व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल जे शिकवते ते पाळण्यास इतरांना मदत करणे

बायबल जे शिकवते ते पाळण्यास इतरांना मदत करणे

बायबल जे शिकवते ते पाळण्यास इतरांना मदत करणे

“चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.”—लूक ८:१५.

१, २. (क) बायबल नेमके काय शिकवते? पुस्तक कोणत्या उद्देशासाठी बनवण्यात आले आहे? (ख) अलिकडील वर्षांत शिष्य बनवण्यासाठी यहोवाचे लोक करत असलेल्या प्रयत्नांना यहोवाने कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?

“खूपच सुरेख पुस्तक आहे हे. माझ्या विद्यार्थ्यांनाही खूप आवडतं. मला तर विचारूच नका. या पुस्तकामुळे मी अगदी दारात उभं राहूनसुद्धा लोकांबरोबर बायबल अभ्यास सुरू करू शकते.” असे यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पूर्ण वेळ पायनियर भगिनीने बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाविषयी म्हटले. * याच पुस्तकाविषयी एक वृद्ध राज्य प्रचारक म्हणतात: “गेल्या ५० वर्षांच्या माझ्या सक्रिय सेवेदरम्यान मी अनेक लोकांना यहोवाला ओळखण्यास मदत केली आहे. तेव्हा मी जी जी प्रकाशनं वापरली त्यापैकी हे प्रकाशन मात्र सर्वात उल्लेखनीय आहे, हे मला सांगावसं वाटतं. त्यांतील शब्दचित्र आणि चित्रं पाहून मनाला तजेला मिळतो.” बायबल काय शिकवते पुस्तकाविषयी तुम्हालाही असेच वाटते का? बायबल अभ्यासाचे हे प्रकाशन, येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यास तुम्हाला मदत देण्याकरता बनवण्यात आले आहे. येशूने ही आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

यहोवा जेव्हा आपल्या ६६ लाख साक्षीदारांना शिष्य बनवण्याविषयी येशूने दिलेल्या आज्ञेचे आनंदाने पालन करताना पाहतो तेव्हा त्याचेही मन आनंदित होते, यात काही शंका नाही. (नीतिसूत्रे २७:११) तो त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देत आहे हे अगदी स्पष्ट दिसून येते. उदाहरणार्थ, २००५ साली सुवार्तेचा प्रचार २३५ राष्ट्रांमध्ये करण्यात आला होता आणि सरासरी ६०,६१,५०० बायबल अभ्यास चालवण्यात आले होते. यामुळे पुष्कळ लोकांना ‘देवाचे वचन ऐकून ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारण्याची’ संधी मिळाली. (१ थेस्सलनीकाकर २:१३) गेल्या दोनपेक्षा अधिक वर्षांपासून पाच लाखांपेक्षा अधिक लोक यहोवाच्या दर्जांच्या सामंजस्यात जीवन जगू लागले आहेत व देवाला त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.

३. बायबल काय शिकवते पुस्तकाच्या उपयोगासंबंधाने या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

एखाद्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केल्याने मिळणारा आनंद तुम्ही अलिकडेच अनुभवला आहे का? संपूर्ण जगभरात, अजूनही ‘सालस व चांगल्या अंतःकरणाचे’ लोक आहेत जे देवाचे वचन ऐकल्यावर ते आपल्या ‘अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात.’ (लूक ८:११-१५) शिष्य बनवण्याच्या या कामात आपण बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग कसा करू शकतो ते पाहूया. आपण तीन प्रश्‍नांची चर्चा करूया: (१) तुम्ही बायबल अभ्यास कसा सुरू करू शकता? (२) शिकवण्याच्या कोणत्या पद्धती जास्त उपयुक्‍त आहेत? (३) तुम्ही एखाद्याला फक्‍त एक विद्यार्थीच नव्हे तर देवाचे लिखित वचन बायबल याचा शिक्षक बनण्यास कशी मदत करू शकता?

तुम्ही बायबल अभ्यास कसा सुरू करू शकता?

४. काही जण बायबलचा अभ्यास करण्यास का कचरतील, आणि घरमालकाला वाटत असलेला हा संकोच दूर करण्यासाठी तुम्ही त्याला कशाप्रकारे मदत करू शकता?

तुम्हाला जर एक रुंद पाण्याचा पाट एका उडीतच पार करण्यास सांगितले तर कदाचित तुम्ही हे आव्हान स्वीकारणार नाही. पण जर जागोजागी लहानलहान दगड ठेवण्यात आले तर कदाचित तुम्ही हा पाट पार करण्याचा प्रयत्न कराल. तसेच कामात व्यग्र असलेली व्यक्‍ती बायबलचा अभ्यास करायला कचरेल. अभ्यासासाठी खूप वेळ द्यावा लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, असे घरमालकाला वाटेल. तुम्ही त्याचा संकोच दूर करण्यास त्याला कशी मदत कराल? लहान लहान परंतु माहितीपूर्ण चर्चा करून तुम्ही घरमालकाला देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास करण्यासाठी बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग करू शकता. तुम्ही जर चांगल्याप्रकारे तयारी केलीत तर प्रत्येक पुनर्भेट ही एका दगडासारखी ठरू शकते ज्यावर पाय ठेवून घरमालक यहोवा देवाबरोबर मैत्री प्रस्थापित करण्याकरता पुढे येऊ शकेल.

५. तुम्ही बायबल काय शिकवते पुस्तक का वाचले पाहिजे?

परंतु बायबल काय शिकवते पुस्तकाचा फायदा कसा घ्यायचा हे दुसऱ्‍यांना दाखवण्याअगोदर तुम्ही स्वतः त्या पुस्तकाशी चांगल्याप्रकारे परिचित झाले पाहिजे. तुम्ही ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून काढले आहे का? एका पती-पत्नीने हे पुस्तक सुटीला जाताना आपल्यासोबत नेले आणि समुद्रकिनाऱ्‍यावर आरामात बसल्यावर ते वाचू लागले. एक बाई समुद्रकिनाऱ्‍यावर काही तरी विकत होती. तिने त्यांच्या हातातल्या पुस्तकाचे शीर्षक वाचले, बायबल नेमके काय शिकवते? ती त्यांना म्हणाली, की थोड्याच वेळापूर्वी तिने देवाला प्रार्थना केली होती आणि त्याला अगदी हाच प्रश्‍न विचारून, मला याचं उत्तर हवं आहे अशी प्रार्थना केली होती. या जोडप्याने तिला या पुस्तकाची एक प्रत दिली. तुम्ही देखील “वेळेचा सदुपयोग” करून हे पुस्तक वाचून काढले आहे का? तुमची कोणाला तरी भेटण्याची वेळ ठरलेली असते आणि तुम्ही त्या व्यक्‍तीची वाट पाहत थांबलेले असता तेव्हा किंवा मग कामात अथवा शाळेत मधल्या सुटीत तुम्ही हे पुस्तक दुसऱ्‍यांदा वाचले आहे का? (इफिसकर ५:१५, १६) असे केल्यास तुम्ही या बायबल अभ्यास प्रकाशनाशी परिचित व्हाल आणि यांतील विषयांबद्दल इतरांबरोबर बोलण्यासाठी तुम्ही संधी निर्माण करू शकाल.

६, ७. बायबल अभ्यास सुरू करण्याकरता तुम्ही बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग कसा करू शकता?

क्षेत्र सेवेत जेव्हा तुम्ही हे पुस्तक सादर करता तेव्हा, पृष्ठे ४, ५ आणि ६ वरील चित्रांचा, शास्त्रवचनांचा व प्रश्‍नांचा चांगल्याप्रकारे उपयोग करा. उदाहरणार्थ तुम्ही, “मानवजातीला आज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, तेव्हा विश्‍वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?” असा प्रश्‍न विचारून लोकांबरोबर संभाषण सुरु करू शकता. समोरच्या व्यक्‍तीचे मनोगत लक्षपूर्वक ऐकून घेतल्यानंतर २ तीमथ्य ३:१६, १७ वाचून दाखवा आणि मग बायबलनुसार मानवजातीच्या समस्यांवरील एकमात्र उपाय काय आहे ते समजावून सांगा. त्यानंतर घरमालकाला पृष्ठे ४ आणि ५ दाखवून विचारा: “या पानांवर दाखवण्यात आलेल्या चित्रांपैकी कोणतं चित्र पाहून तुम्ही खूप अस्वस्थ होता?” घरमालकानं चित्र दाखवल्यावर त्याच्या हातात पुस्तक द्या आणि तुम्ही तुमच्या बायबलमधून त्या चित्राशी संबंधित असलेले वचन वाचा. मग, पृष्ठ ६ वरील मजकूर वाचा आणि घरमालकाला विचारा: “पानावर शेवटी विचारलेल्या सहा प्रश्‍नांपैकी तुम्हाला कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर हवे आहे?” घरमालकाने प्रश्‍न निवडल्यानंतर, या प्रश्‍नाचे उत्तर कोणत्या अध्यायात दिले आहे तो अध्याय त्याला दाखवा आणि हे पुस्तक त्याला देऊन टाका. या प्रश्‍नाची चर्चा करण्यासाठी पुन्हा केव्हा भेटायचे, त्याच्या निश्‍चित योजना करा.

आताच सांगितलेल्या सादरतेला जास्तीतजास्त पाच मिनिटे लागतील. पण या पाच मिनिटात तुम्हाला, घरमालकाला कोणत्या चिंता आहेत हे समजून येईल, तुम्ही त्याला दोन शास्त्रवचने दाखवून ती वचने कशी लागू होतात हे दाखवू शकाल आणि पुनर्भेटीची योजना तुम्हाला करता येईल. घरमालकाबरोबरचे तुमचे हे संक्षिप्त संभाषण, कितीतरी दिवसांतून त्याला झालेला सर्वात उत्तेजनकारक व दिलासाजनक अनुभव ठरू शकतो. यामुळे अगदी कामात व्यग्र असलेली व्यक्‍ती देखील, तुमच्याबरोबर काही मिनिटे घालवण्याची आतुरतेने वाट पाहील आणि तुम्ही या व्यक्‍तीला ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर’ पुढचे पाऊल टाकण्यास मदत करू शकाल. (मत्तय ७:१४) आणि मग जसजसे घरमालकाची आवड वाढत जाते तसतसे तुम्ही तुमचा अभ्यासाचा कालावधी वाढवू शकता. तुम्ही कुठेतरी बसून जास्त वेळासाठी अभ्यास करण्याचे घरमालकाला सुचवू शकता.

उपयुक्‍त ठरणाऱ्‍या शिकवण्याच्या पद्धती

८, ९. (क) तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला संभाव्य अडथळ्यांना व परीक्षांना तोंड देण्यासाठी कशाप्रकारे तयार करू शकता? (ख) दृढ विश्‍वास बांधण्यासाठी लागणारे अग्नीरोधक साहित्य कोठे मिळू शकेल?

बायबल जे शिकवते त्याचे पालन जेव्हा एक व्यक्‍ती करू लागते तेव्हा कदाचित तिला, तिची आध्यात्मिक वाढ खुंटवू शकणाऱ्‍या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. प्रेषित पौलाने म्हटले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) पौलाने या परीक्षांची तुलना अग्नीशी केली जी हलक्या प्रतीच्या बांधकाम साहित्याचा नाश करते परंतु सोने, रुपे आणि मोलवान पाषाण यांच्यावर काहीही परिणाम करत नाही. (१ करिंथकर ३:१०-१३; १ पेत्र १:६, ७) बायबल विद्यार्थ्याला ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागू शकते त्यांचा सामना करण्यासाठी लागत असलेले गुण विकसित करण्याकरता तुम्हाला त्याला, बांधकामात अग्नीरोधक साहित्याचा उपयोग करण्यास मदत करावी लागेल.

“परमेश्‍वराची वचने” “भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी” आहेत, असे स्तोत्रकर्ता म्हणतो. (स्तोत्र १२:६) होय बायबलमध्ये सर्वप्रकारचे मौल्यवान साहित्य आहे ज्यांचा, दृढ विश्‍वास बांधण्यास उपयोग करता येतो. (स्तोत्र १९:७-११; नीतिसूत्रे २:१-६) आणि बायबल काय शिकवते पुस्तक तुम्हाला शास्त्रवचनांचा प्रभावशाली उपयोग कसा करायचे ते दाखवते.

१०. तुम्ही विद्यार्थ्याचे लक्ष बायबलकडे कसे वेधू शकता?

१० अभ्यासाच्या वेळी विद्यार्थ्याचे लक्ष, तुम्ही चर्चा करत असलेल्या अध्यायातील शास्त्रवचनांकडे वेधा. मुख्य बायबल वचनांचा अर्थ समजून तो आपल्या वैयक्‍तीक जीवनात लागू करण्याकरता प्रश्‍नांचा उपयोग करा. त्याने काय करावे, काय करू नये, हे तुम्ही त्याला सांगू नका. तर, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा. नियमशास्त्रात पारंगत असलेल्या एका मनुष्याने येशूला प्रश्‍न विचारला तेव्हा येशूने त्याला असे उत्तर दिले: “नियमशास्रांत काय लिहिले आहे? तुझ्या वाचनांत काय आले आहे?” या मनुष्याने शास्त्रवचनातून उत्तर दिले आणि येशूने त्याला शास्त्रवचनातील तत्त्व स्वतःला कसे लागू करायचे ते समजण्यास मदत केली. एक उदाहरण देऊन येशूने या मनुष्याला, या शिकवणीचा त्याच्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे हेही पाहण्यास मदत केली. (लूक १०:२५-३७) बायबल काय शिकवते पुस्तकात अनेक साधी-साधी उदाहरणे आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही विद्यार्थ्याला शास्त्रवचनातील तत्त्व स्वतःला लागू करण्यास मदत करू शकता.

११. प्रत्येक अभ्यास सत्रात तुम्ही किती परिच्छेदांवर चर्चा केली पाहिजे?

११ येशूने ज्याप्रमाणे साध्या-सोप्या भाषेत अवघड विषय मांडले त्याप्रमाणे बायबल काय शिकवते पुस्तक देवाच्या वचनाचा खुलासा करण्याकरता साध्या व सरळ भाषेचा उपयोग करते. (मत्तय ७:२८, २९) तुम्ही देखील शिकवताना येशूप्रमाणे साधी-सोपी भाषा वापरा. साध्या, स्पष्ट पद्धतीने अचूक माहिती द्या. घाईघाईत अभ्यास करू नका. तर प्रत्येक अभ्यास सत्रात तुम्ही किती परिच्छेदांचा अभ्यास करू शकता, हे विद्यार्थ्याच्या परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार ठरवा. येशूला आपल्या शिष्यांच्या मर्यादा ठाऊक होत्या व त्यामुळे त्याने एकावेळेला त्यांना जितकी माहिती आवश्‍यक होती त्याच्यापेक्षा अधिक माहिती देऊन भारावून टाकले नाही.—योहान १६:१२.

१२. परिशिष्टाचा उपयोग कशाप्रकारे करता येईल?

१२ बायबल काय शिकवते पुस्तकात परिशिष्ट आहे ज्यात १४ विषय आहेत. विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, या माहितीचा सर्वात जास्त उपयोग कसा करता येईल हे शिक्षक यानात्याने तुम्हाला ठरवता आले पाहिजे. जसे की, एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय समजत नसेल किंवा विशिष्ट बाबतीत त्याच्या पूर्वीच्या विश्‍वासांमुळे त्याच्या मनात बरेच प्रश्‍न असतील. अशा विद्यार्थ्याला तुम्ही परिशिष्टातील योग्य भाग काढून दाखवू शकता आणि विद्यार्थी तो विषय आपल्या फावल्या वेळेत वाचून काढू शकतो, असे तुम्ही त्याला सांगू शकता. परंतु काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्हालाच परिशिष्टातील माहिती त्याला समजावून सांगावी लागेल. परिशिष्टात महत्त्वपूर्ण शास्त्रवचनीय विषय आहेत; जसे की, “मानवाच्या शरीरात अदृश्‍य किंवा अमर असे काही असते का?” आणि “‘मोठी बाबेल’ कोण आहे?” तुम्हाला कदाचित हे विषय आपल्या विद्यार्थ्याला समजावून सांगावेसे वाटतील. परिशिष्टात प्रश्‍न नसल्यामुळे, तुम्हाला आधी तो भाग वाचून काढावा लागेल जेणेकरून तुम्ही त्यावर अर्थपूर्ण प्रश्‍न तयार करू शकाल.

१३. विश्‍वास दृढ करण्यात प्रार्थना कोणती भूमिका बजावते?

१३ “परमेश्‍वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्‍याचे श्रम व्यर्थ आहेत,” असे स्तोत्रकर्ता म्हणतो. (स्तोत्र १२७:१) यास्तव, बायबल अभ्यास संचलित करण्याची तयारी करताना यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा. अभ्यासाच्या आधी आणि अभ्यासाच्या शेवटी तुम्ही करत असलेल्या प्रार्थनांवरून, तुमचा यहोवासोबत किती जवळचा संबंध आहे हे विद्यार्थ्याला दिसले पाहिजे. देवाचे वचन समजण्यासाठी बुद्धी व तो सल्ला आपल्या जीवनात लागू करण्यासाठी शक्‍ती देण्याकरता यहोवाला प्रार्थना करण्यास विद्यार्थ्याला सांगा. (याकोब १:५) असे जर विद्यार्थ्याने केले तर त्याला परीक्षांचा सामना करण्याचे मनोबळ मिळेल आणि तो विश्‍वासात वाढत राहील.

बायबल विद्यार्थ्याला शिक्षक बनण्यास मदत करा

१४. बायबल विद्यार्थ्यांनी कोणती प्रगती करणे आवश्‍यक आहे?

१४ तुमच्या बायबल विद्यार्थ्यांनी जर येशूने आपल्या शिष्यांना आज्ञापिलेल्या ‘सर्व गोष्टी’ पाळल्या पाहिजेत तर त्यांनी देवाच्या वचनाचे विद्यार्थी न राहता देवाच्या वचनाचे शिक्षक झाले पाहिजे. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:६-८) ही अशाप्रकारची आध्यात्मिक प्रगती करण्यास तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला कोणती मदत देऊ शकाल?

१५. तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन का दिले पाहिजे?

१५ अगदी पहिल्या अभ्यासापासूनच विद्यार्थ्याला तुमच्यासोबत मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण द्या. या सभांद्वारेच तुम्हाला, देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याचे प्रशिक्षण मिळते, ते त्याला समजावून सांगा. अनेक आठवड्यांपर्यंत प्रत्येक अभ्यासानंतर काही मिनिटांसाठी विविध सभा आणि संमेलने येथे मिळणाऱ्‍या आध्यात्मिक शिक्षणाच्या कार्यक्रमाचे वर्णन करा. या प्रसंगी तुम्हाला मिळत असलेल्या लाभांविषयी उत्साहाने बोला. (इब्री लोकांस १०:२४, २५) विद्यार्थ्याने सभांना उपस्थित राहायला सुरुवात केली तर तो देवाच्या वचनाचा शिक्षक हमखास बनेल.

१६, १७. एक बायबल विद्यार्थी कोणते ध्येय ठेवून ते साध्य करायचा प्रयत्न करू शकतो?

१६ बायबल विद्यार्थ्याला अशी ध्येये ठेवण्याचे उत्तेजन द्या जी तो साध्य करू शकेल. जसे की, तो जे काही शिकतो ते आपल्या एखाद्या मित्राला अथवा नातेवाईकाला सांगण्याचे त्याला उत्तेजन द्या. तसेच, संपूर्ण बायबल वाचून काढायचे ध्येय ठेवण्यास तुम्ही त्याला सुचवू शकता. तुम्ही त्याला नियमित बायबल वाचन करण्याचा नित्यक्रम बनवून तो टिकवून ठेवण्यास मदत केली तर त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही त्याला या सवयीचा फायदा होऊ शकतो. याशिवाय, बायबल काय शिकवते पुस्तकाच्या प्रत्येक अध्यायातल्या एका प्रमुख प्रश्‍नाचे उत्तर देणारे निदान एक बायबल वचन तरी पाठ करण्याचे ध्येय ठेवण्यास त्याला तुम्ही सुचवू शकता. असे केल्याने तो “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी” होऊ शकेल.—२ तीमथ्य २:१५.

१७ विद्यार्थ्याने तोंडपाठ केलेल्या शास्त्रवचनांतून एखादे वचन बोलून दाखवण्याचे किंवा शास्त्रवचनांचा सारांश देण्याचे त्याला शिकवू नका. तर, चर्चा होत असलेल्या विषयाशी विशिष्ट बायबल वचन कसे संबंधित आहे त्याचे स्पष्टीकरण देण्याचे उत्तेजन द्या, जेणेकरून त्याला जेव्हा त्याच्या विश्‍वासाविषयी कोणी प्रश्‍न विचारेल तेव्हा तो आपल्या विश्‍वासाचे समर्थन देऊ शकेल. त्याच्याबरोबर अनेकदा सराव केल्याने त्याला मदत होऊ शकेल. तुम्ही नातेवाईक किंवा सहकर्मचारी होऊ शकता आणि त्याला आपल्या विश्‍वासांचे स्पष्टीकरण देण्यास सांगू शकता. मग विद्यार्थी कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवतो ते पाहून त्याला “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर कसे द्यायचे हे दाखवा.—१ पेत्र ३:१५.

१८. एक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याच्या योग्यतेचा बनतो तेव्हा तुम्ही त्याला आणखी कोणती मदत देऊ शकता?

१८ हळूहळू विद्यार्थी क्षेत्र सेवेत भाग घेण्याच्या योग्यतेचा होईल. या कार्यात भाग घेण्याची अनुमती मिळणे हा एक विशेषाधिकार आहे यावर जोर द्या. (२ करिंथकर ४:१, ७) विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याच्या योग्यतेचा आहे हे वडिलांनी ठरवल्यानंतर त्याला एक साधीशी सादरता तयार करण्यास मदत करा आणि त्याच्याबरोबर क्षेत्र सेवेत जा. सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंदरम्यान त्याच्याबरोबर राहा आणि प्रभावी पुनर्भेटींची तयारी कशी करायची व कशी द्यायची हे त्याला शिकवा. तुमच्या उत्तम उदाहरणाचा त्याच्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.—लूक ६:४०.

‘स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेही तारण साध’

१९, २०. आपण कोणते ध्येय ठेवले पाहिजे व का?

१९ ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचण्यास’ एखाद्याला मदत करण्यात बरेच परिश्रम गोवलेले आहेत, यात काहीच शंका नाही. (१ तीमथ्य २:४) परंतु बायबल जे शिकवते त्याचे पालन करण्यास एखाद्याला शिकवण्यात जो आनंद मिळतो त्याची तुलना जीवनातील फार कमी आनंदांशी करता येते. (१ थेस्सलनीकाकर २:१९, २०) जगभरात चाललेल्या या शिकवण्याच्या कार्यात “देवाचे सहकारी” होण्याचा किती मोठा सुहक्क आपल्याला मिळाला आहे!—१ करिंथकर ३:९.

२० येशू ख्रिस्त आणि शक्‍तिशाली देवदूत यांच्यामार्फत यहोवा देव लवकरच “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा” सूड उगवणार आहे. (२ थेस्सलनीकाकर १:६-८) लोकांचे जीव धोक्यात आहेत. तेव्हा, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा उपयोग करून तुम्ही निदान एक तरी बायबल अभ्यास संचालित करण्याचे ध्येय ठेवू शकता का? या कार्यात भाग घेत असताना तुम्हाला ‘स्वतःचे व तुमचे ऐकणाऱ्‍यांचेही तारण साधण्याची’ संधी मिळेल. (१ तीमथ्य ४:१६) पूर्वीपेक्षा आता आपण इतरांना बायबल जे शिकवते ते पाळण्यास मदत करणे निकडीचे आहे. (w०७ १/१५)

[तळटीप]

^ परि. 1 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

तुम्ही काय शिकलात?

• बायबल काय शिकवते पुस्तक कोणत्या उद्देशास्तव बनवण्यात आले आहे?

• बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग करून तुम्ही बायबल अभ्यास कसे सुरु करू शकता?

• शिकवण्याच्या कोणत्या पद्धती सर्वात उत्तम आहेत?

• बायबल विद्यार्थ्याला तुम्ही देवाच्या वचनाचा शिक्षक होण्यास कशाप्रकारे मदत करू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

तुम्ही या पुस्तकाचा चांगल्याप्रकारे उपयोग करीत आहात का?

[१८ पानांवरील चित्र]

एखाद्या व्यक्‍तीबरोबर लहानशी चर्चा केल्याने अधिक बायबल ज्ञान मिळवण्याची त्याच्यामध्ये उत्सुकता जागृत होऊ शकेल

[२० पानांवरील चित्र]

विद्यार्थ्याचे लक्ष बायबलकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

[२१ पानांवरील चित्र]

बायबल विद्यार्थ्याला प्रगती करण्यास मदत करा