दुष्टाईचे खरे कारण उजेडात आणणे!
दुष्टाईचे खरे कारण उजेडात आणणे!
पहिल्या शतकात बरेच यहुदी, शास्त्रवचनांत ज्याच्याविषयी भाकीत करण्यात आले होते तो मशीहा येण्याची वाट पाहत होते. (योहान ६:१४) येशू पृथ्वीतलावर आला तेव्हा त्याने लोकांना सांत्वन व ज्ञानाचा प्रकाश दिला. त्याने रोग्यांना बरे केले, भुकेल्यांना अन्न दिले, नैसर्गिक शक्तींवरही ताबा असल्याचे प्रकट केले, इतकेच काय तर मृतांनाही त्याने जिवंत केले. (मत्तय ८:२६; १४:१४-२१; १५:३०, ३१; मार्क ५:३८-४३) त्याने यहोवाची वचने लोकांना सांगितली आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा देऊ केली. (योहान ३:३४) येशूने आपल्या शब्दांतून व कृतींतून हे स्पष्टपणे दाखवले की मनुष्यजातीला पाप व त्याच्या सर्व दुष्परिणामांपासून मुक्त करणारा मशीहा आपणच आहोत.
तार्किकदृष्ट्या विचार केल्यास यहुदी धर्मपुढारी येशूचे स्वागत करण्यात, त्याचे ऐकून घेण्यात व त्याच्या उपदेशानुसार वागण्यात सर्वात पुढे असावयास हवे होते. पण असे घडले नाही. उलट त्यांनी त्याचा द्वेष केला, त्याचा छळ केला आणि त्याला जिवे मारण्याचा कट रचला!—मार्क १४:१; १५:१-३, १०-१५.
त्यामुळे येशूने त्या धर्मपुढाऱ्यांच्या कृत्यांची निंदा केली ते योग्यच होते. (मत्तय २३:३३-३५) पण येशूने ओळखले होते की त्यांच्या हृदयातील दुष्टतेकरता आणखीही कोणीतरी जबाबदार होते. त्याने त्यांना म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) मनुष्य दुष्टकृत्ये करण्यास समर्थ आहेत हे येशूने कबूल केले पण या दुष्टाईचा मूळ स्रोत किंवा कारण दियाबल सैतान होता हे त्याने उघडकीस आणले.
सैतान “सत्यात टिकला नाही” असे म्हणण्याद्वारे येशूने हे दाखवले की एकेकाळी हा आत्मिक प्राणी देवाचा विश्वासू सेवक होता पण नंतर तो त्या योग्य मार्गावरून विचलित झाला. सैतानाने यहोवाच्या विरोधात बंड का केले? कारण तो स्वतःला इतके महत्त्व देऊ लागला होता, की केवळ देवाला जी उपासना मिळाली पाहिजे ती आपल्याला मिळावी अशी तो कामना बाळगू लागला. *—मत्तय ४:८, ९.
सैतानाचे बंड एदेन बागेत प्रकट झाले. तेथे त्याने हव्वेला फसवून तिला देवाने मना केलेले फळ खाण्यास प्रवृत्त केले. या जगात खोटे बोलणारा तो पहिलाच होता. तसेच त्याने यहोवावर खोटे आरोप करून त्याची निंदा केली आणि अशारितीने त्याने स्वतःला “लबाडीचा बाप” बनवले. शिवाय, आदाम व हव्वेला देवाची आज्ञा मोडायला लावून त्याने त्यांना पापाचे दास बनवले व याच्या परिणामस्वरूप शेवटी त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्या भावी पिढ्यांवरही मृत्यू ओढावला. अशारितीने सैतानाने स्वतःला “मनुष्यघातक” बनवले. खरोखर तो सबंध इतिहासातला सर्वात भयंकर खूनी आहे!—उत्पत्ति ३:१-६; रोमकर ५:१२.
२ पेत्र २:४) सैतानाप्रमाणेच या दुरात्म्यांनी मानवांसोबत अयोग्य संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी हे ज्याप्रकारे केले ते अनैसर्गिक होते. या दुरात्म्यांनी मानवी कन्यांसोबत लैंगिक संबंध ठेवले आणि याचा परिणाम अतिशय विनाशकारक होता.
सैतानाच्या दुष्ट प्रभावातून आत्मिक प्राणी देखील सुटले नाहीत. यहोवाविरुद्ध बंड करण्यात आपणास साथ देण्याकरता सैतानाने इतर देवदूतांनाही उद्युक्त केले. (पृथ्वी दुष्टाईने भरून जाते
बायबल सांगते: “भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांस कन्या झाल्या तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” (उत्पत्ति ६:१, २) हे खऱ्या देवाचे ‘पुत्र’ कोण होते? ते मानव नव्हेत तर आत्मिक प्राणी होते. (ईयोब १:६; २:१) हे आपण कशावरून म्हणू शकतो? एक गोष्ट म्हणजे, मानवी स्त्रीपुरुषांमध्ये विवाह गेल्या १,५०० वर्षांपासून होत होते. याविषयी खास उल्लेख करण्याची गरज नव्हती. त्याअर्थी, खऱ्या देवाच्या ‘पुत्रांनी’ मानवी शरीर धारण करून ‘मानवकन्यांशी’ विवाह केला असे म्हणताना हा अहवाल, निश्चितच पूर्वी कधीही घडले नव्हते असे काहीतरी, अपवादात्मक घडल्याचे सूचित करतो.
हे विवाह अपवादात्मक होते, हे त्यांना झालेल्या मुलांवरूनही स्पष्ट होते. या मुलांना नेफिलिम म्हणण्यात आले. संकरित संतती असलेली ही मुले मोठी होऊन राक्षस बनली. हे राक्षस लोकांवर क्रूरतेने अत्याचार करत. खरे तर “नेफिलिम” या शब्दाचा अर्थ “पाडणारे” किंवा “इतरांना खाली पाडणारे” असा होतो. “ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले,” असे या महाकाय राक्षसांचे वर्णन बायबलमध्ये केले आहे.—उत्पत्ति ६:४.
नेफिलिम व त्यांना जन्म देणाऱ्या बंडखोर देवदुतांनी अतिशय घृणास्पद प्रकारची दुष्ट कृत्ये केली. उत्पत्ति ६:११ म्हणते, “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” होय, मानवांनी त्यांच्या समाजात आलेल्या या नवीन सदस्यांच्या हिंस्र व दुष्ट मार्गांचे अनुकरण केले.
नेफिलिम व त्यांना जन्म देणाऱ्या त्या बंडखोर देवदुतांनी मानवांवर इतका शक्तिशाली दुष्ट प्रभाव कसा काय टाकला? मनुष्याच्या पापी प्रवृत्तीचा व इच्छांचा गैरवापर करून. यामुळे काय परिणाम झाला? “पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली.” शेवटी, यहोवाने जागतिक प्रलयात त्या जगाचा विनाश केला आणि केवळ नीतिमान नोहा व त्याच्या कुटुंबाला त्याने वाचवले. (उत्पत्ति ६:५, १२-२२) पण मानवी शरीरे धारण केलेल्या देवदूतांची मात्र लाजिरवाणी स्थिती झाली आणि ते आत्मिक क्षेत्रात परतले. आपल्या मानाच्या पदावरून पडलेले हे दुरात्मे देवाचा व एकनिष्ठ देवदुतांच्या त्याच्या नीतिमान कुटंबाचा विरोध करत राहिले. त्या काळापासून देवाने या दुरात्म्यांना पुन्हा मानवी शरीरे धारण करण्यास मनाई केली आहे असे दिसते. (यहूदा ६) तरीपण ते आजही मानवी कारभारांवर जोरदार प्रभाव पाडतात.
त्या दुष्टाला पूर्णपणे उघडकीस आणणे!
सैतानाचा दुष्ट प्रभाव किती व्यापक आहे हे १ योहान ५:१९ यात प्रकट केले आहे. ते म्हणते, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” दियाबल मानवांना अशी कृत्ये करण्यास उद्युक्त करत आहे की ज्यांमुळे त्यांच्यावरील संकटे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. किंबहुना, आता तर तो अधिकच हानी करू इच्छितो. का? कारण १९१४ साली देवाचे राज्य स्थापित झाल्यानंतर सैतान व त्याच्या दुरात्म्यांची स्वर्गातून हकालपट्टी करण्यात आली. याविषयी बायबलमध्ये अशारितीने भाकीत करण्यात आले होते: ‘पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.’ (प्रकटीकरण १२:७-१२) आज सैतान मानवजातीवर कशाप्रकारे प्रभाव टाकतो?
मुख्यतः तो लोकांच्या विचारसरणीवर व कृत्यांवर नियंत्रण करील अशाप्रकारच्या प्रवृत्तीला प्रोत्साहित करण्याद्वारे असे करतो. त्याअनुषंगाने इफिसकर २:२ दियाबलाला “अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा [किंवा, प्रबल प्रवृत्तीचा] अधिपती” म्हणते. देवाचे भय व चांगुलपणाला प्रोत्साहन देण्याऐवजी हा दुरात्मिक ‘आत्मा’ देवाविरुद्ध व त्याच्या दर्जांविरुद्ध बंड करण्यास लोकांना उद्युक्त करतो. अशारितीने सैतान व त्याचे दुरात्मे मानवांनी केलेल्या दुष्टाईला प्रोत्साहन देतात व ती वाढवतात.
“आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर”
या दुरात्मिक प्रभावाचा एक पुरावा म्हणजे अश्लील साहित्य चाळण्याचा लोकांना लागलेला भयानक रोग. या अश्लील साहित्यामुळे अयोग्य लैंगिक इच्छा चेतवल्या जातात आणि विकृत वर्तनही आकर्षक वाटू लागते. (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) बलात्कार, दुसऱ्यांना यातना देऊन त्यातून विकृत आनंद मिळवणे, सामूहिक बलात्कार, पशुसंभोग आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण हे काही विषय आहेत जे अश्लील साहित्यात करमणुकीसाठी वापरले जातात. कमी घातक प्रकारचे अश्लील साहित्य देखील ते पाहणाऱ्यांना किंवा वाचणाऱ्यांना अपाय करते कारण त्यांना अशाप्रकारचे साहित्य चाळण्याची सवयच लागते. * हा दुष्टाईचा असा एक प्रकार आहे जो मानवांचे आपसांतील संबंध आणि मानवाचे देवासोबतचे संबंध देखील बिघडवतो. अश्लील साहित्य त्याचा पुरस्कार करणाऱ्या त्या दुरात्म्यांची नीच मानसिकता प्रतिबिंबित करते ज्यांच्या लैंगिक वासना नोहाच्या काळातील जलप्रलयाआधीच्या जगाइतक्या जुन्या आहेत.
बुद्धिमान शलमोनाने उगीचच असा सल्ला दिला नाही, की “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) प्रत्यक्षात, अश्लील साहित्याच्या धोक्यापासून आपल्या अंतःकरणाचे रक्षण करण्याकरता उत्तेजक चित्रे पडद्यावर आल्यास तुम्ही टीव्हीचे चॅनल बदलले पाहिजे किंवा कंप्युटर बंद केला पाहिजे. आणि याबाबतीत लगेच व निर्णायक कृती करणे महत्त्वाचे आहे! अशी कल्पना करा की तुम्ही एक सैनिक आहात आणि तुमच्या हृदयावर रोखलेल्या क्षेपणास्त्राचा प्रतिकार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. सैतान तुमच्या सर्व इच्छांचे व प्रेरणेचे मूलस्थान असलेल्या तुमच्या लाक्षणिक हृदयाला किंवा अंतःकरणाला आपले लक्ष्य बनवतो व त्यास भ्रष्ट करू पाहतो.
अश्लील गोष्टींसोबतच तुम्ही हिंसाचाराची आवड धरण्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण केले पाहिजे कारण दियाबलाला हे माहीत आहे की यहोवाला “आततायी [“हिंसाचाराची आवड धरणाऱ्या,” NW] माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) तुम्हाला देवाचा शत्रू बनवण्याकरता सैतानाला तुमच्या हातून रक्तपाताची कृत्ये करवून घ्यावी लागत नाहीत; फक्त तुमच्या मनात हिंसाचाराची आवड उत्पन्न करणे व ती वाढवणे पुरेसे आहे. आज हिंसाचार व सहसा त्याच्यासोबत जुळलेले भूतविद्येचे विषय प्रसिद्धी माध्यमांत भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत यात काही आश्चर्य नाही. नेफिलिम केव्हाच पृथ्वीतलावरून नाहीसे झाले पण त्यांची प्रवृत्ती व वर्तन आजही पाहायला मिळते! तुम्ही ज्याप्रकारचे मनोरंजन निवडता त्यावरून तुम्ही सैतानाच्या दुष्ट मनसुब्यांचा विरोध करता हे दिसून येते का?—२ करिंथकर २:११.
सैतानाच्या दुष्ट प्रभावाचा प्रतिकार कसा करावा?
या दुष्ट शक्ती अतिशय बलशाली भासू शकतात. स्वतःच्या अपरिपूर्ण शरीराच्या दुर्बलतेशी संघर्ष करण्यासोबतच बायबल सांगते की देवाला संतुष्ट करु इच्छिणाऱ्यांचे “झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” या संघर्षात विजयी होण्याकरता आणि देवाची कृपा मिळवण्याकरता आपण देवाच्या अनेक तरतुदींचा फायदा करून घेतला पाहिजे.—इफिसकर ६:१२; रोमकर ७:२१-२५.
या तरतुदींपैकी एक म्हणजे देवाचा पवित्र आत्मा, जी या विश्वातली सर्वात सामर्थ्यशाली शक्ती आहे. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना असे लिहिले: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.” (१ करिंथकर २:१२) जे देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात ते देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींची आवड धरतात आणि त्याला ज्यांचा वीट आहे अशा गोष्टींचा द्वेष करतात. (आमोस ५:१५) एक व्यक्ती पवित्र आत्मा कसा मिळवू शकते? मुख्यतः प्रार्थना करण्याद्वारे व बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, कारण बायबल हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच रचलेले आहे. तसेच, त्या व्यक्तीने जे खरोखर देवावर प्रेम करतात अशा लोकांसोबत संगती केली पाहिजे.—लूक ११:१३; २ तीमथ्य ३:१६; इब्री लोकांस १०:२४, २५.
यहोवाच्या या तरतुदींचा तुम्ही फायदा करून घेतल्यास तुम्ही जणू “देवाची शस्त्रसामग्री” धारण करण्यास सुरुवात करता. “सैतानाच्या डावपेचांपुढे” टिकाव धरण्याकरता केवळ ही शस्त्रसामग्रीच तुम्हाला संरक्षण देऊ शकते. (इफिसकर ६:११-१८) या तरतुदींचा पुरेपूर फायदा करून घेणे आज कधी नव्हे इतके तातडीचे आहे. ते का?
दुष्टाईचे दिवस भरले आहेत!
“दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच,” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले आहे. (स्तोत्र ९२:७) नोहाच्या काळाप्रमाणेच आजही दुष्टाईची होत असलेली भरभराट हेच दाखवते की लवकरच देव न्यायनिवाडा करेल. फक्त दुष्ट मानवांचाच नव्हे तर सैतान व त्याच्या दुरात्म्यांचाही. त्यांना अक्रियाशीलतेच्या अगाधकूपात टाकले जाईल आणि कालांतराने त्यांचा सर्वनाश केला जाईल. (२ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण २०:१-३, ७-१०) हा न्यायनिवाडा कोण प्रत्यक्षात घडवून आणेल? अर्थातच येशू ख्रिस्त कारण त्याच्याविषयी बायबल असे सांगते: “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.”—१ योहान ३:८.
दुष्टाईचा कायमचा नाश व्हावा असे तुम्हालाही वाटत नाही का? तर मग, बायबलमधील अभिवचने निश्चितच तुम्हाला सांत्वन देतील. सैतानच दुष्टाईचे मूळ कारण आहे हे दुसरा कोणताही ग्रंथ उघडकीस आणत नाही. आणि दुसरा कोणताही ग्रंथ हे सांगत नाही की त्याचा आणि त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा कायमचा नाश कशाप्रकारे केला जाईल. आम्ही तुम्हाला बायबलमधून अचूक ज्ञान घेण्याचे प्रोत्साहन देऊ इच्छितो. जेणेकरून तुम्हाला आजच्या काळात सैतानाच्या दुष्ट प्रभावांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल आणि दुष्टाईपासून मुक्त झालेल्या एका जगात राहण्याची हमी मिळू शकेल.—स्तोत्र ३७:९, १०. (w०७ ६/१)
[तळटीपा]
^ परि. 5 सैतान बनलेल्या देवदूताचे मूळ नाव बायबलमध्ये सांगितलेले नाही. “सैतान” व “दियाबल” या संज्ञांचा अर्थ अनुक्रमे “विरोधक” व “निंदक” असा होतो. काही बाबतीत सैतानाने निवडलेला मार्ग सोरेच्या राजाच्या वर्तनासारखा होता. (यहेज्केल २८:१२-१९) दोघेही सुरुवातीला निर्दोष होते पण कालांतराने दोघेही स्वतःच्याच गर्विष्ठपणाला बळी पडले.
^ परि. 17 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सावध राहा! मासिकाच्या ऑक्टोबर-डिसेंबर, २००३ अंकातील “अश्लील साहित्य अनपायकारक की अपायकारक?” ही लेखमाला पाहावी.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
काही प्रमाणात तथ्य असलेल्या अख्यायिका
सबंध जगातील प्राचीन दंतकथांमध्ये गंधर्व, राक्षस व एका महाजलप्रलयाचे वर्णन आढळते. उदाहरणार्थ, गिल्गमेशच्या अक्कादी महाकाव्यात एक जलप्रलय, जहाज आणि प्रलयातून जिवंत बचावलेल्यांचा उल्लेख आहे. गिल्गमेश स्वतः एक कामातूर, हिंसक गंधर्व होता, म्हणजे अर्धवट मनुष्य आणि अर्धवट देवता होता असे त्याच्याविषयी वर्णन आढळते. ॲझ्टेक दंतकथेत प्राचीन जगात अनेक राक्षस राहात असल्याचा आणि एक महान जलप्रलय आल्याचा उल्लेख आहे. नोर्स अख्यायिका राक्षसांविषयी आणि बार्गेलमर नावाच्या एका बुद्धिमान माणसाविषयी सांगतात ज्याने एक मोठी नाव तयार करून स्वतःला व आपल्या पत्नीला वाचवले. प्राचीन दुष्ट जगाच्या महाजलप्रलयात झालेल्या नाशातून जे मोजके मानव बचावले त्यांच्यापासून सर्व मानवजात आली आहे या बायबलमधील प्रेरित वचनाला या सर्व पारंपरिक कथा पुष्टी देतात.
[चित्र]
गिल्गमेशच्या महाकाव्याचा कोरीव शिलालेख
[चित्राचे श्रेय]
The University Museum, University of Pennsylvania (neg. # २२०६५)
[५ पानांवरील चित्र]
आजच्या काळातले लोक नेफिलिमसारखेच झाले आहेत
[७ पानांवरील चित्र]
अचूक ज्ञान दुष्ट प्रभावांपासून आपले संरक्षण करते