व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो—यहोवाला सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये राखा

तरुणांनो—यहोवाला सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये राखा

तरुणांनो—यहोवाला सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये राखा

“सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्याकरता कसरत कर.”—१ तीमथ्य ४:७, NW.

१, २. (क) पौलाने तीमथ्याची प्रशंसा का केली? (ख) आज बरेच तरुण कशाप्रकारे ‘सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्याकरता कसरत करत आहेत?’

“तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. . . . जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.” (फिलिप्पैकर २:२०, २२) हे प्रशंसोद्‌गार प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांना पहिल्या शतकात लिहिलेल्या पत्रात आढळतात. पौल कोणाविषयी बोलत होता? तीमथ्याविषयी. तीमथ्य हा त्याच्यापेक्षा वयाने लहान असणारा त्याचा प्रवास सोबती होता. पौलाने आपल्याविषयी व्यक्‍त केलेल्या या प्रेमामुळे व आत्मविश्‍वासामुळे तीमथ्याला किती आनंद वाटला असेल याची कल्पना करा!

यहोवाच्या लोकांमध्ये तीमथ्यासारख्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या तरुणांची मनापासून कदर केली जाते. (स्तोत्र ११०:३) आज देवाच्या संघटनेत अनेक तरुण पायनियर, मिशनरी, बांधकाम स्वयंसेवक व बेथेल सदस्य या नात्याने सेवा करत आहेत. तसेच इतर जबाबदाऱ्‍या सांभाळून जे तरूण मंडळीच्या कार्यात हिरीरीने सहभाग घेतात त्यांचे परिश्रम देखील अतिशय कौतुकास्पद आहेत. या तरुणांना आपला स्वर्गीय पिता यहोवा याला ज्यांमुळे सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये जोपासल्यामुळे खरे समाधान लाभते. ते सर्व खरोखर “सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्याकरता कसरत करत आहेत.”—१ तीमथ्य ४:७, ८.

३. या लेखात कोणत्या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल?

तरुण या नात्याने तुम्ही विशिष्ट आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करत आहात का? असे करण्याकरता तुम्हाला साहाय्य व प्रोत्साहन कोठून मिळू शकते? या भौतिकवादी जगाच्या दबावांना तुम्ही कसे तोंड देऊ शकता? देवाचा सन्मान करणारी ध्येये राखल्याने तुम्हाला कोणते आशीर्वाद लाभतील? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता आपण तीमथ्याच्या जीवनाविषयी व कार्याविषयी परीक्षण करूया.

तीमथ्याची पार्श्‍वभूमी

४. तीमथ्याच्या ख्रिस्ती सेवेचे थोडक्यात वर्णन करा.

तीमथ्य हा गलतिया नावाच्या रोमी प्रांतातील लुस्त्र शहरात लहानाचा मोठा झाला. सा.यु. ४७ सालाच्या सुमारास जेव्हा पौलाने लुस्त्र येथे प्रचार केला तेव्हा कदाचित तीमथ्य पहिल्यांदा ख्रिस्ती विश्‍वासाच्या संपर्कात आला असावा. तेव्हा तो कुमारावस्थेत होता. लवकरच तीमथ्याने स्थानिक ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्तम नावलौकिक मिळवला. पौल दोन वर्षांनी लुस्त्र येथे परत आला आणि त्याने तीमथ्याच्या प्रगतीविषयी ऐकले तेव्हा त्याने तीमथ्याला आपल्या मिशनरी दौऱ्‍यांवर सोबत येण्याकरता निवडले. (प्रेषितांची कृत्ये १४:५-२०; १६:१-३) तीमथ्याचा अनुभव वाढत गेला व कालांतराने त्याच्यावर आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या. उदाहरणार्थ, बांधवांचे मनोबल वाढवण्याकरता त्याला निरनिराळ्या ठिकाणी पाठवले जाऊ लागले. सा.यु. ६५ सालाच्या सुमारास जेव्हा पौलाने तुरुंगातून तीमथ्याला पत्र लिहिले तेव्हा तीमथ्य इफिसस येथे एक ख्रिस्ती वडील या नात्याने सेवा करत होता.

५. दुसरे तीमथ्य ३:१४, १५ यानुसार तीमथ्याने आध्यात्मिक ध्येये राखण्याचा जो निर्णय घेतला त्यावर कोणत्या दोन गोष्टींचा प्रभाव पडला?

साहजिकच तीमथ्याने आपल्या जीवनात आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा मार्ग निवडला होता. पण त्याने हा मार्ग का निवडला? तीमथ्याला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात पौलाने सांगितलेल्या दोन गोष्टींचा त्याच्या या निर्णयावर प्रभाव पडला असेल. पौलाने लिहिले: “ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे.” (२ तीमथ्य ३:१४, १५) सर्वप्रथम, आपण हे पाहुया की तीमथ्याने आध्यात्मिक ध्येये निवडली यात इतर ख्रिश्‍चनांची काय भूमिका होती?

सकारात्मक प्रभावांपासून फायदा घ्या

६. तीमथ्याला कोणते प्रशिक्षण मिळाले आणि त्याने याला कसा प्रतिसाद दिला?

तीमथ्याचे बालपण, धार्मिकरित्या विभाजित कुटुंबात गेले. त्याचे वडील ग्रीक होते तर त्याची आई युनीके व आजी लोईस या यहुदी होत्या. (प्रेषितांची कृत्ये १६:१) युनीके व लोईस यांनी तीमथ्याला अगदी बालपणापासूनच इब्री शास्त्रवचनांतून सत्याविषयीचे धडे दिले. त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्या ख्रिस्ती बनल्यानंतर नक्कीच त्यांनी तीमथ्याला ख्रिस्ती शिकवणुकी स्वीकारण्यास साहाय्य केले असेल. या उत्तम प्रशिक्षणाचा तीमथ्याने पूर्णपणे फायदा करून घेतला हे अगदी स्पष्ट आहे. पौलाने म्हटले: “तो विश्‍वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याहि ठायी आहे असा मला भरवसा आहे.”—२ तीमथ्य १:५.

७. बरेच तरुण कोणत्या आशीर्वादांचा आनंद अनुभवत आहेत आणि याचा त्यांना कशाप्रकारे फायदा होईल?

आज बऱ्‍याच तरुणांना देवाला भिऊन चालणारे आईवडील व आजीआजोबा लाभले आहेत जे लोईस व युनीके यांच्याप्रमाणे आध्यात्मिक ध्येयांचे महत्त्व ओळखतात. उदाहरणार्थ, सामीरा हिला आठवते की किशोरावस्थेत असताना ती बरेचदा आपल्या आईवडिलांसोबत कितीतरी वेळापर्यंत बोलायची. ती सांगते, “आई व बाबांनी मला यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायला आणि प्रचार कार्याला प्राधान्य द्यायला शिकवले. त्यांनी मला नेहमी पूर्ण वेळेची सेवा निवडण्याची प्रेरणा दिली.” सामीराने आपल्या आईवडिलांच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद दिला आणि आज ती तिच्या देशातील बेथेल कुटुंबाची एक सदस्य म्हणून सेवा करत आहे. जर तुमचे आईवडील तुम्हाला आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रोत्साहन देत असतील तर त्यांच्या सल्ल्याविषयी लक्षपूर्वक विचार करा. त्यांना तुमचे भले व्हावे असेच मनापासून वाटते.—नीतिसूत्रे १:५.

८. तीमथ्याला ख्रिस्ती बांधवांच्या उत्तेजनदायक सहवासामुळे कशाप्रकारे फायदा झाला?

ख्रिस्ती बांधवांच्या उत्तेजनदायक सहवासाचाही तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. तीमथ्याच्या स्वतःच्या मंडळीतील वडील व जवळजवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या इकुन्यातले वडील देखील त्याला नावाजीत होते. (प्रेषितांची कृत्ये १६:१, २) पौल, जो एक अतिशय उत्साहपूर्ण व्यक्‍ती होता त्याच्यासोबत तीमथ्याने घनिष्ट मैत्री केली. (फिलिप्पैकर ३:१४) पौलाच्या पत्रांवरून दिसून येते की तीमथ्याने त्याला दिलेल्या सल्ल्याचे स्वागत केले आणि विश्‍वासू बांधवांच्या उदाहरणांचे अनुकरण करण्यास तो तत्पर होता. (१ करिंथकर ४:१७; १ तीमथ्य ४:६, १२-१६) पौलाने लिहिले: “तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्‍वास, सहनशीलता, प्रीति, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस.” (२ तीमथ्य ३:१०) होय तीमथ्याने पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केले. त्याचप्रकारे जर तुम्ही मंडळीतल्या आध्यात्मिकरित्या प्रौढ व्यक्‍तींशी जवळीक केली तर तुम्हालाही आध्यात्मिक ध्येये राखण्यास साहाय्य मिळेल.—२ तीमथ्य २:२०-२२.

‘पवित्र शास्त्राचा’ अभ्यास करा

९. योग्य संगती निवडण्याव्यतिरिक्‍त ‘सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्याकरता कसरत करण्यासाठी’ तुम्ही काय केले पाहिजे?

केवळ योग्य संगतीमुळे आध्यात्मिक ध्येये गाठणे शक्य आहे का? नाही. तीमथ्याप्रमाणे तुम्ही ‘पवित्र शास्त्राचा’ सखोल अभ्यास केला पाहिजे. कदाचित तुम्हाला पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असेल. पण तीमथ्याला “सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्याकरता कसरत” करावी लागली हे आठवणीत असू द्या. खेळाडू आपला इच्छित पुरस्कार मिळवण्याकरता कधीकधी कित्येक महिने कसरत करतात. त्याचप्रकारे आध्यात्मिक ध्येये मिळवण्याकरता आत्मत्याग व परिश्रम करण्याची गरज आहे. (१ तीमथ्य ४:७, ८, १०) पण तुम्ही विचाराल, ‘बायबलचा अभ्यास केल्याने मला माझी ध्येये मिळवण्यास कसे साहाय्य मिळू शकेल?’ याचे तीन मार्ग लक्षात घ्या.

१०, ११. शास्त्रवचने तुम्हाला आध्यात्मिक ध्येये मिळवण्यास कशी मदत करू शकतात? उदाहरण द्या.

१० सर्वप्रथम, तुम्हाला शास्त्रवचनांतून योग्य प्रेरणा मिळेल. शास्त्रवचनांत आपल्या स्वर्गीय पित्याच्या अद्‌भूत व्यक्‍तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. त्याने आपल्याकरता ज्या श्रेष्ठ मार्गाने प्रीती व्यक्‍त केली आणि त्याच्या विश्‍वासू सेवकांसाठी त्याने राखून ठेवलेले सार्वकालिक आशीर्वाद याविषयी त्यात सांगितले आहे. (आमोस ३:७; योहान ३:१६; रोमकर १५:४) यहोवाबद्दलचे तुमचे ज्ञान जसजसे वाढेल तसतसे तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेमही वाढत जाईल आणि त्याला आपले जीवन समर्पित करण्याची इच्छा तुमच्या मनात बळावेल.

११ बरेच तरुण ख्रिस्ती असे म्हणतात की नियमित वैयक्‍तिक बायबल अभ्यासाने त्यांना सत्याचा खऱ्‍या अर्थाने स्वीकार करण्यास मदत केली आहे. उदाहरणार्थ अडेल्‌ ही एका ख्रिस्ती कुटुंबातच लहानाची मोठी झाली पण तिने कधीही कोणतीही आध्यात्मिक ध्येये राखली नव्हती. ती सांगते, “माझे आईवडील मला राज्य सभागृहात घेऊन जायचे, पण मी व्यक्‍तिगत अभ्यास करत नव्हते किंवा सभांमध्ये लक्ष देत नव्हते.” पण बहिणीचा बाप्तिस्मा झाल्यानंतर मात्र अडेल्‌ सत्याविषयी पूर्वीपेक्षा जास्त गांभिर्याने विचार करू लागली. ती सांगते, “मी पूर्ण बायबल वाचून काढायचे ठरवले. थोडेसे वाचल्यानंतर मी त्यावरती आपला अभिप्राय थोडक्यात लिहायचे. अजूनही मी ती वही जपून ठेवली आहे. सबंध बायबल मी एका वर्षात वाचून काढले.” यामुळे अडेल्‌ आपले जीवन यहोवाला समर्पित करण्यास प्रेरित झाली. गंभीर शारीरिक दुर्बलता असूनही आज ती एक पायनियर, अर्थात पूर्ण वेळेची सुवार्तिक आहे.

१२, १३. (क) बायबलचा अभ्यास केल्याने तरुण व्यक्‍तीला कोणते बदल करण्यास साहाय्य मिळेल व कशाप्रकारे? (ख) देवाच्या वचनात असलेल्या व्यवहारोपयोगी सुबुद्धीची काही उदाहरणे सांगा.

१२ दुसरी गोष्ट म्हणजे, बायबल तुम्हाला तुमच्या व्यक्‍तिमत्त्वात आवश्‍यक बदल करण्यास साहाय्य करेल. पौलाने तीमथ्याला सांगितले की ‘पवित्र शास्त्र’ हे “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) देवाच्या वचनातील निरनिराळ्या विषयांवर नियमित मनन केल्याने व बायबलमधील तत्त्वांचे पालन केल्याने तुम्ही देवाच्या आत्म्याला जणू तुमच्या व्यक्‍तिमत्त्वास आकार देण्यास वाव देत असता. पवित्र आत्मा तुमच्या व्यक्‍तिमत्त्वात नम्रता, चिकाटी, परिश्रमी वृत्ती, व बांधवांबद्दल मनस्वी प्रेम यांसारखे आवश्‍यक गुण उत्पन्‍न करेल. (१ तीमथ्य ४:१५) तीमथ्याच्या अंगी हे गुण असल्यामुळेच तो पौलाला व अनेक मंडळ्यांनाही मोलाचे साहाय्य पुरवू शकला.—फिलिप्पैकर २:२०-२२.

१३ तिसरे म्हणजे, देवाचे वचन हे व्यवहारोपयोगी सुबुद्धीचे भांडार आहे. (स्तोत्र १:१-३; १९:७; २ तीमथ्य २:७; ३:१५) ते तुम्हाला योग्य मित्र व निकोप मनोरंजन निवडण्यास आणि इतर असंख्य आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल. (उत्पत्ति ३४:१, २; स्तोत्र ११९:३७; १ करिंथकर ७:३६) आध्यात्मिक ध्येये मिळवण्याकरता आतापासूनच सुज्ञ निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

‘विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध कर’

१४. आध्यात्मिक ध्येयांना प्राधान्य देण्याचा मार्ग हा सर्वात सोपा मार्ग का नाही?

१४ यहोवाला ज्यांमुळे सन्मान मिळेल अशाप्रकारच्या ध्येयांना जीवनात प्राधान्य देणे हा सर्वात सुज्ञतेचा मार्ग आहे पण तो सर्वात सोपा मार्ग मुळीच नाही. उदाहरणार्थ, करियर निवडण्याची वेळ येते तेव्हा तुमचे नातेवाईक, सोबती, आणि तुमचे शिक्षक तुमच्यावर बराच दबाव आणू शकतात. कारण त्यांना तुमच्या हिताची चिंता आहे आणि त्यांच्या मते उच्च शिक्षण आणि लठ्ठ पगाराची नोकरीच माणसाला खरे यश व समाधान मिळवून देऊ शकते. (रोमकर १२:२) तीमथ्याप्रमाणे, तुम्हालाही यहोवाने देऊ केलेले ‘युगानुयुगाचे जीवन बळकट धरण्याकरता विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध करावे लागेल.’—१ तीमथ्य ६:१२; २ तीमथ्य ३:१२.

१५. तीमथ्याला कदाचित कशाप्रकारच्या विरोधाला तोंड द्यावे लागले असेल?

१५ विश्‍वासात नसलेले कुटुंबातले सदस्य तुमचे निर्णय मान्य करत नाहीत तेव्हा तुम्हाला अत्यंत कठीण परीक्षेला तोंड द्यावे लागू शकते. कदाचित तीमथ्यालाही अशाप्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावे लागले असेल. एका संदर्भ ग्रंथानुसार, तीमथ्याचे कुटुंब कदाचित, “समाजातल्या सुशिक्षित, श्रीमंत वर्गातले होते.” त्याअर्थी त्याच्या वडिलांची निश्‍चितच अशी अपेक्षा असेल, की त्याने उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवावा. * असे करण्याऐवजी, तीमथ्याने पौलासोबत मिशनरी कार्य करण्याचे निवडून एक धोकेदायक व आर्थिक अनिश्‍चिततेचा मार्ग निवडला आहे हे समजल्यावर तीमथ्याच्या वडिलांची काय प्रतिक्रिया असावी याची कल्पना करा!

१६. एका तरुणाने पालकांच्या विरोधाला कसे तोंड दिले?

१६ आजही ख्रिस्ती तरुणांना अशाचप्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरात सेवा करणारा मॅथ्यू आपला अनुभव सांगतो: “मी पायनियर सेवा करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांची घोर निराशा झाली. सेवाकार्यात स्वतःचा खर्च भागवण्याकरता मी क्लीनरची नोकरी करू लागलो तेव्हा मी माझे शिक्षण ‘वाया घालवले’ असे त्यांना वाटले. ते नेहमी मला टोमणे मारायचे. पूर्णवेळेची नोकरी केली तर मला किती पैसा कमवता येईल याची वारंवार मला आठवण करून द्यायचे.” मॅथ्यूने या विरोधाला कसे तोंड दिले? “मी नियमितपणे बायबल वाचन आणि सतत प्रार्थना करत होतो. विशेषतः रागाच्या भरात स्वतःवरचा ताबा सुटण्याची भीती वाटताच मी प्रार्थना करत असे.” मॅथ्यूच्या निश्‍चयी वृत्तीचे त्याला चांगले प्रतिफळ मिळाले आहे. काळाच्या ओघात त्याच्या वडिलांसोबतचा त्याचा नातेसंबंध सुधारला आहे. तसेच, मॅथ्यू यहोवाच्याही जास्त जवळ आला आहे. तो सांगतो, “यहोवा कशाप्रकारे माझ्या गरजा भागवतो, मला प्रोत्साहन देतो, अयोग्य निर्णय घेण्यापासून मला आवरतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मी आध्यात्मिक ध्येये राखली नसती, तर मला यापैकी काहीही अनुभवायला मिळाले नसते.”

आध्यात्मिक ध्येयांवर नजर केंद्रित करा

१७. काहीजण कशाप्रकारे पूर्णवेळेच्या सेवेत उतरू इच्छिणाऱ्‍यांचे नकळत धैर्य खचवू शकतात? (मत्तय १६:२२)

१७ आध्यात्मिक ध्येये साध्य करण्याच्या मार्गात एक आव्हान काहीशा अप्रत्यक्ष स्वरूपात, सहविश्‍वासू बांधवांकडूनही येऊ शकते. काहीजण तुम्हाला विचारतील, ‘पायनियर होण्याची काय गरज? चारचौघांसारखे राहूनही प्रचार कार्यात सहभाग घेता येतो. आधी चांगली नोकरी शोध आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर हो.’ हा तर योग्यच सल्ला आहे असे तुम्हाला वाटू शकते पण विचार करा, या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्यास कसरत करू शकाल का?

१८, १९. (क) तुम्ही आध्यात्मिक ध्येयांवर आपली नजर कशी केंद्रित करू शकता? (ख) तरुण या नात्याने तुम्ही राज्यासाठी कोणते त्याग करत आहात याविषयी सांगा.

१८ तीमथ्याच्या काळातल्या काही ख्रिश्‍चनांचीही अशाप्रकारची मते होती. (१ तीमथ्य ६:१७) तीमथ्याला त्याच्या आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्याकरता पौलाने त्याला असे म्हणून प्रोत्साहन दिले: “शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्‍यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याने त्याला संतुष्ट करावे.” (२ तीमथ्य २:४) कामगिरीवर असणारा शिपाई सर्वसामान्य नागरिकाच्या कारभारांत गुंतत नाही. आपल्या वरिष्ठांच्या आदेशांप्रमाणे वागण्यास तयार राहण्यावरच त्याचे व इतरांचे जीवनही अवलंबून असते. ख्रिस्ताचा सैनिक या नात्याने तुम्हीही आपले मन एकाग्र करून, तुम्हाला सोपवलेली जीवनदायक सेवा पूर्ण करण्यात बाधा बनू शकतील अशा सर्व अनावश्‍यक भौतिक ध्येयांत गुंतण्याचे टाळले पाहिजे.—मत्तय ६:२४; १ तीमथ्य ४:१६; २ तीमथ्य ४:२, ५.

१९ ऐषोआरामाच्या जीवनाचे ध्येय राखण्याऐवजी आत्मत्यागी वृत्ती बाळगा. “ख्रिस्त येशूच्या सैन्यातला शिपाई या नात्याने जीवनाच्या सोयीसुविधांचा त्याग करण्यास तयार ऐस.” (२ तीमथ्य २:३, दी इंग्लिश बायबल इन बेसिक इंग्लिश) पौलाच्या सहवासात राहून तीमथ्याने अगदी खडतर परिस्थितीतही समाधानी राहण्याचे रहस्य शिकून घेतले. (फिलिप्पैकर ४:११, १२; १ तीमथ्य ६:६-८) तुम्हीही हेच करू शकता. देवाच्या राज्यासाठी तुम्ही त्याग करण्यास तयार आहात का?

सध्या व भविष्यकाळातही आशीर्वाद

२०, २१. (क) आध्यात्मिक ध्येये मिळवण्यास झटल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात याचे वर्णन करा. (ख) तुमचा निर्धार काय आहे?

२० जवळजवळ १५ वर्षे तीमथ्याने पौलाच्या निकट सहवासात राहून कार्य केले. भूमध्य सागराच्या उत्तरेकडील सबंध प्रदेशात सुवार्तेचा प्रसार कसा झाला व नवनवीन मंडळ्या कशा स्थापन होत गेल्या याला तीमथ्य स्वतः साक्षीदार होता. त्याने “चारचौघांसारखे” राहायचे ठरवले असते तर त्याला इतके रोमांचक व समाधानदायक अनुभव निश्‍चितच आले नसते. आध्यात्मिक ध्येये राखल्यास तुम्हालाही अनमोल आध्यात्मिक आशीर्वाद मिळतील. तुम्ही यहोवाच्या जवळ याल आणि सहख्रिस्ती बांधवांचे प्रेम व आदर मिळवाल. भौतिक संपत्तीच्या पाठीमागे लागून जे दुःख व निराशा पदरी पडते त्याऐवजी तुम्हाला निःस्वार्थपणे इतरांची सेवा केल्यामुळे मिळणारा निर्भेळ आनंद लाभेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ‘खरे जीवन’ अर्थात पृथ्वीवरील नंदनवनातले सार्वकालिक जीवन प्राप्त करता येईल.—१ तीमथ्य ६:९, १०, १७-१९; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

२१ तेव्हा, तुम्ही आधीपासूनच केले नसेल तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर, सुभक्‍तीचे ध्येय मिळवण्यास कसरत करू लागण्याचे प्रोत्साहन देतो. मंडळीत जे तुम्हाला आध्यात्मिक ध्येय मिळवण्यास मदत करू शकतील अशा बांधवांशी जवळीक करा व त्यांचे मार्गदर्शन घ्या. देवाच्या वचनाच्या नियमित वैयक्‍तिक अभ्यासाला जीवनात प्राधान्य द्या. या जगाच्या भौतिकवादी प्रवृत्तीचा सतत प्रतिकार करा. आणि नेहमी आठवणीत असू द्या की जो देव “आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो” त्याचा सन्मान करणारी ध्येये तुम्ही निवडलीत तर तो सध्याच नव्हे तर भविष्यकाळातही तुमच्यावर विपुल आशीर्वादांचा वर्षाव करण्याचे आश्‍वासन देतो.—१ तीमथ्य ६:१७. (w०७ ५/१)

[तळटीप]

^ परि. 15 ग्रीक समाजात शिक्षणाला खूप महत्त्व दिले जात असे. तीमथ्याचा समकालीन प्लूटार्क याने असे लिहिले: “उत्तम शिक्षण मिळवणे हे सर्व चांगल्या गोष्टी संपादन करण्याचा एकमेव मार्ग व रहस्य आहे . . . माझ्या मते, हा मार्ग अवलंबला तरच मनुष्य नैतिकरित्या उच्च पातळी गाठू शकतो आणि जीवनात आनंदी होऊ शकतो. . . . इतर सर्व लाभ हे मानवी आहेत, क्षुल्लक आहेत आणि गांभिर्याने लक्ष देण्याजोगे नाहीत.”—मोराल्या, I, “मुलांचे शिक्षण.”

तुम्हाला आठवते का?

• आध्यात्मिक ध्येये मिळवण्याचा प्रयत्न करण्याकरता तरुणांना कोठून मदत मिळू शकेल?

• बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करणे इतके महत्त्वाचे का आहे?

• तरुण या जगातल्या भौतिकवादी प्रभावाचा प्रतिकार कसा करू शकतात?

• आध्यात्मिक ध्येये मिळवण्यास झटल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्रे]

तीमथ्याला कोणत्या सकारात्मक प्रभावांमुळे फायदा झाला?