व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्यात्माच्या शोधात

अध्यात्माच्या शोधात

अध्यात्माच्या शोधात

येशूने त्याच्या सुविख्यात डोंगरावरील प्रवचनात असे म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक असणारे सुखी आहेत.” (मत्तय ५:३, NW) कदाचित तुम्ही या विधानाशी सहमत असाल. आज जगातल्या सर्व भागांतले लोक आपल्या जीवनात अध्यात्माची गरज आहे हे ओळखतात. अध्यात्माचा ध्यास घेतल्याने जीवन आपोआप सुखी होते असे त्यांचे मानणे आहे. पण “अध्यात्माचा” मुळात अर्थ काय?

एका शब्दकोशानुसार, अध्यात्म म्हणजे “धार्मिक मूल्यांप्रती संवेदनशीलता किंवा ओढ” आणि “आध्यात्मिक प्रवृत्ती असणे.” या शब्दाचा अर्थ आणखी स्पष्ट होण्याकरता ही तुलना विचारात घ्या: जो मनुष्य पैशांच्या व्यवहारात कुशल असतो त्याला व्यावसायिक प्रवृत्तीचा म्हणतात. त्याचप्रकारे ज्याला आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्टींमध्ये मनापासून स्वारस्य असते त्याला आध्यात्मिक प्रवृत्तीचा म्हणतात.

पण खरे अध्यात्म एखाद्याला कशाप्रकारे मिळवता येईल? प्रत्येकच धर्म अध्यात्माचा खरा मार्ग आपल्याजवळ असल्याचा दावा करतो. पण जसे या जगात असंख्य धर्म आहेत तसेच त्यांनी सुचवलेले हे अध्यात्माचे मार्गही असंख्य आहेत. प्रोटेस्टंट पंथीय ख्रिस्ती एखाद्या रिव्हायवल मिटींगमध्ये (प्रार्थना सभेत) आपले तारण झाल्याचे सांगतो. तर कॅथलिक पंथीय व्यक्‍ती मिस्सा घेऊन देवासोबत एकरूप होण्याची आकांक्षा बाळगते. बौद्ध धर्मीय ध्यान करून प्रबोधन मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. हिंदू धर्मीय मोह-माया त्यागून पुनर्जन्माच्या चक्रातून मोक्ष मिळवण्यास उत्सुक असतो. हे सर्व मार्ग, किंबहुना, यांपैकी कोणताही मार्ग मनुष्याला खऱ्‍या अध्यात्माकडे नेतो का?

बऱ्‍याच लोकांना असे वाटत नाही. त्यांचे मानणे आहे की अध्यात्म म्हणजे, कोणत्याही विशिष्ट धर्माशी नाते न जोडता देवाला मानणे. इतरांचे असे मत आहे की अध्यात्माचा देवाधर्माशी संबंध नाही, तर फक्‍त मनःशांतीची आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्याची ओढ म्हणजे अध्यात्म. त्यांचे ठाम मत आहे की अध्यात्माचा ध्यास घेणाऱ्‍याने धर्माकडे ढुंकूनही पाहू नये. तर त्याने स्वतःला, स्वतःच्या आंतरिक भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एका लेखकाने म्हटले: “खरे अध्यात्म मनुष्याच्या स्वतःच्याच अंतर्यामी दडलेले आहे. या जगासोबत व तुमच्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांशी तुम्ही कशाप्रकारे व्यवहार करता, त्यांच्यावर कशाप्रकारे प्रेम करता व त्यांचा कशाप्रकारे स्वीकार करता यालाच अध्यात्म म्हणतात. हे कोणत्याही चर्चमध्ये जाऊन किंवा विशिष्ट सिद्धान्त पाळल्याने मिळवता येत नाही.”

तर अशाप्रकारे लोकांची अध्यात्माविषयी निरनिराळी, व एकमेकांपेक्षा खूप वेगळी मते आहेत. या विषयावर हजारो ग्रंथ लिहिण्यात आले आहेत, पण हे ग्रंथ वाचल्यानंतरही बरेचदा वाचक असमाधानी व गोंधळलेल्या स्थितीत असतात. पण एक ग्रंथ मात्र आहे ज्यात आध्यात्मिक विषयांवर विश्‍वासार्ह मार्गदर्शन आढळते. हे पुस्तक देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे असे पुराव्यांवरून दिसून येते. (२ तीमथ्य ३:१६) तर हे पुस्तक, अर्थात बायबल अध्यात्माच्या अर्थासंबंधी व त्याच्या महत्त्वासंबंधी काय सांगते हे आता आपण पाहू या. (w०७ ८/१)