व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा ‘न्याय करील’

यहोवा ‘न्याय करील’

यहोवा ‘न्याय करील’

“देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धांवा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?”—लूक १८:७.

१. तुम्हाला कोणाच्या उदाहरणामुळे उत्तेजन मिळाले आहे व का?

सबंध जगभरात, यहोवाच्या साक्षीदारांना अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलेल्या बंधूभगिनींचा सहवास अनुभवण्याची सुसंधी लाभली आहे. अशा या प्रिय बंधूभगिनींपैकी तुम्ही कोणाला वैयक्‍तिकरित्या ओळखता का? कदाचित अशा एखाद्या वयस्क बहिणीचे नाव तुमच्या मनात आले असेल, जिचा बाप्तिस्मा अनेक वर्षांपूर्वी झाला होता आणि जी क्वचितच सभा चुकवते. किंवा तुम्हाला अशा एखाद्या वृद्ध भावाची आठवण झाली असेल, जे अनेक दशकांपासून आतापर्यंत दर आठवडी न चुकता मंडळीच्या क्षेत्र सेवाकार्यात सहभागी होतात. अर्थात, या विश्‍वासू बांधवांपैकी अनेकांनी असा विचार केला होता की आतापर्यंत तर हर्मगिदोन यायला हवे होते. पण अन्यायाने भरलेले हे जग अजूनही अस्तित्वात आहे हे पाहून या बांधवांचा यहोवाच्या अभिवचनांवरील भरवसा जराही कमी झालेला नाही. आणि ‘शेवटपर्यंत टिकून राहण्याचा’ त्यांचा निर्धार अजूनही अढळ आहे. (मत्तय २४:१३) यहोवाच्या या एकनिष्ठ सेवकांनी दाखवलेला उल्लेखनीय विश्‍वास खरोखरच मंडळीतल्या सर्वांना उत्तेजन देणारा आहे.—स्तोत्र १४७:११.

२. कोणती वस्तुस्थिती पाहून आपल्याला वाईट वाटते?

पण कधीकधी मात्र आपल्याला अगदी उलट चित्र दिसून येते. अनेक वर्षे सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेतलेल्या काही साक्षीदारांचा विश्‍वास कालांतराने कमी कमी होत गेलेला आढळतो. आणि एक वेळ तर अशी येते की ते ख्रिस्ती मंडळीशी संपर्कच तोडून टाकतात. पूर्वी आपल्यासोबत मिळून यहोवाची सेवा केलेल्या या बांधवांनी यहोवाला सोडून दिले आहे हे पाहून आपल्याला अतिशय वाईट वाटते. आणि यांपैकी प्रत्येक ‘हरवलेल्या मेंढराला’ पुन्हा एकदा कळपात परतण्यास मदत करण्याची आपली मनःपूर्वक इच्छा आहे. (स्तोत्र ११९:१७६; रोमकर १५:१) तरीपण, काही बांधव विश्‍वासू राहतात तर काही विश्‍वासातून पडतात हे पाहून काही प्रश्‍न विचारावेसे वाटतात. बऱ्‍याच साक्षीदारांना यहोवाच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यास कोणती गोष्ट मदत करते? इतरजण का विश्‍वासातून पडतात? यहोवाचा “मोठा दिवस” वेगाने जवळ येत आहे यावरचा आपला विश्‍वास कायम राहण्याकरता आपण वैयक्‍तिकरित्या काय करू शकतो? (सफन्या १:१४) या प्रश्‍नांच्या उत्तरांकरता लूकच्या शुभवर्तमानात आढळणाऱ्‍या एका दृष्टान्तावर विचार करुया.

“मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा” हयात असणाऱ्‍यांकरता एक इशारा

३. विधवा व न्यायाधीश यांच्याविषयीच्या दृष्टान्ताचा विशेषतः कोणाला फायदा होऊ शकतो व का?

लूकच्या १८ व्या अध्यायात, येशूने एक विधवा व एक न्यायाधीश यांच्याबद्दल दिलेला दृष्टान्त आढळतो. हा दृष्टान्त, आपल्या मित्राकडे पुन्हा पुन्हा उसन्या भाकरी देण्याची विनंती करणाऱ्‍या माणसाच्या, मागच्या लेखात आपण विचारात घेतलेल्या दृष्टान्ताशी मिळताजुळता आहे. (लूक ११:५-१३) पण, विधवा व न्यायाधीश यांच्या दृष्टान्ताचा बायबलमधील संदर्भ लक्षात घेतल्यास असे दिसून येते की हा दृष्टान्त “मनुष्याचा पुत्र [राज्य सामर्थ्यासह] येईल तेव्हा” हयात असणाऱ्‍यांकरता विशेषतः समर्पक आहे. हा विशिष्ट काळ १९१४ साली सुरू झाला.—लूक १८:८. *

४. लूकच्या १८ व्या अध्यायातील दृष्टान्त सांगण्याआधी येशूने कशाविषयी चर्चा केली?

हा दृष्टान्त सांगण्याआधी येशूने म्हटले की त्याच्या उपस्थितीचा पुरावा, ‘आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्‍या बाजूपर्यंत प्रकाशणाऱ्‍या विजेइतका’ स्पष्ट व दूरदूरपर्यंत पाहता येण्याजोगा असेल. (लूक १७:२४; २१:१०, २९-३३) तरीपण, ‘अंतसमयात’ हयात असणारे बहुतेक लोक या सुस्पष्ट पुराव्याकडे लक्ष देणार नाहीत. (दानीएल १२:४) का बरे? कारण ते नोहा व लोट यांच्या काळात यहोवाने दिलेल्या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या लोकांसारखेच असतील. नोहा व लोट यांच्या काळातले लोक ‘त्यांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधीत होते.’ (लूक १७:२६-२९) या सर्वसामान्य कार्यांत ते इतके तल्लीन झाले होते की देवाच्या इच्छेकडे लक्ष देण्याकरता त्यांच्याजवळ सवडच नव्हती आणि याच कारणामुळे त्यांनी आपला जीव गमावला. (मत्तय २४:३९) आजही, लोक आपल्या दररोजच्या कामांत इतके गढून गेलेले आहेत, की या अभक्‍त जगाचा नाश जवळ आला आहे याचा पुरावा पाहण्याकरता त्यांच्याजवळ सवड नाही.—लूक १७:३०.

५. (क) येशूने कोणाला इशारा दिला व का? (ख) काहीजण विश्‍वासातून मागे का फिरले?

त्याअर्थी, येशूला आपल्या अनुयायांबद्दल काळजी वाटणे साहचिकच होते. त्याला अशी भीती होती की त्यांनी सैतानाच्या जगात हळूहळू वाहवत जाऊन त्याच्या मार्गातून “मागे फिरू नये.” (लूक १७:२२, ३१) बऱ्‍याच ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीत असेच घडले आहे. कित्येक वर्षांपर्यंत हे बंधू त्या दिवसाची वाट पाहात होते, जेव्हा यहोवा या दुष्ट जगाचा नाश करील. पण त्यांनी अपेक्षिलेल्या वेळी हर्मगिदोन आले नाही तेव्हा ते निराश झाले. यहोवाच्या न्यायाचा दिवस अगदी जवळ आला आहे यावरील त्यांचा भरवसा हळूहळू कमी होऊ लागला. त्यांचा सेवाकार्यातला सहभाग कमी होत गेला आणि हळूहळू ते दररोजच्या कार्यांत इतके रममाण झाले की आध्यात्मिक गोष्टींकरता त्यांना वेळच मिळेनासा झाला. (लूक ८:११, १३, १४) कालांतकराने ते विश्‍वासातून ‘मागे फिरले.’ ही किती दुःखाची गोष्ट आहे!

“सर्वदा प्रार्थना” करण्याची गरज

६-८. (क) विधवा व न्यायाधीशाच्या दाखल्याचे वर्णन करा. (ख) येशूने या दृष्टान्ताचा अर्थ कशाप्रकारे समजावून सांगितला?

यहोवाच्या अभिवचनांवरील आपला भरवसा कधीही कमी होऊ नये म्हणून आपण काय करावे? (इब्री लोकांस ३:१४) आपल्या शिष्यांना सैतानाच्या दुष्ट जगाकडे मागे न फिरण्याचा इशारा दिल्यावर लगेच येशू याच प्रश्‍नाकडे वळाला.

लूकच्या वृत्तांतानुसार, “त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्‍याविषयी [येशूने] त्यांना एक दाखला सांगितला.” त्याने म्हटले: “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’ पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.’”

दाखला सांगून झाल्यावर येशूने त्याचा अर्थ समजावून सांगितला: “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका! तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्‍वास आढळेल काय?”—लूक १८:१-८.

“माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा”

९. विधवा व न्यायाधीशाच्या दाखल्यात कोणता मुख्य विषय ठळकपणे लक्षात येतो?

हा दाखला वाचताना त्याचा मुख्य विषय अगदी ठळकपणे लक्षात येतो. दाखल्यातल्या दोन्ही पात्रांनी तसेच येशूनेही त्याचा उल्लेख केला आहे. विधवा न्यायाधीशाला म्हणते: “माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.” न्यायाधीश म्हणतो: “मी तिचा न्याय करीन.” येशू प्रश्‍न विचारतो: ‘देव न्याय करणार नाही का?’ तसेच, यहोवाविषयी तो म्हणतो, “तो त्यांचा न्याय लवकर करील.” (लूक १८:३, ५, ७, ८) देव नेमका केव्हा ‘न्याय करील?’

१०. (क) पहिल्या शतकात न्याय केव्हा करण्यात आला? (ख) आज देवाच्या सेवकांकरता न्याय केव्हा व कशाप्रकारे केला जाईल?

१० पहिल्या शतकात, “सूड घेण्याचे” (किंवा, “न्याय करण्याचे,” NW) दिवस सा.यु. ७० साली आले जेव्हा जेरूसलेम व त्यात असलेले मंदिर नष्ट करण्यात आले. (लूक २१:२२) आजच्या काळातल्या, देवाच्या लोकांकरता न्याय हा ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवशी’ केला जाईल. (सफन्या १:१४; मत्तय २४:२१) त्यावेळी यहोवा आपल्या लोकांवर “संकट आणणाऱ्‍या लोकांची परत संकटाने फेड” करील. त्यावेळी ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा [येशू ख्रिस्त] सूड उगवील.’—२ थेस्सलनीकाकर १:६-८; रोमकर १२:१९.

११. न्याय “लवकर” येईल तो कोणत्या अर्थाने?

११ पण यहोवा “लवकर” न्याय करील या येशूने दिलेल्या आश्‍वासनाचा आपण कसा अर्थ लावावा? देवाचे वचन दाखवते की मुळात यहोवा सहनशील असला तरीसुद्धा त्याची नियुक्‍त वेळ येताच तो लगेच न्याय करील. (लूक १८:७, ८; २ पेत्र ३:९, १०) नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा दुष्टांना विनाविलंब नष्ट करण्यात आले. तसेच लोटाच्या काळातही स्वर्गातून अग्नी आला तेव्हा दुष्टजनांचा नाश झाला. येशूने म्हटले: “मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल.” (लूक १७:२७-३०) पुन्हा एकदा दुष्टांचा “अकस्मात नाश” होईल. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३) खरोखर आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो की, न्याय मागणी करतो त्यापेक्षा एकही जास्तीचा दिवस यहोवा सैतानाच्या जगाला अस्तित्वात राहू देणार नाही.

“तो न्याय करील”

१२, १३. (क) विधवा व न्यायाधीशाविषयीच्या येशूच्या दाखल्यातून आपण काय शिकतो? (ख) यहोवा आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याला न्याय मिळवून देईल याची आपण खात्री का बाळगू शकतो?

१२ विधवा व न्यायाधीश यांच्याविषयी येशूने दिलेला दाखला इतर महत्त्वाच्या सत्यांवरही प्रकाश टाकतो. या दाखल्याचा अर्थ स्पष्ट करताना येशूने म्हटले: “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका! तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?” या ठिकाणी येशू यहोवाची तुलना त्या न्यायाधीशाशी करत नाही. यहोवा आपली उपासना करणाऱ्‍यांशी त्या न्यायाधीशासारखा वागेल असे तो म्हणत नाही. उलट न्यायाधीश व यहोवा यांच्यातला फरक दाखवून तो आपल्या अनुयायांना यहोवाविषयी काहीतरी शिकवतो. न्यायाधीश व यहोवा कोणकोणत्या बाबतीत अगदीच वेगळे आहेत?

१३ येशूच्या दाखल्यातला न्यायाधीश “अन्यायी” आहे. पण देव मात्र “न्यायी न्यायाधीश” आहे. (स्तोत्र ७:११; ३३:५) त्या न्यायाधीशाला विधवेविषयी जराही वैयक्‍तिक आस्था नाही, पण यहोवाला मात्र प्रत्येक व्यक्‍तीची काळजी आहे. (२ इतिहास ६:२९, ३०) न्यायाधीश विधवेला मदत करण्याची तयारी दाखवत नाही, पण यहोवा आपली सेवा करणाऱ्‍यांस मदत करायला सदैव तयार असतो, नव्हे उत्सुक असतो. (यशया ३०:१८, १९) तर यातून आपल्याला काय शिकायला मिळते? जर अन्यायी न्यायाधीशाने विधवेच्या विनंत्या ऐकून तिला न्याय दिला, तर मग यहोवा आपल्या लोकांच्या प्रार्थना ऐकून त्यांना न्याय मिळवून देईल याची आपण नक्कीच खात्री बाळगू शकतो!—नीतिसूत्रे १५:२९.

१४. देवाच्या न्यायाचा दिवस येण्याविषयी आपण आपला विश्‍वास का सोडू नये?

१४ त्याअर्थी, देवाच्या न्यायाचा दिवस येण्याविषयी जे शंका घेतात ते खरे तर एक गंभीर चूक करतात. का? कारण यहोवाचा “मोठा दिवस” जवळ आहे याविषयीचा आपला पक्का विश्‍वास सोडून देण्याद्वारे, यहोवा आपली अभिवचने पूर्ण करू शकतो किंवा नाही याविषयी ते शंका व्यक्‍त करतात. पण देवाच्या विश्‍वसनीयतेविषयी कोणीही शंका व्यक्‍त करू शकत नाही. (ईयोब ९:१२) एक महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की, वैयक्‍तिकरित्या आपण विश्‍वासू राहू का? अगदी हाच विषय येशूने विधवा व न्यायाधीशाच्या दाखल्याच्या शेवटी उपस्थित केला.

“त्याला पृथ्वीवर हा विश्‍वास आढळेल काय?”

१५. (क) येशूने कोणता प्रश्‍न विचारला आणि का? (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

१५ येशूने एक मनोवेधक प्रश्‍न विचारला: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर हा विश्‍वास आढळेल काय?” (लूक १८:८, NW तळटीप) “हा विश्‍वास” या संज्ञेवरून असे दिसून येते की येशू या ठिकाणी सर्वसामान्य अर्थाने विश्‍वासाविषयी बोलत नव्हता. तर तो एका विशिष्ट प्रकारच्या विश्‍वासाविषयी येथे बोलत होता. अर्थात, दाखल्यातील विधवेने दाखवला त्याप्रकारचा विश्‍वास. येशूने या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही. शिष्यांनी आपापल्या विश्‍वासाची गुणवत्ता तपासून पाहावी म्हणून येशूने मुद्दामहून हा प्रश्‍न उपस्थित केला होता. आपला विश्‍वास हळूहळू कमी तर झालेला नाही? आपण ज्या गोष्टींचा त्याग केला होता, त्यांकडे परत फिरण्याचा आपला कल आहे का? की आपला विश्‍वास त्या विधवेसारखा आहे? हे येशूच्या शिष्यांनी तपासून बघायचे होते. आज आपणही स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे की ‘“मनुष्याच्या पुत्राला” माझ्या हृदयात कशाप्रकारचा विश्‍वास आढळेल?’

१६. विधवेचा विश्‍वास कशाप्रकारचा होता?

१६ यहोवा ज्यांना न्याय मिळवून देईल अशा लोकांपैकी असण्याची जर आपली इच्छा असेल तर आपण त्या विधवेने केले त्याप्रमाणे केले पाहिजे. तिचा विश्‍वास कशाप्रकारचा होता? तिने वारंवार न्यायाधीशाकडे जाऊन ‘माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा,’ असे म्हणण्याद्वारे आपला विश्‍वास प्रकट केला. एका अन्यायी माणसाकडून न्याय मिळवण्यासाठी त्या विधवेने चिकाटी दाखवली. त्याचप्रकारे आज देवाचे सेवकही ही खात्री बाळगू शकतात की—त्यांनी अपेक्षा केली होती त्यापेक्षा अधिक वेळ लागला तरी, त्यांना यहोवाकडून न्याय निश्‍चितच मिळेल. शिवाय सतत प्रार्थना करण्याद्वारेही ते देवाच्या अभिवचनांवरील आपला विश्‍वास प्रकट करतात. होय, ते यहोवाचा “रात्रंदिवस धावा करितात.” (लूक १८:७) जर एखाद्या ख्रिस्ती उपासकाने देवाच्या न्यायाकरता प्रार्थना करण्याचे थांबवले तर यावरून असे दिसून येईल की यहोवा आपल्या सेवकांकरता कार्य करेल यावर त्याला भरवसा नाही.

१७. प्रार्थनेत तत्पर राहण्याची कोणती कारणे आपल्याकडे आहेत आणि यहोवाचा न्यायाचा दिवस अवश्‍य येईल याविषयी आपण दृढ विश्‍वास का बाळगला पाहिजे?

१७ त्या विधवेच्या परिस्थितीवरूनही आपल्याला हे कळून येते की प्रार्थना करत राहण्याची आपल्याजवळ अनेक कारणे आहेत. तिच्या व आपल्या परिस्थितीतील काही फरक लक्षात घ्या. त्या विधवेला कोणीही प्रोत्साहन दिलेले नसतानाही ती वारंवार न्यायाधीशाकडे जात राहिली. पण आपल्याला मात्र देवाच्या वचनात, ‘प्रार्थनेत तत्पर राहण्याचे’ पुष्कळदा प्रोत्साहन देण्यात येते. (रोमकर १२:१२) आपल्या विनंत्या मान्य केल्या जातील याची त्या विधवेला काही खात्री नव्हती पण आपल्याला मात्र यहोवाने आश्‍वासन दिले आहे की तो आपल्याला न्याय मिळवून देईल. आपल्या संदेष्ट्याच्या माध्यमाने यहोवाने म्हटले: “त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच. त्याला विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३; स्तोत्र ९७:१०) त्या विधवेच्या बाजूने बोलणारा किंवा तिच्यासाठी मध्यस्थी करणारा कोणीही नव्हता; पण आपल्याकरता एक सामर्थ्यशाली साहाय्यक आहे. अर्थात येशू “जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीहि [करतो].” (रोमकर ८:३४; इब्री लोकांस ७:२५) त्याअर्थी, जर ती विधवा आपल्या कठीण परिस्थितीतही न्याय मिळवण्याच्या आशेने न्यायाधीशाकडे जात राहिली तर मग आपण यहोवाचा न्यायाचा दिवस अवश्‍य येईल याबद्दल किती दृढ विश्‍वास बाळगला पाहिजे!

१८. प्रार्थनेमुळे आपला विश्‍वास कशाप्रकारे दृढ होईल आणि यामुळे आपल्याला यहोवाचा न्याय मिळवण्यास कशाप्रकारे मदत होईल?

१८ विधवेच्या दृष्टान्तावरून आपल्याला हे शिकायला मिळते की प्रार्थना व विश्‍वास यात जवळचा संबंध आहे आणि सर्वदा प्रार्थना करत राहिल्याने आपल्या विश्‍वासास कमकुवत करणाऱ्‍या प्रभावांना आपण तोंड देऊ शकतो. अर्थात प्रार्थना करत असल्याचा बाह्‍य दिखावा केल्याने आपण गमवलेला विश्‍वास परत मिळवू शकतो असे नाही. (मत्तय ६:७, ८) पण आपण पूर्णपणे देवावर अवलंबून आहोत याची जाणीव बाळगून जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ आणते आणि आपल्या विश्‍वासाला मजबूत बनवते. आणि तारणाकरता विश्‍वास असणे आवश्‍यक असल्यामुळेच येशूने आपल्या शिष्यांना असे प्रोत्साहन दिले की त्यांनी “सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये!” (लूक १८:१; २ थेस्सलनीकाकर ३:१३) अर्थात, यहोवाचा “मोठा दिवस” आपल्या प्रार्थनांवर अवलंबून नाही—आपण प्रार्थना केली किंवा नाही केली तरी तो निश्‍चित येईल. पण व्यक्‍तिशः आपल्याला न्याय मिळेल किंवा नाही आणि देवाच्या लढाईतून आपण जिवंत बचावू किंवा नाही हे निश्‍चितच आपल्या विश्‍वासावर, प्रार्थनांवर व आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने आपण वागतो किंवा नाही यावर अवलंबून आहे.

१९. देव अवश्‍य ‘न्याय करेल’ यावर आपला विश्‍वास असल्याचे आपण कसे सिद्ध करू शकतो?

१९ आपण आधी पाहिल्याप्रमाणे येशूने विचारले होते, की “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्‍वास आढळेल काय?” त्याच्या या लक्षवेधक प्रश्‍नाचे उत्तर काय आहे? आपण आनंदाने म्हणू शकतो, की आज पृथ्वीभरात यहोवाचे लक्षावधी सेवक आपल्या प्रार्थनांतून, धीरातून व चिकाटीतून हे दाखवत आहेत की त्यांच्याजवळ हा विश्‍वास आहे. तेव्हा, या प्रश्‍नाचे होकारार्थी उत्तर देता येते! होय सैतानाच्या जगाचा सध्या आपल्यावर कितीही अन्याय होत असला तरीसुद्धा आपण हा पक्का विश्‍वास बाळगतो की देव त्याचे ‘जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा न्याय’ अवश्‍य करेल. (w०६ १२/१५)

[तळटीप]

^ परि. 3 या दृष्टान्ताचे तात्पर्य पूर्णपणे समजून घेण्याकरता लूक १७:२२-३३ वाचावे. लूक १७:२२, २४, ३० या वचनांत ‘मनुष्याच्या पुत्राविषयी’ आलेले उल्लेख, लूक १८:८ यात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नाशी कशाप्रकारे संबंधित आहेत याकडे लक्ष द्या.

तुम्हाला आठवते का?

• काही ख्रिश्‍चनांनी आपला विश्‍वास का गमावला आहे?

• यहोवाच्या येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसाविषयी आपण पक्का विश्‍वास का बाळगू शकतो?

• सर्वदा प्रार्थना करत राहण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?

• सर्वदा प्रार्थना केल्यामुळे विश्‍वास गमवण्यापासून आपला कसा बचाव होऊ शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

विधवा व न्यायाधीश यांच्या दृष्टान्तातून कोणती गोष्ट स्पष्ट होते?

[२१ पानांवरील चित्रे]

आज लाखो लोकांचा असा विश्‍वास आहे की देव अवश्‍य ‘न्याय करेल’