व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

यहोवाचे वचन सजीव आहे

यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

सा.यु.पू.  ६०९ सालचा डिसेंबर महिना. बॅबिलोनच्या राजाने जेरुसलेम शहराला शेवटल्या वेळी वेढा देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत यहेज्केलाने बॅबिलोनमध्ये बंदिवान असलेल्या यहुद्यांना मुख्यतः एकाच विषयावर संदेश दिले आहेत आणि तो म्हणजे त्यांच्या प्रिय जेरुसलेम नगरीचा पराभव व नाश. आता मात्र यहेज्केलच्या भविष्यवाण्यांचा रोख बदलतो. आता तो देवाच्या लोकांवर आलेल्या संकटामुळे जी मूर्तिपूजक राष्ट्रे आनंदित होतील त्यांच्या नाशाविषयी भाकीत करतो. १८ महिन्यांनंतर जेरुसलेमचा पाडाव झाल्यानंतर यहेज्केलचा संदेश पुन्हा एकदा एक नव्या विषयावर केंद्रित होतो: खऱ्‍या उपासनेची वैभवी पुनर्स्थापना.

यहेज्केल २५:१–४८:३५ यात इस्राएलच्या आसपासच्या देशांविषयी व देवाच्या लोकांच्या सुटकेविषयी भविष्यवाण्या आहेत. * यहेज्केल २९:१७-२० याचा अपवाद वगळता, सबंध वृत्तान्त कालक्रमवार व विषयवार मांडलेला आहे. ही चार वचने कालक्रमानुसार नसली तरी विषयाला समर्पक असल्यामुळे येथे घातलेली आहेत. देवप्रेरित शास्त्रवचनांचा भाग या नात्याने यहेज्केलच्या पुस्तकात सापडणारा संदेश ‘सजीव व सक्रिय आहे.’—इब्री लोकांस ४:१२.

‘ती भूमी एदेन बागेसारखी होईल’

(यहेज्केल २५:१–३९:२९)

जेरुसलेमचा नाश झाल्याचा पाहून आसपासच्या राष्ट्रांची कशी प्रतिक्रिया असेल हे यहोवा आधीपासूनच पाहू शकतो आणि म्हणूनच तो यहेज्केलाला अम्मोन, मवाब, अदोम, पलेशेथ, सोर आणि सीदोन या राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाण्या करण्यास सांगतो. ईजिप्तला लूटले जाईल. “मिसर देशाचा राजा फारो व त्याचा लोकसमूह” यांची तुलना गंधसरूच्या वृक्षाशी करण्यात येते. “बाबेलाच्या राजाची तरवार” या वृक्षास कापून टाकेल.—यहेज्केल ३१:२, ३, १२; ३२:११, १२.

सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेमचा विनाश झाल्यानंतर, एका सुटून पळून आलेल्या मनुष्याने असे वृत्त सांगितले की: “नगराचा नाश झाला आहे!” एव्हाना बंदिवान यहुद्यांना संदेश सांगण्याकरता देवाने यहेज्केल संदेष्ट्याचे तोंड उघडले होते, त्यामुळे आता तो ‘मुका नव्हता.’ (यहेज्केल ३३:२१, २२) त्याला पुनर्स्थापनेविषयीचे संदेश देण्यात आले. यहोवा ‘त्यांवर एक मेंढपाळ नेमील, तो कोण तर [त्याचा] सेवक दावीद.’ (यहेज्केल ३४:२३) अदोम उजाड व उध्वस्त होईल, पण त्यापलीकडे असलेली यहुदाची भूमी मात्र “एदेन बागेसारखी” होईल. (यहेज्केल ३६:३५) यहोवा आपल्या पुनर्स्थापित लोकांचे ‘गोगच्या’ हल्ल्यापासून संरक्षण करण्याचे आश्‍वासन देतो.—यहेज्केल ३८:२.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२९:८-१२—ईजिप्त देश केव्हा चाळीस वर्षे वैराण होता? सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेमचा नाश झाल्यानंतर यहुदातील शेषजनांनी यिर्मयाने दिलेल्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करून ईजिप्तमध्ये शरण घेतली. (यिर्मया २४:१, ८-१०; ४२:७-२२) पण ईजिप्त हे त्यांच्याकरता शरणस्थान ठरले नाही कारण नबुखदनेस्सर याने ईजिप्तवर हल्ला करून त्यावर विजय मिळवला. कदाचित याच पराभवानंतर ईजिप्त ४० वर्षे वैराण राहिला असेल. बायबलेतर इतिहासात याचा कोठेही पुरावा सापडत नाही. तरीपण आपण खात्री बाळगू शकतो की हे निश्‍चितच घडले असेल कारण यहोवा भविष्यवाण्या पूर्ण करणारा देव आहे.—यशया ५५:११.

२९:१८—“सर्वांच्या डोक्यांस टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली” असे का म्हटले आहे? मुख्य भूप्रदेशावरील सोर शहराला नबुखदनेस्सरच्या सैन्याने भारी व जबरदस्त वेढा दिला. सैनिकांच्या डोक्यांवरील टोप घासून घासून त्यांना अक्षरशः टक्कले पडली आणि शहराच्या कोटाभोवती बुरूज व तटबंदी उभारण्याकरता बांधकामाच्या साहित्याची नेआण करता करता त्यांच्या खांद्यांची सालटी निघाली.—यहेज्केल २६:७-१२.

आपल्याकरता धडे:

२९:१९, २०. सोर देशाचे लोक बराचसा खजिना घेऊन त्यांच्या समुद्रातील शहरात पलायन करतात. त्यामुळे नबुखदनेस्सर राजाला लुटीत फारसे हाती लागत नाही. नबुखदनेस्सर हा एक गर्विष्ठ, आत्मकेंद्रित मूर्तिपूजक राजा असूनही यहोवा त्याच्या सैन्याच्या “श्रमाचा मोबदला” म्हणून त्याला ईजिप्त देश देतो. खऱ्‍या देवाचे अनुकरण करून आपणही सरकारकडून आपल्याला ज्या सेवा उपलब्ध होतात त्यांकरता कर देऊ नये का? सरकारी अधिकारी प्रामाणिक असोत वा नसोत, आणि ते आपण भरलेल्या करांचा कसाही उपयोग करोत, तरी आपण या जबाबदारीपासून अंग चोरू शकत नाही.—रोमकर १३:४-७.

३३:७-९. आधुनिक काळातल्या पहारेकरी वर्गाने, अर्थात अभिषिक्‍त शेषजनांनी व त्यांच्या साथीदारांनी राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यापासून आणि लोकांना येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटाविषयी’ इशारा देण्यापासून कधीही माघार घेऊ नये.—मत्तय २४:२१.

३३:१०-२०. वाईट मार्गांतून मागे फिरून देवाच्या अपेक्षांनुसार वागण्यावरच आपले तारण अवलंबून आहे. यहोवाचा मार्ग खरोखरच “नीट” आहे.

३६:२०, २१. “परमेश्‍वराचे लोक” या आपल्या नावाप्रमाणे कार्य न केल्यामुळे, इस्राएल लोकांनी राष्ट्रांमध्ये देवाच्या नावास बट्टा लावला. आपण कधीही केवळ देवाचे नाममात्र उपासक बनू नये.

३८:१-२३. मागोग देशातील गोगाच्या हल्ल्यापासून यहोवा आपल्या लोकांचा बचाव करेल हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते! गोग हे नाव “ह्‍या जगाचा अधिकारी,” अर्थात स्वर्गातून हकालपट्टी झाल्यानंतर दियाबल सैतानाला सूचित करते. मागोगचा देश ही संज्ञा पृथ्वीच्या क्षेत्राच्या संदर्भात वापरलेली आहे. सैतान व त्याचे दुरात्मे आता याच क्षेत्रात बंदिस्त आहेत.—योहान १२:३१; प्रकटीकरण १२:७-१२.

“मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वांकडे चित्त लाव”

(यहेज्केल ४०:१-४८:३५)

जेरुसलेम शहराचे पतन झाल्यानंतरचे हे १४ वे वर्ष आहे. (यहेज्केल ४०:१) अद्यापही बंदिवासाची ५६ वर्षे शिल्लक आहेत. (यिर्मया २९:१०) यहेज्केल आता जवळजवळ ५० वर्षांचा झाला आहे. एका दृष्टान्तात त्याला इस्राएल देशात आणले जाते. त्याला असे सांगण्यात येते: “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक व मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वांकडे चित्त लाव.” (यहेज्केल ४०:२-४) एका नव्या मंदिराचा दृष्टान्त यहेज्केलाला देण्यात आला तेव्हा तो किती रोमांचित झाला असेल याची कल्पना करा!

यहेज्केलाला ज्या वैभवी मंदिराचा दृष्टान्त दिला जातो त्यात ६ द्वार, ३० खोल्या, पवित्रस्थान, परमपवित्रस्थान, लाकडाची वेदी व होमबली अर्पण करण्याकरता एक वेदी होती. मंदिरातून “निघून” पाण्याचा एक झरा वाहत होता पुढे जाऊन त्याची नदी बनते. (यहेज्केल ४७:१) जमिनीची विभागणी करून प्रत्येक वंशाला मिळणाऱ्‍या वतनाचा दृष्टान्तही यहेज्केलाला दिला जातो. प्रत्येक विभागाच्या सीमा पूर्वेकडून पश्‍चिमेकडे असून यहुदा व बन्यामीनाच्या विभागादरम्यान अधिपतीचे वतन आहे. या भागात “परमेश्‍वराचे पवित्रस्थान” आणि याव्हे-शाम्मा नावाचे ‘नगर’ आहे.—यहेज्केल ४८:९, १०, १५, ३५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४०:३–४७:१२—मंदिराचा दृष्टान्त कशास सूचित करतो? यहेज्केलाला दृष्टान्तात दिसलेले हे अवाढव्य मोजमापांचे मंदिर कधीच प्रत्यक्षात बांधण्यात आले नाही. ते देवाच्या आत्मिक मंदिराचे—अर्थात आपल्या काळात शुद्ध उपासनेकरता त्याच्या मंदिरासारख्या तरतुदीचे सूचक आहे. (यहेज्केल ४०:२; मीखा ४:१; इब्री लोकांस ८:२; ९:२३, २४) मंदिराच्या दृष्टान्ताची पूर्णता ‘शेवटल्या काळादरम्यान’ याजकगणाचे शुद्धीकरण केले जाते तेव्हा होते. (२ तीमथ्य ३:१; यहेज्केल ४४:१०-१६; मलाखी ३:१-३) पण त्याची अंतिम पूर्णता ही नंदनवनात होईल. मंदिराच्या दृष्टान्तामुळे बंदिवासातील यहुद्यांना हे आश्‍वासन मिळाले की शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना अवश्‍य होईल आणि प्रत्येक यहुदी कुटुंबाला त्या जमिनीचे वतन मिळेल.

४०:३–४३:१७—मंदिराचे मोजमाप घेणे कशास सूचित करते? मंदिराचे मोजमाप करणे हे शुद्ध उपासनेसंबंधी यहोवाचा उद्देश अवश्‍य पूर्ण होईल याचा संकेत आहे.

४३:१३-२०—यहेज्केलाला दृष्टान्तात दिसलेली वेदी कशाचे प्रतीक आहे? लाक्षणिक अर्थाने वेदी ही येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणासंबंधी देवाच्या इच्छेला सूचित करते. या तरतुदीमुळेच अभिषिक्‍त जनांना नीतिमान ठरवले जाते आणि ‘मोठ्या लोकसमुदायातील’ सदस्य देवाच्या नजरेत शुद्ध ठरतात. (प्रकटीकरण ७:९-१४; रोमकर ५:१, २) म्हणूनच की काय, शलमोनाच्या मंदिरात असलेला ‘ओतीव गंगाळसागर’ अर्थात एक पाण्याचा मोठा हौद ज्यातील पाण्याने याजक स्वतःस शुद्ध करत असत, तो या दृष्टान्तातील मंदिरात आढळत नाही.—१ राजे ७:२३-२६.

४४:१०-१६—याजकगण कोणाचे प्रतिनिधीत्व करतो? याजकगण आपल्या काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या वर्गाला पूर्वसूचित करतो. १९१८ साली यहोवा आपल्या आत्मिक मंदिरात “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा” बसला तेव्हा या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या वर्गाचे शुद्धिकरण करण्यात आले. (मलाखी ३:१-५) जे शुद्ध होते किंवा ज्यांनी पश्‍चात्ताप केला ते आपल्या विशेष सेवेत टिकून राहिले. त्यानंतर त्यांना स्वतःला “जगापासून निष्कलंक” ठेवण्याकरता कठीण परिश्रम करावे लागले. असे केल्यामुळे, याजकगणापैकी नसलेल्या वंशातील लोकांद्वारे चित्रित केलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायासाठी’ ते अनुकरणीय आदर्श ठेवू शकले.—याकोब १:२७; प्रकटीकरण ७:९, १०.

४५:१; ४७:१३–४८:२९—“देश” व त्याची वाटणी कशास सूचित करते? देश हा देवाच्या लोकांच्या कार्यक्षेत्राला सूचित करतो. यहोवाचा उपासक जगात कोठेही असला तरी, जोपर्यंत तो शुद्ध उपासनेला पाठिंबा देतो तोपर्यंत तो पुनर्स्थापित देशात आहे असे म्हणता येते. देशाच्या वाटणीसंबंधी जे सांगितले आहे त्याची शेवटली पूर्णता नव्या जगात होईल जेव्हा प्रत्येक विश्‍वासू व्यक्‍तीला स्वतःचे वतन दिले जाईल.—यशया ६५:१७, २१.

४५:७, १६—याजकांसाठी व अधिपतींसाठी लोकांना जी अर्पणे द्यायची होती त्यांवरून काय सूचित होते? आत्मिक मंदिराच्या व्यवस्थेत हे आध्यात्मिक साहाय्य किंवा मदत देणे व सहकार्य करणे यास सूचित करते.

४७:१-५—यहेज्केलाच्या दृष्टान्तातील नदीचे पाणी कशाचे प्रतीक आहे? हे पाणी यहोवाच्या जीवनदायी आत्मिक तरतुदींचे प्रतीक आहे. या तरतुदींत, ख्रिस्त येशूच्या बलिदानाचा व बायबलमध्ये सापडणाऱ्‍या देवाच्या ज्ञानाचा समावेश आहे. (यिर्मया २:१३; योहान ४:७-२६; इफिसकर ५:२५-२७) खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करणाऱ्‍या नवीन लोकांची जसजशी भर पडते तसतशी ही नदी जणू खोल होत जाते. (यशया ६०:२२) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान ही नदी जीवनाच्या पाण्याने भरभरून वाहील. त्यावेळी जी नवी “पुस्तके” उघडली जातील त्यांतून मिळणाऱ्‍या ज्ञानाचाही समावेश असेल.—प्रकटीकरण २०:१२; २२:१, २.

४७:१२—फळे देणारी झाडे कशास सूचित करतात? ही लाक्षणिक झाडे, मानवजातीला पुन्हा एकदा परिपूर्ण बनवण्याकरता देवाने केलेल्या आत्मिक तरतुदींना सूचित करतात.

४८:१५-१९, ३०-३५—यहेज्केलाच्या दृष्टान्तातील नगर कशाचे प्रतीक आहे? “याव्हे-शाम्मा” हे नगर “सार्वजनिक” प्रदेशात आहे त्याअर्थी ते ज्याचे प्रतिनिधीत्व करते ते पृथ्वीवरच असले पाहिजे. हे नगर धार्मिक ‘नव्या पृथ्वीवरील’ लोकांच्या हिताकरता स्थापन केलेल्या पार्थिव प्रशासनाचे प्रतिनिधीत्व करते असे भासते. (२ पेत्र ३:१३) या नगराच्या प्रत्येक दिशेला वेशी आहेत यावरून त्यात प्रवेश करणे किती सुलभ आहे हे दिसून येते. देवाच्या लोकांमधील पर्यवेक्षकही मंडळीतल्या सदस्यांशी अशाप्रकारे व्यवहार करतात की ते कधीही मदतीकरता या पर्यवेक्षकांकडे निःसंकोचपणे येऊ शकतात.

आपल्याकरता धडे:

४०:१४, १६, २२, २६. मंदिराच्या प्रवेशद्वारांवर खजुरीची झाडे कोरलेली होती. यावरून हे दिसून येते की जे नैतिकरित्या सरळ आहेत अशांनाच केवळ येथे प्रवेश मिळेल. (स्तोत्र ९२:१२) यावरून आपल्याला हे समजते की आपण सरळ व सात्त्विक असलो तरच आपली उपासना यहोवा स्वीकारेल.

४४:२३. आधुनिक काळातील याजक वर्ग जी सेवा करतो त्याबद्दल आपण किती कृतज्ञ असायला हवे! ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ समयोचित आत्मिक अन्‍न पुरवण्याकरता पुढाकार घेतात आणि याद्वारे ते आपल्याला यहोवाच्या नजरेत काय शुद्ध व काय अशुद्ध आहे हे समजण्यास मदत करतात.—मत्तय २४:४५.

४७:९, ११, (पं.र.भा.). लाक्षणिक पाण्याद्वारे सूचित होण्याऱ्‍या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान. हे ज्ञान आपल्या काळात अद्‌भुतरित्या आरोग्यदायी ठरले आहे. हे पाणी पिणारे लोक आध्यात्मिकरित्या जिवंत होतात. (योहान १७:३) दुसरीकडे पाहता, जे हे जीवनदायी पाणी स्वीकारत नाहीत ते “मिठासाठी होतील” अर्थात त्यांचा सार्वकालिक नाश होईल. त्याअर्थी, आपण ‘सत्याचे वचन नीट सांगण्याकरता होईल तितके करणे’ किती महत्त्वाचे आहे!—२ तीमथ्य २:१५.

‘माझे नाम पवित्र मानितील असे मी करीन’

दाविदाच्या कुळातील शेवटला राजा आपल्या राज्यपदावरून पडल्यानंतर, त्याच्या सिंहासनावर “ज्याचा हक्क आहे तो” येईपर्यंत खऱ्‍या देवाने बराच काळ जाऊ दिला. पण दाविदासोबत केलेला करार देव विसरला नव्हता. (यहेज्केल २१:२७; २ शमुवेल ७:११-१६) यहेज्केलाच्या भविष्यवाणीत “माझा सेवक दावीद,” हा “मेंढपाळ” व “राजा” होईल असे सांगितले आहे. (यहेज्केल ३४:२३, २४; ३७:२२, २४, २५) हा दुसरा तिसरा कोणी नसून राज्याधिकार मिळालेला येशू ख्रिस्त आहे. (प्रकटीकरण ११:१५) यहोवा मशीही राज्याकरवी आपल्या ‘थोर नामास पवित्र करेल.’—यहेज्केल ३६:२३.

लवकरच, देवाच्या पवित्र नावाचा अनादर करणाऱ्‍या सर्वांचा नाश केला जाईल. पण जे यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करण्याद्वारे आपल्या जीवनात त्याचे नाव पवित्र मानतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणूनच, आज आपल्या काळात विपूलतेने वाहत असलेल्या जीवनदायी पाण्याचा आपण पूर्णपणे फायदा घेऊन खऱ्‍या उपासनेला आपल्या जीवनात अगदी केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. (w०७ ८/१)

[तळटीप]

^ परि. 2 यहेज्केल १:१–२४:२७ या भागावरील सविस्तर चर्चेकरता टेहळणी बुरूज जुलै १, २००७ अंकातील “यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १” पाहावा.

[९ पानांवरील चित्र]

यहेज्केलाच्या दृष्टान्तातील वैभवी मंदिर

[१० पानांवरील चित्र]

यहेज्केलाच्या दृष्टान्तातील जीवनदायी नदी कशास सूचित करते?

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.