व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘भाषा अनेक प्रीती एक’

‘भाषा अनेक प्रीती एक’

‘भाषा अनेक प्रीती एक’

मुक्‍तता. सुटका. तारण. अनेक शतकांपासून माणूस चिंता व त्रासापासून मुक्‍त होऊ पाहतोय. आपण जीवनाच्या समस्यांना कशाप्रकारे तोंड देऊ शकतो? आपली कधी सुटका होईल का? जर होय, तर कशी?

याविषयांवर यहोवाच्या साक्षीदारांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशनांत चर्चा होती. मे २००६ पासून या अधिवेशन मालिकांची सुरुवात झाली होती. या अधिवेशनाचा विषय होता: “मुक्‍तीसमय जवळ आला आहे!”

या अधिवेशनांपैकी नऊ अधिवेशनांना विविध राष्ट्रांतून आलेले हजारो प्रतिनिधी उपस्थित होते. जुलै व ऑगस्ट २००६ दरम्यान ही अधिवेशने, चेक प्रजासत्ताकाची राजधानी प्राग; स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातीस्लावा; पोलंडमधील कोरझो व पोझनन; * आणि पाच जर्मन शहरांत—डॉर्टमंड, फ्रँकफर्ट, हॅमबर्ग, लायपझीक व म्युनिक येथे भरवण्यात आली होती. त्यांची एकूण उपस्थिती ३,१३,००० च्या वर गेली.

या अधिवेशनांमध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण होते? प्रसारमाध्यमामुळे त्यांना कोणत्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली? अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या प्रतिनिधींना अधिवेशनानंतर कसे वाटले?

पूर्वतयारी

अधिवेशनांना आलेले पाहुणे व स्थानीय साक्षीदार, सर्वजण उत्सुक होते; हे आध्यात्मिक प्रसंग आपण केव्हाही विसरू शकणार नाही, हे त्यांना माहीत होते. प्रतिनिधींच्या राहण्याची सोय करण्याचे खरोखरच एक मोठे काम होते. जसे की, कोरझो अधिवेशनाच्या वेळी, पूर्व युरोपहून आलेल्या जवळजवळ १३,००० पाहुण्यांची पोलिश साक्षीदारांनी आपल्या घरात राहण्याची सोय केली. या अधिवेशनाला, अर्मेनिया, एस्टोनिया, कझाकस्थान, किर्गीझस्थान, जॉर्जिया, ताजिकिस्थान, तुर्कमेनिस्थान, बेलारूस, मोल्डोवा, युक्रेन, उझबेकिस्थान, रशिया, लॅट्‌विया, लिथुआनिया व संयुक्‍त संस्थाने या ठिकाणांहून प्रतिनिधी आले होते.

अनेक प्रतिनिधींनी या अधिवेशनाला येण्याकरता कित्येक महिन्यांआधीपासून तयारीला सुरुवात केली होती. जपानच्या ईशान्येकडे असलेल्या एका रशियन द्वीपकल्पात अर्थात कमचटकात राहणारी तात्याना नावाची एक पूर्ण वेळेची सुवार्तिक भगिनी एक वर्षापूर्वीच प्रवासाच्या खर्चासाठी पैसे साठवू लागली. तिला सुमारे १०,५०० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. कोरझोला पोचण्यासाठी पहिल्यांदा तिने पाच तासांचा विमानाने प्रवास केला; मग, जवळजवळ तीन दिवसांसाठी ट्रेनने प्रवास केला आणि मग शेवटी ३० तासांचा बसने प्रवास केला.

अधिवेशनाच्या आधी हजारो स्वयंसेवकांनी, स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून, उपासनेकरता तयार केली. (अनुवाद २३:१४) याचे केवळ एकच उदाहरण घ्या: लायपझीकमधील स्थानीय साक्षीदारांनी कार्यक्रमाआधी स्टेडिअम घासून-पुसून अगदी चकाचक बनवला आणि अधिवेशनानंतरही स्टेडियम असा स्वच्छ बनवून देऊ, असे म्हटले. यामुळे, स्टेडियमच्या अधिकाऱ्‍यांनी, स्टेडियमच्या भाड्यात, साफसफाईसाठी द्यावे लागणारे पैसे कापले.

आमंत्रणे

संपूर्ण जगभरातील मंडळ्यांनी “मुक्‍तीसमय जवळ आला आहे!” अधिवेशनांची सर्वदूरपर्यंत जाहीरात केली होती. खास अधिवेशनांना उपस्थित राहणाऱ्‍यांनी या मोहिमेत अगदी उत्साहाने भाग घेतला. अधिवेशनाच्या अगदी आदल्या रात्रीपर्यंत ते अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिका वाटत होते. त्यांच्या या आवेशाचे काही चांगले परिणाम प्राप्त झाले का?

बॉग्डन नावाचा एक पोलिश साक्षीदार एका वयोवृद्ध गृहस्थाला भेटला ज्यांना अधिवेशनाला उपस्थित राहायची इच्छा होती परंतु त्यांना मिळणाऱ्‍या तुटपुंज्या पेन्शनमध्ये, कोरझोला जाण्याकरता १२० किलोमीटरचा प्रवासाचा खर्च परवडत नव्हता. झाले असे, की स्थानीय मंडळीने अधिवेशनाला जाण्याकरता एक बस ठरवली होती. या बसमध्ये एक जागा रिकामी होती. बॉग्डन म्हणाला: “आम्ही या गृहस्थाला सांगितले, की ते जर बस जिथून सुटणार आहे त्या ठिकाणी सकाळी ५:३० वाजता आलेत तर त्यांना या बसमध्ये विनामूल्य जाता येईल.” या मनुष्याने हे आमंत्रण स्वीकारले आणि तो अधिवेशनाला उपस्थित राहिला. त्यानंतर त्याने बांधवांना असे लिहिले: “अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर मी एक चांगला मनुष्य व्हायचं ठरवलं आहे.”

प्रागमध्ये, ब्रिटनहून आलेले प्रतिनिधी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे राहणाऱ्‍या एका मनुष्याने एके संध्याकाळी त्यांना म्हटले, की तोही त्या दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. तो कसा काय अधिवेशनाला आला होता बरे? शहरातील रस्त्यांवर जेव्हा त्याला दहा वेगवेगळ्या प्रचारकांकडून अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिका मिळाल्या तेव्हा त्याला वाटले, की आपण या अधिवेशनाला उपस्थित राहिलेच पाहिजे. आणि उपस्थित राहिल्यानंतर तो खूप प्रभावित झाला व त्याला आणखी माहिती हवी होती.—१ तीमथ्य २:३, ४.

पोषक आध्यात्मिक कार्यक्रम

अधिवेशनांतील कार्यक्रमात, विविध समस्या कशा सोडवायच्या यावर चर्चा करण्यात आली. शास्त्रवचनांतल्या सडेतोड सल्ल्याद्वारे, या समस्यांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो किंवा जर त्या समस्या काढून टाकता येत नसतील तर त्या कशा सहन करायच्या हे दाखवून देण्यात आले.

वाढते वय, आजारपण, प्रिय जनांच्या मृत्यूचे दुःख किंवा इतर वैयक्‍तिक समस्यांनी ग्रस्त बंधूभगिनींना, जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत मिळाल्यामुळे बायबलमधून उत्तेजन मिळाले. (स्तोत्र ७२:१२-१४) वैवाहिक जीवन सुखी कसे बनवायचे, मुलांचे संगोपन यशस्वीरीत्या कसे करायचे यावर विवाहित जोडप्यांना व पालकांना बायबलमधील सल्ला ऐकायला मिळाला. (उपदेशक ४:१२; इफिसकर ५:२२, २५; कलस्सैकर ३:२१) किशोरावस्थेत असलेल्या ख्रिश्‍चनांना—ज्यांना शाळेतील साथीदारांच्या वाईट दबावाचा सामना करावा लागतो परंतु घरात व मंडळीत देवाच्या वचनातून सुज्ञ सल्ला ऐकायला मिळतो—त्यांना सामाजिक दबावांचा सामना कसा करायचा आणि ‘तरूणपणाच्या वासनेपासून दूर कसे पळायचे’ त्याबद्दल व्यावहारिक सल्ला मिळाला.—२ तीमथ्य २:२२.

आंतरराष्ट्रीय बंधूसमाज

यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या सभांमध्ये उत्तम शास्त्रवचनीय मार्गदर्शन मिळते, यात काही शंकाच नाही. (२ तीमथ्य ३:१६) परंतु, या अधिवेशनांना, वेगवेगळ्या देशांतून बंधूभगिनी आले असल्यामुळे त्याला एक वेगळेच रूप आले होते. सर्व खास अधिवेशनांत विविध भाषेत एकच आध्यात्मिक कार्यक्रम होता. प्रत्येक दिवशी यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सदस्यांची भाषणे होती व इतर देशांतील अहवालांमुळे कार्यक्रम आणखी रोचक झाला. उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या भाषेच्या बंधूभगिनींच्या लाभासाठी, या भाषणांचे व अहवालांचे अनुवाद झाले.

दुसऱ्‍या देशांतून आलेल्या बंधूभगिनींना भेटायला प्रतिनिधी उत्सुक होते. एका प्रतिनिधीने म्हटले: “आम्हाला एकमेकांची भाषा येत नव्हती तरीसुद्धा काही खास समस्या उद्‌भवल्या नाहीत. उलट, प्रसंगाच्या आनंदात आणखी भर पडली. आलेले पाहुणे वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमीचे असले तरी, एकाच विश्‍वासामुळे त्यांच्यात एकी होती.” म्युनिक येथील अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्यांनी असे म्हटले: “भाषा अनेक असल्या तरी प्रीती एकच होती.” उपस्थित असलेले बंधूभगिनी कोणत्याही देशांतले व भाषेचे असले तरी, आपण खऱ्‍या मित्रांमध्ये आहोत अर्थात आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींच्या मध्ये आहोत, ही जाणीव त्यांना होती.—जखऱ्‍या ८:२३.

कृतज्ञतेच्या अभिव्यक्‍ती

पोलंड येथील अधिवेशनाच्या वेळी हवामान बिघडले तरीसुद्धा आलेल्या प्रतिनिधींनी सहनशीलता दाखवली. तेव्हा नुसता सतत पाऊसच पडत नव्हता तर वातावरणही बरेच थंड—१४°से. इतके झाले. संयुक्‍त संस्थानातून आलेल्या एका बांधवाने असे म्हटले: “एखाद्या अधिवेशनाच्या वेळी मी अनुभवलेलं हे सर्वात बेकार हवामान होतं. तापमानही बरंच उतरलं होतं. मला कार्यक्रमातून खूप कमी समजलं. पण, विविध देशांतून आलेल्या बांधवांमुळे तिथं जे सुरेख वातावरण होतं, बंधूभगिनींमध्ये असलेला उत्साह, त्यांनी आमचा केलेला प्रेमळ पाहुणचार या सर्व गोष्टींनी, जणू काय सर्व उणिवा भरून काढल्या. हे अधिवेशन मी केव्हाही विसरणार नाही!”

पोलिश भाषिक प्रतिनिधींसाठी एक गोष्ट जी अविस्मरणीय ठरली ती होती, इनसाईट ऑन द स्क्रिप्चर्स हे पोलिश भाषेत प्रकाशित होत असल्याची घोषणा! थंडी आणि पाऊस सहन केल्याबद्दल त्यांना जणू काय उत्तम प्रतिफळ मिळाले होते. यहोवाचा दिवस सतत मनात बाळगून जगा (इंग्रजी) या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनामुळे देखील “मुक्‍तीसमय जवळ आला आहे!” या अधिवेशनाचा आनंद द्विगुणीत झाला.

हे अधिवेशन उपस्थित असलेल्या अनेकांच्या वेगळ्या कारणांकरता लक्षात राहील. परदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या एका गटाबरोबर जाण्यास तयार झालेली क्रिस्टिना नावाची एक चेक भगिनी आठवून सांगते: “निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा एका भगिनीने मला बाजूला नेलं आणि मला मिठी मारत म्हणाली: ‘माझी तुम्ही किती काळजी घेतली! तुम्ही अगदी आमच्या सीटपर्यंत आमच्या हातात जेवणाचं ताट आणून दिलं, आम्हाला प्यायला पाणीसुद्धा दिलं. तुमच्या आत्म-त्यागी प्रेमाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.’” परदेशातून आलेल्या प्रतिनिधींसाठी जी जेवणाची व्यवस्था केली होती त्याविषयी ही भगिनी सांगत होती. एका बांधवाने सांगितले: “आम्ही पूर्वी कधी हे काम केलं नव्हतं. एका दिवसाला जवळजवळ ६,५०० जेवणाची ताटं पुरवण्याचं काम मी पूर्वी कधीच केलं नव्हतं. पण, कितीतरी जण, मुलंसुद्धा स्वयंसेवेसाठी पुढं आली; हे पाहून मी खूप प्रभावित झालो.”

युक्रेनहून प्रवास करून कोरझोला अधिवेशनाकरता आलेल्या एका भगिनीने म्हटले: “आमच्या सहविश्‍वासू बंधूभगिनींनी दाखवलेलं प्रेम, काळजी, उदारता पाहून आम्ही खरोखरच अगदी प्रभावित झालो आहोत. त्या सर्वांचे आभार मानण्याकरता आमच्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.” पोलंड येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला फिनलंडहून पत्र लिहिणाऱ्‍या आठ वर्षीय अनीकाने असे लिहिले: “मी जशी अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरीपटीने छान हे अधिवेशन होतं. यहोवाच्या संस्थेत असणं खरोखरच किती चांगली गोष्ट आहे. आपले जगभरात मित्र असू शकतात!”—स्तोत्र १३३:१.

बघ्यांची विधाने

अधिवेशनांच्या आधी, काही प्रतिनिधींकरता प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बवेरियन ग्रामीण भागात गेल्यावर, पाहुणे मंडळी राज्य सभागृहे पाहण्यासाठी थांबली. स्थानीय साक्षीदारांनी तेथे त्यांचे स्वागत केले. एका गटाची टुअरगाईड, जी साक्षीदार नव्हती ती, बंधूभगिनींतील हे प्रेम पाहून अतिशय प्रभावित झाली. एका प्रतिनिधीने तिच्याविषयी असे सांगितले: “आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तिथं बसनं पुन्हा जात असताना या टुअरगाईडनं म्हटलं, की तुम्ही इतर पर्यटक गटांपेक्षा वेगळे लोक आहात. तुमच्या सर्वांचा पोषाख सभ्य होता आणि गटात जे पुढाकार घेतात त्यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलं. कोणी कुणाला शिव्या देत नव्हतं किंवा गोंधळ नव्हता. पूर्णपणे अनोळखी लोक इतक्या लगेच इतके चांगले मित्र कसे बनू शकतात, याचंच तिला आश्‍चर्य वाटत होतं.”

प्राग अधिवेशनात वृत्त सेवा विभागात काम करणाऱ्‍या एका बांधवाने असे सांगितले: “रविवारी सकाळी, एक पोलीस अधिकारी आम्हाला भेटायला आला. अधिवेशन स्थळी त्याची ड्यूटी लागली होती. अधिवेशन स्थळी त्याने पाहिलं, की सर्वकाही शांत व सुरळीत होते. मला इथं काही काम नाही, असं तो म्हणाला. त्यानं असंही सांगितलं, की स्टेडियमच्या आजूबाजूला राहणाऱ्‍या स्थानीय लोकांनी त्याला, स्टेडियममध्ये काय कार्यक्रम चालला आहे याविषयी विचारलं. त्यानं जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांचा कार्यक्रम आहे असं सांगितलं, तेव्हा लोकांनी लगेच आपली नाकं मुरडली. पण या अधिकाऱ्‍यानं त्यांना सांगितलं: ‘जर सर्व लोक, यहोवाच्या साक्षीदारांसारखं पूर्णपणे नव्हे, निदान अर्धे जरी वागले तरी पोलिसांची काही गरजच राहिली नसती.’”

अनेकांची केव्हाच सुटका झाली आहे!

देवाचे वचन बायबल हे संस्कृतींना जोडते; ख्रिश्‍चनांमध्ये शांती व ऐक्य निर्माण करून त्यांना एकत्र आणते. (रोमकर १४:१९; इफिसकर ४:२२-२४; फिलिप्पैकर ४:७) “मुक्‍तीसमय जवळ आला आहे!” या खास अधिवेशनांनी हे शाबीत करून दाखवले. यहोवाचे साक्षीदार, या जगाला पीडित करणाऱ्‍या अनेक पीडांपासून केव्हाच मुक्‍त झाले आहेत. समाजाला पीडित करणाऱ्‍या अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी जसे की, असोशिकपणा, आक्रमकवृत्ती, वंशभेद या सर्व त्यांच्यामधून नाहीशा झाल्या आहेत. आणि ते अशा जगाची वाट पाहत आहेत जेव्हा हे संपूर्ण जग अशा समस्यांपासून मुक्‍त होईल.

विविध देशांच्या व संस्कृतीच्या साक्षीदारांमध्ये जी एकता होती ती, अधिवेशनाला आलेल्यांनी व्यक्‍तिशः अनुभवली. अधिवेशनांच्या शेवटी हे अगदी स्पष्ट दिसून आले. सर्व जण आनंदाने टाळ्या वाजवत होते, नवीन मित्रांना मिठ्या मारत होते, आठवण म्हणून एकमेकांचे फोटो घेत होते. (१ करिंथकर १:१०; १ पेत्र २:१७) सर्व समस्यांपासून व चिंतांपासून आपल्याला लवकरच मुक्‍तता मिळणार आहे यामुळे आनंदित होऊन व खात्री पटल्यानंतर, सर्व प्रतिनिधी आपापल्या घरी व मंडळीला, ‘[देवाच्या] जीवनाच्या वचनावरील’ आपली पकड ढिली न करण्याच्या एका नव्या निश्‍चयाने परत गेले.—फिलिप्पैकर २:१५, १६. (w०७ ७/१)

[तळटीप]

^ परि. 4 पोलंडमध्ये इतर ठिकाणी झालेली सहा इतर अधिवेशने तसेच स्लोव्हाकिया येथे झालेले एक अधिवेशन इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्याने एकमेकांशी जोडण्यात आल्यामुळे कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय भाग प्रसारीत करता आले.

[१० पानांवरील चौकट/चित्र]

सव्वीस भाषा जणू काय एकाच भाषेसारख्या वाटत होत्या!

सर्व नऊ अधिवेशनांमधील कार्यक्रम स्थानीय भाषेत सादर करण्यात आला. जर्मनीतील अधिवेशनांत, जर्मनव्यतिरिक्‍त इतर १८ भाषांमध्ये भाषणे देण्यात आली. डॉर्टमंडमध्ये, अरेबी, फारसी, पोर्तुगीज, स्पॅनिश, रशियन या भाषांत कार्यक्रम होता; तर, फ्रँकफर्ट येथे, इंग्रजी, फ्रेंच व सर्बियन/क्रोएशियन या भाषांत भाषणे होते. हॅमबर्ग येथे, डॅनिश, डच, स्वीडिश व तामीळ मध्ये भाषणे होती, तर लायपझीक येथे चिनी, पोलिश व तुर्क भाषांत कार्यक्रम होता. आणि म्युनिक येथे ग्रीक, इटालियन व जर्मन संकेत भाषांत भाषणे होती. प्राग अधिवेशनांतील सर्व भाषणे चेक, इंग्रजी व रशियन भाषांत होती. ब्रातीस्लावा येथील कार्यक्रम इंग्रजी, हंगेरियन, स्लोवाक व स्लोव्हेकियन संकेत भाषेतही सादर करण्यात आला. कोरझो येथील अधिवेशनांत, पोलिश, रशियन, युक्रेनियन आणि पोलिश संकेत भाषांत भाषणे होती. आणि, पोझनन मध्ये पोलिश व फिनिश भाषांत भाषणे होती.

एकूण सव्वीस भाषांत कार्यक्रम होता. अधिवेशनाला आलेल्या प्रतिनिधींच्या भाषा अनेक होत्या परंतु त्यांच्यात प्रेमळ ऐक्य होते.

[९ पानांवरील चित्र]

फ्रँकफर्ट येथील क्रोएशियन प्रतिनिधींना जेव्हा “नवे जग भाषांतर” आपल्या भाषेत मिळाले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला