व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे

यिर्मयाने स्वतःच्याच लोकांवर संकट येणार असल्याचे घोषित केले तेव्हा त्यांना हे ऐकून किती धक्का बसला असेल! जे भव्य मंदिर तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून उपासनेचे मुख्य केंद्र होते ते बेचिराख होईल. जेरुसलेमचे शहर आणि यहुदाचा प्रदेश ओसाड होईल आणि त्यातील रहिवाशांना बंदिवान बनवले जाईल. या व न्यायदंडांच्या इतर घोषणा आपल्याला बायबलमधील सर्वात मोठ्या पुस्तकांपैकी दुसऱ्‍या क्रमांकावर असलेल्या यिर्मया या पुस्तकात वाचायला मिळतात. यात यिर्मयाला ६७ वर्षे संदेष्टा या नात्याने सेवा करत असताना जे अनुभव आलेत त्यांविषयीचीही माहिती आढळते. या पुस्तकातील माहिती कालक्रमाने मांडलेली नसून विषयांनुसार तिची मांडणी केली आहे.

यिर्मयाच्या पुस्तकातील माहिती आपण का जाणून घ्यावी? यातील पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांविषयी वाचल्यावर यहोवा हा आपल्या प्रतिज्ञा पूर्णत्वास नेणारा देव आहे ही आपली खात्री आणखी वाढते. (यशया ५५:१०, ११) संदेष्टा या नात्याने यिर्मयाचे कार्य आणि त्याच्या संदेशाप्रती लोकांची प्रतिक्रिया आजच्या काळाशी, आपल्या परिस्थितीशी जुळते. (१ करिंथकर १०:११) शिवाय, यहोवाने आपल्या लोकांशी कशारितीने व्यवहार केला याविषयीचे वृतान्त त्याच्या गुणांवर प्रकाश टाकतात आणि हे वृतान्त वाचल्यावर निश्‍चितच आपल्या मनावर त्याचा गहिरा प्रभाव पडण्यास हवा.—इब्री लोकांस ४:१२.

“माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले”

(यिर्मया १:१–२०:१८)

सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेमचा विनाश होण्याच्या ४० वर्षांआधी, म्हणजे यहूदाचा राजा योशीया याच्या कारकीर्दीच्या १३ व्या वर्षी यहोवाने यिर्मयास आपले संदेश घोषित करण्याची आज्ञा दिली. (यिर्मया १:१, २) यिर्मयाने मुख्यतः योशीयाच्या कारकीर्दीच्या उरलेल्या १८ वर्षांदरम्यान संदेश घोषित केले व या संदेशांनी यहूदाची दुष्कर्मे उजेडात आणून या राष्ट्राविरुद्ध यहोवाचे न्यायदंड घोषित केले. यहोवाने घोषित केले: “यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.” (यिर्मया ९:११) का? “कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले,” असे तो म्हणतो.—यिर्मया २:१३.

यिर्मयाने आपल्या संदेशात पश्‍चात्तापी शेषजनांच्या पुनर्स्थापनेविषयीही भाकीत केले. (यिर्मया ३:१४-१८; १२:१४, १५; १६:१४-२१) पण लोकांनी त्याचे ऐकून घेतले नाही. ‘परमेश्‍वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपतीने’ यिर्मयाला फटके मारून रात्रभर त्याला खोडांत अडकवून ठेवले.—यिर्मया २०:१-३.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१०, ११—अविश्‍वासू इस्राएल लोकांची कृत्ये इतकी असाधारण का होती? पश्‍चिमेकडील कित्तीम प्रदेशातील व पूर्वेकडील केदार येथील मूर्तीपूजक राष्ट्रांनी आपल्या देवांमध्ये विदेशी देवतांची भर घालणे ही एक साधारण गोष्ट होती. पण आपल्या देवांना पूर्णपणे सोडून विदेशी देवांची उपासना करू लागण्याची कल्पना अगदीच नवीन होती, कोणीही पूर्वी याविषयी ऐकले नव्हते. पण इस्राएल लोकांनी मात्र हेच केले. त्यांनी यहोवाला सोडून दिले आणि आपल्या जिवंत देवाचे गौरव त्यांनी निर्जीव मूर्तींना दिले.

३:११-२२; ११:१०-१२, १७—शोमरोनाचा सा.यु.पू. ७४० सालीच नाश झाला होता, मग यिर्मयाने न्यायदंडांच्या घोषणेत उत्तरेच्या या दहा गोत्रांच्या राज्याचा समावेश का केला? कारण सा.यु.पू. ६०७ साली झालेला नाश केवळ यहूदावर नव्हे तर इस्राएलच्या सबंध राष्ट्रावर यहोवाने आणलेल्या न्यायदंडाची अभिव्यक्‍ती होती. (यहेज्केल ९:९, १०) शिवाय, दहा गोत्रांच्या राज्याचा नाश झाल्यानंतर जेरूसलेम त्याचे प्रतिनिधीत्व करू लागले कारण देवाच्या संदेष्ट्यांनी आपल्या संदेशांत त्यांचा समावेश करण्याचे थांबवले नाही.

४:३, ४—या आज्ञेचा काय अर्थ होतो? देवाने अविश्‍वासू यहुद्यांना आपल्या अंतःकरणाची जमीन बी पेरण्याकरता तयार करण्यास, त्यावरील काटेरी झुडपे उपटून फेकण्यास सांगितले. त्यांना आपल्या अंतःकरणाची सुंता करण्यास, अर्थात आपल्या अंतःकरणातील अशुद्ध विचार, भावना व हेतू काढून टाकण्यास सांगण्यात आले. (यिर्मया ९:२५, २६; प्रेषितांची कृत्ये ७:५१) याकरता त्यांना आपली जीवनशैलीच बदलावी लागणार होती. वाईट गोष्टी करण्याचे थांबवून, ज्यांमुळे देवाची संमती मिळेल अशी कार्ये त्यांना करावी लागणार होती.

४:१०; १५:१८—यहोवाने आपल्या बंडखोर लोकांना फसविले ते कोणत्या अर्थाने? यिर्मयाच्या काळात, “खोटे संदेश” देणारे संदेष्टे होते. (यिर्मया ५:३१; २०:६; २३:१६, १७, २५-२८, ३२) यहोवाने या खोट्या संदेष्ट्यांना लोकांची भुलवणूक करणारे संदेश सांगण्यापासून रोखले नाही.

१६:१६—मी “पुष्कळ पाग टाकणाऱ्‍यांस” व “पुष्कळ शिकाऱ्‍यांस” बोलावीन असे यहोवाने का म्हटले? अविश्‍वासू यहुद्यांवर आपला न्यायदंड बजावण्याकरता यहोवा त्यांना हुडकून काढण्याकरता शत्रूसैन्यांचा उपयोग करील असा या वाक्यांशांचा अर्थ असावा. पण यिर्मया १६:१५ यात जे सांगितले आहे त्यानुसार, हे शब्द पश्‍चात्तापी इस्राएल लोकांना शोधून काढण्याच्या संदर्भातही असू शकतात.

२०:७—यहोवा कशाप्रकारे यिर्मयावर “प्रबळ” ठरला आणि कोणत्या अर्थाने त्याने यिर्मयाला फसवले? यहोवाच्या संदेशांची घोषणा करत असताना लोकांचा थंड प्रतिसाद, त्यांचा उपहास आणि छळ सहन करताना यिर्मयाला कदाचित असे वाटले असेल की आता आपली शक्‍ती संपली, आता आपण हे काम आणखी करू शकणार नाही. पण यहोवा यिर्मयाच्या अशा भावनांवर प्रबळ झाला आणि त्याने यिर्मयाला त्याचे संदेश घोषित करत राहण्याकरता सामर्थ्य पुरवले. अशारितीने, जे कार्य आपण करू शकत नाही असे संदेष्ट्या यिर्मयाला वाटत होते तेच कार्य त्याच्याकडून साध्य करून घेण्याद्वारे यहोवाने त्याला फसवले.

आपल्याकरता धडे:

१:८. यहोवाच्या लोकांचा छळ होत असताना तो निरनिराळ्या मार्गांनी त्यांचा बचाव करतो. कधी तो अपक्षपाती न्यायाधीशांना उभे करतो, कधी विरोध करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांच्या जागी समजूतदार अधिकारी येतील असे घडवून आणतो किंवा आपल्या उपासकांना सहन करण्याचे सामर्थ्य देतो, या अर्थाने तो त्यांचा बचाव करतो.—१ करिंथकर १०:१३.

२:१३, १८. अविश्‍वासू इस्राएल लोकांनी दोन दुष्कर्म केले. त्यांनी यहोवाला, जो त्यांना निश्‍चित स्वरूपाने आशीर्वाद, मार्गदर्शन व संरक्षण देऊ शकत होता, त्याला सोडून दिले. शिवाय, त्यांनी मिसर व अश्‍शूर यांसारख्या देशांसोबत संगनमत करण्याद्वारे आपल्यासाठी फुटके हौद खोदले. आज आपल्या काळात, मानवी तत्त्वज्ञानाच्या, बुद्धिवादांच्या व जगिक राजकारणाच्या मागे लागून खऱ्‍या देवाला सोडून देणे हे “जिवंत पाण्याचा झरा” सोडून त्याऐवजी “फुटके हौद” खोदण्यासारखे ठरेल.

६:१६. यहोवा आपल्या अवज्ञाकारी लोकांना थोडे थांबून आत्मपरीक्षण करण्याचे व आपल्या विश्‍वासू पूर्वजांचे ‘मार्ग’ शोधून त्यांवर चालण्याचे प्रोत्साहन देतो. आपणही वेळोवेळी, यहोवा ज्या मार्गांवर आपल्याला चालण्यास सांगतो त्यांवर चालत आहोत किंवा नाही याचे परीक्षण करू नये का?

७:१-१५. यहुदी लोक जेरूसलेममधील मंदिरावर भरवसा ठेवून होते. त्यांची अशी धारणा होती की त्या मंदिरामुळे त्यांचे चमत्कारिकरित्या सर्व संकटांपासून संरक्षण होईल, पण यामुळे त्यांचा बचाव झाला नाही. आपण डोळ्यांना दिसते त्यानुसार नव्हे तर विश्‍वासाने चालले पाहिजे.—२ करिंथकर ५:७.

१५:१६, १७. यिर्मयाप्रमाणे आपणही निराशेवर मात करू शकतो. अर्थपूर्ण वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्याद्वारे, प्रचार कार्यात यहोवाच्या नावाचे गौरव करण्याद्वारे व वाईट संगती टाळण्याद्वारे आपण असे करू शकतो.

१७:१, २. यहुदाच्या लोकांच्या पापांमुळे त्यांनी दिलेली अर्पणे यहोवाला नकोशी वाटू लागली. आपण नैतिकरित्या शुद्ध नसल्यास, आपली स्तुतीची बलिदाने यहोवा स्वीकारणार नाही.

१७:५-८. इतर मानव आणि मानवी संस्था जोपर्यंत देवाच्या इच्छेच्या व बायबलमधील तत्त्वांच्या सामंजस्यात कार्य करतात तोपर्यंतच आपण त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो. पण, तारण व खरी शांती व सुरक्षितता यांकरता आपण केवळ यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे.—स्तोत्र १४६:३.

२०:८-११. लोकांची उदासीन मनोवृत्ती, त्यांनी केलेला विरोध किंवा छळ यांमुळे राज्य प्रचार कार्याविषयी आपला आवेश कमी होता कामा नये.—याकोब ५:१०, ११.

“बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या”

(यिर्मया २१:१–५१:६४)

यिर्मयाने यहुदाच्या शेवटल्या चार राजांविरुद्ध तसेच खोटे संदेष्टे, बेजबाबदार मेंढपाळ आणि अन्यायी याजकांविरुद्ध यहोवाचे न्यायसंदेश घोषित केले. विश्‍वासू शेषजनांची तुलना चांगल्या अंजिरांशी करून यहोवाने म्हटले: “मी त्यांजवर कृपादृष्टि करीन.” (यिर्मया २४:५, ६) अध्याय २५ यातील तीन भविष्यवाण्या सारांशरूपात असून त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण नंतरच्या अध्यायात केले आहे.

याजक व संदेष्टे यिर्मयाला जिवे मारण्याचा कट रचतात. हे सर्वजण बॅबिलोनच्या राजाची सेवा करतील असा संदेश यिर्मया घोषित करत असतो. राजा सिद्‌कीया यास यिर्मया म्हणतो: “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या.” (यिर्मया २७:१२) पण तो असेही घोषित करतो की “ज्याने इस्राएलास विखरले तो त्यांस जमा करील.” (यिर्मया ३१:१०) रखाबी लोकांना त्यांच्या आज्ञाधारकतेबद्दल प्रतिफळ म्हणून एक प्रतिज्ञा दिली जाते. यिर्मयाला कैद करून “पहारेकऱ्‍यांच्या चौकात” ठेवले जाते. (यिर्मया ३७:२१) जेरूसलेमचा नाश होतो आणि बहुतेक रहिवाशांना बंदिवान म्हणून नेले जाते. मागे राहणाऱ्‍यांत यिर्मया व त्याचा चिटणीस बारूख हा आहे. यिर्मयाने ताकीद दिली असूनही हे मागे राहिलेले लोक घाबरून ईजिप्तला पळून जातात. अध्याय ४६ ते ५१ यात यिर्मयाने राष्ट्रांविरुद्ध केलेल्या घोषणा नमूद आहेत.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२२:३०—या न्यायनिवाड्यानुसार दाविदाच्या सिंहासनावर बसण्याचा येशू ख्रिस्ताचा अधिकार रद्द झाला का? (मत्तय १:१, ११) नाही. या निवाड्यानुसार यहोयाखीनच्या कोणत्याही वंशजाला “दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश” मिळणार नव्हते. येशू ख्रिस्त यहूदामधील सिंहासनावरून नव्हे तर स्वर्गातून राज्य करणार होता.

२३:३३—यहोवाचे “भारी वचन” कशास सूचित करत होते? यिर्मयाने जेरूसलेमच्या नाशाविषयी घोषित केलेले भारी न्यायसंदेश त्याच्या काळातल्या लोकांकरता एखाद्या ओझ्यासारखे वाटत होते. दुसरीकडे पाहता, यहोवाच्या संदेशांकडे दुर्लक्ष करणारे हे लोक त्याला एखाद्या ओझ्यासारखे वाटू लागले आणि त्याने त्यांना सोडून देण्याचे ठरवले. त्याचप्रकारे ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांना त्यांच्यावर येणार असलेल्या नाशाविषयीचे शास्त्रवचनांतील संदेश एखाद्या ओझ्यासारखे वाटतात आणि जे लोक या संदेशाकडे लक्ष देत नाहीत ते देवाला त्रासदायक वाटतात.

३१:३३—देवाचे नियमशास्त्र हृदयपटलावर कसे काय लिहिले जाऊ शकते? जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला देवाचे नियमशास्त्र इतके प्रिय वाटते की त्यामुळे त्याच्या मनात यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हा देवाचे नियमशास्त्र जणू त्याच्या हृदयपटलावर लिहिले आहे असे म्हणता येते.

३२:१०-१५—एकाच खरेदीखताच्या दोन नकला घेण्याची काय गरज होती? उघडी प्रत ही व्यवहारात उपयोगात आणण्याकरता होती. तर मोहरबंद प्रत गरज असल्यास उघड्या प्रतीची अचूकता पडताळून पाहण्याकरता होती. आपल्या नातेवाईकासोबत व सह उपासकासोबत व्यवहार करतानाही रास्त कायदेशीर पद्धतींचे पालन करण्याद्वारे यिर्मयाने आपल्याकरता एक चांगले उदाहरण पुरवले.

३३:२३, २४—या वचनांत कोणत्या ‘दोन घराण्यांचा’ उल्लेख केला आहे? यांपैकी एक घराणे हे राजा दावीदाच्या वंशावळीतून आलेले शाही घराणे आहे आणि दुसरे हे अहरोनाच्या वंशजांचे याजकीय कुटुंब आहे. जेरूसलेमचा व यहोवाच्या मंदिराचा नाश झाला तेव्हा जणू यहोवाने या दोन घराण्यांना त्यागले आहे आणि आता पृथ्वीवर देवाचे राज्य किंवा त्याची उपासना पुन्हा कधीही स्थापन होणार नाही असे भासले.

४६:२२—ईजिप्तच्या आवाजाची तुलना सर्पाशी का केली आहे? संकट आल्यामुळे ईजिप्तने सरसर आवाज करत मागे जाणाऱ्‍या सर्पासारखी माघार घेतली हे सूचित करण्याकरता किंवा राष्ट्र या नात्याने त्यांच्या मानहानीच्या संदर्भात कदाचित असे म्हटले असावे. या तुलनेवरून हेही दिसून येते की ईजिप्तचे फारो उआत्खित या सर्प-देवतेकडून संरक्षण मिळण्याकरता आपल्या टोपांवर पवित्र सर्पाचे जे चिन्ह लावत ते किती व्यर्थ होते.

आपल्याकरता धडे:

२१:८, ९; ३८:१९. अगदी शेवटल्या घटकेलाही यहोवाने जेरूसलेमच्या अपश्‍चत्तापी रहिवाशांना ते मरणाच्या शिक्षेस पात्र असूनही, बदलण्याची संधी दिली. खरोखर त्याची “करुणा थोर आहे.”—२ शमुवेल २४:१४; स्तोत्र ११९:१५६.

३१:३४. यहोवाने एखाद्याला क्षमा केल्यास तो पुन्हा त्याच्या पापाची आठवण काढत नाही आणि त्याच्याविरुद्ध कार्यवाही करत नाही हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो!

३८:७-१३; ३९:१५-१८. यहोवा आपली विश्‍वासू सेवा, तसेच आपण ‘पवित्र जनांची केलेली सेवा’ विसरत नाही.—इब्री लोकांस ६:१०.

४५:४, ५. यहूदाच्या शेवटल्या दिवसांप्रमाणेच या सध्याच्या दुष्ट जगाच्या ‘शेवटल्या काळात’ धनसंपत्ती, प्रतिष्ठा किंवा आर्थिक सुरक्षितता यांसारख्या “मोठाल्या गोष्टींची” इच्छा धरणे योग्य नाही.—२ तीमथ्य ३:१; १ योहान २:१७.

जेरुसलेम शहर आगीच्या विळख्यात

(यिर्मया ५२:१-३४)

सा.यू.पू. ६०७. सिद्‌कीयाच्या कारकीर्दीचे ११ वे वर्ष सुरू आहे. बॅबिलोनचा राजा नबुखेदनस्सर याने १८ महिन्यांपासून जेरूसलेमला वेढा घातला आहे. नबुखेदनस्सरच्या राजवटीच्या १९ व्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी नबुखदनेस्सरच्या गारद्यांचा नायक नबुजरदान जेरुसलेमला “आला.” (२ राजे २५:८) कदाचित नबुजरदानने शहाच्या तटाच्या बाहेर असलेल्या आपल्या छावणीतून परिस्थितीचे निरीक्षण करून पुढे काय हालचाल करावी ते ठरवले असेल. तीन दिवसांनंतर, त्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तो जेरुसलेम शहरात “आला.” आणि त्याने शहराला आग लावली.—यिर्मया ५२:१२, १३.

जेरुसलेम शहर कसे पडले याविषयी यिर्मया सविस्तर अहवाल देतो. त्याने केलेल्या वर्णनाच्याच आधारावर शोकगीते रचण्यात आली जी बायबलमधील विलापगीत या पुस्तकात वाचायला मिळतात. (w०७ ३/१५)

[८ पानांवरील चित्र]

यिर्मयाने घोषित केलेल्या संदेशांत जेरुसलेमविरुद्ध यहोवाचा न्यायसंदेश देखील होता

[९ पानांवरील चित्र]

कोणत्या अर्थाने यहोवा यिर्मयावर “प्रबळ” ठरला?

[१० पानांवरील चित्र]

‘यहूदाच्या बंदिवान केलेल्या लोकांस या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन.’—यिर्मया २४:५