व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वयोवृद्ध जन तरुणांसाठी एक आशीर्वाद

वयोवृद्ध जन तरुणांसाठी एक आशीर्वाद

वयोवृद्ध जन तरुणांसाठी एक आशीर्वाद

“मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तोत्र ७१:१८.

१, २. देवाच्या वयोवृद्ध सेवकांनी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे व आपण कोणत्या गोष्टींची पुढे चर्चा करणार आहोत?

पश्‍चिम आफ्रिकेतील एक ख्रिस्ती वडील, एका वयोवृद्ध अभिषिक्‍त बांधवाला भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी त्यांना विचारले: “मग काय म्हणते तब्येत?” तर या बांधवाने त्यांना म्हटले: “मी पळू शकतो, उड्याही मारू शकतो.” हे सर्व सांगताना त्यांनी त्याची ॲक्टींग करून दाखवली. मग ते पुढे म्हणाले: “पण मला उडता येत नाही.” ख्रिस्ती वडिलांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला. ‘मी जे करू शकतो, ते करायला मला आनंद वाटतो, पण मला जे करता येत नाही, ते मी करत नाही.’ भेट द्यायला गेलेले ते वडील आता ऐंशी वर्षांचे आहेत व त्या अभिषिक्‍त बांधवाची विनोदबुद्धी आणि त्यांची एकनिष्ठा अजूनही त्यांना आठवते.

एक वयोवृद्ध व्यक्‍ती आपल्या जीवनात ईश्‍वरी गुण प्रदर्शित करते तेव्हा इतरांवर त्याची अमीट छाप पडू शकते. अर्थात वयाबरोबर बुद्धी आणि ख्रिस्तासारखे गुणही आपोआप येतात असे नाही. (उपदेशक ४:१३) बायबल म्हणते: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) तुम्ही जर वयोवृद्ध असाल तर तुमच्या बोलण्याचा व तुमच्या कृतींचा इतरांना किती फायदा होऊ शकतो, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? वयोवृद्ध बंधूभगिनी, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्‍तींसाठी कितपत प्रोत्साहनदायक ठरू शकतात हे दाखवणारी काही बायबल उदाहरणे आहेत ज्यांचा आपण विचार करूया.

दूरगामी परिणाम असलेला विश्‍वास

३. नोहाच्या विश्‍वासूपणाचा आज हयात असलेल्या सर्वांना कोणता फायदा होतो?

नोहाच्या विश्‍वासाने व दृढतेने जे लाभ उत्पन्‍न केले त्यांचा अगदी आपल्या दिवसांपर्यंत आपल्याला फायदा झाला आहे. नोहाला ६०० वर्षे पूर्ण होणार होती तेव्हा त्याने जहाज बांधायला सुरुवात केली, प्राण्यांना गोळा केले आणि आपल्या शेजाऱ्‍यांना प्रचार केला. (उत्पत्ति ७:६; २ पेत्र २:५) नोहाला देवाचे भय असल्यामुळे तो आपल्या कुटुंबासह महाजलप्रलयातून वाचला आणि आज पृथ्वीवर जिवंत असलेल्या लोकांचा पूर्वज बनला. हे खरे आहे, की नोहा अशा काळात हयात होता जेव्हा लोकांची वयोमर्यादा सहसा जास्त होती. तरीपण, त्याच्या वाढत्या वयातही तो विश्‍वासू राहिला व यामुळे त्याला महत्त्वपूर्ण आशीर्वाद मिळाले. कसे?

४. नोहाच्या दृढतेचा देवाच्या आजच्या सेवकांना फायदा कसा झाला आहे?

नोहा जवळजवळ ८०० वर्षांचा होता तेव्हा निम्रोदने “पृथ्वी व्यापून” टाकण्याविषयी यहोवाने दिलेल्या आज्ञेच्या विरोधात जाऊन बाबेलचा बुरूज बांधायला सुरुवात केली. (उत्पत्ति ९:१; ११:१-९) परंतु, निम्रोदाच्या बंडाळीत नोहाने भाग घेतला नाही. त्यामुळे जेव्हा बंडखोरांच्या भाषेचा गोंधळ उडाला तेव्हा कदाचित नोहाची भाषा बदलली नाही. नोहा केवळ त्याच्या म्हातारपणीच नव्हे तर संपूर्ण जीवनभर विश्‍वासू व दृढ राहिला. तेव्हा, सर्व युगातील देवाच्या सेवकांनी त्याचे अनुकरण करणे योग्य आहे.—इब्री लोकांस ११:७.

कौटुंबिक सदस्यांवर प्रभाव

५, ६. (क) अब्राहाम ७५ वर्षांचा होता तेव्हा यहोवाने त्याला काय करायला सांगितले? (ख) देवाच्या आज्ञेला अब्राहामने कसा प्रतिसाद दिला?

वयोवृद्ध जन आपल्या कौटुंबिक सदस्यांच्या विश्‍वासावर प्रभाव पाडू शकतात हे आपल्याला, नोहानंतरच्या कुलपित्यांच्या जीवनशैलीवरून दिसून येते. अब्राहाम ७५ वर्षांचा होता तेव्हा देवाने त्याला असे सांगितले: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन.”—उत्पत्ति १२:१, २.

कल्पना करा: तुम्हाला आपले घरदार, मित्रपरिवार, तुम्ही ज्या देशात जन्मलात तो देश आणि एकत्र कुटुंबातील सुरक्षितता सोडून एका परक्या देशात जाण्यास सांगितले जाते. अब्राहामला अगदी हेच सांगण्यात आले होते. “परमेश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला” व त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्याची परदेशी म्हणून व कनान देशात भटक्या लोकांप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी डेऱ्‍यात वस्ती होती. (उत्पत्ति १२:४; इब्री लोकांस ११:८, ९) मी तुझ्यापासून “मोठे राष्ट्र” तयार करीन असे यहोवाने अब्राहामाला सांगितले होते, तरीपण त्याची संतती वाढण्याआधीच तो मरण पावला. अब्राहाम वचनयुक्‍त देशात २५ वर्षे भटकंती करीत होता, त्यानंतरच त्याची पत्नी सारा हिला केवळ एकच पुत्र अर्थात इसहाक झाला. (उत्पत्ति २१:२, ५) तरीपण अब्राहाम निराश होऊन तो जेथून आला होता तेथे पुन्हा गेला नाही. विश्‍वास आणि धीराचे किती उत्तम उदाहरण!

७. अब्राहामाच्या धीराचा त्याचा पुत्र इसहाक याच्यावर काय प्रभाव पडला आणि यामुळे मानवजातीवर काय परिणाम झाला?

अब्राहामाच्या धीराचा त्याचा पुत्र इसहाक याच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पडला. इसहाकने त्याचे संपूर्ण आयुष्य—१८० वर्षे—कनान देशात परदेशी म्हणून घालवले. इसहाकने देवाच्या वचनावरील विश्‍वासाच्या आधारावर धीर दाखवला होता. असा विश्‍वास त्याच्या वयोवृद्ध आईवडिलांना आणि खुद्द देवाच्या वचनाने त्याच्या मनावर बिंबवला होता. (उत्पत्ति २६:२-५) सर्व मानवजातीच्या आशीर्वादासाठी अब्राहामाच्या कुळातून एक “संतती” जन्माला येईल, असे जे यहोवाने वचन दिले होते ते वचन इसहाक दृढ राहिल्यामुळे पूर्ण झाले. शेकडो वर्षांनंतर त्या ‘संततीचा’ प्रमुख भाग अर्थात येशू ख्रिस्ताने जे त्याच्यावर विश्‍वास ठेवतील त्यांच्यासाठी देवाबरोबर समेट करण्यासाठी व सार्वकालिक जीवन उपभोगण्यासाठी एक मार्ग मोकळा केला.—गलतीकर ३:१६; योहान ३:१६.

८. याकोबाने कशाप्रकारे विश्‍वास दाखवला, आणि याचा परिणाम काय झाला?

इसहाकाने मग आपला पुत्र याकोब याला असा भक्कम विश्‍वास उत्पन्‍न करण्यास मदत केली ज्यामुळे तो आपल्या वृद्धपणी टिकून राहू शकला. याकोब ९७ वर्षांचा होता तेव्हा एकदा एका आशीर्वादासाठी त्याने रात्रभर एका देवदूताशी झोंबी केली. (उत्पत्ति ३२:२४-२८) वयाच्या १४७ व्या वर्षी याकोबाचा मृत्यू होण्याआधी त्याने आपल्या १२ पुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी शक्‍ती गोळा केली. (उत्पत्ति ४७:२८) त्याने तेव्हा उच्चारलेले ते भविष्यसूचक शब्द आज उत्पत्तिच्या पुस्तकातील ४९ व्या अध्यायाच्या १ ते २८ वचनांत लिहून ठेवण्यात आलेले आहेत. यांतील काही शब्द पूर्ण झाले आहेत आणि काही पूर्ण होत आहेत.

९. आध्यात्मिकरीत्या प्रौढ असलेले वयोवृद्ध बंधूभगिनी आपल्या कुटुंबावर जो लाभदायक प्रभाव पाडू शकतात त्याविषयी काय म्हणता येईल?

हे स्पष्ट झाले, की देवाचे वयोवृद्ध एकनिष्ठ सेवक आपल्या कौटुंबिक सदस्यांवर लाभदायक प्रभाव पाडू शकतात. शास्त्रवचनांतील मार्गदर्शन, अनुभवाचे बोल आणि धीर दाखवल्याचे उदाहरण या गोष्टी, एखाद्या तरुण व्यक्‍तीला विश्‍वासात मजबूत होण्यास पुष्कळ साहाय्य करू शकतात. (नीतिसूत्रे २२:६) वृद्ध जन आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांच्यावर जो शक्‍तिशाली प्रभाव पाडू शकतात त्याला त्यांनी क्षुल्लक समजू नये.

सहउपासकांवर प्रभाव

१०. योसेफाने ‘आपल्या अस्थींविषयी कोणती आज्ञा’ दिली आणि याचा परिणाम काय झाला?

१० वृद्ध जन सहविश्‍वासू बंधूभगिनींवर देखील उत्तम प्रभाव पाडू शकतात. याकोबाचा पुत्र योसेफ याने आपल्या म्हातारपणी केलेल्या केवळ एका विश्‍वासाच्या साध्या कृत्याचा, त्याच्यानंतरच्या कोट्यवधी खऱ्‍या उपासकांवर गहिरा प्रभाव पडला. तो जेव्हा ११० वर्षांचा होता तेव्हा त्याने “आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली.” म्हणजे, इस्राएली लोक जेव्हा इजिप्त राष्ट्र सोडतील तेव्हा त्यांना योसेफाची हाडे सोबत न्यायची होती. (इब्री लोकांस ११:२२; उत्पत्ति ५०:२५) या आज्ञेमुळे, अनेक वर्षांपासून दास्यत्वात असलेल्या इस्राएली लोकांना एक आशेचा किरण सापडला. योसेफाच्या मृत्यूनंतर त्यांची लवकरच सुटका होईल, अशी त्यांना खात्री मिळाली.

११. मोशेचा यहोशवावर कोणता प्रभाव पडला असावा?

११ योसेफाच्या विश्‍वासाच्या प्रदर्शनामुळे प्रोत्साहन मिळालेल्यांपैकी एक होता, मोशे. मोशे जेव्हा ८० वर्षांचा होता तेव्हा त्याला योसेफाची हाडे इजिप्त राष्ट्राच्या बाहेर नेण्याचा सुहक्क मिळाला. (निर्गम १३:१९) त्याच वेळेला मोशेची यहोशवाबरोबर ओळख घडली, जो त्याच्यापेक्षा वयाने बराच लहान होता. पुढील ४० वर्षांपर्यंत यहोशवाने मोशेचा व्यक्‍तिगत सेवक म्हणून सेवा केली. (गणना ११:२८) तो मोशेबरोबर सीनाय पर्वताच्या अर्ध्यापर्यंत गेला आणि मोशे जेव्हा पर्वताच्या माथ्यावरून दहा आज्ञांच्या दगडी पाट्या घेऊन आला तेव्हा तोही त्याच्याबरोबर होता. (निर्गम २४:१२-१८; ३२:१५-१७) वयोवृद्ध मोशे यहोशवासाठी प्रगल्भ सल्ल्याचा व बुद्धीचा झराच ठरला असावा!

१२. यहोशवा जिवंत होता तोपर्यंत तो इस्राएल राष्ट्रासाठी एक उत्तम प्रभाव कसा ठरला?

१२ यहोशवा मग त्याच्या जिवात जीव असेपर्यंत इस्राएल राष्ट्राला उत्तेजन देत राहिला. शास्ते २:७, म्हणते: “यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्‍वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्‍वराची सेवा केली.” पण, यहोशवाच्या व मंडळीतल्या इतर वृद्ध जनांच्या मृत्यूनंतर, इस्राएल राष्ट्र पुढील ३०० वर्षांपर्यंत खरी व खोटी उपासना यांमध्ये लटपटत राहिले. त्यांचे असे लटपटणे, संदेष्टा शमुवेलाच्या दिवसांपर्यंत चालले.

शमुवेलाने “नीतिमत्व आचरले”

१३. ‘नीतिमत्व आचरण्याकरता’ शमुवेलाने काय केले?

१३ शमुवेल मरण पावला तेव्हा तो किती वर्षांचा होता, याविषयी बायबलमध्ये काहीही सांगितलेले नाही. पण, पहिले शमुवेल पुस्तकातील घटना १०२ वर्षांच्या कालावधीत घडलेल्या घटना आहेत आणि यांपैकी बहुतेक घटना शमुवेलाने स्वतः पाहिल्या होत्या. इब्री लोकांस ११:३२, ३३ मध्ये आपण असे वाचतो, की धार्मिक शास्त्यांनी व संदेष्ट्यांनी “नीतिमत्व आचरले.” होय, शमुवेलाने आपल्या दिवसांतील काही लोकांना कुमार्गावर जाण्यापासून वाचवले किंवा त्यांना कुमार्ग टाळण्यास मदत केली. (१ शमुवेल ७:२-४) हे त्याने कसे केले? तो आपल्या शेवटल्या श्‍वासापर्यंत यहोवाशी एकनिष्ठ राहिला. (१ शमुवेल १२:२-५) राजाची कानउघाडणी करण्यासही तो घाबरला नाही. (१ शमुवेल १५:१६-२९) तसेच, तो स्वतः ‘वृद्ध झाला होता आणि त्याचे केस पिकले होते’ तरीसुद्धा त्याने इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या बाबतीत स्वतःचे एक उदाहरण मांडले. आपल्या सहइस्राएली बंधूभगिनींसाठी “प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्‍वराचा अपराध माझ्या हातून न घडो,” असे तो म्हणाला.—१ शमुवेल १२:२, २३.

१४, १५. आजचे वयोवृद्ध बांधव प्रार्थनेच्या बाबतीत शमुवेलाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतात?

१४ या सर्व गोष्टी एका महत्त्वाच्या गोष्टीवर जोर देतात; ती ही, की वृद्ध जन यहोवाच्या सहउपासकांवर चांगला प्रभाव पाडू शकतात. प्रकृतीमुळे अथवा इतर परिस्थितींमुळे वयोवृद्ध जन त्यांच्या सेवेत मर्यादित झाले असले तरी ते इतरांसाठी प्रार्थना करू शकतात. वृद्ध बंधूभगिनींनो, तुमच्या प्रार्थनांचा मंडळीला किती फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्‍तावर तुमचा विश्‍वास असल्यामुळे तुम्ही यहोवासमोर ग्रहणीय स्थितीत आहात आणि धीराच्या बाबतीत तुम्ही मांडलेल्या उदाहरणामुळे तुमच्या “विश्‍वासाची पारख” झाली आहे. (याकोब १:३; १ पेत्र १:७) “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते,” हे केव्हाही विसरू नका.—याकोब ५:१६.

१५ यहोवाच्या राज्याच्या संबंधाने होत असलेल्या कार्यासाठी तुमच्या प्रार्थनांचा पाठिंबा असणे आवश्‍यक आहे. आपले काही बांधव, ख्रिस्ती तटस्थता राखल्यामुळे तुरुंगात आहेत. काही जण, नैसर्गिक आपत्ती, युद्धे, मुलकी संघर्ष यांना बळी पडले आहेत. आणखी काही जणांना अगदी आपल्या मंडळीतच मोहांना व विरोधाला तोंड द्यावे लागते. (मत्तय १०:३५, ३६) प्रचार कार्यात पुढाकार घेणाऱ्‍यांसाठी आणि मंडळ्यांमध्ये देखरेख करणाऱ्‍यांसाठी सुद्धा तुम्ही नियमित प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. (इफिसकर ६:१८, १९; कलस्सैकर ४:२, ३) एफफ्रासप्रमाणे तुम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये सहउपासकांची आठवण करता, ही किती चांगली गोष्ट आहे!—कलस्सैकर ४:१२.

येणाऱ्‍या पिढीला शिकवणे

१६, १७. स्तोत्र ७१:१८ मध्ये काय भाकीत करण्यात आले होते आणि हे कसे खरे ठरले आहे?

१६ स्वर्गीय आशा असलेल्या ‘लहान कळपाबरोबर’ संगती केल्यामुळे पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा मिळालेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ आवश्‍यक ते प्रशिक्षण मिळाले आहे. (लूक १२:३२; योहान १०:१६) याविषयी स्तोत्र ७१:१८ मध्ये असे भाकीत करण्यात आले होते: “मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.” येशू ख्रिस्ताबरोबर गौरवित होण्याकरता स्वर्गात जाण्याआधी आत्म्याने अभिषिक्‍त झालेले बांधव, दुसऱ्‍या मेंढरांतील आपल्या सोबत्यांना वाढत्या जबाबदारींसाठी प्रशिक्षित करण्यास आतुर आहेत.

१७ ‘पुढच्या पिढीला’ प्रशिक्षण देण्याबाबत स्तोत्र ७१:१८ मधील तत्त्व, देवाच्या अभिषिक्‍त जनांकडून प्रशिक्षण मिळालेल्या दुसऱ्‍या मेंढरांनाही लागू होऊ शकते. जे आता खरी उपासना स्वीकारत आहेत अशांना यहोवाची ग्वाही देण्याचा सुहक्क यहोवाने वृद्धांना दिला आहे. (योएल १:२, ३) अभिषिक्‍त जणांपासून मिळालेल्या प्रशिक्षणाबद्दल दुसऱ्‍या मेंढरांना धन्य वाटते व आपल्याला मिळालेले शास्त्रवचनीय शिक्षण हे, जे यहोवाची सेवा करू इच्छितात अशा आणखी इतरांना देण्याचे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते.—प्रकटीकरण ७:९, १०.

१८, १९. (क) यहोवाचे वृद्ध सेवक कोणती अमूल्य माहिती देऊ शकतात? (ख) वृद्ध ख्रिश्‍चन कोणता विश्‍वास बाळगू शकतात?

१८ यहोवाचे वृद्ध सेवक, मग ते अभिषिक्‍त वर्गातील असोत अथवा दुसऱ्‍या मेंढरांतील असोत, महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांतील जिवंत दुवा आहेत. सध्या हयात असलेले काही जण, “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चलचित्रपट जेव्हा पहिल्यांदा दाखवण्यात आला होता तेव्हा हजर होते. काही वृद्ध बंधूभगिनी, पुढाकार घेणाऱ्‍या अशा बांधवांना व्यक्‍तिशः ओळखतात की ज्यांना १९१८ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. इतर काही जणांनी, डब्ल्यूबीबीआर या वॉचटावर आकाशवाणीत भाग घेतला होता. अनेक वयोवृद्ध बंधूभगिनी तुम्हाला, सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या साक्षीदारांना धार्मिक स्वातंत्र्य मिळण्याकरता जी प्रकरणे लढवली जात होती त्यांच्याविषयी सांगतील. इतर काही बंधूभगिनींनी, हुकूमशाही पद्धतीच्या सरकाराच्या वेळी खऱ्‍या उपासनेसाठी दृढ भूमिका घेतली. होय, सत्याची समज कशी हळूहळू प्रकट करण्यात आली ते वृद्ध जन आपल्याला सांगू शकतात. बायबल आपल्याला, अनुभवांच्या या संपत्तीतून फायदा मिळवून घेण्याचे उत्तेजन देते.—अनुवाद ३२:७.

१९ वृद्ध ख्रिश्‍चनांना, तरुणांपुढे उत्तम उदाहरण मांण्यास आर्जवले जाते. (तीत २:२-४) तुमच्या धीराचा, प्रार्थनांचा आणि सल्ल्याचा प्रभाव इतरांवर झाल्याचे कदाचित तुम्हाला आता दिसत नसेल. नोहा, अब्राहाम, योसेफ, मोशे व इतरांना, त्यांच्या विश्‍वासूपणाचा भावी पिढीवर किती मोठा प्रभाव पडेल हे माहीत नसावे. तरीपण, आपल्यापर्यंत आलेल्या त्यांच्या विश्‍वासाच्या व एकनिष्ठेच्या वारशाचा खूप मोठा परिणाम झाला; तुमचाही होऊ शकतो.

२०. जे शेवटपर्यंत आपली आशा टिकवून ठेवतात अशांसाठी कोणते आशीर्वाद राखून ठेवण्यात आले आहेत?

२० ‘मोठ्या संकटातून’ पार झाल्यानंतर किंवा पुनरुत्थानात पुन्हा जिवंत झाल्यानंतर तुम्हाला जे “खरे जीवन” मिळेल त्याचा अनुभव घेणे किती आनंदाचे असेल! (मत्तय २४:२१; १ तीमथ्य ६:१९) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत यहोवा जेव्हा म्हातारपणाचे सर्व परिणाम निकामी करेल त्या काळाची कल्पना करा. तेव्हा आपल्या शरीरारची कधीही न थांबणारी झीज अनुभवण्यापेक्षा आपण दररोज सकाळी उठू तेव्हा आपल्या शरीरात होणाऱ्‍या प्रगतीशील सुधारणा पाहू—अधिक शक्‍ती, तीक्ष्ण दृष्टी, स्पष्ट श्रवणशक्‍ती, निरोगी त्वचा! (ईयोब ३३:२५; यशया ३५:५, ६) देवाच्या नवीन जगात जगण्याचा आशीर्वाद मिळालेले, चिरकालाच्या तुलनेत तरुणच असतील; त्यांना चिरकालाचा अनुभव घ्यायचा आहे. (यशया ६५:२२) यास्तव, आपण सर्व शेवटपर्यंत आपली आशा पक्की ठेवू या आणि पूर्ण मनाने यहोवाची सेवा करीत राहू या. मग आपण ही खात्री बाळगू, की यहोवा, त्याने दिलेली सर्व अभिवचने पूर्ण करील आणि आपण ज्या गोष्टींची अपेक्षा केली असेल त्यांच्यापेक्षा कैकपटीने अधिक तो आपल्यासाठी करेल.—स्तोत्र ३७:४; १४५:१६. (w०७ ६/१)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• नोहाची दृढता सर्व मानवजातीसाठी आशीर्वाद कशी काय ठरली?

• कुलपित्यांच्या विश्‍वासाचा त्यांच्या पुढील संततीवर कोणता प्रभाव पडला?

• योसेफ, मोशे, यहोशवा व शमुवेल यांनी आपल्या उतारवयात सहउपासकांना कशाप्रकारे मजबूत केले?

• वृद्ध जन कोणता वारसा देऊ शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चित्र]

अब्राहामच्या धीराचा इसहाकवर जबरदस्त प्रभाव पडला

[२७ पानांवरील चित्र]

मोशेच्या प्रगल्भ सल्ल्याने यहोशवाला उत्तेजन मिळाले

[२९ पानांवरील चित्र]

इतरांसाठी तुम्ही करत असलेल्या प्रार्थनांमुळे चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात

[३० पानांवरील चित्र]

विश्‍वासू वयोवृद्ध बंधूभगिनींच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यामुळे तरुणांचा फायदा होतो