व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते

दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते

दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते

“ज्यांनी [दुःख] सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.”—याकोब ५:११.

१, २. मनुष्याने दुःख भोगावे असा यहोवाचा उद्देश नव्हता हे कशावरून दिसते?

कोणत्याही सर्वसामान्य माणसाला दुःख भोगण्याची इच्छा नसते. आणि मानवांनी दुःख भोगावे, अशी आपल्याला निर्माण करणाऱ्‍या यहोवा देवाचीही इच्छा नाही. आपण त्याच्या प्रेरित वचनाचे परीक्षण करतो आणि पहिल्या स्त्रीपुरुषाच्या निर्मितीनंतर काय घडले याकडे लक्ष देतो तेव्हा हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. प्रथम, देवाने पुरुषाला घडवले. “परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” (उत्पत्ति २:७) आदामाचे शरीर व मन परिपूर्ण होते. तो कधीही आजारी पडणार नव्हता किंवा मरणार नव्हता.

आदाम कशाप्रकारच्या परिस्थितीत राहात होता? “परमेश्‍वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. परमेश्‍वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्‍नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे . . . जमिनीतून उगवविली.” (उत्पत्ति २:८, ९) खरोखर, आदामाचे निवासस्थान अतिशय अद्‌भुत होते. एदेन बागेत कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते.

३. पहिल्या मानवी जोडप्यासमोर कोणते भवितव्य होते?

उत्पत्ति २:१८ आपल्याला असे सांगते: “परमेश्‍वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” यहोवाने आदामासाठी एक परिपूर्ण पत्नी निर्माण केली. आता तो आनंदी कौटुंबिक जीवनाचा आस्वाद घेऊ शकत होता. (उत्पत्ति २:२१-२३) बायबल आपल्याला पुढे असे सांगते: “देवाने त्यास आशीर्वाद दिला; देव त्यास म्हणाला: ‘फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.’” (उत्पत्ति १:२८) पहिल्या मानवी जोडप्याला एदेन बागेतील नंदनवनाच्या सीमा वाढवत जाऊन सबंध पृथ्वीला एक नंदनवन बनवण्याचा अद्‌भुत बहुमान देण्यात आला होता. त्यांना होणारी मुले आनंदी व कोणत्याही प्रकारच्या दुःखापासून मुक्‍त अशी असणार होती. खरोखर ही किती उत्तम सुरुवात होती!—उत्पत्ति १:३१.

दुःखाची सुरुवात

४. इतिहासाकडे पाहिल्यास मानवजातीच्या संबंधाने कोणती गोष्ट स्पष्ट दिसून येते?

पण, सबंध इतिहासात मानवी कुटुंबाच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर हे स्पष्टपणे दिसून येते की उत्तम सुरुवात झाल्यानंतर काहीतरी भयानक घडून सर्वकाही विस्कळीत झाले असावे. सबंध इतिहासात अनेक वाईट घटना घडल्या आहेत आणि मानवी कुटुंबाला अकथनीय दुःख सहन करावे लागले आहे. शतकानुशतके आदाम व हव्वा यांचे वंशज आजाराला, म्हातारपणाला व शेवटी मृत्यूला बळी पडले आहेत. पृथ्वीवर आपल्याला आनंदी लोकांनी भरलेले नंदनवन निश्‍चितच दिसत नाही. मानवजातीच्या या परिस्थितीचे रोमकर ८:२२ यात अगदी अचूक वर्णन केले आहे: “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”

५. मानवी कुटुंबावर दुःख आणण्यात आपल्या पहिल्या आईवडिलांची काय भूमिका होती?

इतक्या काळापासून अस्तित्वात असलेल्या दुःखद परिस्थितीला यहोवा जबाबदार नाही. (२ शमुवेल २२:३१) काही प्रमाणात या परिस्थितीकरता मनुष्यालाच जबाबदार धरले पाहिजे. “लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करितात.” (स्तोत्र १४:१) आपल्या पहिल्या आईवडिलांना एक उत्तम सुरुवात करून देण्यात आली होती. आणि ही उत्तम परिस्थिती टिकवून ठेवण्याकरता त्यांना फक्‍त देवाच्या आज्ञेत राहायचे होते. पण आदाम व हव्वा यांनी यहोवाचे न ऐकता स्वतंत्र असा मार्ग निवडला. आपल्या पहिल्या आईवडिलांनी यहोवाकडे पाठ फिरवल्यामुळे ते परिपूर्ण राहिले नाहीत. त्यांचे शरीर व मन निकृष्ट होत गेले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडून आपल्याला ही अपरिपूर्णता उपजतच मिळाली आहे.—उत्पत्ति ३:१७-१९; रोमकर ५:१२.

६. मानवजातीवर दुःख आणण्यात सैतानाची काय भूमिका होती?

मानवजातीच्या जीवनात दुःख आणण्यात दियाबल सैतान म्हटलेल्या एका आत्मिक प्राण्याचीही भूमिका होती. त्याला इच्छास्वातंत्र्य देण्यात आले होते. पण त्याने या क्षमतेचा दुरुपयोग केला. त्याची अशी इच्छा होती की लोकांनी आपली उपासना करावी. पण फक्‍त यहोवाचीच उपासना करणे योग्य आहे, त्याने निर्माण केलेल्या प्राण्यांची नव्हे. सैतानाने आदाम व हव्वेला यहोवापासून स्वतंत्र होण्यास प्रवृत्त केले. यामुळे ते “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होतील, असे त्याने त्यांना सांगितले.—उत्पत्ति ३:५.

शासन करण्याचा अधिकार केवळ यहोवाचा

७. यहोवाविरुद्ध केलेल्या विद्रोहामुळे जे दुष्परिणाम झाले आहेत, त्यांवरून काय सिद्ध होते?

यहोवाविरुद्ध केलेल्या विद्रोहाचे जे दुष्परिणाम झाले आहेत त्यांवरून हेच सिद्ध होते की सबंध विश्‍वाचा सार्वभौम प्रभू असलेल्या यहोवालाच शासन करण्याचा अधिकार आहे आणि केवळ त्याचेच शासन नीतिमान आहे. मागच्या हजारो वर्षांच्या इतिहासावरून हेच दिसून आले आहे की सैतान जो “ह्‍या जगाचा अधिकारी” बनला आहे, त्याने दुष्ट, अनीतिमान व जुलमी पद्धतीने शासन केले आहे व त्याचे शासन पूर्णतः असमाधानकारक आहे. (योहान १२:३१) सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मानवांनी दीर्घकाळापासून जे दुःखदायी शासन केले आहे त्यावरून, नीतीने शासन करण्याची त्यांच्याजवळ क्षमताच नाही हे देखील सिद्ध झाले आहे. (यिर्मया १०:२३) त्याअर्थी, यहोवाशिवाय दुसऱ्‍या कोणाचेही शासन हे अयशस्वीच ठरेल. इतिहासाने हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

८. सर्व प्रकारच्या मानवी शासनांसंबंधी यहोवाचा उद्देश काय आहे आणि तो हा उद्देश कसा पूर्ण करेल?

यहोवाने मानवांना हजारो वर्षांपासून स्वतंत्रपणे शासन करून पाहण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता त्याने या पृथ्वीवरून सर्व मानवी सरकारांना काढून टाकून त्याऐवजी आपले सरकार स्थापन केल्यास तो अन्याय ठरणार नाही. याविषयी बायबलमध्ये अशी भविष्यवाणी आढळते: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) दुरात्म्यांचे व मानवांचे शासन संपुष्टात येईल आणि केवळ देवाचे स्वर्गीय राज्य अस्तित्वात राहील व या पृथ्वीवर शासन करील. त्या राज्याचा राजा ख्रिस्त असेल आणि त्याच्यासोबत पृथ्वीवरून घेतलेले १,४४,००० विश्‍वासू मानव देखील राज्य करतील.—प्रकटीकरण १४:१.

दुःख सहन करणे लाभदायक

९, १०. येशूने जे दुःख सोसले त्यामुळे त्याला काय लाभ झाला?

त्या स्वर्गीय राज्यात जे राज्य करतील ते याकरता पात्र आहेत की नाही याचे आपण परीक्षण करू या. सर्वप्रथम, राजा या नात्याने कार्य करण्यास आपण किती योग्य आहोत हे ख्रिस्त येशूने सिद्ध करून दाखवले आहे. त्याने यहोवाच्या सहवासात अगणित युगे राहून, त्याच्या इच्छेनुसार एक “कुशल कारागीर” या नात्याने कार्य केले आहे. (नीतिसूत्रे ८:२२-३१) यहोवाने त्याला पृथ्वीवर पाठवण्याची व्यवस्था केली तेव्हा त्याने आनंदाने यहोवाच्या आज्ञेचे पालन केले. पृथ्वीवर त्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाविषयी व त्याच्या राज्याविषयी सर्व लोकांना सांगण्यात आपली शक्‍ती पणास लावली. येशूने यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या अधीन होण्याविषयी आपल्या सर्वांकरता एक उत्तम आदर्श पुरवला आहे.—मत्तय ४:१७; ६:९.

१० येशूचा छळ करण्यात आला आणि शेवटी त्याला जिवे मारण्यात आले. त्याच्या सेवाकार्यादरम्यान तो आपल्या सभोवती मानवजातीची झालेली दयनीय अवस्था पाहू शकत होता. हे सर्व प्रत्यक्ष पाहणे व स्वतःही दुःख सोसणे त्याच्याकरता लाभाचे ठरले का? होय. इब्री लोकांस ५:८ सांगते: “तो पुत्र असूनहि त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” पृथ्वीवर असताना येशूला जो अनुभव मिळाला त्यामुळे तो अधिक समजूतदार व कनवाळू बनला. मानवी कुटुंबाची परिस्थिती त्याने स्वतः अनुभवली. दुःखीकष्टी लोकांबद्दल तो सहानुभूती दाखवू शकला आणि त्यांचे तारण करण्याकरता आपली काय भूमिका आहे हे तो अधिक चांगल्याप्रकारे समजू शकला. याविषयी प्रेषित पौलाने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात प्रकाश टाकला. त्याने म्हटले: “त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधुंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्‍यासाठी की, लोकांच्या पापाबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्‍वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.” “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.”—इब्री लोकांस २:१७, १८; ४:१४-१६; मत्तय ९:३६; ११:२८-३०.

११. पृथ्वीवर मिळालेल्या अनुभवामुळे, शासक या नात्याने भावी राजांना व याजकांना कोणता लाभ होतो?

११ ख्रिस्त येशूसोबत सहशासक म्हणून त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याकरता पृथ्वीवरून ‘विकत घेतलेल्या’ १,४४,००० जनांबद्दलही हेच म्हणता येईल. (प्रकटीकरण १४:४) त्या सर्वांचा या पृथ्वीवर मानवी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी लहानाचे मोठे होताना या जगातले दुःख जवळून पाहिले आणि त्यांना व्यक्‍तिशः दुःख सहन करावे लागले. बऱ्‍याच जणांचा छळ करण्यात आला. काहींना तर यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे व येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालल्यामुळे जिवे मारण्यात आले. पण त्यांनी ‘आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची लाज धरली नाही तर सुवार्तेसाठी दुःख सोसले.’ (२ तीमथ्य १:८) पृथ्वीवर मिळालेल्या या अनुभवामुळे ते स्वर्गातून मानवी कुटुंबाचा न्याय करण्यास अगदी योग्य आहेत. ते अधिक सहानुभूतिशील, दयाळू, व लोकांना साहाय्य करायला उत्सुक असण्यास शिकले आहेत.—प्रकटीकरण ५:१०; १४:२-५; २०:६.

पृथ्वीवर जीवनाची आशा असलेल्यांचा आनंद

१२, १३. पृथ्वीवर जीवनाची आशा असणाऱ्‍यांना दुःख सोसल्याने कोणता फायदा होऊ शकतो?

१२ आजारपण, दुःख व मरण यांपासून मुक्‍त असलेल्या पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळ जगण्याची ज्यांना आशा आहे, त्यांना सध्या सोसाव्या लागणाऱ्‍या दुःखामुळे काही फायदा होऊ शकतो का? दुःखामुळे होणाऱ्‍या वेदना व कष्ट तसे कोणालाही नको असते. पण दुःख सोसल्यामुळे आपल्या अंगी अनेक चांगले गुण येतात आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.

१३ देवाचे प्रेरित वचन याबाबतीत काय म्हणते ते पाहा: “नीतिमत्त्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य.” “ख्रिस्ताच्या नांवामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा.” (१ पेत्र ३:१४; ४:१४) “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” (मत्तय ५:११, १२) “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीति करणाऱ्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.”—याकोब १:१२.

१४. दुःख सोसताना यहोवाच्या उपासकांना कशामुळे आनंद होतो?

१४ अर्थातच, आपल्याला सोसावे लागणारे दुःख प्रत्यक्षात आनंददायक नसते. पण आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागत असल्यामुळे आणि येशूच्या पदचिन्हांवर चालत असल्यामुळे आपल्याला हे दुःख सोसावे लागत आहे ही जाणीव आपल्याला आनंद किंवा समाधान देते. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात, काही प्रेषितांना तुरुंगात टाकण्यात आले आणि मग त्यांना यहुद्यांच्या उच्च न्यायालयापुढे आणण्यात आले. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रचार केल्यामुळे त्यांची निर्भर्त्सना करण्यात आली. त्यांना फटके मारण्यात आले व नंतर मुक्‍त करण्यात आले. हे सर्व सोसावे लागले तेव्हा त्यांनी कशी वृत्ती बाळगली? बायबलमधील अहवाल सांगतो की ते “[ख्रिस्ताच्या] नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.” (प्रेषितांची कृत्ये ५:१७-४१) फटके मारण्यात आले आणि वेदना झाल्या म्हणून त्यांना आनंद वाटला नाही. तर जे काही घडले ते आपण यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे व येशूचे अनुकरण केल्यामुळे घडले, हे जाणून त्यांना आनंद वाटला.—प्रेषितांची कृत्ये १६:२५; २ करिंथकर १२:१०; १ पेत्र ४:१३.

१५. आता दुःख सोसल्यामुळे भविष्यात आपल्याला कोणता फायदा होईल?

१५ आपण विरोधाला आणि छळाला योग्य मनोवृत्तीने तोंड दिल्यास, त्यामुळे आपण धीर धरायला शिकू. आणि धीराचा हा गुण आपल्या अंगी आल्यामुळे भविष्यातल्या परीक्षांना तोंड देण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. बायबल म्हणते: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” (याकोब १:२, ३) त्याचप्रकारे, रोमकर ५:३-५ आपल्याला असे सांगते: “[आपण] संकटांचाहि अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील, व शीलाने आशा निर्माण होते; आणि आशा लाजवीत नाही.” तर ख्रिस्ती मार्गात चालत असल्यामुळे आता आपण जितक्या जास्त परीक्षांना तोंड देऊ, तितकेच आपण भविष्यात येणाऱ्‍या परीक्षांना तोंड देण्याकरता सुसज्ज होऊ.

यहोवा भरपाई करेल

१६. भावी राजे व याजक यांना सोसाव्या लागलेल्या दुःखाची यहोवा कशाप्रकारे भरपाई करेल?

१६ ख्रिस्ती मार्गात चालत असल्यामुळे विरोध किंवा छळ सहन करताना भौतिक वस्तूंची हानी झाली तरीसुद्धा, यहोवा आपल्याला विपुल प्रतिफळ देईल हे जाणून आपण समाधानी राहू शकतो. उदाहरणार्थ, स्वर्गात जाण्याची आशा असणाऱ्‍या काहींना प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता [देवाच्या राज्यात शासक या नात्याने] आपल्याजवळ आहे, व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.” (इब्री लोकांस १०:३४) यहोवाच्या व ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली नव्या जगात जेव्हा ते पृथ्वीच्या रहिवाशांवर अद्‌भुत आशीर्वादांचा वर्षाव करण्यात सहभाग घेतील तेव्हा त्यांना जो आनंद वाटेल त्याची कल्पना करा! प्रेषित पौलाने विश्‍वासू ख्रिश्‍चनांना लिहिलेले शब्द अगदी खरे आहेत: “आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो.”—रोमकर ८:१८.

१७. पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांपैकी सध्या जे यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करतात त्यांना तो कोणते प्रतिफळ देईल?

१७ त्याचप्रकारे, पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांना यहोवाची सेवा करत असल्यामुळे सध्याच्या जीवनात काही गमवावे लागले किंवा त्यांनी स्वेच्छेने काही गोष्टींचा त्याग केला तरीसुद्धा, भविष्यात यहोवा त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे याचे प्रतिफळ त्यांना देईल. तो त्यांना पृथ्वीवर नंदनवनात परिपूर्ण परिस्थितीत सार्वकालिक जीवन देईल. त्या नव्या जगात यहोवा “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) हे आश्‍वासन खरेच किती अद्‌भुत आहे! यहोवासाठी आपल्याला स्वेच्छेने किंवा नाईलाजाने या सध्याच्या जगात काहीही गमवावे लागले तरी, येणाऱ्‍या जगात धीराने दुःख सोसणाऱ्‍या आपल्या विश्‍वासू सेवकांना यहोवा जे अद्‌भुत जीवन देईल त्यापुढे ते अगदीच नगण्य ठरेल.

१८. यहोवा आपल्याला त्याच्या वचनात कोणते सांत्वनदायक आश्‍वासन देतो?

१८ आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागले तरीसुद्धा, त्या दुःखाच्या आठवणी देवाच्या नव्या जगात सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगण्याच्या मार्गात बाधा बनणार नाहीत. त्या नव्या जगातील विस्मयकारक परिस्थितीत ती सर्व दुःखे कायमची नाहीशी होतील. यशया ६५:१७, १८ आपल्याला सांगते: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत; परंतु जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.” म्हणूनच, “ज्यांनी [दुःख] सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो” असे येशूचा भाऊ याकोब याने जे म्हटले ते अगदी योग्यच होते. (याकोब ५:११) होय, सध्याची दुःखे आपण विश्‍वासूपणे सहन केली तर आता आणि भविष्यातही आपल्याला त्याचा लाभ होईल. (w०७ ८/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मानवी कुटुंबावर दुःख कशाप्रकारे आले?

• पृथ्वीच्या भावी शासकांना व रहिवाशांना दुःख सोसल्यामुळे कोणते लाभ मिळतात?

• दुःख सहन करावे लागते तरीसुद्धा आपण सध्याही आनंदी का असू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

आपल्या पहिल्या आईवडिलांपुढे एक अद्‌भुत भवितव्य होते

[१५ पानांवरील चित्र]

जगातील दुःखे प्रत्यक्षात पाहिल्यामुळे येशूला भविष्यात एक उत्तम राजा व महायाजक होण्यास साहाय्य मिळाले

[१७ पानांवरील चित्र]

‘आपल्या विश्‍वासाकरता आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो’ हे जाणून प्रेषितांना आनंद झाला