व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे

यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे

संदेष्टा यशया आपल्यावर सोपवण्यात आलेले काम नेटाने पार पाडत आहे. दहा गोत्रांच्या इस्राएल राष्ट्रांविरुद्ध त्याने भाकीत केलेले न्यायदंड आधीच पूर्ण झालेले आहेत. आता त्याला जेरूसलेमच्या भविष्याबद्दल भविष्यवाणी करण्यास सांगण्यात आले आहे.

जेरूसलम नगरीचा नाश केला जाईल आणि तिच्या रहिवाशांना बंदिवान बनवून नेले जाईल. पण ती कायम ओसाड राहणार नाही. तर विशिष्ट कालावधीनंतर खऱ्‍या उपासनेची पुनःस्थापना केली जाईल. यशया ३६:१–६६:२४ यातील मूलभूत संदेश हाच आहे. * या अध्यायातील माहितीचे परीक्षण केल्याने आपल्याला बराच फायदा होऊ शकतो कारण या भागातील बऱ्‍याच भविष्यवाण्यांची अंतिम पूर्णता सध्या आपल्या काळात होत आहे आणि काहींची लवकरच होणार आहे. यशयाच्या पुस्तकातील या भागात मशीहाविषयीच्या अतिशय रोमांचक भविष्यवाण्याही आढळतात.

“पाहा! असे दिवस येत आहेत”

(यशया ३६:१–३९:८)

हिज्कीया राजाच्या कारकीर्दीच्या १४ व्या वर्षी (सा.यु.पू. ७३२) अश्‍शूरचे सैन्य यहूदावर चढाई करते. यहोवा जेरूसलेमचे संरक्षण करण्याचे वचन देतो. यहोवाचा एकच देवदूत १,८५,००० अश्‍शूरी सैनकांचा घात करतो तेव्हा कोठे लष्करी हल्ल्याचा धोका टळतो.

हिज्कीया आजारी पडतो. यहोवा त्याच्या प्रार्थनेचे उत्तर देऊन त्याला बरे करतो आणि त्याच्या आयुष्याला १५ वर्षे जोडतो. बॅबिलोनचा राजा त्याचे अभिनंदन करण्यासाठी आपली माणसे पाठवतो तेव्हा हिज्कीया अविचारीपणे त्यांना आपली सर्व संपत्ती व खजिना दाखवतो. यशया हिज्कीयाला यहोवाचा हा संदेश देतो: “पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेविले आहे, ते सर्व बाबेलास नेण्यात येईल.” (यशया ३९:५, ६) १०० वर्षे व आणखी थोड्या काळानंतर ही भविष्यवाणी पूर्ण होते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३८:८—छाया कशावरून मागे सरली? सा.यु.पू. आठव्या शतकापर्यंत ईजिप्त व बॅबिलोनमध्ये शंकुयंत्रे सर्रास वापरली जात होती. तेव्हा, या वचनात उल्लेख केलेले शंकुयंत्र कदाचित हिज्कियाचा पिता आहाज याने मिळवलेले असावे. “शंकुयंत्र” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “पायऱ्‍या” असा असल्यामुळे, कदाचित तो राजमहालातल्या एखाद्या जिन्याला सूचित करत असावा. जिन्याच्या बाजूला असलेल्या स्तंभामुळे कदाचित पायऱ्‍यांवर सावली पडत असेल व त्याच्या आधारावर वेळ ठरवली जात असेल.

आपल्याकरता धडे:

३६:२, ३, २२. शेबना याला कारभाऱ्‍याच्या हुद्द्‌यावरून काढून टाकण्यात आले तरीसुद्धा त्याच्याऐवजी नियुक्‍त केलेल्या कारभाऱ्‍याचा चिटणीस म्हणून राजाच्या सेवेत राहण्याची त्याला परवानगी देण्यात आली. (यशया २२:१५, १९) आपल्याला काही कारणास्तव यहोवाच्या संघटनेतील एखाद्या जबाबदारीच्या पदावरून काढून टाकण्यात आले तरीसुद्धा आपण देवाची सेवा तो ज्या पदावर आपल्याला राहू देईल त्यावर राहून करू नये का?

३७:१, १४, १५; ३८:१, २. दुःखद प्रसंगी यहोवाला प्रार्थना करणे व त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवणे सुज्ञतेचे आहे.

३७:१५-२०; ३८:२, ३. जेरूसलेमवर अश्‍शूरी लोकांनी चढाई केली तेव्हा हिज्कियाला सर्वात जास्त काळजी याचीच होती की जेरूसलेमच्या नाशामुळे यहोवाच्या नावावर कलंक लागेल. आपले आजारपण असाध्य आहे हे कळल्यावर हिज्कियाला केवळ स्वतःचीच चिंता नव्हती. त्याची प्रमुख चिंता ही होती की वारस उत्पन्‍न करण्याआधी त्याला मृत्यू आला तर दाविदाच्या कुळातील राजांची मालिका पुढे कशी चालू राहील? तसेच अश्‍शूरी लोकांविरुद्ध लढण्यात कोण पुढाकार घेईल, याचीही त्याला काळजी वाटत होती. हिज्कियाप्रमाणे आपणही यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या उद्देशाची पूर्णता याला आपल्या स्वतःच्या तारणापेक्षा जास्त महत्त्व देतो.

३८:९-२०. हिज्कियाच्या या गीतावरून आपल्याला हे शिकायला मिळते की यहोवाची स्तुती करणे यापेक्षा जास्त महत्त्वाचे जीवनात काहीही नाही.

“ती बांधण्यात येईल”

(यशया ४०:१–५९:२१)

जेरूसलेमच्या नाशाविषयी आणि बॅबिलोनमधील बंदिवासाविषयी भाकीत केल्यावर लगेच यशया पुनर्वसनाची भविष्यवाणी करतो. (यशया ४०:१, २) यशया ४४:२८ म्हणते, “ती [जेरूसलेम] बांधण्यात येईल.” बॅबिलोनच्या देवांच्या मूर्ती “ओझ्याप्रमाणे” लादल्या जातील. (यशया ४६:१) बॅबिलोनचा नाश केला जाईल. ही सर्व भाकिते दोन शतकांनंतर पूर्ण होतात.

यहोवा आपल्या सेवकाला “राष्ट्रांचा प्रकाश” असे नेमतो. (यशया ४९:६) बॅबिलोनी “आकाश” अर्थात त्यातील शासकवर्ग “धुराप्रमाणे विरून जाईल” आणि त्याचे प्रजाजन “चिलटांप्रमाणे मरतील” पण ‘सियोनेची बंदिवान कन्या आपल्या गळ्याची बंधने सोडून टाकील.’ (यशया ५१:६; ५२:२) जे यहोवाकडे येऊन त्याचे ऐकतात अशा सर्वांना तो म्हणतो: “मी तुम्हाबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दावीदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईन.” (यशया ५५:३) देवाच्या नीतिमान अपेक्षांना अनुसरून राहणारे ‘परमेश्‍वराच्या ठायी हर्ष पावतात.’ (यशया ५८:१४) तर दुसरीकडे पाहता, लोकांच्या अपराधांमुळे ‘ते व त्यांचा देव याच्यामध्ये आडभिंत’ निर्माण होते.—यशया ५९:२.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४०:२७, २८—“माझा मार्ग परमेश्‍वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे” असे इस्राएलने का म्हटले? बॅबिलोनमध्ये राहणाऱ्‍या काही यहुद्यांना कदाचित असे वाटले असेल की त्यांना सहन करावे लागणारे अन्याय यहोवापासून गुप्त आहेत किंवा त्याच्या दृष्टिआड झाले आहेत. त्यांना आठवण करून देण्यात आली की बॅबिलोन हे सबंध पृथ्वीच्या निर्माणकर्त्यापासून लपलेले नाही व तो थकतभागत नाही.

४३:१८-२१—जेरूसलेमला परतणाऱ्‍या बंदिवानांना असे का सांगण्यात आले की त्यांनी ‘पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नये?’ गतकाळात यहोवाने आपल्या लोकांचे तारण करण्याकरता जी महत्कृत्ये केली ती त्यांनी विसरून जावीत असा याचा अर्थ नव्हता. उलट यहोवाची अशी इच्छा होती की ते ज्या ‘नवीन गोष्टी’ अनुभवणार होते त्याच्या आधारावर त्यांनी यहोवाचे स्तवन करावे, उदाहरणार्थ, त्यांचे वाळवंटातील मार्गाने जेरूसलेमला सुरक्षित परतणे. “मोठ्या संकटातून” बाहेर येणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायातील’ सदस्य देखील नव्या व वैयक्‍तिक कारणांसाठी यहोवाचे गौरव करतील.—प्रकटीकरण ७:९, १४.

४९:६—मशीहाचे पृथ्वीवरील सेवाकार्य हे इस्राएलच्या पुत्रांपर्यंतच मर्यादित होते. तर मग तो कोणत्या अर्थाने “राष्ट्रांचा प्रकाश” आहे? येशूच्या मृत्यूनंतर जे घडले त्याच्या आधारावर असे म्हटले आहे. बायबलमध्ये यशया ४९:६ यातील शब्दांचा येशूच्या शिष्यांशी संबंध जोडण्यात आला आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:४६, ४७) आज अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि त्यांना साहाय्य करणारा उपासकांचा एक मोठा लोकसमुदाय “राष्ट्रांचा प्रकाश” या नात्याने “दिगंतापर्यंत” लोकांना सत्याचा प्रकाश दाखवत आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

५३:१०—आपल्या पुत्राला ठेचावे असे यहोवाच्या मर्जीस आले याचा काय अर्थ होतो? यहोवा हा करुणामयी व संवेदनशील देव आहे. त्याअर्थी आपल्या प्रिय पुत्राला दुःख सहन करताना पाहून नक्कीच त्याला यातना झाल्या असतील. तरीपण येशूने स्वेच्छेने त्याच्या आज्ञांचे पालन केले हे पाहून व त्याच्या दुःखसहनामुळे व मृत्यूमुळे काय साध्य होईल त्याचा विचार करून यहोवाला आनंद वाटला.—नीतिसूत्रे २७:११; यशया ६३:९.

५३:११—ज्याच्या आधाराने मशीहा “बहुतांस निर्दोष ठरवील” ते ज्ञान काय आहे? येशूने या पृथ्वीवर येऊन, एक मनुष्य बनून व मृत्यूपर्यंत अन्याय सहन करून मिळवलेले हे ज्ञान आहे. (इब्री लोकांस ४:१५) अशारितीने त्याने खंडणी बलिदान पुरवले आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व मोठ्या लोकसमुदायाला देवापुढे नीतिमान ठरवण्यात आले.—रोमकर ५:१९; याकोब २:२३, २५.

५६:६—“विदेशी” कोण आहेत आणि ते कशाप्रकारे यहोवाचा “करार दृढ धरून राहतात”? येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ “विदेशी” म्हटले आहे. (योहान १०:१६) ते नव्या कराराला या अर्थाने दृढ धरून राहतात की त्या कराराशी संबंधित आज्ञांचे ते पालन करतात, त्याद्वारे करण्यात आलेल्या तरतुदींना पूर्ण सहयोग देतात, अभिषिक्‍त ख्रिश्‍चन जे आत्मिक अन्‍न ग्रहण करतात तेच तेही ग्रहण करतात आणि राज्याच्या प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात त्यांना साहाय्य करतात.

आपल्याकरता धडे:

४०:१०-१४, २६, २८. यहोवा सामर्थ्यशाली व कोमल आहे, सर्वशक्‍तिमान व पूर्णार्थाने बुद्धिमान आहे आणि त्याचे विचार हे आपल्या समजण्यापलीकडले आहेत.

४०:१७, २३; ४१:२९; ४४:९; ५९:४. राजकीय मैत्री व राजकीय व्यक्‍तिमत्त्वे “शून्यवत” आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणे व्यर्थ आहे.

४२:१८, १९; ४३:८. देवाच्या लिखित वचनात सांगितलेल्या गोष्टींकडे डोळेझाक करणे आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवलेल्या त्याच्या मार्गदर्शनाकडे कान न देणे हे आध्यात्मिकरित्या अंधळे व बहिरे होण्यासारखे आहे.—मत्तय २४:४५.

४३:२५. यहोवा आपल्या नावाकरता पापे पुसून टाकतो. यहोवाच्या नावाचे पवित्रिकरण हे आपल्याला पाप व मृत्यूपासून सुटका व सार्वकालिक जीवन मिळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

४४:८. आपल्याला यहोवाचा पाठिंबा आहे. तो एखाद्या दुर्गाप्रमाणे अढळ आहे. त्याच्या देवपणाविषयी साक्ष देण्यास आपण कधीही घाबरू नये!—२ शमुवेल २२:३१, ३२.

४४:१८-२०. मूर्तिपूजा हे भ्रष्ट झालेल्या हृदयाचे चिन्ह आहे. आपल्या हृदयात यहोवाची जागा आपण इतर कोणत्याही गोष्टीला देता कामा नये.

४६:१०, ११. आपला ‘संकल्प सिद्धीस’ नेण्याचे अर्थात आपला उद्देश पूर्ण करण्याचे यहोवाचे सामर्थ्य, त्याच्या देवपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे.

४८:१७, १८; ५७:१९-२१. जर आपण तारणाकरता यहोवाकडे पाहिले व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या आज्ञांकडे लक्ष दिले तर आपल्याला वाहत्या नदीतील पाण्याइतकी भरभरून शांती लाभेल आणि आपली नीतिमान कृत्ये समुद्रातील लाटांइतकी विपूल असतील. जे देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाहीत ते ‘खवळलेल्या सागरासारखे’ असतात. त्यांना जराही शांती लाभत नाही.

५२:५, ६. बॅबिलोनी लोकांनी हा चुकीचा निष्कर्ष काढला होता की खरा देव यहोवा हा दुर्बल आहे. यहोवा आपल्या लोकांवर रागावला असल्यामुळेच त्याने त्यांना बंदिवासात जाऊ दिले हे बॅबिलोनी लोकांनी ओळखले नाही. इतरांवर संकट येते तेव्हा अमुक अमुक कारणामुळेच त्यांच्यावर हे संकट आले असा आपण लगेच निष्कर्ष काढू नये.

५२:७-९; ५५:१२, १३. आपल्याजवळ राज्याच्या प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात आनंदाने सहभाग घेण्याची निदान तीन कारणे आहेत. आध्यात्मिकरित्या भुकेल्या लोकांकरता आपले पाय मनोरम आहेत. आपण यहोवाला “प्रत्यक्ष” पाहतो, अर्थात त्याच्यासोबत आपला जवळचा नातेसंबंध आहे. तसेच आपण आध्यात्मिक समृद्धी अनुभवतो.

५२:११, १२. “परमेश्‍वराची पात्रे” वाहण्यास, अर्थात यहोवाच्या पवित्र सेवेच्या तरतुदींचा लाभ घेण्यास योग्य ठरण्याकरता आपण आध्यात्मिकरित्या व नैतिकरित्या शुद्ध असले पाहिजे.

५८:१-१४. भक्‍तीचा व नीतिमत्तेचा ढोंगी दिखावा व्यर्थ आहे. खऱ्‍या उपासकांनी सुभक्‍तीची व बंधुप्रेमाची मनःपूर्वक कृत्ये केली पाहिजेत.—योहान १३:३५; २ पेत्र ३:११.

५९:१५ख-१९. यहोवा मानवाचे सर्व कारभार पाहतो आणि आपल्या नियुक्‍त वेळी हस्तक्षेप करतो.

ती “शोभायमान मुकुट” बनेल

(यशया ६०:१–६६:२४)

प्राचीन काळात तसेच आपल्या काळातही खऱ्‍या उपासनेच्या पुनर्स्थापनेकडे संकेत करून यशया ६०:१ म्हणते: “ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमेश्‍वराचे तेज तुजवर उदय पावले आहे.” सियोन “परमेश्‍वराच्या हाती शोभायमान मुकुट” होईल.—यशया ६२:३.

बॅबिलोनच्या दास्यातून मुक्‍त होऊन परतणाऱ्‍या आपल्या पश्‍चात्तापी बांधवांच्या वतीने यशया यहोवाला प्रार्थना करतो. (यशया ६३:१५–६४:१२) खऱ्‍या व खोट्या उपासकाची तुलना करून संदेष्टा यशया दाखवतो की यहोवा आपली सेवा करणाऱ्‍यांना कशाप्रकारे आशीर्वाद देईल.—यशया ६५:१–६६:२४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

६१:८, ९—“सार्वकालिक करार” काय आहे आणि “वंश” कोण आहेत? हा यहोवाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत केलेला नवा करार आहे. “वंश” म्हणजे अभिषिक्‍त जनांच्या संदेशाला प्रतिसाद देणारी लाखो “दुसरी मेंढरे.”—योहान १०:१६.

६३:५—देवाच्या संतापाने कशाप्रकारे त्याला आधार दिला? देवाचा संताप अर्थात दुष्टाई पाहून त्याला वाटणारा नीतिमान क्रोध हा पूर्णपणे नियंत्रित असतो. त्याचा संताप त्याला आधार देतो तो या अर्थाने की तो त्याला दुष्टांविरुद्ध न्यायदंड बजावण्याची प्रेरणा देतो.

आपल्याकरता धडे:

६४:६.अपरिपूर्ण मानव स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. पापांचे प्रायश्‍चित्त करण्याच्या बाबतीत, त्यांची धार्मिक कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी आहेत.—रोमकर ३:२३, २४.

६५:१३, १४. यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना आशीर्वाद देतो. तो त्यांच्या आध्यात्मिक गरजा उदारतेने पूर्ण करतो.

६६:३-५. यहोवाला दांभिकतेची घृणा वाटते.

“आनंदी व्हा”

बॅबिलोनमध्ये राहणाऱ्‍या विश्‍वासू यहुद्यांकरता यशयाने केलेल्या पुनर्वसनाच्या भविष्यवाण्या किती सांत्वनदायक ठरल्या असतील! यहोवाने म्हटले: “जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा. पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करितो.”—यशया ६५:१८.

आपणही अशा एका काळात जगत आहोत की जेव्हा अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबीड काळोख राष्ट्रांस झाकत आहे. (यशया ६०:२) हे ‘शेवटल्या काळचे कठीण दिवस’ आहेत. (२ तीमथ्य ३:१) म्हणूनच, बायबलमधील यशया पुस्तकात यहोवाने पुरवलेल्या तारणाचा संदेश आपल्याला अतिशय सांत्वन देणारा आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०७ १/१५)

[तळटीप]

^ परि. 4 यशया १:१–३५:१० या भागावरील चर्चेकरता टेहळणी बुरूज डिसेंबर १, २००६ अंकातील “यहोवाचे वचन सजीव आहे—यशया पुस्तकाच्या पहिल्या भागातील ठळक मुद्दे” हा लेख पाहावा.

[८ पानांवरील चित्र]

हिज्कियाने अश्‍शूरी लोकांपासून वाचवण्याची देवाला प्रार्थना केली, ती प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी?

[११ पानांवरील चित्र]

‘जो सुवार्ता सांगतो त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात’