जीभेची शक्ती
जीभेची शक्ती
जिराफची जीभ १८ इंच लांब असते. ती अतिशय चपळ असते. उंच झाडाच्या फांदीवरील पाने ओरबडून काढण्याची तिच्यात शक्ती असते. ब्लू व्हेल माशाच्या जीभेचे वजन हत्तीच्या वजनाएवढे असते. तिची हालचाल करण्यासाठी किती शक्ती लागत असेल याचा विचार करा!
यांच्या तुलनेत, मानवाची जीभ आकाराने, वजनाने, आणि शक्तीने खूप लहान असली तरी, ती खूप शक्तीशाली आहे. बायबल या लहानशा मानवी अवयवाविषयी म्हणते: “जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात.” (नीतिसूत्रे १८:२१) खरे तर, आपण अनेकवेळा मानवी जीभेच्या प्राणघातक शक्तीचा उपयोग खोटी सबब सांगण्यासाठी आणि खोटी साक्ष देऊन एखाद्याला धुळीस मिळवण्यासाठी, निर्दोष लोकांचा बळी घेण्यासाठी झाल्याचे देखील ऐकतो, नाही का?
त्याचप्रमाणे, मनाला दुखवणारे शब्द बोलल्याने अनेक दिवसांची मैत्री देखील संपुष्टात येते. अविचारी शब्दांमुळे भावनांवर देखील आघात होतो. “तुम्ही कोठवर माझ्या जिवास दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?” हे उद्गार ईयोबाने, त्याच्या सोबत्यांच्या बोलण्याला त्रासून काढले. (ईयोब १९:२) शिष्य याकोबाने देखील बेलगाम जीभेच्या विध्वंसक शक्तीचे योग्य स्पष्टीकरण दिले: “जीभहि लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! जीभ ही आग आहे.”—याकोब ३:५, ६.
परंतु दुसरीकडे पाहता, जीभेमध्ये इतरांना जीवन देण्याची देखील शक्ती आहे. सहानुभूतीशील व सांत्वनदायक शब्दांमुळे खिन्न झालेल्यांना सांत्वन मिळते आणि आत्महत्येचा प्रयत्न करणारे आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतात. मादक औषधांचा गैरवापर करणारे अनेक जण व निर्दयी गुन्हेगार जेव्हा विश्वसनीय सल्ल्याचे पालन करतात तेव्हा ते अकाली मृत्यूपासून वाचतात. खरेच, सात्विक व्यक्तीच्या जीभेचे फळ हे, “जीवनाचा वृक्ष” तसेच “रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण” होय.—नीतिसूत्रे १५:४; २५:११.
परंतु, जीभेचा सर्वात चांगला उपयोग, यहोवाची सेवा करण्यासाठी, देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी आणि बायबलमधील मौल्यवान सत्ये इतरांना सांगण्यासाठी करता येतो. का? येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३; मत्तय २४:१४; २८:१९, २०. (w०७ ६/१)