प्रामाणिकपणा आपण फक्त इतरांकडूनच अपेक्षितो का?
प्रामाणिकपणा आपण फक्त इतरांकडूनच अपेक्षितो का?
“मला खोटेपणा आणि खोटे बोलणारे लोक मुळीच आवडत नाहीत!” हे आहेत एका १६ वर्षांच्या मुलीने काढलेले उद्गार. आपल्यापैकी बहुतेकजण तिच्या बोलण्याशी सहमत होऊ. आपल्याला दिली जाणारी माहिती, मग ती कोणी तोंडी सांगितलेली असो किंवा लिखित रूपात असो, ती खरी असावी अशी आपण अपेक्षा करतो. पण आपण इतरांना काही माहिती देतो तेव्हा आपण स्वतः प्रामाणिक असतो का?
जर्मनीत घेतलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की बहुतेक लोकांच्या मते, “स्वतःची किंवा दुसऱ्यांची हानी टाळण्याकरता क्षुल्लक गोष्टींत खोटे बोलण्यात काही गैर नाही. उलट लोकांसोबत सुरळीत संबंध राखण्यासाठी हे आवश्यकही आहे.” एका पत्रकाराने तर असेही लिहिले: “प्रत्येक गोष्टीत खरे बोलावे आणि केवळ खरे बोलावे हा आदर्श फार चांगला आहे, पण याचे पालन केले तरी जीवन नीरस होईल.”
असे तर नाही, की आपण केवळ इतरांकडूनच प्रामाणिक असण्याची अपेक्षा करतो, आणि स्वतः मात्र कधीकधी खोटे बोलण्यासाठी काही न काही सबब शोधून काढतो? खोटे बोलल्याने खरंच काही फरक पडतो का? खरे न बोलल्यामुळे कोणते परिणाम घडू शकतात?
खोटेपणामुळे होणारे दुष्परिणाम
खोटेपणामुळे किती दुष्परिणाम घडू शकतात याचा विचार करा. खोटे बोलण्याच्या सवयीमुळे नवरा बायकोत व कुटुंबातील इतर सदस्यांत अविश्वास निर्माण होतो. खोट्या अफवा पसरवल्यामुळे विनाकारण एखाद्याची बदनामी होऊ शकते. नोकरवर्गाच्या अप्रामाणिकतेमुळे उत्पादनाचा खर्च वाढतो आणि परिणामतः महागड्या वस्तू बाजारात येतात. कर भरण्याच्या बाबतीत बेईमानी केल्यामुळे सरकारांना सार्वजनिक सेवा पुरवण्याकरता पुरेसा निधी मिळत नाही. संशोधक वस्तूस्थितीचा विपर्यास करून सांगतात तेव्हा त्यांचे करियर नष्ट होते आणि नामांकित संस्थांची प्रतिमा डागाळली जाते. बेईमानी करून कमीत कमी वेळात श्रीमंत होण्याच्या फसव्या योजनांना बळी पडणारे भाबडे लोक आपली आयुष्यभरची कमाई गमावून बसतात. आणि कधीकधी तर याहूनही भयंकर परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागते. हे सर्व लक्षात घेता, यहोवा देवाला तिटकारा असणाऱ्या गोष्टींमध्ये “लबाड बोलणारी जिव्हा” आणि “लबाड बोलणारा खोटा साक्षी” यांचा समावेश आहे यात काही आश्चर्य नाही!—नीतिसूत्रे ६:१६-१९.
खोटेपणामुळे व्यक्तींना आणि सबंध समाजालाही हानी होऊ शकते ही वस्तूस्थिती आहे. सहसा कोणीही ही गोष्ट अमान्य करणार नाही. तर मग, लोक जाणूनबुजून खोटे का बोलतात? आणि प्रत्येक असत्य गोष्ट ही एक लबाडी का आहे? या व इतर प्रश्नांची पुढील लेखात चर्चा करूया. (w०७ २/१)
[३ पानांवरील चित्र]
खोटे बोलण्याच्या सवयीमुळे नवरा बायकोत अविश्वास निर्माण होतो