व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मुलांनो, . . . आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा”

“मुलांनो, . . . आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा”

“मुलांनो, . . . आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा”

“मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.”—इफिसकर ६:१.

१. आज्ञा पाळल्यामुळे कशाप्रकारे तुमचे संरक्षण होऊ शकते?

कदाचित आज आपण जिवंत आहोत ते या कारणामुळे की आपण आज्ञा पाळल्या आणि काहीजण आज जिवंत नाहीत कारण त्यांनी आज्ञा पाळल्या नाहीत. कोणाच्या आज्ञा? आपल्या “अद्‌भुत रीतीने” घडलेल्या शरीराच्या आज्ञा किंवा धोक्याच्या सूचना. (स्तोत्र १३९:१४) आपल्याला काळे ढग दिसतात, विजांचा गडगडाट ऐकू येतो. मग हवेतील विद्युत प्रभावामुळे आपले केस उभे राहतात. तेव्हा ज्यांना या धोक्याच्या सूचनांविषयी पूर्वी माहिती देण्यात आली आहे त्यांना लगेच समजेल की वादळ येणार असून लवकरात लवकर सुरक्षित स्थानी आश्रय घेतला पाहिजे नाहीतर वीज पडल्यास किंवा गारांचा जोरदार वर्षाव झाल्यास आपल्या जिवालाही धोका संभवू शकतो.

२. मुलांना पूर्वसूचनांची गरज का असते आणि त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत का राहिले पाहिजे?

लहान मुलांनो, तुम्हाला संभाव्य धोक्यांविषयी सावध केले जाण्याची गरज आहे. आणि या धोक्यांविषयी तुम्हाला जागरूक करण्याची जबाबदारी तुमच्या आईवडिलांची आहे. “शेगडीजवळ जाऊ नकोस, गरम आहे.” “पाण्याजवळ जाऊ नकोस, खूप खोल आहे.” “रस्ता ओलांडताना दोन्हीकडे पाहिल्यावरच पुढे जा.” यांसारख्या सूचना ऐकल्याचे तुम्हाला आठवत असेल. पण दुःखाची गोष्ट म्हणजे बरेचदा अशा आज्ञांचे पालन न केल्यामुळे मुलांना दुखापत झाल्याची अथवा त्यांनी आपला जीवही गमावल्याची उदाहरणे आहेत. आईवडिलांच्या आज्ञेत राहणे हे “योग्य” आहे, उचित आहे. तसेच हे शहाणपणाचे लक्षण आहे. (नीतिसूत्रे ८:३३) बायबलच्या दुसऱ्‍या एका वचनात असे म्हटले आहे की हे प्रभू येशू ख्रिस्ताला “संतोषकारक” आहे. मुळात देव स्वतःच तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याचा आदेश देतो.—कलस्सैकर ३:२०; १ करिंथकर ८:६.

आज्ञापालनाचे चिरकालिक फायदे

३. आपल्यापैकी बहुतेकांकरता “खरे जीवन” काय असेल आणि लहान मुले हे जीवन केव्हा उपभोगू शकतील?

आईवडिलांचे आज्ञापालन केल्याने तुमचे ‘आताचे जीवन’ तर सुरक्षित राहीलच, शिवाय ‘पुढचे’ अर्थात ज्याला “खरे जीवन” म्हणण्यात आले आहे ते जीवनही उपभोगणे तुम्हाला शक्य होईल. (१ तीमथ्य ४:८; ६:१९) आपल्यापैकी बहुतेकांना, देवाच्या आज्ञांचे विश्‍वासूपणे पालन करणाऱ्‍यांना त्याने प्रतिज्ञा दिल्याप्रमाणे पृथ्वीवर एका नव्या जगात सार्वकालिक जीवन मिळेल. देवाच्या आज्ञांपैकी एक मुख्य आज्ञा ही आहे की “‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख; ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे’. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” तेव्हा, आईवडिलांच्या आज्ञा पाळल्यास तुम्ही आनंदी राहाल. तुमचे भविष्य सुरक्षित राहील आणि तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन अनुभवू शकाल.—इफिसकर ६:२, ३.

४. लहान मुले कशाप्रकारे देवाचा आदर करू शकतात आणि यामुळे त्यांना कोणता फायदा मिळू शकतो?

तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळण्याद्वारे त्यांचा मान राखता तेव्हा तुम्ही देवाचाही आदर करता कारण तोच तुम्हाला त्यांच्या आज्ञा पाळण्याचा आदेश देतो. त्याच वेळेस, असे केल्याने तुमचाही फायदा होतो. बायबल म्हणते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो.” (यशया ४८:१७; १ योहान ५:३) आज्ञापालन केल्याने तुमचा फायदा कशाप्रकारे होतो? तुम्ही आईवडिलांच्या आज्ञा पाळता तेव्हा त्यांना आनंद वाटतो आणि ते निरनिराळ्या मार्गांनी आपला हा आनंद व्यक्‍त करतात तेव्हा तुमचेही जीवन आनंददायक बनते. (नीतिसूत्रे २३:२२-२५) पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आज्ञापालनामुळे तुमच्या स्वर्गातील पित्याला आनंद होतो आणि तो तुम्हाला अद्‌भुत रित्या याचे प्रतिफळ देईल. येशूला यहोवाने कशाप्रकारे आशीर्वाद दिला व कशाप्रकारे त्याचे संरक्षण केले ते आता आपण पाहुया कारण येशूने आपल्या स्वर्गीय पित्याच्या संदर्भात असे म्हटले: “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.”—योहान ८:२९.

येशू—एक चांगला कामकरी

५. येशू एक उत्तम कारागीर होता असे आपण का म्हणू शकतो?

येशू आपली आई मरीया हिचा थोरला मुलगा होता. त्याचा दत्तकपिता योसेफ हा एक सुतार होता. येशू देखील सुतार बनला. कदाचित त्याने योसेफकडूनच हा धंदा शिकून घेतला असेल. (मत्तय १३:५५; मार्क ६:३; लूक १:२६-३१) येशू कशाप्रकारचा सुतार होता असे तुम्हाला वाटते? आपल्या कुमारी मातेच्या गर्भात येण्याअगोदर, स्वर्गात असताना बुद्धीचे व्यक्‍तिरूप असे वर्णन केलेल्या येशूने असे म्हटले: ‘मी [देवापाशी] कुशल कारागीर होतो. मी त्याला नित्य आनंददायी होतो.’ स्वर्गात एक उत्तम कारागीर असणाऱ्‍या येशूला देवाने संमती दिली. पृथ्वीवर असतानाही त्याने चांगला कारागीर असण्याचा, सुतारकाम चांगल्या रितीने करण्याचा प्रयत्न केला असेल असे तुम्हाला वाटते का?—नीतिसूत्रे ८:३०; कलस्सैकर १:१५, १६.

६. (क) येशूने लहानपणी आपल्या घरात बरीच कामे केली असतील असे तुम्हाला का वाटते? (ख) लहान मुले येशूचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतात?

साहजिकच, येशू लहान होता तेव्हा तोही इतर मुलांप्रमाणेच कधीकधी निरनिराळे खेळ खेळत असेल. प्राचीन काळी मुले अशाप्रकारचे खेळ खेळायची याविषयी बायबल सांगते. (जखऱ्‍या ८:५; मत्तय ११:१६, १७) पण बेताचीच परिस्थिती असलेल्या एका मोठ्या कुटुंबातील सर्वात थोरला मुलगा असल्याने, नक्कीच येशूला आपल्या पित्याकडून सुतारकाम शिकून घेण्याव्यतिरिक्‍त इतरही बरीच कामे करावी लागत असतील. कालांतराने येशू एक सुवार्तिक बनला आणि त्याने आपल्या सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले. कधीकधी त्यासाठी त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखसोयींचाही त्याग केला. (लूक ९:५८; योहान ५:१७) येशूचे अनुकरण करता येईल असे काही मार्ग तुम्हाला सुचतात का? तुमचे आईवडील तुम्हाला घराची साफसफाई किंवा इतर कामे सांगतात का? ते तुम्हाला ख्रिस्ती सभांना येण्याद्वारे किंवा इतरांना आपल्या विश्‍वासांविषयी सांगण्याद्वारे यहोवाच्या उपासनेत सहभागी होण्याचे प्रोत्साहन देतात का? तुम्हाला काय वाटते, लहान येशू तुमच्या जागी असता तर त्याने काय केले असते?

उत्तम बायबल अभ्यासी व शिक्षक

७. (क) येशू वल्हांडणाला कोणासोबत गेला असावा? (ख) इतरजण घरी जायला निघाले तेव्हा येशू कोठे होता आणि तेथे तो का गेला होता?

इस्राएली कुटुंबांतील सर्व पुरुषांना वर्षातून तीन वेळा यहुदी सणांकरता यहोवाच्या मंदिरात जाऊन त्याची उपासना करण्याची आज्ञा देण्यात आली होती. (अनुवाद १६:१६) येशू १२ वर्षांचा होता तेव्हा कदाचित त्याचे सबंध कुटुंबच वल्हांडणाकरता जेरूसलेमला गेले असावे. यात योसेफ व मरीयेच्या इतर मुलामुलींचाही समावेश असावा. पण येशूच्या कुटुंबासोबत सलोमे जी कदाचित मरीयेची बहीण होती, ती व तिचा पती जब्दी आणि याकोब व योहान ही त्यांची दोन मुले, जे नंतर प्रेषित बनले ते देखील असावेत. * (मत्तय ४:२०, २१; १३:५४-५६; मार्क १५:४०; योहान १९:२५) परत येताना, योसेफ व मरीयेने कदाचित असे गृहीत धरले असावे की येशू त्यांच्या नातेवाईकांसोबत आहे. म्हणूनच सुरुवातीला त्यांना तो नसल्याचे लक्षात आले नाही. शेवटी, तीन दिवसांनंतर मरीया व योसेफ यांना येशू मंदिरात, “गुरूजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्‍न करताना सापडला.”—लूक २:४४-४६.

८. येशूने मंदिरात काय केले आणि लोक चकित का झाले?

येशू गुरूजनांना ‘प्रश्‍न करत’ होता याचा काय अर्थ होतो? त्याचे हे प्रश्‍न विचारणे केवळ जिज्ञासा तृप्त करण्याकरता किंवा फक्‍त काही माहिती मिळवण्याकरता नसावे. येथे जो ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे तो कधीकधी न्यायचौकशीच्या संदर्भातही वापरला जात असे. तेव्हा यातून उलटतपासणीचा अर्थ सूचित होतो. होय, अगदी कोवळ्या वयातही येशूला बायबलचे इतके ज्ञान होते की ते पाहून धार्मिक विद्वानही चकित झाले! बायबल सांगते की “त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले.”—लूक २:४७.

९. बायबलचा अभ्यास करण्याच्या बाबतीत तुम्ही येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकता?

इतक्या लहान वयात येशू अनुभवी गुरूजनांना आपल्या बायबलच्या ज्ञानाने कसा काय प्रभावित करू शकला? तुम्हाला काय वाटते? अर्थात, त्याचे आईवडील देवभीरू होते आणि नक्कीच त्यांनी अगदी बालपणापासून त्याला देवाचे ज्ञान दिले असेल. (निर्गम १२:२४-२७; अनुवाद ६:६-९; मत्तय १:१८-२०) योसेफ चिमुकल्या येशूला सभास्थानात शास्त्रवचनांचे पठण व चर्चा ऐकण्याकरता आपल्यासोबत नेत असेल याची आपण खात्री बाळगू शकतो. तुमचे आईवडीलही जर तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असतील आणि तुम्हाला ख्रिस्ती सभांना नेत असतील, तर हा तुम्हाला मिळालेला एक मोठा आशीर्वादच आहे. येशूप्रमाणे, तुम्ही आपल्या आईवडिलांच्या प्रयत्नांची कदर करता का? तुम्हाला जे शिकायला मिळाले आहे त्याबद्दल तुम्ही येशूसारखेच इतरांना सांगता का?

येशू आपल्या आईवडिलांच्या अधीन राहिला

१०. (क) येशूला कोठे शोधावे हे त्याच्या आईवडिलांना का माहीत असायला हवे होते? (ख) मुलांसाठी येशूचे उदाहरण अनुकरणीय का आहे?

१० तीन दिवसांनंतर शेवटी येशू मंदिरात सापडला तेव्हा योसेफ व मरीयेला कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? नक्कीच त्याला पाहून त्यांना हायसे झाले असेल. पण आपण मंदिरात असू हे आपल्या आईवडिलांना कसे कळले नाही याचे येशूला आश्‍चर्य वाटले. त्या दोघांनाही येशूच्या चमत्कारिक जन्माविषयी माहीत होते. शिवाय, त्यांना सर्व गोष्टी जरी माहीत नव्हत्या तरीसुद्धा तो पुढे चालून तारणकर्ता आणि देवाच्या राज्याचा राजा बनेल याविषयी त्यांना थोडीफार कल्पना नक्कीच असली पाहिजे. (मत्तय १:२१; लूक १:३२-३५; २:११) म्हणूनच येशूने त्यांना विचारले: “तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” पण तरीसुद्धा येशू आज्ञाधारकपणे आपल्या आईवडिलांसोबत नासरेथला आपल्या घरी परतला. बायबल सांगते: “[तो] त्यांच्या आज्ञेत राहिला.” तसेच “त्याच्या आईने ह्‍या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेविल्या.”—लूक २:४८-५१.

११. येशूच्या उदाहरणावरून तुम्ही आज्ञापालनाविषयी कोणता धडा शिकू शकता?

११ तुम्हाला येशूचे अनुकरण करणे, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहणे नेहमीच सोपे जाते का? की कधीकधी आपल्या आईवडिलांना आजच्या जगाबद्दल काही कळत नाही, त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळते असे तुम्हाला वाटते? काही गोष्टींबद्दल, उदाहरणार्थ मोबाईल फोन्स, कंप्युटर्स किंवा इतर आधुनिक वस्तू कशा वापरायच्या याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे हे कबूल आहे. पण येशूबद्दल विचार करा. त्याने आपल्या “बुद्धीवरून व उत्तरावरून” अनुभवी गुरूजनांना थक्क केले. त्याच्या तुलनेत नक्कीच तुमचे ज्ञान फार कमी आहे हे तुम्ही मान्य कराल. आणि तरीसुद्धा येशू आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. याचा अर्थ त्यांचे सर्व निर्णय नेहमीच त्याला पटले असतील असे नाही. तरीपण, तो “त्यांच्या आज्ञेत राहिला”—लहानपणापासून तरुणपणापर्यंत. त्याच्या उदाहरणावरून तुमच्या मते, तुम्ही काय शिकू शकता?—अनुवाद ५:१६, २९.

आज्ञापालन—एक आव्हान

१२. आज्ञा पाळल्यामुळे कशाप्रकारे तुमचा जीव वाचू शकतो?

१२ आज्ञा पाळणे नेहमीच सोपे नसते. हे एका उदाहरणावरून दिसून येते. काही वर्षांपूर्वी, दोन मुलींना एका सहा-लेन्सचा हायवे रस्ता ओलांडायचा होता. पण हा रहदारीचा रस्ता ओलांडण्याकरता जो पूल बांधण्यात आला होता, त्यावरून न जाता त्यांनी धावत रस्त्याच्या पलीकडे जायचे ठरवले. त्यांचा एक मित्र पुलावरून जायला वळाला तेव्हा त्या त्याला म्हणाल्या, “जॉन, काय झालं? आमच्याबरोबर येतोएस नं?” तो काही बोलला नाही तेव्हा त्यांपैकी एका मुलीने त्याला “भित्री भागूबाई!” असे म्हणून टोमणा मारला. पण जॉन न घाबरता त्यांना म्हणाला: “मला आईने जे सांगितलेय तेच मी करणार.” पुलावरून जाताना काही क्षणांनंतर त्याला एका भरधाव येणाऱ्‍या गाडीने अचानक ब्रेक लावल्याचा कर्कश्‍श आवाज ऐकू आला. खाली वाकून पाहिले तेव्हा त्याला दिसले की त्या मुलींना एका गाडीने धडक दिली होती. एक मुलगी जागीच ठार झाली होती आणि दुसरीला इतका जबरदस्त मार लागला की तिचा पाय कापावा लागला. त्या मुलींच्या आईनेही त्यांना पुलावरूनच जायला सांगितले होते. नंतर, तिने जॉनच्या आईला हे बोलून दाखवले: “माझ्या मुलीपण तुमच्या मुलाइतक्याच आज्ञाधारक असत्या तर किती बरे झाले असते!”—इफिसकर ६:१.

१३. (क) तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत का राहिले पाहिजे? (ख) कोणत्या परिस्थितीत मुलांनी आईवडिलांच्या सांगण्यानुसार न केल्यास ते उचित ठरेल?

१३ ‘मुलांनो, आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा,’ असे देव मुलांना का सांगतो? आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिल्यामुळे तुम्ही देवाच्या आज्ञेचे पालन करता. शिवाय, तुमच्या आईवडिलांना तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. उदाहरणार्थ, वरती वर्णन केलेला अपघात घडण्याच्या केवळ पाच वर्षांआधी, जॉनच्या आईच्या एका मैत्रिणीच्या मुलाचा तोच रस्ता ओलांडताना अपघातात मृत्यू झाला होता! तुमच्या आईवडिलांच्या आज्ञा पाळणे तुम्हाला नेहमीच सोपे जाणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही त्या पाळाव्यात असे देव सांगतो. दुसरीकडे पाहता, जर तुमच्या आईवडिलांनी, किंवा इतर कोणी तुम्हाला खोटे बोलण्यास, चोरी करण्यास, किंवा देवाला न आवडणारे काहीही करण्यास सांगितले तर तुम्ही “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” म्हणूनच, बायबल फक्‍त ‘आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा’ असे सांगत नाही. तर, “प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा,” असे सांगते. याचा अर्थ देवाच्या कायद्याच्या एकमतात असलेल्या सर्व गोष्टींत तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

१४. परिपूर्ण असणाऱ्‍या व्यक्‍तीला आज्ञाधारक राहणे सोपे का जाते, तरीसुद्धा त्याला तो शिकावा का लागू शकतो?

१४ जर तुम्ही परिपूर्ण असता, येशूसारखे ‘निर्मळ, पापी जनांपासून वेगळे’ असता तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आज्ञा पाळणे सोपे गेले असते असे तुम्हाला वाटते का? (इब्री लोकांस ७:२६) जर तुम्ही परिपूर्ण असता, तर तुम्हाला आता आहे तशी वाईट गोष्टी करण्याची ओढ नसती हे खरे आहे. (उत्पत्ति ८:२१; स्तोत्र ५१:५) पण येशूलाही आज्ञापालन शिकावे लागले. बायबल सांगते: “[येशू] पुत्र असूनहि त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्री लोकांस ५:८) येशूला आज्ञाधारकपणा, जो स्वर्गात त्याला कधीही शिकावा लागला नाही तो दुःख सोसल्यामुळे कशाप्रकारे शिकता आला?

१५, १६. येशू आज्ञाधारकपणा कसा शिकला?

१५ यहोवाच्या मार्गदर्शनानुसार, योसेफ व मरीयेने येशूच्या बालपणी त्याचे सर्व धोक्यांपासून संरक्षण केले. (मत्तय २:७-२३) पण नंतर मात्र देवाने येशूवर असलेले ते अद्‌भुत संरक्षणाचे छत्र काढून घेतले. येशूला सहन कराव्या लागलेल्या मानसिक व शारीरिक वेदना इतक्या वाढल्या की बायबल सांगते, त्याने “मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली.” (इब्री लोकांस ५:७) हे केव्हा घडले?

१६ हे येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या काही तासांत घडले, जेव्हा सैतानाने त्याची निष्ठा भंग करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. एक गुन्हेगार ठरवून आपल्याला मृत्यूदंड दिल्यामुळे आपल्या पित्याच्या नावाची बदनामी होईल या विचाराने येशू इतका व्यथित झाला की “अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्‍ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” काही तासांनंतर त्याला वधस्तंभावर इतक्या यातना सहन कराव्या लागल्या की त्याने “अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली.” (लूक २२:४२-४४; मार्क १५:३४) अशारितीने “त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला” आणि आपल्या पित्याचे मन आनंदित केले. आज स्वर्गात असलेल्या येशूला आपण आज्ञाधारक राहताना जो काही त्रास सहन करतो तो समजू शकतो.—नीतिसूत्रे २७:११; इब्री लोकांस २:१८; ४:१५.

आज्ञाधारकपणा शिकणे

१७. शिक्षेबद्दल आपला कसा दृष्टिकोन असावा?

१७ तुमचे आईवडील तुम्हाला शिक्षा देतात यावरून हेच दिसून येते की तुमचे भले व्हावे अशी त्यांना इच्छा आहे, त्यांना तुमच्यावर प्रेम आहे. बायबल म्हणते: “ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे?” विचार करा, जर तुमच्या चुका सुधारण्याची तसदी घेण्याइतके त्यांचे तुमच्यावर प्रेम नसते, तुमच्याकडे लक्ष देण्याकरता त्यांना वेळच नसता तर तुम्हाला वाईट वाटले नसते का? त्याचप्रकारे यहोवाला तुमच्यावर प्रेम असल्यामुळेच तो तुम्हाला शिक्षा देतो. “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते.”—इब्री लोकांस १२:७-११.

१८. (क) प्रेमळ शिक्षा कशाचा पुरावा आहे? (ख) अशाप्रकारची शिक्षा मिळाल्यामुळे ज्यांना चांगले वळण लागले अशी काही उदाहरणे तुमच्या लक्षात आहेत का?

१८ प्राचीन इस्राएलातील शलमोन राजा, ज्याच्या उल्लेखनीय बुद्धीची येशूनेही प्रशंसा केली, त्याने मुलांना आईवडिलांच्या प्रेमळ मार्गदर्शनाची किती गरज आहे याविषयी लिहिले होते. त्याने लिहिले: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.” शलमोनाने तर असेही म्हटले की ज्याला शिक्षा मिळते त्याचा जीव अधोलोकापासून वाचवला जाऊ शकतो. (नीतिसूत्रे १३:२४; २३:१३, १४; मत्तय १२:४२) एक ख्रिस्ती बहीण सांगते की जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे वडील तिला आधीच ताकीद द्यायचे की सभा सुरू असताना तिने काही दंगा केला तर घरी गेल्यावर तिला त्याबद्दल शिक्षा मिळेल. आज ती मोठ्या मायेने आपल्या वडिलांची आठवण काढून, प्रेमळपणे तिला वळण लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करते.

१९. तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत का राहिले पाहिजे?

१९ जर तुमचे आईवडील तुमच्याकडे लक्ष देण्याकरता वेळ काढत असतील, प्रेमळपणे तुमच्या चुका सुधारण्याची तसदी घेत असतील तर तुम्ही याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा. असे करण्याद्वारे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त याचे अनुकरण करत असता कारण तो देखील आपल्या आईवडिलांच्या, अर्थात योसेफ व मरीया यांच्या अधीन राहिला. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे करण्याद्वारे तुम्ही आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्या आदेशाचे पालन करत असता. शिवाय आईवडिलांच्या आज्ञेत राहिल्याने तुमचाच फायदा होईल, ‘तुमचे कल्याण होईल व तुम्ही पृथ्वीवर दीर्घायु व्हाल.’—इफिसकर ६:२, ३. (w०७ २/१५)

[तळटीप]

^ परि. 7 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड २ रा, पृष्ठ ८४१ वर पाहावे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मुलांना आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिल्याने कोणते फायदे मिळू शकतील?

• लहान असताना, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याच्या बाबतीत येशू कशाप्रकारे एक उत्तम उदाहरण होता?

• येशू आज्ञाधारकपणा कशारितीने शिकला?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

बारा वर्षांच्या येशूला शास्त्रवचनांचे सखोल ज्ञान होते

[२२ पानांवरील चित्र]

येशूने जे दुःख सोसले त्यातून तो आज्ञाधारकपणा कसा शिकला?