व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विलापगीत पुस्तकातील ठळक मुद्दे

विलापगीत पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

विलापगीत पुस्तकातील ठळक मुद्दे

संदेष्टा यिर्मया ४० वर्षांपासून यहोवाचा जो न्यायसंदेश घोषित करत होता त्याची पूर्णता त्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाली. आपले प्रिय नगर जेरुसलेमचा विध्वंस आपल्या डोळ्यांनी पाहताना यिर्मयाला कसे वाटले? ग्रीक सेप्टुअजिंट भाषांतरात विलापगीत पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की “यिर्मया खाली बसून रडू लागला आणि जेरुसलेमच्या नाशामुळे शोकाकूल होऊन त्याने हे विलापगीत रचले.” हे पुस्तक सा.यु.पू. ६०७ साली रचलेले असल्यामुळे, जेरुलेमला कशाप्रकारे १८ महिने वेढा देण्यात आला व शेवटी कशाप्रकारे या शहराचा अग्नीने नाश करण्यात आला याच्या आठवणी यिर्मयाच्या मनात अद्याप ताज्या होत्या. विलापगीत पुस्तकात यिर्मयाने आपल्या मनोवेदना अतिशय उत्कटपणे व्यक्‍त केल्या आहेत. (यिर्मया ५२:३-५, १२-१४) इतके हृदयद्रावक आणि भावनांनी ओथंबलेले शोकगीत इतिहासात दुसऱ्‍या कोणत्याही शहरासाठी रचण्यात आलेले नाही.

विलापगीत हे पुस्तक खरे तर एकूण पाच कवितांचा संग्रह आहे. पहिल्या चार कविता शोकगीतांच्या रूपात आहेत तर पाचवी एक याचना किंवा प्रार्थना आहे.—विलापगीत ५:१.

“माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत”

(विलापगीत १:१–२:२२)

“हाय हाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकांतात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परागण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!” या शब्दांनी यिर्मया संदेष्ट्याने जेरुसलेम नगरीविषयीच्या विलापगीताची सुरुवात केली. या नगरावर हे संकट का आले याविषयी यिर्मयाने असे म्हटले: “तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्‍वराने तिला पीडिले आहे.”—विलापगीत १:१,.

आपल्या पती व मुलांना गमावलेल्या एका विधवेच्या रूपात चित्रित केलेली जेरुसलेम नगरी विचारते: “माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेहि दुःख आहे काय?” आपल्या वैऱ्‍यांच्या संदर्भात ती देवाला अशी प्रार्थना करते: “त्यांची सर्व दुष्टता तुजपुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”—विलापगीत १:१२, २२.

दुःखाने व्याकूळ होऊन यिर्मया म्हणतो: “[यहोवाने] संतप्त क्रोधाने इस्राएलाचे हरएक शृंग छेदून टाकिले आहे; शत्रु समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे; सभोवतालचे सर्व काही चाटून जाणाऱ्‍या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.” यिर्मया आपला दुःखावेग या शब्दांत व्यक्‍त करतो: “माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत. . . . माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे.” येणारे जाणारे लोक देखील जेरुसलेमची झालेली अवस्था पाहून आश्‍चर्य व्यक्‍त करत म्हणतात: “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ते हेच का नगर?”—विलापगीत २:३, ११, १५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१५—यहोवाने ‘यहूदाच्या कुंवार कन्येला द्राक्षकुंडात तुडविले आहे’ [“यहूदाच्या कुंवार कन्येचा द्राक्षकुंड तुडवला आहे,” NW] याचा काय अर्थ होतो? कुंवार कन्या असे वर्णन केलेल्या शहराचा नाश करताना बॅबिलोनी लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्‍त वाहिले की त्याची तुलना द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवण्याशी करण्यात आली. यहोवाने हे भाकीत केले होते व त्याने असे घडू दिले त्याअर्थी त्याने यहूदाच्या कन्येला “द्राक्षकुंडात तुडविले” असे म्हटले जाऊ शकते.

२:१—कशाप्रकारे ‘इस्राएलाचे वैभव आकाशांतून पृथ्वीवर झुगारून देण्यात आले’? ‘आकाश पृथ्वीहून उंच’ असल्यामुळे उच्चस्थानी असलेल्या गोष्टींचा पाणउतारा केला जातो तेव्हा त्याची तुलना कधीकधी ‘आकाशातून पृथ्वीवर झुगारून देण्याशी’ केली जाते. “इस्राएलाचे वैभव,” अर्थात यहोवाचा आशीर्वाद या राष्ट्रावर असताना त्याच्याजवळ जी महिमा व सत्ता होती, ती जेरुसलेमचा नाश झाला आणि यहूदा ओसाड पडले तेव्हा धुळीस मिळाली.—यशया ५५:९.

२:१, ६—यहोवाचे ‘पादासन’ आणि त्याचा “मांडव” कशास सूचित करतो? स्तोत्रकर्त्याने एका भजनात असे म्हटले: “आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ; त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.” (स्तोत्र १३२:७) त्याअर्थी, विलापगीत २:१ यातील ‘पादासन’ यहोवाच्या उपासनेच्या स्थानास म्हणजेच त्याच्या मंदिरास सूचित करते. बॅबिलोनी लोकांनी, बागेतला मांडव किंवा एखादी झोपडी जाळतात त्याप्रमाणे ‘परमेश्‍वराचे मंदिर जाळून टाकले.’—यिर्मया ५२:१२, १३.

२:१७—जेरुसलेमच्या संबंधाने यहोवाने कोणती “ताकीद” अंमलात आणली? हे लेवीय २६:१७ च्या संदर्भात म्हटले आहे असे दिसते. या वचनात असे म्हटले आहे: “मी तुम्हाला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल. तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवितील व कोणी पाठीस लागला नसतानाहि तुम्ही पळाल.”

आपल्याकरता धडे:

१:१-९. जेरुसलेम रात्री रुदन करते आणि तिचे अश्रू तिच्या गालावर आले आहेत. तिच्या वेशी उजाड पडल्या आहेत आणि तिचे याजक उसासे टाकत आहेत. तिच्या कुमारी खिन्‍न झाल्या आहेत आणि ती स्वतः कष्टी आहे. का? कारण जेरुसलेमने घोर पातक केले आहे. तिची अशुद्धता तिच्या अंगावरील वस्त्रांना लागली आहे. पापामुळे कधीही आनंदी परिणाम होऊ शकत नाही; उलट अश्रू, उसासे, खिन्‍नता आणि कष्ट हेच पदरी पडते.

१:१८. पाप करणाऱ्‍यांना शिक्षा देताना यहोवा नेहमी न्यायी व नीतिमान असतो.

२:२०. इस्राएल लोकांना ही ताकीद देण्यात आली होती की जर त्यांनी यहोवाची वाणी ऐकली नाही तर त्यांच्यावर शाप येतील. “तुझ्या पोटचे मुलगे व मुली ह्‍यांचे तू मांस खाशील” हा देखील त्यांपैकी एक शाप होता. (अनुवाद २८:१५, ४५, ५३) देवाच्या आज्ञा मोडण्याचा मार्ग निवडणे हे किती मूर्खपणाचे कृत्य आहे!

“माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नको”

(विलापगीत ३:१–५:२२)

विलापगीत अध्याय ३ यात इस्राएल राष्ट्राला “मनुष्य” म्हणून संबोधले आहे. बरीच संकटे सोसल्यावरही हा मनुष्य असे गीत गातो: “जे परमेश्‍वराची आशा धरून राहतात त्यांस, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्‍वर प्रसन्‍न होतो.” खऱ्‍या देवाला प्रार्थनेत तो अशी विनंती करतो: “तू माझी वाणी ऐकली; माझ्या उसाश्‍याला, माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.” वैऱ्‍यांनी केलेल्या आपल्या लाजिरवाण्या स्थितीकडे लक्ष देण्यास यहोवाला विनंती करून तो म्हणतो: “हे परमेश्‍वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यांस प्रतिफळ देशील.”—विलापगीत ३:१, २५, ५६, ६४.

जेरुसलेमला १८ महिने वेढा देण्यात आला तेव्हा ज्या भयंकर गोष्टी घडल्या त्यांविषयी यिर्मया अशाप्रकारे शोक व्यक्‍त करतो: “सदोमेवर कोणी हात टाकिला नसून एका क्षणात तिचा निःपात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.” पुढे यिर्मया म्हणतो: “क्षुधेने मारिलेल्यांपेक्षा तरवारीने मारिलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकुळ होऊन क्षय पावतात.”—विलापगीत ४:६,.

पाचवी कविता जणू जेरुसलेमचे रहिवाशी बोलत आहेत या रितीने लिहिण्यात आली आहे. ते म्हणतात: “हे परमेश्‍वरा, आम्हावर काय गुजरले याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर दे.” आपल्या दुःखाचे वर्णन करताना ते यहोवाला अशी याचना करतात: “हे परमेश्‍वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे. हे परमेश्‍वरा, तू आम्हास आपणाकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हास पुनः आण.”—विलापगीत ५:१, १९, २१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:१६—“त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडावयास लाविले आहे” यावरून काय सूचित होते? एका संदर्भ ग्रंथात असा खुलासा केला आहे: “यहुद्यांना बंदिवासात नेले जात असताना त्यांना जमिनीत खणलेल्या खड्ड्यांत भाकरी भाजाव्या लागल्या. त्यामुळे भाकरींत बारीक खडे असायचे.” अशाप्रकारची भाकरी खाताना दाताचा काही भाग तुटण्याची शक्यता होती.

४:३, १०—यिर्मया आपल्या ‘लोकांच्या कन्येची’ तुलना ‘रानातील शहामृगाशी’ का करतो? ईयोब ३९:१६ म्हणते “[शहामृगी] आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच.” उदाहरणार्थ, अंड्यांतून पिले बाहेर पडल्यानंतर शहामृगी इतर शहामृगींसोबत निघून जाते आणि नराला पिलांची काळजी घ्यावी लागते. धोकेदायक परिस्थिती आल्यास हे पक्षी काय करतात? नर व मादी दोघेही आपल्या पिलांना वाऱ्‍यावर सोडून जातात. बॅबिलोनने जेरुसलेमला वेढा दिला तेव्हा शहरातील दुष्काळ इतका विकोपाला गेला की स्वाभाविकरित्या स्वतःच्या मुलांवर माया करणाऱ्‍या मातांनी रानातल्या शहामृगांप्रमाणे आपल्या मुलांशी क्रूरता केली. त्यांचे वागणे आपल्या पिलांना ममता दाखवणाऱ्‍या कोल्हींपेक्षा अगदी वेगळे होते.

५:७—यहोवा लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांबद्दल जबाबदार ठरवतो का? नाही, यहोवा पूर्वजांच्या पापांसाठी कोणालाही शिक्षा देत नाही. बायबल सांगते की “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१२) पण, दुष्कृत्यांचे परिणाम कधीकधी लवकर नाहीसे होत नाहीत. ते नंतरच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात. उदाहरणार्थ, इस्राएल राष्ट्र मूर्तिपूजक बनल्यामुळे नंतरच्या काळात विश्‍वासू इस्राएल लोकांनाही धार्मिकतेच्या मार्गाला जडून राहणे कठीण गेले.—निर्गम २०:५.

आपल्याकरता धडे:

३:८, ४३, ४४. जेरुसलेमवर आलेल्या संकटादरम्यान यहोवाने या शहरातील रहिवाशांच्या मदतीकरता केलेल्या प्रार्थना ऐकल्या नाहीत. का? कारण या लोकांनी देवाच्या आज्ञा भंग केल्या होत्या आणि अपश्‍चात्तापी वृत्ती दाखवली होती. जर यहोवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.—नीतिसूत्रे २८:९.

३:२१-२६, २८-३३. अतिशय दुःखदायक परिस्थितीतही आपण कशाप्रकारे टिकून राहू शकतो? यिर्मया आपल्याला याचे उत्तर देतो. आपण हे कधीही विसरू नये की यहोवाने आपल्या लोकांकरता आजवर अनेक प्रेमदयेची कृत्ये केली आहेत. आपण हे देखील आठवणीत ठेवले पाहिजे की आपण जिवंत आहोत त्याअर्थी आशा सोडून देण्याचे काहीही कारण नाही. आपण सहनशील वृत्तीने वाट पाहात राहिले पाहिजे, आणि कसलीही तक्रार न करता तारणाकरता यहोवाची आस धरली पाहिजे. शिवाय, आपण “आपले तोंड मातीत खुपसावे” म्हणजे आपल्यावर आलेली संकटे नम्रपणे स्वीकारावीत. आपण हे ओळखले पाहिजे की देव जे काही घडू देतो ते तो काहीतरी चांगल्या कारणासाठी घडू देतो.

३:२७. तरुणपणात काही जणांना कठीण परिस्थितीला व थट्टेला तोंड द्यावे लागते व यामुळे त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जाते. पण “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.” का? कारण हे जू वाहण्याकरता जो त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्या तरुणाला नंतरच्या जीवनात येणाऱ्‍या आव्हानांना तोंड देण्यास मदत मिळते.

३:३९-४२. आपल्याच पापांमुळे जेव्हा आपल्याला दुःखद परिणाम सहन करावे लागतात तेव्हा ‘कुरकुर करणे’ योग्य नाही. आपल्या पापाचे दुष्परिणाम भोगताना तक्रार करण्याऐवजी ‘आपण आपले मार्ग शोधावे व तपासावे आणि परमेश्‍वराकडे परत जावे.’ पश्‍चात्ताप करून आपले मार्ग बदलणेच शहाणपणाचे आहे.

यहोवावर भरवसा टाका

विलापगीत या पुस्तकात आपल्याला हे पाहायला मिळते की यहूदा राष्ट्राला बॅबिलोनी लोकांनी नाश करून जेरुसलेम शहर जाळून टाकले त्यानंतर यहोवाने जेरुसलेम व यहुदाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले. या पुस्तकात यिर्मयाने लोकांच्या वतीने जी पापांची कबूली व्यक्‍त केली आहे त्यावरून हे स्पष्ट दिसून येते की यहोवाच्या दृष्टिकोनातून त्या लोकांच्या पापांमुळेच त्यांच्यावर हे संकट आले होते. या पुस्तकातील गीतांतले शब्द यहोवाची आशा धरण्याविषयी व योग्य मार्गात परतण्याची इच्छा व्यक्‍त करतात. अर्थात यिर्मयाच्या दिवसांतील बहुतेक लोकांच्या अशा भावना नसल्या तरीसुद्धा स्वतः यिर्मया व पश्‍चात्तापी शेषवर्गाच्या याच भावना होत्या.

विलापगीत पुस्तकात यहोवा जेरुसलेमच्या अवस्थेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावरून आपल्याला दोन महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. प्रथम, जेरुसलेमचा नाश आणि यहुदा राष्ट्राचे उजाड होणे, यहोवाच्या आज्ञा पाळणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवते आणि देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणे किती धोक्याचे आहे याविषयी ताकीद देते. (१ करिंथकर १०:११) दुसरा धडा आपण यिर्मयाच्या उदाहरणावरून शिकू शकतो. (रोमकर १५:४) अगदीच आशाहीन वाटणाऱ्‍या परिस्थितीतही दुःखाने व्याकूळ झालेल्या या संदेष्ट्याने तारणाकरता यहोवाची आस धरली. आपणही यहोवावर व त्याच्या वचनावर संपूर्ण भरवसा टाकणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!—इब्री लोकांस ४:१२. (w०७ ६/१)

[९ पानांवरील चित्र]

संदेष्ट्या यिर्मयाने घोषित केलेल्या न्यायसंदेशाची पूर्णता त्याने प्रत्यक्षात पाहिली

[१० पानांवरील चित्र]

ख्रिस्ती तटस्थतेच्या प्रश्‍नावरून या कोरियन साक्षीदारांच्या विश्‍वासाची परीक्षा झाली