व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रामाणिक का असावे?

प्रामाणिक का असावे?

प्रामाणिक का असावे?

अठरा वर्षांचा मॅन्फ्रेड प्रशिक्षार्थी म्हणून एका कंपनीतील कार्यालयात कामाला होता. * कंपनीने त्याच्या व इतर प्रशिक्षार्थींकरता, आठवड्यातील दोन दिवस एका व्यावसायिक महाविद्यालयातील वर्गांना उपस्थित राहण्याची व्यवस्था केली होती. एके दिवशी त्यांचा वर्ग नेहमीच्या वेळेच्या आतच सुटला. कंपनीच्या नियमांप्रमाणे खरे तर सर्व प्रशिक्षार्थिंनी कंपनीत जाऊन उरलेला वेळ काम करायला हवे होते. पण परत जाण्याऐवजी ते सर्वजण आयती सुटी मिळाल्याच्या आनंदात, मौजमजा करायला निघून गेले. मॅन्फ्रेड एकटाच कंपनीत परत आला. आणि नेमके त्याच दिवशी प्रशिक्षार्थींचे वरिष्ठ अधिकारी भेट द्यायला आले. मॅन्फ्रेडला पाहून ते म्हणाले: “आज वर्ग नव्हता का? दुसरी मुलं कुठं आहेत?” मॅन्फ्रेडने त्यांना काय उत्तर द्यावे?

मॅन्फ्रेडची अवस्था, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली. खरे सांगावे, की वर्गसोबत्यांना वाचवण्यासाठी ते लपवावे? खरे सांगितले तर सगळी मुले अडचणीत सापडतील आणि यापुढे सर्वजण आपल्याला पाण्यात पाहतील. अशा परिस्थितीत खोटे सांगितले तर चालेल का? तुम्ही काय केले असते? मॅन्फ्रेडने काय केले ते नंतर पाहूया. पण खरे बोलावे की नाही हे ठरवण्याची परिस्थिती आपल्यावर येते तेव्हा कोणकोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट असतात याकडे आधी लक्ष देऊ या.

सत्य व असत्य यांतले जुने वैर

मानवजातीच्या इतिहासाच्या सुरुवातीला सर्व काही सत्यावरच आधारित होते. वस्तूस्थितीचा विपर्यास करणे, सत्यात आपल्या मनाप्रमाणे फेरबदल करून सांगणे किंवा खोटे सांगणे हे प्रकार अस्तित्वातच नव्हते. सृष्टिकर्ता यहोवा याला ‘सत्यस्वरूप देव’ म्हणण्यात आले आहे. त्याचे वचन सत्य आहे; त्याला खोटे बोलणे अशक्य आहे आणि तो खोटेपणाची व खोटे बोलणाऱ्‍यांची निर्भत्सना करतो.—स्तोत्र ३१:५; योहान १७:१७; तीत १:२.

तर मग, असत्य कसे काय अस्तित्वात आले? येशू ख्रिस्ताने या प्रश्‍नाचे सडेतोड उत्तर दिले. त्याचा वध करू पाहणाऱ्‍या धर्मपुढाऱ्‍यांना त्याने असे सांगितले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) अर्थात येशू येथे एदेन बागेत घडलेल्या घटनेच्या संदर्भात बोलत होता. तेथे सैतानाने पहिल्या मानवी दांपत्याला देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास आणि अशारितीने स्वतःवर पाप व मृत्यू ओढवण्यास उद्युक्‍त केले.—उत्पत्ति ३:१-५; रोमकर ५:१२.

येशूचे शब्द अगदी स्पष्टपणे सैतानाची ओळख “लबाडीचा बाप” अर्थात खोटेपणा व असत्याला जन्म देणाऱ्‍याच्या रूपात करून देतात. सैतान आजही असत्याचा प्रमुख पुरस्कर्ता असून ‘सर्व जगाला ठकवित आहे.’ सर्वत्र दिसणाऱ्‍या अप्रामाणिकतेमुळे मानवांना आज जी हानी झाली आहे त्याकरता प्रामुख्याने सैतानच जबाबदार आहे.—प्रकटीकरण १२:९.

सत्य व असत्य यांत प्रस्थापित झालेले हे जुने वैर आजही धुमसत आहे. मानव समाजाच्या सर्व थरांत ते अस्तित्वात असून प्रत्येक व्यक्‍तीवर त्याचा प्रभाव पडतो. एखादी व्यक्‍ती ज्याप्रकारे व्यवहार करते त्यावरून आपण कोणत्या पक्षात आहोत हे ती दाखवून देते. जे देवाच्या बाजूला आहेत ते आपल्या जीवनात देवाचे वचन, बायबल यातील तत्त्वांनुसार वर्तन करतात. जो कोणी सत्याच्या मार्गाने चालत नाही तो एकतर जाणून किंवा अजाणतेत स्वतःला सैतानाच्या हाती सोपवतो कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—१ योहान ५:१९; मत्तय ७:१३, १४.

खोटे बोलण्याची प्रवृत्ती कशामुळे?

“सगळे जग” सैतानाच्या कह्‍यात आहे म्हणूनच आज इतके लोक खोटे बोलतात. पण आपल्या मनात हा प्रश्‍न येऊ शकतो, की ‘“लबाडीचा बाप,” अर्थात सैतान याने असे का केले?’ यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींवर, आणि पहिल्या मानवी जोडप्यावरही यहोवाच सार्वभौम आहे हे सैतानाला माहीत होते. तरीसुद्धा सैतानाने या सर्वोच्च व अद्वितीय पदाची लालसा केली. ज्यावर त्याला अधिकार नव्हता त्याची त्याने कामना केली. या हव्यासापोटी व स्वार्थी आकांक्षेपोटी त्याने यहोवाचे स्थान बळकावण्यासाठी षडयंत्र रचले. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी सैतानाने खोटेपणाचा व लबाडीचा आश्रय घेतला.—१ तीमथ्य ३:६.

आजच्या काळाविषयी काय म्हणता येईल? आजही बरेच लोक हव्यासापोटी आणि स्वार्थी आकांक्षेपोटीच खोटे बोलण्यास प्रवृत्त होत नाहीत का? लोभी व्यापारजगतात, भ्रष्ट राजकारणात आणि खोट्या धर्मांत खोटेपणा, फसवाफसवी, ठकबाजी आणि भ्रष्टाचार माजला आहे. का? सहसा लोकांची हाव व महत्त्वाकांक्षाच त्यांना खोटेपणा करण्यास प्रवृत्त करत नाही का? इतरांना मागे टाकून स्वतः पुढे जाण्याच्या इच्छेमुळे व आपला ज्यावर अधिकार नाही असे धन, सत्ता किंवा प्रतिष्ठा मिळवण्याच्या इच्छेमुळेच सहसा ते असे करत नाहीत का? प्राचीन इस्राएलच्या बुद्धिमान राजा शलमोनाने अशा वागणुकीत दडलेल्या धोक्याविषयी म्हटले: “जो धनवान होण्याची उतावळी करितो त्याला शिक्षा झाल्यावांचून राहत नाही.” (नीतिसूत्रे २८:२०) आणि प्रेषित पौलाने असे लिहिले: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.” (१ तीमथ्य ६:१०) सत्ता व प्रतिष्ठा यांची अवाजवी ओढ असण्याविषयीही हेच म्हणता येईल.

खोटे बोलण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे भीती. सत्य सांगितल्यास होणाऱ्‍या परिणामांची व इतरजण आपल्याविषयी काय विचार करतील याची भीती. सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे, आपल्याला पसंत करावे अशी स्वाभाविक इच्छा लोकांना असते. पण ही इच्छा त्यांना आपल्या चुका लपवण्याकरता, आपले दोष झाकण्याकरता किंवा फक्‍त इतरांवर चांगली छाप पाडण्याकरता सत्याचा, थोडासाच का होईना, पण विपर्यास करण्यास भाग पाडते. म्हणूनच शलमोनाने लिहिले: “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.”—नीतिसूत्रे २९:२५.

सत्यस्वरूप देवाला एकनिष्ठ राहणे

कंपनीच्या अधिकाऱ्‍याने स्पष्टीकरण मागितले तेव्हा मॅन्फ्रेडने काय उत्तर दिले? त्याने खरे सांगितले. तो म्हणाला: “सरांनी आज आम्हाला लवकर सोडले, म्हणून मी परत आलो. इतरांबद्दल तुम्ही विचारले, तर त्यांच्यावतीने मी बोलू शकत नाही. तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे.”

मॅन्फ्रेड हुशारीने काहीतरी उत्तर देऊन मोकळा होऊ शकला असता. इतर मुलांनीही त्याची वाहवाह केली असती. पण मॅन्फ्रेडने एकनिष्ठपणे सत्याची बाजू घेतली ती उगाच नव्हे. मॅन्फ्रेड हा यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहे. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचा विवेक शुद्ध राहिला. तसेच त्याने आपल्या मालकाचाही विश्‍वास संपादन केला. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मॅन्फ्रेडला दागिन्यांच्या विभागात, जेथे इतर प्रशिक्षार्थींना सहसा काम करण्याची परवानगी दिली जात नसे, तेथे नेमण्यात आले. १५ वर्षांनंतर मॅन्फ्रेडला याच कंपनीत पदोन्‍नती मिळून एका जबाबदारीच्या पदावर नियुक्‍त करण्यात आले, तेव्हा त्याच वरिष्ठ अधिकाऱ्‍याने त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याला फोन केला व त्याच्या प्रामाणिकतेचा पुरावा देणाऱ्‍या या घटनेची त्याला आठवण करून दिली.

यहोवा हा सत्यस्वरूप देव असल्यामुळे ज्या कोणाला त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडायचा असेल त्याने ‘लबाडी सोडून देऊन खरे बोलले’ पाहिजे. देवाच्या सेवकाने सत्याला प्रिय मानले पाहिजे. नीतिसूत्रांच्या बुद्धिमान लेखकाने लिहिले: “विश्‍वासू साक्षी खोटे बोलत नाही.” पण खोटे किंवा लबाडी म्हणजे नेमके काय?—इफिसकर ४:२५; नीतिसूत्रे १४:५.

लबाडी म्हणजे नेमके काय?

प्रत्येक लबाडी असत्य असते पण प्रत्येक असत्य ही लबाडी नाही. का नाही? एका शब्दकोशानुसार, लबाडी म्हणजे, “एखादी गोष्ट असत्य आहे हे माहीत असून किंवा अशी खात्री असून, दुसऱ्‍याला फसवण्याच्या उद्देशाने ती गोष्ट खरी आहे असे सांगणे.” होय, लबाडीत दुसऱ्‍याला फसवण्याचा उद्देश गोवलेला असतो. त्याअर्थी, अजाणतेत काहीतरी असत्य बोलणे—उदाहरणार्थ, चुकून दुसऱ्‍यांना चुकीची माहिती किंवा आकडे देणे याला लबाडी किंवा खोटे बोलणे म्हणता येणार नाही.

शिवाय, विशिष्ट माहितीची अपेक्षा करणाऱ्‍या व्यक्‍तीला संपूर्ण उत्तर जाणून घेण्याचा अधिकार आहे का हे देखील लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, मॅन्फ्रेडला तेच प्रश्‍न जर दुसऱ्‍या एखाद्या कंपनीच्या अधिकाऱ्‍याने विचारले असते तर? त्याला सर्व काही सांगण्यास तो बाध्य असता का? नाही. त्या अधिकाऱ्‍याला ती माहिती जाणून घेण्याचा अधिकार नसल्यामुळे मॅन्फ्रेडवर ती माहिती त्याला देण्याचे बंधन नसते. अर्थात, या परिस्थितीतही त्याने खोटे सांगणे चुकीचेच ठरले असते.

या संबंधात येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते? एकेप्रसंगी, येशू काही लोकांशी बोलत होता, जे त्याचे शिष्य नव्हते. या लोकांनी त्याच्या प्रवासाच्या योजनांविषयी चौकशी केली. “तू येथून निघून यहूदीयात जा,” असा त्यांनी त्याला सल्ला दिला. येशूने त्यांना काय उत्तर दिले? “तुम्ही वर [जेरूसलेमला] सणाला जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्‍या सणास जात नाही.” याच्या काही काळानंतर मात्र तो सणासाठी जेरूसलेमला गेला. मग त्याने असे उत्तर का दिले? या लोकांना येशूच्या योजनांविषयी तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा अधिकार नव्हता. त्याअर्थी, येशूने जरी त्यांना असत्य सांगितले नव्हते तरीसुद्धा, त्यांच्याकडून स्वतःला व आपल्या अनुयायांना धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे त्याने त्यांना अपूर्ण उत्तर दिले. ही लबाडी नव्हती कारण प्रेषित पेत्राने ख्रिस्ताविषयी असे लिहिले: “त्याने पाप केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.”—योहान ७:१-१३; १ पेत्र २:२२.

स्वतः पेत्राविषयी काय? येशूला अटक करण्यात आली त्या रात्री पेत्राने तीन वेळा खोटे बोलून येशूला नाकारले नाही का? होय, पेत्र मनुष्याच्या भीतीला बळी पडला आणि खोटे बोलला. पण लगेच तो “मोठ्या दुःखाने रडला” आणि त्याने पश्‍चात्ताप केला, व त्याला क्षमा करण्यात आली. शिवाय, आपल्या चुकीतून त्याने धडा घेतला. काही दिवसांनंतर तो जाहीररित्या येशूबद्दल बोलला आणि जेरूसलेममधील यहुदी अधिकाऱ्‍यांनी येशूविषयी साक्ष देण्याचे थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने त्यांचे ऐकले नाही. पेत्राचे तात्पुरत्या काळासाठी योग्य मार्गातून भटकणे आणि मग लगेच पुन्हा मार्गावर येणे, यावरून आपल्या सर्वांना सांत्वन मिळू शकते कारण एखाद्या दुर्बल क्षणी तोल गेल्यामुळे आपल्या हातूनही सहज शब्दांत किंवा कृतींत चूक घडू शकते.—मत्तय २६:६९-७५; प्रेषितांची कृत्ये ४:१८-२०; ५:२७-३२; याकोब ३:२.

सत्य सर्वकाळ टिकेल

नीतिसूत्रे १२:१९ म्हणते, “सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.” होय, सत्य टिकून राहते. आणि लोक सत्य बोलण्यास व त्यानुसार वागण्यास आपले कर्तव्य समजतात तेव्हा मानवी संबंध अधिक स्थायी व समाधानदायक होतात. प्रामाणिकपणाचे केवळ दीर्घकालीन नव्हे तर काही तात्कालिक लाभही आहेत. उदाहरणार्थ, शुद्ध विवेक, चांगले नाव, आणि वैवाहिक जीवनात, कुटुंबांत, मित्रमंडळीत आणि व्यवसायातही चांगले संबंध हे यांपैकी काही लाभ आहेत.

दुसरीकडे पाहता, असत्य फारकाळ टिकत नाही. खोटे बोलणारी जिव्हा काही काळ इतरांना फसवू शकते पण दीर्घ पल्ल्यात असत्य टिकून राहत नाही. शिवाय, यहोवा सत्यस्वरूप देव असल्यामुळे असत्य आणि त्यास बढावा देणाऱ्‍यांना खपवून घेण्याकरता त्याने एक कालमर्यादा ठरवली आहे. बायबल हे अभिवचन देते की यहोवा, लबाडीचा बाप व सर्व जगाला ठकविणाऱ्‍या दियाबल सैतानाचा प्रभाव कायमचा नाहीसा करील. यहोवा लवकरच सर्व खोटेपणाचा व खोटे बोलणाऱ्‍यांचा नाश करील.—प्रकटीकरण २१:८.

यानंतर सर्वकाळ “सत्याची वाणी” टिकून राहील! (w०७ २/१)

[तळटीप]

^ परि. 2 हे त्याचे खरे नाव नाही.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

हव्यासापोटी आणि स्वार्थी आकांक्षेपोटीच लोक खोटे बोलण्यास प्रवृत्त होतात

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रत्येक लबाडी असत्य असते पण प्रत्येक असत्य ही लबाडी नाही

[६ पानांवरील चित्र]

पेत्राने ख्रिस्ताला नाकारले यावरून आपण काय शिकतो?

[७ पानांवरील चित्र]

सत्य बोलल्यामुळे मानवी संबंध अधिक स्थायी व समाधानदायक होतात