व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओबद्या, योना व मीखा पुस्तकांतील ठळक मुद्दे

ओबद्या, योना व मीखा पुस्तकांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

ओबद्या, योना व मीखा पुस्तकांतील ठळक मुद्दे

“ओबद्याला झालेला दृष्टांत.” (ओबद्या १) या शब्दांनी ओबद्या आपल्या पुस्तकाची सुरुवात करतो. सा.यु.पू. ६०७ साली लिहिण्यात आलेल्या या पुस्तकात संदेष्टा ओबद्या आपल्या नावाखेरीज दुसरी कोणतीही माहिती प्रकट करत नाही. याच्या दोन शतकांपेक्षा जास्त काळाआधी योनाने आपले पुस्तक लिहून पूर्ण केले होते आणि त्यात त्याने आपल्या मिशनरी कार्यातील वैयक्‍तिक अनुभवाविषयी लिहिले. मीखा संदेष्ट्याच्या कार्याची ६० वर्षे ओबद्या व योना यांच्या मधल्या काळात येत असून ती सा.यु.पू. ७७७ पासून सा.यु.पू. ७१७ पर्यंत चालली. मीखाने स्वतःविषयी फक्‍त इतकेच सांगितले आहे की तो ‘मोरष्ट’ या गावाचा रहिवाशी असून “यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या कारकीर्दींत” त्याला परमेश्‍वराचे वचन प्राप्त झाले. (मीखा १:१) मीखा आपल्या संदेशातील मुद्द्‌यांवर भर देण्याकरता ज्या रूपकांचा वापर करतो त्यांवरून त्याची ग्रामीण पार्श्‍वभूमी लक्षात येते.

अदोमाला “कायमचे नष्ट करितील”

(ओबद्या १-२१)

अदोमाविषयी ओबद्या म्हणतो: “तू आपला भाऊ याकोब याजवर गहजब केला म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील व तुला कायमचे नष्ट करितील.” अदोमी लोकांनी अलीकडेच याकोबाचे पुत्र अर्थात इस्राएली यांच्याविरुद्ध जी हिंसाचारी कृत्ये केली, ती संदेष्ट्याच्या आठवणीत ताजी आहेत. सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी सैन्याने जेरूसलेमचा नाश केला तेव्हा अदोमी लोक ‘अलग राहिले’ आणि हल्ला करणाऱ्‍या ‘परदेश्‍यांशी’ त्यांनी संगनमत केले.—ओबद्या १०, ११.

याउलट, याकोबाच्या घराण्याचे पुनर्वसन होणार आहे. ओबद्याच्या भविष्यवाणीत असे विदीत करण्यात आले: “निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्र स्थान असा होईल.”—ओबद्या १७.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

५-८—अदोमाच्या नाशाची तुलना रात्रीच्या वेळी लुटारू आणि द्राक्षे खुडणारे येण्याशी करण्यात आली याचा काय अर्थ होतो? जर चोर अदोमात आले असते तर त्यांनी फक्‍त त्यांना जे हवे ते नेले असते. जर पीक गोळा करणारे आले असते तर त्यांनी सरवा वेचणाऱ्‍यांकरता काही पीक मागे सोडले असते. पण अदोमाचा नाश होईल तेव्हा त्याचा सगळा खजिना धुंडाळून काढला जाईल आणि ज्यांनी त्याच्यासोबत “करारमदार” केला होता तेच म्हणजे त्याचे मित्र, अर्थात बॅबिलोनी लोकच त्याला पूर्णपणे लुटतील.—यिर्मया ४९:९, १०.

१०—अदोमाला कशाप्रकारे “कायमचे नष्ट” करण्यात आले? पूर्वभाकीत करण्यात आल्याप्रमाणे अदोम राष्ट्र, अर्थात त्याचे सरकार आणि पृथ्वीवर एका विशिष्ट प्रदेशात राहणारे लोक या नात्याने ते नामशेष झाले. बॅबिलोनचा राजा नबोनिदस याने सा.यु.पू. सहाव्या शतकात अदोमवर विजय मिळवला. सा.यु.पू. चौथ्या शतकापर्यंत अदोमच्या क्षेत्रात नबायोथी राहू लागले होते आणि त्यामुळे अदोमी लोकांना यहुदीयाच्या दक्षिणी प्रदेशात आश्रय घ्यावा लागला. हे नेगेबचे क्षेत्र होते ज्याला नंतर इदोम हे नाव पडले. सा.यू. ७० साली रोमनांनी जेरूसलेमला नष्ट केल्यानंतर अदोमी लोकांचे अस्तित्त्वच नाहीसे झाले.

आपल्याकरता धडे:

३, ४. अदोमी लोक उंच डोंगर आणि खोल दऱ्‍या असलेल्या उंचसखल प्रदेशात राहात असल्यामुळे लढाईच्या दृष्टीने हा प्रदेश अगदी सोईचा होता. त्यामुळे कदाचित अदोमी लोकांनी गर्विष्ठपणे असा विचार केला असेल की आपण अगदी सुरक्षित आहोत. पण यहोवाचा न्यायदंड कोणीही चुकवू शकत नाही.

८, ९, १५. “परमेश्‍वराचा दिवस” येईल तेव्हा मानवी बुद्धी किंवा सामर्थ कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकणार नाही.—यिर्मया ४९:७, २२.

१२-१४. देवाच्या सेवकांवर आलेली कठीण परिस्थिती पाहून जे लोक आनंद करतात त्यांच्याकरता अदोमी लोकांचे इशारेवजा उदाहरण आहे. आपल्या लोकांना दिलेल्या गैरवागणुकीकडे यहोवा दुर्लक्ष करत नाही.

१७-२०. याकोबाच्या पुत्रांच्या संदर्भात दिलेली ही पुनर्स्थापनेची भविष्यवाणी सा.यु.पू. ५३७ साली जेव्हा यहुद्यांचा शेषवर्ग जेरूसलेमला परतला तेव्हा पूर्ण होण्यास सुरुवात झाली. यहोवाचे वचन नेहमी खरे ठरते. त्याच्या प्रतिज्ञांवर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

“निनवे धुळीस मिळेल”

(योना १:१–४:११)

“त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर” या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याऐवजी योना उलट दिशेला पळून जातो. “समुद्रात प्रचंड वायू” सोडून व एका ‘प्रचंड मत्स्याचा’ उपयोग करून यहोवा योनाला परत यायला लावतो आणि दुसऱ्‍यांदा त्याला अश्‍शूरी राजधानी निनवे येथे जाण्याची आज्ञा देतो.—योना १:२, ४, १७; ३:१, २.

योना निनवे शहरात प्रवेश करतो आणि सडेतोडपणे आपला संदेश घोषित करतो: “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” (योना ३:४) आपल्या प्रचार कार्यामुळे झालेला अनपेक्षित परिणाम पाहून योनाला “राग” येतो. यहोवा एका ‘तुंबीच्या वेलीचा’ उपयोग करून योनाला दया दाखवण्याविषयी धडा देतो.—योना ४:१, ६.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:३निनवे शहराचा आकार खरोखरच इतका होता का की “ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत?” होय. प्राचीन काळात निनवेत, उत्तरेकडील खोर्साबाद पासून दक्षिणेकडील निमरुडपर्यंतच्या भागात वसलेल्या इतर वस्त्यांचा समावेश होता, असे समजले जात असे. निनवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या सर्व वस्त्या चौकोनी होत्या. यांचा परीघ १०० किलोमीटर होता.

३:४—निनवेकरांना देवाचा संदेश सांगण्याकरता योनाला अश्‍शूरी भाषा शिकावी लागली असेल का? योनाला कदाचित आधीपासूनच अश्‍शूरी भाषा येत असावी किंवा चमत्कारिकरित्या त्याला या भाषेत बोलणे शक्य झाले असेल. आणखी एक शक्यता अशी आहे की कदाचित त्याने आपला संक्षिप्त संदेश इब्री भाषेत घोषित केला असेल आणि कोणीतरी त्याचे भाषांतर केले असेल. जर असे घडले असेल तर मग त्याच्या शब्दांनी त्याच्या संदेशाबद्दल आणखीनच उत्सुकता जागृत केली असेल.

आपल्याकरता धडे:

१:१-३. राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात पुरेपूर सहभाग टाळण्यासाठी मुद्दामहून दुसरे काहीतरी काम काढणे चुकीचे आहे. असे करणारा जणू देवाने नेमलेल्या कार्यापासून अंग चोरून पळ काढत असतो.

१:१, २; ३:१०. यहोवाची करूणा ही केवळ कोणत्याही एका राष्ट्रापुरती किंवा वंशापुरती अथवा लोकांच्या एखाद्या विशेष गटापुरती मर्यादित नाही. यहोवा “परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.”—स्तोत्र १४५:९.

१:१७; २:१०. एका प्रचंड माशाच्या पोटात योनाने घालवलेल्या तीन दिवस व रात्रींचा अनुभव भविष्यसूचक असून, तो येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानाकडे संकेत करतो.—मत्तय १२:३९, ४०; १६:२१.

१:१७; २:१०; ४:६. यहोवाने योनाला समुद्रातील तुफानातून सोडवले. तसेच देवाने “तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्‍त व्हावे असे केले.” आजच्या काळातही यहोवाचे उपासक आपल्या देवावर आणि त्याच्या प्रेमदयेवर भरवसा बाळगू शकतात, या खात्रीसहित की तो त्यांचे रक्षण करील आणि त्यांना संकटांतून सोडवील.—स्तोत्र १३:५; ४०:११.

२:१, २, ९, १०. यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या विनवण्यांकडे लक्ष देतो.—स्तोत्र १२०:१; १३०:१, २.

३:८, १०. यहोवा हा खरा देव आहे. पण त्याने जे संकट भाकीत केले होते त्याविषयी तो “अनुताप पावला” किंवा त्याने संकट आणण्याचा आपला इरादा बदलला आणि “ते आणिले नाही.” का? कारण निनवेचे लोक “आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे [त्याने] पाहिले.” त्याचप्रकारे आजही जर एखाद्या पापी व्यक्‍तीने खरा पश्‍चात्ताप व्यक्‍त केला तर तो देवाकडील प्रतिकूल न्यायदंड टाळू शकतो.

४:१-४. कोणताही मनुष्य देवाच्या दयेची सीमा ठरवू शकत नाही. यहोवाच्या दयाळू मार्गांची आपण कधीही टीका करता कामा नये.

४:११. निनवेच्या १,२०,००० लोकांकरता जे केले त्याप्रमाणे, यहोवा आज सहनशीलपणे सबंध पृथ्वीवर राज्याच्या संदेशाची घोषणा करवून घेत आहे. कारण “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही” अशा लोकांविषयी त्याला दया वाटते. आपल्यालाही आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल दया वाटू नये का आणि म्हणून आपण राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने सहभाग घेऊ नये का?—२ पेत्र ३:९.

‘त्यांच्या डोक्याचे टक्कल वाढवले जाईल’

(मीखा १:१–७:२०)

मीखा इस्राएल व यहुदाच्या पातकांचा पर्दाफाश करतो, त्यांच्या राजधानी शहरांच्या सर्वनाशाची भविष्यवाणी घोषित करतो आणि पुनर्स्थापनेचेही आश्‍वासन देतो. शोमरोन “शेतातील दगडांच्या ढिगारासारखे” होईल. इस्राएल व यहुदाने केलेल्या मूर्तिपूजेमुळे त्यांना “टक्कल” पडेल किंवा त्यांची लाजिरवाणी स्थिती होईल. डोक्यावर अगदी थोडेसेच मऊ केस असलेल्या “गिधाडाप्रमाणे” त्यांचे टक्कल वाढवले जाईल अर्थात त्यांना बंदिवासात पाठवले जाईल. यहोवा आश्‍वासन देतो: “हे याकोब, मी तुम्हा सर्वांना निश्‍चये एकत्र करीन.” (मीखा १:६, १६; २:१२) भ्रष्ट नेते व विद्रोही लोकांमुळे जेरूसलेमही “नासधुशीचा ढीग होईल.” पण यहोवा “त्यांस [आपल्या लोकांस] गोळा” करील. “बेथलेहेम एफ्राथा” येथून एकजण निघेल जो “इस्राएलाचा शास्ता होईल.”—मीखा ३:१२; ४:१२; ५:२.

यहोवाने इस्राएलवर अन्याय केला आहे का? त्याच्या अपेक्षा खूपच जाचक आहेत का? नाही. यहोवा आपल्या उपासकांकडून केवळ इतकीच अपेक्षा करतो की त्यांनी ‘नीतीने वागावे, आवडीने दया करावी व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालावे.’ (मीखा ६:८) पण मीखाच्या काळातले लोक इतके दुष्ट बनले आहेत की त्यांच्याजवळ येणाऱ्‍या कोणालाही ते उपद्रव व दुखापतच करतात. म्हणूनच त्यांच्याविषयी असे म्हटले आहे की “त्यांतला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांतला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे.” देव पुन्हा एकदा आपल्या लोकांना दया दाखवेल आणि “त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहांत” टाकील.—मीखा ७:४, १८, १९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१२—‘इस्राएलाचे अवशेष जमा करण्याविषयीची’ भविष्यवाणी केव्हा पूर्ण झाली? या भविष्यवाणीची पहिली पूर्णता सा.यु.पू. ५३७ साली पूर्ण झाली जेव्हा यहुदी अवशेष बॅबिलोनमधील बंदिवासातून आपल्या मायदेशी परतले. आधुनिक काळांत या भविष्यवाणीची पूर्णता ‘देवाच्या इस्राएलांवर’ झाली. (गलतीकर ६:१६) १९१९ पासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “कुरणांमधल्या कळपाप्रमाणे” एकत्रित करण्यात आले आहे. आणि विशेषतः १९३५ पासून त्यांना ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाल्यामुळे ते ‘गजबजले’ आहेत. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) ते सर्व मिळून आवेशाने खऱ्‍या उपासनेचा प्रसार करत आहेत.

४:१-४—“शेवटल्या दिवसात” यहोवा कशाप्रकारे “देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करील, [व] दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इनसाफ ठरवील?” ‘बहुत लोक’ आणि ‘बलवान राष्ट्रे’ या संज्ञा कोणत्याही राष्ट्रसमुहांना किंवा राजकीय संस्थांना सूचित करत नाहीत. तर या संज्ञा सर्व राष्ट्रांतील जे लोक यहोवाचे उपासक बनले आहेत त्यांना सूचित करतात. यहोवा आध्यात्मिक दृष्टीने न्याय करतो व त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींचा इनसाफ ठरवतो.

आपल्याकरता धडे:

१:६, ९; ३:१२; ५:२. पूर्वभाकीत करण्यात आल्याप्रमाणे सा.यु.पू. ७४० साली, मीखाच्या हयातीत शोमरोनचा अश्‍शूरी लोकांकडून नाश झाला. (२ राजे १७:५, ६) हिज्कीयाच्या राज्यादरम्यान अश्‍शूरी लोक जेरूसलेमपर्यंत आले. (२ राजे १८:१३) सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेम शहर आगीने भस्म केले. (२ इतिहास ३६:१९) भविष्यवाणीनुसार मशीहाचा “बेथलेहेम एफ्राथा” येथेच जन्म झाला. (मत्तय २:३-६) यहोवाचे वचन कधीही पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही.

२:१, २. आपण जर देवाची सेवा करण्याचा दावा करत असू, पण प्रत्यक्षात “त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यापेक्षा धनसंपत्ती मिळवण्यासाठी झटत असू तर हे अत्यंत धोकेदायक ठरू शकते.—मत्तय ६:३३; १ तीमथ्य ६:९, १०.

३:१-३, ५. यहोवा त्याच्या लोकांमधील जबाबदार लोकांकडून न्यायाने वागण्याची अपेक्षा करतो.

३:४. यहोवाने आपल्या प्रार्थनांचे उत्तर द्यावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण पापाचरण करू नये किंवा दुहेरी जीवन जगू नये.

३:८. आपल्याला सुवार्ता घोषित करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. या सुवार्तेत न्यायसंदेशांचाही समावेश आहे. केवळ यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच आपण आपल्याला नेमलेले हे कार्य साध्य करू शकतो.

५:५. मशीहाशी संबंधित असलेल्या या भविष्यवाणीतून आपल्याला हे आश्‍वासन मिळते की देवाच्या लोकांवर त्यांच्या शत्रूंचा हल्ला होतो तेव्हा “सात [पूर्णता सूचित करणारे] मेंढपाळ” आणि “आठ लोकनायक” अर्थात बरेच कार्यक्षम पुरुष यहोवाच्या लोकांचे नेतृत्त्व करण्याकरता उभे केले जातात.

५:७, ८. बऱ्‍याच लोकांकरता आजच्या काळात अभिषिक्‍त ख्रिस्ती “परमेश्‍वरापासून [येणाऱ्‍या] दहिवरासारखे” अर्थात देवाकडून मिळालेल्या आशीर्वादासारखे आहेत. कारण राज्य संदेशाची घोषणा करण्याकरता यहोवा या अभिषिक्‍त जनांचा उपयोग करत आहे. “दुसरी मेंढरे” अभिषिक्‍त जनांना प्रचार कार्यात आवेशाने पाठिंबा देण्याद्वारे लोकांना आध्यात्मिक तजेला देतात. (योहान १०:१६) इतरांना खरा तजेला देणाऱ्‍या या कार्यात सहभागी होणे हा खरोखर किती मोठा बहुमान आहे!

६:३, ४. आपण यहोवा देवाचे अनुकरण करून दयाळू व सहानुभूतीशील बनले पाहिजे. ज्यांच्यासोबत जमवून घेणे कठीण जाते किंवा जे आध्यात्मिकरित्या दुर्बल आहेत त्यांनाही आपण दयेने व सहानुभूतीने वागवले पाहिजे.

७:७. या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात आपल्याला निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा आपण खचून जाता कामा नये. उलट मीखाप्रमाणे आपण ‘देवाची वाट पाहत राहिले पाहिजे.’

७:१८, १९. यहोवा ज्याप्रमाणे आपल्या चुकांची क्षमा करण्यास तयार आहे त्याचप्रमाणे आपणही आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना क्षमा करण्यास तयार असले पाहिजे.

‘यहोवाच्या नावाने चालत’ राहा

जे देवाविरुद्ध व त्याच्या लोकांविरुद्ध लढतात त्यांना ‘कायमचे नष्ट केले जाईल.’ (ओबद्या १०) पण जर आपण यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष देऊन ‘कुमार्गापासून वळालो’ तर यहोवाचा क्रोध आपल्यावर येणार नाही. (योना ३:१०) या “शेवटल्या काळी” खऱ्‍या उपासनेला खोट्या धर्माहून उंच केले जात आहे आणि आज्ञाधारक जन त्याकडे लोटत आहेत. (मीखा ४:१; २ तीमथ्य ३:१) म्हणूनच आपण हा निश्‍चय करू या, की आपण “यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.”—मीखा ४:५, पं.र.भा.

ओबद्या, योना व मीखा या पुस्तकांतून खरोखरच आपल्याला किती मोलाचे धडे मिळाले आहेत! ही पुस्तके २,५०० वर्षांपेक्षा जास्त काळाआधी लिहिण्यात आलेली असूनही त्यांतील संदेश आजही ‘सजीव व सक्रिय’ आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०७ ११/१)