणि आपली शक्‍ती गोवलेली आहे. (मार्क १२:३०) अशाप्रकारचे प्रेम हृदयापासून येते. यांत आपल्या भावना, इच्छा, अगदी आपले आंतरिक विचार गोवलेले असतात. आणि यामुळे यहोवाला संतुष्ट करण्याची आपली उत्कट इच्छा होते. आपण पूर्ण बुद्धीने देखील प्रेम करतो. आपली भक्‍ती ही अंधविश्‍वास नाही. आपण यहोवाच्या गुणांविषयी, त्याच्या दर्जांविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी शिकून घेऊन त्याला ओळखतो. यहोवाची सेवा करण्याकरता व त्याची स्तुती करण्याकरता आपण आपल्या जिवाचा, अर्थात आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा आणि आपल्या जीवनाचा उपयोग करतो. तसेच आपण आपल्या शक्‍तीचा देखील उपयोग करतो.

आपण यहोवावर प्रेम का केले पाहिजे?

१२. आपण देवावर प्रेम करावे अशी तो अपेक्षा का करतो?

१२ यहोवावर प्रेम करण्याचे एक कारण हे आहे की, आपण त्याचे गुण प्रतिबिंबित करावेत अशी तो अपेक्षा करतो. देव प्रीतीचा उगम आहे आणि प्रेम दाखवण्याच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. प्रेषित योहानाने ईश्‍वरप्रेरणेने असे लिहिले: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) मानवांना देवाच्या प्रतिरुपात बनवण्यात आले असल्यामुळे आपल्यात प्रेम दाखवण्याची क्षमता आहे. खरे पाहता, यहोवाचे सार्वभौमत्व त्याच्या प्रेमावरच आधारित आहे. ज्यांना त्याचे शासन करण्याचे धार्मिक मार्ग आवडतात व जे त्यावर चालू इच्छितात केवळ असेच लोक त्याला त्याची प्रजा म्हणून हवे आहेत. होय, सर्व सृष्टीत शांती व एकता टिकून राहण्याकरता प्रेमाची गरज आहे.

१३. (क) इस्राएली लोकांना ‘आपला देव यहोवा ह्‍याच्यावर प्रेम करण्यास’ का सांगण्यात आले होते? (ख) यहोवा आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो ते वाजवी का आहे?

१३ यहोवावर प्रेम करण्याचे आणखी एक कारण हे आहे, की त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. येशूने यहुद्यांना काय म्हटले त्याची आठवण करा: ‘तू आपला देव यहोवा ह्‍याच्यावर प्रेम कर.’ त्यांना कोणत्याही निर्गुण निराकार देवावर जो कुठेतरी खूप दूर व अज्ञात आहे त्याच्यावर प्रेम करायचे नव्हते तर ज्याने स्वतःचे प्रेम प्रकट केले होते अशा देवावर प्रेम करायचे होते. यहोवा त्यांचा देव होता. त्यानेच या लोकांना इजिप्त देशातून सोडवून वचनयुक्‍त देशात आणले होते. त्यांचे संरक्षण करणारा, त्यांना सांभाळून ठेवणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांना शिस्त लावणारा तोच तर होता. आणि आज यहोवा आपला देव आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे खंडणी बलिदान दिले. तेव्हा, यहोवा आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो हे किती वाजवी आहे! आपले प्रेम हे देवाच्या प्रेमाला दिलेला प्रतिसाद आहे. ज्याने आपल्यावर प्रेम केले त्याच्यावर आपणही प्रेम करावे असे आपल्याला सांगण्यात आले आहे. ‘पहिल्याने ज्याने आपणावर प्रीती केली’ त्या देवावर आपले प्रेम आहे.—१ योहान ४:१९.

१४. यहोवाने दाखवलेले प्रेम एका प्रेमळ पालकाप्रमाणे कसे आहे?

१४ यहोवाने मानवजातीला दाखवलेले प्रेम, एक प्रेमळ पालक आपल्या मुलांना दाखवत असलेल्या प्रेमासारखे आहे. अपरिपूर्ण असूनही, प्रेमळ पालक आपल्या मुलांची काळजी घेण्याकरता रक्‍ताचे पाणी करून आपल्या मुलांना वाढवतात. पालक आपल्या मुलांना शिक्षण, उत्तेजन, आधार व शिस्त देतात कारण त्यांची इच्छा असते की आपल्या मुलांनी सुखी व्हावे, त्यांची समृद्धी व्हावी. याच्या बदल्यात पालक काय अपेक्षा करतात? आपल्या मुलांनी आपल्यावर प्रेम करावे व त्यांच्या भल्यासाठी जे काही सांगण्यात आले आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशीच अपेक्षा ते करतात. मग, आपला परिपूर्ण पिता, त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण प्रेमाने प्रवृत्त होऊन कृतज्ञता दाखवावी अशी जी अपेक्षा तो करतो त्यात काही वावगे आहे का?

देवाबद्दल प्रेम विकसित करणे

१५. देवाबद्दल प्रेम विकसित करण्याचे पहिले पाऊल कोणते?

१५ आपण देवाला पाहिलेले नाही किंवा त्याचा आवाजही ऐकलेला नाही. (योहान १:१८) तरीपण तो आपल्याला त्याच्याबरोबर नातेसंबंध जोडण्याचे आमंत्रण देतो. (याकोब ४:८) हे आपण कसे करू शकतो? कोणावरही प्रेम करायला सुरवात करतानाचे पहिले पाऊल आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो; आपण ज्याला ओळखत नाही अशा कोणावर आपण गहिरे प्रेम करू शकत नाही. यहोवाने आपल्याला त्याचे वचन बायबल दिले असल्यामुळे आपण त्याच्याविषयी शिकू शकतो. म्हणूनच आपल्या संघटनेमार्फत यहोवा आपल्याला बायबल नियमितरीत्या वाचण्याचे उत्तेजन देतो. केवळ बायबलच आपल्याला देवाविषयी, त्याच्या गुणांविषयी, त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी आणि हजारो वर्षांपूर्वी त्याने आपल्या लोकांबरोबर कशाप्रकारचे व्यवहार केले त्याविषयीची माहिती देते. या अशा अहवालांवर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा आपल्या मनात यहोवाबद्दलची कृतज्ञता व प्रेम वाढते.—रोमकर १५:४.

१६. येशूच्या सेवेवर मनन केल्यास आपल्या मनात देवावरील प्रेम कसे वाढते?

१६ यहोवावरचे प्रेम आणखी वाढवण्याचा एक प्रमुख मार्ग आहे, येशूचे जीवन आणि त्याची सेवा यांवर मनन करणे. वास्तविक पाहता, येशू आपल्या पित्याचे इतके हुबेहूब प्रतिबिंब होता की तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) विधवेच्या एकुलत्या एका पुत्राला पुन्हा जिवंत करून येशूने दाखवलेली दया पाहून तुमचे हृदय भरून येत नाही का? (लूक ७:११-१५) देवाचा पुत्र आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य असलेल्या येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुवून किती नम्रता दाखवली, हे माहीत झाल्यावर तुम्ही त्याच्याकडे आकर्षित झाला नाहीत का? (योहान १३:३-५) तो इतर सर्व मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ व बुद्धिमान होता तरीपण त्याने स्वतःला इतके लीन केले होते, की त्याच्याजवळ कोणालाही अगदी मुलांनाही यायला संकोच वाटत नव्हता, हे माहीत झाल्यावर तुम्ही प्रभावीत झाला नाहीत का? (मार्क १०:१३, १४) या सर्व गोष्टींवर जेव्हा आपण कृतज्ञापूर्वक मनन करतो तेव्हा आपण अशा ख्रिश्‍चनांप्रमाणे बनतो ज्यांच्याविषयी पेत्राने असे लिहिले: “त्याला [येशूला] पाहिले नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता.” (१ पेत्र १:८) येशूबद्दल आपल्या मनात जसे प्रेम वाढत राहील तसेच यहोवाबद्दलही वाढत राहील.

१७, १८. यहोवाने आपल्यासाठी केलेल्या कोणत्या प्रेमळ तरतूदी आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढवू शकतात?

१७ देवाबद्दल प्रेम वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे जीवनाचा आनंद लुटण्याकरता त्याने केलेल्या विपुल तरतूदींवर मनन करणे. सृष्टीसौंदर्य, खाण्याकरता बनवलेले तऱ्‍हेतऱ्‍हेचे पदार्थ, चांगल्या मित्रांचा प्रेमळ सहवास तसेच आपल्याला आनंद व समाधान देणाऱ्‍या इतर अनेक सुखकारक गोष्टी, या त्या विपुल तरतूदी आहेत ज्या त्याने आपल्यासाठी बनवल्या आहेत. (प्रेषितांची कृत्ये १४:१७) आपण जितके अधिक देवाविषयी शिकू तितकी अधिक कारणे आपल्याला त्याच्या असीम चांगुलपणाची व उदारपणाची कृतज्ञता करण्यासाठी मिळतात. तुमच्यासाठी व्यक्‍तिशः यहोवाने केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करा. तुम्ही त्याच्यावर खरोखरच प्रेम केले पाहिजे, असे नाही का वाटत तुम्हाला?

१८ देवाने दिलेल्या देणग्यांतील एक देणगी आहे, त्याच्याशी प्रार्थनेद्वारे केव्हाही बोलण्याची आपल्याला मिळालेली संधी. तो ‘प्रार्थना ऐकणारा’ देव असल्यामुळे आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा तो त्या ऐकतो. (स्तोत्र ६५:२) यहोवाने आपल्या प्रिय पुत्रावर राज्य करण्याचा व न्याय करण्याचा अधिकार सोपवला आहे. परंतु, त्याने कोणालाही, आपल्या पुत्राला देखील प्रार्थना ऐकण्याचा अधिकार दिलेला नाही! तो स्वतः आपल्या प्रार्थना ऐकतो. यहोवा आपल्याला दाखवत असलेले प्रेम आणि तो जातीने आपल्याकडे लक्ष देतो म्हणून आपण त्याच्याकडे आकर्षित होतो.

१९. यहोवाने दिलेल्या कोणत्या अभिवचनांमुळे आपण त्याच्याजवळ येतो?

१९ मानवजातीसाठी त्याने काय राखून ठेवले आहे याचाही जेव्हा आपण विचार करतो तेव्हाही आपण त्याच्याकडे खेचले जातो. आजारपण, दुःख आणि मृत्यू यांचा अंत करण्याचे त्याने वचन दिले आहे. (प्रकटीकरण २१:३, ४) मानवजातीला परिपूर्ण केल्यानंतर कोणालाही नैराश्‍य, निरुत्साह किंवा दुर्घटना सहन करावी लागणार नाही. उपासमार, दारिद्र्‌य, युद्ध इतिहासजमा होईल. (स्तोत्र ४६:९; ७२:१६) पृथ्वीचे नंदनवन होईल. (लूक २३:४३) यहोवा हे सर्व आशीर्वाद आपल्याला, त्याला द्यावे लागत आहेत म्हणून नव्हे तर त्याचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून देणार आहे.

२०. यहोवावर प्रेम केल्याने मिळणाऱ्‍या फायद्यांविषयी मोशेने काय म्हटले?

२० तेव्हा, आपल्या देवावर प्रेम करण्याकरता आणि हे प्रेम असेच वाढत राहण्याकरता पुष्कळ ठोस कारणे आहेत. आपण देवावरचे आपले प्रेम वाढवत राहू का? आपल्याला मार्गदर्शन देण्याची आपण त्याला अनुमती देऊ का? निवड आपण करायची आहे. यहोवाबद्दल प्रेम विकसित करून ते टिकवून ठेवण्यात किती फायदा आहे हे मोशेने जाणले होते. प्राचीन काळच्या इस्राएलांना त्याने म्हटले: “तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील.”—अनुवाद ३०:१९, २०. (w०६ १२/०१)

तुम्हाला आठवते का?

• आपण यहोवावर प्रेम करणे महत्त्वाचे का आहे?

• यहोवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे व्यक्‍त करू शकतो?

• यहोवावर प्रेम करण्याकरता आपल्याजवळ कोणती कारणे आहेत?

• यहोवाबद्दल प्रेम आपण कसे विकसित करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

आपण सर्व यहोवाला जे प्रेम व्यक्‍त करू शकतो त्याची त्याला खरोखरच कदर आहे

[२३ पानांवरील चित्रे]

“ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान १४:९