व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का?

तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का?

तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का?

“ज्याचा परिणाम मरण आहे असेहि पाप आहे.”—१ योहान ५:१६.

१, २. आपल्या हातून देवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडणे शक्य आहे, हे आपल्याला कसे माहीत होते?

“माझ्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडले आहे, या विचारानं मी पछाडून गेले आहे.” असे जर्मनीतील एका स्त्रीने लिहिले. ती देवाची सेवा करत होती, तरीसुद्धा तिला असे वाटत होते, की तिने पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे. एक ख्रिस्ती खरोखरच देवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध किंवा त्याच्या कार्यकारी शक्‍तीविरुद्ध पाप करू शकतो का?

होय, एखाद्याच्या हातून यहोवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडू शकते. येशू ख्रिस्ताने म्हटले: “प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्‍याची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.” (मत्तय १२:३१) ‘आपण खरेपणाचे पूर्ण ज्ञान घेतल्यावर जाणूनबुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे आणखी यज्ञ व्हायचा राहिला नाही, तर आपण न्याय होण्याची मार्गप्रतीक्षा’ करू शकतो, असे आपल्याला निक्षून सांगण्यात आले आहे. (इब्री लोकांस १०:२६, २७) आणि प्रेषित योहानाने असे लिहिले: “ज्याचा परिणाम मरण आहे असेहि पाप आहे.” (१ योहान ५:१६) “ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप” आपल्या हातून घडले आहे किंवा नाही, हे ज्याने गंभीर पाप केले आहे केवळ त्या व्यक्‍तीनेच सर्वस्वी ठरवावे का?

पश्‍चात्ताप केल्यास क्षमा मिळते

३. आपल्या हातून घडलेल्या एखाद्या पापाबद्दल आपल्याला अगदी मनापासून खेद होत असेल तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो?

सर्व अपराध्यांचा शेवटी यहोवाच न्याय करतो. आपल्या सर्वांना त्याला जाब द्यायचा आहे आणि तो नेहमी जे उचित आहे तेच करतो. (उत्पत्ति १८:२५; रोमकर १४:१२) आपण अक्षम्य पाप केले आहे किंवा नाही, हे केवळ यहोवा ठरवतो; आणि तो आपल्याकडून त्याचा पवित्र आत्मा काढून घेऊ शकतो. (स्तोत्र ५१:११) परंतु, आपल्या हातून घडलेल्या एखाद्या पापाबद्दल आपल्याला अगदी मनापासून खेद होत असेल तर याचा अर्थ कदाचित आपण खरोखर पश्‍चात्तापी आहोत. परंतु, खरा पश्‍चात्ताप म्हणजे काय?

४. (क) पश्‍चात्ताप करणे याचा अर्थ काय? (ख) स्तोत्र १०३:१०-१४ मधील स्तोत्रकर्त्याचे शब्द सांत्वनदायक का आहेत?

पश्‍चात्ताप करणे याचा अर्थ, पूर्वीच्या अपराधांबद्दल किंवा जी पापे आपल्या हातून घडतील त्याबद्दल पस्तावा व्यक्‍त करून पापी मार्गापासून मागे वळणे. आपल्या हातून गंभीर पाप घडले आहे, परंतु आपल्याला त्याबद्दल पश्‍चात्ताप झाला आहे हे दाखवणारी आवश्‍यक ती पावले आपण उचलली असतील तर आपल्याला स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांतून सांत्वन मिळू शकते. त्याने असे म्हटले: “आमच्या पातकांच्या मानाने [यहोवाने] आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:१०-१४.

५, ६. पहिले योहान ३:१९-२२ वचनांतील मुख्य मुद्दा काय आहे व प्रेषित योहानाच्या शब्दांचे स्पष्टीकरण द्या.

प्रेषित योहानाचे शब्द देखील सांत्वनदायक आहेत. तो म्हणतो: “आपण सत्याचे आहो हे ह्‍यावरुन आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते. प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो.”—१ योहान ३:१९-२२.

आपण सर्व एकमेकांशी प्रेमळपणे वागत असल्यामुळे व पाप करण्याची आपल्या कोणालाही सवय नसल्यामुळे “आपण सत्याचे आहो” हे आपल्याला माहीत आहे. (स्तोत्र ११९:११) जर कोणत्याही कारणास्तव आपल्या मनात दोषी भावना येत असतील तर “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते,” हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. यहोवा आपल्याला दया दाखवतो कारण, आपले आपापसांत ‘निर्दंभ बंधूप्रेम’ आहे, पाप न करण्यासाठी आपण संघर्ष करतो आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो, याची त्याला जाणीव आहे. (१ पेत्र १:२२) आपण जर यहोवावर भरवसा ठेवला, निखळ बंधूप्रेम दाखवले, मुद्दामहून पाप करीत नसलो तर आपले हृदय आपल्याला ‘दोषी ठरवणार’ नाही. आपण ‘देवासमोर धैर्याने येऊ’ अर्थात देवाला प्रार्थना करताना आपला विवेक आपल्याला बोचणार नाही आणि आपण देवाच्या आज्ञांचे पालन करत असल्यामुळे देवही आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल.

पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केलेल्यांची उदाहरणे

७. एखाद्या व्यक्‍तीचे पाप क्षम्य आहे अथवा नाही हे कोणत्या आधारावर ठरवता येईल?

कोणती पापे अक्षम्य आहेत? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आपण बायबलमधील काही उदाहरणांचा विचार करूया. आपण पश्‍चात्ताप केलेला असला तरी, आपले मन जर आपल्याला अजूनही खात असेल तर ही उदाहरणे आपल्याला सांत्वनदायक ठरली पाहिजेत. आपण हे पाहणार आहोत, की एखाद्या व्यक्‍तीने कोणत्या प्रकारचे पाप केले आहे हे महत्त्वाचे नाही तर पाप करण्यामागचा तिचा हेतू किंवा तिची मनोवृत्ती काय होती आणि तिने ते पाप किती जाणीवपूर्वकतेने केले आहे याच्या आधारावर, त्या व्यक्‍तीचे पाप क्षम्य आहे किंवा नाही हे ठरवता येईल.

८. पहिल्या शतकातील काही यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी कशाप्रकारे पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले?

पहिल्या शतकातील यहुदी धार्मिक पुढारी दुष्ट भावना बाळगून येशू ख्रिस्ताचा विरोध करून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करीत होते. येशू जे चमत्कार करत होता ते यहोवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे करत होता; या चमत्कारांद्वारे यहोवाचा गौरव होत होता. धार्मिक पुढारी हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होते. तरीपण ख्रिस्ताच्या या शत्रूंनी, तो ही कार्ये दियाबल सैतानाच्या शक्‍तीने करतोय, असे म्हटले. येशूने म्हटले, की जे देवाच्या पवित्र आत्म्याची निंदा करत होते ते असे पाप करत होते ज्याला, ‘सध्या व येणाऱ्‍या युगातही क्षमा नव्हती.’—मत्तय १२:२२-३२.

९. ईशनिंदा म्हणजे काय आणि येशूने याविषयी काय म्हटले?

ईशनिंदा म्हणजे खोटे, घातक किंवा अपशब्दयुक्‍त भाषण. पवित्र आत्मा देवाची शक्‍ती असल्यामुळे, त्याच्या पवित्र आत्म्याविरुद्ध बोलणे म्हणजे खुद्द यहोवाविरुद्ध बोलणे. अपश्‍चात्तापीपणे अशाप्रकारे बोलत राहणे अक्षम्य आहे. अशा पापांविषयी येशूने जे म्हटले त्यावरून असे दिसते, की येशू, देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याला जाणूनबुजून विरोध करणाऱ्‍या लोकांविषयी बोलत होता. यहोवाचा आत्मा येशूमध्ये कार्य करत होता तरीपण त्याच्या विरोधकांनी, ही शक्‍ती दियाबलाकडून आहे असे म्हटल्यामुळे त्यांनी जाणूनबुजून पवित्र आत्म्याची निंदा केली. म्हणूनच येशू असे म्हणाला: “जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”—मार्क ३:२०-२९.

१०. येशूने यहुदाला ‘नाशाचा पुत्र’ असे का संबोधले?

१० यहुदा इस्कर्योताचे देखील उदाहरण घ्या. तो बेईमानी करत होता. त्याला, दानपेटी सांभाळण्याचे काम देण्यात आले होते. या दानपेटीतून तो पैसे चोरत असे. (योहान १२:५, ६) नंतर, यहुदा, यहुदी शासकांकडे गेला आणि येशूला पकडून देण्याविषयी बोलणी करून चांदीच्या ३० शिक्क्यांच्या मोबदल्यात येशूला दगा देण्यास राजी झाला. येशूचा विश्‍वासघात केल्यानंतर यहुदाला पस्तावा झाला खरा, परंतु त्याने जाणूनबुजून केलेल्या पापाबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. परिणामतः, यहुदा पुनरुत्थान मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे येशूने त्याला ‘नाशाचा पुत्र’ असे संबोधले.—योहान १७:१२; मत्तय २६:१४-१६.

ज्यांनी पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले नाही अशांची उदाहरणे

११-१३. राजा दाविदाने बथशेबाबरोबर कोणते घोर पाप केले आणि या दोघांचे प्रकरण यहोवाने ज्याप्रकारे हाताळले त्यावरून आपल्याला काय सांत्वन मिळते?

११ काही वेळा, ज्या ख्रिश्‍चनांनी गंभीर पाप केल्याचे कबूल केले आहे आणि ज्यांना मंडळीतल्या वडिलांकडून आध्यात्मिक मदतही मिळाली आहे अशा ख्रिश्‍चनांचे अद्यापही, देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन केल्याबद्दल सतत मन खात राहते. (याकोब ५:१४) आपण अशांपैकी एक आहोत तर, कदाचित आपल्याला, ज्यांच्या पापांची क्षमा करण्यात आली होती त्यांच्याबद्दल शास्त्रवचनांमध्ये जे काही म्हटले आहे त्यावर विचार केल्याने फायदा होईल.

१२ राजा दाविदाने, उरीयाची पत्नी बथशेबा हिच्याबरोबर अतिशय घोर पाप केले. एकदा दावीद आपल्या घराच्या गच्चीवर होता. गच्चीवरून त्याने या देखण्या विवाहित स्त्रीला स्नान करताना पाहिले. त्याने तिला आपल्या राजवाड्यात बोलावून आणले आणि तिच्याबरोबर कुकर्म केले. आपल्याला गर्भ राहिला आहे असे जेव्हा तिने दाविदाला सांगून पाठवले तेव्हा त्याने आपले कुकर्म झाकून टाकण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याने उरीयाला रात्री तिच्याकडे पाठवले. परंतु जेव्हा ही शक्कल फसली तेव्हा त्याने, उरीया युद्धात मारला जाईल अशी योजना केली. नंतर त्याने बथशेबाबरोबर लग्न केले. पण बथशेबाला त्याच्याकडून झालेले ते बाळ मरण पावले.—२ शमुवेल ११:१-२७.

१३ दावीद आणि बथशेबाचे प्रकरण यहोवाने हाताळले. दाविदाने पश्‍चात्ताप केल्यामुळे व दाविदाबरोबर यहोवाने राज्याविषयी जी वाचा बांधली होती त्यामुळे यहोवाने दाविदास क्षमा केली. (२ शमुवेल ७:११-१६; १२:७-१४) बथशेबाची मनोवृत्ती पश्‍चात्तापी असल्यामुळे तिला राजा शलमोनाची आई होण्याचा व येशू ख्रिस्ताची पूर्वज बनण्याचा मान मिळाला. (मत्तय १:१, ६, १६) आपल्या हातूनही पाप घडले असेल तर यहोवा आपण केलेला पश्‍चात्ताप पाहतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.

१४. यहोवा किती उदार मनाने क्षमा करतो हे यहुदाचा राजा मनश्‍शे याच्या उदाहरणावरूनही कसे दिसून येते?

१४ यहोवा किती उदार मनाने क्षमा करतो हे यहुदाचा राजा मनश्‍शे याच्या उदाहरणावरूनही दिसून येते. परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते मनश्‍शेने केले. त्याने बआल दैवतेसाठी वेद्या बांधल्या, तो “नक्षत्रगणांची पूजा करीत असे,” आणि त्याने मंदिराच्या दोन्ही अंगणात खोट्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या. तो आपली मुले अग्नीत होम करीत असे, जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि त्याने यहुदा व जेरूसलेमेतील लोकांना इतके बहकविले, की “परमेश्‍वराने इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनहि अधिक दुराचार त्यांनी केला.” देवाचे संदेष्टे देत असलेल्या इशारेवजा संदेशाकडे त्याने लक्ष दिले नाही. सरतेशेवटी, अश्‍शूरच्या राजाने मनश्‍शेला धरून नेले. बंदिवासात असताना मनश्‍शेने पश्‍चात्ताप केला आणि यहोवाला तो सतत प्रार्थना करीत राहिला. यहोवाने त्याला क्षमा केली आणि जेरूसलेमधील राजपद त्याला पुन्हा मिळवून दिले. मग त्याने खरी उपासना पुन्हा स्थापन केली.—२ इतिहास ३३:२-१७.

१५. प्रेषित पेत्राच्या जीवनात घडलेल्या कोणत्या घटनेवरून दिसून येते, की देव “भरपूर क्षमा” करतो?

१५ अनेक शतकांनंतर, प्रेषित पेत्राने येशूला नाकारून गंभीर पाप केले. (मार्क १४:३०, ६६-७२) परंतु यहोवाने पेत्राला “भरपूर क्षमा” केली. (यशया ५५:७) का बरे? कारण पेत्राने मनापासून पश्‍चात्ताप केला. (लूक २२:६२) देवाने त्याला क्षमा केल्याचा स्पष्ट पुरावा ५० दिवसांनंतर दिसला. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राला येशूविषयीची साक्ष देण्याचा सुहक्क मिळाला. (प्रेषितांची कृत्ये २:१४-३६) मग आज जे ख्रिस्ती मनापासून पश्‍चात्ताप करतात त्यांना देव क्षमा करणार नाही का? “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? . . . तुझ्या ठायी क्षमा आहे,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले.—स्तोत्र १३०:३, ४.

आपल्या हातून पाप घडले असावे अशी मनातील भीती काढून टाकणे

१६. कोणत्या गोष्टींच्या आधारावर देव क्षमा करतो?

१६ आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडले असावे, अशी आपल्या मनातली भीती काढून टाकण्यास वरील उदाहरणांवरून आपल्याला मदत मिळाली पाहिजे. यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पातक्यांना क्षमा करतो, हे या उदाहरणांवरून दिसून येते. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे आपण देवाला कळकळीची प्रार्थना केली पाहिजे. आपण जर पाप केले आहे तर आपण येशूचे खंडणी बलिदान, यहोवाची दया, आपल्याला वारशाने मिळालेली अपरिपूर्णता आणि आपल्या विश्‍वासू सेवेचा अहवाल या गोष्टींच्या आधारावर क्षमायाचना करू शकतो. यहोवा अपात्र कृपा दाखवतो, हे माहीत असल्यामुळे, तो आपल्याला नक्कीच क्षमा करेल या भरवशाने आपण त्याच्याकडे क्षमा मागू शकतो.—इफिसकर १:७.

१७. आपण जर पाप केले असेल आणि आपल्याला आध्यात्मिक मदतीची गरज असेल तर आपण काय केले पाहिजे?

१७ आपल्या हातून जर पाप घडले असेल आणि त्यामुळे यहोवाबरोबर आपला नातेसंबंध इतका बिघडला आहे की आपल्याला त्याला प्रार्थनाही कराविशी वाटत नसेल तर काय? याबाबतीत, शिष्य याकोबाने असे लिहिले: “[अशा व्यक्‍तीने] मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.”—याकोब ५:१४, १५.

१८. एखाद्या व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलेले असले तरी, त्याचे पाप हे अक्षम्य असतेच, असे का नाही?

१८ एखादा पाप करतो आणि तो पश्‍चात्ताप करत नाही व त्याला मंडळीतून बहिष्कृत केले जाते तर त्याचे पाप अक्षम्य आहे, असे नाही. करिंथ मंडळीतील एका अभिषिक्‍त बांधवाला पाप केल्यामुळे बहिष्कृत करण्यात आले; त्याच्याविषयी पौलाने असे लिहिले: “अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाही तर तो दुःखसागरात बुडून” जाईल. (२ करिंथकर २:६-८; १ करिंथकर ५:१-५) परंतु, यहोवाबरोबर पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करण्याकरता पाप करणाऱ्‍यांनी, ख्रिस्ती वडील देत असलेली बायबल आधारित मदत स्वीकारली पाहिजे आणि मनापासून पश्‍चात्ताप होत आहे याचा पुरावा दिला पाहिजे. त्यांनी, “पश्‍चात्तापास योग्य अशी फळे” उत्पन्‍न केली पाहिजेत.—लूक ३:८.

१९. काय केल्याने आपला विश्‍वास “दृढ” होईल?

१९ आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध तर पाप घडले नसावे, अशी भावना आपल्या मनात का येऊ शकते? अशी भावना आपल्या मनात येण्याची कारणे अतिखबरदारीपणा किंवा कमजोर मानसिक व शारीरिक प्रकृती ही असू शकतात. अशावेळी, प्रार्थना आणि पुरेसा आराम या दोन गोष्टी आपली मदत करू शकतील. अशावेळी आपण सैतानाने आपल्याला निराश करू नये म्हणून दक्षता बाळगली पाहिजे; नाहीतर आपण देवाची सेवा करण्याचे सोडून देऊ. यहोवाला, दुष्ट लोकांच्या मृत्यूने देखील आनंद होत नाही तर मग, आपल्या कोणत्याही सेवकाला गमावण्याचे त्याला किती दुःख होते. यास्तव, आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडले असावे, अशी जर आपल्या मनात भीती असेल तर आपण देवाच्या वचनातून मिळणारे आध्यात्मिक मार्गदर्शन, विशेषकरून, स्तोत्रसंहिता पुस्तकातील काही सांत्वनदायक उताऱ्‍यांचे वाचन करण्याचे थांबवू नये. आपण मंडळीच्या सभांना जात राहिले पाहिजे आणि राज्य प्रचार कार्यात भाग घेत राहिला पाहिजे. असे केल्याने आपला विश्‍वास “दृढ” होईल आणि आपल्या हातून कदाचित अक्षम्य पाप घडले असावे या चिंतेपासून आपली सुटका होईल.—तीत २:२.

२०. कोणता तर्कवाद एखाद्याला, आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडले आहे किंवा नाही हे पाहण्यास मदत करू शकेल?

२० आपल्या हातून कदाचित पवित्र आत्म्याविरुद्ध पाप झाले असावे अशी ज्यांना भीती वाटत असते ते स्वतःला असे विचारू शकतात: ‘मी पवित्र आत्म्याची निंदा केली आहे का? मी मनापासून पश्‍चात्ताप केला आहे? देव क्षमा करतो, असा माझा विश्‍वास आहे का? मी आध्यात्मिक प्रकाश नाकारणारा धर्मत्यागी आहे का?’ बहुतेकदा, अशा लोकांना जाणवेल, की त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याची निंदा केलेली नसते, किंवा ते धर्मत्यागी बनलेले नसतात. ते पश्‍चात्तापी असतात आणि यहोवा क्षमा करतो असा ते कायम विश्‍वास करतात. असे आहे तर मग त्यांनी यहोवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केलेले नाही.

२१. पुढील लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

२१ आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडलेले नाही, अशी खात्री पटल्यानंतर आपण किती निश्‍चिंत होतो, नाही का? परंतु, पुढील लेखात असे काही प्रश्‍न आहेत जे या विषयाशी संबंधित आहेत. जसे की, आपण कदाचित स्वतःला विचारू शकतो: ‘मला खरोखरच देवाचा पवित्र आत्मा मार्गदर्शित करतो का? माझ्या जीवनचर्येतून पवित्र आत्म्याचे फळ दिसून येते का?’ (w०७ ७/१५)

तुमचे उत्तर काय आहे?

• पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करणे शक्य आहे, असे का म्हणता येऊ शकते?

• पश्‍चात्ताप करणे म्हणजे काय?

• येशू पृथ्वीवर असताना, ज्यांनी पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले असे कोण होते?

• आपल्या हातून अक्षम्य पाप घडले असावे, या चिंतेपासून सुटका कशी मिळवता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]