दुष्टाई—हाताबाहेर गेली आहे का?
दुष्टाई—हाताबाहेर गेली आहे का?
एका लहानशा मुलाने, मैदानात पडलेली वस्तू काय आहे म्हणून पाहायला उचलली आणि तो कायमचा अंधळा आणि विद्रूप होऊन बसला. त्याने नकळत एक सुरुंग उचलला होता. एक आई आपल्या नवजात बालकाला सोडून गेली. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरापेटीत तिने त्याला लपवले होते. नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या एका कामगाराने आपल्या सर्व सहकर्मचाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले आणि शेवटी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. एका प्रतिष्ठित नागरिकाने असाहाय्य मुलांवर लैंगिक अत्याचार केले.
अशा दुष्ट कृत्यांच्या बातम्या आजकाल अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण याहीपेक्षा दुःखाची गोष्ट म्हणजे, जातीय हिंसाचार व दहशतवादाच्या बातम्यांपुढे या बातम्या फिक्या पडतात. १९९५ साली प्रकाशित झालेल्या एका संपादकीय लेखात असे म्हटले होते: “[या शतकाला] सैतानाचे शतक हे नाव अगदी योग्य ठरेल. इतिहासात पूर्वी केव्हाही जाती, धर्म किंवा वर्गाच्या नावाखाली लक्षावधी लोकांना जिवे मारण्याची इतकी व्यापक क्षमता आणि इतकी उत्कट इच्छा लोकांमध्ये दिसून आली नाही.”
दुसरीकडे पाहता, मनुष्य हवा प्रदूषित करत आहेत, जमिनीला विषारी बनवत आहेत, पृथ्वीची साधनसंपत्ती नष्ट करत आहेत आणि असंख्य प्राण्यांना नामशेष होण्याच्या वाटेला लावत आहेत. या सर्व दुष्ट कृत्यांवर मात करून हे जग राहण्याकरता सुखमय व सुरक्षित बनवणे मनुष्याच्या हातात आहे का? की असे करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे? दुष्टाईच्या विषयावर बरेच लिखाण केलेल्या एका प्राध्यापकाने असे म्हटले: “आपण या जगात काहीतरी बदल घडवून आणावा, सुधारणा करावी असे मला मनापासून वाटत होते. पण या जगात कोणतीच सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.” कदाचित तुम्हालाही या प्राध्यापकाप्रमाणे वाटत असेल.
हे जग दिवसेंदिवस ज्याप्रकारे वाटचाल करत आहे त्याची तुलना एका अशा जहाजाशी करता येईल की जे खवळलेल्या व अतिशय धोकेदायक समुद्रात प्रवास करत आहे. कोणालाही पुढे जाण्याची इच्छा नसूनही, जहाज मागे फिरवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरतात. ते पुढे पुढे जात राहते, त्याला थांबवण्याचा मार्गच नाही. समोरच्या भयानक वादळाला तोंड देण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही.
काही प्रमाणात जगाच्या बिघडतच चाललेल्या या परिस्थितीला मानवाची स्वाभाविक अपरिपूर्णता जबाबदार आहे. (रोमकर ३:२३) तरीपण दुष्टाईचे प्रमाण, तिची व्यापकता आणि निरंतरता पाहून केवळ मनुष्याची स्वाभाविक दुष्ट प्रवृत्ती याला कारणीभूत असेल असे वाटत नाही. मनुष्यजातीवर एखादी अदृश्य पण सामर्थ्यशाली दुष्ट शक्ती तर नियंत्रण करत नसेल? जर असे असेल तर मग आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? पुढच्या लेखात या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. (w०७ ६/१)
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Heldur Netocny/Panos Pictures