उपयुक्त ठरणारी उत्तरे!
उपयुक्त ठरणारी उत्तरे!
आज उपलब्ध असलेल्या बहुतेक सल्लाविषयक पुस्तकांतील माहिती अशा लोकांना मदत करण्यावर केंद्रित असते, की जे सध्या आपल्या जीवनात अनेक समस्यांशी झुंजत आहेत. पण बायबल या पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. अर्थात, बायबलमधील माहितीही समस्यांना तोंड देत असलेल्या लोकांच्या कामी पडू शकते, पण बायबल याच्या एक पाऊल पुढे जाते. बायबलमधील सल्ला एका व्यक्तीला अशा चुका टाळण्यास मदत करते की ज्यांमुळे तिच्या जीवनात अनावश्यक समस्या निर्माण होतील.
बायबल “भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून [देऊ]” शकते. (नीतिसूत्रे १:४) बायबलमधील सल्ल्याचा तुम्ही अवलंब केल्यास, ‘विवेक तुमचे रक्षण करील, समंजसपणा तुम्हाला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून, . . . तो तुम्हाला दूर ठेवील.’ (नीतिसूत्रे २:११, १२) बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्याने कशाप्रकारे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे रक्षण करता येईल, तुमचे कौटुंबिक जीवन अधिक सुखकर बनवता येईल आणि नोकरी किंवा व्यवसायात कशाप्रकारे यशस्वी होता येईल याची काही उदाहरणे पाहू या.
मद्याचा सांभाळून उपयोग करा
बायबलमध्ये वाजवी प्रमाणात मद्यपान करण्यास बंदी केलेली नाही. प्रेषित पौलाने आपल्यापेक्षा कमी वयाच्या तीमथ्याला सल्ला देताना द्राक्षारसाच्या औषधी गुणांविषयी असे लिहिले होते: “आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या आपल्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस घे.” (१ तीमथ्य ५:२३) बायबलमधील इतर काही उताऱ्यांवरूनही असे दिसून येते की देवाने द्राक्षारसाचा केवळ औषधापुरताच उपयोग करावा असे सुचवले नाही. उलट द्राक्षारसाला “मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा” असे म्हटले आहे. (स्तोत्र १०४:१५) पण “मद्यपानासक्त” असण्याविरुद्ध बायबल इशारा देते. (तीत २:३) ते म्हणते: “मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको; कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो.” (नीतिसूत्रे २३:२०, २१) असा हा वाजवी सल्ला दुर्लक्षित केल्याने काय परिणाम होतो? काही देशांतील आकडेवारीकडे लक्ष द्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन ॲल्कहॉल २००४ यात असे म्हटले आहे: “मद्यपानाशी संबंधित समस्यांमुळे आयर्लंडच्या नागरिकांना वर्षाला जवळजवळ ३ अब्ज यु.एस. डॉलर्सचा भुर्दंड बसतो.” या अवाढव्य खर्चात “औषधोपचारांचा खर्च (३५ कोटी यु.एस. डॉलर्स), रस्त्यांवरील दुर्घटनांमुळे होणारे नुकसान (३८ कोटी यु.एस. डॉलर्स), दारू पिऊन केलेल्या गुन्ह्यांमुळे होणारा खर्च (१२.६ कोटी यु.एस. डॉलर्स), तसेच अतिमद्यपानाशी संबंधित
कारणांमुळे रजा घेतल्याने उत्पादनशीलतेत आलेली घट (१३० कोटी यु.एस. डॉलर्स) समाविष्ट आहे,” असे या वृत्तात म्हटले आहे.मद्याच्या दुरुपयोगामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापेक्षा त्यामुळे होणारे मानवी दुःख जास्त महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियात फक्त १२ महिन्यांच्या कालावधीत ५ लाख लोकांना दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींकडून मारहाण झाली. फ्रान्समध्ये घडणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांपैकी तीस टक्के घटना दारूच्या व्यसनामुळे घडतात. हे सर्व लक्षात घेतल्यावर, मद्यपानाविषयी बायबलमध्ये दिलेला सल्ला तुम्हाला वाजवी वाटत नाही का?
दूषित करणाऱ्या सवयी टाळा
फार पूर्वी जेव्हा धूम्रपान फॅशनेबल समजले जात होते तेव्हाच म्हणजे, १९४२ सालादरम्यान या नियतकालिकाने अर्थात टेहळणी बुरूजने आपल्या वाचकांना याची जाणीव करून दिली होती की तंबाखू वापरल्याने बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन होते आणि त्यामुळे ते टाळले पाहिजे. त्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखात असा तर्कवाद मांडण्यात आला की ज्यांना देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे त्यांनी ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध’ करण्याविषयीच्या बायबलमधील आज्ञेचे पालन केले पाहिजे. (२ करिंथकर ७:१) आज त्याला जवळजवळ ६५ वर्षे झाली आहेत. बायबलमधील हा सल्ला खरोखरच उपयुक्त होता हे आज सिद्ध झालेले नाही का?
जागतिक आरोग्य संघटनेने २००६ साली, तंबाखू हे “जगातील एकूण मृत्यूंना जबाबदार असलेले दुसरे मुख्य कारण” असल्याचे जाहीर केले. दर वर्षी जवळजवळ ५० लाख लोक तंबाखूच्या सवयीमुळे दगावतात. त्याच्या तुलनेत एचआयव्ही/एड्सने वर्षाला जवळजवळ ३० लाख लोकांचा बळी जातो. २० व्या शतकादरम्यान धूम्रपानामुळे अंदाजे दहा कोटी लोक दगावले. जवळजवळ तितकेच लोक त्या सबंध शतकातील एकूण युद्धांत मृत्यूमुखी पडले. तंबाखू टाळणेच सुज्ञतेचे आहे हे आज बहुतेक लोक मान्य करतात.
“जारकर्मापासून पळ काढा”
पण लैंगिक आचरणासंबंधी बायबलमध्ये जे सांगितले आहे ते लोक सहसा तितक्या सहजासहजी मान्य करायला तयार होत नाहीत. बऱ्याच लोकांचा असा ग्रह आहे की बायबलमध्ये लैंगिक इच्छेलाच पापस्वरूप म्हणण्यात आले आहे. पण हे खरे नाही. अर्थात, लैंगिक इच्छेची अभिव्यक्ती कशी व्हावी यासंबंधी बायबलमध्ये सुज्ञ सल्ला अवश्य दिलेला आहे. बायबलनुसार लैंगिक संबंध केवळ एकमेकांशी विवाहित असलेल्या स्त्री व पुरुषातच असावेत. (उत्पत्ति २:२४; मत्तय १९:४-६; इब्री लोकांस १३:४) लैंगिक समागम हा विवाहित जोडीदारांनी एकमेकांबद्दल प्रेम व जवळीक व्यक्त करण्याचा व अनुभवण्याचा एक मार्ग आहे. (१ करिंथकर ७:१-५) या मीलनातून उत्पन्न होणाऱ्या मुलांना एकमेकांवर प्रेम असणाऱ्या दोन पालकांचे वात्सल्य लाभते.—कलस्सैकर ३:१८-२१.
लैंगिक अनैतिकतेविषयी बायबल असे सांगते: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.” (१ करिंथकर ६:१८) यामागचे एक कारण कोणते आहे? याच वचनात पुढे असे म्हटले आहे: “जे कोणतेहि दुसरे पापकर्म मनुष्य करितो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करितो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो.” लैंगिक संबंधाविषयी बायबलमधील सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय परिणाम होतो?
अमेरिकेत आज जे घडत आहे त्याचे उदाहरण घ्या. आजच्या घडीला, गरोदर राहणाऱ्या कुमारींची संख्या औद्योगिकरित्या विकसित देशांपैकी अमेरिकेत सर्वात जास्त आहे—वर्षाला ८,५०,०००. जी बालके गर्भपातापासून बचावतात ती अविवाहित मातांच्या पोटी जन्माला येतात. साहजिकच या कोवळ्या वयाच्या माता आपल्या परीने होईल तितक्या चांगल्याप्रकारे आपल्या मुलांचे प्रेमाने व शिस्तीने संगोपन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांपैकी काही यशस्वी देखील होतात. पण वस्तूस्थिती ही आहे की या कुमारी मातांची मुले मोठी होऊन सहसा तुरुंगात जातात आणि त्यांच्या मुली स्वतः कुमारी माता बनतात. मागच्या अनेक दशकांच्या आकडेवारीची पाहणी केल्यावर संशोधक रॉबर्ट लर्मन यांनी लिहिले: “एक-पालक कुटुंबांच्या वाढत्या प्रमाणामुळेच कदाचित इतरही अनेक सामाजिक समस्यांना उधाण आले असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, शालेय शिक्षण मध्यातूनच सोडून देणे, मद्य व मादक पदार्थांचे व्यसन, किशोरवयीन मुलींचे गर्भारपण व मातृत्त्व तसेच बालगुन्हेगारी यांचे वाढते प्रमाण.”
लैंगिक दुराचरण करणाऱ्यांना शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या कितीतरी आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, पेडियाट्रिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार: “उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते की लहान वयातच लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात केलेल्या मुलांमुलींमध्ये डिप्रेशन व आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.” इतर आरोग्य समस्यांविषयी अमेरिकन सोशियल हेल्थ असोसिएशनने असे विधान केले: “[संयुक्त संस्थानांतील] निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आयुष्यात कधी तरी एसटीडी [लैंगिकरित्या संक्रमित रोग] होईल.” लैंगिक आचरणासंबंधी बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्यास किती मनःस्ताप आणि दुःख टाळता येण्यासारखे आहे याचा विचार करा!
कौटुंबिक बंध मजबूत करा
बायबल केवळ अपायकारक सवयींबद्दल इशारा देत नाही. कौटुंबिक जीवन अधिक सुखकर बनवण्यासंबंधी त्यात दिलेला व्यवहारोपयोगी सल्ला विचारात घ्या.
देवाचे वचन म्हणते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी.” (इफिसकर ५:२८) आपल्या पत्नीला क्षुल्लक लेखण्याऐवजी पतींना “त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून [त्यांच्याबरोबर] सुज्ञतेने सहवास ठेवा” असा आग्रह केला आहे. (१ पेत्र ३:७) वैवाहिक जीवनात उत्पन्न होणाऱ्या मतभेदांसंबंधी पतींना असा सल्ला देण्यात आला आहे: “आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” (कलस्सैकर ३:१९) जो पती या सल्ल्याचे पालन करतो तो आपोआपच आपल्या पत्नीचे प्रेम व आदर मिळवेल असे तुम्हाला वाटत नाही का?
पत्नींना बायबल हा आदेश देते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे. . . . पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:२२, २३, ३३) आपल्या पतीशी बोलताना किंवा त्याच्याविषयी इतरांशी बोलताना जी पत्नी या सल्ल्याचे पालन करते तिचा पती तिच्यावर मनापासून प्रेम करेल असे तुम्हाला नाही का वाटत?
मुलांना वळण लावण्यासंबंधी बायबल पालकांना असा सल्ला देते की त्यांनी “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता” आपल्या मुलांशी सुसंवाद साधावा. (अनुवाद ६:७) विशेषतः वडिलांना हे मार्गदर्शन दिले आहे की त्यांनी आपल्या मुलांना नैतिक शिक्षण द्यावे व प्रेमाने त्यांना शिस्त लावावी. देवाचे वचन म्हणते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) तर मुलांना असे सांगण्यात आले आहे: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा. . . . आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.” *—इफिसकर ६:१, २.
या सल्ल्याचे पालन केल्यास कुटुंबाना फायदा होईल असे तुम्हाला वाटते का? तुम्ही कदाचित म्हणाल, ‘हो, पण हे सर्व पुस्तकातच छान वाटतं, प्रत्यक्षात त्याचा खरच उपयोग होतो का?’ आम्ही तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या स्थानिक राज्य सभागृहाला भेट देण्याचे निमंत्रण देतो. तेथे तुम्हाला अशी कुटुंबे भेटतील की जी बायबलमधील सुज्ञ सल्ल्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी भेटा, बोला, ते एकमेकांशी कसे वागतात याचे निरीक्षण करा. बायबलमधील तत्त्वे खरोखरच कौटुंबिक जीवन अधिक सुखकर
बनवण्यास हातभार लावतात हे तुम्हाला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळेल!मेहनती कामगार आणि इमानदार मालक
नोकरी-व्यवसायातील दैनंदिन संघर्षाविषयी बायबलमध्ये कोणते मार्गदर्शन सापडते? बायबल असे सांगते की जो कामगार आपले काम निपुणतेने करतो त्याची कदर केली जाईल आणि त्याला त्याचे चांगले प्रतिफळ मिळते. बुद्धिमान राजा शलमोन याने असे लिहिले: “जो आपल्या धंद्यात निपुण आहे अशा मनुष्याला तू पाहिले काय? तो राजांसमोर उभा राहील.” (नीतिसूत्रे २२:२९, पं.र.भा.) दुसरीकडे पाहता, “जसा धूर डोळ्यांस” त्रासदायक असतो तसाच “सुस्त मनुष्य” आपल्या मालकासाठी त्रासदायक ठरतो. (नीतिसूत्रे १०:२६) बायबल कामकऱ्यांना प्रामाणिक व मेहनती असण्याचे प्रोत्साहन देते. “चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करु नये, तर त्यापेक्षा . . . जे चांगले ते आपल्या हातांनी करुन उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) मालक समोर नसतो तेव्हा देखील हा सल्ला लागू होतो. “सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्याच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीति बाळगून पाळा.” (कलस्सैकर ३:२२) जर तुम्ही मालक असाल, तर या सल्ल्याचे पालन करणारा कर्मचारी तुम्हाला हवाहवासा वाटणार नाही का?
मालकांना बायबल ही आठवण करून देते: “कामकऱ्याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.” (१ तीमथ्य ५:१८) इस्राएल लोकांना देवाने दिलेल्या नियमशास्त्रात मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी, वाजवी वेतन देण्याची आज्ञा दिली होती. मोशेने असे लिहिले: “आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको.” (लेवीय १९:१३) जो मालक बायबलच्या या आदेशाचे पालन करून तुम्हाला योग्य वेळी इमानदारीने वेतन देतो त्याच्याकरता काम करण्यास तुम्हाला आनंद वाटणार नाही का?
बुद्धीचा श्रेष्ठ उगम
बायबलसारख्या प्राचीन ग्रंथात आजच्या काळाकरता समर्पक असणारे मार्गदर्शन सापडते याचे तुम्हाला आश्चर्य वाटते का? इतर बरेच ग्रंथ कालबाह्य झाले आहेत तरी, बायबल अद्याप टिकून राहिले आहे त्याचे कारण हे आहे की त्यात मनुष्यांचे विचार नाहीत, तर ते “देवाचे वचन” आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३.
देवाच्या वचनाशी आणखी परिचित होण्याचा प्रयत्न करण्याचे आम्ही तुम्हाला उत्तेजन देत आहोत. कारण असे केल्यास बायबलचा लेखक, यहोवा देव याच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता वाटू लागेल. त्याने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा आणि ते कशाप्रकारे तुमचे रक्षण करते व तुमच्या जीवनात आणखी आनंद आणते याची प्रचिती घ्या. असे केल्याने तुम्ही ‘देवाजवळ याल’ आणि “तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) इतर कोणतेही पुस्तक तुम्हाला अशारितीने साहाय्य करू शकणार नाही. (w०७ ४/१)
[तळटीप]
^ परि. 20 तुमच्या कुटुंबाला फायदेकारक ठरू शकतील अशा बायबल तत्त्वांवरील सविस्तर चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक पाहावे.
[४ पानांवरील चित्र]
मद्यपानासंबंधी बायबलचा दृष्टिकोन तुम्हाला वाजवी वाटतो का?
[५ पानांवरील चित्र]
तंबाखूचा वापर टाळण्याविषयीचा बायबलमधील सल्ला तुम्हाला पटतो का?
[७ पानांवरील चित्रे]
बायबलमधील मार्गदर्शनाचे पालन केल्याने कौटुंबिक जीवन अधिक सुखकर होते
[५ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृथ्वीचा गोल: Based on NASA photo