व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”

“यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”

“यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”

“यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे. तो जवळच आहे आणि फार त्वरा करतो.” —सफन्या १:१४, पं.र.भा.

१, २. (क) ख्रिस्ती कोणत्या खास दिवसाची वाट पाहतात? (ख) आपण कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत आणि का?

एक आनंदी नवतरुणी आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते. दिवस भरत आलेली आई आपल्या बाळाच्या आगमनाची वाटत पाहते. कामाच्या व्यापाने थकून गेलेला कर्मचारी रजेच्या पहिल्या दिवसाची वाट पाहतो. या सर्वांच्या बाबतीत एक गोष्ट सारखी आहे. ती कोणती? हे सर्वजण एका विशेष दिवसाची वाट पाहात आहेत, एक असा दिवस ज्याचा त्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. भावना तर त्या सर्वांच्याच उत्कट आहेत, पण एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या. अर्थात, ते ज्या दिवसाची वाट पाहात आहेत, तो दिवस अवश्‍य येईल आणि जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याकरता तयार असावे असे त्या सर्वांना वाटते.

आज खरे ख्रिस्ती देखील एक खास दिवस येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा आहे “यहोवाचा दिवस.” (यशया १३:९, पं.र.भा.; योएल २:१; २ पेत्र ३:१२) “यहोवाचा दिवस” म्हणजे काय आणि तो आल्याने मानवजातीवर कोणता प्रभाव पडेल? शिवाय, आपण या दिवसाच्या आगमनाकरता तयार आहोत याची खात्री कशी करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे आपण आताच मिळवणे अत्यंत जरुरीचे आहे कारण पुराव्यावरून असे दिसून येते की बायबलचे पुढील शब्द अगदी खरे आहेत: “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे. तो जवळच आहे आणि फार त्वरा करतो.”—सफन्या १:१४.

“यहोवाचा मोठा दिवस”

३. “यहोवाचा मोठा दिवस” काय आहे?

“यहोवाचा मोठा दिवस” काय आहे? सबंध बायबलमध्ये, ‘यहोवाचा दिवस’ हा शब्दप्रयोग अशा खास काळांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे की जेव्हा यहोवाने आपल्या शत्रूंवर न्यायदंड बजावला आणि आपल्या महान नावाचे गौरव केले. यहुदा व जेरूसलेमच्या अविश्‍वासू लोकांनी तसेच यहोवाच्या लोकांचा छळ करणाऱ्‍या बॅबिलोन व ईजिप्तच्या दुष्ट लोकांनीही ‘यहोवाचा दिवस’ अनुभवला, म्हणजेच त्यांना यहोवाचा न्यायदंड भोगावा लागला. (यशया २:१, १०-१२; १३:१-६; यिर्मया ४६:७-१०) पण यहोवाचा सर्वात “मोठा दिवस” भविष्यात येणार आहे. हा तो “दिवस” आहे जेव्हा यहोवाच्या नावाचा अवमान करणाऱ्‍यांवर त्याचा न्यायदंड येईल. या दिवसाची सुरुवात ‘मोठ्या बाबेलच्या’ म्हणजेच खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याच्या नाशाने होईल आणि त्याची समाप्ती हर्मगिदोनाच्या युद्धात उरलेल्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या सर्वनाशाने होईल.—प्रकटीकरण १६:१४, १६; १७:५, १५-१७; १९:११-२१.

४. मानवजातीपैकी बहुतेकांनी यहोवाच्या वेगाने जवळ येत असलेल्या दिवसाचे भय का बाळगले पाहिजे?

लोकांना याची जाणीव असो वा नसो, पण मानवजातीपैकी बहुतेकांनी या वेगाने जवळ येत असलेल्या दिवसाविषयी भय बाळगण्याचे कारण आहे. का? संदेष्टा सफन्या याच्याद्वारे यहोवा उत्तर देतो: “हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.” किती भीतीदायक वर्णन! पुढे संदेष्टा म्हणतो: “मी माणसांवर संकट आणीन, . . . कारण त्यांनी परमेश्‍वराविरुद्ध पाप केले आहे.”—सफन्या १:१५, १७.

५. लाखो लोक यहोवाच्या दिवसाची आतुरतेने का वाट पाहात आहेत?

पण इतर लाखो लोक यहोवाच्या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. का? त्यांना माहीत आहे की हा तारणाचा समय, नीतिमानांकरता मुक्‍ततेचा समय आहे. हा असा समय असेल जेव्हा यहोवा प्रतापाने विजयी होईल आणि त्याचे गौरवशाली नाव पवित्र केले जाईल. (योएल ३:१६, १७; सफन्या ३:१२-१७) कोणत्याही व्यक्‍तीला त्या दिवसाची भीती वाटावी किंवा तिने आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहावी हे आज ती व्यक्‍ती आपल्या जीवनात काय करत आहे यावर अवलंबून आहे. तुम्ही या दिवसाच्या आगमनाकडे कशा दृष्टीने पाहात आहात? तुम्ही त्याकरता तयार आहात का? यहोवाचा दिवस जवळ आला आहे याची जाणीव तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करत आहे का?

“थट्टेखोर लोक” येतील

६. बहुतेक लोक ‘यहोवाच्या दिवसाविषयी’ कसा दृष्टिकोन बाळगतात आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांना याचे आश्‍चर्य का वाटत नाही?

आजची परिस्थिती इतकी निकडीची असूनही पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या बहुतेक लोकांना जवळ आलेल्या ‘यहोवाच्या दिवसाविषयी’ जराही पर्वा नाही. हा दिवस जवळ आला आहे अशी ताकीद देणाऱ्‍यांची ते थट्टा करतात. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना याचे आश्‍चर्य वाटत नाही. कारण प्रेषित पेत्राने याविषयी जे आधीच बजावले होते याची ते आठवण ठेवतात: “प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”—२ पेत्र ३:३, ४.

७. सध्याच्या काळाची निकड ओळखून वागण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

अशाप्रकारे अविश्‍वास दाखवणाऱ्‍या लोकांच्या विचारसरणीचा आपल्यावर परिणाम होऊ नये आणि आपल्याला सध्याच्या काळाची निकड बाळगून वागता यावे म्हणून आपण काय केले पाहिजे? पेत्र सांगतो: “मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे; ह्‍यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभु तारणारा ह्‍याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.” (२ पेत्र ३:१, २) संदेष्ट्यांनी दिलेल्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्याने आपल्याला आपले ‘निर्मळ मन जागृत करण्यास’ अर्थात सुस्पष्टरित्या विचार करण्यास मदत होईल. कदाचित आपण या सूचना अनेकदा ऐकल्या असतील, पण कधी नव्हते इतके आता त्यांकडे लक्ष देत राहणे अत्यावश्‍यक आहे.—यशया ३४:१-४; लूक २१:३४-३६.

८. बरेच लोक बायबलमधील इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष का करतात?

काहीजण या सूचनांकडे दुर्लक्ष का करतात? पेत्र पुढे म्हणतो: “ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यांतून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली; त्याच्या योगे तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.” (२ पेत्र ३:५, ६) होय, यहोवाचा दिवस येऊच नये अशी काहीजण बुद्धिपुरस्सर इच्छा बाळगतात. आपल्या सुरळीत चाललेल्या जीवनात कोणतेही व्यत्यय येऊ नयेत असे त्यांना वाटते. आपल्या स्वार्थी जीवनशैलीबद्दल यहोवाला जाब द्यावा लागेल ही कल्पना त्यांना रुचत नाही. पेत्राने म्हटल्याप्रमाणे हे लोक “स्वतःच्याच वासनांप्रमाणे” जगत आहेत.

९. नोहा व लोट यांच्या काळात लोकांनी कशाप्रकारची मनोवृत्ती दाखवली?

हे थट्टा करणारे “बुद्धिपुरस्सर” ही गोष्ट विसरतात की गतकाळातही यहोवाने मानवजातीच्या कारभारांत हस्तक्षेप केला होता. येशू ख्रिस्त व प्रेषित पेत्र या दोघांनीही अशाप्रकारच्या दोन घटनांचे अर्थात ‘नोहाच्या दिवसांचे’ व ‘लोटाच्या दिवसांचे’ उदाहरण दिले होते. (लूक १७:२६-३०; २ पेत्र २:५-९) जलप्रलयाआधी, नोहाने दिलेल्या इशाऱ्‍याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. त्याचप्रकारे, सदोम व गमोराच्या विनाशाआधी लोटाच्या जावयांना वाटले की ‘तो केवळ गंमत करीत आहे.’—उत्पत्ति १९:१४.

१०. जे दुर्लक्ष करतात अशा लोकांबद्दल यहोवाची काय प्रतिक्रिया आहे?

१० आजही तीच परिस्थिती आहे. पण दुर्लक्ष करणाऱ्‍या या लोकांबद्दल यहोवाची काय प्रतिक्रिया आहे ते पाहा: “जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनांत म्हणतात की परमेश्‍वर बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही, त्यांचा मी समाचार घेईन. त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील; ते घरे बांधितील पण त्यांत वसणार नाहीत; द्राक्षीचे मळे लावितील पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत.” (सफन्या १:१२, १३) लोक कशाचीही पर्वा न करता आपली ‘रोजची कामे’ करत राहतील पण त्यांच्या परिश्रमांपासून त्यांना कोणताही कायमस्वरूपी फायदा होणार नाही. का? कारण यहोवाचा दिवस अचानक येईल आणि तेव्हा मात्र त्यांनी साठवलेली संपत्ती त्यांना वाचवू शकणार नाही.—सफन्या १:१८.

“त्याची वाट पाहा”

११. आपण कोणता सल्ला आठवणीत ठेवला पाहिजे?

११ आपल्या सभोवती असलेल्या दुष्ट जगाचे अनुकरण न करता, आपण संदेष्टा हबक्कूक याने लिहून ठेवलेल्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) आपल्या अपरिपूर्ण दृष्टिकोनातून जरी तो दिवस येण्यास विलंब लागत आहे असे भासले तरीसुद्धा, यहोवा कधीही विलंब लावत नाही हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. त्याचा दिवस अगदी अचूक वेळी येईल, अशा वेळी जेव्हा मानवांनी त्याची अपेक्षा केली नव्हती.—मार्क १३:३३; २ पेत्र ३:९, १०.

१२. येशूने कोणता इशारा दिला होता आणि येशूच्या विश्‍वासू अनुयायांचे वागणे कशाप्रकारे वेगळे आहे?

१२ यहोवाच्या दिवसाची वाट पाहात राहण्याच्या महत्त्वाविषयी आपल्या शिष्यांना जाणीव करून देताना, येशूने असा इशारा दिला होता की त्याच्या अनुयायांपैकीही काहीजण काळाची निकड विसरून जातील. त्यांच्याविषयी त्याने असे भाकीत केले: “आपला धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल व आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, तर तो वाट पाहात नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील.” (मत्तय २४:४८-५१) याउलट, विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग या काळाची निकड ओळखून एकनिष्ठपणे कार्य करत आहे. या दास वर्गाने सतत जागृत राहून त्या दिवसाकरता आपण तयार आहोत हे दाखवले आहे. म्हणूनच, येशूने त्याला पृथ्वीवरील आपल्या “सर्वस्वावर” नेमले आहे.—मत्तय २४:४२-४७.

काळाची निकड ओळखून वागण्याची गरज

१३. येशूने काळाची निकड ओळखून तातडीने कार्य करण्याच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला?

१३ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना काळाची निकड ओळखून वागणे अगत्याचे होते. जेरूसलेम शहराला “सैन्यांचा वेढा पडत आहे” हे पाहताच त्यांना लगेच शहरातून पळून जाण्यास सांगण्यात आले होते. (लूक २१:२०, २१) हे सा.यु. ६६ साली घडले. काळाची निकड ओळखून वागणे किती महत्त्वाचे आहे याकडे त्या काळातल्या ख्रिश्‍चनांचे लक्ष वेधून येशूने म्हटले: “जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये.” (मत्तय २४:१७, १८) पण इतिहासावरून असे दिसून येते की आणखी चार वर्षांपर्यंत जेरूसलेम शहराला काहीही हानी झाली नाही. मग सा.यु. ६६ मध्ये ख्रिश्‍चनांनी येशूच्या शब्दांकडे लक्ष देऊन तातडीने त्याचे पालन करणे महत्त्वाचे का होते?

१४, १५. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी जेरुसलेमला सैन्याचा वेढा पडत आहे हे दिसताच लवकरात लवकर कार्य करणे का महत्त्वाचे होते?

१४ रोमी सैन्याने सा.यु. ७० सालापर्यंत जेरुसलेमचा नाश केला नाही हे जरी खरे असले तरी, ती मधली चार वर्षे अगदी शांतीपूर्ण होती अशातला भाग नाही. किंबहुना, या चार वर्षांदरम्यान भयानक हिंसाचार व रक्‍तपात घडत होता. एका इतिहासकाराच्या शब्दांत, त्या काळात जेरुसलेममध्ये “भयानक मुलकी युद्ध, रक्‍तपात आणि अतिशय भयंकर क्रूरतेच्या घटना” घडत होत्या. शहराभोवती पहारा देण्याकरता, शस्रास्त्रे चालवण्याकरता व लष्करात सेवा करण्याकरता तरुणांना सैन्यात भरती करण्यात आले. त्यांना दररोज लष्करी कवाईती कराव्या लागत. या सर्व टोकाच्या कारवायांचे ज्यांनी समर्थन केले नाही त्यांना गद्दार ठरवले जात होते. जर ख्रिस्ताच्या अनुयायांनी शहरातून पळून जाण्यास विलंब लावला असता तर ते अतिशय भयानक परिस्थितीत सापडले असते.—मत्तय २६:५२; मार्क १२:१७.

१५ येशूने केवळ जेरूसलेममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनाच नव्हे, तर “जे यहूदीयात असतील” त्यांनाही डोंगरांत पळून जाण्यास सांगितले होते याकडे लक्ष द्या. हे महत्त्वाचे आहे कारण काही महिन्यांतच जेरुसलेममधून माघार घेतल्यानंतर रोमी सैन्यांनी पुन्हा एकदा आपल्या लष्करी कारवाया सुरू केल्या. प्रथम त्यांनी सा.यु. ६७ मध्ये गालीलवर आणि त्याच्या पुढच्या वर्षी यहूदीयावर हल्ला केला व त्यास काबीज केले. यामुळे ग्रामीण भागांत हाःहाकार माजला. तसेच कोणत्याही यहुद्याला जेरुसलेममधून बाहेर पडणे आता आणखीनच कठीण होते. शहराच्या वेशींवर पहारा होता आणि कोणीही पलायन करताना पकडला गेला तर तो गद्दार होऊन रोमी सैन्याला जाऊन मिळू इच्छितो असे गृहित धरले जात होते.

१६. संकटाच्या काळात जिवंत बचावण्याकरता पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगणे आवश्‍यक होते?

१६ या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास येशूने काळाची निकड ओळखून तातडीने कृती करण्यावर का जोर दिला हे आपण समजू शकतो. ख्रिश्‍चनांनी त्याग करण्यास तयार असणे आवश्‍यक होते. त्यांनी भौतिक संपत्तीमुळे आपले लक्ष विचलित न होऊ देण्याची काळजी घ्यायची होती. दुसऱ्‍या शब्दात येशूच्या सूचनेनुसार वागण्याकरता त्यांनी “आपल्या सर्वस्वाचा त्याग” करण्यास तयार असायचे होते. (लूक १४:३३) ज्यांनी येशूच्या सूचनेनुसार तातडीने कार्य केले आणि यार्देनच्या पलीकडे गेले ते जिवंत बचावले.

सध्याच्या काळाचे महत्त्व कधीही नजरेआड न होऊ देणे

१७. आपण सध्याच्या काळाची निकड ओळखून वागण्याचा अधिकाधिक प्रयत्न का केला पाहिजे?

१७ बायबलमधील भविष्यवाण्या स्पष्टपणे हे दाखवतात की आपण शेवटल्या काळाच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत. कधी नव्हते इतके आज या काळाची निकड ओळखून वागण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सैनिकाला लढाई सुरू असताना जो ताण व धोका जाणवतो तो शांतीच्या काळात तितका जाणवत नाही. तरीपण, जर त्याने सतत सावध राहण्याचे महत्त्व ओळखले नाही आणि अशात जर त्याला अचानक युद्धात लढण्याकरता बोलावण्यात आले तर तो त्याकरता तयार नसेल आणि यामुळे त्याला मृत्यूलाही तोंड द्यावे लागू शकते. आध्यात्मिकदृष्ट्याही हीच गोष्ट खरी आहे. जर आपण सध्याच्या काळाचे महत्त्व ओळखले नाही आणि सतत सावधगिरी बाळगली नाही तर आपल्यावर होणाऱ्‍या निरनिराळ्या प्रकारच्या हल्ल्यांचा आपण सामना करू शकणार नाही आणि यहोवाचा दिवस येईल तेव्हा कदाचित आपण त्याकरता तयार नसू. (लूक २१:३६; १ थेस्सलनीकाकर ५:४) जर कोणी “परमेश्‍वरापासून पराङमुख झाले” असतील तर त्यांनी पुन्हा त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे परत येण्याची हीच वेळ आहे.—सफन्या १:३-६; २ थेस्सलनीकाकर १:८, ९.

१८, १९. कशाप्रकारे आपण यहोवाचा दिवस ‘लवकर यावा म्हणून खटपट’ करू शकतो?

१८ म्हणूनच, प्रेषित पेत्र आपल्याला ‘देवाचा दिवस लवकर यावा म्हणून खटपट करण्याचा’ आग्रह करतो! आपण हे कसे करू शकतो? एक मार्ग आहे, “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” तल्लीन राहण्याद्वारे. (२ पेत्र ३:११, १२) अशा कार्यांत मग्न राहिल्यामुळे आपल्याला “यहोवाचा दिवस” येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास मदत मिळेल. अर्थात, आपण खटपट केल्याने यहोवाचा दिवस ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर येईल अशातला भाग नाही. पण त्या दिवसाची वाट पाहात असताना जर आपण देवाच्या सेवेत तल्लीन राहिलो तर राहिलेला वेळ लवकर निघून जाईल.—१ करिंथकर १५:५८.

१९ देवाच्या वचनावर आणि त्यातील सूचनांवर मनन केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या दिवसाची वाट पाहण्यास, “त्याच्या येण्याची अगदी मनःपूर्वक उत्कंठा बाळगण्यास (त्याची अपेक्षा करण्यास, तो यावा म्हणून घाई करण्यास)” किंबहुना, “सतत त्याची अपेक्षा” करण्यास मदत मिळेल. (२ पेत्र ३:१२, दी ॲम्पलीफाईड बायबल; विल्यम बार्क्ले यांचे द न्यू टेस्टमेंट) या सूचनांमध्ये त्या अनेक भविष्यवाण्यांचाही समावेश आहे ज्या केवळ यहोवाच्या दिवसाच्या आगमनाविषयीच भाकीत करत नाहीत तर जे यहोवाची ‘वाट पाहतात’ त्यांना मिळणार असलेल्या उदंड आशीर्वादांचेही वर्णन करतात.—सफन्या ३:८.

२०. आपण कोणत्या आदेशाचे मनापासून पालन केले पाहिजे?

२० खरे तर, आपण सर्वांनी संदेष्ट्या सफन्याने दिलेल्या या आदेशाचे मनापासून पालन करण्याची ही वेळ आहे: “परमेश्‍वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:२, ३.

२१. देवाच्या लोकांचा २००७ या सालादरम्यान कोणता निर्धार असेल?

२१ हे लक्षात घेता, २००७ सालाकरता निवडण्यात आलेले हे वार्षिक वचन अगदी योग्यच आहे: “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे.” देवाच्या लोकांना ही खात्री आहे की “तो जवळच आहे आणि फार त्वरा करतो.” (सफन्या १:१४) “तो उशीर करणार नाही.” (हबक्कूक २:३, पं.र.भा.) तर मग, त्या दिवसाची वाट पाहात असताना आपण सध्याच्या या काळात घडणाऱ्‍या घडामोडींकडे सतत लक्ष ठेवले पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की या भविष्यवाण्यांची पूर्णता अगदी जवळ आली आहे! (w०६ १२/१५)

तुमचे उत्तर काय?

• “यहोवाचा मोठा दिवस” काय आहे?

• बरेच लोक सध्याच्या काळाचे महत्त्व का ओळखत नाहीत?

• पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी काळाची निकड ओळखून लगेच कार्य करणे का महत्त्वाचे होते?

• आपण सतत या काळाची निकड ओळखून वागण्याकरता काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

२००७ सालाकरता वार्षिक वचन: “यहोवाचा दिवस जवळ आहे.”—सफन्या १:१४, पं.र.भा.

[९ पानांवरील चित्र]

नोहाच्या काळाप्रमाणे आजही, यहोवाचा दिवस येईल तेव्हा थट्टा करणारे आश्‍चर्यचकित होतील

[१० पानांवरील चित्र]

जेरूसलेम शहराला ‘सैन्यांचा वेढा पडत आहे’ हे पाहताच ख्रिस्ताच्या अनुयायांनी विलंब न लावता लगेच पाऊल उचलायचे होते