यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
यहोवाचे वचन सजीव आहे
यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
वर्ष आहे सा.यु.पू. ६१३. संदेष्टा यिर्मया यहुदात, जेरुसलेमवर लवकरच येणाऱ्या नाशाची व यहुदाच्या विनाशाची घोषणा निर्भयतेने करत आहे. बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर याने तर अनेक यहुद्यांना कैदही करून नेले. यांपैकी तरुण दानीएल आणि त्याचे तीन साथिदारही आहेत जे खासद्यांच्या महालात काम करत आहेत. बहुतेक यहुदी बंदिवान “खास्द्यांच्या देशात” खबार नदीच्या तीरी आहेत. (यहेज्केल १:१-३) या बंदिवानांना यहोवा संदेशवाहकाविना सोडत नाही. तो ३० वर्षीय यहेज्केलास संदेष्टा म्हणून नियुक्त करतो.
सा.यु.पू. ५९१ मध्ये यहेज्केल हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. यांत २२ वर्षांचा इतिहास आहे. यहेज्केलने अगदी बारीकसारीक गोष्टींची नोंद केली आहे. त्याने कोणती भविष्यवाणी कोणत्या वर्षाच्या कोणत्या महिन्यात व कोणत्या दिवशी केली हेही सांगितले आहे. यहेज्केलाच्या संदेशाचा पहिला भाग, जेरुसलेमचे पतन व नाश यांवर केंद्रित आहे. दुसऱ्या भागात, आजूबाजूच्या राष्ट्रांविरुद्ध देवाने केलेल्या घोषणा आहेत आणि शेवटल्या भागात, यहोवाच्या उपासनेच्या पुनर्स्थापनेविषयी सांगितले आहे. या लेखात यहेज्केल १:१–२४:२७ पर्यंतच्या वचनांतील ठळक मुद्दे आहेत ज्यात, दृष्टांत, भविष्यवाण्या आणि जेरुसलेमला जे काही सहन करावे लागणार होते त्याची नाट्य रुपांतरे आहेत.
“मी तुला . . . पहारेकरी नेमिले आहे”
यहोवाच्या सिंहासनाचा भयप्रेरक दृष्टांत दाखवल्यानंतर यहेज्केलास त्याची नेमणूक मिळते. यहोवा त्याला सांगतो: “मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांस बजावून सांग.” (यहेज्केल ३:१७) जेरुसलेमला वेढा पडेल आणि त्यानंतर कोणते परिणाम उद्भवतील याविषयी भाकीत करताना यहेज्केलला दोन मूकनाट्ये करून दाखवण्याची आज्ञा दिली जाते. यहुदाविषयी बोलताना यहोवा यहेज्केलद्वारे असे म्हणतो: “पाहा, मी, मीच तुम्हावर तरवार आणून तुमची उच्च स्थाने उध्वस्त करीन.” (यहेज्केल ६:३) देशातील रहिवाशांना तो म्हणतो: “तुझी घडी भरली आहे.”—यहेज्केल ७:७.
सा.यु.पू. ६१२ मध्ये, एका दृष्टांतात यहेज्केल जेरुसलेमला जातो. देवाच्या मंदिरात तो अतिशय घृणास्पद गोष्टी घडत असल्याचे पाहतो. धर्मत्यागी लोकांविरुद्ध यहोवा जेव्हा न्यायदंड बजावणाऱ्या आपल्या स्वर्गीय सेनेला पाठवेल तेव्हा ज्यांच्या “कपाळावर चिन्ह” आहे केवळ त्यांनाच वाचवले जाईल. (यहेज्केल ९:२-६) परंतु, त्याआधी संपूर्ण शहरावर ‘ईंगळे’—नाशाविषयी देवाचा जळजळता संदेश—विखरायचा होता. (यहेज्केल १०:२) यहोवा असे वचन देतो, की “जे दुष्ट आहेत त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे” तो करील परंतु त्याचबरोबर ‘पांगलेल्या इस्राएलांस तो गोळा करील.’—यहेज्केल ११:१७-२१.
देवाचा आत्मा यहेज्केलास पुन्हा खास्दी देशांत आणतो. एका नाट्यरूपांतरात, राजा सिदकीया आणि त्याचे लोक जेरुसलेमेतून कसे पलायन करतात ते दाखवण्यात येते. खोट्या संदेष्ट्यांना व संदेष्ट्रींना शाप दिला जातो. मूर्तीपूजकांचा त्याग केला जातो. यहुदाची तुलना एका निकामी द्राक्षीसोबत करण्यात येते. जेरुसलेम मदतीसाठी मिसराकडे वळाल्यामुळे तिला किती घोर परिणाम भोगावे लागतील हे एका गरुड-द्राक्षीच्या कोड्यावरून दाखवले जाते. या कोड्याच्या समाप्तीस यहोवा असे वचन देतो, की मी “अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन.” (यहेज्केल १७:२२) परंतु, यहुदात “अधिकार चालविण्याचा राजदंड” नसेल.—यहेज्केल १९:१४.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:४-२८—हा स्वर्गीय रथ कशास चित्रित करतो? तो, यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागास चित्रित करतो जो विश्वासू आत्मिक प्राण्यांचा मिळून बनला आहे. या रथाची शक्ती यहोवाचा पवित्र आत्मा आहे. यहोवाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रथाच्या चालकाचे वैभव, वर्णन करण्यास शब्द
अपुरे पडतील असे आहे. एका सुंदर मेघधनुष्याद्वारे त्याचे शांतचित्त चित्रित करण्यात आले आहे.१:५-११—ते चार जिवंत प्राणी कोण आहेत? यहेज्केलाला जो रथाविषयी दुसरा दृष्टांत झाला त्यात तो या चार जिवंत प्राण्यांची करूब म्हणून ओळख करून देतो. (यहेज्केल १०:१-११; ११:२२) या नंतरच्या वर्णनात तो, बैलाचे मुख “करुबाच्या मुखासारखे होते,” असे म्हणतो. (यहेज्केल १०:१४) हे वर्णन अगदी उचित आहे कारण बैल, ताकद आणि शक्तीचे प्रतिक आहे; व करुब हे शक्तिशाली आत्मिक प्राणी आहेत.
२:६—यहेज्केलाला वारंवार ‘मानवपुत्र’ असे का संबोधण्यात आले आहे? यहेज्केलाला असे संबोधून यहोवा या संदेष्ट्याला एकप्रकारे अशी आठवण करून देत आहे, की तो हाडा-मांसाचा आहे व त्यामुळे, मानव संदेशवाहक आणि संदेशाचा स्रोत देव यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. शुभवर्तमानांमध्ये, येशू ख्रिस्ताला संबोधताना हीच पदवी ८० वेळा वापरण्यात आली आहे. त्यावरून स्पष्ट दिसते, की देवाचा पुत्र, देवाचा अवतार म्हणून नव्हे तर मानव म्हणून या पृथ्वीवर आला होता.
२:९–३:३—विलाप व शोक ह्यांविषयीचा ग्रंथपट यहेज्केलाने सेवन केल्यावर तो त्याला मधूर का लागला? यहेज्केलावर जी कामगिरी सोपवण्यात आली होती त्या कामगिरीकडे त्याने ज्या दृष्टीने पाहिले त्यामुळे त्याला तो ग्रंथपट मधूर वाटला. संदेष्टा म्हणून यहेज्केलाला जो बहुमान मिळाला होता त्याबद्दल तो यहोवास कृतज्ञ होता.
४:१-१७—जेरुसलेमच्या भोवती जो वेढा पडणार होता त्याचे यहेज्केलाने खरोखरच नाट्यरुपांतर करून दाखवले का? जळण बदलण्याविषयी यहेज्केलाने यहोवाला जी विनंती केली आणि यहोवाने देखील ती मान्य केली यावरून असे सूचित होते, की संदेष्ट्याने खरोखरच त्या दृश्याचे नाट्यरुपांतर केले. डाव्या कुशीवर निजणे, इस्राएलच्या दहा-गोत्रांच्या ३९० वर्षांच्या अधर्मास सूचित करत होते. सा.यु.पू. ९९७ पासून सुरू होऊन सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरुसलेमचा नाश होईपर्यंत हा ३९० वर्षांचा काळ होय. उजव्या कुशीवर निजणे, यहुदाच्या ४० वर्षांच्या अधर्मास सूचित करत होते. यिर्मयाला सा.यु.पू. ६४७ मध्ये जेव्हा संदेष्टा म्हणून नियुक्त केले तेव्हापासून सा.यु.पू. ६०७ पर्यंत ही ४० वर्षे होतात. एकूण ४३० दिवसांच्या कालावधीदरम्यान, यहेज्केल खूप कमी जेवण आणि पाण्यावरच होता. हे, जेरुसलेमला वेढा पडेल तेव्हा दुष्काळ पडेल याचे भविष्यसूचक होते.
५:१-३—यहेज्केलास काही केस वाऱ्यावर उडवायचे होते आणि काही आपल्या वस्त्राच्या पदरी बांधायचे होते; हे कशास सूचित करत होते? ते हे सूचित करत होते, की ७० वर्षांच्या नाशानंतर, काही शेष लोक यहुदास पुन्हा येतील व खरी उपासना पुन्हा सुरू करतील.—यहेज्केल ११:१७-२०.
१७:१-२४—दोन मोठे गरुड कोण आहेत, गंधसरूच्या शेंड्याकडील डहाळ्या कशाप्रकारे तोडून घेण्यात येतात व यहोवाने जिला लावले ती ‘कोवळी फांदी’ कोण आहे? दोन मोठे गरुड, बॅबिलोन व इजिप्तच्या शासकांना चित्रित करतात. पहिले गरुड गंधसरूच्या शेंड्याकडे येते म्हणजे दाविदाच्या राजेशाही घराण्याच्या सरकाराच्या शासकाकडे येते. मग हे गरुड, सिदकियाच्या ऐवजी यहुदाचा राजा यहोयाखीन यास नेमून शेंड्याकडील कोवळ्या डहाळ्या तोडते. एकनिष्ठेची शपथ घेऊनही सिदकिया दुसऱ्या गरुडाची अर्थात ईजिप्तची मदत घेण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचा काही फायदा होत नाही. त्याला बंदिवान म्हणून नेले जाणार होते व बॅबिलोनमध्ये त्याचा मृत्यू होणार होता. यहोवा, एक ‘कोवळी फांदी’ देखील तोडतो; ही कोवळी फांदी अर्थात मशिही राजा. या कोवळ्या फांदीला “एका मोठ्या उंच पर्वतावर” अर्थात स्वर्गीय सीयोन डोंगरावर लावले जाते. तेथे ही कोवळी प्रकटीकरण १४:१.
फांदी अर्थात मशिही राजा “उत्तम गंधसरू” होईल. म्हणजे, पृथ्वीवर खऱ्या आशीर्वादांचा तो स्रोत बनेल.—आपल्याकरता धडे:
२:६-८; ३:८, ९, १८-२१. आपण दुष्टांना भिण्याचे कारण नाही किंवा त्यांना देवाचा संदेश सांगण्यापासून टाळणे देखील बरोबर नाही कारण या संदेशात त्यांच्यासाठी एक इशारा देखील आहे. लोक जेव्हा आपली थट्टा करतात किंवा आपला विरोध करतात तेव्हा आपण गारगोटीसारखे कठीण असले पाहिजे. परंतु आपण, पाषाणहृदयी, भावनाहीन किंवा निर्दयी होणार नाही याची खबरदारी बाळगली पाहिजे. येशूने ज्या लोकांना प्रचार केला त्यांना पाहून त्याला कळवळा आला. लोकांबद्दल कळवळा असल्यामुळे आपण त्यांना प्रचार करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.—मत्तय ९:३६.
३:१५. यहेज्केलास त्याची कामगिरी मिळाल्यानंतर तो तेल-अबीब येथे ‘सात दिवसांसाठी भयचकित होऊन’ राहिला; अर्थात त्याला जो संदेश घोषित करायचा होता तो आत्मसात करण्यासाठी राहिला. आध्यात्मिक गहन सत्ये समजण्याकरता त्यांचा मनःपूर्वक अभ्यास करण्यासाठी व मनन करण्यासाठी आपणही वेळ काढू नये का?
४:१–५:४. दोन भविष्यसूचक मूकनाट्ये करून दाखवण्याकरता यहेज्केलाला नम्रपणा व धैर्य दाखवणे आवश्यक होते. देवाने दिलेली नेमणूक पार पाडण्याकरता आपण देखील नम्र व धैर्यशील असले पाहिजे.
७:४, ९; ८:१८; ९:५, १०. ज्यांना देवाचा प्रतिकूल न्यायदंड भोगावा लागतो अशांची आपण गय करू नये किंवा त्यांच्यावर कृपादृष्टी करू नये.
७:१९. यहोवा जेव्हा या व्यवस्थीकरणावर न्यायदंड बजावेल तेव्हा पैशाला काहीही किंमत राहणार नाही.
८:५-१८. धर्मत्यागामुळे एक व्यक्ती देवाबरोबरचा तिचा नातेसंबंध नष्ट करते. “अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करितो.” (नीतिसूत्रे ११:९) धर्मत्यागींचे म्हणणे ऐकून घेण्याचा विचार देखील आपल्या मनातून काढून टाकण्याद्वारे आपण सुज्ञता दाखवतो.
९:३-६. चिन्ह करून घेणे अर्थात आपण देवाचे समर्पित, बाप्तिस्मा घेतलेले सेवक आहोत आणि आपण ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व धारण केले आहे हे, ‘मोठ्या संकटातून’ सुखरूप वाचण्याकरता आवश्यक आहे. (मत्तय २४:२१) कारकुनाची दऊत घेऊन असलेला मनुष्य अभिषिक्त ख्रिश्चनांना चित्रित करतो. हे ख्रिस्ती चिन्ह लावण्याच्या कामात अर्थात राज्य प्रचारकार्यात व शिष्य बनवण्याच्या कामात अग्रगामी आहेत. आपण जर आपल्या कपाळावरील चिन्ह टिकवून ठेवू इच्छित असू तर आपण या ख्रिश्चनांना या कार्यात आवेशाने मदत केली पाहिजे.
१२:२६-२८. जे यहेज्केलाच्या संदेशाची थट्टा करीत होते त्यांनाही त्याला असे म्हणायचे होते: ‘यहोवाच्या कोणत्याहि वचनास विलंब लागणार नाही.’ यहोवा या व्यवस्थीकरणाचा नाश आणायच्या आधी आपण लोकांना त्याच्यावर भरवसा ठेवण्यास मदत करण्याकरता होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
१४:१२-२३. तारण प्राप्त करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. कोणी कोणासाठी तारण प्राप्त करू शकत नाही.—रोमकर १४:१२.
१८:१-२९. आपल्या कार्यांच्या परिणामांसाठी आपणच जबाबदार आहोत.
“मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन”
सा.यु.पू. ६११ मध्ये म्हणजे बंदिवासाच्या सातव्या वर्षी, इस्राएलचे वडील यहोवाला “प्रश्न विचारण्यासाठी” यहेज्केलाकडे येतात. तेव्हा इस्राएलने यहोवाविरुद्ध बंड केल्याचा इतिहास आणि यहोवा ‘त्यांच्याविरुद्ध आपली तरवार’ चालवणार असल्याचा इशारा ते ऐकतात. (यहेज्केल २०:१; २१:३) इस्राएलचा सरदार (सिदकिया याला उद्देशून यहोवा म्हणतो: “शिरोभूषण उतरीव, मुकुट काढून टाक; काहीच कायम राहावयाचे नाही; जे नीच ते उंच होईल आणि जे उंच ते नीच होईल. मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन; ही स्थिति अशीच राहावयाची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्यास मी सत्ता देईन.”—यहेज्केल २१:२६, २७.
जेरुसलेमवर अपराधाचा आरोप केला जातो. अहला (इस्राएल) व अहलीबा (यहुदा) यांचे अपराध उजेडात आणले जातात. अहलाला तर केव्हाच ‘तिच्या जारांच्या स्वाधीन . . . [अर्थात] अश्शुरी पुरुषांच्या हाती’ करण्यात आले आहे. (यहेज्केल २३:९) अहलीबाचा नाश लवकरच होणार असतो. सा.यु.पू. ६०९ मध्ये जेरुसलेमला पडलेल्या १८ महिन्यांच्या वेढ्यास सुरुवात होते. या शहराचा पाडाव होईल तेव्हा, यहुदी इतके अचंबित होतील, की त्यांना आपले शोकही व्यक्त करता येणार नाही. जोपर्यंत “निभावलेला एखादा माणूस” यहेज्केलाला नाशाची बातमी सांगत नाही तोपर्यंत यहेज्केलास देवाचा संदेश सांगण्यास मनाई आहे.—यहेज्केल २४:२६, २७.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
२१:३—यहोवा कोणती तरवार ‘म्यानातून उपसून’ काढतो? जेरुसलेम व यहुदा यांच्यावर न्यायदंड बजावण्याकरता यहोवा ज्या ‘तरवारीचा’ उपयोग करतो ती, बॅबिलोनचा राजा नबुखदनेसर व त्याचे सैन्य होय. ही तरवार, शक्तिशाली आत्मिक प्राण्यांची मिळून बनलेल्या देवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग देखील असू शकते.
२४:६-१४—कढईला लागलेला गंज कशास चित्रित करतो? वेढा पडलेल्या जेरुसलेमची तुलना मोठ्या तोंडाच्या कढईशी करण्यात आली आहे. या कढईला लागलेला गंज, शहरातील नैतिक घाण, जसे की, अशुद्धपणा, कामातूरपणा आणि रक्तपात यांस चित्रित करतो. या सर्व गोष्टींसाठी जेरुसलेमला जबाबदार ठरवण्यात आले आहे. तिच्यात इतका अशुद्धपणा भरला आहे, की रिकाम्या कढईला विस्तवावर ठेवून ती अतिशय तप्त केली तरीसुद्धा तिला चढलेला गंज निघून जात नाही.
आपल्याकरता धडे:
२०:१, ४९. इस्राएलच्या वडिलधाऱ्यांनी जशी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून असे दिसून आले, की त्यांना यहेज्केलाने जे सांगितले त्याबद्दल शंका होती. देवाकडून येणाऱ्या इशाऱ्यांबद्दल आपण केव्हाही अशी शंका घेण्याची मनोवृत्ती विकसित करू नये.
२१:१८-२२. नबुखदनेसरने शकुन पाहिलेले असले तरीसुद्धा, मूर्तीपूजक शासक जेरुसलेमविरुद्ध चाल करतील, असे यहोवाने घडवून आणले. यावरून हेच दिसून येते, की यहोवा जेव्हा न्यायदंड बजावण्याकरता आपल्या दूतांना आपला उद्देश पूर्ण करण्याकरता पाठवतो तेव्हा दुरात्मे देखील त्यांना अडवू शकत नाहीत.
२२:६-१६. लबाडी, अनैतिक वर्तन, सत्तेचा गैरवापर आणि लाच घेणे यांचा यहोवाला वीट आहे. अशी पातके न करण्याचा आपण केलेल्या निश्चयात आपण केव्हाही डगमगू नये.
२३:५-४९. राजकीय सख्य केल्यामुळे इस्राएल व यहुदाने त्यांच्या मित्रांची खोटी उपासना स्वीकारली. आपणही जगाबरोबर मैत्री करण्याचे आवर्जून टाळू ज्यामुळे आपल्या विश्वासाचा नाश होऊ शकेल.—याकोब ४:४.
सजीव व सक्रिय असलेला संदेश
बायबलमधील यहेज्केल पुस्तकाच्या पहिल्या २४ अध्यायांतून आपल्याला सर्वोत्तम धडे शिकायला मिळतात. त्या अध्यायांतील तत्त्वांवरून आपल्याला दिसून येते, की कोणत्या गोष्टी केल्याने देव असंतुष्ट होतो, आपण त्याची दया कशी प्राप्त करू शकतो आणि आपण दुष्टांना इशारा का दिला पाहिजे. जेरुसलेमच्या नाशाविषयीची भविष्यवाणी हे स्पष्टपणे दाखवून देते, की यहोवा एक असा देव आहे जो ‘नव्या गोष्टी आरंभ होण्यापूर्वी त्या आपल्या लोकांना ऐकवितो.’—यशया ४२:९.
यहेज्केल १७:२२-२४ व २१:२६, २७ मध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या भविष्यवाण्या मशिही राज्याची स्वर्गामध्ये स्थापना झाल्याचे दर्शवितात. लवकरच या मशिही राज्याद्वारे संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही होईल. (मत्तय ६:९, १०) या राज्याचे आशीर्वाद मिळण्याची आपण भक्कम विश्वास व भरवशाने वाट पाहू शकतो. खरेच, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०७ ७/१)
[१२ पानांवरील चित्र]
स्वर्गीय रथ कशास चित्रित करतो?
[१४ पानांवरील चित्र]
प्रचार कार्यात आवेशाने भाग घेत राहिल्याने आपण आपल्या कपाळावरील “चिन्ह” टिकवून ठेवू शकतो