व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण दयाळूपणा कशाप्रकारे दाखवू शकतो?

आपण दयाळूपणा कशाप्रकारे दाखवू शकतो?

आपण दयाळूपणा कशाप्रकारे दाखवू शकतो?

“जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०.

१, २. दयाळू शोमरोन्याचा दाखला आपल्याला, दयेविषयी कोणता धडा शिकवतो?

नियमशास्त्रात पारंगत असलेल्या एका मनुष्याने येशूबरोबर बोलताना त्याला असे विचारले: “माझा शेजारी कोण?” त्याला उत्तर देताना येशूने एक दाखला दिला: “एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात असतांना लुटारुंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीहि त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्‍या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ‘ह्‍याची काळजी घ्या; आणि ह्‍यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’” मग येशूने त्या मनुष्याला विचारले: “तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?” त्या माणसाने उत्तर दिले: “त्याच्यावर दया करणारा तो.”—लूक १०:२५, २९-३७क.

शोमरोन्याने त्या जखमी माणसाच्या घेतलेल्या काळजीवरून, खरा दयाळूपणा काय आहे हे किती स्पष्टपणे दिसून येते. शोमरोनी माणसाला जखमी माणसाची कीव आली. आणि त्याने असे कार्य केले ज्यामुळे जखमी मनुष्याला आराम मिळाला. शिवाय, हा जखमी मनुष्य शोमरोन्यासाठी अगदी अनोळखी होता. दयाळूपणा राष्ट्रीय, धार्मिक किंवा सांस्कृतिक अडथळे पार करतो. दयाळू शोमरोन्याचा दाखला दिल्यानंतर येशूने त्या मनुष्याला असा सल्ला दिला: “जा आणि तूंहि तसेच कर.” (लूक १०:३७ख) आपणही या सल्ल्याची दखल घेऊन इतरांना दया दाखवण्यास झटू शकतो. पण आपण हे कसे करू शकतो? आपल्या दैनंदिन जीवनात आपण दयाळूपणा कसा दाखवू शकतो?

‘एखादा भाऊ . . . उघडा आहे’

३, ४. ख्रिस्ती मंडळीत विशेषकरून दयाळूपणा दाखवणे महत्त्वाचे का आहे?

प्रेषित पौलाने असे म्हटले: “आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) तेव्हा, आपल्याबरोबर जे विश्‍वासाने एका घरचे झालेले आहेत त्यांचे आपण विपुलप्रमाणात बरे कसे करू शकतो, याचा आधी विचार करूया.

एकमेकांना दया दाखवा असे ख्रिश्‍चनांना आर्जवताना शिष्य याकोबाने असे लिहिले: “ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल.” (याकोब २:१३) या ईश्‍वरप्रेरित वचनांच्या मागच्या-पुढच्या संदर्भावरून आपल्याला, दयाळूपणा दाखवण्याचे कोणकोणते मार्ग आहेत हे कळते. उदाहरणार्थ, याकोब १:२७ मध्ये आपण असे वाचतो: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.” याकोब २:१५, १६ मध्ये असे म्हटले आहे: “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्‍नाची वाण आहे, आणि तुम्हांमधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?”

५, ६. स्थानीय मंडळीसोबत संगती करताना आपण विपुलमात्रेत दयाळूपणा कसा दाखवू शकतो?

इतरांची काळजी घेणे आणि गरज असलेल्यांना मदत करणे हे खऱ्‍या धर्माचे एक ओळखचिन्ह आहे. यहोवा देवाचे उपासक असल्यामुळे आपण इतरांची फक्‍त ख्यालीखुशाली विचारून आपली चिंता व्यक्‍त करत नाही तर, ज्यांना खरोखरच गरज आहे अशांबद्दल आपल्याला वाटणारी कीव अर्थात कळवळा आपल्याला त्यांना मदत करण्यास प्रवृत्त करतो. (१ योहान ३:१७, १८) एखाद्या आजारी व्यक्‍तीला जेवण बनवून देणे, वृद्ध बंधू अथवा बहिणीला घरातील अथवा बाहेरची कामे करून देणे, आवश्‍यकता असते तेव्हा ख्रिस्ती सभांना नेणे व आणून सोडणे आणि ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे अशांना कंजूषपणा न दाखवता सढळ हाताने मदत करणे हे विपुलमात्रेत दयाळूपणा दाखवण्याचे काही मार्ग आहेत.—अनुवाद १५:७-१०.

वाढत चाललेल्या ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांना भौतिक मदत देणे हे महत्त्वाचे असले तरी, त्यांना आध्यात्मिक मदत देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा,” असे आपल्याला आर्जवण्यात आले आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) ‘वृद्ध स्त्रिया’ “सुशिक्षण देणाऱ्‍या असाव्या,” असे त्यांना उत्तेजन देण्यात येते. (तीत २:३) ख्रिस्ती पर्यवेक्षकांबद्दल बायबल म्हणते, की प्रत्येकाने “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा,” असे असले पाहिजे.—यशया ३२:२.

७. सीरियातील अंत्युखियात राहणाऱ्‍या शिष्यांकडून आपण दयाळूपणा दाखवण्याच्याबाबतीत कोणता धडा शिकतो?

पहिल्या शतकातील मंडळ्या, स्थानीय मंडळीतील विधवा, अनाथ व गरजू बंधूभगिनींना मदत करण्यासोबतच, अधूनमधून इतर ठिकाणच्या सहविश्‍वासू बंधूभगिनींसाठी देखील मदत पाठवण्याची व्यवस्था करत असत. उदाहरणार्थ, अगब नावाच्या संदेष्ट्याने जेव्हा “सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे” असे भाकीत केले तेव्हा, सीरियातील अंत्युखियात राहणाऱ्‍या शिष्यांनी “निश्‍चय केला की, यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरिता यथाशक्‍ति काही पाठवावे.” ही मदत “बर्णबा व शौल ह्‍यांच्या हाती” तेथील वडीलवर्गाकडे पाठवण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये ११:२८-३०) आजही असेच केले जाते का? चक्रीवादळे, भूकंप किंवा सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम झालेल्या बंधूभगिनींची काळजी घेण्याकरता ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ साहाय्य समित्या बनवल्या आहेत. (मत्तय २४:४५) या व्यवस्थेला सहयोग देण्याकरता स्वेच्छेने आपला वेळ, परिश्रम आणि संपत्तीचा उपयोग करणे हा दया दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

“जर तुम्ही तोंड पाहून वागत आहा तर”

८. पक्षपात हा दया दाखवण्यास एक अडखळण कसा आहे?

दया दाखवण्यास अडखळण बनू शकणाऱ्‍या व प्रीतिच्या ‘राजमान्य नियमाविरुद्ध’ असलेल्या एका गुणाविषयी इशारा देताना याकोबाने असे लिहिले: “जर तुम्ही तोंड पाहून वागत आहा तर पाप करिता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.” (याकोब २:८, ९) भौतिकरीत्या श्रीमंत असलेल्यांची किंवा मोठ्या हुद्द्‌यावर असलेल्यांची आपण फाजील तोंडपूजा करीत राहिलो तर “गरिबाची आरोळी” ऐकण्याकरता आपण तितकेसे संवेदनशील राहणार नाही. (नीतिसूत्रे २१:१३) पक्षपातीपणा हा दया दाखवण्यास एक अडखळण आहे. आपण इतरांना निःपक्षपातीपणे वागवून दया दाखवतो.

९. योग्य लोकांचा खास आदर करणे गैर का नाही?

आपण निःपक्षपाती असले पाहिजे याचा अर्थ, आपण कोणाचीच अधिक काळजी करू नये, असा होतो का? नाही. आपला सहकर्मचारी एपफ्रदीत याच्याविषयी पौलाने फिलिप्पै येथील ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “अशांचा मान राखा.” का? पौल पुढे म्हणतो: “कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.” (फिलिप्पैकर २:२५, २९, ३०) एपफ्रदीतने केलेली विश्‍वासू सेवा ही आदरास पात्र होती. शिवाय, १ तीमथ्य ५:१७ मध्ये आपण असे वाचतो: “जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” उत्तम आध्यात्मिक गुणही सन्मानास पात्र आहेत. अशाप्रकारचा आदर दाखवणे हा पक्षपात नव्हे.

‘वरून येणारे ज्ञान दयेने पूर्ण आहे’

१०. आपण आपल्या जीभेवर ताबा का ठेवला पाहिजे?

१० जीभेविषयी बोलताना याकोबाने म्हटले: “ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभु व पिता त्याची आपण स्तुति करितो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापहि देतो; एकाच तोंडातून स्तुति व शाप निघतात.” येथे याकोब पुढे म्हणतो: “तुमच्या मनांत तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका, व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.”—याकोब ३:८-१०क, १४-१७.

११. जीभेच्या वापराच्या संबंधाने आपण दयाळूपणा कसा दाखवू शकतो?

११ यास्तव, आपण आपल्या जीभेचा ज्याप्रकारे वापर करतो त्यावरून दिसून येईल, की आपल्याजवळ ‘दयेने पूर्ण’ असलेले ज्ञान आहे किंवा नाही. मत्सर किंवा द्वेष यामुळे जर आपण बढाई मारत असलो, खोटे बोलत असलो किंवा इतरांची चुगली करत असलो तर यावरून काय दिसून येईल? स्तोत्र ९४:४ मध्ये, जे स्वतःविषयी फुशारकी मारतात त्यांना “दुष्कर्मी” म्हटले आहे. एखाद्या प्रामाणिक व्यक्‍तीबद्दलच्या हानीकारक गप्पा किती लवकर तिचे नाव खराब करू शकतात! (स्तोत्र ६४:२-४) शिवाय, ‘असत्य वदणाऱ्‍या खोट्या साक्षीमुळे’ किती हानी होऊ शकते, याचा विचार करा. (नीतिसूत्रे १४:५; १ राजे २१:७-१३) जीभेच्या गैरवापराविषयी चर्चा केल्यानंतर याकोब म्हणतो: “माझ्या बंधूंनो, ह्‍या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.” (याकोब ३:१०ख) खरी दया दाखवण्याची आपली इच्छा असेल तर आपण शालीन, शांतीमय व समंजसपणे आपल्या जीभेचा वापर केला पाहिजे. येशूने म्हटले: “मी तुम्हास सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.” (मत्तय १२:३६) तेव्हा, आपल्या जीभेच्या वापराच्या संबंधाने देखील आपण दयाळू असणे किती महत्त्वाचे आहे!

‘तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा करा’

१२, १३. (क) मोठे कर्ज असलेल्या एका दासाच्या दाखल्यावरून आपण दयेविषयी काय शिकतो? (ख) “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करण्याचा काय अर्थ होतो?

१२ येशूने आणखी एक दाखला देऊन, दयाळूपणा दाखवण्याचा दुसरा मार्ग दाखवला. एका दासावर राजा असलेल्या त्याच्या धन्याचे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडणे त्याला अशक्य असल्यामुळे तो दयेची भीक मागतो. “दया येऊन” धनी या दासाचे सर्व कर्ज सोडून देतो. पण हा दास बाहेर जातो आणि त्याचा सोबतीचा एक दास त्याला भेटतो ज्याला त्याचे केवळ शंभर रुपये द्यायचे होते. तेव्हा तो त्याला कसलीही दया न दाखवता तुरुंगात डांबतो. धन्याच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडते तेव्हा धनी, क्षमा केलेल्या दासाला बोलवून घेतो आणि त्याला म्हणतो: “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूहि आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय?” मग त्याचा धनी त्याला बंदिशाळेच्या नायकाच्या हाती सोपवून देतो. येशू दाखल्याच्या शेवटी असे म्हणतो: “म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.”—मत्तय १८:२३-३५.

१३ वर उल्लेखलेला दाखला किती जोरदारपणे, दयेमध्ये क्षमा करण्याची तयारी असली पाहिजे हा मुद्दा दाखवून देतो! यहोवाने आपल्या सर्वांच्या पापाचे मोठे कर्ज माफ केले आहे. तेव्हा आपणही “लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा” करू नये का? (मत्तय ६:१४, १५) येशूने निर्दयी दासाचा दाखला देण्याआधी पेत्राने त्याला विचारले होते: “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले होते: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.” (मत्तय १८:२१, २२) होय, दयाळू व्यक्‍ती “साताच्या सत्तर वेळा” अर्थात अमर्यादपणे क्षमा करण्यास तयार असते!

१४. मत्तय ७:१-४ नुसार, आपण दररोज दया कशी दाखवू शकतो?

१४ दया दाखवण्याच्या आणखी एका मार्गाविषयी येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात असे म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील . . . तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.” (मत्तय ७:१-४) यास्तव, सतत इतरांचे दोष न काढता, त्यांच्या चुका सहन करण्याद्वारे आपण दररोज दया दाखवू शकतो.

‘सर्वांचे बरे करावे’

१५. आपण दयाळूपणा फक्‍त आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींनाच दाखवतो असे का नाही?

१५ बायबलमधील याकोबाच्या पुस्तकात, बंधूभगिनींना विशेषकरून दया दाखवण्यावर जोर देण्यात आलेला असला तरी, आपण केवळ ख्रिस्ती मंडळीतल्यांनाच दया दाखवली पाहिजे, असा याचा अर्थ होत नाही. स्तोत्र १४५:९ म्हणते: “परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्यांची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” आपल्याला असे आर्जवण्यात आले आहे: “[देवाचे] अनुकरण करणारे व्हा,” आणि ‘सर्वांचे बरे करा.’ (इफिसकर ५:१; गलतीकर ६:१०) आपण “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति” करत नसलो तरी, जगातील गरजू लोकांबद्दल आपण भावनाशून्य नाही.—१ योहान २:१५.

१६. कोणत्या कारणांमुळे आपण इतरांना दया दाखवतो?

१६ ख्रिस्ती यानात्याने आपण, “समय व प्रसंग” यांमुळे संकटाला बळी पडलेल्यांना किंवा कठीण परिस्थितीत असलेल्यांना जी मदत करता येईल ती करण्यास सदैव तयार असतो. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) अर्थात, आपण आपल्या ऐपतीनुसार हे करू. (नीतिसूत्रे ३:२७) इतरांना आर्थिक मदत करत असताना आपण एक सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण ज्या व्यक्‍तीला मदत करत आहोत तिला आपण आळशी तर बनवत नाही, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. (नीतिसूत्रे २०:१, ४; २ थेस्सलनीकाकर ३:१०-१२) यास्तव, कनवाळूपणाच्या कोमल भावना, सहानुभूती व समंजसपणाने प्रवृत्त होऊन एक व्यक्‍ती खरी दया दाखवते.

१७. ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नसलेल्यांना दया दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

१७ ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नसलेल्या लोकांना दया दाखवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे, त्यांना बायबलमधील सत्य सांगणे. का? कारण, बहुतेक मानवजात आज आध्यात्मिक अंधकारात चाचपडत आहे. आलेल्या समस्येला कसे हाताळायचे याविषयी काहीही माहीत नसल्यामुळे किंवा भवितव्याची कसलीही आशा नसल्यामुळे बहुतेक लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले” आहेत. (मत्तय ९:३६) देवाच्या वचनातील संदेश त्यांच्या ‘पावलांकरिता दिव्यासारखा’ असू शकतो जो त्यांना जीवनाच्या समस्या सोडवण्यास मदत करतो. तो त्यांच्या ‘मार्गावर प्रकाशासारखा’ देखील असू शकतो. अर्थात, बायबल भवितव्याबद्दल देवाचा उद्देश काय आहे याविषयी भाकीत करून, उज्ज्वल भवितव्याची आशा बाळगण्याचे कारण देते. (स्तोत्र ११९:१०५) सत्याची नितांत गरज असलेल्यांना बायबलमधील अद्‌भुत संदेश सांगण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! “मोठे संकट” अगदी जवळ येऊन ठेपले आहे. हे लक्षात ठेवून आपण, राज्य प्रचारकार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेण्याची हीच वेळ आहे. (मत्तय २४:३-८, २१, २२, ३६-४१; २८:१९, २०) या कार्यात भाग घेण्यापेक्षा इतर कोणतेही दयाळू कार्य महत्त्वाचे नाही.

“जे आंत आहे त्याचा दानधर्म करा”

१८, १९. आपण आपल्या जीवनात होता होईल तितकी दया दाखवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

१८ “जे आंत आहे त्याचा दानधर्म करा,” असे येशूने म्हटले. (लूक ११:४१) आपण जर खरोखरच दयाळू कार्य करू इच्छित असू तर ते सत्कृत्य आपल्या आतून प्रेरित झाले पाहिजे अर्थात आपण जे दयाळू कार्य करू ते प्रेमळ व स्वेच्छापूर्ण हृदयाने करू. (२ करिंथकर ९:७) कठोरपणा, स्वार्थीपणा आणि इतरांच्या दुःखांबद्दल व समस्यांबद्दलची बेपर्वा मनोवृत्ती आजच्या जगात सर्वसामान्य आहे; पण आपण दाखवत असलेली दया लोकांना तजेला देऊ शकते.

१९ तेव्हा, आपण आपल्या जीवनात होता होईल तितकी दया दाखवण्याचा प्रयत्न करूया. आपण जितके दयाळूपणे वागू तितकेच आपण देवासारखे होऊ. यामुळे आपण अर्थपूर्ण व समाधानकारक जीवन जगू शकू.—मत्तय ५:७. (w०७ ९/१५)

तुम्ही काय शिकलात?

• सहविश्‍वासू बंधूभगिनींना खासकरून दया दाखवणे महत्त्वाचे का आहे?

• ख्रिस्ती मंडळीत आपण दया कशी दाखवू शकतो?

• ख्रिस्ती मंडळीचे सदस्य नसलेल्यांचे आपण बरे कसे करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

शोमरोनी मनुष्य दयाळूपणे वागला

[१६ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती विपुलमात्रेत दया दाखवतात