व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुला अत्यानंद होईल”

“तुला अत्यानंद होईल”

“तुला अत्यानंद होईल”

‘तू परमेश्‍वराप्रीत्यर्थ सण पाळावा . . . तुला अत्यानंद होईल.’—अनुवाद १६:१५.

१. (क) सैतानाने कोणते वादविषय उत्पन्‍न केले? (ख) आदाम व हव्वा यांनी बंड केल्यावर यहोवाने काय भाकीत केले?

सैतानाने आदाम व हव्वा यांना त्यांच्या सृष्टिकर्त्याच्या विरोधात बंड करण्यास उद्युक्‍त केले तेव्हा त्याने दोन महत्त्वाचे वादविषय उत्पन्‍न केले. एकतर, त्याने यहोवाच्या खरेपणाविरुद्ध आणि त्याच्या शासन करण्याच्या पद्धतीबद्दल वादविषय उभा केला. याशिवाय, सैतानाने असेही सुचवले की मानव केवळ स्वार्थापोटी देवाची सेवा करतील. हा दुसरा वादविषय ईयोबाच्या काळात त्याने अगदी स्पष्टपणे व्यक्‍त केला. (उत्पत्ति ३:१-६; ईयोब १:९, १०; २:४, ५) पण यहोवाने या परिस्थितीला तोंड देण्याकरता लगेच पावले उचलली. आदाम व हव्वा अजून एदेन बागेतच असताना यहोवाने आपण हे वादविषय कशाप्रकारे मिटवू याविषयी भाकीत केले. त्याने एक “संतति” येण्याविषयी भाकीत केले. या संततीची टाच फोडली जाईल आणि मग ती सैतानाचे डोके फोडील.—उत्पत्ति ३:१५.

२. उत्पत्ति ३:१५ यातील भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण होईल याविषयी यहोवाने कसा प्रकाश टाकला?

काळाच्या ओघात यहोवा त्या भविष्यवाणीवर हळूहळू प्रकाश टाकत गेला आणि अशारितीने ही भविष्यवाणी कालांतराने निश्‍चित पूर्ण होईल हे त्याने दाखवले. उदाहरणार्थ, देवाने अब्राहामला सांगितले की भाकीत केलेली “संतति” त्याच्या वंशजातून येईल. (उत्पत्ति २२:१५-१८) अब्राहामचा नातू याकोब इस्राएलच्या १२ गोत्रांचा जनक होता. सा.यु.पू. १५१३ साली या बारा गोत्रांचे एक राष्ट्र बनले तेव्हा यहोवाने त्यांना एक नियमशास्त्र दिले. या नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांना निरनिराळे सण पाळण्यास सांगण्यात आले होते. प्रेषित पौलाने म्हटले की हे सण “पुढे होणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत.” (कलस्सैकर २:१६, १७; इब्री लोकांस १०:१) यांत संततिविषयी यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेशी संबंधित काही पूर्वसंकेत होते. इस्राएल राष्ट्रात हे सण अतिशय आनंदात साजरे केले जात असत. या सणांचे संक्षिप्त परीक्षण केल्यामुळे यहोवाच्या प्रतिज्ञांवरील आपला विश्‍वास निश्‍चितच दृढ होईल.

संतति प्रकट होते

३. भाकीत केलेली संतती कोण होती आणि तिची टाच कशाप्रकारे फोडली गेली?

यहोवाने पहिली भविष्यवाणी केल्यावर जवळजवळ ४,००० वर्षांनंतर भाकीत केलेली संतति प्रकट झाली. तो येशू होता. (गलतीकर ३:१६) परिपूर्ण मनुष्य या नात्याने येशू मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिला आणि अशाप्रकारे त्याने हे सिद्ध केले की सैतानाचे आरोप खोटे होते. शिवाय, येशू परिपूर्ण होता, त्याच्याठायी पापाचा अंशही नव्हता. त्यामुळे त्याचे बलिदान अतिशय मोलाचे होते. हे बलिदान देऊन येशूने आदाम व हव्वा यांच्या विश्‍वासू वंशजांना पाप व मृत्यू यांच्या गुलामीतून मुक्‍तता दिली. येशूचा वधस्तंभावर मृत्यू झाला तेव्हा भाकीत केलेल्या संततीची ‘टाच फोडण्यात’ आली होती.—इब्री लोकांस ९:११-१४.

४. येशूच्या बलिदानाचे कशाप्रकारे पूर्वचित्रित करण्यात आले?

सा.यु. ३३ साली निसान १४ या दिवशी येशूचा मृत्यू झाला. * इस्राएल राष्ट्रात निसान १४ हा वल्हांडणाचा अर्थात आनंदोत्सवाचा दिवस होता. त्या दिवशी दर वर्षी इस्राएली कुटंबे एकत्र मिळून भोजन करीत. या विशेष भोजनाकरता एक लहानसे निर्दोष कोकरू कापले जाई. सा.यु.पू. १५१३ साली निसान १४ या दिवशी परमेश्‍वराच्या स्वर्गदूताने इजिप्शियन लोकांच्या घराण्यातील प्रथम जन्मलेल्यांस मारून टाकले तेव्हा कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे इस्राएली घराण्यांतील प्रथमपुत्रांचे तारण झाले होते याची प्रत्येक वल्हांडणाच्या दिवशी आठवण केली जाई. (निर्गम १२:१-१४) वल्हांडणाच्या दिवशी वधले जाणारे कोकरू येशूचे प्रतीक होते. त्याच्याविषयी प्रेषित पौलाने असे म्हटले: “आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले.” (१ करिंथकर ५:७) वल्हांडणाच्या कोकऱ्‍याच्या रक्‍ताप्रमाणे येशूने वाहिलेले रक्‍त अनेकांना तारण मिळवून देते.—योहान ३:१६, ३६.

“महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ”

५, ६. (क) येशूचे पुनरुत्थान केव्हा झाले आणि नियमशास्त्रात त्या घटनेचे पूर्वचित्रण कशाप्रकारे करण्यात आले? (ख) येशूच्या पुनरुत्थानामुळे उत्पत्ति ३:१५ या वचनाची पूर्णता होणे कशाप्रकारे शक्य झाले?

तिसऱ्‍या दिवशी, येशूला आपल्या बलिदानाचे मोल आपल्या पित्यासमोर सादर करता यावे म्हणून त्याला पुन्हा जिवंत करण्यात आले. (इब्री लोकांस ९:२४) त्याचे पुनरुत्थान दुसऱ्‍या एका सणातून पूर्वचित्रित करण्यात आले. निसान १४ च्या नंतरचा दिवस, बेखमीर भाकरींच्या सणाचा पहिला दिवस होता. यानंतरच्या दिवशी म्हणजे निसान १६ रोजी इस्राएली लोक जवाच्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी आणत आणि याजक ती पेंढी यहोवासमोर ओवाळत असे. इस्राएल राष्ट्रात सर्वात आधी जवाच्या पिकाची कापणी केली जात असे. (लेवीय २३:६-१४) सा.यु. ३३ सालच्या त्याच दिवशी म्हणजे निसान १६ रोजी यहोवाने त्याचा ‘विश्‍वासू व खरा साक्षी’ असणाऱ्‍या येशूला ठार मारण्याच्या सैतानाच्या दुष्ट प्रयत्नांना निष्फळ केले. सा.यु. ३३ च्या निसान १६ रोजी यहोवाने येशूला मृतांतून उठवून त्याला अमर आत्मिक जीवन बहाल केले.—प्रकटीकरण ३:१४; १ पेत्र ३:१८.

येशू “महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ” ठरला. (१ करिंथकर १५:२०) याआधी ज्या कोणाचे पुनरुत्थान झाले होते ते सर्वजण पुन्हा मेले. पण येशूला पुन्हा मरावे लागले नाही, तर तो स्वर्गात यहोवाच्या उजव्या हाताला जाऊन बसला आणि यहोवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून त्याला नियुक्‍त करण्यात येईपर्यंत तो थांबला. (स्तोत्र ११०:१; प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३; इब्री लोकांस १०:१२, १३) १९१४ साली येशूचा राज्याभिषेक झाल्यापासून, तो आपल्या शत्रूचे अर्थात सैतानाचे डोके फोडून त्याला व त्याच्या संततीला कायमचे नष्ट करण्यास समर्थ आहे.—प्रकटीकरण ११:१५, १८; २०:१-३, १०.

अब्राहामच्या संततीतील आणखी सदस्य

७. सप्ताहांच्या सणाचे वर्णन करा.

एदेन बागेत जिच्याविषयी भाकीत करण्यात आले होते आणि जिच्या माध्यमाने यहोवा “सैतानाची कृत्ये नष्ट” करणार होता, ती संतती म्हणजे येशू होता. (१ योहान ३:८) पण यहोवा अब्राहामशी बोलला तेव्हाच त्याने असे सुचवले होते, की अब्राहामची ‘संतति’ केवळ एक व्यक्‍ती नसेल. तर त्याची संतती “आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी” असेल. (उत्पत्ति २२:१७) ‘संततितील’ इतर सदस्यांचे प्रकट होणे हे आणखी एका आनंददायक सणाद्वारे पूर्वचित्रित करण्यात आले. निसान १६ या दिवसाच्या पन्‍नास दिवसांनंतर इस्राएलात सप्ताहांचा सण साजरा केला जाई. या सणाच्या संदर्भात नियमशास्त्रात असे म्हटले होते: “सातव्या शब्बाथाच्या दुसऱ्‍या दिवसापर्यंत पन्‍नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्‍वराप्रीत्यर्थ नवे अन्‍नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशमांश एफाभर सपिठाच्या दोन भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या; परमेश्‍वराप्रीत्यर्थ हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.” *लेवीय २३:१६, १७, २०.

८. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणती अभूतपूर्व घटना घडली?

येशू पृथ्वीवर असताना, सप्ताहांच्या सणाला पेन्टेकॉस्ट म्हटले जाई. हा शब्द “पन्‍नासावा” या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आला होता. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रमुख महायाजकाने अर्थात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताने जेरूसलेम येथे जमलेल्या १२० शिष्यांच्या लहानशा गटावर पवित्र आत्मा ओतला. अशारितीने हे शिष्य देवाचे अभिषिक्‍त पुत्र आणि येशू ख्रिस्ताचे बंधू बनले. (रोमकर ८:१५-१७) ते एका नव्या राष्ट्राचे अर्थात ‘देवाच्या इस्राएलाचे’ सदस्य बनले. (गलतीकर ६:१६) त्या लहान संख्येपासून शेवटी या नव्या राष्ट्राच्या सदस्यांची संख्या १,४४,००० इतकी होणार होती.—प्रकटीकरण ७:१-४.

९, १०. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला पेन्टेकॉस्टच्या सणादरम्यान कशाप्रकारे चित्रित करण्यात आले?

दर वर्षी पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवासमोर ओवाळल्या जाणाऱ्‍या खमीर घातलेल्या दोन भाकरी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला पूर्वचित्रित करत होत्या. खमीर घालून भाजलेल्या या भाकरींवरून असे सूचित झाले की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमध्ये अद्यापही उपजत पापाचे खमीर आहे. पण तरीसुद्धा ते येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर यहोवाची उपासना करू शकत होते. (रोमकर ५:१, २) दोन भाकरी का बरे? यावरून कदाचित असे सूचित होत असावे की देवाचे अभिषिक्‍त पुत्र दोन गटांतून—प्रथम नैसर्गिक यहुद्यांमधून व नंतर गैरयहुद्यांमधून घेतलेले असतील.—गलतीकर ३:२६-२९; इफिसकर २:१३-१८.

१० पेन्टेकॉस्टच्या दिवशी अर्पण केल्या जाणाऱ्‍या दोन भाकरी गव्हाच्या पिकाच्या उपजातील प्रथमफळ होत्या. त्याचप्रकारे, आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ‘त्याच्या सृष्ट वस्तूंतील प्रथमफळ’ म्हणण्यात आले. (याकोब १:१८) येशूने वाहिलेल्या रक्‍ताच्या आधारावर सर्वप्रथम त्यांच्याच पापांची क्षमा केली जाते आणि अशारितीने त्यांना स्वर्गात अमर जीवन प्राप्त करून येशूसोबत त्याच्या राज्यात शासन करण्याचा मार्ग मोकळा होतो. (१ करिंथकर १५:५३; फिलिप्पैकर ३:२०, २१; प्रकटीकरण २०:६) स्वर्गीय पुत्र या नात्याने लवकरच ते ‘लोहदंडाने [राष्ट्रांवर] अधिकार गाजवतील’ आणि ‘सैतानाला आपल्या पायांखाली तुडवलेला’ पाहतील. (प्रकटीकरण २:२६, २७; रोमकर १६:२०) प्रेषित योहानाने म्हटले: “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत.”—प्रकटीकरण १४:४.

मुक्‍ततेची आठवण करून देणारा दिवस

११, १२. (क) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी काय घडत असे? (ख) गोऱ्ह्याच्या व बकऱ्‍यांच्या अर्पणांतून इस्राएल राष्ट्राला कोणकोणते फायदे मिळत?

११ एथनिमच्या (ज्याला नंतर तिशरी म्हणण्यात आले) * दहाव्या दिवशी, इस्राएल राष्ट्रात एक सण साजरा केला जाई, जो येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचे फायदे मानवजातीला कशाप्रकारे मिळतील याचे पूर्वचित्रण करत होता. त्या दिवशी, संपूर्ण राष्ट्र प्रायश्‍चित्ताचा दिवस साजरा करण्याकरता व आपल्या पापांच्या प्रायश्‍चित्ताकरता यज्ञ अर्पण केले जाण्याकरता एकत्र येई.—लेवीय १६:२९, ३०.

१२ प्रायश्‍चित्ताच्या दिवशी, महायाजक एका गोऱ्ह्याचा वध करून परमपवित्र स्थानात त्याचे काही रक्‍त कराराच्या कोशाच्या दयासनासमोर सात वेळा शिंपडत असे. असे करण्याद्वारे ते रक्‍त यहोवासमोर अर्पण केले जात आहे असे सूचित होत असे. हे अर्पण महायाजकासाठी आणि त्याच्या “घराण्यासाठी,” तसेच याजक व लेवीय यांच्यासाठी पापार्पण होते. यानंतर महायाजक दोन बकरे घेऊन त्यांपैकी एक “लोकांच्या” पापांबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून अर्पण करत असे. त्याचेही काही रक्‍त परमपवित्र स्थानात कोशाच्या दयासनासमोर शिंपडले जात असे. यानंतर महायाजक दुसऱ्‍या बकऱ्‍यावर आपले हात ठेवून इस्राएल लोकांच्या सर्व पापांचा अंगीकार करत असे. मग तो बकरा लाक्षणिक अर्थाने इस्राएल राष्ट्राचे पाप वाहून नेण्याकरता रानात सोडून दिला जात असे.—लेवीय १६:३-१६, २१, २२.

१३. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी घडणाऱ्‍या घटनांनी येशूने निभावलेल्या भूमिकेस कशाप्रकारे पूर्वचित्रित केले?

१३ या सर्व गोष्टींवरून पूर्वचित्रित झाल्याप्रमाणे येशू आपल्या स्वतःच्या रक्‍ताचे मोल पापांची क्षमा देण्याकरता उपयोगात आणतो. सर्वप्रथम त्याच्या रक्‍ताचे मोल १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या ‘आध्यात्मिक मंदिराकरता’ वापरले जाते. या रक्‍ताच्या आधारावर त्यांना नीतिमान घोषित केले जाते आणि अशारितीने ते यहोवासमोर निर्दोष असे ठरतात. (१ पेत्र २:५; १ करिंथकर ६:११) हे गोऱ्ह्याच्या अर्पणावरून पूर्वचित्रित होते. अशारितीने त्यांना स्वर्गीय जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. यानंतर, येशूच्या रक्‍ताचे मोल ख्रिस्तावर विश्‍वास दाखवणाऱ्‍या इतर लाखो लोकांच्या फायद्याकरता वापरले जाते. हे बकऱ्‍याच्या अर्पणावरून सूचित होते. यांना आशीर्वादाच्या रूपात आदाम व हव्वा यांनी जे गमवले होते ते, अर्थात पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळेल. (स्तोत्र ३७:१०, ११) जिवंत बकरा ज्याप्रमाणे इस्राएल राष्ट्राची पापे रानात वाहून नेत असे त्याचप्रमाणे, येशूने वाहिलेल्या रक्‍ताच्या आधारावर तो मानवजातीची पापे वाहून नेतो.—यशया ५३:४, ५.

यहोवासमोर आनंदित होणे

१४, १५. मांडवांच्या सणात काय घडे आणि यामुळे इस्राएली लोकांना कशाची आठवण करून दिली जात असे?

१४ प्रायश्‍चित्ताच्या दिवसानंतर इस्राएली लोक मांडवांचा सण पाळत. हा सण सर्व यहुदी सणांपैकी सर्वात आनंददायक सण होता. (लेवीय २३:३४-४३) एथनिमच्या १५ व्या दिवसापासून २१ व्या दिवसापर्यंत साजरा केल्या जाणाऱ्‍या या सणाचा, महिन्याच्या २२ व्या दिवशी पवित्र मेळ्याने समारोप होत असे. या सणाने पीक गोळा करण्याचा काळ समाप्त होई. हा देवाच्या चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानण्याचा काळ असे. म्हणूनच यहोवाने सण साजरा करणाऱ्‍यांना असे म्हटले होते: “तुझे सर्व उत्पन्‍न व तू हाती घेतलेली कामे ह्‍यात तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.” (अनुवाद १६:१५) तो खरोखरच किती आनंदाचा समय असेल!

१५ त्या सणादरम्यान इस्राएली लोक सात दिवस मांडवांत राहात. एकेकाळी ते अरण्यात कशाप्रकारे तंबूंमध्ये राहात होते याची त्यांना आठवण करून देण्यासाठी हे होते. या सणादरम्यान, यहोवाने एका प्रेमळ पित्याप्रमाणे कशी त्यांची काळजी वाहिली याविषयी मनन करण्याकरता त्यांना उत्तम संधी मिळे. (अनुवाद ८:१५, १६) आणि श्रीमंत, गरीब, सर्वजण एकाचप्रकारच्या मांडवांत राहायचे त्यामुळे इस्राएल लोकांना याची आठवण करून दिली जात असे, की या सणादरम्यान त्यांच्यात कोणीही उच्च किंवा नीच नव्हते.—नहेम्या ८:१४-१६.

१६. मांडवांच्या सणात कशाची पूर्वछाया होती?

१६ मांडवांचा सण हा कापणीशी, पीक गोळा करण्याशी संबंधित असलेला आनंदोत्सव होता. आणि या सणात येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना गोळा केल्या जाण्याच्या आनंददायक कार्याची पूर्वछाया होती. हे कार्य सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुरू झाले. या दिवशी येशूचे १२० शिष्य अभिषिक्‍त झाले व एका ‘पवित्र याजकगणाचे’ भाग बनले. ज्याप्रकारे इस्राएली लोक केवळ काही दिवस तंबूंत राहात होते त्याचप्रकारे अभिषिक्‍त जनांना हे माहीत आहे की ते या अभक्‍त जगात केवळ ‘प्रवासी’ अर्थात तात्पुरते रहिवासी आहेत. त्यांची आशा ही स्वर्गीय जीवनाची आहे. (१ पेत्र २:५, ११) अभिषिक्‍त जनांना गोळा करण्याचे कार्य, १,४४,००० जनांपैकी शेवटल्या सदस्यांना गोळा केल्यावर, म्हणजे या ‘शेवटल्या काळात’ पूर्ण होते.—२ तीमथ्य ३:१.

१७, १८. (क) अभिषिक्‍त जनांव्यतिरिक्‍त इतरजणांनाही येशूच्या यज्ञार्पणाचा फायदा होईल हे कशावरून सूचित होते? (ख) आज लाक्षणिक मांडवांच्या सणाचा कोणाला फायदा होत आहे आणि हा आनंददायक सण केव्हा कळसास पोचेल?

१७ या प्राचीन सणादरम्यान एकूण ७० गोऱ्‍हे अर्पण केले जात असत. (गणना २९:१२-३४) ७० ही संख्या ७ व १० या संख्यांचा गुणाकार करून मिळते. ७ व १० या संख्या बायबलमध्ये स्वर्गीय व पृथ्वीसंबंधी पूर्णत्वास सूचित करतात. त्याअर्थी, येशूचे यज्ञार्पण, नोहापासून उत्पन्‍न झालेल्या मानवजातीच्या सर्व ७० कुटुंबांतील विश्‍वासू जनांकरता फायदेकारक ठरेल. (उत्पत्ति १०:१-२९) त्याच धर्तीवर, आपल्या काळात विश्‍वासू जनांना गोळा करण्याचे कार्य विस्तारले आहे; आज सर्व राष्ट्रांतील लोकांपैकी जे येशूवर विश्‍वास ठेवतात आणि ज्यांना पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याची आशा आहे त्यांना गोळा केले जात आहे.

१८ आधुनिक काळात विश्‍वासू जनांचे हे एकत्रित केले जाणे प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात पाहिले होते. प्रथम त्याने १,४४,००० जनांवर शिक्का मारण्यात आल्याची घोषणा ऐकली. त्यानंतर त्याने यहोवा व येशूच्या समोर उभा असलेला “कोणाला मोजता आला नाही असा” आणि “हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय” पाहिला. हे लोक “मोठ्या संकटातून येतात” व नव्या जगात प्रवेश करतात. ते देखील या जुन्या व्यवस्थीकरणात परदेशी, अर्थात तात्पुरते रहिवासी आहेत आणि आत्मविश्‍वासाने त्या काळाची वाट पाहात आहेत, जेव्हा “कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल.” तेव्हा, “देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:१-१०, १४-१७) या सर्वांना, तसेच पुनरुत्थान झालेल्या सर्व विश्‍वासू जनांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी सार्वकालिक जीवन बहाल केले जाईल तेव्हा लाक्षणिक मांडवांचा सण कळसास पोचेल.—प्रकटीकरण २०:५.

१९. इस्राएलात साजरे केल्या जाणाऱ्‍या सणांचे परीक्षण केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो?

१९ प्राचीन यहुदी सणांच्या अर्थसूचकतेविषयी मनन करताना आपल्यालाही “अत्यानंद” होतो. एदेन बागेत दिलेल्या भविष्यवाणीची कशाप्रकारे पूर्णता होईल याविषयी यहोवाने दिलेले पूर्वसंकेत विचारात घेणे खरोखरच रोमांचकारी आहे आणि या भविष्यवाणीची टप्प्याटप्प्याने पूर्णता होताना प्रत्यक्षात पाहणेही अतिशय आनंददायक आहे. आज आपल्याला हे माहीत आहे की त्या भविष्यवाणीतील संतति प्रकट झाली असून तिची टाच फोडण्यात आली आहे. आज येशू ख्रिस्त स्वर्गीय राजा आहे. शिवाय, १,४४,००० जनांपैकी बहुतेक जणांनी मृत्यूपर्यंत आपला विश्‍वासूपणा सिद्ध केला आहे. आता काय करणे बाकी आहे? ही भविष्यवाणी पूर्ण होण्यास आता किती अवकाश उरला आहे? याविषयी पुढच्या लेखात चर्चा केली आहे. (w०७ १/१)

[तळटीपा]

^ परि. 4 निसान महिना आपल्या सध्याच्या दिनदर्शिकेनुसार मार्च/एप्रिल महिन्यादरम्यान येतो.

^ परि. 7 खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरींचे ओवाळणीचे अर्पण देताना, सहसा याजक या दोन भाकरी आपल्या ओंजळीत घेऊन, हात वर करून त्या ओवाळत असे. या कृतीवरून अर्पणाच्या वस्तू यहोवाला सादर केल्या जात आहे असे सूचित होत असे.—यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठ ५२८ पाहावे.

^ परि. 11 एथनिम किंवा तिशरी आपल्या सध्याच्या दिनदर्शिकेनुसार सप्टेंबर/ऑक्टोबर या दरम्यान येतो.

तुम्ही हे स्पष्ट करू शकता का?

• वल्हांडणाच्या कोकऱ्‍याने कशास पूर्वचित्रित केले?

• पेन्टेकॉस्टच्या सणात कोणत्या गोळा करण्याच्या कार्याची पूर्वछाया होती?

• येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा मानवजातीला कशाप्रकारे फायदा होईल हे प्रायश्‍चित्ताच्या दिवशी केल्या जाणाऱ्‍या निरनिराळ्या गोष्टींतून कशाप्रकारे पूर्वचित्रित करण्यात आले?

• ख्रिश्‍चनांना गोळा केले जाणे हे मांडवांच्या सणात कशाप्रकारे पूर्वचित्रित करण्यात आले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४, २५ पानांवरील तक्‍ता]

घटना: कशास पूर्वचित्रित केले:

वल्हांडण निसान १४ वल्हांडणाच्या कोकऱ्‍याचा वध येशूचे यज्ञार्पण

बेखमीर भाकरींचा निसान १५ शब्बाथ

सण

(निसान १५-२१) निसान १६ जवाच्या प्रथमफळाचे अर्पण येशूचे पुनरुत्थान

५० दिवस

सप्ताहांचा सिवान ६ दोन भाकरी अर्पण येशूने आपल्या अभिषिक्‍त

सण (पेन्टेकॉस्ट) केल्या जात बांधवांना यहोवाला सादर केले

प्रायश्‍चित्ताचा तिशरी १० एक गोऱ्‍हा व दोन येशूने आपल्या रक्‍ताचे

दिवस बकऱ्‍यांचे अर्पण मोल सर्व मानवजातीकरता

अर्पण केले

मांडवांचा सण तिशरी १५-२१ इस्राएली लोक आनंदाने मांडवांत अभिषिक्‍त व ‘मोठ्या

(कापणीचा, राहात व कापणीचा आनंदोत्सव लोकसमुदायाला’ गोळा

मंडपांचा) साजरा करीत, ७० गोऱ्‍हे केले जाणे

अर्पण केले जात

[२३ पानांवरील चित्रे]

वल्हांडणाच्या कोकऱ्‍याच्या रक्‍ताप्रमाणे येशूने वाहिलेल्या रक्‍तामुळे अनेकांचे तारण होते

[२४ पानांवरील चित्रे]

निसान १६ रोजी अर्पण केल्या जाणाऱ्‍या जवाच्या उपजातील प्रथमफळाने येशूच्या पुनरुत्थानास चित्रित केले

[२५ पानांवरील चित्रे]

पेन्टेकॉस्टच्या दिवशी अर्पण केल्या जाणाऱ्‍या दोन भाकरींनी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीकडे पूर्वसंकेत केला

[२६ पानांवरील चित्रे]

मांडवांच्या सणात, अभिषिक्‍त जनांस व सर्व राष्ट्रांतील एका ‘मोठ्या लोकसमुदायास’ गोळा केले जाण्याची पूर्वछाया होती