व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेणे

‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेणे

‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेणे

“आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.”—१ करिंथकर २:१०.

१. बायबलमधील कोणत्या सत्यांविषयी शिकल्यावर नव्या विद्यार्थ्यांना अत्यानंद होतो?

आपण पहिल्यांदा सत्य शिकलो तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता हे आपल्यापैकी बहुतेकजणांना आठवत असेल. यहोवाचे नाव किती अर्थपूर्ण आहे, त्याने दुःखाला अनुमती का दिली आहे, काहीजण स्वर्गात का जातात आणि विश्‍वासू मानवजातीकरता भविष्यात काय राखून ठेवले आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजले. कदाचित त्याआधीही आपण बायबलचा अभ्यास केला असेल, पण तरीसुद्धा या सर्व गोष्टी जशा आज बहुतेकजणांना माहीत नाहीत तशाच त्या आपल्यापासूनही लपलेल्याच होत्या. आपली स्थिती समुद्राच्या पाण्याखालचे पोवळे, खडक व फुलांनी बहरलेल्या झाडाप्रमाणे वाटणारे अनेमोन प्राणी पाहू इच्छिणाऱ्‍या मनुष्यासारखी होती. योग्य साधनांशिवाय त्याला पाण्याखालच्या सुंदर वस्तू नीट दिसत नाहीत. पण पाण्यात बुडी मारणाऱ्‍यांचा खास चष्मा लावल्यावर किंवा काचेचे तळ असलेल्या बोटीत बसल्यावर त्याला पहिल्यांदा पाण्याखालचे रंगीबेरंगी पोवळे, मासे, व इतर आकर्षक जीव दिसतात तेव्हा त्याला अतिशय आनंद होतो. त्याचप्रकारे, कोणीतरी आपल्याला शास्त्रवचनांतील सत्य समजून घेण्यास मदत करू लागल्यावर आपल्याला पहिल्यांदा ‘देवाच्या गहन गोष्टींची’ झलक मिळाली.—१ करिंथकर २:८-१०.

२. देवाच्या वचनाचा शोध घेणे कधी संपणार नाही, असे का?

पण बायबलमधील सत्याची केवळ एक झलक पाहून आपण समाधान मानावे का? ‘देवाच्या गहन गोष्टी’ या संज्ञेत देवाच्या बुद्धीचे आकलन होण्याचा अर्थ समाविष्ट आहे. ही बुद्धी इतरांकरता लपलेली आहे पण ख्रिश्‍चनांना मात्र ती पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केली जाते. (१ करिंथकर २:७) देवाच्या बुद्धीला सीमा नाहीत आणि तिचा शोध घेणे अतिशय आनंददायक ठरू शकते! ईश्‍वरी बुद्धीच्या मार्गांविषयी आपल्याला सर्वकाही माहीत झाले आहे अशी स्थिती कधीही येणार नाही. पण जर आपण ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ निरंतर शोध घेत राहिलो, तर बायबलमधील मूलभूत सत्ये शिकल्यावर आपण जो आनंद अनुभवला होता तो आपल्याजवळ सर्वकाळ राहू शकतो.

३. आपल्या विश्‍वासांमागची कारणे समजून घेण्याची काय गरज आहे?

या ‘गहन गोष्टी’ समजून घेणे का जरूरीचे आहे? आपण काय काय मानतो केवळ हेच नव्हे तर आपण त्या गोष्टी का मानतो, अर्थात, आपल्या विश्‍वासांमागची कारणे समजून घेतल्यामुळे आपला विश्‍वास भक्कम होतो. बायबल आपल्याला आपली “तर्कशक्‍ती” वापरून ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्या’ असे सांगते. (रोमकर १२:१, NW; २) यहोवा आपल्याला विशिष्ट पद्धतीने आचरण करायला का सांगतो हे समजून घेतल्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. म्हणूनच, ‘गहन गोष्टींचे’ ज्ञान आपल्याला अधार्मिक कृत्यांत गुंतण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्याची शक्‍ती देते आणि “चांगल्या कामात तत्पर” राहण्याची प्रेरणा देते.—तीत २:१४.

४. बायबलचा अभ्यास करण्यात काय समाविष्ट आहे?

गहन गोष्टी समजून घेण्याकरता अभ्यास करण्याची गरज आहे. पण एखाद्या पुस्तकातील माहिती वरवर वाचणे म्हणजे अभ्यास नव्हे. तर अभ्यास म्हणजे, विशिष्ट माहितीचे बारकाईने परीक्षण करणे आणि आपल्याला आधीपासूनच जे ज्ञान आहे त्याच्याशी ही माहिती कशी जुळते हे पडताळून पाहणे. (२ तीमथ्य १:१३) जर अमुक विधान केले आहे तर त्यामागची कारणे कोणती हे समजून घेणे यात समाविष्ट आहे. बायबल अभ्यास करताना आपण जे शिकलो त्याचा, सुज्ञपणे निर्णय घेण्याकरता व इतरांना मदत करण्याकरता आपण कसा उपयोग करू शकतो याविषयी मननही केले पाहिजे. तसेच, ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित व उपयोगी’ असल्यामुळे, आपल्या अभ्यासात आपण ‘परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाचा’ समावेश केला पाहिजे. (२ तीमथ्य ३:१६, १७; मत्तय ४:४) बायबल अभ्यास करणे सोपे निश्‍चितच नाही, त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते! पण ते आनंददायक ठरू शकते आणि देवाच्या ‘गहन गोष्टी’ समजायला खूप कठीण नाहीत.

यहोवा नम्र जनांना समजशक्‍ती देतो

५. ‘देवाच्या गहन गोष्टी’ कोण समजू शकतो?

शालेय जीवनात कदाचित तुम्ही अभ्यासात इतके हुशार नसाल, किंवा कदाचित तुम्हाला अभ्यासाची सवय नसेल. तरीपण, ‘देवाच्या गहन गोष्टी’ आपल्या समजण्यापलीकडे आहेत असा कधीही निष्कर्ष काढू नका. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान, यहोवाने आपल्या उद्देशाविषयीचे ज्ञान विद्वानांना व बुद्धिवंतांना नव्हे, तर निरक्षर व अज्ञानी जनांना दिले जे देवाच्या सेवकाकडून नम्रपणे शिकून घेण्यास तयार होते. मोठमोठ्या विद्यालयांत शिकलेल्यांच्या तुलनेत हे लोक अजाण बालकांसारखे होते. (मत्तय ११:२५; प्रेषितांची कृत्ये ४:१३) ‘आपणावर प्रीती करणाऱ्‍यांसाठी देवाने [जे] सिद्ध केले आहे’ त्याविषयी प्रेषित पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांना असे लिहिले: “देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.”—१ करिंथकर २:९, १०.

६. १ करिंथकर २:१० चा अर्थ काय होतो?

देवाचा आत्मा कशाप्रकारे “सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि” शोध घेतो? प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला सत्य प्रकट करण्याऐवजी यहोवा आपल्या आत्म्याच्या माध्यमाने आपल्या संघटनेचे मार्गदर्शन करतो. ही संघटना देवाच्या लोकांच्या एकजूट मंडळीला बायबलचे ज्ञान देते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; इफिसकर ४:३-६) सबंध जगात सर्व मंडळ्यांमध्ये बायबल अभ्यासाचा एकसारखाच कार्यक्रम पाळला जातो. अनेक वर्षांपासून या मंडळ्यांमध्ये बायबलमधील निरनिराळ्या शिकवणींविषयी ज्ञान दिले जात आहे. पवित्र आत्मा मंडळीच्या माध्यमाने लोकांना ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्याकरता आवश्‍यक असलेली मनोवृत्ती विकसित करण्यास मदत करतो.—प्रेषितांची कृत्ये ५:३२.

‘देवाच्या गहन गोष्टींत’ कशाचा समावेश आहे?

७. पुष्कळ लोक ‘देवाच्या गहन गोष्टी’ का समजू शकत नाहीत?

‘गहन गोष्टी’ म्हणजे समजायला कठीण असणारे विषय, असे समीकरण करणे चुकीचे आहे. ‘देवाच्या गहन गोष्टींचे’ ज्ञान बहुतेक लोकांपासून लपलेले आहे हे खरे आहे. पण हे ज्ञान संपादन करणे फार कठीण असल्यामुळे नव्हे. तर सैतान लोकांची फसवणूक करत असल्यामुळे व त्यांना यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे पुरवलेली मदत स्वीकारण्यापासून परावृत्त करत असल्यामुळे ही परिस्थिती आहे.—२ करिंथकर ४:३, ४.

८. पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्राच्या तिसऱ्‍या अध्यायात उल्लेख केलेल्या गहन गोष्टी काय आहेत?

पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रातील तिसऱ्‍या अध्यायातून आपल्याला कळते की ‘देवाच्या गहन गोष्टींमध्ये’ अशा सत्यांचा समावेश आहे की जी सत्ये यहोवाच्या लोकांपैकी बहुतेकांना चांगल्याप्रकारे समजलेली आहेत. उदाहरणार्थ, प्रतिज्ञा केलेल्या संततीची ओळख, मानवांमधून काहीजणांना स्वर्गीय जीवनाकरता निवडले जाणे, व मशीहाचे राज्य. पौलाने लिहिले: “ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रगट करून दाखविलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानास कळविण्यात आले नव्हते, ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधु, आमच्या बरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.” पौलाने म्हटले की त्याला यासाठीच नेमण्यात आले होते, की त्याने “देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे.”—इफिसकर ३:५-९.

९. ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेणे हा एक मोठा बहुमान का आहे?

पौलाने पुढे आणखी खुलासा केला की कशाप्रकारे “देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपति व अधिकारी ह्‍यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे” अशी देवाची इच्छा होती. (इफिसकर ३:१०) ख्रिस्ती मंडळीसोबतच्या व्यवहारांतून यहोवाची जी बुद्धी प्रकट होते तिचे निरीक्षण केल्याने व ती समजून घेतल्याने देवदूतांनाही फायदा होतो. देवदूतांनाही ज्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्या समजून घेणे हा आपल्याकरता एक मोठा बहुमानच नाही का? (१ पेत्र १:१०-१२) यानंतर पौल म्हणतो की आपण ख्रिस्ती विश्‍वासाची ‘रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयाचा’ प्रयत्न केला पाहिजे. (इफिसकर ३:१०, ११, १८, १९) तर आता आपण अशा काही गहन गोष्टींच्या उदाहरणांवर विचार करू या, की ज्यांमुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.

गहन गोष्टींची काही उदाहरणे

१०, ११. शास्त्रवचनांनुसार येशू, देवाच्या स्वर्गीय ‘स्त्रीच्या’ संततिचा मुख्य भाग केव्हा झाला?

१० उत्पत्ति ३:१५ यात उल्लेख करण्यात आलेल्या देवाच्या स्वर्गीय ‘स्त्रीच्या’ संततिचा मुख्य भाग येशू आहे हे तर आपल्याला माहीत आहे. पण आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण पुढील प्रश्‍न विचारू शकतो: ‘येशूने प्रतिज्ञात संततीची भूमिका केव्हा घेतली? पृथ्वीवर मानवाच्या रूपात येण्याअगोदर, त्याचा मानवी रूपात जन्म झाला तेव्हा, त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा, की त्याचे पुनरुत्थान झाले तेव्हा?’

११ देवाने वचन दिले होते, की त्याच्या संघटनेचा स्वर्गीय भाग, ज्याला भविष्यवाणीत “स्त्री” म्हणण्यात आले होते, तो एक संतती उत्पन्‍न करील व ही संतती सर्पाचे डोके फोडील. पण हजारो वर्षे उलटली तरीसुद्धा देवाच्या स्त्रीने सैतान व त्याची कार्ये नष्ट करू शकेल अशी कोणतीही संतती उत्पन्‍न केली नाही. परिणामस्वरूप, यशयाच्या भविष्यवाणीत तिला ‘मूल न झालेली वंध्या’ व ‘दुःखित मनाची स्त्री’ म्हणण्यात आले. (यशया ५४:१, ५, ६) कालांतराने बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला. पण ‘हा माझा पुत्र आहे’ अशी घोषणा यहोवाने येशूच्या बाप्तिस्म्यानंतरच केली. त्यावेळी त्याला आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले आणि तो देवाचा आत्मिक पुत्र बनला. (मत्तय ३:१७; योहान ३:३) अशारितीने स्त्रीच्या ‘संततिचा’ मुख्य भाग प्रकट झाला. नंतर येशूच्या अनुयायांनाही पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले व तेही देवाचे पुत्र बनले. यहोवाची “स्त्री” जी बऱ्‍याच काळापासून, ‘मूल न झालेल्या वंध्येसारखी होती’ ती आता “आनंदाने गजर” करू शकत होती.—यशया ५४:१; गलतीकर ३:१९.

१२, १३. पृथ्वीवरील सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दान’ बनतो हे कोणत्या शास्त्रवचनांनुसार कळते?

१२ आपल्याला प्रकट करण्यात आलेल्या गहन गोष्टींचे एक दुसरे उदाहरण म्हणजे मानवजातीतून १,४४,००० जणांना निवडण्याचा देवाचा उद्देश. (प्रकटीकरण १४:१, ४) येशूने म्हटले होते की त्याच्या परिवाराला यथाकाळी “खावयास” देण्यासाठी एका “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” नेमले जाईल. आपण असे मानतो की हा विश्‍वासू व बुद्धिमान दास, कोणत्याही विशिष्ट वेळी पृथ्वीवर जिवंत असणाऱ्‍या सर्व अभिषिक्‍त जनांनी मिळून बनलेला आहे. (मत्तय २४:४५) आपले हे मानणे खरे आहे हे बायबलमधील कोणत्या शास्त्रवचनांवरून सिद्ध होते? कदाचित येशू अशा कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीबद्दल बोलत असावा का, की जो आपल्या बांधवांना आध्यात्मिक पोषणाद्वारे उत्तेजन देतो?

१३ देवाने इस्राएल राष्ट्राला संबोधून असे म्हटले: “तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.” (यशया ४३:१०) पण सा.यु. ३३ सालच्या निसान ११ रोजी येशूने इस्राएलच्या पुढाऱ्‍यांना स्पष्टपणे सांगितले की देवाने त्यांच्या राष्ट्राचा अव्हेर केला आहे व आता ते त्याचे निवडलेले सेवक नाहीत. त्याने म्हटले: “देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्याला ते दिले जाईल.” इस्राएल लोकांच्या समुदायाला त्याने म्हटले: “पाहा! तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्तय २१:४३, पं.र.भा.; २३:३८) यहोवाचे सेवक किंवा दास या नात्याने इस्राएलाचे घराणे ना विश्‍वासू होते ना बुद्धिमान. (यशया २९:१३, १४) त्याच दिवशी काही वेळानंतर जेव्हा येशूने “विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण?” असे विचारले तेव्हा तो खरे तर असे विचारू इच्छित होता, की ‘इस्राएलच्याऐवजी आता कोणते बुद्धिमान राष्ट्र देवाचा विश्‍वासू दास बनेल?’ प्रेषित पेत्राने याचे उत्तर दिले. त्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला उद्देशून म्हटले: “तुम्ही . . . ‘पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा.’” (१ पेत्र १:४; २:९) ते आत्मिक राष्ट्र, अर्थात, ‘देवाचे इस्राएल’ यहोवाचा नवा दास बनले. (गलतीकर ६:१६) प्राचीन इस्राएलचे सर्व सदस्य मिळून ज्याप्रमाणे एक “सेवक” होते त्याचप्रकारे कोणत्याही काळात पृथ्वीवरील सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ बनतो. देवाच्या या ‘दासाकरवी’ आपल्याला आध्यात्मिक अन्‍न “खावयास” दिले जाते याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!

आनंददायक वैयक्‍तिक अभ्यास

१४. बायबल अभ्यास केवळ वरवरचे वाचन नव्हे, तर अतिशय आनंददायक अनुभव का आहे?

१४ बायबलमधून जेव्हा आपल्याला एखादा नवीन मुद्दा स्पष्टपणे समजतो तेव्हा आपल्याला आनंद होत नाही का? आपल्याला आनंद होतो, कारण या नव्या ज्ञानामुळे आपल्या विश्‍वासाला पुष्टी मिळते. म्हणूनच, केवळ वरवरचे वाचन नव्हे, तर बायबलचा अभ्यास अतिशय आनंददायक असतो. तुम्ही जेव्हा ख्रिस्ती प्रकाशने वाचता तेव्हा वाचनासोबतच आपल्या विचारशक्‍तीचाही उपयोग करा. स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘या विषयावर मला आधीपासूनच जे माहीत होते त्याच्याशी हे स्पष्टीकरण कशाप्रकारे जुळते? या लेखात जे समजावण्यात आले आहे त्याला आधार देण्याकरता बायबलमधली आणखी कोणती शास्त्रवचने किंवा तर्कवाद देता येतील?’ जर अतिरिक्‍त संशोधन करण्याची गरज असेल, तर ज्या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला हवे आहे तो लिहून ठेवा आणि त्याला तुमच्या अभ्यासाच्या पुढच्या उपक्रमाचा विषय बनवा.

१५. बायबल अभ्यासातील कोणते उपक्रम आनंददायक असू शकतात व यांचा कायमस्वरूपी लाभ कसा मिळू शकतो?

१५ नवे ज्ञान मिळवण्याचा आनंद अनुभवण्याकरता तुम्ही आपल्या वैयक्‍तिक अभ्यासात कशाप्रकारचे उपक्रम हाती घेऊ शकता? देवाने मानवजातीच्या कल्याणाकरता काळाच्या ओघात त्यांच्यासोबत जे निरनिराळे करार बांधले त्या सर्व करारांचे सखोल परीक्षण अतिशय उद्‌बोधक ठरू शकेल. येशू ख्रिस्ताकडे संकेत करणाऱ्‍या सर्व भविष्यवाण्यांचा किंवा बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पुस्तकांतील प्रत्येक वचनाचा एकेक करून अभ्यास केल्यानेही तुमचा विश्‍वास नक्कीच दृढ होईल. तसेच, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी) हे प्रकाशन जर तुमच्या भाषेत उपलब्ध असेल, तर त्याच्या आधारावर यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक इतिहासाचा अभ्यास केल्यानेही तुमच्या विश्‍वासात भर पडेल. * टेहळणी बुरूज मासिकाच्या गतकाळातील अंकांत “वाचकांचे प्रश्‍न” जर तुम्ही पडताळून पाहिलेत तर बायबलमधील विशिष्ट शास्त्रवचने अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. या लेखांत जे निष्कर्ष सादर केले आहेत ते कोणत्या शास्त्रवचनांच्या आधारावर आहेत याकडे विशेष लक्ष द्या. यामुळे तुमच्या ‘ज्ञानेंद्रियांना’ सराव मिळेल व चांगल्यावाईटाचा फरक करण्याची तुमची क्षमता सुधारेल. (इब्री लोकांस ५:१४) अभ्यास करताना, तुमच्या बायबलमध्ये किंवा एका वेगळ्या वहीत मुद्दे लिहून ठेवा जेणेकरून ते तुम्हाला भविष्यातही उपयोगी पडतील आणि त्यांच्या साहाय्याने तुम्ही दुसऱ्‍यांनाही मदत करू शकाल.

लहान मुलांना बायबल अभ्यासाचा आनंद अनुभवण्यास शिकवा

१६. लहान मुलांना देखील तुम्ही बायबल अभ्यासाची गोडी कशी लावू शकता?

१६ आईवडील आपल्या मुलांची आध्यात्मिक भूक वाढवण्याकरता बरेच काही करू शकतात. मुलांना गहन गोष्टी समजणार नाहीत असा लगेच निष्कर्ष काढू नका. जर तुम्ही कौटुंबिक बायबल अभ्यासाच्या तयारीकरता मुलांना एखाद्या विषयावर संशोधन करण्यास सांगितले असेल तर त्यांना कायकाय शिकायला मिळाले याविषयी विचारा. कौटुंबिक अभ्यासादरम्यान काल्पनिक दृश्‍यांच्या साहाय्याने तुम्ही लहान मुलांना आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्याकरता व आपण जे शिकलो आहोत ते खरे आहे हे सिद्ध करून दाखवण्याकरता निरनिराळ्या प्रश्‍नांची उत्तरे कशी देता येतील हे शिकवू शकता. तसेच, बायबलमधील निरनिराळ्या प्रदेशांविषयी शिकवण्याकरता व आठवड्याच्या बायबल अभ्यासादरम्यान आलेल्या माहितीवर प्रकाश टाकण्याकरता तुम्ही “उत्तम देश पाहा” * (इंग्रजी) या माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता.

१७. वैयक्‍तिक बायबल अभ्यास उपक्रम हाती घेतल्यावर आपण संतुलन का राखले पाहिजे?

१७ वैयक्‍तिक अभ्यासाचे उपक्रम अतिशय रोचक असू शकतात. त्यावेळी ते आपल्या विश्‍वासाला बळकट करतात. पण वैयक्‍तिक अभ्यासामुळे मंडळीच्या सभांची नेहमीची तयारी राहून जाणार नाही याची काळजी घ्या. यहोवा आपल्याला मंडळीच्या सभांमधूनही ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने शिक्षण देतो. पण अतिरिक्‍त संशोधन केल्यामुळे तुम्हाला सभांमध्ये, उदाहरणार्थ, मंडळीच्या पुस्तक अभ्यासात किंवा ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत बायबलच्या ठळक मुद्द्‌यांच्या चर्चेत अर्थपूर्ण अभिप्राय व्यक्‍त करण्यास मदत मिळेल.

१८. ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ अभ्यास करण्याकरता आपण करत असलेली मेहनत व्यर्थ का ठरणार नाही?

१८ देवाच्या वचनाचा सखोल वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या जवळ येण्यास साहाय्य मिळेल. अशाप्रकारचा अभ्यास किती महत्त्वपूर्ण आहे याविषयी सांगताना बायबल म्हणते: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:१२) म्हणूनच, आध्यात्मिक गोष्टींविषयी अधिक स्पष्टपणे समजून घेण्याकरता कितीही मेहनत घ्यावी लागली तरी ती कधीच व्यर्थ ठरणार नाही हे आठवणीत असू द्या. जो परिश्रमाने शोध घेत राहील त्याला बायबल असे आश्‍वासन देते की: “देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:४, ५. (w०७ ११/१)

[तळटीपा]

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 16 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ‘देवाच्या गहन गोष्टींमध्ये’ कशाचा समावेश आहे?

• आपण गहन गोष्टींचा अभ्यास करण्याचे कधीही का थांबवू नये?

• ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्याचा आनंद अनुभवण्याची संधी सर्व ख्रिश्‍चनांकरता आहे असे आपण का म्हणू शकतो?

• ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ पुरेपूर फायदा मिळवण्याकरता तुम्ही काय करू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]