व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व मिळून यहोवाच्या नावाची महती वर्णूं या

सर्व मिळून यहोवाच्या नावाची महती वर्णूं या

सर्व मिळून यहोवाच्या नावाची महती वर्णूं या

“तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूं या.”—स्तोत्र ३४:३.

१. येशूने पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्यादरम्यान आपल्याकरता एक अनुकरणीय उदाहरण कशाप्रकारे पुरवले?

सा.यु. ३३ सालच्या निसान १४ तारखेला येशू व त्याच्या प्रेषितांनी जेरूसलेममधील एका माडीवरच्या खोलीत एकत्र मिळून यहोवाच्या स्तुतीकरता गीते गायिली. (मत्तय २६:३०) आपल्या प्रेषितांसोबत असे करण्याची ही येशूची शेवटली वेळ होती. पण त्यांच्यासोबतच्या त्या भेटीचा समारोप त्याने अशाप्रकारे करावा हे उचितच होते. कारण येशूने त्याच्या सेवाकार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या पित्याच्या नावाची स्तुती केली आणि मोठ्या आवेशाने त्याच्या नावाचा प्रचार केला. (मत्तय ४:१०; ६:९; २२:३७, ३८; योहान १२:२८; १७:६) एका अर्थाने त्याने स्तोत्रकर्त्याच्या प्रेमळ निमंत्रणाचा पुनरुच्चार केला: “तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूं या.” (स्तोत्र ३४:३) आपल्याकरता हे किती अनुकरणीय उदाहरण आहे!

२, ३. (क) स्तोत्र ३४ यात भविष्यसूचक माहिती आहे हे आपल्याला कसे कळते? (ख) या व पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

येशूसोबत देवाची स्तुतीगीते गायिल्यावर काही तासांतच प्रेषित योहानाला एक अगदी वेगळी घटना पाहायला मिळाली. त्याने येशू ख्रिस्ताला व त्याच्यासोबत दोन गुन्हेगारांना वधस्तंभांवर जिवे मारले जाताना पाहिले. रोमी सैनिकांनी त्या दोन गुन्हेगारांना लवकर मृत्यू यावा म्हणून त्यांचे पाय तोडून टाकले. पण योहान असे वृत्त देतो की त्यांनी येशूचे पाय तोडले नाहीत. सैनिक येशूजवळ आले तोपर्यंत तो मेला होता. योहानाने आपल्या शुभवर्तमानात या घटनेतून स्तोत्र ३४ च्या दुसऱ्‍या एका वचनाची कशाप्रकारे पूर्णता झाली याविषयी लिहिले. त्यात म्हटले आहे: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.”—योहान १९:३२-३६; स्तोत्र ३४:२०, सेप्टुअजिंट.

स्तोत्र ३४ यात ख्रिश्‍चनांकरता इतरही अनेक रोचक मुद्दे आहेत. म्हणूनच या व पुढच्या लेखात आपण दाविदाने ज्या परिस्थितीत हे स्तोत्र लिहिले होते त्याचे परीक्षण करू या आणि नंतर या स्तोत्रातील काही माहिती विचारात घेऊ या.

दावीदाचे शौलापासून पलायन

४. (क) दाविदाला इस्राएलचा भावी राजा म्हणून का अभिषिक्‍त करण्यात आले? (ख) शौल दाविदावर “फार प्रेम” का करू लागला?

दावीद लहान असताना शौल इस्राएलचा राजा होता. पण शौलाने यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे तो त्याच्या मर्जीतून उतरला. याच कारणामुळे संदेष्टा शमुवेल याने त्याला म्हटले: “परमेश्‍वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुजपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्‍यास दिले आहे.” (१ शमुवेल १५:२८) कालांतराने, यहोवाने शमुवेलास सांगितले की त्याने इशायाचा पुत्र दावीद याचा अभिषेक करावा व त्याला इस्राएलचा नवा राजा घोषित करावे. इकडे, देवाचा आत्मा शौलापासून निघून गेल्यामुळे तो अतिशय वाईट मनस्थितीत होता. तेव्हा दावीद हा एक उत्तम वीणावादक असल्यामुळे त्याला राजाची सेवा करण्याकरता गिबा येथे आणण्यात आले. दाविदाच्या संगीतामुळे शौलाला चैन पडून बरे वाटले आणि शौल “त्याजवर फार प्रेम करू लागला.”—१ शमुवेल १६:११, १३, २१, २३.

५. दाविदाप्रती शौलाची मनोवृत्ती का बदलली आणि दाविदाला शेवटी काय करावे लागले?

काळाच्या ओघात, यहोवा सतत दाविदाच्या पाठीशी राहिला. त्याने दाविदाला पलिष्टी वीर गल्याथ याच्यावर विजय मिळवण्यास साहाय्य केले आणि यासारखेच अनेक विजय मिळवून दिले. अशारितीने इस्राएलमध्ये दाविदाच्या पराक्रमाचे लोक गौरव करू लागले. पण दाविदावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे पाहून शौल मत्सराने पेटला आणि तो दाविदाचा द्वेष करू लागला. दावीद वीणा वाजवत असताना शौलाने दोनदा त्याच्यावर भाला फेकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळा दावीदाने भाला चुकवला. पण शौलाने तिसऱ्‍यांदा जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा इस्राएलच्या भावी राजाला जाणीव झाली की त्याने पलायन केले पाहिजे. तरीही शौलाने दाविदाला मारून टाकण्याकरता आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि त्यामुळे शेवटी दाविदाने इस्राएलच्या प्रदेशाच्या बाहेर जाऊन आश्रय घेण्याचे ठरवले.—१ शमुवेल १८:११; १९:९, १०.

६. शौलाने नोब शहराच्या रहिवाशांची कत्तल करण्याचा हुकूम का दिला?

इस्राएलच्या सीमेजवळ जाताना दावीद नोब नावाच्या शहरात आला. या शहरात यहोवाचा निवासमंडप होता. दाविदासोबत त्याची माणसे देखील होती आणि त्यांना भूक लागली तेव्हा दावीद स्वतःकरता व त्यांच्याकरता काही खावयास शोधू लागला. शौलाला ही खबर मिळाली की महायाजकाने दाविदाला व त्याच्या माणसांना खायला दिले आणि त्यासोबतच गल्याथाकडून मिळवलेली तरवार देखील त्याला दिली. हे ऐकून शौल इतका क्रोधित झाला की त्याने नोब शहराच्या सर्व रहिवाशांची तसेच ८५ याजकांची कत्तल केली.—१ शमुवेल २१:१, २; २२:१२, १३, १८, १९; मत्तय १२:३, ४.

पुन्हा एकदा मृत्यूच्या विळख्यातून सुटका

७. गथ हे लपण्याचे सुरक्षित स्थान का नव्हते?

नोब येथून निघून दावीद पश्‍चिम दिशेला ४० किलोमीटर अंतर पार करून पलिष्टी क्षेत्रात आला आणि त्याने गल्याथाचे जन्मस्थान गथ येथे राजा आखीश याजकडे आश्रय घेतला. कदाचित त्याने असे विचार केला असावा की आपण गथला येऊन लपू असा शौल स्वप्नातही विचार करणार नाही त्यामुळे हे स्थान सुरक्षित आहे. पण लवकरच गथाच्या राजाच्या माणसांनी दाविदाला ओळखले. लोकांनी आपल्याला ओळखले आहे हे दाविदाच्या कानावर पडले तेव्हा, “गथाचा राजा आखीश याचा त्याला फार धाक वाटला.”—१ शमुवेल २१:१०-१२.

८. (क) स्तोत्र ५६ वरून आपल्याला दाविदाला गथ शहरात आलेल्या अनुभवांविषयी काय समजते? (ख) कशारितीने दावीद मृत्यूच्या विळख्यातून सुखरूप बचावला?

पलिष्ट्यांनी लगेच दाविदाला धरले. कदाचित याचदरम्यान दाविदाने ते स्तोत्र लिहिले असावे ज्यात तो यहोवाला मनापासून म्हणतो की ‘माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेव.’ (स्तोत्र ५६:८ व उपरिलेखन) अशारितीने त्याने हा विश्‍वास व्यक्‍त केला की यहोवा त्याचे दुःख विसरून जाणार नाही तर प्रेमळपणे त्याची काळजी घेईल व त्याचे संरक्षण करील. पलिष्टी राजाला फसवण्याकरता दाविदाने एक योजनाही आखली. त्याने वेड्याचे सोंग घेतले. हे पाहून आखीश राजाने आपल्यासमोर ‘वेड्याला’ का आणले म्हणून आपल्या सेवकांना दटावले. यहोवाने दाविदाला आशीर्वाद दिल्यामुळे त्याची योजना सफल झाली होती. दाविदाला त्या शहरातून घालवण्यात आले आणि अशारितीने तो पुन्हा एकदा मृत्यूच्या विळख्यातून सुखरूप बचावला.—१ शमुवेल २१:१३-१५.

९, १०. दाविदाने स्तोत्र ३४ का लिहिले आणि हे स्तोत्र लिहिताना दाविदाच्या मनात कोणाचा विचार असावा?

दाविदासोबत असलेली त्याची माणसेही त्याच्यासोबत गथला गेली होती की ती जवळपास असलेल्या इस्राएलच्या खेड्यापाड्यांत त्याची वाट पाहात होती हे बायबल आपल्याला सांगत नाही. काहीही असो, जेव्हा दाविदाने त्यांना यहोवाने कशाप्रकारे आपल्याला पुन्हा एकदा सोडवले याविषयीचा वृत्तान्त सांगितला असेल तेव्हा निश्‍चितच त्या सर्वांना खूप आनंद झाला असेल. ही घटना स्तोत्र ३४ ची पार्श्‍वभूमी ठरली. हे त्याच्या उपरिलेखनावरूनही दिसून येते. या स्तोत्राच्या पहिल्या सात वचनांत दावीद आपली सुटका केल्याबद्दल देवाची स्तुती करतो आणि आपल्या लोकांचा संभाळ करणाऱ्‍या या थोर संरक्षणकर्त्याची महती वर्णण्यात आपल्या सर्व साथीदारांनाही आपल्यासोबत सामील होण्यास सांगतो.—स्तोत्र ३४:३, ४, ७.

१० दावीद व त्याची माणसे गथपासून पूर्व दिशेला जवळजवळ १५ किलोमीटरच्या अंतरावर इस्राएलच्या एका डोंगराळ प्रदेशात अदुल्लामच्या गुहेत आश्रय घेतात. येथे शौल राजाच्या शासनामुळे नाखुष असलेले इस्राएलीही त्यांना येऊन मिळाले. (१ शमुवेल २२:१, २) स्तोत्र ३४:८-२२ यातील शब्द दाविदाने रचले तेव्हा कदाचित त्याने अशा व्यक्‍तींना मनात ठेवून ते शब्द लिहिले असावेत. या वचनांतील शब्द आज आपल्यालाही काही महत्त्वाच्या मुद्द्‌यांची आठवण करून देतात. तेव्हा या सुरेख स्तोत्राच्या सविस्तर चर्चेतून निश्‍चितच आपल्या सर्वांनाच फायदा होईल.

दाविदाला ज्याचा ध्यास होता त्याचा तुम्हालाही आहे का?

११, १२. यहोवाची सतत स्तुती करण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?

११ “परमेश्‍वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.” (स्तोत्र ३४:१) रानावनात भटकणाऱ्‍या दाविदाला निश्‍चितच त्याच्या शारीरिक गरजा भागवण्याविषयी काळजी असावी. पण त्याच्या या शब्दांवरून दिसून येते की त्याला केवळ यहोवाची स्तुती करण्याचा ध्यास होता. दैनंदिन गरजांच्या काळजीमुळे त्यात कधीही व्यत्यय आले नाही. आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते तेव्हा दाविदाचे उदाहरण आपल्याकरता किती प्रेरणादायी ठरू शकते! आपण शाळेत, कामाच्या ठिकाणी, सहख्रिस्ती बांधवांसोबत, क्षेत्र सेवाकार्यात किंवा इतर कोठेही असलो तरी आपण सर्वप्रथम यहोवाची स्तुती करण्याविषयी विचार केला पाहिजे. यहोवाची स्तुती करण्याची असंख्य कारणे आपल्याजवळ आहेत! उदाहरणार्थ, यहोवाच्या सृष्टीत पाहिले तर आपल्याला नित्यनवीन अद्‌भुत गोष्टी आढळतील व आनंद देतील. शिवाय यहोवाच्या संघटनेचा जो पृथ्वीवरील भाग आहे त्याच्या माध्यमाने यहोवाने काय काय साध्य केले आहे याचा विचार करा! यहोवाचे विश्‍वासू सेवक अपरिपूर्ण असूनही यहोवाने या आधुनिक काळात बरेच पराक्रम करण्याकरता त्यांचा उपयोग केला आहे. जगात ज्या मनुष्यांचा उदोउदो केला जातो व ज्यांना अक्षरशः देवाचा दर्जा दिला जातो, त्यांच्या तुलनेत देवाच्या महत्कृत्यांविषयी काय म्हणता येईल? दाविदाच्या या शब्दांशी तुम्ही सहमत नाही का: “हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीहि कृत्ये नाहीत.”—स्तोत्र ८६:८.

१२ दाविदाप्रमाणे, आपल्यालाही यहोवाच्या अतुलनीय कार्यांबद्दल त्याची सतत स्तुती केल्याशिवाय राहवत नाही. शिवाय, देवाच्या राज्याची सूत्रे आता दाविदाचा चिरकालिक वारस येशू ख्रिस्त याच्या हातात आहेत हे जाणून आपण रोमांचित होतो. (प्रकटीकरण ११:१५) याचा अर्थ सध्याच्या या जगाचा अंत अगदी जवळ आहे. सहाशे कोटी लोकांचे सार्वकालिक भविष्य धोक्यात आहे. देवाचे राज्य काय आहे आणि लवकरच ते मानवांकरता काय करणार आहे हे लोकांना सांगणे आणि त्यांनाही आपल्यासोबत यहोवाची स्तुती करण्यास साहाय्य करणे पूर्वी कधी नव्हते तितके आज गरजेचे आहे. निश्‍चितच, फार उशीर होण्याआधी ही “सुवार्ता” स्वीकारण्यास इतरांना प्रोत्साहन देण्याकरता आपण प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. या कार्याला आपण आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे.—मत्तय २४:१४.

१३. (क) दाविदाने कोणाविषयी फुशारकी मारली आणि कोणत्या प्रकारच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला? (ख) आज नम्र लोक कशाप्रकारे ख्रिस्ती मंडळीकडे आकर्षित होत आहेत?

१३ “माझा जीव परमेश्‍वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करितील.” (स्तोत्र ३४:२) दावीद स्वतःच्या यशाची प्रौढी मिरवत नव्हता. उदाहरणार्थ त्याने गथाच्या राजाला कशाप्रकारे फसवले याची त्याने फुशारकी मारली नाही. त्याला याची जाणीव होती की त्या प्रसंगी यहोवाने त्याचे संरक्षण केले होते आणि केवळ यहोवाच्याच मदतीमुळे तो जिवंत बचावला होता. (नीतिसूत्रे २१:१) तेव्हा दाविदाने स्वतःविषयी नव्हे तर यहोवाविषयी फुशारकी मारली. यामुळे नम्र लोकांना यहोवाकडे येण्याचे प्रोत्साहन मिळाले. त्याचप्रकारे येशूनेही यहोवाच्या नावाचे गौरव केले आणि यामुळे नम्र, शिकण्यास उत्सुक असणारे लोक त्याच्याकडे आकर्षित झाले. आज, सर्व राष्ट्रांतील नम्र लोक येशूच्या नेतृत्त्वाखाली कार्य करणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांच्या आंतरराष्ट्रीय मंडळीत सामील होण्यास पुढे येत आहेत. (कलस्सैकर १:१८) हे नम्र लोक जेव्हा देवाच्या नम्र सेवकांच्या तोंडून त्याच्या नावाच्या महिमेचे वर्णन ऐकतात व बायबलमधील संदेश ऐकतात तेव्हा देवाचा पवित्र आत्मा त्यांना या गोष्टी समजून घेण्यास मदत करतो आणि ते या ज्ञानाला अगदी अंतःकरणापासून प्रतिसाद देतात.—योहान ६:४४; प्रेषितांची कृत्ये १६:१४.

सभा आपल्या विश्‍वासास बळकट करतात

१४. (क) दावीदाने स्वतःच यहोवाची स्तुती करण्यात समाधान मानले का? (ख) उपासनेकरता एकत्र येण्याबद्दल येशूने आपल्याकरता कोणता आदर्श पुरवला?

१४ “तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूं या.” (स्तोत्र ३४:३) दावीद स्वतः तर यहोवाची स्तुती करतच होता, पण त्याने यातच समाधान मानले नाही. तर त्याने आपल्या साथीदारांनाही देवाच्या नावाची स्तुती करण्यास आपल्यासोबत सामील होण्याचे आवाहन केले. त्याचप्रकारे, थोर दावीद येशू ख्रिस्त यालाही जाहीररित्या यहोवाची स्तुती करण्यास आनंद वाटे. सभास्थानांत, जेरुसलेम येथील मंदिरात सणांच्या वेळी, आणि आपल्या अनुयायांसोबत असताना येशूने यहोवाची स्तुती केली. (लूक २:४९; ४:१६-१९; १०:२१; योहान १८:२०) आपणही आपल्या सहख्रिस्ती बांधवांसोबत मिळून प्रत्येक प्रसंगी येशूप्रमाणेच यहोवाची स्तुती करू शकतो हा आपल्याकरता किती आनंददायी बहुमान आहे! आणि “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते” तसतसे आपण हे अधिकाधिक उत्साहाने केले पाहिजे.—इब्री लोकांस १०:२४, २५.

१५. (क) दाविदाच्या अनुभवामुळे त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या माणसांवर काय परिणाम झाला? (ख) सभांना आल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

१५ “मी परमेश्‍वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले.” (स्तोत्र ३४:४) हा अनुभव दाविदाकरता महत्त्वाचा होता. म्हणूनच त्याने पुढे असे म्हटले: “ह्‍या पामराने धावा केला आणि परमेश्‍वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविले.” (स्तोत्र ३४:६) सहख्रिस्ती बांधवांसोबत आपण उठतोबसतो तेव्हा यहोवाने आपल्याला कठीण परिस्थितीत टिकून राहण्यास कशाप्रकारे साहाय्य केले याविषयी इतरांनाही प्रोत्साहन मिळू शकेल अशाप्रकारचे अनुभव सांगण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतात. यामुळे आपल्या सहविश्‍वासू बांधवांचा विश्‍वासही बळकट होईल. दाविदाच्या अनुभवांमुळे त्याच्या साथीदारांचा विश्‍वास बळकट झाला. दावीद आपल्या साथीदारांच्या संदर्भात असे म्हणू शकला, “ज्यांनी [यहोवाकडे] पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.” (स्तोत्र ३४:५) राजा शौल याच्यापासून पलायन करतानाही त्यांना लाज वाटण्याचे कारण नव्हते. त्यांना खात्री होती की यहोवा दाविदाच्या पाठीशी आहे आणि यामुळे त्यांच्या मुखांवर प्रकाश होता. त्याचप्रकारे, जे अलीकडेच देवाविषयी अभ्यास करू लागले आहेत तसेच जे बऱ्‍याच काळापासून खरे ख्रिस्ती आहेत ते सर्वजण यहोवाकडून साहाय्याची अपेक्षा करतात. त्यांनी वैयक्‍तिकरित्या यहोवाचे साहाय्य अनुभवले असल्यामुळे त्यांच्या मुखांवर प्रकाश आहे. हा प्रकाश त्यांच्या विश्‍वासू राहण्याचा निर्धार प्रतिबिंबित करतो.

देवदूतांच्या मदतीबद्दल कृतज्ञ असा

१६. यहोवाने आपल्याला साहाय्य पुरवण्याकरता देवदूतांचा कशाप्रकारे उपयोग केला आहे?

१६ “परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.” (स्तोत्र ३४:७) यहोवाने दाविदाचे संरक्षण केले होते. पण हा अनुभव केवळ आपल्यालाच येऊ शकतो असा दाविदाचा दृष्टिकोन नव्हता. दावीद हा यहोवाचा अभिषिक्‍त, इस्राएलचा भावी राजा होता हे खरे आहे; पण त्याला माहीत होते की यहोवा आपल्या सर्व विश्‍वासू उपासकांचे, मग ते कोणीतरी विशेष असोत किंवा अगदी सर्वसाधारण असोत, त्या सर्वांचे संरक्षण करण्याकरता तो त्याच्या देवदूतांचा उपयोग करतो. या आधुनिक काळात खऱ्‍या उपासकांनीही यहोवाकडून संरक्षण अनुभवले आहे. नात्सी जर्मनीत तसेच अंगोला, मलावी, मोझांबीक आणि इतर अनेक देशांत अधिकाऱ्‍यांनी यहोवाच्या साक्षीदारांचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. उलट त्या देशांत यहोवाच्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे व ते आजही सर्व मिळून देवाच्या नावाचा गौरव करत आहेत. का बरे? कारण यहोवा आपल्या देवदूतांच्या माध्यमाने आपल्या लोकांचे संरक्षण व मार्गदर्शन करतो.—इब्री लोकांस १:१४.

१७. देवाचे दूत आपल्याला कशाप्रकारे मदत करतात?

१७ याशिवाय, जे इतरांना अडखळण्याचे कारण बनतात त्यांना यहोवाच्या लोकांमधून काढून टाकले जावे म्हणून यहोवाचे देवदूत आवश्‍यक घटना घडवून आणतात. (मत्तय १३:४१; १८:६, १०) आणि कधीकधी आपल्याला कळतसुद्धा नाही, पण देवदूत आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर करून देवाची सेवा करत राहण्यास आपले साहाय्य करतात; तसेच यहोवासोबतचा आपला नातेसंबंध ज्यामुळे धोक्यात येऊ शकेल अशा गोष्टींपासून ते आपले संरक्षण करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व मानवजातीला “सार्वकालिक सुवार्ता” घोषित करण्याच्या कार्यात ते आपले नेतृत्त्व करतात; विशेषतः अशा ठिकाणी जेथे प्रचार कार्य अतिशय धोकेदायक परिस्थितीत केले जाते. (प्रकटीकरण १४:६) देवदूतांच्या मदतीची प्रचिती देणारे अनुभव यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल आधारित प्रकाशनांत अनेकदा प्रकाशित होतात. * अशाप्रकारच्या असंख्य अनुभवांना निश्‍चितच योगायोग म्हणता येणार नाही.

१८. (क) देवदूतांची मदत मिळावी म्हणून आपण काय केले पाहिजे? (ख) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१८ देवदूतांचे मार्गदर्शन व संरक्षण सतत मिळवण्याकरता आपण विरोध होत असतानाही यहोवाच्या नावाचे गौरव करत राहिले पाहिजे. देवाचा देवदूत केवळ [यहोवाचे] भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो” हे आठवणीत असू द्या. याचा काय अर्थ होतो? देवाचे भय म्हणजे काय आणि आपण हे भय कसे उत्पन्‍न करू शकतो? एक प्रेमळ देव आपण त्याचे भय बाळगावे अशी अपेक्षा का करतो? या प्रश्‍नांची पुढील लेखात चर्चा केली जाईल. (w०७ ३/१)

[तळटीप]

^ परि. 17 पुढील संदर्भ पडताळून पाहावेत: यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी), पृष्ठ ५५०; २००५ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ५३; टेहळणी बुरूज, मार्च १, २०००, पृष्ठे ५-६; जानेवारी १, १९९१, (इंग्रजी) पृष्ठ २७; व फेब्रुवारी १५, १९९१, (इंग्रजी) पृष्ठ २६.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• दाविदाने तरुणपणी कोणकोणत्या परीक्षांना तोंड दिले?

• दाविदाप्रमाणे आपणही सर्वात प्रमुखपणे काय करू इच्छितो?

• ख्रिस्ती सभांविषयी आपला काय दृष्टिकोन आहे?

• यहोवा आपले साहाय्य करण्याकरता कशाप्रकारे त्याच्या देवदूतांचा उपयोग करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

रामा

गथ

सिकलाग

गिबा

नोब

जेरूसलेम

बेथलेहेम

अदुल्लाम

कईला

हेब्रोन

जीफ

होरेश

कर्मेल

मावोन

एनगेदी

क्षारसमुद्र

[चित्राचे श्रेय]

Map: Based on maps copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel

[२५ पानांवरील चित्र]

रानावनात भटकतानाही दाविदाने यहोवाच्या नावाचे गौरव केले