व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो

तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो

तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो

“माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर.”—नीतिसूत्रे २७:११.

१. आज समाजात कोणती प्रवृत्ती सर्रास आढळते?

सबंध जगात आज स्वैराचाराची व आज्ञाभंग करण्याची वृत्ती दिसून येते. प्रेषित पौलाने इफिसकर ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात याचे कारण स्पष्ट केले: “तुम्ही पूर्वी . . . ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा अधिपति ह्‍याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.” (इफिसकर २:१,२) होय, दियाबल सैतान जो “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” आहे त्याने एकार्थाने सबंध जगालाच आज्ञाभंग करण्याच्या प्रवृत्तीने दूषित केले आहे. पहिल्या शतकातही तो हे करत होता, पण पहिल्या महायुद्धाच्या सुमारास जेव्हा त्याला स्वर्गातून पृथ्वीवर टाकून देण्यात आले तेव्हापासून तर तो हे अधिकच जोमाने करू लागला आहे.—प्रकटीकरण १२:९.

२, ३. यहोवाच्या आज्ञा आपण का पाळाव्यात?

पण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला हे माहीत आहे की आपण यहोवा देवाच्या आज्ञांचे मनापासून पालन केलेच पाहिजे. अशी अपेक्षा करण्यास तो योग्य आहे कारण तो आपला सृष्टिकर्ता, पालनकर्ता, प्रेमळ सार्वभौम स्वामी आणि तारणकर्ता देखील आहे. (स्तोत्र १४८:५,६; प्रेषितांची कृत्ये ४:२४; कलस्सैकर १:१३; प्रकटीकरण ४:११) मोशेच्या काळातील इस्राएली लोकांनाही हे माहीत होते की यहोवा त्यांचा जीवनदाता व मुक्‍तिदाता होता. म्हणूनच मोशेने त्यांना सांगितले होते की “तुम्ही आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा.” (अनुवाद ५:३२) होय, त्यांच्याकडून आज्ञापालनाची अपेक्षा करण्यास यहोवा योग्य होता. तरीसुद्धा, त्यांनी लवकरच आपल्या सार्वभौम प्रभूच्या आज्ञा मोडल्या.

विश्‍वाच्या निर्माणकर्त्याला आपण आज्ञाधारक राहणे किती महत्त्वाचे आहे? देवाने एकदा संदेष्टा शमुवेलाकडून शौल राजास असे सांगितले: “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे.” (१ शमुवेल १५:२२,२३) असे त्याने का सांगितले असावे?

कशाप्रकारे “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे” आहे?

४. आपण यहोवाला काय देऊ शकतो?

आपल्याजवळ जे काही आहे ते सृष्टिकर्ता या नात्याने यहोवाच्याच मालकीचे आहे. तेव्हा, आपण त्याला काही देऊ शकतो का? होय, आपण अतिशय मौल्यवान असे काहीतरी त्याला देऊ शकतो. ते काय? यहोवानेच दिलेल्या पुढील आदेशावरून आपण या प्रश्‍नाचे उत्तर मिळवू शकतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) तर आपण देवाला जी गोष्ट देऊ शकतो ती म्हणजे आपले आज्ञापालन. आपली परिस्थिती व पार्श्‍वभूमी वेगवेगळी असली तरीसुद्धा, मानव कठीण परिस्थितीत देवाला निष्ठावान राहणार नाहीत हा सैतानाचा द्वेषपूर्ण दावा आपण आज्ञाधारक राहण्याद्वारे खोटा ठरवू शकतो. खरे तर हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!

५. मानव आज्ञाभंग करतात तेव्हा निर्माणकर्त्याला कसे वाटते? उदाहरण देऊन सांगावे.

आपण जीवनात जे निर्णय घेतो त्यांविषयी देवाला आस्था आहे. आपण त्याच्या आज्ञा मोडतो तेव्हा त्याच्यावर याचा परिणाम होतो. तो कसा? कोणीही जेव्हा अविचारी मार्ग पत्करतो तेव्हा देवाला हे पाहून दुःख होते. (स्तोत्र ७८:४०,४१) उदाहरणार्थ, एखादा मधुमेही जर त्याच्याच भल्याकरता सुचवलेला आहार न घेता, त्याच्या आरोग्याकरता हानीकारक असलेल्या वस्तू खात राहिला, तर त्याच्याविषयी कळकळ वाटणाऱ्‍या त्याच्या डॉक्टरला कसे वाटेल? त्याचप्रकारे मानव जेव्हा यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात तेव्हा त्याला दुःख होते, कारण त्याने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम त्याला माहीत आहेत.

६. देवाला आज्ञाधारक राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

यहोवाला आज्ञाधारक राहण्यास वैयक्‍तिकरित्या आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल? आपल्यापैकी प्रत्येकाने देवाला राजा शलमोनाप्रमाणे, “ऐकणारे हृदय” अर्थात आज्ञाधारक हृदय देण्याची विनंती केली पाहिजे. शलमोनाने अशा हृदयाची यासाठी विनंती केली की जेणेकरून त्याला आपल्या इस्राएली देशबांधवांचा न्याय करताना ‘बरे आणि वाईट यांचा विवेक करता यावा.’ (१ राजे ३:९, पं.र.भा., तळटीप) आज या जगात सर्वत्र अवज्ञाकारी प्रवृत्ती दिसत असताना चांगल्या व वाईटाचा भेद करण्याकरता आपल्यालाही ‘ऐकणाऱ्‍या हृदयाची’ आवश्‍यकता आहे. असे हृदय संपादन करता यावे म्हणून देवाने आपल्याकरता त्याचे वचन, बायबल अभ्यासाची साधने, ख्रिस्ती सभा, आणि आपल्याविषयी कळकळ बाळगणारे मंडळीतले वडील पुरवले आहेत. या प्रेमळ तरतुदींचा आपण पुरेपूर फायदा घेत आहोत का?

७. यहोवा यज्ञांपेक्षा आज्ञापालनाला का महत्त्व देतो?

या संदर्भात, यहोवाने आपल्या प्राचीन काळातील लोकांना काय सांगितले होते हे आठवणीत घ्या. त्याने त्यांना सांगितले होते की आज्ञापालन करणे हे पशूंचे यज्ञ अर्पण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. (नीतिसूत्रे २१:३,२७; होशेय ६:६; मत्तय १२:७) पण हे यज्ञ अर्पण करण्याची आज्ञा यहोवाने स्वतःच त्याच्या लोकांना दिली होती, नाही का? मग त्याने असे का सांगितले? तर, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, यज्ञ अर्पण करणाऱ्‍याचा हेतू काय आहे? तो देवाला संतुष्ट करण्यासाठी यज्ञ अर्पण करत आहे का? की तो निव्वळ एक रीत पाळत आहे? जर एखाद्या उपासकाला खरोखरच देवाला संतुष्ट करण्याची इच्छा असेल तर साहजिकच तो काळजीपूर्वक त्याच्या सर्व आज्ञांचे पालनही करेल. देवाला पशूंच्या अर्पणांची गरज नाही. पण आपले आज्ञापालन ही अशी एक गोष्ट आहे की जी त्याला मौल्यवान वाटते व जी आपण त्याला देऊ शकतो.

एक इशारेवजा उदाहरण

८. देवाने शौलाला राजाच्या पदावरून का काढून टाकले?

शौल राजाविषयीचा बायबलमधील अहवाल, आज्ञापालन किती महत्त्वाचे आहे हे दाखवतो. सुरुवातीला शौल हा एक नम्र व निराभिमानी, “आपल्या दृष्टीने क्षुद्र” असा शासक होता. पण कालांतराने तो गर्विष्ठपणा व अयोग्य तर्कवादाच्या प्रभावात येऊन निर्णय घेऊ लागला. (१ शमुवेल १०:२१,२२; १५:१७) एकदा शौलाला युद्धात पलिष्टी लोकांचा सामना करायचा होता. शमुवेलाने त्याला आपण येऊन यहोवाला यज्ञ अर्पण करीपर्यंत व पुढील सूचना देईपर्यंत थांबून राहण्यास सांगितले. पण शमुवेल हा अपेक्षित वेळेच्या आत आला नाही. हळूहळू लोक पांगू लागले. हे पाहून शौलाने “स्वतःच होम केला.” यहोवाला ही गोष्ट मुळीच आवडली नाही. शेवटी शमुवेल आला तेव्हा शौल राजा आपण केलेल्या आज्ञाभंगाबद्दल सबब देऊ लागला. त्याने म्हटले की शमुवेलाला उशीर झाल्यामुळे ‘परमेश्‍वराचा प्रसाद मागण्याकरता माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.’ शमुवेलाने येऊन यज्ञ देईपर्यंत थांबून राहण्याची जी आज्ञा देण्यात आली होती तिचे पालन करण्यापेक्षा राजा शौलाला तो यज्ञ अर्पण करणे जास्त महत्त्वाचे वाटले. शमुवेल त्याला म्हणाला: “तू मूर्खपणा केला; तुझा देव परमेश्‍वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही.” यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे शौलाला आपले राजपद गमवावे लागले.—१ शमुवेल १०:८; १३:५-१३.

९. शौल राजाने कशाप्रकारे हे दाखवले की देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणे त्याच्या अंगवळणी पडले होते?

या अनुभवातून शौल राजाने धडा घेतला का? नाही! काही काळानंतर यहोवाने शौलाला अमालेकी लोकांचा संहार करण्याची आज्ञा दिली. या राष्ट्राने याआधी इस्राएलवर कोणतेही कारण नसताना आक्रमण केले होते. शौलाला सांगण्यात आले की त्याने या लोकांची गुरेढोरेही सोडू नयेत तर सर्वांचा सर्वनाश करावा. शौलाने काहीप्रमाणात यहोवाच्या आज्ञेनुसार वागून, “हवीलापासून मिसरासमोरील शूराच्या मार्गापर्यंत अमालेक्यास मार देते नेले.” शमुवेल शौल राजाला भेटायला आला तेव्हा राजाने अगदी आनंदाने त्याला विजयाची बातमी सांगितली व म्हटले: “परमेश्‍वर आपले कल्याण करो; मी परमेश्‍वराची आज्ञा पाळिली आहे.” पण खरे पाहता, शौलाला व त्याच्या लोकांना देण्यात आलेल्या सुस्पष्ट सूचनांच्या विरुद्ध वागून त्यांनी राजा अगाग याला आणि त्याच्यासोबत “उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेविले.” यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केल्याबद्दल शौल राजाने ही सबब सांगितली: “लोकांनी आपला देव परमेश्‍वर याच्या प्रीत्यर्थ बलि अर्पण करण्यासाठी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेविली आहेत.”—१ शमुवेल १५:१-१५.

१०. शौलाने कोणता धडा घेतला नाही?

१० तेव्हा शमुवेलाने शौलाला सांगितले: “परमेश्‍वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.” (१ शमुवेल १५:२२) त्या प्राण्यांचा संहार केला जावा असे यहोवाने ठरवले होते, त्याअर्थी ते यज्ञ म्हणून अर्पण करण्यास योग्य नव्हते.

सर्व बाबतींत आज्ञाधारक राहा

११, १२. (क) यहोवाची उपासना करण्याकरता व त्याला संतुष्ट करण्याकरता आपण जे परिश्रम घेतो त्यांच्याविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे? (ख) एक व्यक्‍ती यहोवाच्या आज्ञा मोडून आपण अजूनही यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत असा खोटा दिलासा स्वतःला कशाप्रकारे देऊ शकते?

११ यहोवाचे एकनिष्ठ सेवक छळ होत असूनही खंबीर राहतात, लोक प्रतिसाद देत नाहीत तरीसुद्धा राज्याचा प्रचार करत राहतात, व उदरनिर्वाहाशी संबंधित असलेल्या ताणतणावांना तोंड देऊनही ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतात तेव्हा त्याला किती आनंद होतो! आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या या महत्त्वाच्या बाबतींत आपण आज्ञाधारक राहतो तेव्हा यहोवाला संतोष वाटतो! आपण प्रेमाने प्रेरित होऊन जेव्हा यहोवाच्या उपासनेकरता परिश्रम घेतो, तेव्हा तो आपल्या परिश्रमांची कदर करतो. इतर लोक कदाचित आपल्या कठीण परिश्रमांची दखलही घेणार नाहीत पण यहोवा आपल्या मनःपूर्वक अर्पणांकडे दुर्लक्ष करत नाही तर ती तो आठवणीत ठेवतो.—मत्तय ६:४.

१२ पण आपल्या देवाला पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठी आपण जीवनातील सर्व बाबतींत आज्ञाधारक असले पाहिजे. इतर बाबतींत आपण यहोवाची उपासना करत आहोत त्या अर्थी काही बाबतींत आपण त्याच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करू शकतो असा विचार करून आपण कधीही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती कदाचित स्वतःला असा खोटा दिलासा देऊ शकते, की यहोवाच्या उपासनेशी संबंधित सर्व औपचारिकता आपण पूर्ण करत आहोत, तेव्हा, अनैतिकता किंवा इतर प्रकारचे गंभीर पातक केल्यास आपल्याला कोणतीही शिक्षा होणार नाही. पण असे करणे किती चुकीचे ठरेल!—गलतीकर ६:७,८.

१३. एकांतात आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करतो किंवा नाही याची परीक्षा कशाप्रकारे होऊ शकते?

१३ त्याचप्रकारे आपण स्वतःला असे विचारू शकतो, ‘मी आपल्या दैनंदिन, खासगी जीवनातही यहोवाचे आज्ञापालन करत आहे का?’ येशूने म्हटले: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्कळाविषयीहि विश्‍वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) आपण ‘आपल्या घरात’ असतानाही, म्हणजे इतरजण आपल्याला पाहात नसतात तेव्हा देखील ‘सरळ अंतःकरणाने वागतो’ का? (स्तोत्र १०१:२) होय, आपण घरात असतानाही आपल्या विश्‍वासूपणाची परीक्षा होऊ शकते. काही वर्षांआधी अश्‍लील चित्रे, अशाप्रकारचे चित्रपट दाखवल्या जाणाऱ्‍या ठिकाणी गेल्याशिवाय पाहता येणे शक्य नव्हते. पण बऱ्‍याच देशात, आता घराघरात कंप्युटर आले आहेत. त्यामुळे अश्‍लील चित्रे पाहणे हे आता फक्‍त काही बटण दाबण्याइतके सोपे झाले आहे. अशा परिस्थितीत आपण येशूच्या या पुढील शब्दांची आज्ञाधारकपणे दखल घेऊ का: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” होय, आपण अनैतिक चित्रांकडे पाहण्यासही नकार देतो का? (मत्तय ५:२८; ईयोब ३१:१,९,१०; स्तोत्र ११९:३७; नीतिसूत्रे ६:२४,२५; इफिसकर ५:३-५) हिंसाचाराची दृश्‍ये असलेल्या टीव्हीवरील कार्यक्रमांविषयी काय? परमेश्‍वराला हिंसाचारी अर्थात, “आततायी माणसाचा वीट आहे.” याबाबतीत आपणही आपल्या परमेश्‍वराशी सहमत आहोत का? (स्तोत्र ११:५) किंवा, एकांतात अतिमद्यपान करण्याविषयी काय? बायबल दारुडेपणाची निर्भर्त्सना करते. पण त्याचप्रकारे, ते ख्रिश्‍चनांना “मद्यपानासक्‍त” नसण्याविषयीही बजावते.—तीत २:३; लूक २१:३४,३५; १ तीमथ्य ३:३.

१४. पैशांच्या व्यवहारांत आपण देवाला आज्ञाधारक आहोत हे कशाप्रकारे दाखवू शकतो?

१४ आणखी एक गोष्ट जिच्याबद्दल आपण सतर्क राहिले पाहिजे ती पैशांच्या व्यवहारांसंबंधी आहे. उदाहरणार्थ, आपण झटपट भरपूर पैसा कमवण्याच्या अशा योजनांमध्ये सामील होतो का, की ज्या जवळजवळ फसवेगिरी करण्यासारख्याच असतात? किंवा कर चुकवण्यासाठी आपण बेकायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या मोहात पडतो का? की त्याऐवजी आपण “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या” या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन करतो?—रोमकर १३:७.

प्रेमापोटी आज्ञापालन

१५. तुम्ही यहोवाच्या आज्ञांचे पालन का करता?

१५ देवाच्या नियमांचे पालन केल्यामुळे आशीर्वाद मिळतात. उदाहरणार्थ, तंबाखूचा वापर न केल्यामुळे, नैतिकतेने जीवन जगल्यामुळे आणि रक्‍ताच्या पावित्र्याचा आदर केल्यामुळे आपण अनेक आजार टाळू शकतो. शिवाय, जीवनाच्या इतर पैलूंतही बायबलमधील सत्याच्या अनुषंगाने आपले जीवन व्यतीत केल्यामुळे आपल्याला आर्थिक, सामाजिक दृष्ट्या किंवा आपल्या कौटुंबिक जीवनात बरेच फायदे मिळू शकतात. (यशया ४८:१७) हे सर्व फायदे देवाकडील आशीर्वादच आहेत आणि यांवरून देवाचे कायदे किती व्यवहारोपयोगी आहेत हे सिद्ध होते. तरीपण, आपण या फायद्यांसाठी नव्हे तर यहोवावर आपले प्रेम असल्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन करतो. देवाची सेवा करण्यामागे आपला कोणताही स्वार्थी हेतू नाही. (ईयोब १:९-११; २:४,५) आपण कोणाच्या आज्ञा पाळू इच्छितो हे निवडण्याचे स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिले आहे. आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे निवडतो कारण आपण त्याला संतुष्ट करू इच्छितो आणि जे योग्य ते करण्याची आपली इच्छा आहे.—रोमकर ६:१६,१७; १ योहान ५:३.

१६, १७. (क) येशू मनापासून असलेल्या प्रेमापोटी देवाला कशाप्रकारे आज्ञाधारक राहिला? (ख) आपण येशूचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

१६ मनापासून असलेल्या प्रेमापोटी यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट उदाहरण येशूचे आहे. (योहान ८:२८,२९) पृथ्वीवर असताना “[येशूने] जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्री लोकांस ५:८,९) ते कसे? येशूने “वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:७,८) स्वर्गात असताना तर तो देवाला आज्ञाधारक होताच, पण पृथ्वीवर येशूच्या आज्ञाधारकपणाची आणखी परीक्षा झाली. येशू आपल्या आत्मिक बंधुंकरता तसेच त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या इतर मानवांकरताही प्रमुख याजक या नात्याने कार्य करण्यास हर तऱ्‍हेने पात्र आहे.—इब्री लोकांस ४:१५; १ योहान २:१,२.

१७ आपल्याविषयी काय? आज्ञाधारकपणे देवाच्या इच्छेनुसार वागण्यास आपण जीवनात प्राधान्य देण्याद्वारे येशूचे अनुकरण करू शकतो. (१ पेत्र २:२१) यहोवा देवाबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमामुळे प्रेरित होऊन जेव्हा आपण त्याच्या आज्ञांचे पालन करतो; या आज्ञा मोडण्याचा दबाव किंवा मोह असतानाही आपण त्या पाळतो तेव्हा आपल्याला एक वैयक्‍तिक समाधान अनुभवायला मिळते. (रोमकर ७:१८-२०) यात खऱ्‍या उपासनेत आपले नेतृत्त्व करणाऱ्‍या बांधवांच्या सूचनांचे आनंदाने पालन करणे देखील समाविष्ट आहे. ते अपरिपूर्ण असले तरीही आपण त्यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. (इब्री लोकांस १३:१७) खासगी जीवनात आपण देवाच्या नियमांप्रती जी आज्ञाधारक वृत्ती दाखवतो तिला तो अत्यंत मौल्यवान लेखतो.

१८, १९. आपण मनापासून देवाच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हा काय परिणाम होतो?

१८ आज, यहोवाचे आज्ञापालन करण्याकरता आपल्याला, कदाचित छळालाही तोंड देऊन आपला विश्‍वासूपणा सिद्ध करावा लागू शकतो. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) तसेच, सुवार्तेची घोषणा करण्याची व शिष्य बनवण्याची जी आज्ञा यहोवाने आपल्याला दिली आहे ती पूर्ण करण्याकरता आपल्याला या व्यवस्थिकरणाच्या अंतापर्यंत धीर धरण्याची गरज आहे. (मत्तय २४:१३,१४; २८:१९,२०) जगाच्या दबावांना तोंड देत असताना, आपल्या बांधवांसोबत नियमित एकत्र येण्याकरताही आपल्याला धीराची गरज आहे. या सर्व बाबतींत आज्ञाधारक राहण्याकरता आपल्याला काय काय त्रास सहन करावा लागतो याची आपल्या प्रेमळ देवाला पूर्ण कल्पना आहे. पण पूर्णार्थाने आज्ञाधारक राहण्याकरता आपण आपल्या पापी शरीराच्या अभिलाषांवर मात करून वाईट गोष्टींकडे पाठ फिरवली पाहिजे आणि जे चांगले आहे त्याबद्दल कदर बाळगण्यास शिकले पाहिजे.—रोमकर १२:९.

१९ आपण प्रेमापोटी आणि कृतज्ञ अंतःकरणाने यहोवाची सेवा करतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद लाभतात कारण “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) योग्य अर्पणे आवश्‍यक व महत्त्वाची आहेत यात वाद नाही; पण यहोवाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो, जेव्हा आपण प्रेमापोटी त्याच्या आज्ञांचे पालन करतो.—नीतिसूत्रे ३:१,२. (w०७ ६/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपल्याजवळ यहोवाला देण्यासारखे काहीतरी आहे हे आपण का म्हणू शकतो?

• शौलाने कोणत्या चुका केल्या?

• यज्ञांपेक्षा आज्ञापालन बरे हे आपणही मान्य करत असल्याचे तुम्ही कसे दाखवू शकता?

• तुम्हाला कशामुळे यहोवाच्या आज्ञांचे पालन करावेसे वाटते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

शौल राजाने कशामुळे यहोवाचा क्रोध स्वतःवर ओढवला?