व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली कृतज्ञ मनोवृत्ती कमी होऊ देऊ नका

आपली कृतज्ञ मनोवृत्ती कमी होऊ देऊ नका

आपली कृतज्ञ मनोवृत्ती कमी होऊ देऊ नका

“तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे?”—स्तोत्र १३९:१७.

१, २. आपण देवाच्या वचनाबद्दल कृतज्ञ का असले पाहिजे व स्तोत्रकर्त्याने आपली कृतज्ञता कशी व्यक्‍त केली?

एक खळबळजनक शोध लागला होता. जेरुसलेममधील यहोवाच्या मंदिराची डागडुजी करीत असताना महायाजक हिल्कीया याला “मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.” सुमारे ८०० वर्षांपूर्वी लेखन पूर्ण झालेला हा मूळ ग्रंथ होता. देव-भीरू राजा योशियासमोर जेव्हा हा ग्रंथ ठेवण्यात आला तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्याने तो ग्रंथ अतिशय आदराने घेतला आणि लगेच आपला चिटणीस शाफान याला तो मोठ्याने वाचून दाखवायला सांगितले.—२ इतिहास ३४:१४-१८.

आज, देवाचे वचन संपूर्ण अथवा निम्म्या रुपात, कोट्यवधी लोकांना वाचायला मिळते. पण मग याचा अर्थ शास्त्रवचनांचे मूल्य कमी होते, किंवा ते कमी महत्त्वाचे होते का? कसे होणार? त्यात तर आपल्या भल्यासाठी लिहून ठेवलेले सर्वसमर्थ देवाचे विचार नाहीत का? (२ तीमथ्य ३:१६) देवाच्या वचनाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्‍त करताना स्तोत्रकर्ता दावीद याने असे लिहिले: “तुझे संकल्प किती मोलवान्‌ वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे?”—स्तोत्र १३९:१७.

३. दावीदाला देवाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाची सखोल जाणीव होती हे कशावरून दिसून येते?

यहोवा, त्याचे वचन आणि खऱ्‍या उपासनेसाठी असलेल्या व्यवस्था यांच्याबद्दल दावीदाच्या मनातील कृतज्ञता केव्हाही कमी झाली नाही! त्याने रचलेल्या सुरेख स्तोत्रांतून त्याच्या भावना आपल्याला कळून येतात. जसे की, स्तोत्र २७:४ मध्ये त्याने असे लिहिले: “परमेश्‍वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्‍वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्‍वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” मूळ इब्री भाषेत, ‘ध्यान करणे’ या वाक्यांशाचा अर्थ चिंतन करण्यात निमग्न होणे, बारकाईने परीक्षण करणे, आवडीने, आनंदाने, कौतुकाने पाहणे असा होतो. तेव्हा, दावीदाला देवाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाची सखोल जाणीव होती. त्याचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी यहोवाने दिलेल्या सर्व गोष्टींबद्दल तो मनापासून कृतज्ञ होता आणि देवाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाचा प्रत्येक कण तो आनंदाने सेवन करीत होता. कृतज्ञता दाखवण्याच्या बाबतीत त्याने मांडलेले उदाहरण आपण नक्कीच अनुकरले पाहिजे.—स्तोत्र १९:७-११.

बायबल सत्य माहीत झाल्याच्या संधीबद्दल कृतज्ञ असा

४. कोणत्या कारणामुळे येशू “पवित्र आत्म्यांत उल्लसित” झाला?

देवाच्या वचनातील सूक्ष्मदृष्टी प्राप्त करणे, बौद्धिक क्षमतेवर किंवा जगिक शिक्षणावर अवलंबून नाही. कारण ही अशाप्रकारची मनोवृत्ती एखाद्याला गर्विष्ठ बनवू शकते. उलट, ती यहोवाच्या अपात्री कृपेवर अवलंबून आहे. आणि यहोवाने ही अपात्री कृपा नम्र, प्रांजळ मनाच्या लोकांना दाखवली आहे ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे. (मत्तय ५:३; १ योहान ५:२०) काही अपरिपूर्ण मानवांची नावे स्वर्गात लिहिली जात आहेत यावर जेव्हा येशूने मनन केले तेव्हा तो “पवित्र आत्म्यांत उल्लसित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तूं बाळकांस प्रगट केल्या आहेत.”—लूक १०:१७-२१.

५. येशूच्या शिष्यांनी त्यांना प्रकट करण्यात आलेली राज्याची सत्ये क्षुल्लक का लेखायची नव्हती?

या प्रार्थनेनंतर येशूने आपल्या शिष्यांकडे वळून म्हटले: “तुम्ही जे काही पाहत आहां ते पाहणारे डोळे धन्य होत; मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहां ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहां ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.” होय, येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना, त्यांना प्रकट करण्यात आलेल्या राज्याची मौल्यवान सत्ये क्षुल्लक लेखू नयेत म्हणून उत्तेजन दिले. ही सत्ये देवाच्या सेवकांच्या आधीच्या पिढीला प्रकट करण्यात आली नव्हती, आणि येशूच्या दिवसांतील “ज्ञानी आणि विचारवंत” लोकांना तर नाहीच नाही!—लूक १०:२३, २४.

६, ७. (क) देवाच्या सत्यांबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी आपल्याजवळ कोणती कारणे आहेत? (ख) आज खऱ्‍या आणि खोट्या धर्मात कोणता फरक दिसून येतो?

आपल्या दिवसात आपल्याला प्रकट करण्यात आलेल्या देवाच्या सत्यांबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी अधिक कारणे आहेत. कारण यहोवाने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासामार्फत’ आपल्या लोकांना त्याच्या वचनाचे आणखी खोल ज्ञान दिले आहे. (मत्तय २४:४५; दानीएल १२:१०) अंतसमयाविषयी संदेष्टा दानीएल याने असे लिहिले: ‘पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व [खऱ्‍या] ज्ञानाची वृद्धि होईल.’ (दानीएल १२:४) तुम्हाला नाही वाटत, आज देवाच्या ज्ञानाची वृद्धी झाली आहे आणि यहोवाचे सेवक आध्यात्मिक अन्‍नाने तृप्त झाले आहेत?

देवाच्या लोकांतील आध्यात्मिक समृद्धी आणि मोठ्या बाबेलमध्ये चाललेला धार्मिक गोंधळ यात किती फरक आपण पाहतो! या धार्मिक गोंधळामुळे पुष्कळ लोक निराश झाले आहेत किंवा खोट्या धर्मात चाललेल्या गोष्टी पाहून ऊबग आल्यामुळे ते खऱ्‍या उपासनेकडे वळत आहेत. हे मेंढरासमान लोक आहेत ज्यांना मोठ्या बाबेलच्या “पापांचे वाटेकरी” होण्याची किंवा “तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा” भोगण्याची इच्छा नाही. यहोवा आणि त्याचे सर्व सेवक अशा लोकांचे खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीत स्वागत करतात.—प्रकटीकरण १८:२-४; २२:१७.

कृतज्ञशील लोक देवाकडे झुंडीच्या झुंडीने येतात

८, ९. आज हाग्गय २:७ मधील शब्दांची पूर्णता कशी होत आहे?

आपल्या आध्यात्मिक मंदिराविषयी यहोवाने असे भाकीत केले: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” (हाग्गय २:७) देवाच्या लोकांतील पुनर्स्थापित शेष जणांनी जेरुसलेममधील मंदिर पुन्हा बांधले तेव्हा या आश्‍चर्यकारक भविष्यवाणीची पूर्णता हाग्गयच्या काळात झाली. आज, यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराच्या संबंधाने हाग्गयच्या भविष्यवाणीची आणखी पूर्णता होत आहे.

लाखो लोक देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याकरता लाक्षणिक मंदिराकडे झुंडीच्या झुंडीने येत आहेत आणि दर वर्षी २,००,००० पेक्षा अधिक लोक अर्थात “राष्ट्रांतील निवडक वस्तु” येत आहेत. (योहान ४:२३, २४) उदाहरणार्थ, २००६ सालचा सेवा वर्षाचा अहवाल दाखवतो की २,४८,३२७ लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. याचा अर्थ दर दिवसाला सरासरी ६८० नवीन जन देवाच्या मंदिरात येत आहेत! सत्याबद्दल त्यांना असलेले प्रेम आणि राज्य उद्‌घोषक म्हणून यहोवाची सेवा करण्याची त्यांची इच्छा हा पुरावा देते, की त्यांना खरोखरच देवाने आपल्याकडे आकर्षित केले आहे.—योहान ६:४४, ६५.

१०, ११. लोकांना सत्य समजते तेव्हा त्यांना ते किती आपलेसे वाटू लागते, हे दाखवणारे एखादे उदाहरण सांगा.

१० यांतील बहुतेक प्रामाणिक लोक सत्याकडे आकर्षित झाले कारण त्यांना ‘धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद कळला.’ (मलाखी ३:१८) वेन आणि व्हर्जिनिया या विवाहित दांपत्याचा अनुभव पाहा. ते प्रॉटेस्टंट चर्चचे सदस्य होते आणि त्यांच्या मनात प्रश्‍नांचे मोहोळ उठले होते. त्यांना युद्धाचा तिटकारा वाटायचा आणि पाळकाला जेव्हा सैनिकांवर व शस्त्रांवर आशीर्वाद मागताना त्यांनी पाहिले तेव्हा दोघेही गोंधळून गेले व अस्वस्थ झाले. जसजसे त्यांचे वय वाढत जाऊ लागले तसतसे चर्चमधील सदस्य त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे त्यांना वाटू लागले. व्हर्जिनिया संडे स्कूलमध्ये कित्येक वर्षांपासून शिकवत होत्या, तरीपण लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी राहिली नाही, असे त्यांना जाणवले. त्या म्हणाल्या: “कोणीही आम्हाला भेटायला यायचं नाही किंवा आम्ही आध्यात्मिकरीत्या कसे आहोत याची कुणालाही पर्वा नसायची. चर्चचा फक्‍त आमच्या पैशावर डोळा होता. आम्ही अतिशय निराश झालो होतो.” त्यांच्या चर्चने जेव्हा समलैंगिकतेसारख्या गोष्टी खपवून घेण्याची मनोवृत्ती दाखवली तेव्हा तर हे दोघे आणखीनच निरुत्साहित झाले.

११ मग, वेन आणि व्हर्जिनिया यांची नात आणि नंतर त्यांची मुलगी यहोवाच्या साक्षीदार बनल्या. सुरुवातीला वेन आणि व्हर्जिनियाला त्यांचा राग आला. पण नंतर त्यांचे मन बदलले आणि ते बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाले. वेन म्हणतात: “गेल्या ७० वर्षांमध्ये आम्ही बायबलच्या जितक्या गोष्टी शिकलो नव्हतो तितक्या अवघ्या तीन महिन्यात शिकलो! देवाचं नाव यहोवा आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला राज्याविषयी, पृथ्वीवर नंदनवन येणार आहे त्याविषयी काहीच माहीत नव्हतं.” या जोडप्याने लगेच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे सुरु केले व ते सेवेतही भाग घेऊ लागले. व्हर्जिनिया म्हणतात: “आम्हाला तर सर्वांना सत्य सांगावसं वाटतं होतं.” आणि २००५ साली त्यांचा बाप्तिस्मा झाला; दोघांनीही ऐंशी ओलांडली होती. “आम्हाला आता खरेखुरे ख्रिस्ती कुटुंब सापडले आहे,” असे ते म्हणाले.

“प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” करण्यात आल्याबद्दल कृतज्ञ असा

१२. यहोवाने आपल्या सेवकांना नेहमी कोणती मदत दिली आहे व तिचा फायदा उचलण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१२ यहोवाने नेहमी आपल्या सेवकांना त्याची इच्छा पूर्ण करण्यास मदत केली आहे. उदाहरणार्थ, नोहाला तारू कसे बांधायचे त्याविषयी स्पष्ट, विशिष्ट सूचना देण्यात आल्या. हा असा एक प्रकल्प होता जो पहिल्यांदा इतका अचूक करायचा होता! आणि नोहा हा प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडू शकला. का बरे? कारण “देवाने [नोहाला] जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:१४-२२) आजही यहोवा आपल्या सेवकांना त्याची इच्छा पूर्ण करण्यास सज्ज करतो. अर्थात आपले प्रमुख कार्य देवाच्या स्थापित राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व योग्य लोकांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवणे हे आहे. नोहाप्रमाणे आपलेही यश, आपल्या आज्ञाधारकतेवर अवलंबून आहे. यहोवा आपले वचन आणि आपली संघटना यांच्यामार्फत पुरवत असलेले मार्गदर्शन आपण आज्ञाधारकपणे पाळले पाहिजे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

१३. यहोवा आपल्याला कोणत्या माध्यमाद्वारे प्रशिक्षण देतो?

१३ आपले प्रमुख कार्य पूर्ण करण्याकरता, आधी आपण आपल्या मुख्य उपकरणाचा अर्थात देवाच्या वचनाचा “नीट” उपयोग करण्यास शिकले पाहिजे. देवाचे वचन “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य २:१५; ३:१६, १७) पहिल्या शतकाप्रमाणेच आजही यहोवा आपल्याला ख्रिस्ती मंडळीद्वारे अमूल्य प्रशिक्षण देतो. आज, संपूर्ण जगभरातील ९९,७७० मंडळ्यांत दर आठवडी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा चालवल्या जातात ज्यांमुळे आपल्याला सेवेत भाग घेण्याचे प्रशिक्षण मिळते. या सभांना नियमितरीत्या उपस्थित राहून व शिकत असलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात अंमल करून, तुम्ही या महत्त्वपूर्ण सभांबद्दल आपली कृतज्ञता दाखवता का?—इब्री लोकांस १०:२४, २५.

१४. यहोवाच्या सेवकांना त्याची सेवा करण्याचा जो विशेषाधिकार मिळाला आहे त्याबद्दल ते आपली कृतज्ञता कशी व्यक्‍त करतात?

१४ जगाच्या पाठीवरील देवाचे लाखो लोक सेवेमध्ये जोमाने भाग घेऊन, त्यांना मिळत असलेल्या प्रशिक्षणाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्‍त करतात. जसे की, २००६ सेवा वर्षांत ६७,४१,४४४ राज्य प्रचारकांनी एकूण १,३३,३९,६६,१९९ तास सेवेच्या विविध पैलूंमध्ये भाग घेऊन खर्च केले. यांत, ६२,८६,६१८ बायबल अभ्यास संचालित केल्याचाही समावेश आहे. जगभरातील अहवालात सांगण्यात आलेली ही केवळ काही प्रोत्साहनदायक माहिती आहे. पहिल्या शतकातील आपल्या बांधवांनी त्यांच्या काळात प्रचार कार्याच्या वृद्धिच्या अहवालांतून जसे प्रोत्साहन मिळवले तसे तुम्हीही आजच्या या अहवालांचे बारकाईने परीक्षण करून प्रोत्साहन मिळवावे असे आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.—प्रेषितांची कृत्ये १:१५; २:५-११, ४१, ४७; ४:४; ६:७.

१५. एखाद्याने त्याच्या पूर्ण मनाने केलेल्या सेवेविषयी निरुत्साहित का होऊ नये?

१५ दर वर्षी देवाच्या स्तुतीचा लोट जो त्याच्यापर्यंत पोहंचतो त्यावरून असे दिसते, की यहोवाच्या सेवकांना, त्याला ओळखण्याचा व त्याच्याविषयीची साक्ष देण्याचा जो सुहक्क मिळाला आहे त्याबद्दल ते मनापासून कृतज्ञ आहेत. (यशया ४३:१०) आपल्यातील वृद्ध, आजारी किंवा अशक्‍त बंधूभगिनी करत असलेल्या स्तुतीच्या यज्ञाची तुलना विधवेच्या दमडीशी करता येईल. परंतु यहोवा आणि त्याचा पुत्र, देवाची मनापासून सेवा करणाऱ्‍यांची कदर करतात. कारण हे सर्व बंधूभगिनी त्यांच्यापरीने प्रयत्न करतात.—लूक २१:१-४; गलतीकर ६:४.

१६. अलिकडील वर्षांत देवाने शिकवण्याची कोणती साधने पुरवली आहेत?

१६ सेवेचे प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्‍त यहोवा देव आपल्या संघटनेतर्फे आपल्याला उत्तमातली उत्तम शिकवण्याची साधने देखील देतो. अलिकडील शतकात, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि सध्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकांचा शिकवण्याच्या साधनांत समावेश होतो. या तरतूदींबद्दल मनापासून कृतज्ञ असलेले, सेवेमध्ये त्यांचा चांगला उपयोग करतात.

बायबल काय शिकवते पुस्तकाचा चांगल्याप्रकारे उपयोग करा

१७, १८. (क) बायबल काय शिकवते पुस्तकातील कोणत्या भागांवर तुम्ही क्षेत्र सेवेत अधिक भर देता? (ख) बायबल काय शिकवते पुस्तकाविषयी एका विभागीय पर्यवेक्षकांनी काय म्हटले?

१७ बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकात एकूण १९ अध्याय आहेत. तसेच एक परिशिष्टही आहे ज्यात विषयवार सविस्तर माहिती स्पष्ट आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे. हे पुस्तक सेवेसाठी जणू काय एक वरदानच आहे. उदाहरणार्थ, १२ व्या अध्यायात “देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगणे” या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. बायबल अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्याला या अध्यायाचा अभ्यास करताना समजेल, की तो देवाचा मित्र कसा होऊ शकेल. देवाचा मित्र बनण्याची कल्पना पुष्कळ लोकांच्या मनात येत नाही, किंवा त्यांना हे अशक्य कोटीतील वाटते. (याकोब २:२३) हे बायबल अभ्यास साधन बंधूभगिनींनी कशाप्रकारे स्वीकारले?

१८ ऑस्ट्रेलियातील एका विभागीय पर्यवेक्षकांनी म्हटले, की बायबल काय शिकवते पुस्तक “इतके आकर्षक आहे की घरमालक लगेच संभाषणास तयार होतात.” ते पुढे म्हणाले, की हे पुस्तक वापरायला देखील खूप सोपे असल्यामुळे “पुष्कळ राज्य प्रचारकांना सेवेत भाग घेण्यास नव्याने आत्मविश्‍वास व आनंद मिळाला आहे. पुष्कळ जण या पुस्तकाला सोन्याचा तुकडा (सोनेरी रंगाच्या कव्हरमुळे) म्हणतात ते काही उगच नाही!”

१९-२१. बायबल काय शिकवते पुस्तकाच्या महत्त्वावर जोर देणारे काही अनुभव सांगा.

१९ एक पायनियर भगिनी एका स्त्रीच्या घरी गेली तेव्हा, “देवानंच तुम्हाला पाठवलं असावं,” असे या स्त्रीने म्हटले. या स्त्रीबरोबर बिनलग्नाचा राहणारा पुरुष तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोडून गेला होता. पायनियर भगिनीने बायबल काय शिकवते पुस्तकातून पहिला अध्याय उघडून, “आपल्यावर अन्याय होतो तेव्हा देवाला कसे वाटते?” या उपशीर्षकाखालील ११ वा परिच्छेद मोठ्याने वाचला. “यातील मुद्दे वाचून ती खूप प्रभावित झाली. इतकी प्रभावीत झाली की, ती आपल्या दुकानाच्या मागं गेली आणि ढळाढळा रडली,” असे पायनियर भगिनीने म्हटले. ही स्त्री एका स्थानीय भगिनीबरोबर नियमित गृह बायबल अभ्यास करण्यास तयार झाली व ती आता चांगली प्रगतीही करत आहे.

२० होसे स्पेनमध्ये राहतात. एका वाहतूक अपघातात त्यांची पत्नी मरण पावली. त्यांनी दुःख कमी करण्यासाठी मादक औषधांचा आधार घेतला; ते मानसोपचारतज्ज्ञांकडेही गेले. परंतु या तज्ज्ञांना होसेला पीडित करणाऱ्‍या प्रश्‍नाचे: “देवानं माझ्या बायकोला मरण का येऊ दिलं?” याचे उत्तर सापडत नव्हते. मग एके दिवशी होसेंची मुलाखत फ्रँचेस्क यांच्याबरोबर झाली जे होसेच्याच कंपनीत कामाला होते. फ्रँचेस्क यांनी होसेला बायबल काय शिकवते पुस्तकाच्या ११ व्या अध्यायाची चर्चा करण्यास सुचवले. या अध्यायाचा विषय आहे: “देव दुःख काढून का टाकत नाही?” या अध्यायातील शास्त्रवचनानुसार दिलेले स्पष्टीकरण आणि शिक्षक व विद्यार्थ्याचे उदाहरण वाचल्यावर होसे खूप प्रभावीत झाले. ते नियमाने अभ्यास करू लागले, एका विभागीय संमेलनाला उपस्थित राहिले आणि आता स्थानीय राज्य सभागृहातील सभांनाही हजर राहतात.

२१ पोलंडमधील ४० वर्षीय रोमानला देवाच्या वचनाबद्दल पहिल्यापासून आदर आहे. ते बायबलचा अभ्यास करीत होते, परंतु कामाच्या व्यापामुळे त्यांचा अभ्यास अर्ध्यावरच राहिला. तरीपण ते एका प्रांतीय अधिवेशनाला हजर राहिले व त्यांना बायबल काय शिकवते पुस्तकाची एक प्रत मिळाली. त्यानंतर ते म्हणाले: “या पुस्तकामुळे, बायबलच्या सर्व मूलभूत शिकवणी, जुळणी कोड्याप्रमाणे जणू काय एका पूर्ण केलेल्या चित्राप्रमाणे दिसू लागतात.” रोमान आता नियमाने बायबलचा अभ्यास करत आहेत व उत्तम प्रगतीही करत आहेत.

आपली कृतज्ञशील मनोवृत्ती वाढवत राहा

२२, २३. आपल्यापुढे असलेल्या आशेबद्दल आपण नेहमी कृतज्ञता कशी दाखवू शकतो?

२२ “मुक्‍तिसमय जवळ आला आहे!” या प्रांतीय अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे खरे ख्रिस्ती, देवाने वचन दिलेल्या आणि येशू ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्‍तामुळे शक्य झालेल्या ‘सार्वकालिक मुक्‍तिची’ आतुरतेने वाट पाहत आहेत. या अद्‌भुत आशेबद्दल मनापासून कृतज्ञता दाखवण्याचा दुसरा सर्वोत्तम मार्ग असूच शकत नाही; व तो मार्ग आहे, ‘आपली सद्‌सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून शुद्ध करीत’ राहणे.—इब्री लोकांस ९:१२, १४.

२३ साठ लाखांपेक्षा अधिक राज्य उद्‌घोषक, स्वार्थी महत्त्वाकांक्षांचा पाठलाग करण्याचा दबाव असतानाही विश्‍वासूपणे देवाच्या सेवेत टिकून आहेत हा सर्वकाळातला सर्वश्रेष्ठ चमत्कारच म्हणावा लागेल. यावरून हेही सिद्ध होते, की यहोवाचे सेवक देवाची सेवा करण्याचा मान मिळाल्याबद्दल अगदी आपल्या बेंबीच्या देठापासून कृतज्ञशील आहेत. त्यांना माहीत आहे, की “प्रभूमध्ये [त्यांचे] श्रम व्यर्थ नाहीत.” ही आपली कृतज्ञशील मनोवृत्ती कधीही कमी होता कामा नये.—१ करिंथकर १५:५८; स्तोत्र ११०:३. (w०७ २/१)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• देवाबद्दल आणि त्याने केलेल्या आध्यात्मिक तरतूदींबद्दल कृतज्ञता दाखवण्याच्या बाबतीत आपण स्तोत्रकर्त्याकडून कोणता धडा शिकतो?

हाग्गय २:७ मधील शब्दांची पूर्णता आज कशी होत आहे?

• यहोवाने आपल्या सेवकांना त्याची सेवा प्रभावीपणे करण्यास कशाप्रकारे तयार केले आहे?

• यहोवाच्या चांगुलपणाबद्दल कृतज्ञ असल्याचे तुम्ही कसे दाखवू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्रे]

यहोवा, त्याची इच्छा पूर्ण करण्यास आपल्याला सज्ज करतो