व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्त आणि त्याच्या विश्‍वासू दासाशी एकनिष्ठ राहा

ख्रिस्त आणि त्याच्या विश्‍वासू दासाशी एकनिष्ठ राहा

ख्रिस्त आणि त्याच्या विश्‍वासू दासाशी एकनिष्ठ राहा

‘धनी . . . त्याला आपल्या सर्वस्वावर नेमील.’—मत्तय २४:४५-४७.

१, २. (क) आपला पुढारी कोण आहे असे शास्त्रवचने सूचित करतात? (ख) येशू ख्रिस्त, ख्रिस्ती मंडळीचे सक्रियपणे नेतृत्त्व करीत आहे हे कशावरून दिसते?

“आपणास पुढारी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे.” (मत्तय २३:१०, पं.र.भा.) या शब्दांवरून येशूने आपल्या अनुयायांना हे स्पष्टपणे सांगितले, की पृथ्वीवरील कोणीही मनुष्य त्यांचा पुढारी होऊ शकत नाही. त्यांचा एकच स्वर्गीय पुढारी—स्वतः येशू ख्रिस्त असणार आहे. देवाने येशूला पुढारी होण्यास नियुक्‍त केले आहे. यहोवाने “त्याला मेलेल्यातून उठविले, आणि . . . त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले; हीच त्याचे शरीर.”—इफिसकर १:२०-२३.

येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत “सर्वांवर मस्तक” असल्यामुळे मंडळीत जे काही घडते त्यावर त्याचा अधिकार आहे. मंडळीत घडणारी एकही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटत नाही. ख्रिश्‍चनांचा प्रत्येक गट किंवा मंडळी ख्रिस्ती तत्त्वांनुसार जगत आहे किंवा नाही, देवाबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यास तो उत्सुक आहे. सा.यु. पहिल्या शतकाच्या शेवटी प्रेषित योहानाला झालेल्या प्रकटीकरणात आपल्याला हे स्पष्टपणे दिसते. सात मंडळ्यांना येशूने पाच वेळा असे म्हटले, की त्याला त्यांची कृत्ये, त्यांचे बलस्थान आणि त्यांच्या कमतरता ठाऊक होत्या व त्यानुसार त्याने त्यांना सल्ला व उत्तेजन दिले. (प्रकटीकरण २:२, ९, १३, १९; ३:१, ८, १५) या सात मंडळ्यांव्यतिरिक्‍त ख्रिस्ताला निश्‍चितच, आशिया मायनर, पॅलेस्टाईन, सिरिया, बॅबिलोनिया, ग्रीस, इटली व इतरत्र असलेल्या मंडळ्यांच्या आध्यात्मिक स्थितींविषयी देखील माहीत असेल. (प्रेषितांची कृत्ये १:८) आजही त्याला माहीत आहे का?

विश्‍वासू दास

३. ख्रिस्ताची तुलना मस्तकाशी आणि त्याच्या मंडळीची तुलना शरीराशी करणे उचित का आहे?

येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर व तो आपल्या पित्याजवळ स्वर्गात जाण्याच्या काही काळाआधी त्याने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” त्याने असेही म्हटले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१८-२०) तो त्यांचा पुढारी असणार होता आणि सक्रियपणे त्यांचे नेतृत्त्व करणार होता. इफिसस व कलोसेमधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौल ख्रिस्ती मंडळीची तुलना एका ‘शरीराशी’ करतो ज्याचे मस्तक ख्रिस्त आहे. (इफिसकर १:२२, २३; कलस्सैकर १:१८) शरीराची तुलना मंडळीशी करणाऱ्‍या या रुपकावरून “केवळ, मस्तकाशी एकरुप होणे महत्त्वाचे आहे इतकेच सूचित होत नाही तर, मस्तक सदस्यांना मार्गदर्शन करतो, हेही सूचित होते. मंडळीतील सदस्य त्याचे साधन आहेत,” असे कॅम्ब्रीज बायबल फॉर स्कूल्स ॲण्ड कॉलेजेस या पुस्तकात म्हटले आहे. सन १९१४ मध्ये ख्रिस्त येशूला राज्य अधिकार देण्यात आल्यापासून तो कोणत्या समूहाचा, आपले साधन म्हणून उपयोग करत आहे?—दानीएल ७:१३, १४.

४. मलाखीच्या भविष्यवाणीत भाकीत केल्याप्रमाणे यहोवा आणि येशू आध्यात्मिक मंदिराची पाहणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांना काय दिसून आले?

‘[खरा] प्रभू’ यहोवा, ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याबरोबर’ अर्थात नव्याने सिंहासनावर विराजमान झालेला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर ‘मंदिराचा’ अर्थात लाक्षणिक आध्यात्मिक उपासना गृहाचा न्याय व पाहणी करण्याकरता येईल, असे मलाखीच्या भविष्यवाणीत म्हटले आहे. ‘देवाच्या घराच्या न्यायनिवाड्याची’ नियुक्‍त “वेळ” १९१८ मध्ये सुरु झाली. * (मलाखी ३:१; १ पेत्र ४:१७) पृथ्वीवर देव आणि त्याच्या खऱ्‍या उपासनेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍यांना देखील पारखण्यात आले. अनेक शतकांपासून देवाचा अवमान करणाऱ्‍या शिकवणी देणाऱ्‍या व पहिल्या महायुद्धातील निर्घृण हत्येत सामील असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसना नाकारण्यात आले. आत्म्याने अभिषिक्‍त केलेल्या विश्‍वासू शेष ख्रिश्‍चनांची जणू काय अग्नीपरीक्षा घेण्यात आली ज्यात ते यहोवाच्या पसंतीस उतरले आणि ‘धर्माने बलि अर्पण करणारे’ झाले.—मलाखी ३:३.

५. येशूने त्याच्या ‘उपस्थितीविषयी’ जी भविष्यवाणी केली त्यानुसार विश्‍वासू “दास” कोण ठरला?

मलाखीच्या भविष्यवाणीनुसार, येशूने आपल्या शिष्यांना ‘आपल्या येण्याचा व ह्‍या युगाच्या समाप्तीचा’ काळ ओळखण्याकरता दिलेल्या बहुव्यापक चिन्हात, एका सामूहिक ‘दासाला’ ओळखण्याचे चिन्ह देखील होते. येशूने म्हटले: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:३, ४५-४७) सन १९१८ मध्ये ‘दासाची’ तपासणी करण्याकरता ख्रिस्त ‘आला’ तेव्हा त्याला आत्म्याने अभिषिक्‍त असलेला विश्‍वासू शिष्यांचा एक शेष वर्ग आढळून आला जो १८७९ पासून या नियतकालिकाद्वारे आणि इतर बायबल आधारित प्रकाशनांद्वारे “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवत होता. या वर्गाला त्याने आपले सामूहिक साधन अर्थात “दास” म्हणून स्वीकारले आणि १९१९ मध्ये त्यांच्यावर पृथ्वीवरील आपल्या सर्वस्वाची व्यवस्था पाहण्याची कामगिरी सोपवली.

ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील सर्वस्वाची व्यवस्था पाहणे

६, ७. (क) आपल्या विश्‍वासू ‘दासाविषयी’ बोलताना येशूने आणखी कोणत्या शब्दांचा उपयोग केला? (ख) “कारभारी” या येशूने वापरलेल्या शब्दावरून काय सूचित होते?

आपल्या उपस्थितीच्या चिन्हाची भविष्यवाणी देण्याच्या आणि पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या ‘दासाविषयी’ सांगण्याच्या काही महिन्यांआधी येशूने या ‘दासाविषयी’ बोलताना एक वेगळा शब्द वापरला जो दासाच्या जबाबदारीचे वर्णन करतो. येशूने म्हटले: “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्‍वासू व विचारशील कारभारी कोण? मी तुम्हांस खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.”—लूक १२:४२, ४४.

येथे दासाला कारभारी म्हटले आहे. हे ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे ज्याचा अर्थ “घराची अथवा जमीनजुमल्याची व्यवस्था पाहणारा गुमास्ता” असा होतो. हा सामूहिक कारभारी वर्ग, केवळ बायबलमधून लक्षवेधक मुद्द्‌यांचे स्पष्टीकरण देणारा विद्वानांचा वर्ग असू शकत नाही. आणि, पोषक आध्यात्मिक अन्‍न “योग्य वेळी” देण्याव्यतिरिक्‍त ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याला’ ख्रिस्ताच्या सर्व सेवकांवर नेमण्यात येणार होते आणि पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या “सर्वस्वावर” अर्थात ख्रिस्ताच्या मंडळ्यांची आणि त्यांच्या कार्यांची व्यवस्था पाहण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात येणार होते. यामध्ये काय काय गोवलेले असणार होते?

८, ९. दास वर्गाला कोणत्या “सर्वस्वावर” देखरेख करण्यास नेमण्यात आले आहे?

दासाच्या जबाबदारीत, ख्रिस्ताचे अनुयायी आपली ख्रिस्ती कार्ये पूर्ण करण्याकरता वापरत असलेल्या भौतिक गोष्टींवर देखरेख करणे समाविष्ट आहे. या भौतिक गोष्टी म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांची मुख्यालये आणि शाखा दफ्तरे तसेच संपूर्ण जगभरातील त्यांची उपासना स्थळे—राज्य सभागृहे आणि संमेलन गृहे—यांच्यावर देखरेख करणे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, हा दासवर्ग, आध्यात्मिक उभारणीकारक कार्यक्रमांवर देखील देखरेख करतो; जसे की, दर आठवडी होणाऱ्‍या सभांमध्ये व ठराविक काळाने होणाऱ्‍या संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये बायबल अभ्यास कार्यक्रमांवर देखील देखरेख करतो. या सभांमध्ये बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेची माहिती दिली जाते व दैनंदिन जीवनात बायबल तत्त्वांचे पालन कसे करायचे याविषयी व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाते.

कारभाऱ्‍याला, सर्वात महत्त्वाचे काम अर्थात ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार व ‘शिष्य बनवण्याच्या’ कार्यावर देखील देखरेख करायची आहे. शिष्य बनवण्याच्या कार्यात, मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताने या अंतसमयात जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ती पूर्ण करण्यास लोकांना शिकवणे समाविष्ट आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रकटीकरण १२:१७) प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यामुळे अभिषिक्‍त शेष जनांचे ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ अनेक एकनिष्ठ सोबती तयार झाले आहेत. “सर्व राष्ट्रांतील [या] निवडक वस्तू” ख्रिस्ताच्या अमूल्य ‘सर्वस्वात’ गणल्या जातात ज्यांच्यावर विश्‍वासू दास देखरेख करतो.—प्रकटीकरण ७:९; हाग्गय २:७.

दास वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे नियमन मंडळ

१०. पहिल्या शतकात, कोणत्या वर्गाला निर्णय घेण्यास नेमण्यात आले होते व याचा मंडळ्यांवर काय परीणाम झाला?

१० विश्‍वासू दासावर भारी जबाबदारी आहे याचा अर्थ त्यांना अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागतात. आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत, जेरुसलेममधील प्रेषितांनी व वडिलांनी दास वर्गाचे प्रतिनिधीत्व केले; संपूर्ण ख्रिस्ती मंडळीच्या वतीने ते महत्त्वाचे निर्णय घेत असत. (प्रेषितांची कृत्ये १५:१, २) पहिल्या शतकातील नियमन मंडळाने घेतलेले निर्णय, पत्रांद्वारे व प्रवासी प्रतिनिधींद्वारे मंडळ्यांपर्यंत पोहंचवले जात असत. हे स्पष्ट मार्गदर्शन मिळाल्यावर आरंभीच्या ख्रिश्‍चनांना आनंद होई. नियमन मंडळाला ते आनंदाने सहकार्य देत असल्यामुळे शांती व ऐक्य नांदत असे.—प्रेषितांची कृत्ये १५:२२-३१; १६:४, ५; फिलिप्पैकर २:२.

११. आपल्या मंडळीचे मार्गदर्शन करण्यासाठी ख्रिस्त आज कोणाचा उपयोग करत आहे आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या गटाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?

११ आरंभीच्या ख्रिस्ती काळांप्रमाणे आज पृथ्वीवर आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलेल्या सदस्यांचा एक लहान गट आहे जो ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये नियमन मंडळ यानात्याने कार्य करतो. मंडळीचा मस्तक ख्रिस्त आपल्या ‘उजव्या हाताच्या’ उपयोजित शक्‍तीद्वारे, हे विश्‍वासू पुरुष राज्य कार्यावर देखरेख करत असताना त्यांना मार्गदर्शन देतो. (प्रकटीकरण १:१६, २०) बंधू अल्बर्ट श्रोडर अनेक वर्षांपासून नियमन मंडळाचे सदस्य होते. अलिकडेच त्यांनी त्यांची पृथ्वीवरील सेवा समाप्त केली. त्यांच्या जीवनकथेत त्यांनी असे लिहिले: “दर बुधवारी नियमन मंडळाची सभा होत असते. सभेआधी ते यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात. या सभेत हाताळली जाणारी प्रत्येक बाब आणि प्रत्येक निर्णय देवाचे वचन बायबल याच्या सुसंगतेत आहे, याची खात्री करण्यासाठी मंडळातील प्रत्येक सदस्य बराच प्रयत्न करतो.” * अशा विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर आपण संपूर्ण भरवसा ठेवू शकतो. नियमन मंडळाच्या बाबतीत खासकरून आपण प्रेषित पौलाने दिलेल्या आज्ञेचे पालन केले पाहिजे: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण . . . ते तुमच्या जिवांची राखण करितात.”—इब्री लोकांस १३:१७.

विश्‍वासू दासाबद्दल उचित आदर दाखवणे

१२, १३. दास वर्गाचा आदर करण्याकरता आपल्याजवळ कोणकोणती शास्त्रआधारित कारणे आहेत?

१२ विश्‍वासू दास वर्गाचा आदर करण्याचे एक मुख्य कारण हे आहे, की असे करण्याद्वारे आपण आपला धनी, येशू ख्रिस्त याचा आदर करतो. अभिषिक्‍त जनांविषयी पौलाने असे लिहिले: “मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा.” (१ करिंथकर ७:२२, २३; इफिसकर ६:६) यास्तव, आपण जेव्हा विश्‍वासू दासाच्या व त्याच्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाला एकनिष्ठपणे अधीन होतो तेव्हा आपण दासाचा धनी ख्रिस्त याच्या अधीन होतो. पृथ्वीवरील आपल्या सर्वस्वाची व्यवस्था पाहण्याकरता ख्रिस्त ज्या साधनाचा उपयोग करत आहे त्याला योग्य आदर दाखवणे हा, “देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल” करण्याचा एक मार्ग आहे.—फिलिप्पैकर २:११.

१३ विश्‍वासू दासाचा आदर करण्याचे आणखी एक शास्त्रवचनीय कारण हे आहे, की पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लाक्षणिकरीत्या बायबलमध्ये “मंदिर” म्हटले आहे ज्यात देवाचा आत्मा “वास” करतो. त्यामुळे ते “पवित्र” बनतात. (१ करिंथकर ३:१६, १७; इफिसकर २:१९-२२) येशूने या पवित्र मंदिर वर्गाच्या हवाली पृथ्वीवरील आपले सर्वस्व केले आहे. याचा अर्थ ख्रिस्ती मंडळीविषयक विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्‍या या सामूहिक दासाजवळ आहेत. म्हणूनच मंडळीतील सर्व जण, विश्‍वासू दास आणि त्याचे नियमन मंडळ यांच्याकडून येणारे मार्गदर्शन अनुसरणे व त्याला सहकार्य देणे आपली पवित्र जबाबदारी समजतात. होय, दास वर्गाला धन्याच्या संपत्तीची काळजी घेण्याची जबाबदारी आहे आणि ‘दुसरी मेंढरे’ या दास वर्गाला सहकार्य देणे एक विशेषाधिकार समजतात.—योहान १०:१६.

एकनिष्ठपणे सहकार्य देणे

१४. यशयाने भाकीत केल्याप्रमाणे दुसरी मेंढरे कशाप्रकारे अभिषिक्‍त दास वर्गाच्या मागे चालतात आणि ‘बिनपगारी मजूरांप्रमाणे’ सेवा करतात?

१४ दुसरी मेंढरे, आध्यात्मिक इस्राएलच्या अभिषिक्‍त सदस्यांच्या नम्रपणे अधीन राहतील याविषयी यशयाच्या भविष्यवाणीत भाकीत करण्यात आले होते. त्याविषयी असे म्हणण्यात आले होते: “परमेश्‍वर असे म्हणतो, ‘मिसराचे [“बिनपगारी मजूर,” NW], कुशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक ही तुजजवळ येऊन तुझी होतील; ते तुझ्यामागून येतील. बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालितील. ते तुला विनंति करून म्हणतील की “खरोखर तुजजवळ देव आहे, त्याजशिवाय अन्य देव नाही, दुसरा देवच नाही.”’” (यशया ४५:१४) लाक्षणिक अर्थाने आज दुसरी मेंढरे अभिषिक्‍त दास वर्ग आणि त्याच्या नियमन मंडळाच्या मागे चालतात आणि त्यांच्याकडून येणाऱ्‍या मार्गदर्शनाचा स्वीकार करतात. ‘बिनपगारी मजूरांप्रमाणे’ इतर मेंढरे स्वेच्छेने आपली शक्‍ती आणि आपली संपत्ती, ख्रिस्ताने या पृथ्वीवर आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना सोपवलेल्या जगव्याप्त प्रचार कार्यासाठी खर्च करतात.—प्रेषितांची कृत्ये १:८; प्रकटीकरण १२:१७.

१५. यशया ६१:५, ६ मधील भविष्यवाणी, दुसरी मेंढरे आणि आध्यात्मिक इस्राएल यांच्यामध्ये असलेल्या नातेसंबंधाचे भाकीत कसे करते?

१५ दास वर्ग आणि त्याच्या नियमन मंडळाच्या देखरेखीखाली यहोवाची सेवा करण्यास दुसऱ्‍या मेंढरांना आनंद वाटतो शिवाय ते कृतज्ञही आहेत. अभिषिक्‍त जण ‘देवाच्या इस्राएलचे’ सदस्य आहेत, याची त्यांना जाणीव आहे. (गलतीकर ६:१६) आध्यात्मिक इस्राएलशी संलग्न असलेले लाक्षणिक “परके” आणि “परदेशी” यानात्याने त्यांना, “परमेश्‍वराचे याजक” आणि “देवाचे सेवक” असलेल्या अभिषिक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली “नांगऱ्‍ये” व “द्राक्षाचे मळे लावणारे” म्हणून सेवा करण्यास आनंद वाटतो. (यशया ६१:५, ६) ते राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेतात. मेंढपाळकत्वाच्या कार्यात आणि नव्याने आढळलेल्या मेंढरासमान लोकांची काळजी घेण्यात ते दास वर्गाला पूर्ण मनाने सहकार्य देतात.

१६. कोणती गोष्ट दुसऱ्‍या मेंढरांना, विश्‍वासू व बुद्धिमान दासाला सहकार्य देण्यास प्रवृत्त करते?

१६ विश्‍वासू दास उचित वेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवत असल्यामुळे आपले खूप भले झाले आहे, हे दुसऱ्‍या मेंढरांनी ओळखले आहे. ते अगदी नम्रपणे हे कबूल करतात, की विश्‍वासू व बुद्धिमान दास नसते तर त्यांना, बायबलमधील मौल्यवान सत्ये जसे की, यहोवाचे सार्वभौमत्व, त्याच्या नावाचे पवित्रिकरण, त्याचे राज्य, नवे आकाश आणि नवी पृथ्वी, जीव, मृतांची स्थिती, यहोवा देव, त्याचा पुत्र आणि पवित्र आत्मा यांसारख्या गोष्टींची खरी ओळख त्यांना फार कमी किंवा कदाचित झालीच नसती. निव्वळ कृतज्ञतेपोटी व निष्ठेपोटी दुसरी मेंढरे या अंतसमयादरम्यान पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त ‘बांधवांना’ प्रेमळ सहकार्य देतात.—मत्तय २५:४०.

१७. नियमन मंडळाने काय करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील लेखात आपण कोणता विषय सविस्तर पाहणार आहोत?

१७ अभिषिक्‍त जणांची संख्या घटत चालल्यामुळे, ख्रिस्ताच्या सर्वस्वाची व्यवस्था ठीकठाक चालली आहे की नाही हे पाहण्यासाठी अभिषिक्‍त जण सर्व मंडळ्यांमध्ये हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे, नियमन मंडळ दुसऱ्‍या मेंढरांतील पुरुषांना, यहोवाच्या साक्षीदारांची शाखा दफ्तरे, प्रांत व विभाग आणि मंडळ्या यांच्यावर देखरेख करण्यास नियुक्‍त करते. या सहमेंढपाळांबद्दल आपण जी मनोवृत्ती बाळगतो तिचा, ख्रिस्त आणि त्याच्या विश्‍वासू दास यांच्याबरोबर असलेल्या आपल्या निष्ठेवर काही परिणाम होतो का? याबद्दल आपण पुढील लेखात सविस्तर पाहणार आहोत. (w०७ ४/१)

[तळटीप]

^ परि. 4 या विषयावर आणखी माहितीकरता, टेहळणी बुरूज मार्च १, २००४, पृष्ठे १३-१८ आणि डिसेंबर १, १९९२, पृष्ठ १३ पाहा.

^ परि. 11 ही जीवनकथा या नियतकालिकाच्या मार्च १, १९८८, पृष्ठे १०-१७ अंकात प्रकाशित झाली होती.

उजळणी

• आपला पुढारी कोण आहे, व मंडळ्यांत काय काय चालले आहे याची त्याला जाणीव आहे हे कशावरून दिसते?

• ‘मंदिराच्या’ पाहणीच्या वेळी विश्‍वासू दासाचे काम कोण करत असल्याचे आढळून आले, व त्यांना सोपवण्यात आलेले सर्वस्व काय आहे?

• विश्‍वासू दासाला एकनिष्ठपणे सहकार्य देण्याकरता आपल्याजवळ कोणकोणती शास्त्र आधारित कारणे आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

“कारभारी” ज्यांची व्यवस्था पाहतो त्या ‘सर्वस्वात,’ आर्थिक संपत्ती, आध्यात्मिक कार्यक्रम आणि प्रचार कार्य समाविष्ट आहे

[२५ पानांवरील चित्र]

दुसऱ्‍या मेंढरांचे सदस्य आवेशाने प्रचार कार्य करून विश्‍वासू दास वर्गाला सहकार्य देतात