“त्याच्या निश्चयी वृत्तीचे मला कौतुक वाटे”
“त्याच्या निश्चयी वृत्तीचे मला कौतुक वाटे”
जर्मन लेखक व १९९९ सालच्या नोबेल साहित्य पारितोषिक विजेता, गुंतर ग्रॉस यांनी २००६ साली आपली आत्मकथा प्रकाशित केली. या आत्मकथेत त्यांनी सांगितले, की त्यांना एसएस (शुट्सस्टॅफेल) अर्थात हिट्लरच्या सुरक्षा बलाच्या लष्करी शाखेत भरती करण्यात आले होते. याच पुस्तकात, ते एका माणसाविषयी सांगतात, ज्याच्या वागणुकीची त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पडली की साठ वर्षे उलटून गेल्यानंतरही ते अजून त्याला विसरलेले नाहीत. हा माणूस छळ सोसावा लागला तरी आपल्या विश्वासाला खंबीरपणे चिकटून राहिला.
फ्रॅन्कफर्टर ॲल्जेमाईन सायतुंग या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत ग्रॉस यांनी, शस्त्र उचलण्यास नकार देणाऱ्या या असाधारण मनुष्याची आठवण काढली. ग्रॉस म्हणाले, की हा मनुष्य “त्या काळच्या नात्झीवाद, कम्युनिझम, समाजवाद किंवा इतर कोणत्याही प्रचलित मताचा अनुयायी नव्हता. तो एक यहोवाचा साक्षीदार होता.” ग्रॉसना या साक्षीदाराचे नाव आठवत नाही पण त्यांनी त्याचे नाव, “आम्ही-असल्या-गोष्टी-करत-नाही” असे ठेवले. यहोवाच्या साक्षीदारांच्या संशोधकांनी या मनुष्याची ओळख पटवली आहे. त्यांचे नाव योआकिम ॲल्फरमन होते. त्यांना वारंवार अपमानास्पद रितीने मारहाण करण्यात आली आणि नंतर अंधारकोठडीची शिक्षा देण्यात आली. पण ॲल्फरमन खंबीर राहिले. शेवटपर्यंत ते शस्त्र उचलण्यास तयार झाले नाहीत.
ग्रॉस म्हणतात, “त्याच्या निश्चयी वृत्तीचे मला कौतुक वाटे. मी विचार करायचो, की हा एवढे सगळे कसे सहन करू शकतो?” ॲल्फरमन यांना देवाच्या आज्ञांविरुद्ध कार्य करायला लावण्याचा बऱ्याच काळपर्यंत प्रयत्न केल्यानंतर शेवटी फेब्रुवारी, १९४४ साली त्यांना श्टूटहोफ यातना शिबिरात पाठवण्यात आले. १९४५ सालच्या एप्रिल महिन्यात सर्व कैद्यांना सुटका मिळाली. अशारितीने, ॲल्फरमन युद्धाच्या भयानक काळातून जिवंत बचावून १९९८ साली मृत्यू होईपर्यंत यहोवाचे विश्वासू साक्षीदार राहिले.
ॲल्फरमन हे जर्मनी व नात्झी अंमलाखाली असलेल्या इतर देशांतील एकूण १३,४०० साक्षीदारांपैकी होते ज्यांना आपल्या धार्मिक विश्वासांकरता छळ सहन करावा लागला. बायबलमधील मार्गदर्शनाचे पालन करून ते राजकीय व्यवहारांत तटस्थ राहिले व त्यांनी शस्त्र उचलण्यास नकार दिला. (मत्तय २६:५२; योहान १८:३६) जवळजवळ ४,२०० साक्षीदारांना यातना शिबिरांत पाठवण्यात आले आणि त्यांपैकी १,४९० जणांचा मृत्यू झाला. आजही, त्या साक्षीदारांनी घेतलेल्या निश्चयी भूमिकेविषयी जाणून बरेच लोक प्रभावित होतात. हे लोक स्वतः साक्षीदार नसले तरीही साक्षीदारांच्या खंबीरतेचे ते कौतुक करतात. (w०७ १०/१५)
[३२ पानांवरील चित्र]
योआकिम ॲल्फरमन