व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती होवो

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती होवो

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती होवो

“मी आपल्या भावांजवळ तुझे नाव सांगीन. मंडळीमध्ये मी तुझी स्तुती गाईन.” —इब्री लोकांस २:१२, पं.र.भा.

१, २. मंडळीची व्यवस्था इतकी लाभदायक का आहे आणि या व्यवस्थेचा मुख्य उद्देश काय?

कुटुंब हे समाजातील एक मूलभूत संस्थान आहे. सबंध इतिहासात मानवाला कुटुंबाच्या व्यवस्थेतून प्रेमळ सहवास व सुरक्षितता लाभली आहे. पण बायबलमध्ये आणखी एका व्यवस्थेविषयी सांगितलेले आहे. ही एक अशी व्यवस्था आहे, की जिच्याकरवी सबंध जगातील असंख्य लोक एका वेगळ्याच प्रकारच्या सहवासाचा व सुरक्षिततेचा उपभोग घेत आहेत. ही व्यवस्था म्हणजे ख्रिस्ती मंडळी. तुम्हाला स्वतःच्या प्रेमळ कुटुंबाचा आधार असो वा नसो, पण मंडळीच्या व्यवस्थेतून देवाने जे काही पुरवले आहे त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असू शकता, नव्हे असलेच पाहिजे. अर्थात, जर तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या मंडळीसोबत आधीपासूनच संबंधित असाल तर या मंडळ्यांमधील प्रेमळ सहवासाबद्दल व तेथे मिळणाऱ्‍या सुरक्षिततेबद्दल तुम्ही स्वतः आपल्या अनुभवावरून सांगू शकता.

मंडळी म्हणजे केवळ एक सामाजिक गट नव्हे. ती समान परिस्थिती व आवडीनिवडी किंवा छंद असलेले लोक जेथे एकत्र येतात अशा संस्थेसारखी किंवा क्लबसारखी नाही. तर मंडळीच्या व्यवस्थेमागचा मुख्य उद्देश हा यहोवा देवाची स्तुती करण्याचा आहे. आणि हाच उद्देश फार पूर्वीपासून होता हे स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातून वारंवार पाहायला मिळते. स्तोत्र ३५:१८ यात आपण असे वाचतो: “मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.” तसेच स्तोत्र १०७:३१, ३२ यात आपल्याला असा आग्रह करण्यात आला आहे: “परमेश्‍वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्‌भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावोत.”

३. पौलाने सांगितल्यानुसार मडंळीची भूमिका काय आहे?

ख्रिस्ती प्रेषित पौल याने “सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात” असे लिहिताना, मंडळीच्या आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. (१ तीमथ्य ३:१५) पौल कोणत्या मंडळीविषयी येथे बोलत होता? बायबलमध्ये “मंडळी” या शब्दाचा कोणत्या अर्थाने उपयोग करण्यात आला आहे? आणि याचा आपल्या जीवनावर व भविष्यावर काय परिणाम झाला पाहिजे? हे जाणून घेण्याकरता प्रथम आपण देवाच्या वचनात “मंडळी” या शब्दाचा कशाप्रकारे उपयोग केला आहे याचे परीक्षण करू या.

४. “मंडळी” हा शब्द इब्री शास्त्रवचनांत मुख्यतः कोणत्या अर्थाने वापरण्यात आला आहे?

“मंडळी” असे सहसा ज्याचे भाषांतर केले जाते त्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ “एकत्रित करणे” किंवा “जमवणे” असा आहे. (अनुवाद ४:१०; ९:१०) स्तोत्रकर्त्याने “मंडळी” शब्द स्वर्गातील देवदूतांच्या संदर्भात वापरला आणि हाच शब्द दुर्जनांच्या संदर्भातही वापरलेला आढळतो. (स्तोत्र २६:५; ८९:५-७) पण बहुधा इब्री शास्त्रवचनांत हा शब्द इस्राएल लोकांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. देवाने असे सांगितले होते की याकोबापासून “राष्ट्रसमुदाय” किंवा मूळ इब्री भाषेत शब्दशः म्हटल्याप्रमाणे, “लोकांची मंडळी” उत्पन्‍न होईल आणि त्यानुसार झाले. (उत्पत्ति २८:३; ३५:११; ४८:४) इस्राएल लोकांना “यहोवाची मंडळी” होण्याकरता निवडण्यात आले होते.—गणना २०:४, पं.र.भा.; नहेम्या १३:१; यहोशवा ८:३५; १ शमुवेल १७:४७; मीखा २:५.

५. “मंडळी” असे सहसा ज्याचे भाषांतर केले जाते तो ग्रीक शब्द कोणता, आणि हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो?

मंडळी या अर्थाचा ग्रीक भाषेतील शब्द एक्लेसिया असून, तो “बाहेर” व “बोलावणे” या अर्थाच्या दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. हा शब्द केवळ धार्मिक संदर्भात वापरतात असे नाही. इफिसस येथे देमेत्रिय याने पौलाच्या विरोधात जी “सभा” बोलावली होती तिच्या संदर्भातही हाच शब्द वापरला जाऊ शकतो. (प्रेषितांची कृत्ये १९:३२, ३९, ४१) पण बायबलमध्ये हा शब्द सहसा ख्रिस्ती मंडळीच्या संदर्भातच वापरलेला आढळतो. काही भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर “चर्च” असे केले आहे पण दी इंपीरियल बायबल-डिक्शनरी यात असे सांगितले आहे की हा शब्द “केव्हाही . . . ख्रिस्ती ज्या इमारतीत उपासनेकरता एकत्रित होतात त्यास सूचित करत नाही.” पण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतच “मंडळी” या शब्दाचा निदान चार वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे हे लक्षवेधक आहे.

देवाची अभिषिक्‍त मंडळी

६. दाविदाने व येशूने मंडळीत काय केले?

स्तोत्र २२:२२ (पं.र.भा.) यातील दाविदाच्या शब्दांचा उपयोग करून प्रेषित पौलाने येशूबद्दल असे लिहिले: ‘मी आपल्या भावांजवळ तुझे नाव सांगीन. मंडळीमध्ये तुझी स्तुती गायीन.’ म्हणून [येशूला] सर्व प्रकारे ‘आपल्या भावांसारखे’ होणे अवश्‍य होते, यासाठी की, लोकांच्या पापाबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरिता त्याने देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्‍वासू प्रमुख याजक व्हावे.” (इब्री लोकांस २:१२, १७, पं.र.भा.) दाविदाने प्राचीन इस्राएलातील मंडळीत देवाचे स्तवन केले होते. (स्तोत्र ४०:९) पण येशूने “मंडळीमध्ये” देवाची स्तुती गायिली असे पौलाने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? तो कोणत्या मंडळीबद्दल बोलत होता?

७. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “मंडळी” या शब्दाचा प्रमुख अर्थ काय आहे?

इब्री लोकांस २:१२, १७ यात आपण जे वाचतो ते अतिशय अर्थभरीत आहे. या वचनांवरून हे दिसून येते की ख्रिस्ताने आपल्या बंधूंजवळ देवाच्या नावाची कीर्ती वर्णिली तेव्हा तो देखील मंडळीचा एक सदस्य होता. हे बंधू कोण? हे ‘अब्राहामाच्या संतानात’ समाविष्ट असलेले ख्रिस्ताचे आत्म्याने अभिषिक्‍त झालेले बंधू, अर्थात ‘स्वर्गीय पाचारणाचे भागीदार’ आहेत. (इब्री लोकांस २:१६–३:१; मत्तय २५:४०) तेव्हा, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “मंडळी” या शब्दाचा प्रमुख अर्थ ख्रस्ताच्या, आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या अनुयायांचा सामूहिक गट असा आहे. या १,४४,००० अभिषिक्‍त सदस्यांना “स्वर्गांतील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी” असे म्हणण्यात आले आहे.—इब्री लोकांस १२:२३.

८. येशूने ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेविषयी कशाप्रकारे पूर्वसंकेत दिला?

येशूने ही ख्रिस्ती “मंडळी” स्थापन होणार असल्याचे सूचित केले होते. त्याच्या मृत्यूच्या सुमारे एका वर्षाआधी त्याने प्रेषितांपैकी एकाला असे सांगितले: “तू पेत्र आहेस आणि ह्‍या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही.” (मत्तय १६:१८) पेत्र व पौल या दोघांनाही येशूच स्वतः तो भाकीत केलेला खडक होता हे अचूकपणे समजले होते. म्हणूनच पेत्राने असे लिहिले की येशूच्या रूपातील खडकावर जे आध्यात्मिक मंदिराच्या “जिवंत धोड्यांसारखे” रचले जातात ते ‘देवाचे स्वतःचे लोक असे होते, ह्‍यासाठी की त्यांनी ज्याने त्यांस पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करावे.’—१ पेत्र २:४-९; स्तोत्र ११८:२२; यशया ८:१४; १ करिंथकर १०:१-४.

९. देवाची मंडळी रचण्यास केव्हा सुरुवात झाली?

“देवाचे स्वतःचे लोक” असलेल्या या सदस्यांपासून ख्रिस्ती मंडळी रचण्यास केव्हा सुरुवात झाली? हे सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडले. त्या दिवशी देवाने जेरुसलेम येथे जमलेल्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला. त्या दिवशी नंतर पेत्राने यहुदी व मतानुसारी यांच्या एका जमावापुढे एक उत्कृष्ट व्याख्यान दिले. येशूच्या मृत्यूसंबंधी ऐकून बऱ्‍याच जणांच्या अंतःकरणास चुटपुट लागली; त्यांनी पश्‍चात्ताप केला व बाप्तिस्मा घेतला. बायबलमधील ऐतिहासिक अहवालानुसार त्या दिवशी तीन हजार लोकांचा बाप्तिस्मा झाला आणि तेसुद्धा देवाच्या नव्या व सतत वाढत असलेल्या मंडळीचे भाग बनले. (प्रेषितांची कृत्ये २:१-४, १४, ३७-४७) या मंडळीत वाढ होण्याचे कारण म्हणजे अधिकाधिक यहुद्यांनी व मतानुसाऱ्‍यांनी हे कबूल केले की नैसर्गिक इस्राएल आता पूर्वीसारखे देवाची मंडळी नव्हते. उलट, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपासून बनलेले आत्मिक ‘देवाचे इस्राएल’ हेच देवाची खरी मंडळी बनले होते.—गलतीकर ६:१६; प्रेषितांची कृत्ये २०:२८.

१०. येशूचा देवाच्या मंडळीसोबत कशाप्रकारचा संबंध आहे?

१० बायबलमध्ये बरेचदा येशू व अभिषिक्‍त जनांमध्ये फरक दाखवला जातो, उदाहरणार्थ “ख्रिस्त मंडळी ह्‍यांच्यासंबंधाने” असा वाक्यांश बऱ्‍याच ठिकाणी आढळतो. येशू हा आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या मंडळीचा मस्तक आहे. पौलाने लिहिले की “[येशूने] सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून [देवाने] त्यास मंडळीला दिले, हीच त्याचे शरीर.” (इफिसकर १:२२, २३; इफिसकर ५:२३, ३२; कलस्सैकर १:१८, २४) आज पृथ्वीवर या मंडळीच्या अभिषिक्‍त सदस्यांपैकी लहानसा शेषवर्ग उरला आहे. त्यांचे मस्तक येशू ख्रिस्त, याचे त्यांच्यावर प्रेम आहे याची आपण खात्री बाळगू शकतो. त्यांच्याविषयीच्या त्याच्या भावनांचे वर्णन इफिसकर ५:२५ यात अशाप्रकारे केले आहे: “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” ख्रिस्ताचे त्यांच्यावर प्रेम आहे कारण ते ‘देवाचे नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ’ अर्पण करण्यात हिरीरीने भाग घेतात; पृथ्वीवर असताना येशूने देखील असेच केले होते.—इब्री लोकांस १३:१५.

“मंडळी” शब्दाचे इतर अर्थ

११. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “मंडळी” हा शब्द कोणत्या दुसऱ्‍या अर्थाने उपयोगात आणलेला आढळतो?

११ काहीवेळा, बायबलमध्ये “मंडळी” हा शब्द ‘देवाच्या मंडळीत’ समाविष्ट असलेल्या १,४४,००० अभिषिक्‍त जनांच्या सबंध गटाला सूचित न करता काहीशा मर्यादित अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, पौलाने ख्रिश्‍चनांच्या एका गटाला असे लिहिले: “यहूदी, हेल्लणी व देवाची मंडळी ह्‍यांच्यापैकी कोणालाहि अडखळविणारे होऊ नका.” (१ करिंथकर १०:३२) अर्थातच, करिंथ येथील एखाद्या ख्रिश्‍चनाच्या अयोग्य वर्तनामुळे काहींना अडखळण होण्याचा संभव होता. पण त्यामुळे पौलाच्या काळापासून आतापर्यंत सर्वच्या सर्व यहुद्यांना व हेल्लणी लोकांना किंवा अभिषिक्‍त जनांना अडखळण होणे शक्य होते का? साहजिकच हे शक्य नव्हते. त्याअर्थी हे वचन “देवाची मंडळी” असे कोणत्याही विशिष्ट काळात राहात असलेल्या ख्रिश्‍चनांना लागू होते. तसेच, देवाने मंडळीला साहाय्य केले किंवा तिच्यावर आशीर्वाद दिला असे म्हणता येते. येथे मंडळी असे म्हणण्याचा अर्थ, कोणत्याही विशिष्ट वेळी जगात कोठेही राहात असलेले सर्व ख्रिस्ती असा होऊ शकतो. किंवा आपण आज देवाच्या मंडळीत आनंद व शांती नांदते असे म्हणू शकतो ते या अर्थाने की सबंध ख्रिस्ती बंधूवर्गात आनंद व शांती आहे.

१२. बायबलमध्ये “मंडळी” हा शब्द कोणत्या तिसऱ्‍या पद्धतीने वापरलेला आढळतो?

१२ बायबल “मंडळी” या शब्दाचा एका तिसऱ्‍या पद्धतीनेही वापर करते. अर्थात, विशिष्ट भौगोलिक परिसरात राहणाऱ्‍या सर्व ख्रिश्‍चनांच्या संदर्भात. आपण असे वाचतो: “सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्‍या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली.” (प्रेषितांची कृत्ये ९:३१) त्या मोठ्या क्षेत्रात तसे ख्रिश्‍चनांचे अनेक गट होते पण यहूदीया, गालील व शोमरोन येथील सर्व गटांना ‘मंडळी’ असे म्हणण्यात आले. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी व त्यानंतर लवकरच किती लोकांनी बाप्तिस्मा घेतला होता, हे लक्षात घेऊन आपण असे म्हणू शकतो की जेरुसलेमच्या क्षेत्रात निश्‍चितच एकापेक्षा जास्त गट नियमित एकत्र येत असावेत. (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४६, ४७; ४:४; ६:१,) हेरोद अग्रिप्पाने सा.यु. ४४ सालात त्याचा मृत्यू होईपर्यंत यहूदीयात राज्य केले आणि १ थेस्सलनीकाकर २:१४ यावरून हे स्पष्ट होते की निदान सा.यु. ५० पर्यंत तरी यहूदीया प्रांतात बऱ्‍याच मंडळ्या स्थापन झालेल्या होत्या. त्याअर्थी, “हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला,” असे आपण वाचतो ते जेरुसलेममध्ये भेटणाऱ्‍या एकाच नव्हे तर बऱ्‍याच गटांना सूचित होते.—प्रेषितांची कृत्ये १२:१.

१३. बायबलमध्ये “मंडळी” हा शब्द कोणत्या चवथ्या अर्थाने सामान्यपणे वापरला जातो?

१३ “मंडळी” या शब्दाचा आणखीनच मर्यादित अर्थाने सर्वसामान्यपणे वापर केला जातो; तो म्हणजे कोणत्याही एका स्थानिक मंडळीतल्या, उदाहरणार्थ एखाद्याच्या घरात जमणाऱ्‍या मंडळीतल्या ख्रिश्‍चनांच्या संदर्भात. पौलाने ‘गलतीयातील मंडळ्यांविषयी’ उल्लेख केला होता. त्या मोठ्या रोमी प्रांतात अशा अनेक मंडळ्या होत्या. पौलाने दोनदा गलतीयाच्या संदर्भात ‘मंडळ्या’ हा शब्द बहुवचनात वापरला; यात, अंत्युखिया, दर्बे, लुस्त्र व इकुन्या येथील मंडळ्यांचा देखील समावेश होतो. या स्थानिक मंडळ्यांमध्ये सुयोग्य पात्रता असलेल्या वडिलांना किंवा पर्यवेक्षकांना नेमण्यात आले. (१ करिंथकर १६:१; गलतीकर १:२; प्रेषितांची कृत्ये १४:१९-२३) आणि शास्त्रवचनांनुसार या सर्व मंडळ्या ‘देवाच्या’ होत्या.—१ करिंथकर ११:१६; २ थेस्सलनीकाकर १:४.

१४. काही शास्त्रवचनांत “मंडळी” हा शब्द ज्याप्रकारे वापरण्यात आला आहे त्यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?

१४ काही ठिकाणी ख्रिस्ती सभांकरता भेटणारे गट लहान असतील. उदाहरणार्थ एखाद्याच्या घरात मावण्याइतके ते लहान असतील. तरीपण अशा काही गटांच्या संदर्भातही “मंडळी” हा शब्द वापरण्यात आला. यांपैकी अक्विला व प्रिस्क, नुंफा तसेच फिलेमोन यांच्या घरात भेटणाऱ्‍या मंडळ्यांविषयी आपल्याला माहीत आहे. (रोमकर १६:३-५; कलस्सैकर ४:१५; फिलेमोन २) आज ज्या मंडळ्या अगदी लहान आहेत किंवा ज्या एखाद्याच्या घरात भेटतात अशा मंडळ्यांतील बांधवांना हे जाणून नक्कीच सांत्वन मिळेल. यहोवाने पहिल्या शतकात अशा लहान मंडळ्यांनाही संमती दिली आणि निश्‍चितच आजही देतो. तो त्यांना आपल्या आत्म्याच्या माध्यमाने आशीर्वादित करतो.

मंडळ्या यहोवाचे स्तवन करतात

१५. पवित्र आत्म्याची कृपादाने काही सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये कोणकोणत्या मार्गांनी प्रकट झाली?

१५ आपण पाहिले की येशूने मंडळीत देवाचे स्तवन करण्याद्वारे स्तोत्र २२:२२ यातील शब्दांची पूर्णता केली. (इब्री लोकांस २:१२) त्याचे विश्‍वासू अनुयायी देखील हेच करतात. पहिल्या शतकात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना पवित्र आत्म्याने देवाचे पुत्र आणि त्याअर्थी ख्रिस्ताचे बंधू होण्याकरता अभिषिक्‍त केले तेव्हा त्यांच्यापैकी काहींना आत्म्याचे खास वरदान प्राप्त झाले. त्यांना आत्म्याची चमत्कारिक कृपादाने मिळाली. ज्ञानाच्या किंवा विद्येच्या वचनातून, निरोगी करण्याच्या किंवा संदेश देण्याच्या शक्‍तीतून, किंवा स्वतःला न येणाऱ्‍या अन्य भाषेत बोलण्याच्या अद्‌भूत शक्‍तीतून ही आत्म्याची कृपादाने प्रकट झाली.—१ करिंथकर १२:४-११.

१६. आत्म्याच्या चमत्कारिक कृपादानांचा उद्देश काय होता?

१६ अन्य भाषेत बोलण्याविषयी पौलाने म्हटले: “मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेहि गाणार.” (१ करिंथकर १४:१५) आपण काय बोलत आहोत याचा इतरांना अर्थ कळणे व त्यातून त्यांना काही बोध मिळणे किती महत्त्वाचे आहे याची पौलाला जाणीव होती. मंडळीत यहोवाची स्तुती करण्याचे पौलाचे ध्येय होते. त्याने आत्म्याची कृपादाने मिळालेल्या इतरांनाही असा आग्रह केला की ज्या स्थानिक मंडळीत ते आपल्याला मिळालेली दाने प्रकट करीत होते, त्या ‘मंडळीच्या उन्‍नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून [त्यांनी] खटपट करावी.’ (१ करिंथकर १४:४, ५, १२, २३) स्पष्टपणे पौलाला स्थानिक मंडळ्यांविषयी कळकळ वाटत होती. त्याला माहीत होते की या प्रत्येक मंडळीत ख्रिश्‍चनांना देवाची स्तुती करण्याची संधी होती.

१७. आज स्थानिक मंडळ्यांच्या संदर्भात पाहू जाता, आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१७ यहोवा आजही आपल्या मंडळीचा उपयोग करत आहे व तिला साहाय्य करत आहे. तो आज पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या सामूहिक गटाला विपुल आशीर्वाद देत आहे. आज देवाच्या लोकांना मुबलकतेने जे आध्यात्मिक अन्‍न मिळते त्यावरून हे स्पष्ट दिसून येते. (लूक १२:४२) जगभरातील सबंध बंधुवर्गालाही तो आशीर्वाद देत आहे. तसेच ज्या स्थानिक मंडळ्यांत आपण आपल्या वर्तनाने व उत्तेजनदायक आध्यात्मिक अभिप्रायांद्वारे आपल्या निर्माणकर्त्याची स्तुती करतो, त्या स्थानिक मंडळ्यांवरही त्याचा विपुल आशीर्वाद आहे. याच मंडळ्यांमध्ये आपल्याला बोध व प्रशिक्षण मिळते जेणेकरून आपल्याला इतर ठिकाणीही, म्हणजे शारीरिकरित्या आपल्या स्थानिक मंडळ्यांपासून दूर असतानाही देवाची स्तुती करता येईल.

१८, १९. कोणत्याही स्थानिक मंडळीतल्या प्रामाणिक ख्रिश्‍चनांची काय इच्छा असली पाहिजे?

१८ प्रेषित पौलाने मासेदोनियातील फिलिप्पै येथील स्थानिक मंडळीतल्या ख्रिश्‍चनांना काय म्हटले याची आठवण करा: “माझी ही प्रार्थना आहे की, . . . देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.” यात इतरांशी, अर्थात बाहेरच्या लोकांशी येशूवरील आपल्या विश्‍वासासंबंधी व त्यांच्या अद्‌भूत आशेविषयी बोलणे समाविष्ट होते. (फिलिप्पैकर १:९-११; ३:८-११) म्हणूनच पौलाने सहविश्‍वासू बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “[येशूचे] नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”—इब्री लोकांस १३:१५.

१९ तुम्हाला येशूप्रमाणे “महामंडळात” देवाची स्तुती करण्यास आनंद वाटतो का? तसेच ज्यांना अजून यहोवाविषयी माहीत नाही व त्यामुळे जे अद्याप त्याची स्तुती करत नाहीत त्यांच्यापुढे आपल्या ओठांनी यहोवाचे स्तवन करण्यास तुम्हाला आनंद वाटतो का? (इब्री लोकांस २:१२; रोमकर १५:९-११) देवाच्या उद्देशात आपल्या स्थानिक मंडळीच्या भूमिकेविषयी आपल्या काय भावना आहेत यावर या प्रश्‍नाचे आपले वैयक्‍तिक उत्तर अवलंबून आहे. पुढच्या लेखात आपण पाहू की यहोवा आपल्या स्थानिक मंडळीला कशाप्रकारे मार्गदर्शन पुरवत आहे व तिचा कशाप्रकारे उपयोग करत आहे आणि त्याअर्थी आपल्या जीवनात आज तिची काय भूमिका असावी. (w०७ ४/१५)

तुम्हाला आठवते का?

• अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपासून बनलेल्या ‘देवाच्या मंडळीची’ रचना कशाप्रकारे करण्यात आली?

• बायबल आणखी कोणत्या तीन अर्थांनी “मंडळी” हा शब्द वापरते?

• मंडळीच्या संदर्भात दाविदाची, येशूची व पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांची काय इच्छा होती आणि याचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

येशू कोणत्या मंडळीचा पाया होता?

[१२ पानांवरील चित्र]

बेनिन येथील ख्रिस्ती बांधवांप्रमाणे आपणही मंडळीत आपल्या बांधवांसोबत यहोवाची स्तुती करू शकतो