व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल जे शिकवते तेच शिकवा

बायबल जे शिकवते तेच शिकवा

बायबल जे शिकवते तेच शिकवा

“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” —मत्तय २८:१९, २०.

१. बायबलच्या उपलब्धतेविषयी काय म्हणता येते?

यहोवाचे वचन अर्थात पवित्र बायबल जगातील सर्वात जुन्या पुस्तकांपैकी व सर्वाधिक खप असलेले पुस्तक आहे. त्याचा काही भाग २,३०० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आला आहे. पृथ्वीच्या ९० टक्के रहिवाशांना ते आपल्या मातृभाषेत उपलब्ध आहे.

२, ३. (क) बायबलच्या शिकवणींविषयी आज जगात गोंधळ का माजला आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

कोट्यवधी लोक दररोज बायबलमधील एखादा भाग वाचतात. काहींनी तर अनेक वेळा बायबल वाचून काढले आहे. हजारो धर्म बायबलच्या आधारावर शिकवण देण्याचा दावा करतात परंतु इतर धार्मिक गट शिकवत असलेल्या शिकवणींशी ते सहमत नाहीत. एकाच धर्माच्या सदस्यांमध्ये असलेल्या उग्र मतभेदामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. काहींच्या मनात बायबलविषयी, त्याच्या उगमाविषयी आणि त्याच्या महत्त्वाविषयी अनेक शंका आहेत. पुष्कळ लोक त्याला एक पवित्र पुस्तक मानतात जे फक्‍त धार्मिक विधींच्या वेळी वचन देण्यासाठी किंवा मग कोर्टात त्याच्यावर हात ठेवून सत्य बोलण्याची शपथ घेण्यासाठी वापरले पाहिजे.

खरे तर बायबलमध्ये मानवजातीसाठी देवाचे शक्‍तिशाली वचन अथवा संदेश आहे. (इब्री लोकांस ४:१२) त्यामुळे यहोवाचे साक्षीदार यानात्याने आपली इच्छा आहे की लोकांनी बायबल जे शिकवते ते शिकावे. येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांवर जी कामगिरी सोपवली ती पूर्ण करण्यास आपल्याला आनंद वाटतो. त्याने असे म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) आपल्या सार्वजनिक सेवेत आपण प्रामाणिक हृदयाच्या लोकांना भेटतो जे, जगात चाललेला धार्मिक गोंधळ पाहून अस्वस्थ झाले आहेत. या लोकांना आपला निर्माणकर्ता कोण आहे याविषयीचे सत्य जाणून घ्यायचे असते, जीवनाचा उद्देश काय याविषयी बायबल काय शिकवते हे माहीत करून घ्यायचे असते. अनेक लोक ज्यामुळे अस्वस्थ होतात अशा तीन प्रश्‍नांची चर्चा आपण करूया. धार्मिक नेते या प्रश्‍नांची कोणती चुकीची उत्तरे देतात परंतु बायबल नेमके काय शिकवते ते आपण पाहूया. ते प्रश्‍न पुढीलप्रमाणे आहेत: (१) देवाला आपली काळजी आहे का? (२) माणूस जन्माला का येतो? (३) मृत्यूनंतर आपले काय होते?

देवाला आपली काळजी आहे का?

४, ५. देवाला आपली काळजी नाही, असे लोकांना का वाटते?

सर्वात आधी आपण, देवाला आपली खरोखरच काळजी आहे का? या प्रश्‍नाची चर्चा करूया. दुःखाची गोष्ट म्हणजे पुष्कळ लोकांना या प्रश्‍नाचे उत्तर, नाही असेच वाटते. त्यांना असे का वाटते? एक कारण हे आहे, की ते द्वेष, युद्धे आणि पीडा यांनी भरलेल्या जगात राहतात. ‘देवाला आपली काळजी असती तर त्याने या दुःखद गोष्टी घडूच दिल्या नसत्या,’ असा ते तर्क करतात.

देवाला काळजी नाही असा विचार करण्याचे दुसरे कारण हे आहे, की धार्मिक नेत्यांकडून त्यांना अशी माहिती मिळालेली असते. कोणतेही संकट कोसळते तेव्हा धार्मिक नेते सहसा काय म्हणतात? एका स्त्रीच्या दोन तान्ह्या मुलांचे अपघाती निधन झाले तेव्हा तिला पाळकाने म्हटले: “ही ईश्‍वराची इच्छा होती. देवाला आणखी दोन देवदूत हवे होते.” पाळक जेव्हा अशी विधाने करतात तेव्हा ते, आज जगात चाललेल्या वाईट गोष्टींसाठी वास्तविकतेत देवाला जबाबदार ठरवतात. पण शिष्य याकोबाने असे लिहिले: “कोणीही जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, ‘हे संकट देवाने माझ्यावर आणले.’ कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.” (याकोब १:१३, ईजी टू रीड व्हर्शन) यहोवा देव केव्हाही वाईट गोष्टी घडवून आणत नाही. होय, “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको.”—ईयोब ३४:१०.

६. या जगात चाललेल्या दुष्टाईमागे व दुःखामागे कोण आहे?

पण मग आज जगात इतकी दुष्टाई व इतके दुःख का आहे? एक कारण हे आहे, की मानवजातीने देवाला आपला शासक म्हणून नाकारले आहे. मानवजातीला त्याच्या धार्मिक नियमांचे व तत्त्वांचे पालन करायचे नाही. मानव अजाणतेत देवाचा शत्रू सैतान याच्या अधीन झाले आहेत. आणि “सगळे जग [सैतानाला] वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) ही वस्तुस्थिती माहीत झाल्यावर, आपल्याला हे समजायला सोपे जाईल की आज जगात इतकी वाईट परिस्थिती का आहे. सैतान दुष्ट, द्वेषपूर्ण, फसवा व क्रूर आहे. त्यामुळे हे जग आपल्या शासकाचे व्यक्‍तिमत्त्व प्रतिबिंबित करते. म्हणूनच तर आज इतकी दुष्टाई आहे!

७. आपण अनुभवत असलेल्या दुःखाची काही कारणे कोणती आहेत?

मानवी अपरिपूर्णता, हे आज आपण अनुभवत असलेल्या दुःखाचे दुसरे कारण आहे. पापी मानव या नाही तर त्या मार्गाने प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात ज्याची परिणती युद्धे, जुलूम, दुःख हे आहेत. उपदेशक ८:९ किती उचितरीत्या असे म्हणते: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” दुःखाचे आणखी एक कारण हे आहे, की “समय व प्रसंग” सर्वांना घडतात. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) लोकांना संकटांचा सामना करावा लागतो कारण ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी असतात.

८, ९. यहोवा खरोखरच आपली काळजी घेतो हे आपल्याला कसे माहीत होते?

यहोवा दुःख आणत नाही, हे माहीत झाल्याने आपल्याला किती सांत्वन मिळते. पण मग आपल्या जीवनात जे काही चालले आहे त्याविषयी देवाला काही काळजी आहे का? होय, असे या प्रश्‍नाचे दिलासा देणारे उत्तर आहे. यहोवाला काळजी आहे, हे आपल्याला माहीत आहे कारण त्याचे ईश्‍वरप्रेरित वचन आपल्याला, त्याने मानवांना वाईट मार्गावर चालण्याची अनुमती का दिली आहे, याची कारणे सांगते. या कारणात दोन वादविषय गोवलेले आहेत: त्याचे सार्वभौमत्व आणि मानवाची एकनिष्ठा. यहोवा सर्वसमर्थ निर्माणकर्ता असल्यामुळे, त्याने दुःखाला अनुमती का दिली याचे कारण आपल्याला सांगण्यास तो बांधील नाही. तरीपण तो सांगतो, कारण त्याला आपली काळजी आहे.

देवाला आपली काळजी आहे, याचा आणखी पुरावा पाहा. नोहाच्या दिवसांत जेव्हा सर्व पृथ्वीवर दुष्टाई माजली होती तेव्हा “त्याच्या चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६) मग आज त्याला काही वेगळे वाटते का? नाही, कारण तो बदललेला नाही. (मलाखी ३:६) आजही त्याला अन्याय व अन्यायामुळे लोक कसे दुःख भोगत आहेत हे पाहवत नाही. यास्तव बायबल असे शिकवते, की देव लवकरच मानवी शासनाचे व दियाबलच्या प्रभावाचे सर्व दुष्परिणाम काढून टाकणार आहे. देव आपली काळजी घेतो याचा हा सर्वात खात्रीलायक पुरावा नाही का?

१०. मानवाच्या दुःखाविषयी यहोवाला कसे वाटते?

१० आपण अनुभवत असलेल्या दुर्घटना देवाची इच्छा आहे, असे सांगून धार्मिक नेते देवाचे नाव खराब करतात. परंतु मानवाच्या दुःखाचा अंत करण्याची यहोवाला उत्कट इच्छा आहे. १ पेत्र ५:७ म्हणते: “तो तुमची काळजी घेतो.” हीच आहे बायबलची खरी शिकवण!

माणूस जन्माला का येतो?

११. पृथ्वीवरील मानवी जीवनाविषयी जगाचे धर्म काय शिकवण देतात?

११ आता आपण दुसऱ्‍या प्रश्‍नाची चर्चा करू या, जो अनेक लोकांच्या मनात येतो. तो आहे: माणूस जन्माला का येतो? जगाचे धर्म या प्रश्‍नाचे सहसा असे उत्तर देतात, की मानव पृथ्वीवर तात्पुरत्या काळासाठी आहे. हे विश्‍व दुसऱ्‍या जगात जाण्याकरता केवळ एक मुक्कामाचे ठिकाण आहे, असा ते विश्‍वास करतात. देव कधीनकधी तरी या ग्रहाचा नाश करणार आहे, ही खोटी शिकवण काही पाळक शिकवतात. या अशा शिकवणींमुळे पुष्कळ लोकांचा असा ग्रह झाला आहे, की आज नाहीतर उद्या आपल्याला मरायचेच आहे तेव्हा आत्ताच जीवनाचा पुरेपूर उपभोग घ्या. परंतु, माणूस जन्माला का येतो, याबद्दल बायबल नेमके काय शिकवते?

१२-१४. पृथ्वी आणि मानवजातीबद्दल देवाचा काय उद्देश आहे याविषयी बायबल काय शिकवते?

१२ पृथ्वीबद्दल आणि मानवजातीबद्दल देवाचा एक सुरेख उद्देश आहे. “त्याने [पृथ्वी] निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) शिवाय, यहोवाने ‘पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहे की ती कधीहि ढळणार नाही.’ (स्तोत्र १०४:५) पृथ्वी आणि मानवजात यांच्याबद्दल देवाचा उद्देश काय आहे हे शिकून घेतल्यानंतर आपल्याला, माणूस जन्माला का येतो हे समजू शकेल.

१३ यहोवाने पृथ्वीची निर्मिती इतकी काळजीपूर्वक केली की मानव त्यावर वास करू शकेल, याविषयीचा वृत्तांत आपल्याला उत्पत्तिच्या १ ल्या व २ ऱ्‍या अध्यायात वाचायला मिळतो. मानवाला राहण्याकरता पृथ्वीची निर्मिती करून झाल्यानंतर सर्वकाही “फार चांगले” होते. (उत्पत्ति १:३१) देवाने पहिला पुरुष आदाम व पहिली स्त्री हव्वा यांना एदेन नावाच्या सुंदर बागेत ठेवले जेथे त्यांना खाण्याकरता विपुल मात्रेत अन्‍न होते. या पहिल्या मानवी दांपत्याला असे सांगण्यात आले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” त्यांना परिपूर्ण मुलांना जन्म द्यायचा होता, त्यांना राहण्यासाठी जी बाग दिली होती त्या बागेच्या सीमा वाढवायच्या होत्या आणि सर्व प्राण्यांवर स्वामित्व गाजवायचे होते.—उत्पत्ति १:२६-२८.

१४ पृथ्वीवर परिपूर्ण मानव कुटुंबाने सदासर्वकाळ जगावे, हा यहोवाचा उद्देश आहे. देवाचे वचन म्हणते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) होय, मानवजातीला पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्यासाठी बनवण्यात आले होते. हा देवाचा उद्देश आहे आणि बायबल नेमके हेच शिकवते!

मृत्यूनंतर आपले काय होते?

१५. मृत्यूनंतर आपले काय होते, याविषयी जगातील बहुतेक धर्मांची काय शिकवण आहे?

१५ आता आपण तिसऱ्‍या प्रश्‍नाची चर्चा करू ज्याची अनेक लोकांना चिंता वाटते. तो आहे: मृत्यूनंतर आपले काय होते? जगातील बहुतेक धर्म असे शिकवतात, की मनुष्याच्या देहाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या देहातला एक भाग जिवंत राहतो. काही धार्मिक गट तर अजूनही, देव दुष्ट लोकांना धगधगत्या नरकाग्नीत टाकून शिक्षा देतो, असा विश्‍वास करतात. पण हे खरे आहे का? बायबल मृत्यूविषयी नेमके काय शिकवते?

१६, १७. बायबलनुसार मृत कोणत्या स्थितीत आहेत?

१६ देवाचे वचन म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते.” ‘मृतांस काहीच कळत नसल्यामुळे’ ते ऐकू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, जाणवू शकत नाहीत किंवा विचार करू शकत नाहीत. त्यांना काही फलप्राप्ती होत नाही. कशी होणार? ते काम करण्यास असमर्थ आहेत! शिवाय, “त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत,” कारण त्यांना कोणत्याही प्रकारच्या भावना व्यक्‍त करता येत नाहीत.—उपदेशक ९:५, ६, १०.

१७ बायबल याविषयावर जी माहिती देते ती अगदी सरळ व स्पष्ट आहे—मृत जन इतरत्र कोठेही वास करत नाहीत. पुनर्जन्मावर विश्‍वास ठेवत असलेले लोक मानत असलेल्या विश्‍वासाप्रमाणे मृत्यूनंतर आपल्या शरीरातला कोणताही भाग देहातून निघून दुसऱ्‍या देहात प्रवेश करून पुनर्जन्म घेत नाही. हे समजण्यासाठी आपण या उदाहरणाचा उपयोग करू शकतो: आपले जीवन मेणबत्तीच्या ज्योतीसारखे आहे. मेणबत्तीची ज्योत विझवल्यावर ती कुठेही जात नाही. तर तिचे अस्तित्व नाहीसे होते.

१८. मृतांस काहीच कळत नाही हे जेव्हा एक बायबल विद्यार्थी शिकतो तेव्हा तो कोणते निष्कर्ष काढू शकतो?

१८ या अतिशय साध्या परंतु शक्‍तिशाली सत्याचा काय परिणाम होतो त्याचा जरा विचार करा. मृतांस काहीच कळत नाही हे जेव्हा एक बायबल विद्यार्थी शिकतो तेव्हा त्याला सहज हा निष्कर्ष काढता आला पाहिजे, की माझे मृत पूर्वज जिवंत असताना माझ्यावर कितीही रागावलेले असले तरी, मृतावस्थेत ते मला त्रास देऊ शकत नाहीत. या बायबल विद्यार्थ्याला हेही समजले पाहिजे, की त्याचे मृत प्रिय जन ऐकू शकत नाही, पाहू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, काहीही जाणवू शकत नाहीत किंवा विचारही करू शकत नाहीत. त्यामुळे मृत्यूलोकात त्यांना असहनीय एकटेपणा जाणवू शकत नाही किंवा धगधगत्या नरकाग्नीत ते तळमळतात हेही खरे असू शकत नाही. परंतु बायबलची अशी शिकवण आहे, की देवाच्या स्मरणात असलेल्या मृतजनांना पुन्हा उठवले जाईल. किती अद्‌भुत आशा आहे ही!—योहान ५:२८, २९.

आपल्या सर्वांसाठी एक नवे पुस्तक

१९, २०. ख्रिस्ती या नात्याने आपले काय कर्तव्य आहे आणि सेवेत उपयोग करता येईल असे कोणते बायबल अभ्यास साहित्य खास आपल्यासाठी बनवण्यात आले आहे?

१९ पुष्कळ लोकांच्या मनात येत असलेल्या केवळ तीन प्रश्‍नांची आपण चर्चा केली. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर बायबल किती स्पष्ट व सरळ देते, हे आपण पाहिले. बायबल काय शिकवते हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्‍यांना ही सत्ये शिकवणे खरोखर किती आनंददायक आहे! परंतु असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्‍न आहेत ज्यांचे समाधानकारक उत्तर प्रामाणिक मनाच्या लोकांना हवे आहे. या लोकांना ही उत्तरे शोधण्यास मदत करण्याचे ख्रिस्ती यानात्याने आपले कर्तव्य आहे.

२० शास्त्रवचनातील सत्य स्पष्टपणे व हृदयाला भावेल अशा पद्धतीने शिकवणे सोपे नाही. आपले काम सुलभ व्हावे म्हणून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्यासाठी खास एक पुस्तक बनवले आहे ज्याचा उपयोग आपण आपल्या ख्रिस्ती सेवेत करू शकतो. (मत्तय २४:४५-४७) या २२४ पानी पुस्तकाचे शीर्षक बायबल नेमके काय शिकवते? असे आहे.

२१, २२. बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये कोणती आहेत?

२१ यहोवाच्या साक्षीदारांच्या “देवाच्या आज्ञेत राहा” या २००५/०६ प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात विविध उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. जसे की, या पुस्तकात पाच पानांची प्रस्तावना आहे जी गृह बायबल अभ्यास सुरू करण्याकरता खूप फायदेकारक ठरत आहे. प्रस्तावनेतील चित्रांवर व शास्त्रवचनांवर चर्चा करणे कदाचित तुम्हाला सोपे वाटेल. बायबलमधील अध्याय आणि वचने कशी शोधायची हे दाखवण्यासाठी तुम्ही या भागातील माहितीचा देखील उपयोग करू शकता.

२२ या पुस्तकाची लेखन शैली अतिशय साधी व स्पष्ट आहे. शक्य तेव्हा विद्यार्थ्याचे मत विचारण्याचा या पुस्तकात प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला अनेक प्रश्‍न आहेत व अध्यायाच्या शेवटी “बायबल असे शिकवते” नावाचा चौकोन आहे. या चौकोनात अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्‍नांची शास्त्रवचनांच्या आधारावर उत्तरे देण्यात आली आहेत. या प्रकाशनातील सुरेख चित्रे, चित्रांखालील मथळे आणि उदाहरणे विद्यार्थ्याला नवीन कल्पना आत्मसात करण्यास मदत करतील. पुस्तकातील मुख्य माहिती सोप्या शब्दांत मांडण्यात आलेली आहे. परंतु, जर विद्यार्थ्याला सविस्तर माहिती हवी असेल तर, पुस्तकातील परिशिष्टात १४ महत्त्वपूर्ण विषयांची खोलवर माहिती देण्यात आली आहे.

२३. बायबल काय शिकवते पुस्तकाचा बायबल अभ्यासासाठी उपयोग करते वेळी कोणत्या काही सूचना देण्यात आल्या आहेत?

२३ बायबल काय शिकवते पुस्तक वेगवेगळ्या शैक्षणिक स्तराच्या व विविध धार्मिक पार्श्‍वभूमीच्या लोकांना मदत करण्यासाठी बनवण्यात आले आहे. एखाद्या विद्यार्थ्याला बायबलविषयी कसलीच माहिती नसेल तर कदाचित एक अध्याय एकापेक्षा अधिक सत्रांत पूर्ण करावा लागेल. अभ्यासात घाई करू नका. विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करा. पुस्तकातील एखादे उदाहरण त्याला समजत नसेल तर त्याची फोड करून सांगा किंवा दुसऱ्‍या एखाद्या उदाहरणाचा उपयोग करा. चांगली तयारी करा. पुस्तकाचा परिणामकारकपणे उपयोग करण्याचा प्रयत्न करा आणि देवाला प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही ‘सत्याचे वचन नीट सांगू’ शकाल.—२ तीमथ्य २:१५.

अमूल्य विशेषाधिकारांबद्दल कृतज्ञ असा

२४, २५. यहोवाने आपल्या लोकांना कोणते अमूल्य विशेषाधिकार दिले आहेत?

२४ यहोवाने आपल्या लोकांना अमूल्य विशेषाधिकार दिले आहेत. त्याने आपल्याला त्याच्याबद्दलचे सत्य शिकून घेणे शक्य केले आहे. हा विशेषाधिकार आपण केव्हाही क्षुल्लक लेखू नये! कारण देवाने वास्तविकतेत आपले उद्देश घमेंडी लोकांपासून गुप्त ठेवून नम्र लोकांना प्रकट केले आहेत. याविषयी येशूने म्हटले: “हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या.” (मत्तय ११:२५) विश्‍वाचा सार्वभौम असलेल्या यहोवाची सेवा करणाऱ्‍या नम्र लोकांमध्ये आपण गणले जाणे, हा एक दुर्मिळ सन्मान आहे!

२५ देवाने आपल्याला त्याच्याविषयी इतरांना शिकवण्याचा विशेषाधिकारही दिला आहे. पण त्याच्याविषयीच्या खोट्या शिकवणी पसरवणाऱ्‍यांनी त्याचे नाव बदनाम केले आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या मनात यहोवाबद्दल पूर्णपणे चुकीचे मत आहे. त्यांना वाटते, की त्याला आपली कसलीही काळजी नाही, तो पाषाण-हृदयी आहे. अशा लोकांचा गैरसमज दूर करण्यास तुम्ही तयार, नव्हे उत्सुक आहात का? सबंध जगातील प्रामाणिक लोकांना देवाविषयीचे सत्य समजले पाहिजे, असे तुम्हाला वाटते का? मग, महत्त्वपूर्ण विषयांवर बायबल काय शिकवते याचा लोकांना आवेशाने प्रचार करून व शिकवून तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत आहात हे दाखवून द्या. बायबल नेमके काय शिकवते, हे सत्य शोधकांना समजलेच पाहिजे. (w०७ १/१५)

तुमचे काय उत्तर आहे?

• देवाला आपली काळजी आहे, हे आपल्याला कसे माहीत होते?

• माणूस जन्माला का येतो?

• मृत्यूनंतर आपले काय होते?

• बायबल काय शिकवते पुस्तकातील कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला खास उपयोगी वाटतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

धार्मिक लोक नंदनवनात सदासर्वकाळ राहतील