व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला वास्तविक वाटते का?

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला वास्तविक वाटते का?

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला वास्तविक वाटते का?

“पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

१. मृत्यू अटळ का वाटतो?

“या जगात मृत्यू आणि कर या दोन्ही गोष्टी अटळ आहेत.” सन १७८९ साली अमेरिकेचे मुसद्दी बेंजमिन फ्रँकलिन यांनी लिहिलेले हे विधान काहींना प्रगल्भ वाटले. परंतु, पुष्कळ अप्रामाणिक लोक आपले कर चुकवतात. मृत्यू मात्र कोणीही चुकवू शकत नाही. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर आपल्यातील कोणीही मृत्यू टाळू शकत नाही. तो आपल्या सर्वांचा पाठलाग करतो. मानवजातीची सर्वसाधारण कबर असलेल्या शिओलला जणू काय कधीही न शमणारी भूक लागली आहे—आपल्या प्रिय जनांना ती गिळंकृत करते. (नीतिसूत्रे २७:२०) पण आपल्यासाठी एक सांत्वनदायक विचार आहे.

२, ३. (क) काहींसाठी मृत्यू अटळ का नाही, हे पुष्कळ लोकांना का कळत नाही? (ख) या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

यहोवाचे वचन पुनरुत्थानाची अर्थात पुन्हा एकदा जिवंत केले जाण्याची पक्की आशा देते. हे केवळ एक स्वप्न नव्हे आणि विश्‍वातील कोणतीही शक्‍ती यहोवाला ही आशा खरी करण्यापासून रोखू शकत नाही. परंतु पुष्कळ लोकांना हे कळत नाही, की काही लोकांना मृत्यू अटळ नाही. का? कारण एक अगणित “मोठा लोकसमुदाय” “मोठ्या संकटातून” लवकरच वाचणार आहे. (प्रकटीकरण ७:९, १०, १४) यानंतर मोठ्या लोकसमुदायातील लोक सदासर्वकाळ जगतील. अशाप्रकारे या लोकांसाठी मृत्यू अटळ नाही. शिवाय, मृत्यूला ‘नाहीसे केले जाईल.’—१ करिंथकर १५:२६.

प्रेषित पौलाला पुनरुत्थानाविषयी जशी पक्की खात्री होती तशी आपल्याला देखील असली पाहिजे. त्याने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) पुनरुत्थानाविषयी आपण तीन प्रश्‍नांचा विचार करू या. पहिला प्रश्‍न, कोणत्या कारणामुळे ही आशा इतकी पक्की बनते? दुसरा, पुनरुत्थानाच्या आशेतून तुम्ही स्वतः सांत्वन कसे मिळवू शकता? आणि तिसरा, तुम्ही आता ज्याप्रकारे तुमचे जीवन व्यतीत करत आहात त्यावर या आशेचा कशाप्रकारे प्रभाव पडू शकतो?

पुनरुत्थान—निश्‍चित होणार

४. पुनरुत्थानाची आशा ही देवाच्या उद्देशातील सर्वात प्रमुख कशी आहे?

पुनरुत्थान निश्‍चित होणार यासाठी अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, ते यहोवाच्या उद्देशांत सर्वात प्रमुख आहे. तुम्हाला आठवत असेल, सैतानाने मानवजातीला पाप करण्यास लावले ज्याचा अटळ परिणाम मृत्यू होता. म्हणूनच येशूने सैतानाविषयी असे म्हटले: “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता.” (योहान ८:४४) पण यहोवाने असे वचन दिले आहे की, त्याची “स्त्री,” अर्थात स्वर्गातील पत्नीसमान संघटना अशी एक “संतती” उत्पन्‍न करील जी ‘जुनाट सापाचे’ डोके फोडेल अर्थात सैतानाचा कायमचा नाश करेल. (उत्पत्ति ३:१-६, १५; प्रकटीकरण १२:९, १०; २०:१०) या मशिही संततीविषयी यहोवाने जसजसा आपला उद्देश प्रकट केला तसतसे हे साफ दिसू लागले, की मशिही संतती फक्‍त सैतानाचा नाश करून थांबणार नाही तर आणखी बरेच काही करणार आहे. देवाचे वचन म्हणते: “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.” (१ योहान ३:८) आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाचा परिणाम मृत्यू हा, त्या सैतानाच्या कृत्यांपैकी सर्वात प्रमुख कृत्य आहे ज्याला येशू ख्रिस्ताद्वारे निकामी करण्याचा यहोवाचा उद्देश आहे. याबाबतीत येशूची खंडणी आणि पुनरुत्थान या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.—प्रेषितांची कृत्ये २:२२-२४; रोमकर ६:२३.

५. पुनरुत्थान यहोवाच्या नावाचे गौरव का करेल?

यहोवाने आपल्या पवित्र नामाचे गौरव करण्याचा चंग बांधला आहे. सैतानाने देवाच्या नावाची निंदा केली आहे आणि त्याच्याविषयी लबाड्या पसरविल्या आहेत. आदाम आणि हव्वेने, देवाने मना केलेले फळ खाल्ले तर ते ‘खरोखर मरणार नाहीत’ असे तो खोटे बोलला. (उत्पत्ति २:१६, १७; ३:४) तेव्हापासून सैतानाने अशा अनेक लबाड्या पसरविल्या आहेत; जसे की, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो, यासारख्या खोट्या शिकवणी दिल्या आहेत. परंतु पुनरुत्थानाद्वारे यहोवा या सर्व खोट्या शिकवणुकींचे बिंग फोडणार आहे. तो हे सिद्ध करून दाखवेल, की केवळ तोच जीवन टिकवणारा व पुन्हा जीवदान देणारा आहे.

६, ७. लोकांचे पुनरुत्थान करण्याविषयी यहोवाला कसे वाटते, आणि त्याच्या काय भावना आहेत हे आपल्याला कसे माहीत होते?

यहोवा पुनरुत्थान करण्यास आतुर आहे. याबाबतीत यहोवाच्या काय भावना आहेत हे बायबल अगदी स्पष्टपणे दाखवून देते. जसे की, विश्‍वासू ईयोबाने लिहिलेल्या ईश्‍वरप्रेरित शब्दांचा विचार करा: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१४, १५) या शब्दांचा काय अर्थ होतो?

ईयोबाला माहीत होते, की त्याच्या मृत्यूनंतर त्याला मृत्यूच्या निद्रेत थांबून राहावे लागेल. या काळाला त्याने “कष्टमय सेवेचे” दिवस अर्थात त्याची सूटका होईपर्यंत थांबून राहावे लागण्याचे दिवस म्हटले. त्याची निश्‍चित सूटका होईल हे त्याला माहीत होते. त्याला मुक्‍तता मिळेल याची खात्री होती. का? कारण त्याला यहोवाच्या भावना माहीत होत्या. आपल्या विश्‍वासू सेवकाला पुन्हा पाहण्याची यहोवाला “उत्कंठा लागेल.” होय, सर्व धार्मिक व्यक्‍तींना पुन्हा जिवंत करण्यास देव आतुर आहे. पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची संधी देखील तो इतरांना देईल. (लूक २३:४३; योहान ५:२८, २९) हा उद्देश पूर्ण करण्याची देवाचीच इच्छा आहे तर कोण त्याला अडवू शकेल?

८. आपल्या भवितव्याच्या आशेसाठी यहोवाने कशाप्रकारे “प्रमाण” दिले आहे?

भवितव्याबद्दलच्या आपल्या आशेला, येशूच्या पुनरुत्थानाद्वारे हमी मिळते. पौलाने अथेन्समध्ये एक भाषण दिले. त्याने असे म्हटले: “[देवाने] असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्‍याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:३१) पौलाच्या श्रोत्यांतील काहींनी पुनरुत्थानाविषयी ऐकले तेव्हा त्याची थट्टा केली. पण काहींनी विश्‍वास ठेवला. या आशेचे प्रमाण देण्यात आले आहे, या विचाराने कदाचित ते आकर्षित झाले असावेत. यहोवाने येशूचे पुनरुत्थान करून सर्वात मोठा चमत्कार केला. त्याने आपल्या पुत्राला एक शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍ती म्हणून मृतांतून पुन्हा जिवंत केले. (१ पेत्र ३:१८) पुनरुत्थित येशू, मानवपूर्व अस्तित्वात तो ज्या स्थितीत होता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. येशू अमर आहे व यहोवाच्या खालोखाल तोच आहे ज्याच्याजवळ अमर्याद शक्‍ती आहे. आपल्या पित्याकडून मिळालेल्या भारी जबाबदाऱ्‍या घेण्यास तो सज्ज आहे. यहोवा इतर सर्व पुनरुत्थाने मग ती स्वर्गातील जीवनासाठी असोत अथवा पृथ्वीवरील जीवनासाठी असोत, येशूमार्फत करणार आहे. स्वतः येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” (योहान ५:२५; ११:२५) आपल्या पुत्राला पुनरुत्थित करण्याद्वारे यहोवाने सर्व विश्‍वासू जनांच्या आशेची हमी दिली.

९. बायबलमधील अहवाल, पुनरुत्थानाच्या वास्तविकतेचा पुरावा कसा सिद्ध करतो?

पुनरुत्थाने झाल्याचे लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आणि देवाच्या वचनातही त्यांचा अहवाल लिहून ठेवण्यात आला. बायबलमध्ये, पृथ्वीवर मानव म्हणून पुन्हा जिवंत केलेल्या आठ लोकांच्या पुनरुत्थानांचे सविस्तर वर्णन आहे. हे चमत्कार गुप्तपणे करण्यात आले नाहीत तर लोकांच्यासमोर करण्यात आले. लाजरला मरून चार दिवस झाले होते. येशूने लाजरचे पुनरुत्थान एका मोठ्या शोक करणाऱ्‍या समुदायासमोर केले; या समुदायात अर्थातच लाजरच्या कुटुंबातले सदस्य, मित्रजन व शेजारी उपस्थित होते. येशूला देवाने पाठविले आहे हा पुरावा इतका जबरदस्त होता, की येशूचे धार्मिक शत्रू देखील जे काही घडले ते नाकारू शकत नव्हते. त्यांना नाकारता येत नव्हते म्हणून त्यांनी फक्‍त येशूलाच नव्हे तर लाजरला देखील ठार मारण्याचा कट रचला! (योहान ११:१७-४४, ५३; १२:९-११) होय, आपण हा भरवसा बाळगू शकतो, की पुनरुत्थान निश्‍चित होणार. आपले सांत्वन करण्यासाठी व आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी यहोवाने आपल्याला गत काळातील पुनरुत्थानांचा अहवाल दिला आहे.

पुनरुत्थानाच्या आशेतून सांत्वन मिळवणे

१०. बायबलमधील पुनरुत्थानाच्या अहवालांतून सांत्वन मिळण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकेल?

१० मृत्यूची टांगती तलवार आपल्या डोक्यावर लटकत असते तेव्हा आपण सांत्वन मिळवण्यास आसूसलेलो असतो का? सांत्वनाचा एक स्रोत बायबलमधील पुनरुत्थानाच्या अहवालात आहे. असे अहवाल वाचल्याने, त्यांच्यावर मनन केल्याने व त्या घटना जणू काय आपल्या डोळ्यांपुढे घडत आहेत अशी कल्पना केल्याने पुनरुत्थानाची आशा आपल्याला आणखी खरी वाटेल. (रोमकर १५:४) बायबलमधील हे अहवाल केवळ कथा नाहीत. त्या, एका खऱ्‍या कालावधीत व खऱ्‍या ठिकाणी राहणाऱ्‍या आपल्यासारख्या खऱ्‍या लोकांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी आहेत. आपण केवळ एका उदाहरणावर संक्षिप्तपणे लक्ष केंद्रित करूया. हा बायबलमधील पुनरुत्थानाचा पहिला अहवाल आहे.

११, १२. (क) सारफथच्या विधवेवर कोणते संकट कोसळते, व ती सुरुवातीला कशी प्रतिक्रिया दाखवते? (ख) यहोवाने एलीयाला या विधवेसाठी काय करण्याची शक्‍ती दिली ते सांगा.

११ कल्पना करा. काही आठवड्यांपासून संदेष्टा एलीया, सारफथ नगरात राहणाऱ्‍या एका विधवा स्त्रीच्या घरी, माडीवर पाहुणा म्हणून राहत आहे. तो दुःखद काळ आहे. कारण त्या भागात कोरड व दुष्काळ पडला आहे. पुष्कळ लोक मरत आहेत. या नम्र विधवेच्या विश्‍वासाचे तिला प्रतिफळ देण्याकरता यहोवाने एलीयाचा तिच्यासाठी एक असा चमत्कार करण्यास उपयोग करून घेतला की जो दीर्घकाळपर्यंत टिकला. या विधवा स्त्रीची आणि तिच्या मुलाची उपासमार होणार होती; कारण त्यांच्याकडे केवळ एक वेळेला पुरेल इतकेच अन्‍न उरले होते. पण एलीयाने चमत्कार केला. त्यांच्या घरातील पीठ व तेल हे संपलेच नाही. पण आता त्यांच्यावर एक दुसरे संकट कोसळते. मुलगा आजारी पडतो आणि त्याचा श्‍वासच थांबतो. विधवा पार उद्धवस्थ होते! नवऱ्‍याच्या आधाराविना ती कशीबशी एकटी राहत होती आणि आता तर तिचा एकुलता एक मुलगा देखील मृत्यूमुखी पडतो. तिच्या दुःखामुळे ती एलीया आणि त्याचा देव यहोवा या दोघांनाही नाव ठेवते! आता संदेष्टा काय करेल?

१२ विधवेने लावलेल्या खोट्या आरोपांसाठी एलीया तिला रागवत नाही. उलट तो म्हणतो: “तुझ्या मुलास घेऊन ये.” मृत मुलाला माडीवर नेऊन एलीया मुलाला पुन्हा जिवंत करावे म्हणून अनेकदा प्रार्थना करतो. सरतेशेवटी यहोवा कार्य करतो! मुलगा श्‍वास घ्यायला लागल्यामुळे त्याची छाती वर-खाली होताना पाहून एलीयाचा चेहरा आनंदाने कसा खुलला असेल याची कल्पना करा! मुलगा आपल्या पापण्या उघडतो आणि त्याचे डोळे चमकू लागतात. एलीया मुलाला खाली आणतो आणि आपल्या आईकडे त्याला सोपवत म्हणतो: “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.” आपल्या मुलाला पुन्हा जिवंत झालेला पाहून विधवेला किती आनंद झाला असेल याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती म्हणते: “आपण देवाचे माणूस आहा आणि परमेश्‍वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.” (१ राजे १७:८-२४) यहोवा आणि त्याचा प्रतिनिधी यांच्यावरील तिचा विश्‍वास पहिल्यापेक्षा अधिक भक्कम होतो.

१३. एलीया विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत करतो हा अहवाल आज आपल्याला दिलासा का देतो?

१३ या अशा अहवालांवर मनन केल्याने तुम्हाला खूप सांत्वन मिळू शकते. आपला शत्रू मृत्यू याची यहोवा नांगी तोडू शकतो हे किती स्पष्ट आहे. कल्पना करा, मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान होईल तेव्हा विधवेला झालेला आनंद पृथ्वीवरील कोट्यवधी रहिवासी अनुभवतील! स्वर्गातही मोठा आनंद होईल कारण तेव्हा यहोवाला, आपल्या पुत्राला पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर पुनरुत्थाने करण्याचे मार्गदर्शन देण्यास आनंद वाटेल. (योहान ५:२८, २९) मृत्यूने तुमच्या कोणा प्रिय व्यक्‍तीला तुमच्यापासून हिरावून घेतले आहे का? यहोवा लोकांना पुन्हा जिवंत करण्यास समर्थ आहे, नव्हे तसे तो करणार आहे, हे माहीत होणे किती दिलासा देणारे आहे नाही का?

तुमची आशा आणि तुमचे आताचे जीवन

१४. पुनरुत्थानाची आशा तुमच्या जीवनावर प्रभाव कसा पाडू शकते?

१४ पुनरुत्थानाची आशा तुम्ही ज्याप्रकारे तुमचे जीवन आता जगत आहात त्यावर प्रभाव कसा पाडू शकते? तुम्ही जेव्हा कठीण परिस्थितींना, आव्हानांना, छळाला किंवा जीवघेण्या परिस्थितीला तोंड देता तेव्हा या आशेतून शक्‍ती मिळवू शकता. सुरक्षिततेच्या कुठल्यातरी फुसक्या वायद्यासाठी तुम्ही तुमची एकनिष्ठा सोडून द्यायला तयार व्हावे म्हणून सैतान तुमच्या मनात मृत्यूचे भय उत्पन्‍न करू इच्छितो. सैतान यहोवाला काय म्हणाला होता ते आठवा: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) हे असे विधान करून सैतानाने आपल्या सर्वांवर, हो तुमच्यावरही खोटा दोषारोप लावला आहे. तुमच्यासमोर जर एखादा जीवघेणा प्रसंग आला तर तुम्ही यहोवा देवाची सेवा सोडून द्याल का? पुनरुत्थानाच्या आशेवर मनन करून तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करीत राहण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का करू शकता.

१५. आपण जीवघेण्या परिस्थितीत असतो तेव्हा मत्तय १०:२८ मधील येशूच्या शब्दांतून सांत्वन कसे मिळवू शकतो?

१५ येशूने म्हटले: “जे शरीराला वधतात पण जिवाला वधायला समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यांपेक्षा जिवाला व शरीरालाही गेहेन्‍नात टाकून त्यांचा नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या.” (मत्तय १०:२८, पं.र.भा.) आपण सैतान किंवा त्याच्या मानवी हस्तकांना घाबरण्याचे काही एक कारण नाही. हे खरे आहे, की काहींमध्ये आपल्याला इजा पोहंचवण्याची, आपल्याला ठार मारण्याची शक्‍ती आहे. पण, ते आपल्याला सर्वात वाईटातली वाईट वागणूक देऊ शकत असले तरी ती तात्पुरती आहे. आपल्या विश्‍वासू सेवकांना जी जी हानी सहन करावी लागते ती सर्व तो भरून काढण्यास, होय मृत्यूतून पुन्हा जिवंत करण्यासही समर्थ आहे. त्यामुळे आपण केवळ त्याचेच भय बाळगले पाहिजे; हे आदरयुक्‍त भय आहे. केवळ त्याच्याकडेच, आपले जीवन आणि भवितव्यातील जीवनाची आशा काढून घेण्याचे अर्थात जिवाला व शरीराला गेहेन्‍नात टाकण्याचे सामर्थ्य आहे. पण तुमच्याबाबतीत असे व्हावे अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. (२ पेत्र ३:९) पुनरुत्थानाच्या आशेमुळे देवाचे सेवक यानात्याने आपण नेहमी ही खात्री बाळगू शकतो, की आपण सुरक्षित आहोत. आपण जोपर्यंत विश्‍वासू राहू तोपर्यंत आपल्यापुढे सार्वकालिक जीवन आहे. आणि सैतान आणि त्याचे बगलबच्चे याबाबतीत काही करू शकत नाहीत.—स्तोत्र ११८:६; इब्री लोकांस १३:६.

१६. पुनरुत्थानाच्या आशेचा, जीवनात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो त्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो?

१६ पुनरुत्थानाची आशा आपल्याला खरी वाटत असेल तर जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलेल. आपण “जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो,” हे आपल्याला माहीत आहे. (रोमकर १४:७, ८) त्यामुळे जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे ठरवताना आपण पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) पुष्कळ लोक, आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक महत्त्वकांक्षा, मनात येणारी प्रत्येक मनीषा पूर्ण करण्यास उतावीळ असतात. जीवन अल्प आहे असे ते समजत असल्यामुळे ते सुखविलासाच्या मागे वेड्यासारखे धावत असतात; आणि ते उपासना जरी करत असले तरी, त्यांची उपासना ही ‘देवाच्या परिपूर्ण इच्छेनुरुप’ नसते.

१७, १८. (क) मानवी जीवनाच्या अल्पतेविषयी यहोवाचे वचन काय कबूल करते, पण आपण काय करावे अशी देवाची इच्छा आहे? (ख) आपण यहोवाची दररोज स्तुती करण्यास का प्रवृत्त होतो?

१७ हे खरे आहे, की जीवन हे अतिशय अल्प आहे. “ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो”—कधीकधी तर ७० किंवा ८० वर्षांतच ते संपते. (स्तोत्र ९०:१०) मानव, हिरव्या गवताप्रमाणे, सावलीप्रमाणे, श्‍वासाप्रमाणे आहेत; येतात आणि नाहीसेही होतात. (स्तोत्र १०३:१५; १४४:३, ४) मानवांनी लहानाचे मोठे होण्यात, बुद्धी व अनुभव संपादन करत आयुष्याचा कळस गाठल्यानंतर मग, आजारपण व नंतर मृत्यूच्या उतरणीला लागायचे, हा देवाचा उद्देश नव्हता. यहोवाने मानवांना चिरकाल जिवंत राहण्याच्या इच्छेसह निर्माण केले. “त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे,” असे बायबल आपल्याला सांगते. (उपदेशक ३:११) देव इतका क्रूर आहे का, की आपल्या मनात अशी इच्छा घालून मग ती पूर्ण करण्यास अशक्य बनवेल? नाही, मुळीच नाही. बायबल म्हणते, की “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) मरण पावलेल्यांना सार्वकालिक जीवन शक्य करून देण्याकरता तो त्यांचे पुनरुत्थान करील.

१८ पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपले भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा आपण जिवंत आहोत तोपर्यंत पूर्ण करण्याचा आपण ध्यास घेण्याची गरज नाही. रसातळाला जात असलेल्या या जगाचा “उपयोग पूर्णपणे” करण्याची गरज नाही. (१ करिंथकर ७:२९-३१; १ योहान २:१७) ज्यांना खरी आशा नाही ते असे करतात. पण आपल्याला एक अद्‌भुत भेट मिळालेली आहे: आपण जर यहोवा देवाशी विश्‍वासू राहिलो तर त्याची स्तुती करण्यासाठी व जीवनाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी आपल्याकडे सदासर्वकाळ आहे, ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे. तेव्हा, जो पुनरुत्थानाची आशा निश्‍चितपणे पूर्ण करेल त्या यहोवाची आपण दररोज स्तुती करू या! (w०७ ५/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• पुनरुत्थानाच्या आशेविषयी आपल्याला कोणती खात्री असली पाहिजे?

• कोणत्या कारणांमुळे पुनरुत्थानाची आशा ही निश्‍चित्त पूर्ण होईल?

• पुनरुत्थानाच्या आशेतून तुम्ही सांत्वन कसे मिळवू शकता?

• तुम्ही ज्याप्रकारे तुमचे जीवन जगता त्यावर पुनरुत्थानाच्या आशेचा प्रभाव कसा पडू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

धार्मिकांचे पुनरुत्थान करण्यासाठी यहोवाला उत्कंठा लागली आहे हे ईयोबाला माहीत होते

[२० पानांवरील चित्र]

“पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे”