व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे वचन कधीही टळत नाही

यहोवाचे वचन कधीही टळत नाही

यहोवाचे वचन कधीही टळत नाही

“आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहोशवा २३:१४.

१. यहोशवा कोण होता आणि आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्याने काय केले?

तोअतिशय उत्साही व निडर असा सैन्यप्रमुख होता. तसेच तो एक विश्‍वासू व सत्त्वशील मनुष्य होता. तो मोशेसोबत चालला आणि यहोवाने इस्राएल राष्ट्राला भयावह अरण्यातून दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात नेण्याकरता या मनुष्याला स्वतः निवडले. आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात या अतिशय सन्मानित मनुष्याने, अर्थात यहोशवाने, इस्राएलच्या वडीलधाऱ्‍यांना एक अतिशय भावस्पर्शी निरोपाचे भाषण दिले. निश्‍चितच हे भाषण ऐकणाऱ्‍या सर्वांच्या विश्‍वासाला त्यामुळे पुष्टी मिळाली असेल. हेच तुमच्याबाबतीतही घडू शकते.

२, ३. यहोशवाने इस्राएलच्या वडीलधाऱ्‍यांना उद्देशून भाषण दिले तेव्हा इस्राएलची स्थिती काय होती आणि यहोशवाने काय म्हटले?

बायबलमध्ये वर्णन केलेले हे दृश्‍य डोळ्यापुढे उभे करा: “इस्राएलांना परमेश्‍वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला; आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला; तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएलांना म्हणजे त्यांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अमलदार ह्‍यांना बोलावून म्हटले, मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे.”—यहोशवा २३:१, २.

यहोशवा आता जवळजवळ ११० वर्षांचा झाला होता. देवाच्या लोकांच्या इतिहासातील एका अतिशय रोमांचक काळात त्याचे आयुष्य गेले होते. त्याने देवाची महत्कृत्ये आपल्या डोळ्यांनी पाहिली होती आणि यहोवाच्या अनेक प्रतिज्ञांची पूर्णता होताना पाहिली होती. म्हणूनच स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर तो अगदी पक्क्या विश्‍वासाने असे म्हणाला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.

४. यहोवाने इस्राएल लोकांना कोणती आश्‍वासने दिली होती?

यहोशवाच्या जीवनकाळात यहोवाने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी सिद्धीस गेल्या होत्या? यहोवाने इस्राएलांना दिलेल्या तीन आश्‍वासनांचा आपण विचार करू या. पहिले, हे की देव त्यांना गुलामीतून सोडवील. दुसरे, तो त्यांचे संरक्षण करील. आणि तिसरे, तो त्यांचा संभाळ करील. यहोवाने आधुनिक काळातही आपल्या लोकांना अशाचप्रकारची आश्‍वासने दिली आहेत आणि आपण ही आश्‍वासने पूर्ण झालेली पाहिली आहेत. पण आधुनिक काळात यहोवाने काय केले आहे याविषयी चर्चा करण्याअगोदर आपण यहोशवाच्या काळात त्याने काय केले होते हे पाहू.

यहोवा आपल्या लोकांची सुटका करतो

५, ६. यहोवाने इस्राएल लोकांची ईजिप्तमधून कशाप्रकारे सुटका केली आणि यावरून काय दिसून आले?

ईजिप्तमधील बिकट दास्यामुळे इस्राएलांनी आक्रोश करीत देवाचा धावा केला तेव्हा यहोवाने त्यांच्याकडे लक्ष दिले. (निर्गम २:२३-२५) जळणाऱ्‍या झुडपाजवळ यहोवाने मोशेला म्हटले: “[माझ्या लोकांस] मिसरांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशांत . . . त्यांस घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.” (निर्गम ३:८) यहोवाने हे कशाप्रकारे घडवून आणले हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे खरोखर किती रोमांचक असेल! फारोने इस्राएलांना ईजिप्तमधून जाऊ देण्यास नकार दिला तेव्हा मोशेने त्याला सांगितले की देव नाईल नदीच्या पाण्याचे रक्‍त करेल. यहोवाचे शब्द व्यर्थ ठरले नाहीत. नाईल नदीच्या पाण्याचे खरोखरच रक्‍त झाले. पाण्यातले मासे मेले आणि नदीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही. (निर्गम ७:१४-२१) फारो तरीही अडून राहिला. तेव्हा यहोवाने आणखी नऊ पीडा आणल्या व प्रत्येक पीडा आणण्याआधी त्याने तिचे वर्णन करून सांगितले. (निर्गम, अध्याय ८-१२) दहाव्या पीडेने ईजिप्तच्या ज्येष्ठ पुत्रांचा बळी घेतला तेव्हा फारोने इस्राएलांना जाण्याचा हुकूम दिला. आणि अशारितीने शेवटी इस्राएल लोक ईजिप्तमधून बाहेर पडले!—निर्गम १२:२९-३२.

ईजिप्तमधून सुटका झाल्यामुळे यहोवाने इस्राएलास आपले निवडलेले राष्ट्र म्हणून स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे यहोवा हा आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करणारा देव आहे व त्याचे वचन कधीही निष्फळ होत नाही हे सिद्ध झाले. तसेच राष्ट्रांच्या देवतांपेक्षा यहोवा सामर्थ्यशाली असल्याचेही सिद्ध झाले. देवाच्या लोकांची कशाप्रकारे सुटका झाली याविषयी वाचताना आपला विश्‍वास दृढ होतो. प्रत्यक्ष ते अनुभवणे किती अद्‌भुत असेल याची कल्पना करा! यहोशवाने आपल्या डोळ्यांनी पाहिले की खरोखरच यहोवा “सर्व पृथ्वीवर परात्पर” आहे.—स्तोत्र ८३:१८.

यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो

७. यहोवाने इस्राएल लोकांचे फारोच्या सैन्यापासून कशाप्रकारे संरक्षण केले?

यहोवाने दिलेल्या दुसऱ्‍या आश्‍वासनाविषयी काय? यहोवाने असे आश्‍वासन दिले होते की तो आपल्या लोकांची ईजिप्तमधून सुटका करून त्यांना प्रतिज्ञात देशात प्रवेश करू देईल. तुम्हाला आठवत असेल, फारोने क्रोधित होऊन आपल्या बलशाली सैन्यासोबत इस्राएलांचा पाठलाग केला. त्यांच्याजवळ शेकडो रथ होते. इस्राएल लोक जेव्हा डोंगर व समुद्र यांच्यामध्ये अडकले तेव्हा गर्विष्ठ फारोला आपला विजय निश्‍चित आहे असे वाटले असेल. पण आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी देवाने हस्तक्षेप केला. त्याने दोन्ही छावण्यांच्या मधोमध एक ढग आणले. ईजिप्त सैन्याच्या बाजूला अंधार तर इस्राएलांच्या बाजूला प्रकाश होता. त्या ढगामुळे ईजिप्शियन लोकांना पुढे येता आले नाही. इकडे मोशेने आपली काठी समुद्रावर उगारली तेव्हा तांबडा समुद्र दुभंगला. यामुळे एकाचवेळी इस्राएलांकरता पळ काढण्याचा मार्ग व ईजिप्शियन लोकांकरता एक पाश तयार झाला. यहोवाने फारोच्या बलशाली सैन्याचा नाश केला आणि आपल्या लोकांचा पराभव होऊ दिला नाही.—निर्गम १४:१९-२८.

८. (क) अरण्यात व (ख) प्रतिज्ञात देशात प्रवेश केल्यानंतर इस्राएल लोकांचे कशाप्रकारे संरक्षण करण्यात आले?

तांबडा समुद्र पार केल्यावर इस्राएल लोक अरण्यात भटकू लागले. या अरण्याचे वर्णन ‘आग्या सापांनी व विंचवांनी व्यापलेले घोर व भयानक रान आणि रुक्ष व निर्जल भूमी’ असे करण्यात आले आहे. (अनुवाद ८:१५) तेथेही यहोवाने आपल्या लोकांचे संरक्षण केले. आणि प्रतिज्ञात देशात प्रवेश करताना काय घडले? शक्‍तिशाली कनानी सैन्यांनी त्यांना विरोध केला. पण यहोवाने यहोशवाला म्हटले: “ऊठ व ह्‍यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्‍या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाहि टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरहि मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (यहोशवा १:२, ५) यहोवाचे हे शब्दही व्यर्थ ठरले नाहीत. सुमारे सहा वर्षांत यहोशवाने ३१ राजांचा पराभव केला आणि प्रतिज्ञात देशातील मोठाले प्रदेश काबीज केले. (यहोशवा १२:७-२४) यहोवाच्या संरक्षणाशिवाय व साहाय्याशिवाय हे विजय मिळवणे शक्य झाले नसते.

यहोवा आपल्या लोकांचा संभाळ करतो

९, १०. यहोवाने अरण्यात आपल्या लोकांचा कशाप्रकारे संभाळ केला?

आता तिसरे आश्‍वासन विचारात घ्या. ते असे, की यहोवा आपल्या लोकांचा संभाळ करील. ईजिप्तमधून सुटका झाल्यानंतर काही काळातच देवाने इस्राएल लोकांना असे वचन दिले: “पाहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्‍नवृष्टि करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे.” आणि खरोखरच देवाने ‘आकाशातून अन्‍न’ पाठवले. “इस्राएल लोक ते पाहून एकमेकांस म्हणाले, ‘हे काय?’” तो मान्‍ना होता, अर्थात यहोवाने त्यांना वचन दिलेले आकाशातील अन्‍न.—निर्गम १६:४, १३-१५.

१० अरण्यात ४० वर्षांपर्यंत, यहोवाने इस्राएल लोकांची काळजी वाहिली. त्यांना अन्‍न व पाणी पुरवले. इतकेच काय तर त्याने त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण होऊ दिले नाहीत की त्यांचे पाय सुजू दिले नाहीत. (अनुवाद ८:३, ४) यहोशवाने हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिले. यहोवाने आश्‍वासन दिले होते त्याप्रमाणे त्याने आपल्या लोकांची सुटका केली, त्यांचे संरक्षण केले, व त्यांचा संभाळ केला.

आधुनिक काळात सुटका

११. ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे १९१४ साली काय घडले आणि त्यावेळी कशाची वेळ आली होती?

११ आपल्या काळाविषयी काय? शुक्रवार ऑक्टोबर २, १९१४ रोजी सकाळी, चार्ल्स टेझ रस्सल, जे त्या काळी बायबल विद्यार्थ्यांचे नेत्तृत्व करत होते, ते ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील बेथेलगृहातील डायनिंग रूममध्ये आले. ते खूप खुषीत आहेत असे वाटत होते. सर्वांना “गुड मॉर्निंग” म्हणून खाली बसण्याअगोदर त्यांनी आनंदाने ही घोषणा केली: “विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती झाली आहे; त्यांच्या अधिपतींचा काळ संपला आहे!” पुन्हा एकदा या विश्‍वाचा सार्वभौम यहोवा याची आपल्या लोकांच्या वतीने कार्य करण्याची वेळ आली होती. आणि त्याने खरोखरच कार्य केले!

१२. देवाच्या लोकांची १९१९ साली कशापासून सुटका झाली आणि यामुळे कशाकरता मार्ग मोकळा झाला?

१२ याच्या केवळ पाच वर्षांनंतर यहोवाने आपल्या लोकांची ‘मोठ्या बाबेलच्या’ अर्थात खोट्या धर्माच्या सामर्थ्यशाली जागतिक साम्राज्याच्या दास्यातून सुटका केली. (प्रकटीकरण १८:२) आपल्यापैकी फार कमी जण असे आहेत की ज्यांनी ती रोमांचक सुटका प्रत्यक्ष अनुभवली आहे. तरीपण त्याचे परिणाम आपण प्रत्यक्ष पाहात आहोत. यहोवाने खऱ्‍या उपासनेस पुनर्स्थापित केले आणि त्याची उपासना करू इच्छिणाऱ्‍यांना संघटित केले. हे यशया संदेष्ट्याने पुढील शब्दांत भाकीत केले होते: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्टांतील लोक लोटतील.”—यशया २:२.

१३. तुम्ही यहोवाच्या लोकांमध्ये कशाप्रकारे वृद्धी झालेली पाहिली आहे?

१३ यशयाचे शब्द निष्फळ ठरले नाहीत. १९१९ साली अभिषिक्‍त शेषवर्गाने निर्भीडपणे प्रचारकार्याची जागतिक मोहीम हाती घेतली. यामुळे खऱ्‍या देवाची उपासना जगभरात उंचावण्यात आली. १९३० च्या दशकात “दुसरी मेंढरे” गोळा केली जात आहेत हे स्पष्ट झाले. (योहान १०:१६) आधी शेकडो, मग हजारो आणि आता तर लाखो लोक खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करत आहेत! प्रेषित योहानाला देण्यात आलेल्या एका दृष्टान्तात त्यांचे वर्णन ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा मोठा लोकसमुदाय’ या शब्दांत करण्यात आले आहे. (प्रकटीकरण ७:९) तुम्ही आपल्या जीवनकाळात काय काय घडताना पाहिले आहे? तुम्ही सत्य शिकायला सुरुवात केली तेव्हा पृथ्वीवर किती यहोवाचे साक्षीदार होते? आज यहोवाची सेवा करणाऱ्‍यांची संख्या ६७,००,००० पेक्षा जास्त झाली आहे. आपल्या लोकांची मोठ्या बाबेलमधून सुटका करून यहोवाने आज जगभरात दिसणाऱ्‍या या रोमांचक वृद्धीचा मार्ग मोकळा केला.

१४. भविष्यात कोणती सुटका घडून येणार आहे?

१४ आणखी एक सुटका यहोवा भविष्यात घडवून आणणार आहे. आणि तेव्हा जगाच्या पाठीवर राहणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीचा त्यात समावेश असेल. तेव्हा, यहोवा आपल्या सामर्थ्याचे अतिशय आश्‍चर्यकारक प्रदर्शन करेल. त्याचा विरोध करणाऱ्‍या सर्वांना मार्गातून दूर करून तो आपल्या लोकांची सुटका करेल व त्यांना एका नव्या जगात नेईल जेथे नीतिमत्त्व वास करेल. दुष्टाईचा अंत होऊन मानव इतिहासातील सर्वात आनंददायक काळाची सुरुवात होताना पाहणे किती अद्‌भुत असेल!—प्रकटीकरण २१:१-४.

आपल्या काळात यहोवाचे संरक्षण

१५. आधुनिक काळात यहोवाच्या लोकांना त्याच्या संरक्षणाची गरज का भासली आहे?

१५ आपण पाहिल्याप्रमाणे यहोशवाच्या काळात इस्राएल लोकांना यहोवाच्या संरक्षणाची गरज होती. आजच्या आधुनिक काळात यहोवाच्या लोकांची परिस्थिती काही वेगळी आहे का? मुळीच नाही! येशूने आपल्या अनुयायांना आधीच सांगितले होते: “तुमचे हाल करण्याकरिता [लोक] तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) आतापर्यंत यहोवाच्या साक्षीदारांना बऱ्‍याच देशांत कडा विरोध व क्रूर छळणूक सहन करावी लागली आहे. तरीपण यहोवा आपल्या लोकांच्या पाठीशी आहे हे स्पष्ट झाले आहे. (रोमकर ८:३१) त्याचे वचन आपल्याला आश्‍वासन देते की ‘आपल्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार’ राज्य प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य थांबवू शकणार नाही.—यशया ५४:१७.

१६. यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो याचा कोणता पुरावा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे?

१६ जगाचा द्वेष असूनही, यहोवाच्या लोकांची संख्या वाढतच गेली आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची २३६ देशांत भरभराट होत आहे. जे आपले कार्य थांबवू इच्छितात किंवा आपल्याला नष्ट करू इच्छितात त्यांच्यापासून संरक्षण करण्याकरता यहोवा आपल्यासोबत आहे याचाच हा एक खात्रीलायक पुरावा आहे. तुम्हाला अशा शक्‍तिशाली राजकीय किंवा धार्मिक पुढाऱ्‍यांची नावे आठवतात का, ज्यांनी तुमच्या जीवनकाळादरम्यान देवाच्या लोकांवर अत्याचार केले? त्यांचे काय झाले? आज ते कोठे आहेत? मोशे व यहोशवाच्या काळातल्या फारोप्रमाणेच, त्यांच्यापैकी बहुतेकजण नामशेष झाले आहेत. पण देवाच्या आधुनिक काळातील सेवकांपैकी जे मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिले त्यांच्याविषयी काय? ते यहोवाच्या स्मृतीत सुरक्षित आहेत. यापेक्षा सुरक्षित ठिकाण कोणते असू शकते? खरोखर आपल्या लोकांचे संरक्षण करण्याविषयी यहोवाचे शब्द खरे ठरले आहेत.

यहोवा आज आपल्या लोकांचा संभाळ करतो

१७. यहोवाने आध्यात्मिक अन्‍नासंबंधी कोणते आश्‍वासन दिले?

१७ यहोवाने अरण्यात आपल्या लोकांचा संभाळ केला आणि आजही तो त्यांचा संभाळ करत आहे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांकरवी’ आपल्याला आध्यात्मिक पोषण मिळते. (मत्तय २४:४५) कित्येक शतकांपर्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या आध्यात्मिक सत्यांचे ज्ञान आपल्याला मिळते. दानिएलाला देवदुताने सांगितले होते: “तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धि होईल.”—दानीएल १२:४.

१८. आज खरे ज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असे का म्हणता येते?

१८ आज आपण अंतसमयात राहात आहोत आणि खऱ्‍या ज्ञानाची खरोखरच वृद्धी झाली आहे. सबंध जगात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे सत्याची आवड धरणाऱ्‍यांना खऱ्‍या देवाचे व त्याच्या उद्देशांचे अचूक ज्ञान दिले जात आहे. बायबलच्या प्रती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच बायबलमध्ये असलेल्या मौल्यवान सत्यांविषयी समजून घेण्यास मदत करणारी प्रकाशने देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, बायबल नेमके काय शिकवते? या बायबल अभ्यासाकरता तयार करण्यात आलेल्या प्रकाशनाची अनुक्रमणिका पाहा. * यातील निरनिराळ्या अध्यायांपैकी काही अध्यायांची शीर्षके पुढीलप्रमाणे आहेत: “देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?,” “मृत कोठे आहेत?,” “देवाचे राज्य काय आहे?” व “देव दुःख काढून का टाकत नाही?” मानवांनी हजारो वर्षांपासून अशाप्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आज या प्रश्‍नांची उत्तरे सहज उपलब्ध आहेत. कित्येक शतकांपर्यंत लोक अंधारात होते आणि ख्रिस्ती धर्मजगताने त्यांना खोटे सिद्धान्त शिकवले तरीसुद्धा देवाचे वचन टिकून राहिले व यहोवाची सेवा करण्यास उत्सुक असणाऱ्‍या सर्वांना त्याद्वारे आध्यात्मिक पोषण मिळाले.

१९. तुम्ही कोणत्या प्रतिज्ञांची पूर्णता पाहिली आहे आणि यावरून तुम्ही कोणत्या निष्कर्षावर पोचला आहात?

१९ नक्कीच, आपण जे प्रत्यक्ष पाहिले आहे त्याच्या आधारावर आपण असे म्हणू शकतो की “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यहोवा आपल्या लोकांची सुटका करतो, त्यांचे संरक्षण करतो व त्यांचा संभाळ करतो. तुम्ही देवाच्या कोणत्याही अशा प्रतिज्ञेचा उल्लेख करू शकता का की जी त्याच्या नियुक्‍त वेळी पूर्ण झाली नाही? कोणीही करू शकत नाही. म्हणूनच देवाच्या विश्‍वासार्ह वचनावर भरवसा ठेवण्यात सुज्ञपणा आहे.

२०. आपण भविष्याकडे आत्मविश्‍वासाने का पाहू शकतो?

२० भविष्याविषयी काय? यहोवाने आपल्याला सांगितले आहे की आपल्यापैकी बहुतेकजण पृथ्वीवर एका सुंदर नंदनवनात राहण्याची आशा बाळगू शकतात. आपल्यापैकी काही जणांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा आहे. आपली आशा कोणतीही असो, पण आपण सर्वांनी यहोशवासारखे शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे. तो दिवस अवश्‍य येईल जेव्हा आपली आशा वास्तवात उतरेल. मग आपणही यहोवाच्या सर्व प्रतिज्ञांकडे मागे वळून पाहताना असे म्हणू: “त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (w०७ ११/१)

[तळटीप]

^ परि. 18 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• यहोशवाने यहोवाच्या कोणत्या आश्‍वासनांची पूर्तता होताना पाहिली?

• तुम्ही देवाच्या कोणत्या आश्‍वासनांची पूर्तता होताना पाहिली आहे?

• देवाच्या वचनाबद्दल आपण कोणती खात्री बाळगू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्रे]

यहोवा आजही आपल्या लोकांची काळजी वाहतो