व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फक्‍त आजच्यापुरते जगावे का?

फक्‍त आजच्यापुरते जगावे का?

फक्‍त आजच्यापुरते जगावे का?

“मी कधीच भविष्याचा विचार करत नाही. भविष्य यायला उशीर लागत नाही.” हे शब्द सुविख्यात शास्त्रज्ञ ॲल्बर्ट आइंस्टाईन यांचे आहेत. बरेच लोक या शब्दांना आपली सहमती दर्शवतात. काहीजण म्हणतात, “भविष्याची चिंता कशाला करायची?” किंवा तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की “आला दिवस काढायचा.” “फक्‍त आजच्यापुरता विचार करायचा” किंवा “उद्याचं उद्या पाहू.”

ही एकंदर मनोवृत्ती काही नवीन नाही. प्राचीन काळात एपिक्युरीयन तत्त्वज्ञान्यांचे हेच ब्रीदवाक्य होते, “खा, प्या, मौज करा. बाकीचे सगळे व्यर्थ आहे.” प्रेषित पौलाच्या काळातल्या काही लोकांचेही हेच मत होते. ते म्हणायचे, “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथकर १५:३२) त्यांचा असा समज होता की आपल्या हातात केवळ सध्याचे अल्पायुष्य आहे. त्यामुळे या जीवनाचा पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे.

पण पृथ्वीवर राहणाऱ्‍या लाखो लोकांकरता सध्याचे जीवन म्हणजे कधी न संपणारा, त्रासदायक संघर्ष आहे. खा, प्या व मौज करा हे ब्रीदवाक्य मानून ते आपले जीवन जगू शकत नाहीत. “उद्या” म्हणजे भविष्यातही त्यांना कोणताही आशेचा किरण दिसत नाही. मग त्यांनी का म्हणून अशा असह्‍य, आशाहीन भविष्याचा विचार करावा?

उद्याकरता योजना करणे?

ज्यांची परिस्थिती इतकी वाईट नाही त्यांनाही भविष्याकरता योजना करणे निरर्थक वाटते. काहीजण म्हणतात, “कशाला काळजी करायची?” ते असा तर्क करतात की भविष्याकरता योजना करणाऱ्‍यांचे चांगल्यात चांगले बेतही निष्फळ ठरतात. शेवटी निराशाच त्यांच्या पदरी पडते. प्राचीन काळातल्या कुलपिता ईयोबाच्या सर्व योजना जेव्हा “निष्फळ” झाल्या आणि त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या आनंदी भविष्याची सर्व साधने नष्ट झाली तेव्हा तो अगदी विषण्ण झाला.—ईयोब १७:११; उपदेशक ९:११.

स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न्स याने आपल्या परिस्थितीची तुलना शेतात राहणाऱ्‍या एक लहानशा उंदराशी केली. बर्न्स याने एकदा शेत नांगरताना नकळत या उंदराचे घरटे उद्ध्‌वस्त केले. त्या बिचाऱ्‍या उंदरावर जणू आभाळच कोसळले आणि तो आपला जीव घेऊन सैरावैरा धावत सुटला. तेव्हा कवीच्या मनात विचार आला की ‘खरंच, कितीदा आपलीही या उंदरासाखीच अवस्था होते. आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटनांमुळे कधीकधी आपल्या अगदी विचारपूर्वक आखलेल्या योजनाही व्यर्थ ठरतात आणि आपण काहीएक करू शकत नाही.’

त्याअर्थी, भविष्याकरता योजना करणेच व्यर्थ आहे का? भविष्याकरता पुरेशा योजना न केल्यामुळे कधीकधी, वादळे किंवा इतर नैसर्गिक दुर्घटना घडतात तेव्हा अतिशय नाशकारक परिणाम भोगावे लागू शकतात. उदाहरणार्थ, अलीकडे आलेले कॅटरिना वादळ कोणीही थांबवू शकत नव्हते हे तर कबूल आहे. पण भविष्याचा विचार करून जर योग्य समायोजन करण्यात आले असते तर या वादळात सापडलेल्या शहराचे व त्यातील रहिवाशांचे बरेचसे नुकसान टाळता आले नसते का?

तुम्हाला काय वाटते? फक्‍त आजच्यापुरते जगणे आणि उद्याचा विचार न करणे खरेच तर्काला धरून आहे का? या विषयावर पुढच्या लेखात मांडलेले मुद्दे कृपया विचारात घ्या. (w०७ १०/१५)

[३ पानांवरील चित्रे]

“खा, प्या, मौज करा. बाकीचे सगळे व्यर्थ आहे.”