व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुमचा पिता दयाळू आहे”

“तुमचा पिता दयाळू आहे”

“तुमचा पिता दयाळू आहे”

“जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीहि दयाळू व्हा.”—लूक ६:३६.

१, २. दया हा गुण अत्यंत लाभदायक गुण आहे हे येशूने शास्त्र्यांना, परुशांना व आपल्या अनुयायांना जे सांगितले त्यावरून कसे दिसते?

मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रात, सुमारे ६०० नियम व कायदे होते. या नियमशास्त्रातील नियमांचे पालन करणे जितके आवश्‍यक होते तितकेच, दया दाखवणेही महत्त्वाचे होते. दया दाखवण्याची मनोवृत्ती नसलेल्या परुशांना येशूने काय म्हटले त्याचा विचार करा. दोन प्रसंगी त्याने त्यांना खडसावले आणि देवाने काय म्हटले होते ते दाखवले: “मला दया पाहिजे, यज्ञ नको.” (मत्तय ९:१०-१३; १२:१-७; होशेय ६:६) आपल्या सेवेच्या शेवटी शेवटी येशूने असे म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडिशेप व जिरे ह्‍यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत.”—मत्तय २३:२३.

येशूने दया या गुणाला अत्यंत महत्त्व दिले. त्याने आपल्या अनुयायांना असे सांगितले: “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीहि दयाळू व्हा.” (लूक ६:३६) परंतु याबाबतीत देवाचे “अनुकरण करणारे” होण्याकरता आपल्याला आधी, खरी दया म्हणजे नेमके काय हे माहीत असले पाहिजे. (इफिसकर ५:१) शिवाय, दया दाखवल्याने फायदा होतो, हे समजल्याने आपण आपल्या जीवनात आणखी दयाळू होण्यास प्रवृत्त होऊ.

गरजू लोकांना दया दाखवणे

३. खरी दया काय आहे हे आपण यहोवाकडून का शिकले पाहिजे?

स्तोत्रकर्त्याने गायिले: “परमेश्‍वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे; परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्यांची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” (स्तोत्र १४५:८, ९) यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव,” आहे. (२ करिंथकर १:३) एखाद्याशी दयाळूपणे वागून दया दाखवता येते. हा देवाच्या व्यक्‍तिमत्त्वातील एक महत्त्वाचा पैलू आहे. त्याचे उदाहरण आणि त्याने दिलेल्या सूचना आपल्याला, खरी दया काय आहे हे शिकवू शकते.

४. यशया ४९:१५ वचनातून आपण दयेविषयी काय शिकतो?

यशया ४९:१५ मध्ये यहोवा असे म्हणतो: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय?” येथे, “करुणा” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या इब्री भाषेतल्या शब्दाची रुपे वर उल्लेखलेल्या स्तोत्र १४५:८, ९ मधील दया या शब्दाच्या संबंधाने वापरण्यात आली आहेत. ज्या भावनामुळे यहोवा दया दाखवण्यास प्रवृत्त होतो त्या भावनेची तुलना, आपल्या बाळाबद्दल सहसा एखाद्या आईला जी ममता असते तिच्याशी करण्यात आली आहे. कदाचित त्या बाळाला भूक लागली आहे किंवा त्याला काहीतरी दुसरे हवे आहे. तेव्हा त्या आईच्या मनात आपलेपणाची भावना किंवा सहानुभूती जागृत होते आणि ती आपल्या बाळाची गरज पूर्ण करते. यहोवा ज्यांना दया दाखवतो त्यांच्याबद्दल त्याच्या मनात अशाच भावना असतात.

५. इस्राएल लोकांबरोबर यहोवाने जे व्यवहार केले त्यातून त्याने कसे दाखवून दिले की तो “दयासंपन्‍न” आहे?

इतरांबद्दल दया वाटणे हे तर कौतुकास्पद आहेच परंतु जे गरजू आहेत त्यांच्या लाभास्तव कार्य करणे हे आणखीनच कौतुकास्पद आहे. सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी यहोवाचे उपासक मिसरात दास म्हणून गेले तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली त्याचा विचार करा. त्याने मोशेला सांगितले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशांत, . . . त्यांस घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.” (निर्गम ३:७, ८) मिसरातून इस्राएली लोकांची सुटका होऊन सुमारे ५०० वर्षे उलटल्यानंतर, यहोवाने त्यांना आठवण करून दिली: “मी इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणिले आणि तुम्हास मिसरी लोकांच्या हातातून आणि तुम्हास गाजणाऱ्‍या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडविले.” (१ शमुवेल १०:१८) देवाच्या धार्मिक स्तरांचे पालन करण्याचे सोडून दिल्यामुळे इस्राएली लोकांची अनेकदा दयनीय स्थिती झाली. तरीपण यहोवाला त्यांचा कळवळा आला आणि तो वारंवार त्यांच्या मदतीला धावून गेला. (शास्ते २:११-१६; २ इतिहास ३६:१५) यावरून आपला प्रेमळ देव गरजू, धोक्यात असलेल्या किंवा अडचणीत असलेल्या लोकांबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवतो, हे दिसते. यहोवा “दयासंपन्‍न” आहे.—इफिसकर २:४.

६. येशू ख्रिस्ताने दया दाखवण्याच्या बाबतीत आपल्या पित्याचे अनुकरण कसे केले?

पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने दया दाखवण्याच्या बाबतीत आपल्या पित्याचे हुबेहूब अनुकरण केले. दोन आंधळ्यांनी जेव्हा येशूला: “हे प्रभो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा,” अशी विनंती केली तेव्हा येशूने काय केले? आपल्याला चमत्काराने दृष्टी पुन्हा मिळावी अशी त्यांनी येशूला भीक मागितली. तेव्हा येशूने भावनाशून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले नाही. तर, “येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला; तेव्हा त्यांस तत्काळ दिसू लागले,” असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (मत्तय २०:३०-३४) येशूला लोकांचा कळवळा आला आणि त्याने चमत्कारिकपणे आंधळ्यांना दृष्टी दिली, भुताने पछाडलेल्यांना मुक्‍त केले, कुष्ठरोग्यांना बरे केले; या सर्व लोकांनी तसेच आपली रोगी मुले बरी झाल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.—मत्तय ९:२७; १५:२२; १७:१५; मार्क ५:१८, १९; लूक १७:१२, १३.

७. यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू यांच्या उदाहरणावरून आपण दयेविषयी काय शिकतो?

यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्या उदाहरणावरून दिसून येते, की दयेचे दोन पैलू अथवा घटक आहेत: कनवाळूपणा, सहानुभूती किंवा जे उपेक्षित आहेत त्यांचा कळवळा येणे आणि त्यांना आराम देईल असे कार्य करणे. दया दाखवण्याकरता दोन्ही घटकांची आवश्‍यकता आहे. शास्त्रवचनांत, दया हा शब्द सहसा एका सकारात्मक अर्थाने वापरण्यात आला आहे; जसे की, गरजू लोकांबद्दल कनवाळूपणे विचार करणे या अर्थाने. परंतु, एखाद्या न्यायिक प्रकरणात दया कशी दाखवली जाते? यामध्ये, नकारात्मक कार्य जसे की शिक्षा ठोठावण्यापासून परावृत्त होणे देखील समाविष्ट आहे का?

पातक्यांना दया दाखवणे

८, ९. बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर दावीदाला दाखवण्यात आलेल्या दयेत काय समाविष्ट होते?

संदेष्टा नाथान प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याला, बथशेबाबरोबरच्या दावीदाच्या अनैतिक संबंधांविषयी सांगायला गेला तेव्हा काय झाले त्याचा विचार करा. पश्‍चात्तापी दावीदाने अशी प्रार्थना केली: “हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.”—स्तोत्र ५१:१-४.

दावीदाला मनापासून पश्‍चात्ताप झाला होता. यहोवाने त्याच्या पापांची क्षमा केली आणि त्याला व बथशेबाला जितकी शिक्षा व्हायची होती तितकी न देता कमी शिक्षा केली. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, दावीद आणि बथशेबा या दोघांनाही जिवे मारायला हवे होते. (अनुवाद २२:२२) हे दोघेही आपल्या पापाच्या सर्व परिणामांपासून वाचले नसले तरीसुद्धा त्यांना जिवंत राहू देण्यात आले. (२ शमुवेल १२:१३) देवाच्या दयेत, पापाची क्षमा करणे देखील समाविष्ट आहे. परंतु, योग्य शिक्षा देण्यापासून तो परावृत्त होत नाही.

१०. न्याय करताना देव दयाळू असला तरी, आपण त्याच्या दयेचा गैरफायदा का घेऊ नये?

१० ‘एका माणसाच्या द्वारे [आदामाच्याद्वारे] पाप जगात शिरल्यामुळे’ व “पापाचे वेतन मरण” असल्यामुळे सर्व मानव मृत्यूस पात्र आहेत. (रोमकर ५:१२; ६:२३) यहोवा जेव्हा न्याय करतो तेव्हा तो दयाळू असतो, म्हणून आपण त्याचे किती आभारी आहोत! परंतु, देवाच्या दयेचा आपण गैरफायदा तर घेत नाही याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे. अनुवाद ३२:४ मध्ये म्हटले आहे: “त्याचे [यहोवाचे] सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” दया दाखवताना देव न्यायाच्या आपल्या परिपूर्ण दर्जांकडे दुर्लक्ष करीत नाही.

११. दावीद आणि बथशेबाच्या पापांची शिक्षा देताना यहोवाने न्यायाबद्दल उचित आदर कसा दाखवला?

११ दावीद आणि बथशेबाच्या प्रकरणात, त्यांची मृत्यूची शिक्षा कमी करण्याआधी, त्यांच्या पापांची क्षमा होणे महत्त्वाचे होते. पापांची क्षमा करण्याचा अधिकार यहोवाने इस्राएली न्यायाधिशांना दिला नव्हता. जर या न्यायाधिशांना हे प्रकरण हाताळायला दिले असते तर त्यांच्या जवळ या दोघांना मृत्यूची शिक्षा ठोठावण्याव्यतिरिक्‍त दुसरा पर्याय उरला नसता. कारण नियमशास्त्रातच तशी आज्ञा होती. परंतु, यहोवाने दावीदाबरोबर करार केला असल्यामुळे यहोवाला, दावीदाचे पाप क्षमा करण्यासाठी काही आधार आहे किंवा नाही हे पाहायचे होते. (२ शमुवेल ७:१२-१६) म्हणूनच, “जगाचा न्यायाधीश” यहोवा देव जो “हृदयाची पारख” करतो त्याने हे प्रकरण स्वतः हाताळायचे ठरवले. (उत्पत्ति १८:२५; १ इतिहास २९:१७) यहोवा देव दावीदाचे हृदय पाहू शकत होता, त्याच्या पश्‍चात्तापाचा अस्सलपणा मोजू शकत होता आणि त्याला क्षमा करू शकत होता.

१२. पापी मानव देवाच्या दयेचा फायदा कसा करून घेऊ शकतात?

१२ वारशाने मिळालेल्या पापाच्या वेतनातून यहोवा आपली सुटका शक्य करून जी दया दाखवतो ती त्याच्या न्यायाच्या सुसंगतेत आहे. न्यायाचा भंग न करता पापांची क्षमा शक्य करण्याकरता यहोवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त याचे खंडणी बलिदान देऊन सर्वात महान दया दाखवली. (मत्तय २०:२८; रोमकर ६:२२, २३) वारशाने मिळालेल्या पापाची शिक्षा असलेल्या मृत्यूपासून देवाची दया आपल्याला वाचवू शकते; तर या दयेचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर आपण देवाच्या ‘पुत्रावर विश्‍वास’ ठेवला पाहिजे.—योहान ३:१६, ३६.

दयाळू व न्याय्य देव

१३, १४. देवाची दया त्याच्या न्यायाच्या परिणामांना संतुलित करते का? समजावून सांगा.

१३ यहोवाची दया त्याच्या न्यायाच्या स्तराचा भंग करीत नसली तरी, त्याच्या दया दाखवण्यावर त्याचा परिणाम होतो का? दयेमुळे त्याच्या न्यायाची तीव्रता कमी होते का? नाही, असे होत नाही.

१४ संदेष्टा होशेयद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना असे सांगितले: “मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन, धर्माने व न्यायाने, ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन.” (होशेय २:१९) या शब्दांवरून हे स्पष्ट दिसते, की यहोवा आपले इतर गुण आणि न्याय यांच्या सामंज्यसात दया दाखवतो. यहोवा “दयाळू व कृपाळू, . . . अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा, पण शिक्षेपासून सूट न देणारा देव आहे.” (निर्गम ३४:६, ७, NW) यहोवा देव, दयाळू आणि न्याय्य आहे. त्याच्याविषयी बायबलमध्ये म्हटले आहे: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (अनुवाद ३२:४) देवाची दया जशी परिपूर्ण तसाच त्याचा न्याय देखील परिपूर्ण आहे. कोणताही गुण दुसऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ नाही किंवा कोणत्याही गुणाला दुसऱ्‍या गुणाचे परिणाम संतुलित करावे लागत नाहीत. तर, दोन्ही गुण एकमेकांच्या अगदी परिपूर्णपणे सुसंगत आहेत.

१५, १६. (क) देवाचा न्याय निष्ठूर नाही, हे कशावरून दिसते? (ख) यहोवा जेव्हा सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणावर न्यायदंड बजावेल तेव्हा त्याचे उपासक कोणती खात्री बाळगू शकतात?

१५ यहोवाचा न्याय निष्ठूर नाही. न्यायाचा सहसा कायद्याशी संबंध असतो आणि न्यायदंड देताना सहसा पात्र असलेल्या अपराध्यांना शिक्षा द्यावी लागते. परंतु, जेव्हा देव न्याय करतो तेव्हा जे पात्र आहेत त्यांचे तारण देखील होऊ शकते. उदाहरणार्थ, सदोम व गमोरा या दुष्ट शहरांचा नाश केला जात होता तेव्हा कुलपिता लोट व त्याच्या दोन मुलींना वाचवण्यात आले.—उत्पत्ति १९:१२-२६.

१६ यहोवा जेव्हा सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणावर न्यायदंड बजावेल तेव्हा, ज्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत” अशा खऱ्‍या उपासकांचा “मोठा लोकसमुदाय” वाचेल, अशी आपल्याला खात्री आहे. अशाप्रकारे हा मोठा लोकसमुदाय “मोठ्या संकटातून [बाहेर]” येईल.—प्रकटीकरण ७:९-१४.

आपण दयाळू का असले पाहिजे?

१७. दयाळू असण्याचे महत्त्वाचे कारण काय आहे?

१७ यहोवा आणि येशू ख्रिस्त यांची उदाहरणे आपल्याला, खरी दया काय आहे हे शिकवतात. आपण दयाळू का असले पाहिजे याचे एक महत्त्वाचे कारण नीतिसूत्रे १९:१७ यात दिले आहे: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” एकमेकांबरोबर दयाळूपणे व्यवहार करून आपण जेव्हा यहोवा देवाचे आणि त्याच्या पुत्राचे अनुकरण करतो तेव्हा यहोवा देवाला आनंद वाटतो. (१ करिंथकर ११:१) इतरांनाही दयाळू असण्याचे उत्तेजन दिले जाते कारण आपण जेव्हा इतरांशी दयाळूपणे वागतो तेव्हा तेही आपल्याशी तसेच वागण्याची शक्यता आहे.—लूक ६:३८.

१८. आपण दयाळू असण्याचा विशेष प्रयत्न का केला पाहिजे?

१८ दया हा गुण अनेक उत्तम गुणांचे मिश्रण आहे. यात, विनम्रपणा, प्रेम, कनवाळूपणा आणि चांगुलपणा यांचा समावेश होतो. कनवाळूपणाच्या कोमल भावना किंवा सहानुभूती, या गुणांमुळे एखादी व्यक्‍ती दयाळू कार्ये करण्यास प्रवृत्त होते. यहोवा जेव्हा दया दाखवतो तेव्हा त्याचा न्यायी गुण कमकुवत होत नसला तरी तो मंदक्रोध आहे आणि अगदी सहनशीलपणे अपराध्यांना पश्‍चात्ताप करण्यास पुरेसा वेळ देतो. (२ पेत्र ३:९, १०) त्यामुळे दयेचा संबंध सहनशीलता आणि धीर यांच्याशी देखील आहे. अशारितीने, दया हा अनेक उत्तम गुणांची सांगड असलेला गुण आहे. यात देवाच्या आत्म्याच्या फळाचे विविध पैलू देखील गोवलेले आहेत. त्याअर्थी, दया या गुणाच्या चाकोरीत हे अनेक गुण संपादन केले जाऊ शकतात. (गलतीकर ५:२२, २३) आपण दयाळू असण्याचा विशेष प्रयत्न करणे खरोखरच किती महत्त्वाचे आहे!

“जे दयाळू ते धन्य”

१९, २०. कोणत्या अर्थाने दया न्यायावर विजय मिळविते?

१९ शिष्य याकोब आपल्याला सांगतो, की आपण इतरांशी नेहमीच दयाळूपणे का वागले पाहिजे. त्याने असे लिहिले: “दया न्यायावर विजय मिळविते.” (याकोब २:१३ख) यहोवाचा उपासक इतरांना दाखवत असलेल्या दयेविषयी याकोब बोलत होता. दया न्यायावर विजय मिळवते. म्हणजे, जेव्हा एका व्यक्‍तीला “आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब” द्यायची वेळ येते तेव्हा यहोवा या व्यक्‍तीची दयाळू कार्ये लक्षात घेऊन तिला आपल्या पुत्राच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर क्षमा करेल. (रोमकर १४:१२) दावीदाने बथशेबाबरोबर केलेल्या पापांबद्दल त्याला दया दाखवण्याचे एक कारण हे होते, की दावीद स्वतः एक दयाळू मनुष्य होता. (१ शमुवेल २४:४-७) पण, “ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल.” (याकोब २:१३क) म्हणूनच, ‘निर्दयी’ लोकांना अशा लोकांमध्ये गणले जाते ज्यांना देवाने “मरणास पात्र” ठरवले आहे.—रोमकर १:३१, ३२.

२० डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने असे म्हटले: “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.” (मत्तय ५:७) तेव्हा, जे देवाच्या दयेची अपेक्षा करतात त्यांना स्वतः दयाळू असले पाहिजे, हे येशूच्या शब्दांवरून किती जोरदारपणे दिसून येते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात दयाळूपणा कसा दाखवू शकतो, याची चर्चा पुढील लेखात करण्यात आली आहे. (w०७ ९/१५)

तुम्ही काय शिकलात?

• दयेचा अर्थ काय होतो?

• कोणकोणत्या मार्गांनी दया दाखवता येते?

• कोणत्या अर्थाने यहोवा दयाळू व न्यायी परमेश्‍वर आहे?

• आपण दयाळू का असले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

एका आईला जशा आपल्या बाळाबद्दल भावना असतात तशाच कोमल भावना यहोवाला गरजू लोकांबद्दल आहेत

[१२ पानांवरील चित्र]

दाविदाला दया दाखवून यहोवाने न्यायाचा भंग केला का?