व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वांशिक असोशिकपणा यावर उपाय काय?

वांशिक असोशिकपणा यावर उपाय काय?

वांशिक असोशिकपणा यावर उपाय काय?

स्पेनमध्ये एक पंच, फूटबॉलचा एक सामना थांबवतो. का? कारण, सामन्यात भाग घेणाऱ्‍या एका कॅमेरूनच्या खेळाडूला, खेळ पाहणारे लोक इतक्या शिव्या देत असतात, की तो सामना सोडून जाण्याची धमकी देतो. रशियात आफ्रिकन, आशिया व लॅटिन अमेरिकेतील लोकांविरुद्धचे हिंसक हल्ले सर्वसामान्य बनले आहेत; २००४ सालादरम्यान वंशवाद्यांचे हल्ले ५५ टक्क्यांनी वाढले; २००५ सालादरम्यान तेथे ३९४ हल्ल्यांच्या घटना घडल्या. ब्रिटनमध्ये घेतलेल्या एका सर्व्हेत एक तृतीयांश आशियाई व निग्रो लोकांना वाटले, की वांशिक भेदामुळे त्यांनी त्यांची नोकरी गमावली होती. ही उदाहरणे, जगभरातील प्रवृत्ती प्रतिबिंबित करतात.

वांशिक असोशिकपणा वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतो. खोचक किंवा अविचारी बोलण्यापासून राष्ट्रीय धोरण म्हणून एखाद्या वांशिक गटाचे पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांपर्यंत हे असू शकते. वांशिक असोशिकपणाचे मूळ कारण काय आहे? वांशिक भेद दाखवण्याचे आपण कसे टाळू शकतो? मानवजातीतील सर्व कुटुंबे एके दिवशी शांतीने नांदतील, अशी आशा बाळगणे रास्त आहे का? बायबल याबाबतीत अतिशय रोचक सूक्ष्मदृष्टी पुरवते.

जुलूम आणि द्वेष

“मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात,” असे बायबल म्हणते. (उत्पत्ति ८:२१) त्यामुळे काही लोकांना इतरांवर जुलूम करण्यात एकप्रकारचा आनंद मिळतो. बायबल पुढे असेही म्हणते: “पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलूम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे.”—उपदेशक ४:१.

बायबल हेही दाखवते, की वांशिक द्वेषाच्या घटना फार पूर्वीपासूनच घडत होत्या. जसे की, आपल्या सामान्य युगापूर्वीच्या १८ व्या शतकात, एका इजिप्शियन फारोने, हिब्रू असलेल्या याकोबाला आणि त्याच्या मोठ्या कुटुंबाला इजिप्तमध्येच येऊन राहण्याचे आमंत्रण दिले. परंतु नंतर दुसऱ्‍या एका फारोला, स्थलांतर करून आलेल्या या मोठ्या समुदायापासून धोका असल्याचे वाटू लागले. त्यामुळे, अहवालात असे म्हटले आहे: “तो आपल्या लोकांस म्हणाला, ‘पाहा, या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत; तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील.’ . . . त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांस जेरीस आणावे, या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले.” (निर्गम १:९-११) इजिप्शियन लोकांनी तर याकोबाच्या या वंशजांत मुलगा जन्मल्यास त्यांना ठार मारण्याची आज्ञा दिली.—निर्गम १:१५, १६.

वांशिक द्वेषाचे मूळ कोण आहे?

जगाच्या धर्मांनी, वांशिक असोशिकपणा थांबवण्यासाठी काहीही केलेले नाही. काही व्यक्‍तींनी जुलूमाचा विरोध करता करता आपला प्राण जरी गमावला असला तरी, धर्मांनी एकूणच, जे जुलूम करतात त्यांची कड घेतली आहे. संयुक्‍त संस्थानात असेच झाले. काळ्या लोकांवर ताबा मिळवण्यासाठी कायद्याचा वापर करण्यात आला आणि काहींना तर जबरदस्तीने फासावरही लटकवण्यात आले व १९६७ पर्यंत मिश्र विवाहांवर कायद्याने बंदी होती. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचे धोरण चाललेल्या काळातही हे खरे होते; एका अल्पसंख्याक समाजाने कायद्याने आपापली पदे जपून ठेवली; या कायद्यात, आंतरजातीय विवाहांवर बंदी असलेल्या नियमाचा देखील समावेश होता. प्रत्येक बाबतीत, असोशिकपणाचा पुरस्कार करणाऱ्‍या वांशिक गटातील काही सदस्य, अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते.

परंतु, बायबलमध्ये वांशिक असोशिकपणाचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे. काही वांशिक गट इतरांवर जुलूम का करतात, त्याचे स्पष्टीकरण बायबलमध्ये दिले आहे. ते म्हणते: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे. ‘मी देवावर प्रीति करितो,’ असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:८, २०) या विधानावरून वांशिक असोशिकपणाच्या मुळाशी काय आहे ते दिसून येते. लोक धार्मिक असल्याचा दावा करीत असले अथवा करीत नसले तरी ते वांशिक द्वेष बाळगतात कारण ते देवाला ओळखत नाहीत किंवा त्याच्यावर प्रेम करत नाहीत.

देवाबद्दलचे ज्ञान—वांशिक एकोप्यासाठी आधार

देवाला ओळखल्याने व त्याच्यावर प्रेम केल्याने वांशिक एकोपा कसा काय उत्पन्‍न होतो? देवाच्या वचनातील असे कोणते ज्ञान लोकांना, वेगळ्या जातीच्या लोकांचा द्वेष करण्यास बांध घालते? बायबल म्हणते, की यहोवा सर्वांचा पिता आहे. ते असे म्हणते: “आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले.” (१ करिंथकर ८:६) शिवाय ते असेही म्हणते: “त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण” केली. (प्रेषितांची कृत्ये १७:२६) यास्तव, सर्व लोक वास्तविकतेत एकमेकांचे भाऊ आहेत.

सर्व वंशाचे लोक, देवाकडून जीवन मिळाल्याबद्दल अभिमान बाळगू शकतात. परंतु, आपल्या पूर्वजाच्या एका गोष्टीसाठी मात्र सर्वांना वाईट वाटेल. बायबल लेखक पौल याने असे लिहिले: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले.” त्यामुळे, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३; ५:१२) यहोवा हा असा देव आहे ज्याला विविधता आवडते—कोणतेही दोन प्राणी अगदी हुबेहूब एकमेकांसारखे नाहीत. तरीपण, कोणत्याही वांशिक गटाला त्याने वर्चस्वाची भावना मनात बाळगण्यास कारण दिलेले नाही. आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, ही सर्वत्र दिसून येणारी भावना, शास्त्रवचनांतील सत्यांच्या विरोधात आहे. होय, देवाकडून मिळणारे ज्ञान वांशिक ऐक्य उत्पन्‍न करते.

सर्व राष्ट्रांबद्दल देवाला असलेली काळजी

काहींना असे वाटते, की प्राचीन इस्राएल लोकांवर कृपापसंती दाखवून व इतर राष्ट्रांपासून त्यांना वेगळे राहण्याचे शिकवून देवाने वांशिक पूर्वग्रहाचा पुरस्कार केला. (निर्गम ३४:१२) एकेकाळी, देवाने इस्राएल राष्ट्राला, इस्राएलचा कुलपिता अब्राहाम याने दाखवलेल्या उल्लेखनीय विश्‍वासामुळे आपले स्वतःचे लोक होण्यास निवडले. देवाने स्वतः तेव्हा प्राचीन इस्राएलवर राज्य केले, त्यांच्यावरील राजांना स्वतः निवडले आणि त्यांना नियमावली दिली. इस्राएलने जोपर्यंत ही व्यवस्था मान्य केली होती तोपर्यंत, इतर लोक दुसरीकडच्या मानवी सरकारांच्या तुलनेत देवाच्या सरकारचे उत्तम परिणाम पाहू शकत होते. यहोवाने तेव्हा इस्राएल राष्ट्राला हेही शिकवले, की मानवजातीला त्याच्याबरोबर उत्तम नातेसंबंध पुन्हा स्थापित करायचा असेल तर एका बलिदानाची आवश्‍यकता आहे. यामुळे, इस्राएलबरोबर देवाने केलेल्या व्यवहारांचा सर्व राष्ट्रांना फायदा झाला. हे त्याने अब्राहामाला जे सांगितले त्याच्या अनुषंगात होते: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति २२:१८.

याशिवाय, यहुद्यांना देवाची पवित्र वचने प्राप्त करण्याचा व ज्या राष्ट्रात मशिहाचा जन्म झाला होता त्या राष्ट्राचे सदस्य होण्याचा बहुमान मिळाला होता. पण हेही सर्व राष्ट्रांना फायदा व्हावा म्हणून होते. यहुद्यांना देण्यात आलेल्या इब्री शास्त्रवचनांत, सर्व वंशाच्या लोकांना जेव्हा महान आशीर्वाद मिळतील त्या काळाचे अतिशय सुरेख वर्णन आहे: “देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो.’ . . . यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:२-४.

येशू ख्रिस्ताने यहुद्यांना प्रचार केला असला तरी, त्याने असेही म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) एकही राष्ट्र सुवार्ता ऐकल्यावाचून राहणार नाही. सर्व वांशिक गटांशी निःपक्षपाती पद्धतीने वागण्यात यहोवाने एक परिपूर्ण उदाहरण मांडले आहे. “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

प्राचीन इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या नियमावलीतूनही हे स्पष्ट होते, की सर्व राष्ट्रांबद्दल त्याला काळजी आहे. गैर इस्राएली लोक जेव्हा देशात राहायला येतात तेव्हा त्यांना फक्‍त तिथे राहू द्यावे इतकेच नियमशास्त्रात सांगण्यात आले नव्हते तर आणखी काय सांगितले होते ते पाहा: “तुमच्याबरोबर राहणाऱ्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा; कारण तुम्हीहि मिसर देशात परदेशीय होता.” (लेवीय १९:३४) देवाने दिलेल्या अनेक नियमांत इस्राएलांना, स्थलांतर करून आलेल्या लोकांना दयाळुपणे वागवण्यास शिकवण्यात आले होते. त्यामुळेच, बवाज नावाच्या येशूच्या एका पूर्वजाने देवाकडून त्याला जे शिक्षण मिळाले होते ते कृतीत आणले. त्याने जेव्हा एका विदेशी स्त्रीला आपल्या शेतात सरवा गोळा करताना पाहिले तेव्हा, या स्त्रीला पुरेसे धान्य गोळा करता येईल इतके पीक आपले कापणी कामगार मागे सोडत आहेत, याची खात्री केली.—रूथ २:१, १०, १६.

येशू दयाळुपणा दाखवण्यास शिकवतो

इतर कोणाही पेक्षा येशूने देवाबद्दलचे ज्ञान दिले. परजातीच्या लोकांशी दयाळुपणे कसे वागायचे हे त्याने आपल्या अनुयायांना दाखवले. एकदा त्याने एका शोमरोनी स्त्रीबरोबर संभाषण सुरू केले. अनेक यहुदी शोमरोन्यांचा द्वेष करीत; त्यामुळे येशू जेव्हा या स्त्रीबरोबर बोलू लागला तेव्हा या स्त्रीला खूप आश्‍चर्य वाटले. तिच्याबरोबर बोलताना येशूने दयाळुपणे या स्त्रीला, ती सार्वकालिक जीवन कसे मिळवू शकते, हे समजण्यास मदत केली.—योहान ४:७-१४.

एका दयाळु शोमरोन्याचा दाखला देऊन येशूने आपल्याला हेही शिकवले, की आपण परजातीच्या लोकांशी कशाप्रकारे व्यवहार केला पाहिजे. या शोमरोन्याला एक यहुदी जखमी अवस्थेत दिसतो. लुटारूंनी त्याच्यावर हल्ला करून त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिले होते. शोमरोनी अगदी सहजगत्या असे म्हणू शकला असता: ‘एका यहुद्याला मी का म्हणून मदत करू? यहुदी लोक माझ्या लोकांना तुच्छ लेखतात.’ पण अनोळखी लोकांबद्दल या शोमरोन्याचा वेगळा दृष्टिकोन होता, असे येशूने दाखवले. हा जखमी मनुष्य ज्या रस्त्याच्या कडेला पडला होता त्या रस्त्यावरून इतरही लोक गेले होते तरीपण, फक्‍त शोमरोन्यालाच ‘त्याचा कळवळा’ आला आणि त्याने त्याला बरीच मदतही केली. येशूने या दृष्टांताची समाप्ती करताना म्हटले, की जो कोणी देवाची मर्जी प्राप्त करू इच्छितो त्याने असेच केले पाहिजे.—लूक १०:३०-३७.

जे देवाला संतुष्ट करू इच्छितात त्यांनी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल केला पाहिजे आणि देव ज्याप्रकारे लोकांशी व्यवहार करतो त्याबाबतीत त्याचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रेषित पौलाने शिकवले. त्याने असे लिहिले: ‘तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाका. आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण करा. ह्‍यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, हा भेदच नाही. . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.’—कलस्सैकर ३:९-१४.

देवाबद्दलचे ज्ञान घेतल्यावर लोकांमध्ये बदल होतो का?

यहोवा देवाचे ज्ञान घेतल्यावर खरोखरच लोकांमध्ये बदल होतात का? परजातीच्या लोकांना ते पूर्वी ज्याप्रकारे वागवत होते त्याप्रकारे ते देवाचे ज्ञान घेतल्यावर वागवत नाहीत का? कॅनडात राहायला गेलेल्या एका आशियाई स्त्रीचे उदाहरण घ्या. तिला तिथे जेव्हा वंशभेदाचा सामना करावा लागत होता तेव्हा ती अतिशय निराश झाली होती. मग तिची ओळख यहोवाच्या साक्षीदारांशी झाली आणि ते तिच्याशी बायबलचा अभ्यास करू लागले. नंतर तिने त्यांना एक आभारप्रदर्शनाचे पत्र लिहिले. त्यात ती असे म्हणते: ‘तुम्ही खूप चांगले व दयाळु श्‍वेत लोक आहात. दुसऱ्‍या श्‍वेतवर्णीयांपेक्षा तुम्ही वेगळे लोक आहात हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी विचार करू लागले, की तुम्ही वेगळे का आहात. मी खूप खूप विचार केला आणि स्वतःच असा निष्कर्ष काढला की तुम्ही देवाचे साक्षीदार आहात. बायबलमध्ये याविषयी नक्कीच काहीतरी शिकवण असावी. मी तुमच्या मंडळीत, श्‍वेतवर्णीय, कृष्णवर्णीय, गव्हाळवर्णीय, असे सर्वप्रकारचे लोक पाहिले, आणि तुमच्या सर्वांची मनं एकाच रंगाची होती—पारदर्शक होती. कारण तुम्ही सर्व बंधूभगिनी होता. आता मला माहीत आहे, तुम्हाला कोणी इतकं चांगलं बनवलं आहे. तुमच्या देवानं!’

देवाचे वचन अशा काळाविषयी भाकीत करते जेव्हा “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) बायबल भविष्यवाणीची पूर्णता आजही होत आहे. “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी” लाखोंच्या घरात असलेला एक मोठा लोकसमुदाय खरी उपासना ऐक्याने करत आहे. (प्रकटीकरण ७:९) या समुदायातील लोक अशा काळाची वाट पाहत आहेत जेव्हा संपूर्ण जगातील लोक एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी एकमेकांवर प्रेम करतील. तेव्हा यहोवाने अब्राहामाला दिलेले वचन लवकरच पूर्ण होईल: “पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”—प्रेषितांची कृत्ये ३:२५. (w०७ ७/१)

[४, ५ पानांवरील चित्र]

देवाच्या नियमशास्त्राने इस्राएली लोकांना, त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या परदेशी लोकांवर प्रेम करण्यास शिकवले

[५ पानांवरील चित्र]

दयाळु शोमरोन्याच्या दाखल्यावरून आपण काय शिकू शकतो?

[६ पानांवरील चित्रे]

देवाने कोणत्याही वांशिक गटाला दुसऱ्‍यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याकरता कारण दिलेले नाही