व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौतुकाने रचना पाहा रचनाकाराला जाणा

कौतुकाने रचना पाहा रचनाकाराला जाणा

कौतुकाने रचना पाहा रचनाकाराला जाणा

तुम्ही कधी मायकेलॲन्जेलो हे नाव ऐकले आहे का? तो एक श्रेष्ठ इटालियन चित्रकार आणि मूर्तिकार होता. तुम्हाला जर कधी त्याची कलानिर्मिती पाहण्याची संधी मिळालीच तर तुम्ही नक्की, एका कला इतिहासकाराशी सहमत व्हाल ज्याने या इटालियन कलावंताला, “सर्वोत्कृष्ट व अतुलनीय कलाकार,” असे संबोधले. मायकेलॲन्जेलोच्या कला कोणीही नाकारू शकत नाही. असा कोणी आहे का जो मायकेलॲन्जेलोच्या कलाकृतीचे कौतुक करतो परंतु कलाकार म्हणून त्याला नाकारतो? असा क्वचितच कोणी असेल.

आता, आपल्या सभोवती पृथ्वीवर आपण पाहत असलेल्या क्लिष्ट व वैविध्यपूर्ण जीवसृष्टीचा विचार करा जिला पाहून कधीकधी आपण तोंडात बोट घालतो. द न्यू यॉर्क टाईम्सने अगदी उचितपणे एका जीवरसायन शास्त्राच्या प्राध्यापकांचे शब्द उद्धृत केले: “जीवशास्त्रात रचनेचा पुरावा स्पष्ट दिसतो. जीवसृष्टीच्या निर्मितीतील रचना पाहून आपले मन भारून जाते.” रचनाकाराचे अस्तित्व नाकारून रचनेचे कौतुक करणे बरोबर आहे का?

प्रेषित पौल त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी बारकाईने न्याहाळायचा. तो अशा लोकांविषयी बोलला जे “निर्माणकर्त्याऐवजी निर्माण केलेल्या प्राणिमात्रांची भक्‍ती व सेवा” करतात. (रोमकर १:२५, कॉमन लँग्वेज) सर्वत्र असलेल्या उत्क्रांतीच्या कल्पनेचा परिणाम झाल्यामुळे काही लोक, रचना रचनाकाराकडे अंगुली दर्शवते ही गोष्ट एकतर नाकारतात किंवा तिच्याकडे कानाडोळा करतात. परंतु, उत्क्रांतीचा सिद्धांत अगदी उत्तमरीत्या खऱ्‍या विज्ञानाचे वर्णन करतो का? ख्रिस्तोफ शोनबॉर्न नावाच्या विएनाच्या कॅथलिक आर्चबिशपने न्यू यॉर्क टाईम्समध्ये काय म्हटले ते पाहा: “जीवशास्त्रात रचनेसाठी मिळणारा भारावून टाकणारा पुरावा नाकारणारा किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारा कोणताही सिद्धांत हा सत्य गोष्टींवर आधारित नसलेला तत्त्वसिद्धांत आहे, विज्ञान नव्हे.”

रचनाकार आहे म्हणजे विज्ञान नाही?

परंतु, असेही काही लोक आहेत ज्यांना असे वाटते, की निर्माणकर्ता असल्याचा पुरावा आहे असा स्वीकार केल्याने “संशोधनात अडथळा” येऊ शकतो. न्यू सायन्टिस्ट नावाच्या एका मासिकातील एका लेखात अशी भीती व्यक्‍त करण्यात आली होती. त्या मासिकात असा दावा करण्यात आला होता, की “विज्ञानात शिकण्याच्या व शोध लावण्याच्या अनंत संधी आहेत; पण या संधींना, ‘रचनाकाराने बनवले आहे,’ या अभेद्य अडथळ्याने खीळ बसेल.” या भीतीला काही आधार आहे का? मुळीच नाही. याउलट विज्ञानातील संशोधन पुढे चालत राहील. का?

आकस्मिक अपघातामुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या उत्क्रांतीतून आपले विश्‍व आणि पृथ्वीवरील जीवन सुरू झाले असा विश्‍वास करणे म्हणजे वास्तविकतेत अर्थपूर्ण स्पष्टीकरण मिळण्याचा प्रयत्न सोडून देणे होय. दुसरीकडे पाहता, आपल्या सभोवती आपण पाहत असलेल्या गोष्टी एका बुद्धिमान निर्माणकर्त्याने बनवल्या आहेत असा विश्‍वास केल्यामुळे आपण निर्सगाचा आणखी अभ्यास करू आणि या भौतिक विश्‍वातून दिसून येत असलेली त्याची बुद्धिमत्ता स्वीकारू. यावर विचार करा: लिओनार्दो डा विंचीने “मोनालिसाचे” चित्र रंगवले आहे हे माहीत झाल्यानंतरही कला इतिहासकारांनी, लिओनार्दोने कोणकोणत्या पद्धतींचा व साहित्यांचा उपयोग केला याचा शोध लावण्याचे थांबवले नाही. तसेच, एक रचनाकार अथवा एक निर्माणकर्ता आहे हे स्वीकारल्यानंतर आपण, त्याच्या रचनेतील व सृष्टीतील बारीकसारीक व क्लिष्ट गोष्टींबद्दलची अधिक माहिती घेण्याचे थांबवण्याचे काहीही कारण नाही.

आणखी संशोधन करण्यापासून रोखण्याऐवजी बायबल, केवळ विज्ञान व निसर्गाविषयीच नव्हे तर देवाविषयीच्या प्रश्‍नांची देखील अधिक उत्तरे शोधण्याचे प्रोत्साहन देते. प्राचीन राजा दाविदाने, अतिशय कौशल्याने तयार केलेल्या त्याच्या शारीरिक घडणीवर मनन केले. त्यामुळेच तो असे म्हणू शकला: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, . . . तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) किंबहुना, बायबलमध्ये असे दाखवण्यात आले आहे, की निर्माणकर्ता कुलपिता ईयोबाला असे विचारतो: “पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय?” (ईयोब ३८:१८) यावरून, आणखी माहिती घेण्यास व संशोधन करण्यास कसलेही अडखळण सूचित होत नाही. उलट, निर्माणकर्ता येथे त्याच्या हस्तकृतींचा अभ्यास करण्याचे आमंत्रण देतोय. संदेष्टा यशया याने देखील एका आमंत्रणाविषयी लिहिले. तो वृत्तांत आपल्याला, आपल्या सभोवती दिसणाऱ्‍या निर्मितीस कारणीभूत असलेल्या रचनाकाराविषयी आपली समज वाढवण्यास सांगतो: “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले?” होय, यशया ४०:२६ मधील हे शब्द एक वस्तुस्थिती दर्शवतात जी, E=mcया आईनस्टाईनच्या अतिशय प्रसिद्ध नियमाशी सुसंगत आहेत. ही वस्तुस्थिती अशी आहे, की हे विश्‍व जो महासमर्थ व प्रबळ आहे त्याने बनवले आहे.

अर्थात, सृष्टीविषयी असलेल्या सर्वच प्रश्‍नांची उत्तरे सहजगत्या उपलब्ध नसतात. याचे एक कारण हे आहे, की आपली आकलन शक्‍ती मर्यादित आहे आणि आपण ज्या जगात राहत आहोत त्या जगाबद्दलचे आपले ज्ञान अर्धवट आहे. ईयोबाने हे समजून घेतले. त्याने त्या निर्माणकर्त्याची स्तुती केली ज्याने पृथ्वी निराधार टांगली आहे आणि पाण्याने भरलेले ढग पृथ्वीवर पसरवले आहेत. (ईयोब २६:७-९) तरीपण, हे चमत्कार “त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत,” हे ईयोबाने जाणले. (ईयोब २६:१४) ईयोबाला त्याच्या अवतीभोवती असलेल्या जगाविषयी आणखी शिकायची इच्छा होती. दावीद आपल्या मर्यादांविषयी असे लिहितो: “हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.”—स्तोत्र १३९:६.

निर्माणकर्त्याचे अस्तित्व स्वीकारल्याने वैज्ञानिक प्रगती खुंटत नाही. भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाबतीतील बहुव्यापक ज्ञानाला मर्यादा नाहीत व ते अनंत आहे. ज्ञानवंत म्हणून नावाजलेल्या एका प्राचीन राजाने अगदी नम्रपणे असे लिहिले: “त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.”—उपदेशक ३:११.

“त्रुटींचा देव”?

काही असा आक्षेप घेतात, की जेव्हा कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण सिद्ध करता येत नाही तेव्हा देवाला मध्ये आणले जाते. दुसऱ्‍या शब्दात, जेव्हा वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही तेव्हा, निर्माणकर्ता म्हटला जाणारा देव, “त्रुटींचा देव” बनतो; मनुष्य जेव्हा जेव्हा तार्किक व वैज्ञानिकरीत्या गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत तेव्हा तेव्हा ते फक्‍त, हे “देवाने” बनवले असे बोलून दाखवतात. पण येथे कोणत्या त्रुटींविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे? या आपल्या ज्ञानातील लहानसहान व बिनमहत्त्वाच्या त्रुटी आहेत का? नाही, त्या अगदी मोठमोठाल्या त्रुटी आहेत ज्या डार्विनच्या उत्क्रांतीवादात आहेत. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास या त्रुटी मूलभूत भगदाडाप्रमाणे आहेत ज्यांना उत्क्रांतीवादाचा सिद्धांत बुजवण्यास असमर्थ आहे. खरे तर, जे उत्क्रांतीवादी बिनबुडाच्या प्रतिपादनांवर विसंबून राहतात ते, “विज्ञानाद्वारे सिद्ध करता येत नाहीत अशा त्रुटींचे स्पष्टीकरण देण्याकरता डार्विनच्या सिद्धांताचा परिणामकारकतेने उपयोग करीत आहेत.”

बायबलमध्ये निर्माणकर्ता म्हणून ज्याचे वर्णन करण्यात आले आहे तो देव “त्रुटींचा देव” नाही. तर, सृष्टीच्या सर्व टप्प्यात, पैलूत आणि बारीकसारीक गोष्टींमध्ये त्याची कार्ये दिसून येतात. स्तोत्रकर्त्याने यहोवाच्या सर्व समावेशक सृष्टीच्या कार्यांवर जोर देत असे म्हटले: “सर्व जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.” (स्तोत्र ३६:९, टुडेज इंग्लिश व्हर्शन) “आकाश, पृथ्वी, समुद्र ह्‍यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्‍नकर्ता तूच आहेस,” असे उचितपणे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:२४; १४:१५; १७:२४) म्हणूनच अगदी योग्य कारणासाठी पहिल्या शतकातील एका शिक्षकाने असे लिहिले, की देवाने “सर्व काही निर्माण केले.”—इफिसकर ३:९.

याशिवाय देवाने, “आकाशमंडळाचे नियम” अर्थात प्रकृतिद्रव्य आणि उर्जा यांच्यावर नियंत्रण करणारे भौतिक नियम घालून दिले आहेत ज्यांचा शास्त्रज्ञ अजूनही अभ्यास करीत आहेत. (ईयोब ३८:३३) देवाची रचना पूर्ण व उद्देशपूर्ण आहे. आश्‍चर्यचकित करणारी वैविध्यपूर्ण जीवसृष्टी या पृथ्वीवर वसावी या दृष्टीने तिला निर्माण करण्याचा त्याचा उद्देश त्याने साध्य केला.

रचना आणि व्यवहारज्ञान

सरतेशेवटी, आपण व्यवहारज्ञानाचा देखील विचार केला पाहिजे. विविध वैज्ञानिक सिद्धांतांच्या महत्त्वावर मोघम भाष्य करताना, विज्ञान लेखक जॉन हॉर्गन यांनी असे म्हटले: “जेव्हा पुरावा ठोस नसतो तेव्हा, आपल्या व्यवहारज्ञानाचा उपयोग करण्यास आपल्याला लाज वाटू नये.”

जीवन हे अचानक किंवा आकस्मिक प्रक्रियेतून उद्‌भवले असा दावा करण्यात खरोखरच काही तथ्य आहे का? उत्क्रांतीचा सिद्धांत लोकप्रिय असला तरी, अनेक बुद्धिमान लोकांची तसेच वैज्ञानिकांची खात्री पटली आहे, की एक बुद्धिमान निर्माणकर्ता अस्तित्वात आहे. विज्ञानाच्या एका प्राध्यापकांनी म्हटले, की सामान्य जनता, “अगदी ठामपणे व बुद्धिमानपणे असा विचार करते, की जीवन निर्माण करण्यात आले आहे.” का? बहुतेक लोक प्रेषित पौलाच्या बोलण्याशी सहमत होतील; त्याने असे लिहिले: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते.” (इब्री लोकांस ३:४) त्याच वचनाचा शेवट पौल तर्काला पटेल अशा शब्दांत करतो: “सर्व काही बांधणारा देवच आहे.” बायबल जे म्हणते त्यानुसार एकीकडे हे कबूल करायचे की घर बांधण्याकरता, त्याचा आराखडा बनवणाऱ्‍याची आणि ते बांधणाऱ्‍याची गरज असते आणि दुसरीकडे, एक क्लिष्ट कोशिका अचानक अस्तित्वात आली, असे म्हणण्यात काही अर्थ नाही

रचनाकाराचे व निर्माणकर्त्याचे अस्तित्व नाकारणाऱ्‍यांविषयी बायबल असे म्हणते: “मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” (स्तोत्र १४:१) येथे, देव आहे अशी ज्यांची अजून खात्री पटलेली नाही अशा लोकांच्या समजात स्तोत्रकर्ता सुधारणा करतो. एखाद्या व्यक्‍तीचे कदाचित स्वतःच्या विचारांच्या आधारावरच असे मत झाले असावे, वस्तुस्थितींच्या आधारावर नाही. परंतु, एक सुज्ञ व समंजस व्यक्‍ती निर्माणकर्ता असल्याचे नम्रपणे कबूल करते.—यशया ४५:१८.

विचार करणाऱ्‍या अनेक लोकांना, एक सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे याचा पुरावा स्पष्ट दिसतो.

तुम्ही त्या रचनाकाराला जाणू शकता

आपली रचना करण्यात आली आहे, या दृष्टीने जर आपण स्वतःकडे पाहत असू तर मग आपल्या मनात असा प्रश्‍न येतो, की कोणत्या उद्देशास्तव आपली रचना करण्यात आली आहे? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? केवळ विज्ञान या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. परंतु, या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांना तर्काला पटतील अशी समाधानकारक उत्तरे असणे आवश्‍यक आहे. याबाबतीत बायबल आपल्याला खूप मदत करू शकते. ते आपल्याला फक्‍त इतकेच सांगत नाही, की यहोवा आपला निर्माणकर्ता आहे तर हेही सांगते, की तो एक उद्देशकर्ता आहे अर्थात तो जे काही करतो त्यासाठी त्याच्याकडे उचित कारणे असतात. शास्त्रवचनांत मानवजातीकरता असलेला उद्देश सांगण्यात आला आहे. आपल्यापुढे एक भविष्य आहे आणि एक आशाही आहे.

तरीपण, हा यहोवा कोण आहे? तो कोणत्या प्रकारचा देव आहे? यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आपल्या महान रचनाकाराला, तो एक खरीखुरी व्यक्‍ती म्हणून ओळख करून घेण्यासाठी आमंत्रण देतात. तुम्ही त्याच्या नावाविषयी, त्याच्या गुणांविषयी आणि मानवजातीबरोबर त्याने केलेल्या व्यवहारांविषयी शिकू शकता. त्याचे वचन बायबल याच्याद्वारे तुम्हाला दिसून येईल की त्याच्या रचनेचे केवळ कौतुक करणे पुरेसे नाही तर, रचनाकार म्हणून आपण त्याची स्तुती करणे देखील आवश्‍यक आहे..—स्तोत्र ८६:१२; प्रकटीकरण ४:११. (w०७ ८/१५)

[४ पानांवरील चित्र]

मायकेलॲन्जेलो

[५ पानांवरील चित्रे]

रचनाकार आहे असा विश्‍वास करणे खऱ्‍या विज्ञानाशी जुळते

[६ पानांवरील चित्र]

विविधता आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हा, कल्पक रचनेतील वैविध्याचा पुरावा आहे

[७ पानांवरील चित्रे]

रचनेसाठी रचनाकार हवाच