व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे

यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे

“मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” असे यहोवाने आवाहन केले तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने असे उत्तर दिले: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया १:१; ६:८) तेव्हा त्याला संदेष्टा म्हणून कार्य करण्यासाठी नेमण्यात आले. यशयाने एक संदेष्टा या नात्याने काय काय केले हे त्याचेच नाव असलेल्या बायबलमधील एका पुस्तकात लिहून ठेवलेले आहे.

यशया नावाचे हे पुस्तक संदेष्टा यशयानेच लिहिलेले असून सा.यु.पू. ७७८ ते सा.यु.पू. ७३२ या दरम्यानच्या एकूण ४६ वर्षांच्या कालावधीत ते लिहिण्यात आले. या पुस्तकात यहुदा, इस्राएल व आसपासच्या राष्ट्रांविरुद्ध घोषित केलेले न्यायसंदेश आहेत खरे, पण या पुस्तकाचा मुख्य विषय केवळ न्यायदंड हा नाही. उलट यहोवा ‘देवाने केलेले तारण’ हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. (यशया २५:९) यशया या नावाचाच अर्थ खरे तर, “यहोवाने केलेले तारण” असा आहे. या लेखात यशया १:१–३५:१० यातील मुख्य मुद्द्‌यांची चर्चा केली जाईल.

‘अवशेष परत येईल’

(यशया १:१–१२:६)

यशया पुस्तकातील पहिल्या पाच अध्यायांत लिहिलेला संदेश, यशयाला संदेष्टा म्हणून नियुक्‍त करण्याआधी लिहिण्यात आला किंवा कसे, याविषयी बायबलमध्ये काहीही सांगितलेले नाही. (यशया ६:६-९) पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते, ती अशी की यहुदा व जेरुसलेम यांची “पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत” आध्यात्मिकरित्या रोगट अवस्था झाली आहे. (यशया १:६) राष्ट्रात मूर्तिपूजा बोकाळली आहे. राष्ट्राचे पुढारी नीतिभ्रष्ट झाले आहेत. स्त्रिया गर्विष्ठ झाल्या आहेत. लोक खऱ्‍या देवाची योग्य मार्गाने उपासना करत नाहीत. यशयाला वारंवार जाऊन अशा लोकांना देवाचे संदेश सांगण्याचे काम देण्यात येते, की जे ‘ऐकत राहतात’ पण त्या संदेशांचा अर्थ समजून घेत नाहीत आणि समजून घेण्याची त्यांना इच्छाही नाही.

यहुदावर इस्राएल व सिरिया या देशांच्या एकत्रित सैन्याचा हल्ला होणार आहे. यशया व त्याच्या मुलांचा “चिन्हे व उत्पात” म्हणून वापर करून यहोवा यहुदाला हे आश्‍वासन देतो की इस्राएल व सिरियाचे एकत्रित सैन्य यशस्वी होणार नाही. (यशया ८:१८) पण चिरकालिक शांती मात्र केवळ ‘शांतीचा अधिपतीच’ आपल्या शासनाकरवी आणेल. (यशया ९:६, ७) तसेच, यहोवा आपल्या “क्रोधाची काठी” म्हणून ज्या अश्‍शूर राष्ट्राचा वापर करतो त्यांच्याकडूनही तो हिशेब मागेल. यहुदाच्या रहिवाशांना शेवटी बंदिवासात नेले जाईल पण त्यांच्यातील ‘अवशेष परत येईल.’ (यशया १०:५, २१, २२) लाक्षणिक अर्थाने, “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल” व त्याच्या शासनात खरा न्याय पृथ्वीवर स्थापन होईल.—यशया ११:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:८, ९—“सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यांतल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी . . . राहिली आहे” हे कोणत्या अर्थाने? याचा अर्थ असा होतो की अश्‍शूरी सैन्याचा हल्ला होईल तेव्हा जेरूसलेम नगरी, द्राक्षीच्या मळ्यांतल्या किंवा काकड्यांच्या बागेतल्या कच्च्या आणि सहज पडू शकणाऱ्‍या झोपडीसारखी अगदीच असहाय्य दिसेल. पण यहोवा तिच्या मदतीला धावून येतो आणि त्यामुळे तिची दशा सदोम व गमोरासारखी होत नाही.

१:१८—“चला, या, आपण बुद्धिवाद करू” या शब्दांचा काय अर्थ होतो? विचारविनिमय करून आपसात काहीतरी संगनमत करण्याकरता किंवा तडजोड करण्याकरता यहोवा त्यांना बोलावत आहे असा याचा अर्थ नाही. उलट, या वचनात एक जाहीर न्यायपीठ स्थापन करण्याविषयी सांगितले आहे ज्यात न्यायनिष्ठ न्यायाधीश यहोवा इस्राएल राष्ट्राला आपले मार्ग बदलून स्वतःस शुद्ध करण्याची एक संधी देतो.

६:८क—या वचनात “मी” आणि “आमच्यासाठी” हे सर्वनाम का वापरले आहेत? “मी” हे सर्वनाम यहोवा देवाच्या संदर्भात वापरले आहे. “आमच्यासाठी” या बहुवचनी सर्वनामावरून असे दिसून येते की यहोवासोबत आणखीही एक व्यक्‍ती आहे. ही व्यक्‍ती म्हणजे अर्थातच त्याचा “एकुलता एक पुत्र” आहे.—योहान १:१४; ३:१६.

६:११—“हे प्रभू, असे कोठवर?” असे यशयाने का म्हटले? देवाकडील संदेशांना जराही प्रतिसाद न देणाऱ्‍या लोकांना जाऊन, आणखी कोठवर हे संदेश द्यावे लागतील असे यशया यहोवाला विचारत नव्हता. तर, या लोकांच्या आध्यात्मिकरित्या रोगट अवस्थेमुळे आणखी कोठवर देवाच्या नावाचा अनादर होत राहणार हे यशया जाणून घेऊ इच्छित होता.

७:३, ४—यहोवाने आहाज या दुष्ट राजाचे तारण का केले? सिरिया व इस्राएलच्या राजांनी यहुदाच्या आहाज राजाला राजपदावरून काढून त्याच्या जागी, ताबेलाचा पुत्र, हा त्यांच्या इशाऱ्‍यांवर नाचणारा राजा नियुक्‍त करायचे ठरवले. हा ताबेलाचा पुत्र दाविदाचा वंशज नव्हता. ही दुष्ट योजना नक्कीच दियाबलाची होती कारण हा बेत जर सफल झाला असता तर दाविदासोबत यहोवाने केलेल्या राज्याच्या कराराची पूर्णता होण्यात बाधा आली असती. “शांतिचा अधिपती” ज्या वंशावळीतून येणार होता त्या वंशावळीचे रक्षण करण्याकरता यहोवाने आहाजाचे रक्षण केले.—यशया ९:६.

७:८—पासष्ट वर्षांच्या आत एफ्राइम कशाप्रकारे ‘भंग पावले?’ यशयाने ही भविष्यवाणी केल्यानंतर काही काळातच, “इस्राएलाचा राजा पेकह” याच्या राज्यात दहा गोत्रांच्या राज्यातील लोकांना हद्दपार करण्यात आले आणि त्यांच्याऐवजी विदेशी लोकांना आणून या देशात वसवण्यास सुरुवात झाली. (२ राजे १५:२९) हे यानंतर बराच काळ, म्हणजे सन्हेरीबाचा पुत्र व वारस, राजा एसर-हद्दोन याच्या काळापर्यंत चालले. (२ राजे १७:६; एज्रा ४:१, २; यशया ३७:३७, ३८) अश्‍शूरी लोकांकरवी एफ्राइमातील लोकांना हद्दपार करण्यास व विदेशी लोकांना येथे वसवण्यास यशया ७:८ यात सांगितल्याप्रमाणे ६५ वर्षांचा काळ लागला असावा.

११:१, १०, पं.र.भा.—येशू ख्रिस्त हा “इशायाच्या बुडख्यापासून [निघालेले] कोंब” आणि त्याचवेळी “इशायाचे मूळ” कसा काय असू शकतो? (रोमकर १५:१२) येशूचा शारीरिकरित्या कसा जन्म झाला याचा विचार केल्यास, त्याला ‘इशायाच्या बुडख्यापासून निघालेले कोंब’ म्हणता येईल. कारण तो इशायाचा पुत्र दावीद याचा वंशज होता. (मत्तय १:१-६; लूक ३:२३-३२) पण, येशूला राज्याचा अधिकार मिळाल्यामुळे त्याच्या पूर्वजांसोबतच्या त्याच्या नातेसंबंधाला एक नवा अर्थ लाभला. आज्ञाधारक मानवजातीला पृथ्वीवर सार्वकालिक जीवन देण्याचे सामर्थ्य व अधिकार येशूला देण्यात आला असल्यामुळे तो त्यांचा “सनातन पिता” बनतो. (यशया ९:६) त्याअर्थी तो त्याच्या पूर्वजांचा “मूळ” ठरतो आणि यात अर्थातच इशायाचाही समावेश आहे.

आपल्याकरता धडे:

१:३. आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञांचा जीवनात अवलंब करण्यास आपण नकार दिल्यास आपल्याला बैलांपेक्षा व गाढवांपेक्षाही कमी ज्ञान आहे असे दिसून येईल. दुसरीकडे पाहता, यहोवाने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती बाळगल्यास, अविचारीपणे वागण्यापासून व त्याच्या मार्गांचा त्याग करण्यापासून आपले रक्षण होईल.

१:११-१३. दांभिक धार्मिक विधी व निव्वळ औपचारिक प्रार्थना यांचा यहोवाला वीट आहे. आपल्या सर्व कृती व प्रार्थना योग्य हेतूने केलेल्या असल्या पाहिजे.

१:२५-२७; २:२; ४:२, ३. यहुदा देशाची बंदिवान व ओसाड अवस्था संपून पश्‍चात्तापी शेषवर्ग जेरूसलेमला परतणार होता व खरी उपासना पुन्हा एकदा स्थापन होणार होती. पश्‍चात्ताप व्यक्‍त करणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करतो.

२:२-४. राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात जेव्हा आपण आवेशाने सहभाग घेतो तेव्हा अनेक राष्ट्रांच्या लोकांना शांतीचा मार्ग शिकून घेण्याची व त्या मार्गाचा अवलंब करण्याची संधी मिळते.

४:४. यहोवा सर्व प्रकारची नैतिक मलीनता आणि रक्‍तदोष काढून टाकेल.

५:११-१३. करमणूक निवडताना संयम व संतुलन सोडून वागणे हे अज्ञानीपणाचे कृत्य ठरेल.—रोमकर १३:१३.

५:२१-२३. ख्रिस्ती वडील किंवा पर्यवेक्षकांनी “आपल्या दृष्टीने ज्ञानी” असू नये. तसेच, ‘द्राक्षारस पिण्याच्या’ बाबतीत त्यांनी संयम दाखवावा व कधीही पक्षपात करू नये.

११:३क. येशूच्या उदाहरणावरून व शिकवणुकींवरून दिसून येते की यहोवाचे भय मानणे आनंददायक आहे.

“याकोबावर परमेश्‍वर दया करील”

(यशया १३:१–३५:१०)

अध्याय १३ ते २३ यांत राष्ट्रांविरुद्ध दिलेले न्यायसंदेश आहेत. पण ‘याकोबावर दया करून’ यहोवा इस्राएलच्या सर्व गोत्रांना आपल्या मायदेशी परतण्याची संधी देईल. (यशया १४:१) अध्याय २४ ते २७ यांत यहुदा ओसाड होईल असे भाकीत करण्यासोबतच त्याचे पुनर्स्थापन केले जाईल असे आश्‍वासनही दिले आहे. सिरियासोबत सख्य केल्याबद्दल यहोवा ‘एफ्राइमातील मद्यप्यांविरुद्ध’ तसेच, अश्‍शूरासोबत सख्य करू पाहणाऱ्‍या यहुदातील ‘याजक व संदेष्ट्यांविरुद्ध’ क्रोध व्यक्‍त करतो. (यशया २८:१, ७) “अरीएल” अर्थात जेरूसलेम नगराने संरक्षणाकरता ‘मिसराची वाट धरिल्याबद्दल’ त्यावर अनर्थ येईल असे भाकीत केले जाते. (यशया २९:१; ३०:१, २) तरीसुद्धा, जे यहोवावर विश्‍वास ठेवतात त्यांचे तारण होईल असे भविष्यवाणीत सांगितले आहे.

‘तरुण सिंह आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असतो’ त्याप्रमाणे यहोवा ‘सियोन डोंगराचे’ रक्षण करेल. (यशया ३१:४) एक प्रतिज्ञा देखील देण्यात आली आहे: “पाहा, राजा धर्माने राज्य करील.” (यशया ३२:१) अश्‍शूऱ्‍यांच्या धमकावण्यामुळे यहुदातील “शांतीचा संदेश आणणारे” देखील स्फुंदून स्फुंदून रडतात पण यहोवा आश्‍वासन देतो की त्याच्या लोकांना निरोगी केले जाईल व त्यांच्या ‘पातकांची क्षमा’ केली जाईल. (यशया ३३:७, २२-२४) “परमेश्‍वराचा कोप सर्व राष्ट्रावर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यावर होत आहे.” (यशया ३४:२) यहुदा ओसाड राहणार नाही. “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.”—यशया ३५:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१३:१७—मेदी लोक रुप्याची परवा करणार नाहीत व सोन्याने खुष होणार नाहीत हे भाकीत कशाप्रकारे पूर्ण झाले? मेदी व फारसी लोकांच्या दृष्टीने युद्धात विजयी झाल्यामुळे मिळणारी महिमा ही युद्धात लुटलेल्या वस्तूंपेक्षा जास्त मौल्यवान होती. कोरेशाच्या बाबतीत हे खरे ठरले. त्याने नबुखेदनस्सरने यहोवाच्या मंदिरातून लुटून आणलेली सोन्याची व रुप्याची भांडी जेरूसलेमला परतणाऱ्‍या यहुद्यांना दिली.

१४:१, २—“ज्यांनी त्यांस बंदिवान करून नेले होते त्यांस ते बंदीत ठेवितील” हे शब्द यहोवाच्या लोकांच्या बाबतीत कसे खरे ठरले? हे शब्द ज्या व्यक्‍तींच्या बाबतीत खरे ठरले त्यांच्यापैकी एक होता, दानीएल जो मेद व पारस यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या बॅबिलोनमध्ये वरिष्ठ पदावर होता. तसेच एस्तेर, जी पर्शियाची राणी बनली आणि मर्दखय ज्याला पर्शियन साम्राज्याचा पंतप्रधान नियुक्‍त करण्यात आले.

२०:२-५—यशया खरोखरच तीन वर्षे नग्न अवस्थेत फिरत होता का? कदाचित यशयाने आपले बाहेरील वस्त्र काढून टाकले असावे व तो अतिशय कमी वस्त्रे घालत असावा.

२१:१—कोणत्या प्रदेशाला ‘समुद्रालगतचे रान’ म्हटले असावे? बॅबिलोनच्या आसपास कोणताही समुद्र नव्हता तरीसुद्धा त्याच्या संदर्भात असे म्हटले आहे. कारण, युफ्रेटिस व टायग्रिस नदीमुळे दर वर्षी या भागात पूर येत असल्यामुळे याठिकाणी दलदलीचा प्रदेश किंवा ‘समुद्र’ निर्माण झाला होता.

२४:१३-१६, पं.र.भा.—“जैतून झाडाला हालवताना जसे घडते, द्राक्षाचे तोडणे होत असता जशी चुकलेली फळे राहतात तसे पृथ्वीत लोकांमध्ये” यहुदी लोक कोणत्या अर्थाने होतील? ज्याप्रकारे हंगाम झाल्यानंतर झाडावर अगदी थोडी फळे उरतात त्याचप्रमाणे जेरूसलेम व यहुदाचा नाश झाल्यानंतर फार कमी लोक बचावतील. या बचावलेल्या लोकांना हद्दपार करून जेथे कोठे पाठवले जाईल, मग ते “उगवतीकडल्या” अर्थात पूर्वेकडल्या बॅबिलोनमध्ये असोत किंवा “समुद्रतीरी” अर्थात भूमध्य सागरातील द्वीपांवर असो, ते कोठेही गेले तरी यहोवाची स्तुती करतील.

२४:२१—“आकाशस्थांचे सैन्य” आणि “भूमीचे राजे” कोण आहेत? “आकाशस्थांचे सैन्य” दुष्ट आत्मिक शक्‍तींना सूचित करू शकते. त्याअर्थी, “भूमीचे राजे” हे पृथ्वीवरील शासक आहेत, ज्यांच्यावर दुरात्म्यांचा शक्‍तिशाली प्रभाव आहे.—१ योहान ५:१९.

२५:७—“सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन” काय आहे? ही तुलना मानवजातीच्या दोन मुख्य शत्रूंकडे लक्ष वेधते—पाप व मृत्यू.

आपल्याकरता धडे:

१३:२०-२२; १४:२२, २३; २१:१-९. बॅबिलोनच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे, यहोवाचे भविष्यसूचक वचन नेहमी खरे ठरते.

१७:७, ८. इस्राएलातील बहुतेक लोकांनी ऐकले नाही तरीसुद्धा, काही व्यक्‍ती मात्र यहोवाकडे वळाल्या. त्याचप्रकारे ख्रिस्ती धर्मजगतातले काहीजण राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देतात.

२८:१-६. अश्‍शूराकडून इस्राएलचा पराभव होईल खरा, पण देव विश्‍वासू व्यक्‍तींना वाचवील. यहोवा न्यायदंड बजावतो तेव्हा तो नीतिमान लोकांना कोणत्याही आशेविना नाश होऊ देत नाही.

२८:२३-२९. यहोवा प्रांजळ मनाच्या व्यक्‍तींना त्यांच्या विशिष्ट गरजांनुरूप व परिस्थितीनुरूप शिस्त देतो.

३०:१५. यहोवाकडून तारण मिळण्याकरता आपण ‘स्वस्थ राहून,’ मानवाच्या योजनांकरवी बचावण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून दिले पाहिजे. तसेच, घाबरून न जाता, ‘शांत’ राहिल्यामुळे आपला बचाव करण्यास यहोवा समर्थ आहे यावर पूर्ण भरवसा असल्याचे आपण दाखवतो.

३०:२०, २१. यहोवा त्याचे प्रेरित वचन बायबल याद्वारे आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांद्वारे’ जे बोलतो त्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा एका अर्थाने यहोवा आपल्याला ‘दिसतो’ आणि आपले तारण करणारा त्याचा आवाज आपण ‘ऐकतो.’—मत्तय २४:४५.

यशयाची भविष्यवाणी देवाच्या वचनावरील आपला भरवसा वाढवते

यशयाच्या पुस्तकातील देवाच्या संदेशाबद्दल आपण किती कृतज्ञ असण्यास हवे! ज्या भविष्यवाण्या आधीच पूर्ण झाल्या आहेत त्या आपल्याला हा भरवसा देतात की ‘यहोवाच्या मुखातून निघणारे वचन विफल होऊन परत येणार नाही.’—यशया ५५:११.

यशया ९:७ आणि ११:१-५, १० यांतील मशीहाविषयीच्या भाकितांविषयी काय? यहोवाने आपल्या तारणाकरता केलेल्या तरतुदीवरील आपला विश्‍वास यांमुळे बळकट होत नाही का? या पुस्तकात अशाही काही भविष्यवाण्या आहेत, ज्यांची महत्त्वाची पूर्णता आपल्या काळात घडत आहे किंवा भविष्यात घडणार आहे. (यशया २:२-४; ११:६-९; २५:६-८; ३२:१, २) किंबहुना, ‘देवाचे वचन सजीव आहे’ हे सिद्ध करणाऱ्‍या पुराव्यात यशयाचे पुस्तक आणखी भर घालते.—इब्री लोकांस ४:१२. (w०६ १२/०१)

[१२ पानांवरील चित्र]

यशया व त्याची मुले इस्राएलात “चिन्हे व उत्पात” यांसारखी होती

[१२, १३ पानांवरील चित्र]

जेरूसलेम ‘द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखे’ होणार होते

[१४ पानांवरील चित्र]

राष्ट्रांतील लोकांना “आपल्या तरवारीचे फाळ” करण्यास कशाप्रकारे मदत केली जात आहे?