व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे

आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे

आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे

“भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे.”—स्तोत्र १३९:१४.

१. बरेच विचारशील लोक पृथ्वीवरील अद्‌भुत सृष्टीचे श्रेय देवाला का देतात?

निसर्गात, सृष्टीचे असंख्य अद्‌भुत आविष्कार पाहायला मिळतात. हे सर्व कसे अस्तित्वात आले? काहीजण असे मानतात की या प्रश्‍नाचा एका बुद्धिमान सृष्टिकर्त्याशी काहीही संबंध नाही. तर इतरांचे असे म्हणणे आहे की सृष्टिकर्ता नाही असे म्हटल्यास, आपण निसर्गाला पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाही. त्यांच्या मते पृथ्वीवरील सजीव सृष्टी इतकी गुंतागुंतीची, इतकी वैविध्यपूर्ण आणि इतकी अद्‌भुत आहे की ती आपोआप आली असे म्हणणे तार्किकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. बऱ्‍याच लोकांच्या, व काही शास्त्रज्ञांच्याही मते, पुराव्यावरून दिसून येते की हे विश्‍व एका बुद्धिमान, सामर्थ्यशाली व उदार निर्माणकर्त्याने रचले आहे. *

२. दावीद यहोवाची स्तुती करण्यास कशामुळे प्रेरित झाला?

पृथ्वीवरील अद्‌भुत सृष्टी निर्माण करण्याचे श्रेय एका सृष्टिकर्त्याला दिले पाहिजे, याविषयी पूर्ण खात्री असलेल्यांपैकी एक होता प्राचीन इस्राएलचा राजा दावीद. वैज्ञानिक प्रगतीच्या या युगाच्या कितीतरी काळाआधी हयात असूनही, दाविदाने हे ओळखले होते की सृष्टीतील अद्‌भुत गोष्टी या देवाच्या हस्तकृती आहेत. स्वतःच्या शरीराची घडण लक्षात घेतल्यावर दाविदाला देवाच्या सर्जनशीलतेची कल्पना आली व तो अतिशय विस्मित झाला. त्याने लिहिले: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो. तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”—स्तोत्र १३९:१४.

३, ४. आपल्यापैकी प्रत्येकाने यहोवाच्या कार्यांविषयी गांभीर्याने विचार करणे का महत्त्वाचे आहे?

दाविदाला ही खात्री पटली ती गांभीर्याने विचार केल्यामुळे. तेव्हा दाविदासारखा विश्‍वास असण्याकरता आपणही गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज शाळा-कॉलेजांतील अभ्यासक्रमांत व प्रसिद्धी माध्यमांत मानवाच्या उत्पत्तीबद्दल असे असंख्य सिद्धान्त मांडले जातात की जे देवावरील आपला विश्‍वास नष्ट करू शकतात. पण सृष्टिकर्त्याच्या अस्तित्वासारख्या मूलभूत विषयावर, फक्‍त इतरजण विशिष्टप्रकारे विचार करतात म्हणून आपणही तसा विचार करणे धोकेदायक आहे.

शिवाय, यहोवाच्या कार्यांविषयी मनन केल्यामुळे आपल्या मनात त्याच्याविषयी असलेली कृतज्ञता वाढते आणि भविष्याकरता त्याने दिलेल्या प्रतिज्ञांवर आपला विश्‍वास मजबूत होतो. ही कृतज्ञता व हा विश्‍वास आपल्याला यहोवाला आणखी चांगल्याप्रकारे जाणून घेण्याची व त्याची सेवा करत राहण्याची प्रेरणा देईल. तेव्हा आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे या दाविदाच्या निष्कर्षाला आधुनिक विज्ञान कशाप्रकारे दुजोरा देते याविषयी आपण आता विचार करू या.

आश्‍चर्यकारक शारीरिक विकास

५, ६. (क) आपल्या सर्वांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली? (ख) आपली मूत्रपिंडे कोणते कार्य करतात?

“तूच माझी वृक्के निर्माण केली; माझ्या आईच्या उदरी तू मला झाकून ठेवले.” (स्तोत्र १३९:१३, NW) आपल्या सर्वांच्या अस्तित्त्वाची सुरुवात आपल्या आईच्या शरीरात, केवळ एकाच पेशीच्या रूपात झाली. ही पेशी या वाक्याच्या शेवटी येणाऱ्‍या पूर्णविरामाच्या चिन्हापेक्षाही लहान होती. पण त्या सूक्ष्म पेशीची रचना अत्यंत गुंतागुंतीची होती, एक लहानशी रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच म्हणा ना! या पेशीची झपाट्याने वाढ होऊ लागली. आईच्या गर्भातील दुसऱ्‍या महिन्याच्या शेवटापर्यंत तुमची सर्व महत्त्वाची इंद्रिये तयार झालेली होती. या इंद्रियांत तुमची वृक्के, अर्थात मूत्रपिंडे देखील होती. तुमचा जन्म झाला तेव्हा तुमची मूत्रपिंडे तुमच्या शरीरातील रक्‍त शुद्ध करण्यास, अर्थात नकोसे पदार्थ व जादा प्रमाणातील पाणी वेगळे करून, आवश्‍यक घटक शरीरातच ठेवण्यास सुसज्ज होती. तुमची दोन मूत्रपिंडे निरोगी अवस्थेत, दर ४५ मिनिटांच्या अवधीत प्रौढ व्यक्‍तीच्या शरीरातील जवळजवळ पाच लिटर पाण्याचे शुद्धिकरण करतात!

तसेच तुमची मूत्रपिंडे तुमच्या शरीरातील क्षार व अम्लांचे प्रमाण तसेच रक्‍तदाबही नियंत्रणात ठेवतात. ती इतरही अनेक महत्त्वाची कार्ये करतात, उदाहरणार्थ, डी जीवनसत्त्वाचे, हाडांच्या विकासाकरता आवश्‍यक असलेल्या घटकात रूपांतर करणे व तुमच्या हाडांत तांबड्या रक्‍त पेशींच्या निर्माणास चालना देणारे इरिथ्रोपोएटिन नावाचे संप्रेरक तयार करणे. मूत्रपिंडांना “शरीरातील रसायनशास्त्रज्ञ” म्हटल्यास वावगे ठरणार नाही. *

७, ८. (क) गर्भातल्या बाळाची सुरुवातीच्या काळात कशाप्रकारे वाढ होते याचे वर्णन करा. (ख) वाढणाऱ्‍या बाळाची कोणत्या अर्थाने ‘पृथ्वीच्या अधोभागी घडण होत असते’?

“मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी हाडे तुला गुप्त नव्हती.” (स्तोत्र १३९:१५, NW) त्या सुरुवातीच्या एका मूळ पेशीचे विभाजन झाले व त्यानंतर नवीन पेशींचेही विभाजन होत राहिले. काही काळातच, या पेशी खास प्रकारच्या पेशीसमूहांत एकत्रित होऊ लागल्या. उदाहरणार्थ, चेतातंतू पेशी, स्नायू पेशी, त्वचा पेशी इत्यादी. एकाच प्रकारच्या पेशींचे समूह तयार होऊन त्यांपासून ऊतके व नंतर इंद्रिये तयार झाली. उदाहरणार्थ, गर्भधारणा झाल्यावर तिसऱ्‍या आठवड्यात तुमच्या शरीरातील अस्थिककार व्यवस्था आकार घेऊ लागली. तुम्ही फक्‍त सात आठवड्यांचे होता व फक्‍त एका इंचाइतकी तुमच्या शरीराची लांबी होती तेव्हाच, तुमच्या प्रौढ शरीरातील एकूण २०६ प्रकारच्या हाडांची आद्यस्वरूपे तयार झालेली होती, फक्‍त ती कठीण हाडांत अद्याप रूपांतरित झालेली नव्हती.

ही विस्मयकारक वाढ तुमच्या आईच्या गर्भाच्या आत, मानवी दृष्टीपासून लपलेल्या ठिकाणी, जणू पृथ्वीच्या अगदी खोलवर घडली. म्हणूनच तर आपला विकास नेमका कशाप्रकारे होतो यासंबंधी बरेच प्रश्‍न अद्यापही मानवाकरता अनुत्तरितच आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या पेशींमधल्या विशिष्ट जनुकांना वेगवेगळ्या पेशीसमूहांत एकत्र होऊ लागण्यास कशामुळे प्रेरणा मिळते? कदाचित वैज्ञानिकांना भविष्यात याचे उत्तर सापडेलही पण दाविदाने पुढे म्हटल्याप्रमाणे, आपल्या सृष्टिकर्त्याला अर्थात यहोवाला हे पूर्वीपासूनच माहीत आहे.

९, १०. गर्भाच्या निरनिराळ्या अवयवांच्या रचनेविषयी देवाच्या “वहीत नमूद करून ठेविले होते” हे कसे?

“मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकहि दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.” (स्तोत्र १३९:१६) तुमच्या पहिल्या पेशीतच तुमच्या सबंध शरीराची रूपरेखा होती. या रूपरेखेच्या आधारावरच जन्माआधीच्या नऊ महिन्यांदरम्यान गर्भात, आणि मग जवळजवळ दोन दशके, म्हणजे प्रौढावस्थेत येईपर्यंत तुमच्या शरीराचा विकास होत गेला. या काळात तुमचे शरीर विकासाच्या बऱ्‍याच टप्प्यांतून गेले पण हे सर्व त्या पहिल्या पेशीत बंदिस्त असलेल्या माहितीनुसारच घडले.

१० दाविदाजवळ पेशींबद्दल व जनुकांबद्दल कोणतीच माहिती नव्हती, त्याच्याजवळ सूक्ष्मदर्शक यंत्रसुद्धा नव्हते. पण तरीसुद्धा त्याने अगदी अचूकपणे हे ओळखले की त्याच्या स्वतःच्या शरीराचा विकास हा पूर्वनियोजित रूपरेखेचा पुरावा होता. गर्भाचा विकास कशाप्रकारे होतो यासंबंधी कदाचित दाविदाला थोडीफार माहिती असावी, त्यामुळे तो हा तर्क करू शकला की त्या विकासाचा प्रत्येक टप्पा आधीच आखलेल्या रूपरेखेनुसार व वेळापत्रकानुसार पूर्ण होत असतो. काव्यमय भाषेत त्याने ही रूपरेखा देवाच्या “वहीत” नमूद आहे असे म्हटले.

११. आपल्याला आपली शारीरिक वैशिष्ट्ये कशाप्रकारे मिळाली?

११ आज सर्वांना माहीत आहे की पालकांकडून व इतर पूर्वजांकडून तुम्हाला उपजत मिळालेले गुण, उदाहरणार्थ उंची, नाकडोळे, केसांचा व डोळ्यांचा रंग आणि अशी हजारो वैशिष्ट्ये ही तुमच्या विशिष्ट जनुकांमुळे तुम्हाला मिळतात. तुमच्या प्रत्येक पेशीत हजारो जनुके असतात आणि प्रत्येक जनुक डीएनए (डीऑक्सिरायबोन्युक्लीइक ॲसिड) पासून बनलेल्या एका लांबलचक साखळीचा भाग असते. तुमच्या शरीराच्या वाढीविषयक सूचना तुमच्या वैयक्‍तिक डीएनएच्या रासायनिक संरचनेत “नमूद” असतात. नव्या पेशी निर्माण करण्याकरता किंवा जुन्यांची जागा घेण्याकरता जेव्हा जेव्हा तुमच्या पेशींचे विभाजन होते तेव्हा तेव्हा तुमचे डीएनए या सूचना त्या नव्या पेशीला देते आणि यामुळे तुम्ही जिवंत राहता आणि तुमचे स्वाभाविक स्वरूप कायम राहते. हे सर्व लक्षात घेतल्यावर आपल्या स्वर्गीय रचनाकाराच्या सामर्थ्याची व बुद्धीची किती उल्लेखनीयरित्या प्रचिती येते, नाही का?

आपली वैशिष्ट्यपूर्ण बौद्धिक क्षमता

१२. मानवांमध्ये आणि इतर पशुपक्ष्यांमध्ये कोणता महत्त्वाचा फरक आहे?

१२ “हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान्‌ वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे? ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील.” (स्तोत्र १३९:१७,१८क) प्राण्यांचीही रचना अद्‌भुतरितीने झाली आहे आणि काही पशुपक्ष्यांमध्ये तर मानवांपेक्षाही श्रेष्ठ असे गुण व क्षमता आहेत. पण देवाने मानवाला जी बौद्धिक क्षमता दिली आहे ती कोणत्याही प्राण्यापेक्षा वरचढ ठरते. विज्ञानाच्या एका पाठ्यपुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “आपण अनेक बाबतीत इतर जातीच्या प्राण्यांसारखे असलो तरीही भाषेचा वापर व विचार करण्याची क्षमता यांबाबतीत पृथ्वीवरील इतर सर्व सजीवांमध्ये आपण विलक्षण आहोत. तसेच स्वतःविषयी आपल्याला जे सतत कुतूहल वाटत असते, उदाहरणार्थ: आपल्या शरीराची रचना कशाप्रकारे झाली आहे? आपण कसे अस्तित्वात आलो? हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील एकमेवपणे मनुष्यांतच आढळते.” याच प्रश्‍नांविषयी दाविदानेही चिंतन केले.

१३. (क) दाविद देवाच्या विचारांवर कशाप्रकारे मनन करू शकला? (ख) आपण दाविदाच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

१३ प्राण्यांमध्ये व मानवांमध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा फरक हा की फक्‍त मानवच देवाच्या विचारांवर मनन करू शकतात. * ही खास देणगी आपल्याला मिळाली आहे कारण आपल्याला ‘देवाच्या प्रतिरुपात’ निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२७) दाविदाने या देणगीचा उत्तमरीत्या उपयोग केला. त्याने देवाच्या अस्तित्त्वाच्या पुराव्याविषयी व आपल्याभोवती दिसणाऱ्‍या पृथ्वीवरील सृष्टीत देवाचे जे गुण प्रतिबिंबित होतात त्यांविषयी मनन केले. दाविदाजवळ पवित्र शास्त्राची सुरुवातीची काही पुस्तकेही होती. यांत देवाविषयी व त्याच्या कार्यांविषयी त्याने स्वतः प्रकट केलेली माहिती नमूद होती. या देवप्रेरित लिखाणांमुळे दाविदाला देवाचे विचार, त्याचे व्यक्‍तिमत्त्व व त्याच्या उद्देशाबद्दल समजून घेण्यास साहाय्य मिळाले. या शास्त्रवचनांवर, देवाच्या निर्मित वस्तूंवर व आपल्यासोबत ज्याप्रकारे देवाने व्यवहार केला त्यावर मनन केल्यामुळे दाविदाला आपल्या सृष्टिकर्त्याची स्तुती करण्याची प्रेरणा मिळाली.

विश्‍वास असणे म्हणजे काय?

१४. देवावर विश्‍वास ठेवण्याकरता त्याच्याविषयी सर्वकाही जाणून घेणे आवश्‍यक का नाही?

१४ सृष्टीविषयी व शास्त्रवचनांविषयी दाविदाने जितके चिंतन केले तितकीच प्रकर्षाने त्याला ही जाणीव होत गेली की देवाच्या ज्ञानाचा व समार्थ्याचा पूर्णपणे बोध होणे हे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. (स्तोत्र १३९:६) आपल्याबाबतीतही हीच वस्तुस्थिती आहे. देवाच्या निर्मितीकृत्यांविषयी सर्वकाही आपण कधीही समजून घेऊ शकणार नाही. (उपदेशक ३:११; ८:१७) पण कोणत्याही काळात राहणाऱ्‍या सत्यशोधकांना, पुराव्याच्या आधारे विश्‍वास ठेवण्याकरता पुरेसे ठरेल इतके ज्ञान देवाने त्याच्या शास्त्रवचनांत व निसर्गात “दाखवून दिले आहे.”—रोमकर १:१९,२०; इब्री लोकांस ११:१,.

१५. विश्‍वास व देवासोबतचा आपला नातेसंबंध कशाप्रकारे एकमेकांशी निगडीत आहेत हे उदाहरण देऊन सांगा.

१५ फक्‍त हे कबूल करणे, की सजीव सृष्टी व या विश्‍वाला अस्तित्त्वात आणणारी निश्‍चितच कोणतीतरी बुद्धिमान शक्‍ती असली पाहिजे, म्हणजे विश्‍वास ठेवणे नव्हे. विश्‍वास ठेवण्याचा अर्थ यहोवा देव एक वास्तविक व्यक्‍ती आहे यावर भरवसा ठेवणे व आपण त्याला जाणून घ्यावे व त्याच्यासोबत आपला एक चांगला नातेसंबंध असावा अशी त्याची इच्छा आहे हे मानणे. (याकोब ४:८) मुलाला आपल्या प्रेमळ वडिलावर जो विश्‍वास व भरवसा असतो त्याच्याशी याची तुलना करता येईल. तुम्ही एखाद्या संकटात सापडल्यास तुमचे वडील खरच तुम्हाला मदत करतील का? असे एखाद्याने उपहासाने विचारल्यास, तुमचे वडील भरवशालायक आहेत हे कदाचित तुम्हाला त्याला पटवून देता येणार नाही. पण जर अनुभवातून तुमच्याजवळ आपल्या वडिलांच्या चांगल्या गुणांबद्दल पुरेसा पुरावा असेल, तर तुमच्या मनाला ही खात्री असेल की ते अवश्‍य तुम्हाला मदत करतील. त्याचप्रकारे शास्त्रवचनांच्या अभ्यासातून, सृष्टीविषयी मनन करून आणि आपल्या प्रार्थनांचे तो कशाप्रकारे उत्तर देतो हे अनुभवून आपल्याला यहोवाची ओळख घडते आणि यामुळे त्याच्यावर भरवसा ठेवण्यास आपण प्रेरित होतो. त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेण्याची आणि निःस्वार्थ प्रीतीने व भक्‍तिभावाने त्याची सर्वकाळ स्तुती करण्याची आपल्या मनात इच्छा निर्माण होते. यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही ध्येय असू शकत नाही.—इफिसकर ५:१,२.

सृष्टिकर्त्याच्या मार्गदर्शनाची लालसा बाळगा!

१६. यहोवासोबत असलेल्या दाविदाच्या घनिष्ठ नातेसंबंधावरून आपण काय शिकू शकतो?

१६ “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.” (स्तोत्र १३९:२३,२४) यहोवा आपल्याला आतून-बाहेरून अगदी पूर्णतया जाणतो याची दाविदाला जाणीव होती. आपला एकही विचार, शब्द किंवा कृती आपल्या सृष्टिकर्त्याच्या नजरेपासून लपलेली नाही हे त्याला माहीत होते. (स्तोत्र १३९:१-१२; इब्री लोकांस ४:१३) देवाला आपल्याबद्दल अशी इत्थंभूत माहिती आहे हे जाणून दाविदाला सुरक्षित वाटले. आपल्या प्रेमळ आईवडिलांच्या कुशीत जसे मुलाला स्वस्थ व निश्‍चिंत वाटते तसे दाविदाला वाटले. यहोवासोबत असलेला हा घनिष्ठ नातेसंबंध दाविदाला अतिशय प्रिय होता आणि म्हणूनच यहोवाच्या कार्यांबद्दल मनन करून व त्याला प्रार्थना करून हा नातेसंबंध टिकवून ठेवण्यास दावीद नेहमी प्रयत्नशील होता. किंबहुना, दाविदाच्या स्तोत्रांपैकी बरीच स्तोत्रे, उदाहरणार्थ स्तोत्र १३९ सुद्धा, संगीताच्या तालावर गावयाच्या प्रार्थनाच आहेत. मनन व प्रार्थना केल्यामुळे आपणही यहोवाच्या जवळ येऊ शकतो.

१७. (क) यहोवाने आपल्या हृदयाची झडती घ्यावी असे दाविदाला का वाटत होते? (ख) आपल्या इच्छास्वातंत्र्याचा आपण कशाप्रकारे उपयोग करतो याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?

१७ आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेले असल्यामुळे आपल्याला इच्छास्वातंत्र्य देण्यात आले आहे. चांगले किंवा वाईट करण्याची आपण निवड करू शकतो. पण या स्वातंत्र्यासोबत ओघानेच नैतिक जबाबदारीही येते. दाविदाला दुर्जनांसोबत गणले जाण्याची इच्छा नव्हती. (स्तोत्र १३९:१९-२२) ज्यामुळे दुःखद परिणाम होतील अशा चुका टाळण्याची त्याची इच्छा होती. म्हणूनच, यहोवाच्या समग्र ज्ञानाविषयी मनन केल्यावर दाविदाने नम्रपणे त्याला आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करण्याची आणि जीवनाकडे नेईल अशा वाटेने आपले मार्गदर्शन करण्याची विनंती केली. देवाचे नीतिमान नैतिक आदर्श सर्वांकरता आहेत तेव्हा आपणही जीवनात योग्य निवडी केल्या पाहिजेत. यहोवा आपल्या सर्वांना त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचे प्रोत्साहन देतो. असे केल्यामुळे आपल्याला त्याची संमती आणि अनेक आशीर्वाद मिळतात. (योहान १२:५०; १ तीमथ्य ४:८) दररोज यहोवासोबत चालल्यामुळे आपल्याला दुःखद परिस्थितीला तोंड देतानाही एकप्रकारची आंतरिक शांती अनुभवायला मिळते.—फिलिप्पैकर ४:६,७.

आपल्या अद्‌भुत सृष्टिकर्त्याने दाखवलेल्या मार्गाने चाला!

१८. सृष्टीतील अद्‌भुत गोष्टींविषयी मनन केल्यावर दावीद कोणत्या निष्कर्षावर पोचला?

१८ लहान असताना दावीद बरेचदा रानावनात मेंढरांची राखण करत असे. मेंढरे खाली मान करून चरायला लागली की दावीद वर आकाशाकडे पाहात असे. रात्रीच्या काळोखात तो हे अफाट विश्‍व किती आश्‍चर्यकारक आहे आणि या सर्वांचा काय अर्थ असावा यावर विचार करत असे. त्याने एका स्तोत्रात लिहिले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते.” (स्तोत्र १९:१,२) ज्याने या सर्व गोष्टी इतक्या अद्‌भुतरित्या निर्माण केल्या आहेत, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याने दाखवलेल्या मार्गाने चालले पाहिजे हे दाविदाने ओळखले. आपणही हेच करण्याची गरज आहे.

१९. आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण झाली आहे’ यावरून तरुण व वृद्ध काय बोध घेऊ शकतात?

१९ दाविदाचा पुत्र शलमोन याने नंतर तरुणांना जो सल्ला दिला होता त्याचे पालन कसे करावे हे दाखवण्याकरता दाविदाचे उदाहरण देता येईल. शलमोनाने तरुणांना म्हटले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; . . . देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१,१३) तरुणपणीच दाविदाने, आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे हे ओळखले होते. ही जाणीव बाळगून जीवन व्यतीत केल्यामुळे त्याला त्याच्या सबंध जीवनात अनेक आशीर्वाद मिळाले. जे यहोवासोबत आपला घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवतात आणि त्याच्या नीतिमान मार्गांत चालत राहतात त्यांच्याविषयी बायबल असे अभिवचन देते: “वृद्धपणातहि ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील; ह्‍यावरून दिसेल की परमेश्‍वर सरळ आहे.” (स्तोत्र ९२:१४,१५) तेव्हा, आपण तरुण असोत वा वृद्ध, जर आपण आपल्या महान सृष्टिकर्त्याची स्तुती केली व त्याची सेवा केली तर आपले आताचे आणि भविष्यातले जीवनही आनंदमय होईल. आणि आपल्या सृष्टिकर्त्याच्या अद्‌भुत कार्यांचा सर्वकाळ आनंद लुटण्याची आशा आपल्याला लाभेल. (w०७ ६/१५)

[तळटीपा]

^ परि. 1 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सावध राहा! मासिकाचा जून २२,२००४ हा इंग्रजी अंक पाहावा.

^ परि. 6 “तुमचे मूत्रपिंड—जीवनदायी गाळणी” हा ऑगस्ट ८,१९९८ सावध राहा! अंकातील लेख देखील पाहावा.

^ परि. 13 स्तोत्र १३९:१८ख यातील शब्दांतून दावीद कदाचित असे सुचवत असावा की त्याने दिवसभर, अगदी झोपी जाईपर्यंत यहोवाच्या विचारांची गणना केली, तरी सकाळी उठल्यानंतर ते संपुष्टात आलेले नसतील.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• गर्भाची ज्याप्रकारे वाढ होते त्यावरून आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण झाली आहे’ हे कसे दिसून येते?

• आपण यहोवाच्या विचारांवर मनन का केले पाहिजे?

• विश्‍वास व यहोवासोबतचा आपला नातेसंबंध एकमेकांशी कशाप्रकारे निगडीत आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

गर्भात बाळाचा विकास एका पूर्वनियोजित रूपरेखेनुसार होत असतो

डीएनए

[चित्राचे श्रेय]

भ्रूण: Lennart Nilsson