व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.”—रोमकर १२:१७.

१. कशाप्रकारची वागणूक बरेचदा पाहायला मिळते?

एखाद्या लहान मुलाला त्याच्या भावाने किंवा बहिणीने धक्का मारल्यास तो काय करतो? लगेच तोही त्याला किंवा तिला धक्का मारतो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, ही जशास-तसे वागणूक फक्‍त लहान मुलांपुरतीच मर्यादित नाही. बरेच प्रौढ देखील कित्येकदा असेच वागतात. कोणी त्यांच्या भावना दुखावल्यास तेही त्या व्यक्‍तीला दुखावण्याचा प्रयत्न करतात. मुलांसारखी धक्काबुक्की कदाचित ते करणार नाहीत, पण अप्रत्यक्ष मार्गांनी ते त्या व्यक्‍तीला खाली ओढण्याचा प्रयत्न करतील. कधी खोट्या अफवा पसरवून तर कधी त्याला यशस्वी न होऊ देण्याचा या ना त्या मार्गाने प्रयत्न करून ते आपल्या भावना दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीचे वाईट करतात. मार्ग कोणताही असला तरी त्यामागचा हेतू एकच असतो—त्याने आपल्याला जी वागणूक दिली तीच वागणूक त्याला देऊन त्याचा बदला घ्यायचा.

२. (क) खरे ख्रिस्ती बदला घेण्याच्या इच्छेशी का झगडतात? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर व बायबलच्या कोणत्या अध्यायाची चर्चा करणार आहोत?

बदला घेण्याची इच्छा खूप तीव्र असू शकते. पण खरे ख्रिस्ती या इच्छेशी झगडतात. बदला घेण्याच्या तीव्र इच्छेला बळी पडण्याऐवजी, “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका” या प्रेषित पौलाच्या आदेशाचे पालन करण्याचा ते प्रयत्न करतात. (रोमकर १२:१७) या उदात्त आदर्शानुसार जगण्याची आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळू शकेल? आपण विशेषतः कोणाला वाइटाबद्दल वाईट अशी फेड करू नये? बदला घेण्यापासून स्वतःला आवरल्यामुळे आपल्याला कोणते फायदे मिळतील? या प्रश्‍नांचे उत्तर मिळवण्याकरता आपण पौलाच्या शब्दांची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊ आणि बदला न घेणे हाच योग्य, प्रेमळपणाचा आणि विनयशील मार्ग आहे हे रोमकरांस पत्रातील १२ वा अध्याय कशाप्रकारे स्पष्ट करतो याचे परीक्षण करू. हे तिन्ही पैलू आपण एकेक करून विचारात घेऊ.

‘म्हणून, मी तुम्हाला विनवितो’

३, ४. (क) रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायापासून पौल कशाविषयी चर्चा करण्यास सुरुवात करतो आणि “म्हणून” हा शब्द वापरण्याद्वारे त्याने काय सुचवले? (ख) देवाच्या करूणेचा रोममधील ख्रिश्‍चनांवर कसा परिणाम व्हायला हवा होता?

रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायापासून पौल ख्रिस्ती जीवनावर परिणाम करणाऱ्‍या चार अशा विषयांची चर्चा करण्यास सुरुवात करतो, की जे एकमेकांशी संबंधित आहेत. तो यहोवासोबत, सहविश्‍वासू बांधवांसोबत, आपले सहउपासक नसलेल्यांसोबत आणि सरकारी अधिकाऱ्‍यांसोबत आपले संबंध कसे असावेत याविषयी वर्णन करतो. “म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करूणेमुळे तुम्हाला विनवितो” असे म्हणण्याद्वारे, पौल असे सुचवतो की बदला घेण्याच्या इच्छेसारख्याच इतरही अयोग्य इच्छांचा प्रतिकार करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. (रोमकर १२:१) “म्हणून” या शब्दाने तो सुरुवात करतो याकडे लक्ष द्या. दुसऱ्‍या शब्दांत, “आपण आतापर्यंत जे पाहिले त्याच्या आधारावर.” त्याअर्थी पौल असे म्हणत होता, की ‘मी आताच तुम्हाला जे समजावून सांगितले आहे, त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला असे विनवितो.’ पौलाने या रोमकर ख्रिश्‍चनांना काय समजावून सांगितले होते?

या पत्राच्या पहिल्या ११ अध्यायांत पौलाने देवाच्या राज्यात ख्रिस्तासोबत राज्य करण्याची जी अद्‌भुत संधी यहुद्यांना व विदेश्‍यांनाही मिळाली होती, व जी संधी नैसर्गिक यहुद्यांनी अव्हेरली होती तिच्याविषयी चर्चा केली. (रोमकर ११:१३-३६) ही मौल्यवान सुसंधी केवळ “देवाच्या करूणेमुळे” शक्य झाली होती. तेव्हा, देवाच्या या अपार करूणेबद्दल ख्रिश्‍चनांची कशी प्रतिक्रिया असण्यास हवी होती? त्यांची अंतःकरणे कृतज्ञतेने अशी ओथंबून जाण्यास हवी होती की जेणेकरून त्यांना पौलाने पुढे जे म्हटले त्याप्रमाणे करण्याची प्रेरणा मिळावी: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.” (रोमकर १२:१) पण ते ख्रिस्ती देवाला “यज्ञ” म्हणून स्वतःस कसे समर्पित करू शकत होते?

५. (क) एक व्यक्‍ती देवाला “यज्ञ” म्हणून स्वतःस कसे समर्पित करू शकते? (ख) एका ख्रिश्‍चनाच्या वागणुकीवर कशाचा परिणाम झाला पाहिजे?

पौल पुढे असा खुलासा करतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) या जगाच्या आत्म्याचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू देण्याऐवजी त्यांनी ख्रिस्ताच्या विचारसरणीनुसार आपल्या मनाचे नवीकरण करायचे होते. (१ करिंथकर २:१६; फिलिप्पैकर २:५) त्याच तत्त्वाचा सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या आणि आज आपल्याही वागणुकीवर परिणाम झाला पाहिजे.

६. रोमकर १२:१,२ यात पौलाने केलेल्या युक्‍तिवादाच्या आधारावर कोणती गोष्ट आपल्याला बदला घेण्यापासून आवरते?

रोमकर १२:१,२ यात पौलाने केलेला युक्‍तिवाद आपल्याला कशाप्रकारे लागू पडतो? रोममध्ये राहणाऱ्‍या त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणेच, आपणही देवाने जी करूणा आपल्याप्रती असंख्य मार्गांनी दाखवली आहे आणि दररोज दाखवतच आहे तिच्याबद्दल त्याचे अत्यंत कृतज्ञ आहोत. म्हणून, अर्थात आपले अंतःकरण कृतज्ञतेने ओथंबलेले असल्यामुळेच, आपण आपल्या संपूर्ण तन, मन, धनाने देवाची सेवा करू इच्छितो. हीच मनःपूर्वक इच्छा आपल्याला जगाच्या रीतीप्रमाणे नव्हे तर ख्रिस्ताप्रमाणे विचार करण्यास प्रेरित करते. आणि ख्रिस्ताची विचारसरणी जर आपण अवलंबली असेल तर आपले सहउपासक आणि जे सहउपासक नाहीत अशा लोकांशीही आपल्या वागणुकीवर याचा परिणाम होईल. (गलतीकर ५:२५) याचे एक समर्पक उदाहरण म्हणजे: जर आपण ख्रिस्तासारखे विचार करत असू तर बदला घेण्याच्या तीव्र इच्छेचा प्रतिकार करण्यास आपण प्रवृत्त होऊ.—१ पेत्र २:२१-२३.

“प्रीतीमध्ये ढोंग नसावे”

७. रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायात कोणत्या प्रकारच्या प्रीतीविषयी चर्चा केली आहे?

वाइटाबद्दल वाईट अशी फेड आपण करत नाही. असे करणे केवळ योग्य असल्यामुळेच नव्हे, तर असे करणे प्रेमळपणाचे आहे याचीही आपल्याला जाणीव आहे. प्रेम आपल्याला कशाप्रकारे प्रेरित करू शकते याचविषयी प्रेषित पौल पुढे चर्चा करतो. रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पौल देवाच्या व ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी बोलताना “प्रीती” (गीक्रमध्ये अगापे) या शब्दाचा अनेकदा उपयोग करतो. (रोमकर ५:५,८; ८:३५,३९) पण १२ व्या अध्यायात पौलाने अगापे या शब्दाचा काहीशा वेगळ्या अर्थाने—सहमानवांप्रती दाखवलेल्या प्रीतीच्या संदर्भात उपयोग केला आहे. पवित्र आत्म्याची कृपादाने निरनिराळी असून ती काही बांधवांना लाभली आहेत असे सांगितल्यावर पौल अशा एका गुणाचा उल्लेख करतो की जो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पौल म्हणतो: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे.” (रोमकर १२:४-९) इतरांप्रती प्रेम व्यक्‍त करणे हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे सर्वात पहिले ओळखचिन्ह आहे. (मार्क १२:२८-३१) पण ख्रिस्ती या नात्याने आपण जे प्रेम प्रदर्शित करतो ते निष्कपट असावे अशी पौल आपल्याला आठवण करून देतो.

८. आपण निष्कपट प्रेम कसे दाखवू शकतो?

पुढे पौल सांगतो की हे निष्कपट प्रेम कशाप्रकारे दाखवले जाते. तो म्हणतो: “वाइटाचा वीट माना; बऱ्‍याला चिकटून राहा.” (रोमकर १२:९) “वीट माना” व “चिकटून राहा” हे वजनदार शब्दप्रयोग आहेत. ‘वीट मानणे’ याला दुसऱ्‍या शब्दांत “खूपच तिरस्कार करणे” असेही म्हणता येते. आपण वाइटाच्या केवळ दुष्परिणामांचाच नव्हे तर मुळात त्या वाइटाचाही तिरस्कार केला पाहिजे. (स्तोत्र ९७:१०) ‘चिकटून राहा’ असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक क्रियापदावरून असे समजते की चांगुलपणाचा गुण हा निष्कपट प्रेमाशी इतका जवळून निगडीत आहे की तो असे निष्कपट प्रेम बाळगणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वाचा अविभाज्य अंग असतो.

९. पौल वारंवार कोणता आदेश देतो?

प्रेम व्यक्‍त करण्याच्या एका विशिष्ट मार्गाबद्दल पौल वारंवार उल्लेख करतो. तो म्हणतो: “तुमचा छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.” “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” “प्रिय जनहो, सूड उगवू नका.” ‘वाइटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका.’ (रोमकर १२:१४,१७-१९,२१) जे आपले सहउपासक नाहीत अशा लोकांशीही, किंबहुना जे आपला विरोध करतात त्यांच्याशीही आपण कसे वागावे हे पौलाच्या शब्दांवरून अगदीच स्पष्ट आहे.

“छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद द्या”

१०. आपण कशाप्रकारे आपला छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद देऊ शकतो?

१० “तुमचा छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद द्या” या पौलाच्या सल्ल्याचे आपण कशाप्रकारे पालन करावे? (रोमकर १२:१४) येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (मत्तय ५:४४; लूक ६:२७,२८) त्याअर्थी आपला छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद देण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. आपण देवाला विनंती करू शकतो की यांपैकी काहीजण जर अज्ञानामुळे आपला विरोध करत असतील, तर यहोवाने त्यांचे डोळे उघडावेत जेणेकरून ते सत्य समजून घेतील. (२ करिंथकर ४:४) अर्थात, आपला छळ करणाऱ्‍या व्यक्‍तीला देवाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती करणे आपल्याला काहीसे विचित्र वाटेल. पण आपल्या विचारसरणीचे ख्रिस्ताच्या विचारसरणीशी जितके अधिक साम्य असेल, तितकेच आपल्याला आपल्या शत्रूंबद्दलही प्रेम व्यक्‍त करणे सोपे जाईल. (लूक २३:३४) अशाप्रकारे प्रेम व्यक्‍त केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो?

११. (क) स्तेफनाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? (ख) पौलाच्या अनुभवावरून दिसते त्याप्रमाणे छळ करणाऱ्‍यांपैकी काहीजणांमध्ये कोणता बदल घडून येऊ शकतो?

११ स्तेफनाने आपला छळ करणाऱ्‍यांसाठी प्रार्थना केली होती. आणि त्याची प्रार्थना व्यर्थ ठरली नाही. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर काही काळातच, ख्रिस्ती मंडळीचा विरोध करणाऱ्‍यांनी स्तेफनाला अटक केली, त्याला शहराबाहेर ओढत नेले आणि तेथे ते त्याला दगडमार करू लागले. मरण्याआधी स्तेफनाने मोठ्याने ओरडून म्हटले: “प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” (प्रेषितांची कृत्ये ७:५८–८:१) त्यादिवशी स्तेफनाने ज्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांच्यापैकी एक होता शौल. स्तेफनाचा वध झाला तेव्हा शौल तेथेच उभा होता व त्याला हा वध मान्य होता. नंतर, पुनरुत्थित येशूने शौलाला दर्शन दिले. पूर्वी ख्रिश्‍चनांचा छळ करणारा हा शौल ख्रिस्ताचा अनुयायी बनला आणि कालांतराने तो प्रेषित पौल बनला. याच पौलाने रोमकरांना पत्र लिहिले. (प्रेषितांची कृत्ये २६:१२-१८) स्तेफनाच्या प्रार्थनेनुसार यहोवाने पौलाला ख्रिश्‍चनांचा छळ करण्याच्या पापाबद्दल क्षमा केले. (१ तीमथ्य १:१२-१६) म्हणूनच की काय, पौलाने ख्रिश्‍चनांना आग्रह केला की “तुमचा छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद द्या!” त्याला अनुभवाने हे माहीत होते की छळ करणाऱ्‍यांपैकीही काही जण भविष्यात देवाचे सेवक बनू शकतात. आज आपल्या काळातही, छळ करणाऱ्‍यांपैकी काहीजण यहोवाच्या सेवकांचे शांतीप्रिय वर्तन पाहून सत्यात आल्याची उदाहरणे आहेत.

‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’

१२. रोमकर १२:९,१७ या दोन्ही वचनांत जे सांगितले आहे ते कशाप्रकारे सुसंगत आहे?

१२ आपल्या सहउपासकांसोबत आणि सहउपासक नसलेल्यांसोबतही आपण कसे वागावे याविषयी पौल पुढे अशी ताकीद देतो की “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” हे त्याने याआधी जे म्हटले त्याच्याशी सुसंगत आहे, अर्थात, “वाइटाचा वीट माना.” साहजिकच, जर एखादी व्यक्‍ती बदला घेण्यासाठी इतरांचे वाईट करते, तर आपण वाइटाचा किंवा दुष्टाईचा वीट मानतो असे ती कसे म्हणू शकते? इतरांचे वाईट करणे हे ‘ढोंगी नसणाऱ्‍या’ अर्थात निष्कपट प्रीतीच्या अगदीच विरोधात आहे. यानंतर पौल म्हणतो: “सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.” (रोमकर १२:९,१७) या शब्दांचे आपण व्यवहारात कशाप्रकारे पालन करू शकतो?

१३. आपण ‘सर्व मनुष्यांच्या दृष्टीत’ कशाप्रकारे वागतो?

१३ याआधी, करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने, प्रेषितांना सोसाव्या लागलेल्या छळाविषयी लिहिले. त्याने म्हटले: “आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो! . . . आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करितो; आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करितो.” (१ करिंथकर ४:९-१३) त्याचप्रकारे आजही खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर जगातल्या लोकांचे लक्ष आहे. आपल्याला अन्यायी वागणूक दिली जाते तेव्हासुद्धा आपण चांगली कार्ये करत राहतो हे जेव्हा लोक पाहतात तेव्हा आपल्या ख्रिस्ती संदेशाला चांगला प्रतिसाद देण्यास ते प्रवृत्त होऊ शकतात.—१ पेत्र २:१२.

१४. शांतीने राहण्यासाठी आपण कोठपर्यंत प्रयत्न करतो?

१४ पण, शांती राखण्यासाठी आपण कोठपर्यंत प्रयत्न करत राहावे? आपल्याला शक्य होईल तेथपर्यंत आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. पौल आपल्या ख्रिस्ती बांधवांना सांगतो: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) “शक्य तर” आणि “तुम्हाकडून होईल तितके” हे वाक्यांश असे सुचवतात की इतरांसोबत शांतीसंबंध कायम ठेवणे नेहमीच शक्य होणार नाही. उदाहरणार्थ, केवळ एखाद्या मनुष्यासोबत शांती राखण्यासाठी आपण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. (मत्तय १०:३४-३६; इब्री लोकांस १२:१४) तरीपण, “सर्व माणसांबरोबर” शांतीने राहण्याकरता, देवाच्या वचनातील तत्त्वांसंबंधाने हातमिळवणी न करता, आपण आपल्याकडून शक्य असतील ते सर्व माफक प्रयत्न करतो.

“सूड उगवू नका”

१५. रोमकर १२:१९ यात बदला न घेण्याचे कोणते कारण सापडते?

१५ आपण कोणाचा बदला का घेऊ नये, याचे आणखी एक पटण्याजोगे कारण पौल सांगतो; कारण हा विनयशीलतेचा मार्ग आहे. पौल म्हणतो: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (रोमकर १२:१९) जो ख्रिस्ती सूड उगवण्याचा प्रयत्न करतो तो गर्विष्ठ आहे. जे काम देवाचे आहे ते तो आपल्या हातात घेतो. (मत्तय ७:१) शिवाय असे करण्याद्वारे, “मी फेड करीन” या यहोवाच्या आश्‍वासनावरही आपला विश्‍वास नसल्याचे तो दाखवतो. याउलट, खरे ख्रिस्ती हा भरवसा बाळगतात की यहोवा आपल्या ‘निवडलेल्या लोकांचा न्याय करेल.’ (लूक १८:७,८; २ थेस्सलनीकाकर १:६-८) हा भरवसा असल्यामुळे, ते घडलेल्या वाइटाची फेड करण्याचे काम विनयशीलपणे देवावर सोडून देतात.—यिर्मया ३०:२३,२४; रोमकर १:१८.

१६, १७. (क) एखाद्याच्या मस्तकावर “निखाऱ्‍यांची रास” करण्याचा काय अर्थ होतो? (ख) दयाळूपणामुळे, सत्य न मानणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीचे हृदय पाझरल्याचे तुमच्या पाहण्यात आले आहे का? उदाहरण द्या.

१६ एखाद्या शत्रूचा बदला घेतल्याने त्याचे मन आणखीनच कठोर बनू शकते, पण त्याच्याशी दयाळूपणे वागल्याने त्याचा पावित्रा काहीसा नरम होण्याची शक्यता आहे. का? रोममधील ख्रिश्‍चनांना पौल काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्‍यांची रास करिशील.” (रोमकर १२:२०; नीतिसूत्रे २५:२१,२२) याचा काय अर्थ होतो?

१७ “त्याच्या मस्तकावर निखाऱ्‍यांची रास करिशील” हा एक अलंकारिक वाक्प्रचार असून, बायबल लिहिण्यात आले त्या काळांत धातू गाळण्याकरता जी पद्धत वापरली जायची तिच्यावरून तो घेण्यात आला आहे. खनिज धातूवर जळत्या कोळशांची रास ठेवल्यामुळे तापमान वाढून त्यातील कठीण धातू वितळे व अशुद्धतांपासून वेगळा होई. त्याचप्रकारे, विरोध करणाऱ्‍या व्यक्‍तीप्रती दयाळूपणाची कृत्ये केल्यामुळे आपण त्याच्या स्वभावातील कठीणता ‘वितळवून’ त्याच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊ शकतो. (२ राजे ६:१४-२३) किंबहुना, ख्रिस्ती मंडळीतले कित्येक सदस्य यहोवाच्या सेवकांनी त्यांच्याप्रती केलेल्या दयाळू कृत्यांमुळेच सर्वप्रथम खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित झाले होते.

आपण बदला का घेत नाही?

१८. बदला न घेणे हा योग्य, प्रेमळपणाचा व विनयशील मार्ग का आहे?

१८ रोमकरांस लिहिलेल्या पत्राच्या १२ व्या अध्यायाचे थोडक्यात परीक्षण करताना “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” न करण्याची अनेक महत्त्वाची कारणे आपण पाहिली. सर्वात पहिले कारण म्हणजे, बदला घेण्यापासून स्वतःला आवरणे योग्य आहे. देवाने आपल्याप्रती जी करूणा दाखवली आहे ती लक्षात घेऊन आपण स्वतःस यहोवाला समर्पित करणे व आनंदाने त्याच्या आज्ञांचे पालन करणे हे योग्य व रास्त आहे. आणि त्याच्या आज्ञांपैकी एक आज्ञा ही आहे की आपण आपल्या शत्रूंवरही प्रेम केले पाहिजे. दुसरे कारण हे की वाइटाबद्दल वाईट अशी फेड न करणे हे प्रेमळपणाचे आहे. बदला न घेता, शांतीने राहण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपण प्रेमळपणे ही आशा बाळगतो की आपला कडा विरोध करणाऱ्‍यांपैकीही काहीजण यहोवाचे उपासक बनतील. तिसरे कारण म्हणजे वाइटाबद्दल वाईट अशी फेड न करणे हा विनयशीलतेचा मार्ग आहे. सूड उगवणे हे गर्विष्ठपणाचे लक्षण ठरेल कारण यहोवा म्हणतो: “सूड घेणे माझ्याकडे आहे.” शिवाय, देवाचे वचन ही ताकीद देते: “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतिसूत्रे ११:२) घडलेल्या वाइटाबद्दल फेड करणे देवावर सोडून देणे हे शहाणपणाचे आहे आणि यावरून आपली विनयशीलता दिसून येते.

१९. पुढच्या लेखात आपण काय विचारात घेणार आहोत?

१९ आपण इतरांशी कशाप्रकारे वागावे याविषयीच्या चर्चेचा शेवटी पौल सारांश देतो. तो ख्रिश्‍चनांना आवर्जून सांगतो की ‘वाइटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका.’ (रोमकर १२:२१) आज आपल्याला कोणत्या वाईट शक्‍तींना तोंड द्यावे लागत आहे? आपण त्यांच्यावर विजय कसा मिळवू शकतो? या व इतर संबंधित प्रश्‍नांची उत्तरे पुढील लेखात विचारात घेतली जातील. (w०७ ७/१)

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

रोमकर अध्याय १२ यात कोणता सल्ला वारंवार आढळतो?

• कोणती गोष्ट आपल्याला बदला न घेण्याची प्रेरणा देते?

• आपण “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” न केल्यास आपल्याला व इतरांनाही कोणते आशीर्वाद मिळतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चौकट]

रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायात ख्रिस्ती व्यक्‍तीच्या पुढील नातेसंबंधांचे वर्णन केले आहे:

यहोवासोबत

सहउपासकांसोबत

सहउपासक नसणाऱ्‍यांसोबत

[२५ पानांवरील चित्र]

पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रातून ख्रिश्‍चनांना बराच व्यवहारोपयोगी सल्ला मिळतो