व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा”

“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा”

“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा”

“कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”—लूक १२:१५.

१, २. (क) आज लोकांच्या आवडी-निवडी व ध्येये काय आहेत? (ख) अशा मनोवृत्तीचा आपल्यावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो?

पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, बक्कळ पैसा देणारी नोकरी, कुटुंब—या अशा काही गोष्टी आहेत ज्यांवरून बहुतेक लोक यशाचे मोजमाप करतात किंवा या गोष्टी सुरक्षित भवितव्यासाठी आवश्‍यक आहेत, असे समजतात. श्रीमंत व गरीब राष्ट्रांत, बहुतेक लोकांच्या आवडी-निवडी आणि ध्येये भौतिक संपत्ती व यश मिळवण्यावरच केंद्रित आहेत. दुसरीकडे पाहता, आध्यात्मिक गोष्टींतील त्यांची आवड—असल्यास—झपाट्याने कमी होत चालली आहे.

बायबलमध्ये जे भाकीत करण्यात आले होते तेच आज जगात पाहायला मिळते. बायबलमध्ये असे म्हटले आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. . . . कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, . . . देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.” (२ तीमथ्य ३:१-५) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना अशा लोकांबरोबर उठबस करावी लागत असल्यामुळे, त्यांच्यावर या लोकांसारखा विचार करण्याचा व त्यांच्यासारखी आपली जीवनशैली बनवण्याचा सतत दबाव असतो. पण कोणती गोष्ट आपल्याला, ‘युगाबरोबर समरुप होऊ नये’ म्हणून जगाचा प्रतिकार करण्यास मदत करू शकेल?—रोमकर १२:२.

३. येशूने कोणता सल्ला दिला ज्याचा आपण आता विचार करणार आहोत?

“आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू” ख्रिस्त याने याबाबतीत आपल्याला अतिशय प्रभावी धडे शिकवले आहेत. (इब्री लोकांस १२:२) एकदा येशू आध्यात्मिकरीत्या प्रबोधन मिळेल अशा एका विषयावर एका समूहाबरोबर बोलत होता तेव्हा, एका मनुष्याने मध्येच चर्चा थांबवून त्याला अशी विनंती केली: “गुरुजी, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” येशूने त्याला उत्तर देताना, त्या मनुष्याला आणि जे त्याचे बोलणे ऐकत होते त्यांना अतिशय गंभीर सल्ला दिला. त्याने लोभ बाळगण्याविरुद्ध अतिशय कडक इशारा दिला आणि विचार करायला लावेल असा एका दाखला देऊन या इशाऱ्‍यावर आणखी जोर दिला. येशूने त्या प्रसंगी जे काही म्हटले त्याकडे आपणही गंभीरपणे लक्ष देऊन, या सल्ल्याचा आपल्या जीवनात कशाप्रकारे अवलंब करून लाभ मिळवू शकतो, हे पाहिले पाहिजे.—लूक १२:१३-२१.

अयोग्य विनंती

४. त्या मनुष्याने येशूचे बोलणे मध्येच थांबवणे अनुचित का होते?

येशू आपल्या शिष्यांबरोबर व इतरांबरोबर, दांभिकपणापासून दूर राहण्याविषयी, आपण मनुष्याच्या पुत्राला स्वीकारल्याच्या धैर्याविषयी आणि पवित्र आत्म्याची मदत मिळण्याविषयी बोलत असताना त्या मनुष्याने येशूचे बोलणे मध्येच थांबवले. (लूक १२:१-१२) हे महत्त्वाचे विषय होते ज्यांच्याकडे शिष्यांनी बारकाईने लक्ष देणे अगत्याचे होते. येशू, विचारांना चालना देणारे भाषण देत होता; पण हा मनुष्य त्याला मध्येच थांबवून, भौतिक मालमत्तेवरून कुटुंबात चाललेला वाद सोडवण्यास सांगतो. तरीपण, या घटनेवरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो.

५. त्या मनुष्याने केलेल्या विनंतीवरून त्याच्या स्वभावाविषयी काय दिसून आले?

असे लिहिण्यात आले आहे, की “मनुष्य जेव्हा एखादा धार्मिक सल्ला ऐकत असतो तेव्हा त्याचे विचार कोणत्या दिशेने जात असतात त्यावरून त्या मनुष्याचा स्वभाव समजून येतो.” येशू गंभीर आध्यात्मिक गोष्टी सांगत होता आणि हा मनुष्य, विशिष्ट आर्थिक फायदे मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करत होता. वारसाहक्काने त्याला मिळणाऱ्‍या संपत्तीच्या बाबतीत तो करत असलेली तक्रार उचित होती किंवा नव्हती, याविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. मानवी कारभारात येशू उत्तमप्रकारे न्याय करू शकतो म्हणून तो मनुष्य त्याच्या अधिकाराचा व नावलौकिकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असावा. (यशया ११:३, ४; मत्तय २२:१६) कारण काहीही असो, त्याच्या प्रश्‍न विचारण्यावरून हेच सूचित होते, की त्याच्या अंतःकरणात एक गंभीर समस्या होती—आध्यात्मिक गोष्टींची त्याला जराही किंमत नव्हती. यावरून आपल्यालाही, स्वतःचे परीक्षण करून पाहण्याचे प्रोत्साहन मिळत नाही का? उदाहरणार्थ, ख्रिस्ती सभांमध्ये आपण राज्य सभागृहात बसलेलो असतो तेव्हा आपले मन कुठेतरी दुसरीकडे भटकंतीला जाते किंवा ज्याचा विचार आपण नंतरही करू शकतो अशा एखाद्या विषयावर आपण तेथे विचार करत बसतो. याऐवजी आपण पुलपीटावरून जे सांगितले जात आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सांगितलेली माहिती आपल्या व्यक्‍तिगत जीवनात कोणकोणत्या मार्गांद्वारे लागू करता येईल याचा विचार केला पाहिजे. यामुळे, आपला स्वर्गीय पिता यहोवा देव आणि आपले सहविश्‍वासू बंधूभगिनी यांच्याबरोबर आपला नातेसंबंध सुधारेल.—स्तोत्र २२:२२; मार्क ४:२४.

६. येशूने त्या मनुष्याची विनंती का पूर्ण केली नाही?

या मनुष्याने कोणत्याही कारणास्तव ती विनंती केलेली असली तरीसुद्धा, येशूने मात्र त्याची विनंती पूर्ण केली नाही. उलट येशू त्याला म्हणाला: “गृहस्था, मला तुम्हांवर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले?” (लूक १२:१४) असे म्हणून येशू, लोकांना माहीत असलेल्या एका गोष्टीचा उल्लेख करीत होता. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, नगरातील न्यायाधिशांना अगदी अशाच बाबींवर निर्णय घेण्यास नेमण्यात आले होते. (अनुवाद १६:१८-२०; २१:१५-१७; रूथ ४:१, २) परंतु येशूला अधिक महत्त्वाच्या गोष्टींची चिंता होती अर्थात राज्य सत्याची साक्ष देण्याची व लोकांना देवाची इच्छा पूर्ण करण्यास शिकवण्याची. (योहान १८:३७) बारीकसारीक गोष्टींवर आपले मन विचलित होऊ देण्यापेक्षा आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. आपण आपला वेळ आणि आपली शक्‍ती, सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आणि “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्यासाठी खर्ची घालतो.—मत्तय २४:१४; २८:१९.

लोभीपणापासून सावध राहा

७. येशूने कोणते मर्मभेदक निरीक्षण केले?

येशूला आपल्या हृदयातील खोल हेतू समजण्याची कुवत असल्यामुळे, त्या मनुष्याने जेव्हा येशूला त्याच्या खासगी बाबीत लक्ष घालण्याची विनंती केली तेव्हा येशूला एक गंभीर समस्या दिसून आली. त्यामुळे, त्या मनुष्याच्या विनंतीला केवळ नाकारून येशू गप्प राहिला नाही तर त्याने अगदी मुख्य मुद्द्‌यालाच हात घालून असे म्हटले: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”—लूक १२:१५.

८. लोभीपणा याचा अर्थ काय होतो आणि अशाप्रकारचा लोभ एखाद्याला कुठे नेऊ शकतो?

लोभ या शब्दाचा अर्थ केवळ, ज्याचा चांगला उपयोग करता येतो व ज्याचा चांगला हेतू आहे तो पैसा किंवा विशिष्ट वस्तू मिळवण्याची इच्छा, एवढाच नाही. तर त्याचा अर्थ, “धनसंपत्ती किंवा मालमत्ता अथवा दुसऱ्‍याची मालमत्ता प्राप्त करण्याची असामान्य हाव” असाही होतो. इतरही अर्थ यामध्ये समाविष्ट आहेत. जसे की, लोभी व्यक्‍तीला वस्तू मिळवण्याची कधीही न शमणारी भूक असते; आणि कदाचित त्या वस्तू दुसऱ्‍याच्या मालकीच्या असतात तरीपण तिला काहीही करून त्या हव्या असतात. या वस्तुंची तिला गरज असो अथवा नसो किंवा तिच्या वागण्याचा इतरांवर कसा प्रभाव पडतो याची तमा न बाळगता लोभी व्यक्‍ती, त्या वस्तू आपल्याजवळ देखील असाव्यात या हव्यासापोटी असा अधाशीपणा दाखवते. लोभी व्यक्‍ती आपल्या इच्छेला, आपले विचार आणि कार्ये यांच्यावर इतके नियंत्रण करू देते, की तिची इच्छा सरतेशेवटी तिचा देव बनते. प्रेषित पौलाने लोभी व्यक्‍तीची तुलना कशाशी केली आहे, हे तुम्हाला आठवते का? त्याने लोभी व्यक्‍तीची तुलना एका मूर्तिपूजकाशी केली ज्याला देवाच्या राज्यात वारसा नाही.—इफिसकर ५:५; कलस्सैकर ३:५.

९. लोभ कोणकोणत्या प्रकारचा असू शकतो? उदाहरणे द्या.

येशूने “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा” असा इशारा दिला. लोभीपणा हा वेगवेगळ्या रूपात असू शकतो. यांपैकी काहींचे वर्णन दहा आज्ञांच्या शेवटीशेवटी करण्यात आले आहे: “आपल्या शेजाऱ्‍याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीहि वस्तु ह्‍यांचा लोभ धरू नको.” (निर्गम २०:१७) या नाही तर त्या प्रकारचा लोभीपणा दाखवून ज्यांच्या हातून पापे घडली अशा व्यक्‍तींची चिकार उदाहरणे बायबलमध्ये आहेत. सर्वात पहिले उदाहरण सैतानाचे आहे ज्याने, दुसऱ्‍याचा मालकीहक्क असलेल्या गोष्टीचा अर्थात, वैभव, गौरव आणि अधिकार जे केवळ यहोवाचे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला. (प्रकटीकरण ४:११) हव्वेने, बरोबर आणि चूक हे ठरवण्याच्या हक्काचा लोभ बाळगला व याबाबतीत जेव्हा तिची फसगत झाली तेव्हापासून मानवजात पाप आणि मृत्यूच्या मार्गावर लागली. (उत्पत्ति ३:४-७) जे स्वर्गदूत दिलेल्या ‘अधिकारपदात’ समाधानी नसल्यामुळे दुरात्मे बनले आणि जी गोष्ट त्यांना बहाल करण्यात आली नव्हती ती मिळवण्यासाठी त्यांनी “आपले वसतिस्थान सोडले.” (यहूदा ६; उत्पत्ति ६:२) बलाम, आखान, गेहेजी, यहुदा इस्कर्योत यांनी देखील काय केले त्याचा विचार करा. जीवनात त्यांच्या वाट्याला जे होते त्यात त्यांनी समाधान मानले नाही. भौतिक संपत्तीच्या फाजील हव्यासामुळे ते, त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदार पदाशी फितूर झाले ज्याचा शेवट नाशात झाला.

१०. येशूने सल्ला दिल्याप्रमाणे आपण आपले डोळे उघडे कसे ठेवू शकतो?

१० लोभाविरुद्ध इशारा देताना येशूने “संभाळा,” किंवा आणखी एका भाषांतरानुसार, ‘आपले डोळे उघडे ठेवा,’ या शब्दाने सुरुवात केली ते किती उचित होते! का? कारण, इतरजण किती हावरट किंवा लोभी आहेत हे लोक सहजपणे पाहू शकतात परंतु आपण स्वतःही हेच पाप करत आहोत, असे फार क्वचित लोक कबूल करतात. प्रेषित पौल दाखवून देतो, की “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) शिष्य याकोब म्हणतो, की चुकीची वासना “गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” (याकोब १:१५) तेव्हा, येशूने जो सल्ला दिला त्यानुसार आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत—दुसरे लोभी आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी नव्हे तर, आपले लक्ष कशावर केंद्रित आहे याचे परीक्षण करण्यासाठी; जेणेकरून, आपण ‘सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहू शकू.’

पुष्कळ संपत्ती

११, १२. (क) लोभीपणाविरुद्ध येशूने कोणता इशारा दिला? (ख) आपण येशूच्या इशाऱ्‍याकडे लक्ष देणे का आवश्‍यक आहे?

११ लोभापासून आपण दूर का राहिले पाहिजे त्याचे आणखी एक कारण आहे. येशूने पुढे काय म्हटले ते पाहा: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) आजच्या धनलोभी युगात येशूचे हे शब्द आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात कारण, आजच्या जगातील लोक, श्रीमंती आणि आर्थिक भरभराटीची तुलना आनंद व यशाशी करतात. या शब्दांवरून येशू हे दाखवत होता, की खरोखरचे उद्देशपूर्ण व समाधानी जीवन हे, आर्थिक सुबत्तेवर, मग ही सुबत्ता कितीही विपुल असली तरीसुद्धा त्यावर अवलंबून नाही.

१२ परंतु काही लोक याजशी सहमत होणार नाहीत. ते असा तर्क करतील, की आर्थिक सुबत्तेमुळे तर जीवन आणखी आरामशीर व सुखकर आणि परिणामी अर्थपूर्ण बनते. त्यामुळे ते अशा ध्येयांचा पाठलाग करतात ज्यामुळे त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करता येतात. यामुळेच आपण सुखी होऊ असा ते विचार करतात. पण असा विचार करत असताना त्यांना, येशूने जी गोष्ट सांगितली ती समजत नाही.

१३. जीवन आणि साधनसंपत्ती याबाबतचा संतुलित दृष्टिकोन कोणता आहे?

१३ भौतिक संपती विपुल मात्रेत बाळगणे बरोबर आहे किंवा नाही यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा येशूने यावर जोर दिला, की मनुष्याच्या जवळ असलेल्या संपत्तीने त्याचे जीवन होते असे नाही. याबाबतीत आपल्या सर्वांना माहीत आहे, की जिवंत राहण्याकरता जास्त गोष्टींची गरज नसते. फक्‍त पोटापुरते अन्‍न, नेसण्यासाठी वस्त्र आणि डोकं टेकवण्यासाठी जागा, इतकेच आपल्याला लागते. श्रीमंत लोकांकडे या गोष्टी विपुल मात्रेत असतात; गरिबांना ज्या आवश्‍यक गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. परंतु, जेव्हा मृत्यू ओढवतो तेव्हा श्रीमंत काय आणि गरीब काय—दोघांचा शेवट एकसारखाच असतो. तेव्हा सर्वकाही समाप्त होते. (उपदेशक ९:५, ६) यास्तव, एक व्यक्‍ती किती वस्तू गोळा करू शकते किंवा तिच्याजवळ किती वस्तू आहेत यावरून तिचे जीवन खरोखरच उद्देशपूर्ण व अर्थपूर्ण होऊ शकत नाही आणि होऊही नये. हा विचार, येशू ज्या प्रकारच्या जीवनाविषयी बोलत होता त्या जीवनाचे परीक्षण केल्यावर स्पष्ट होते.

१४. बायबल अहवालातील “जीवन” या शब्दासाठी मूळ भाषेत जो शब्द वापरण्यात आला होता त्यावरून आपल्याला काय समजते?

१४ येशूने जेव्हा “पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही,” असे म्हटले तेव्हा येथे लूकच्या शुभवर्तमानात लिहिण्यात आलेल्या “जीवन” या शब्दासाठी वापरण्यात आलेला (ग्रीक भाषेतील, झोई) हा शब्द, जीवनशैलीला नव्हे तर पूर्णार्थाने जिवंत असण्याच्या स्थितीस सूचित करतो. * आपण श्रीमंत असलो किंवा गरीब असलो, आपल्याकडे वाहता पैसा असला किंवा जिवंत राहण्याकरता आपल्याला रक्‍ताचे पाणी करावे लागत असले, तरी आपण किती काळ जगणार आहोत किंवा आपण उद्याचा दिवस पाहायला जिवंत असू किंवा नाही यावर आपल्याला पूर्ण नियंत्रण नाही, असे येशू म्हणत होता. डोंगरावरील आपल्या प्रवचनात तो म्हणतो: “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” (मत्तय ६:२७) बायबल स्पष्टपणे दाखवून देते, की केवळ यहोवाजवळच “जीवनाचा झरा” आहे आणि फक्‍त तोच विश्‍वासू जनांना स्वर्गातील अथवा पृथ्वीवरील “खरे जीवन” किंवा ‘युगानुयुगाचे जीवन’ अर्थात अनंतकालिक जीवन देऊ शकतो.—स्तोत्र ३६:९; १ तीमथ्य ६:१२, १९.

१५. पुष्कळ लोक भौतिक मालमत्तेवर भरवसा का ठेवतात?

१५ येशूचे शब्द दाखवून देतात, की लोक अगदी सहजासहजी जीवनाबद्दल चुकीचा दृष्टिकोन बाळगू शकतात. सर्व मानव, मग ते श्रीमंत असोत अथवा गरीब, ते सर्व अपरिपूर्ण आहेत आणि सर्वांचा शेवट एकच आहे. प्राचीन काळातल्या मोशेने असे निरीक्षण केले: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०; ईयोब १४:१, २; १ पेत्र १:२४) यामुळे, ज्या लोकांनी देवाबरोबर चांगला नातेसंबंध प्रस्थापित केलेला नाही त्यांची, “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या [आपल्याला] मरावयाचे आहे,” अशी मनोवृत्ती झाली आहे, असे प्रेषित पौलाने म्हटले. (१ करिंथकर १५:३२) इतर लोक पाहतात, की जीवन अल्पकाळ व अनिश्‍चित आहे त्यामुळे ते भौतिक गोष्टींच्याद्वारे सुरक्षितता आणि स्थैर्य मिळवू पाहतात. कदाचित ते असा विचार करत असतात, की दृश्‍य भौतिक वस्तुंमुळे आपले जीवन अधिक सुरक्षित बनते. त्यामुळे, धन व संपत्ती साठवण्याकरता ते आपले रक्‍त आटवतात. याच गोष्टी आपल्याला सुरक्षितता व आनंद देतात असे त्यांचे चुकीचे समीकरण असते.—स्तोत्र ४९:६, ११, १२.

सुरक्षित भवितव्य

१६. जीवनाचे खरे मूल्य कशावर आधारित नाही?

१६ हे खरे आहे, की उच्च जीवनशैलीमुळे—भरपूर अन्‍न, वस्त्र, निवारा आणि इतर सुखसोयींमुळे जीवन अधिक आरामशीर बनते किंवा उत्तम वैद्यकीय उपचार मिळवून एखाद्याची आयुर्मर्यादा काही वर्षांनी वाढवता येते. पण, अशाप्रकारचे जीवन खरोखरच अधिक अर्थपूर्ण व अधिक सुरक्षित असते का? जीवनाचे खरे मूल्य, एक व्यक्‍ती किती वर्षे जगते किंवा तिच्याकडे किती भौतिक संपत्ती आहे व ती त्याचा कसा उपयोग करते यानुसार मोजले जात नाही. अशा गोष्टींवर जास्त भरवसा ठेवणे किती धोकादायक आहे हे प्रेषित पौलाने दाखवून दिले. तीमथ्याला त्याने असे लिहिले: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.”—१ तीमथ्य ६:१७.

१७, १८. (क) भौतिक संपत्तीच्या बाबतीत कोणती उल्लेखनीय उदाहरणे आहेत ज्यांचे आपण अनुकरण करू शकतो? (ख) पुढील लेखात येशूच्या कोणत्या दाखल्याची चर्चा करण्यात आली आहे?

१७ धनसंपत्तीवर भरवसा ठेवणे मूर्खपणाचे आहे कारण ते “चंचल” असते. कुलपिता ईयोब अतिशय धनवान होता; पण जेव्हा त्याच्यावर संकट आले तेव्हा त्याची धनसंपत्ती काही कामाची नव्हती; एका झटक्यात ती नाहीशी झाली. देवाबरोबर त्याने जोडलेल्या दृढ नातेसंबंधामुळेच त्याला सर्व परीक्षांमध्ये व संकटांमध्ये तग धरून राहण्यास मदत झाली. (ईयोब १:१, ३, २०-२२) अब्राहामाला जेव्हा यहोवाने एक कठीण कामगिरी दिली तेव्हा त्याने ती आनंदाने स्वीकारली कारण त्याचे मन त्याच्या विपुल भौतिक संपत्तीशी जडलेले नव्हते. परिणामतः, त्याला “राष्ट्रसमूहाचा जनक” बनण्याचा आशीर्वाद मिळाला. (उत्पत्ति १२:१, ४; १७:४-६) ही आणि अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचे अनुकरण करून आपण लाभ मिळवू शकतो. तेव्हा, आपण सर्व लहानथोरांनी, आपल्या जीवनात कोणती गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे आणि कोणत्या गोष्टीवर आपण भरवसा ठेवला आहे, याचे परीक्षण करून पाहिले पाहिजे.—इफिसकर ५:१०; फिलिप्पैकर १:१०.

१८ लोभाविषयी आणि जीवनाचा उचित दृष्टिकोन बाळगण्याविषयी येशूने जे मोजके शब्द बोलून दाखवले ते निश्‍चितच महत्त्वाचे व बोधकारक आहेत. परंतु, येशूच्या मनात आणखी काही गोष्टी होत्या. त्यामुळे त्याने, आपल्या विचारांना जागवणाऱ्‍या एका निर्बुद्ध धनवानाचा दाखला दिला. हा दाखला आज आपल्या जीवनाला कसा लागू होतो आणि या दाखल्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. (w०७ ८/१)

[तळटीप]

^ परि. 14 “जीवन” यासाठी आणखी एक ग्रीक शब्द आहे, बिओस. या शब्दातून, इंग्रजीतील “बायोग्राफी” आणि “बायोलॉजी” हे शब्द आले आहेत. वाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टामेंट वड्‌र्स नुसार, बिओस हा शब्द, “जीवन काल,” “जीवन शैली,” आणि “उपजिविकेचे साधन” यांना सूचित करतो.

तुमचे उत्तर काय आहे?

• येशूने जनसमूहातील एका मनुष्याच्या विनंतीला पूर्ण करण्यास नकार दिला यावरून आपण काय शिकू शकतो?

• आपण लोभापासून सावध का असले पाहिजे व असे आपण कसे करू शकतो?

• भौतिक संपत्तीतून जीवन का मिळत नाही?

• कोणत्या गोष्टींमुळे जीवन खरोखर अर्थपूर्ण व सुरक्षित बनू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]