व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पहिले पुनरुत्थान” —सध्या सुरू आहे!

“पहिले पुनरुत्थान” —सध्या सुरू आहे!

“पहिले पुनरुत्थान” —सध्या सुरू आहे!

“ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.”—१ थेस्सलनीकाकर ४:१६.

१, २. (क) ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याकरता कोणती आशा आहे? (ख) तुम्ही कोणत्या आधारावर पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवता? (तळटीप पाहावी.)

“आपणांस मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते.” आदामाने पाप केल्यापासून हे विधान सातत्याने खरे ठरले आहे. सबंध इतिहासात, जो कोणी जन्मला त्याला हे माहीत होते की कालांतराने आपण मरू. बऱ्‍याच जणांना हा प्रश्‍न पडतो की ‘त्यानंतर काय? मृतावस्था कशी असते?’ बायबल उत्तर देते: ‘मृतांस काहीच कळत नाही.’—उपदेशक ९:५.

तर मग ज्यांचा मृत्यू झाला आहे अशांना काही आशा आहे का? होय, आहे. किंबहुना त्यांना आशा असल्याशिवाय, देवाचा मानवजातीकरता असलेला मूळ उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही. यहोवाने एका संततीविषयी भाकीत केले होते की जो सैतानाचा नाश करेल आणि त्याने केलेली सर्व हानी भरून काढेल. कित्येक शतकांदरम्यान, देवाच्या एकनिष्ठ सेवकांनी यहोवाच्या या अभिवचनावर विश्‍वास ठेवला आहे. (उत्पत्ति ३:१५) त्यांपैकी बऱ्‍याच जणांचा मृत्यू झाला आहे. यहोवाच्या त्या अभिवचनाची व त्याच्या इतर प्रतिज्ञांची पूर्णता पाहण्याकरता त्यांना मृतांतून उठवले जाणे आवश्‍यक आहे. (इब्री लोकांस ११:१३) पण हे घडणे शक्य आहे का? होय, आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) पौलाने एकदा युतुख नावाच्या एका तरुणाचे पुनरुत्थान केले होते. हा तरुण तिसऱ्‍या मजल्यावरून खाली पडून “मेलेला हाती लागला” होता. बायबलमध्ये वर्णन केलेल्या नऊ पुनरुत्थानांपैकी हे शेवटले पुनरुत्थान होते.—प्रेषितांची कृत्ये २०:७-१२. *

३. योहान ५:२८, २९ यातील येशूच्या शब्दांमुळे वैयक्‍तिकरित्या तुम्हाला कशाप्रकारे सांत्वन मिळाले आहे व का?

ते नऊ पुनरुत्थानांचे वृत्तान्त पौलाच्या विधानावर विश्‍वास ठेवण्याकरता आधार पुरवतात. तसेच, ‘कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि बाहेर येतील, अशी वेळ येत आहे,’ असे जे आश्‍वासन येशूने दिले होते त्यावर आपला भरवसा या वृत्तान्तांमुळे दृढ होतो. (योहान ५:२८, २९) येशूचे हे आश्‍वासन किती दिलासा देणारे आहे! ज्या लाखो लोकांच्या प्रियजनांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याकरता हे आश्‍वासन किती सांत्वनदायक आहे!

४, ५. बायबलमध्ये कोणकोणत्या पुनरुत्थानांविषयी सांगितले आहे आणि या लेखात कोणत्या पुनरुत्थानाविषयी चर्चा केली जाईल?

ज्यांचे पुनरुत्थान होईल त्यांच्यापैकी बहुतेकजण देवाच्या शासनाखाली शांतीपूर्ण बनवण्यात आलेल्या पृथ्वीवर परत येतील. (स्तोत्र ३७:१०, ११, २९; यशया ११:६-९; ३५:५, ६; ६५:२१-२३) पण, हे घडण्यापूर्वी इतर काही पुनरुत्थाने घडावयाची होती. सर्वप्रथम, येशू ख्रिस्ताला त्याच्या यज्ञार्पणाचे मोल आपल्याकरता देवापुढे सादर करता यावे म्हणून त्याचे पुनरुत्थान होणे आवश्‍यक होते. सा.यु. ३३ साली येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाले.

यानंतर, ‘देवाच्या इस्राएलातील’ अभिषिक्‍त सदस्यांनी स्वर्गीय गौरवात प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जाणे आवश्‍यक होते, जेथे ते “सदासर्वदा प्रभूजवळ” राहतील. (गलतीकर ६:१६; १ थेस्सलनीकाकर ४:१७) या घटनेला ‘पहिले पुनरुत्थान’ म्हटले आहे. (प्रकटीकरण २०:६) हे पुनरुत्थान पूर्ण झाल्यावर लाखो मृतजनांना पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता पुनरुत्थित केले जाईल. तेव्हा आपली आशा स्वर्गीय असो वा पृथ्वीवरील, आपल्यापैकी सर्वांनाच या ‘पहिल्या पुनरुत्थानाविषयी’ जाणून घेण्याची उत्कंठा आहे. हे पुनरुत्थान कोणत्या प्रकारचे आहे? ते केव्हा घडते?

“कोणत्या प्रकारच्या शरीराने?”

६, ७. (क) अभिषिक्‍त ख्रिस्ती स्वर्गात जाण्याअगोदर काय घडणे आवश्‍यक आहे? (ख) ते कोणत्या शरीराने मृतांतून परत येतील?

करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौल पहिल्या पुनरुत्थानाविषयी एक प्रश्‍न विचारतो: “मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?” मग तो या प्रश्‍नाचे उत्तर देतो: “जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही; . . . पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. . . . स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक.”—१ करिंथकर १५:३५-४०.

पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या ख्रिश्‍चनांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळण्याआधी त्यांचा मृत्यू झाला पाहिजे. त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे पार्थिव शरीर मातीत मिळते. (उत्पत्ति ३:१९) देवाच्या नियुक्‍त वेळी मात्र स्वर्गातील जीवनास योग्य अशा शरीरात त्यांचे पुनरुत्थान होते. (१ योहान ३:२) देव त्यांना अमरत्वही बहाल करतो. हे त्यांच्याजवळ जन्मापासूनच असते, किंवा त्यांच्यामध्ये जन्मतःच अमर आत्मा असतो असे नाही. पौल म्हणतो, “जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्‍यक आहे.” त्याअर्थी, अमरत्व हे देवाकडील वरदान आहे. ज्यांचा पहिल्या पुनरुत्थानात समावेश आहे, ते हे अमरत्व ‘परिधान करतात.’—१ करिंथकर १५:५०, ५३; उत्पत्ति २:७; २ करिंथकर ५:१, २,.

८. देव १,४४,००० सदस्यांना वेगवेगळ्या धर्मांतून निवडत नाही हे आपल्याला कशावरून कळते?

पहिल्या पुनरुत्थानात केवळ १,४४,००० जण सहभागी होतात. यहोवाने त्यांना येशूच्या पुनरुत्थानानंतर लवकरच, म्हणजे सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून निवडण्यास सुरुवात केली. त्या सर्वांच्या ‘कपाळावर येशूचे नाव व त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले’ आहे. (प्रकटीकरण १४:१, ३) त्याअर्थी त्यांना अनेक वेगवेगळ्या धर्मांतून निवडले जात नाही. ते सर्व ख्रिस्ती आहेत आणि आपला पिता, यहोवा याचे नाव ते मोठ्या गर्वाने धारण करतात. त्यांचे पुनरुत्थान होते तेव्हा त्यांना स्वर्गात कार्य करण्यास नेमले जाते. अशाप्रकारे थेटपणे देवाची सेवा करण्याची भावी आशा त्यांना रोमांचित करते.

सध्या सुरू आहे?

९. प्रकटीकरण १२:७ व १७:४ आपल्याला पहिले पुनरुत्थान साधारणतः केव्हा सुरू होते हे ठरवण्यास कशाप्रकारे मदत करते?

पहिले पुनरुत्थान केव्हा घडते? ते सध्या सुरू असल्याचा जोरदार पुरावा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ प्रकटीकरणातील दोन अध्यायांची तुलना करा. प्रथम प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायाकडे लक्ष द्या. येथे आपण वाचतो की नुकताच सिंहासनाधिष्ठ झालेला येशू ख्रिस्त आपल्या पवित्र देवदूतांसोबत, सैतान व त्याच्या दुरात्म्यांशी लढाई करतो. (प्रकटीकरण १२:७-९) या मासिकात कित्येकदा स्पष्ट केल्याप्रमाणे ही लढाई १९१४ साली सुरू झाली. * पण या स्वर्गीय लढाईत ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांपैकी कोणीही त्याच्यासोबत असल्याचे येथे सांगितलेले नाही याकडे लक्ष द्या. आता, प्रकटीकरणाचा १७ वा अध्याय पाहा. यात आपण असे वाचतो की ‘मोठ्या बाबेलच्या’ नाशानंतर कोकरा राष्ट्रांवर विजय मिळवेल. पुढे असे म्हटले आहे: “जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू आहेत.” (प्रकटीकरण १७:५, १४) सैतानाच्या जगावर शेवटला विजय मिळवताना येशूसोबत “पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू” जन आहेत, त्याअर्थी तोपर्यंत त्यांचे पुनरुत्थान झालेले असले पाहिजे. तर मग, हर्मगिदोनाआधी ज्या अभिषिक्‍त जनांचा मृत्यू होतो त्यांचे पुनरुत्थान १९१४ आणि हर्मगिदोन येईपर्यंतच्या काळात कधीतरी होते असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.

१०, ११. (क) चोवीस वडील कोण आहेत आणि त्यांच्यापैकी एकजण योहानाला काय सांगतो? (ख) यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?

१० पहिले पुनरुत्थान केव्हा सुरू होते हे आपण आणखी अचूकपणे सांगू शकतो का? याविषयीचा एक लक्षवेधक सुगावा प्रकटीकरण ७:९-१५ येथे सापडतो. या उताऱ्‍यात प्रेषित योहान ‘कोणाला मोजता आला नाही अशा मोठ्या लोकसमुदायाचे’ वर्णन करतो. या मोठ्या लोकसमुदायाची योहानाला ओळख करून देणारा २४ वडिलांपैकी एक आहे. आणि हे २४ वडील ख्रिस्तासोबत सहवारस असणाऱ्‍या १,४४,००० सदस्यांचे त्यांच्या स्वर्गीय गौरवात प्रतिनिधीत्व करतात. * (लूक २२:२८-३०; प्रकटीकरण ४:४) योहानालाही स्वर्गीय आशा होती; पण तो वडील त्याच्याशी बोलला तेव्हा योहान अद्यापही पृथ्वीवर एक मनुष्य होता, त्याअर्थी, त्या दृष्टान्तात योहान पृथ्वीवरील अभिषिक्‍त जनांचे प्रतिनिधीत्व करत असावा, ज्यांना अद्याप त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळालेले नाही.

११ तर मग २४ वडिलांपैकी एकजण योहानाला मोठ्या लोकसमुदायाची ओळख करून देतो यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? यावरून असे दिसते, की २४ वडिलांच्या गटातील पुनरुत्थित अभिषिक्‍त जन कदाचित आजच्या काळात देवाची सत्ये कळवण्याच्या कार्यात समाविष्ट असावेत. हे महत्त्वाचे का आहे? कारण मोठ्या लोकसमुदायाची खरी ओळख देवाच्या पृथ्वीवरील अभिषिक्‍त सेवकांना १९३५ साली देण्यात आली. हे महत्त्वाचे सत्य कळवण्याकरता २४ वडिलांपैकी एकाचा उपयोग करण्यात आला असल्यास, त्याचे फार तर १९३५ पर्यंत स्वर्गात पुनरुत्थान झालेले असले पाहिजे. यावरून असे सूचित होते की पहिले पुनरुत्थान १९१४ ते १९३५ च्या दरम्यान कधीतरी सुरू झाले. यापेक्षा आणखी स्पष्ट उत्तर देता येईल का?

१२. पहिले पुनरुत्थान कदाचित १९१८ सालच्या एप्रिलमध्ये सुरू झाले असावे असे का म्हणता येते हे स्पष्ट करा.

१२ या टप्प्यावर, बायबलमधील एक समांतर वृत्तान्त लक्षात घेणे उपयुक्‍त ठरेल. येशू ख्रिस्ताला सा.यु. २९ सालच्या ऑक्टोबरमध्ये देवाच्या राज्याचा भावी राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आले. साडेतीन वर्षांनंतर म्हणजे, सा.यु. ३३ सालच्या एप्रिल महिन्यात त्याला एक शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍तीच्या रूपात पुनरुत्थित करण्यात आले. त्याचप्रकारे, येशूला १९१४ सालच्या ऑक्टोबरमध्ये सिंहासनाधिष्ट करण्यात आले त्याअर्थी त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त अनुयायांचे साडेतीन वर्षांनंतर म्हणजे १९१८ सालच्या एप्रिलमध्ये पुनरुत्थान होण्यास सुरुवात झाली असावी असा तर्कवाद यावरून करता येईल का? ही रोचक शक्यता नाकारता येत नाही. जरी या तर्कवादाला बायबलमध्ये थेटपणे काही आधार नसला तरी, इतर शास्त्रवचनेही असे दाखवतात की पहिले पुनरुत्थान ख्रिस्ताची उपस्थिती सुरू झाल्यानंतर थोड्या काळानंतरच सुरू झाले व हा तर्कवाद याच्या सामंजस्यात आहे.

१३. पहिले पुनरुत्थान हे ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या आरंभास सुरू झाले हे १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७ यातून कसे सूचित होते?

१३ उदाहरणार्थ पौलाने लिहिले: “प्रभूचे येणे जे होईपर्यंत [त्याची उपस्थिती संपेपर्यंत नव्हे] आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.” (१ थेस्सलनीकाकर ४:१५-१७) तेव्हा, जे अभिषिक्‍त ख्रिस्ती, ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या आधी मेले त्यांचे स्वर्गीय पुनरुत्थान, ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान अद्याप जिवंत असलेल्या अभिषिक्‍त जनांच्या आधी झाले. याचा अर्थ असा होतो, की पहिले पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या आरंभी सुरू झाले असावे आणि ते “त्याच्या आगमनकाळी” अर्थात त्याच्या उपस्थितीदरम्यान सुरू राहते. (१ करिंथकर १५:२३) पहिले पुनरुत्थान हे एकाच वेळी न घडता विशिष्ट कालावधीत घडते.

“त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला”

१४. (क) प्रकटीकरणाच्या ६ या अध्यायातील दृष्टान्त केव्हा पूर्ण होतात? (ख) प्रकटीकरणात काय चित्रित करण्यात आले आहे?

१४ तसेच प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायातील पुराव्याकडेही लक्ष द्या. येथे येशू एक विजयशाली राजा या नात्याने घोडदौड करत असल्याचे चित्रित केले आहे. (प्रकटीकरण ६:२) राष्ट्रे मोठमोठ्या लढायांत गुंतलेली आहेत. (प्रकटीकरण ६:४) जगातल्या अनेक भागांत दुष्काळ आहे. (प्रकटीकरण ६:५, ६) भयानक रोगांनी मानजातीला ग्रासले आहे. (प्रकटीकरण ६:८) या सर्व भाकीत घटना १९१४ पासून जगाच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळतात. पण आणखी काहीतरी घडते. एका यज्ञाच्या वेदीकडे आपले लक्ष वेधण्यात येते. या वेदीच्या खाली “देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे [आत्मे] होते.” (प्रकटीकरण ६:९) ‘शरीराचे जीवन [म्हणजेच, जीव] रक्‍तात असते’ त्याअर्थी, वेदीच्या खाली खरे तर येशूच्या त्या विश्‍वासू सेवकांचे रक्‍त असल्याचे चित्रित करण्यात आले आहे, ज्यांना निर्भयतेने व आवेशाने साक्ष दिल्याबद्दल जिवे मारण्यात आले आहे.—लेवीय १७:११.

१५, १६. प्रकटीकरण ६:१०, ११ पहिल्या पुनरुत्थानास का सूचित करतात हे स्पष्ट करा.

१५ नीतिमान हाबेल याच्या रक्‍ताप्रमाणेच, या ख्रिस्ती शहीदांचे रक्‍त न्याय मिळण्याकरता आक्रोश करत आहे. (उत्पत्ति ४:१०) “ते मोठ्याने ओरडून म्हणाले, ‘हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस. तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांपासून आमच्या रक्‍ताचा सूड घेणार नाहीस?’” यानंतर काय घडते? “त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधु तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांति घ्या.”—प्रकटीकरण ६:१०, ११.

१६ हे शुभ्र झगे वेदीच्या खाली पडलेल्या रक्‍ताच्या पाटांना देण्यात येतात का? हे अर्थातच शक्य नाही! तर हे झगे त्या वेदीवर ज्यांचे रक्‍त वाहण्यात आले त्या व्यक्‍तींना देण्यात येतात. त्यांनी येशूच्या नावाने मृत्यू पत्करला आणि आता त्यांना आत्मिक व्यक्‍ती म्हणून पुनरुत्थित करण्यात आले. हे आपल्याला कसे कळते? प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात आपण असे वाचतो: “जो विजय मिळवितो तो अशारीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही.” तसेच, २४ वडील “शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुगूट घातलेले” होते हेही आठवा. (प्रकटीकरण ३:५; ४:४) त्याअर्थी १,४४,००० सदस्यांपैकी ज्यांचा मृत्यू झाला होता व ज्यांचे वेदीच्या खाली पडलेल्या रक्‍ताद्वारे चित्रण केले आहे त्यांना पृथ्वीवर युद्धे, दुष्काळ व रोगराईचे थैमान माजल्यानंतर स्वर्गीय जीवनाकरता पुनरुत्थित करण्यात आले व लाक्षणिक शुभ्र झगे देण्यात आले.

१७. ज्यांना शुभ्र झगे दिले जातात त्यांना कोणत्या अर्थाने “विश्रांती” घ्यावी लागेल?

१७ या नुकतेच पुनरुत्थान झालेल्यांना “विश्रांति” घेण्यास सांगितले जाते. देवाचा सूड घेण्याचा दिवस येईपर्यंत त्यांनी धीराने थांबून राहायचे आहे. त्यांचे “सोबतीचे दास” अर्थात इतर अभिषिक्‍त ख्रिस्ती अद्याप पृथ्वीवर आहेत आणि त्यांनाही परीक्षांना तोंड देऊन आपला विश्‍वासूपणा सिद्ध करावा लागेल. देवाची न्यायदंड बजावण्याची वेळ येईल तेव्हा त्यांची “विश्रांती” संपेल. (प्रकटीकरण ७:३) त्यावेळी, हे पुनरुत्थित जन, दुष्टांचा होय, ज्यांनी निर्दोष ख्रिश्‍चनांचे रक्‍त वाहिले त्यांचाही नाश करण्यात प्रभू येशू ख्रिस्तासोबत सहभागी होतील.—२ थेस्सलनीकाकर १:७-१०.

आपल्याकरता काय अर्थ होतो

१८, १९. (क) पहिले पुनरुत्थान सध्या सुरू आहे हे तुम्ही कोणत्या कारणांवरून ठरवू शकता? (ख) पहिल्या पुनरुत्थानाविषयी समजून घेतल्यावर तुम्हाला कसे वाटते?

१८ देवाचे वचन पहिल्या पुनरुत्थानाची कोणतीही निश्‍चित तारीख सांगत नाही. तर ते एका कालावधीदरम्यान, अर्थात ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात घडते असे सांगते. सर्वप्रथम, ख्रिस्ताची उपस्थिती सुरू होण्याआधी ज्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मृत्यू झाला त्यांचे पुनरुत्थान होते. ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान, जे अभिषिक्‍त ख्रिस्ती शेवटपर्यंत विश्‍वासू राहून आपले पार्थिव जीवन संपवतात ते “निमिषात” शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍तींमध्ये रूपांतरित होतात. (१ करिंथकर १५:५२) हर्मगिदोनाची लढाई सुरू होण्याआधी सर्व अभिषिक्‍त जनांना स्वर्गीय प्रतिफळ मिळेल का? हे आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की देवाच्या नियुक्‍त वेळी उरलेले सर्व १,४४,००० जन स्वर्गातील सियोन पर्वतावर उभे राहतील.

१९ आपल्याला हेही माहीत आहे की १,४४,००० जनांपैकी बहुतेकजण आधीच ख्रिस्तासोबत आहेत. तुलनेत फार कमी पृथ्वीवर उरले आहेत. देवाच्या न्यायाचा दिवस अतिशय वेगाने जवळ येत आहे याचा हा किती जोरदार पुरावा आहे! लवकरच सैतानाच्या सबंध जगाचा नाश केला जाईल. सैतानालाही अगाधकूपात टाकले जाईल. यानंतर सर्वसाधारण पुनरुत्थानाला सुरुवात होऊ शकेल. आणि विश्‍वासू मानवजातीला येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर, आदामाने गमवलेल्या परिपूर्णतेपर्यंत आणले जाण्याचा मार्ग मोकळा होईल. उत्पत्ति ३:१५ यात लिहिलेली यहोवाची भविष्यवाणी अतिशय आश्‍चर्यकारकरित्या पूर्ण होत आहे. या काळात जिवंत असणे हा केवढा बहुमान! (w०७ १/१)

[तळटीपा]

^ परि. 9 ख्रिस्ताची उपस्थिती १९१४ साली सुरू झाली याकरता शास्त्रवचनांतील पुराव्याकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे २१५-१८ पाहावीत.

^ परि. 10 चोवीस वडील स्वर्गीय गौरवातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधीत्व करतात हे कशावरून म्हणता येते याविषयी अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठ ७७ पाहावे.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

पुढील शास्त्रवचने आपल्याला ‘पहिल्या पुनरुत्थानाचा’ कालावधी ओळखण्यास कशाप्रकारे मदत करतात?

प्रकटीकरण १२:७; १७:१४

प्रकटीकरण ७:१३, १४

१ करिंथकर १५:२३; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७

प्रकटीकरण ६:२, ९-११

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्रे]

सर्वसाधारण मानवजातीचे मृतांतून पुनरुत्थान होण्याआधी कोणकोणती पुनरुत्थाने घडतात?