व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“रुपे माझे आहे, सोने माझे आहे”

“रुपे माझे आहे, सोने माझे आहे”

“रुपे माझे आहे, सोने माझे आहे”

सा.यु.पू. सहाव्या शतकात पारसचा राजा कोरेश याने देवाच्या लोकांना बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍त केले. तेव्हा त्यांच्यापैकी हजारो जण यहोवाचे मंदिर जे पडीक अवस्थेत होते, त्याची डागडुजी करण्यासाठी जेरूसलेमला परत आले. त्या परत आलेल्या यहुद्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती आणि त्यांच्या पुनर्बांधणीच्या कार्याला आसपासच्या प्रदेशांतील लोकांचा विरोध होता. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प कधी पूर्ण होऊ शकेल का अशी बांधणाऱ्‍यांपैकी काहीजणांना शंका वाटत होती.

हाग्गय नावाच्या आपल्या एका संदेष्ट्याच्या माध्यमाने यहोवाने बांधकाम करणाऱ्‍या यहुद्यांना आश्‍वासन दिले की तो त्यांच्या पाठीशी आहे. देवाने म्हटले: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.” शिवाय, प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल की नाही याविषयीही बांधकाम करणाऱ्‍यांना काळजी वाटत होती, पण हाग्गयने त्यांना हा संदेश सांगितला: “रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” (हाग्गय २:७-९) हाग्गयने हे रोमांचक शब्द लोकांच्या कानावर घातल्यावर, पाच वर्षांच्या आत मंदिराच्या बांधकामाचा प्रकल्प पूर्ण झाला.—एज्रा ६:१३-१५.

अलीकडच्या काळात, यहोवाच्या उपासनेशी संबंधित मोठे प्रकल्प हाती घेताना, हाग्गयच्या त्याच शब्दांनी देवाच्या लोकांना प्रेरणा दिली. १८७९ साली जेव्हा विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाने या मासिकाचे प्रकाशन सुरू केले तेव्हा झायन्स वॉचटावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्‌स प्रेझेंस हे नाव असलेल्या त्या मासिकात पुढील विधान छापण्यात आले: “‘झायन्स वॉचटावरला’ खुद्द यहोवाचा पाठिंबा असल्याचे आम्ही मानतो. या कारणास्तव आम्ही साहाय्याकरता कधीही मनुष्यांसमोर हात पसरणार नाही किंवा याचना करणार नाही. ‘पर्वतांवरील सर्व सोने व रुपे माझे आहे’ असे म्हणणारा ज्या दिवशी आवश्‍यक निधी पुरवण्याचे थांबवेल त्या दिवशी आम्ही समजू की हे प्रकाशन बंद करण्याची वेळ आता आली आहे.”

आजपर्यंत या मासिकाचे प्रकाशन कधीही थांबवण्यात आले नाही. पहिल्या अंकाच्या ६,००० प्रती फक्‍त इंग्रजीत छापण्यात आल्या होत्या. आज दर अंकाच्या सरासरी २,८५,७८,००० प्रती, १६१ भाषांत छापल्या जातात. * आणि सावध राहा! या मासिकाच्या सरासरी ३,४२,६७,००० प्रती ८१ भाषांत छापल्या जातात.

यहोवाचे साक्षीदार असे अनेक प्रकल्प हाती घेतात, ज्यांचा मुख्य उद्देश टेहळणी बुरूज प्रकाशित करण्यामागच्या उद्देशासारखाच आहे. तो उद्देश म्हणजे, या विश्‍वाचा सार्वभौम प्रभू या नात्याने यहोवाचे गौरव करणे व त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणे. (मत्तय २४:१४; प्रकटीकरण ४:११) १८७९ साली या मासिकात जो विश्‍वास प्रदर्शित करण्यात आला होता तोच विश्‍वास यहोवाचे साक्षीदार आजही बाळगतात. त्यांना खात्री आहे की त्यांच्या कार्याला देवाचा पाठिंबा आहे आणि कोणत्याही प्रकल्पावर त्याचा आशीर्वाद असल्यास त्याकरता निधीही उपलब्ध केला जाईल. पण, व्यावहारिक दृष्टिकोनातून यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य कशाप्रकारे चालते? आणि सबंध जगात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी ते कोणत्या प्रकारचे प्रकल्प हाती घेत आहेत?

कार्याचा खर्च कसा चालतो?

सार्वजनिक प्रचार कार्य करत असताना अनेकदा यहोवाच्या साक्षीदारांना हा प्रश्‍न विचारला जातो, की “तुम्हाला या कामासाठी पगार मिळतो का?” या प्रश्‍नाचे उत्तर आहे की नाही, त्यांना पगार मिळत नाही. ते आपला वेळ स्वेच्छेने, विनामूल्य देतात. कृतज्ञतेने प्रेरित होऊन हे सुवार्तिक यहोवाबद्दल व एका उत्तम भविष्याबद्दल लोकांशी बोलण्याकरता कित्येक तास खर्च करतात. देवाने त्यांच्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल आणि सुवार्तेच्या संदेशाने त्यांच्या जीवनावर व एकंदर दृष्टिकोनावर जो परिणाम केला आहे त्याबद्दल त्यांना कदर वाटते. त्यामुळे या चांगल्या गोष्टींचा फायदा ते इतरांनाही देऊ इच्छितात. असे करताना ते येशूच्या या तत्त्वाचे पालन करत आहेत, की “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्तय १०:८) यहोवा व येशू यांच्याविषयी साक्ष देण्याची इच्छा असल्यामुळे ते लोकांना, अगदी त्यांच्यापासून दूरदूरच्या परिसरांत राहणाऱ्‍या लोकांनासुद्धा आपल्या विश्‍वासांविषयी सांगण्याकरता स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करतात.—यशया ४३:१०; प्रेषितांची कृत्ये १:८.

प्रचार कार्याचा व्याप फार मोठा आहे. शिवाय हे कार्य साध्य करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी माध्यमे—मुद्रणालये, कार्यालये, संमेलन गृहे, मिशनरी गृहे इत्यादी चालवण्याकरता बराच खर्च होतो. याकरता निधी कोठून येतो? या सर्व कार्यांकरता लागणारा निधी ऐच्छिक अनुदानांतून मिळतो. यहोवाच्या साक्षीदारांत, संघटनेच्या कार्याला आर्थिक हातभार लावण्याकरता मंडळीच्या सदस्यांना कोणत्याही प्रकारची बळजबरी केली जात नाही. तसेच प्रकाशने वितरीत करतानासुद्धा ते त्याची किंमत घेत नाहीत. जर कोणाला त्यांच्या शैक्षणिक कार्याकरता काही अनुदान देण्याची इच्छा असेल तर साक्षीदार ते आनंदाने स्वीकारतात. प्रचार कार्य जगभरात करण्याकरता ज्या निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जातात त्यांपैकी केवळ एक—भाषांतर याविषयी आपण पाहूया.

४३७ भाषांतून प्रकाशने

कित्येक दशकांपासून यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने जगातल्या सर्वाधिक अनुवाद केलेल्या प्रकाशनांपैकी आहेत. पत्रिका, माहितीपत्रके, मासिके, व पुस्तके यांचे ४३७ भाषांतून भाषांतर करण्यात आले आहे. अर्थात प्रचारकार्याशी संबंधित इतर कोणत्याही कार्याप्रमाणेच भाषांतराकरताही बऱ्‍याच साधनसंपत्तीची गरज आहे. पण भाषांतर प्रक्रियेत नेमके काय केले जाते?

यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांचे संपादक जेव्हा कोणत्याही इंग्रजी लेखातील मजकूर निश्‍चित करतात तेव्हा ते लेख सबंध जगभरात निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षित अनुवादकांच्या गटांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवले जातात. प्रत्येक भाषांतर गट कोणत्याही एका भाषेतील प्रकाशने तयार करण्याचे काम पाहतो. त्या भाषेत किती व कोणकोणती प्रकाशने भाषांतरीत केली जातात, तसेच ती भाषा प्रत्यक्षात किती सोपी किंवा अवघड आहे याच्या आधारावर प्रत्येक भाषांतर गटात ५ ते २५ सदस्य असू शकतात.

भाषांतर केलेले साहित्य तपासले जाते व वाचून काढले जाते. याचा उद्देश हाच असतो की इंग्रजी मजकुरातील विचार त्या विशिष्ट भाषेत जास्तीत जास्त अचूक व स्पष्ट पद्धतीने व्यक्‍त करता यावेत. असे करताना निरनिराळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. इंग्रजी मजकुरात जर काही विशेष संज्ञा वापरण्यात आल्या असतील तर त्या मजकुराचे अचूक भाषांतर करण्याकरता अनुवादकांना मूळ भाषेत (इंग्रजी किंवा द्वितीय मूळ भाषा जसे की फ्रेंच, रशियन किंवा स्पॅनिश) तसेच स्वतःच्या भाषेतही बरेच संशोधन करावे लागू शकते. उदाहरणार्थ, सावध राहा! मासिकातील लेखात एखाद्या शास्त्रीय किंवा ऐतिहासिक विषयाची चर्चा केलेली असल्यास त्यासाठी बरेच संशोधन करावे लागते.

बरेच अनुवादक यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरांत एकतर पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कार्य करतात. इतर जण ती विशिष्ट भाषा ज्या प्रदेशात बोलली जाते तेथे राहून कार्य करतात. या अनुवादकांना त्यांच्या कामासाठी कोणताही आर्थिक मोबदला दिला जात नाही. पूर्णवेळ कार्य करणाऱ्‍या भाषांतरकारांना फक्‍त राहण्याचे ठिकाण व जेवण तसेच वरखर्च म्हणून एक लहानशी रक्कम पुरवली जाते. सबंध जगात जवळजवळ २,८०० साक्षीदार अनुवादक म्हणून कार्य करत आहेत. सध्या यहोवाच्या साक्षीदारांची ९८ शाखा दप्तरे भाषांतराचे काम पाहतात. यांपैकी काही शाखा दप्तरांतच भाषांतर गट आहेत व काही दप्तरे इतर ठिकाणी असलेल्या गटांच्या कार्याची देखरेख करतात. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, रशिया येथील शाखा दप्तर २३० पूर्णवेळ अथवा अर्धवेळ कार्य करणाऱ्‍या भाषांतरकारांच्या कामावर देखरेख करते. हे भाषांतरकार ३० पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषांतून अनुवाद करतात. यांपैकी काही भाषा रशियाशिवाय इतर ठिकाणी फारशा प्रचलित नाहीत, उदाहरणार्थ कूवॅश, ऑसेशियन व उईगर.

भाषांतराचा दर्जा सुधारणे

नवी भाषा शिकण्याचा ज्याने प्रयत्न केला आहे तो तुम्हाला सांगू शकेल, की गुंतागुंतीचे विचार दुसऱ्‍या भाषेत व्यक्‍त करणे ही काही साधी गोष्ट नसते. मूळ भाषेतील माहिती व विचार दुसऱ्‍या एखाद्या भाषेत अचूकपणे व्यक्‍त करणे आणि त्याच वेळी ते इतक्या सहजतेने व्यक्‍त करणे की वाचकाला हे भाषांतर आहे असे कळूही न देणे. हे ध्येय साध्य करणे खरोखर एक कला आहे. ही कला अवगत होण्याकरता नव्या भाषांतरकारांना अनेक वर्षे लागतात. आणि यहोवाचे साक्षीदार याकरता त्यांना सातत्याने प्रशिक्षण देतात. कधीकधी प्रशिक्षक भाषांतर गटांना भेट देऊन, भाषांतराचे तंत्र तसेच निरनिराळे कंप्युटर प्रोग्रॅम्स कसे वापरायचे यासंबंधी शिक्षण देतात.

या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, निकाराग्वा येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तराने असे वृत्त दिले: “पहिल्यांदा, आमच्या मिस्कितो भाषांतरकारांना मेक्सिको शाखा दप्तरातून आलेल्या एका प्रशिक्षकाकडून अनुवादाच्या निरनिराळ्या पद्धती व तंत्रांविषयी शिक्षण मिळाले. यामुळे आमच्या भाषांतरकारांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत फार मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. भाषांतराच्या दर्जातही लक्षणीय सुधारणा झाली आहे.”

अंतःकरणाला स्पर्श करणारे शब्द

बायबल व बायबलवर आधारित साहित्य लोकांच्या मातृभाषेत प्रकाशित करण्याचा उद्देशच हा आहे की त्यातील माहिती त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करावी. आणि अगदी हेच घडत आहे. २००६ साली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर बल्गेरियन भाषेत प्रसिद्ध करण्यात आले तेव्हा बल्गेरिया येथील यहोवाच्या साक्षीदारांना अत्यानंद झाला. या बायबलविषयी कित्येक जणांनी बल्गेरिया शाखा दप्तराला पत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्‍त केली. मंडळीतील बांधव म्हणतात, की “आता बायबलमधली वचनं फक्‍त बुद्धीला पटत नाहीत, तर थेट अंतःकरणाला स्पर्श करतात.” सोफिया येथून एका वयस्क माणसाने असा अभिप्राय व्यक्‍त केला: “मी कित्येक वर्षांपासून बायबल वाचत आलो आहे. पण समजायला इतके सोपे, आणि अगदी हृदयाला स्पर्श करणारे दुसरे कोणतेही भाषांतर माझ्या पाहण्यात आलेले नाही.” तसेच अल्बेनियन भाषेत संपूर्ण नवे जग भाषांतर मिळाल्यानंतर अल्बेनिया येथील एका बहिणीने असे म्हटले: “अल्बेनियन भाषेत देवाचे वचन किती सुरेख वाटते! आज यहोवा आमच्या स्वतःच्या भाषेत आमच्याशी बोलतोय, हा आमच्याकरता केवढा बहुमान आहे!”

संपूर्ण बायबलचे भाषांतर करण्याकरता भाषांतर गटाला अनेक वर्षे लागू शकतात. पण, जर लाखो लोकांना यामुळे देवाचे वचन पहिल्यांदा आपल्या भाषेत खऱ्‍या अर्थाने समजून घेण्याची संधी मिळणार असेल, तर त्यांचे सर्व परिश्रम सार्थकच ठरतील, नाही का?

“आम्ही देवाचे सहकारी आहो”

सुवार्तेची परिणामकारक पद्धतीने घोषणा करण्याकरता जी बरीच कार्ये हाती घेतली जातात, त्यांपैकी भाषांतर हे एक कार्य आहे. साहित्याचे लेखन, मुद्रण, व ते निरनिराळ्या ठिकाणी पोचते करणे याव्यतिरिक्‍त यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरांत, विभागांत व मंडळ्यांमध्ये इतरही बरीच कार्ये केली जातात व या सर्व कार्यांकरता बरेच परिश्रम घ्यावे लागतात व बराच खर्चही होतो. तरीपण, हे कार्य साध्य करण्याकरता देवाचे लोक “संतोषाने पुढे होतात.” (स्तोत्र ११०:३) या कार्याकरता आपल्या परीने होईल तितके योगदान देण्यास ते आपला बहुमान समजतात. आणि असे केल्यामुळे यहोवा त्यांना आपल्या ‘सहकाऱ्‍यांमध्ये’ गणतो हा त्यांच्याकरता एक सन्मान आहे.—१ करिंथकर ३:५-९.

“रुपे माझे आहे, सोने माझे आहे” असे म्हणणारा, त्याचे कार्य साध्य करण्याकरता आपल्या आर्थिक साहाय्यास मोताद नाही हे खरे आहे. तरीपण “सर्व राष्ट्रांस” जीवनदायक सत्याचा प्रचार करण्याकरता आर्थिक साहाय्य देण्याद्वारे, यहोवाच्या नावाच्या पवित्रिकरणात सहभाग घेण्याची सुसंधी देऊन यहोवाने आपल्या सेवकांना मान दिला आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) भविष्यात पुन्हा कधीही केले जाणार नाही, अशा या कार्याला पूर्ण मनाने हातभार लावण्याची तुम्हालाही प्रेरणा होत नाही का? (w०७ ११/१)

[तळटीप]

^ परि. 5 भाषांची यादी या अंकातील पृष्ठ २ वर दिली आहे.

[२२ पानांवरील चौकट]

“ही मासिके आम्हाला गांभीर्याने विचार करायला लावतात”

एका १४ वर्षीय मुलीने यहोवाच्या साक्षीदारांच्या कॅमरून शाखा दप्तराला लिहिले: “शाळेत लागणाऱ्‍या वस्तूंचा वर्षभराचा साठा विकत घेतल्यानंतर मी मागच्या वर्षीची दोन पाठ्यपुस्तके विकली व त्याकरता मला २,५०० फ्रँक्स मिळाले. ही रक्कम आणि त्यासोबत मी साठवलेले ९१० फ्रँक्स मी अनुदान म्हणून पाठवत आहे. तुम्ही जे उत्तम कार्य करत आहात ते पुढे चालू ठेवण्याचे प्रोत्साहन मी तुम्हाला देऊ इच्छिते. टेहळणी बुरूज सावध राहा! मासिके प्रकाशित करण्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ही मासिके आम्हाला गांभीर्याने विचार करायला लावतात.”

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

अनोखे अनुदान

यहोवाच्या साक्षीदारांच्या मेक्सिको शाखा दप्तराला चिआपास राज्यात राहणाऱ्‍या मॅन्वेल नावाच्या एका सहा वर्षांच्या चिमुकल्याकडून पुढील पत्र मिळाले. त्याला अजून लिहिता येत नाही. त्यामुळे त्याच्या एका मित्राने त्याच्या वतीने हे पत्र लिहिले. मॅन्वेल म्हणतो: “माझ्या आजीने मला एक डुकरीण दिली. तिला पिलं झाली तेव्हा सर्वात चांगले पिलू निवडून मी बांधवांच्या मदतीने ते वाढवले. ते मोठे झाल्यावर त्याचे वजन १०० किलो झाले. त्याला विकल्यानंतर मला १,२५० पेसो मिळाले. हे पैसे मी अतिशय प्रेमाने आपल्याला पाठवत आहे. हे पैसे यहोवासाठी वापरा अशी मी विनंती करतो.”

[२३ पानांवरील चौकट]

‘हे बायबलचे भाषांतर करण्यासाठी वापरा’

युक्रेन येथे २००५ साली झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनांत युक्रेनियन भाषेत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर प्रसिद्ध करण्यात आले. दुसऱ्‍या दिवशी, अधिवेशनातील दानपेटीत ही लहानशी चिठ्ठी सापडली: “मी नऊ वर्षांची आहे. ग्रीक शास्त्रवचने प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. आईने माझ्या लहान भावाला व मला बसने शाळेला जाण्यासाठी हे पैसे दिले होते. पण पाऊस नसेल त्या दिवशी आम्ही पायीच शाळेला जायचो आणि असे करून हे ५० ऱ्‍हिवनिया [सुमारे ४५० रुपये] आम्ही साठवले. माझ्या भावाची व माझी इच्छा आहे की तुम्ही हे पैसे संपूर्ण बायबलचे युक्रेनियन भाषेत भाषांतर करण्याकरता वापरावेत.”

[२०, २१ पानांवरील चौकट]

दान देण्यासाठी काहीजण निवडत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील सरळ या शाखा दप्तरांना पाठवले जाऊ शकते. शाखा दफ्तरांचे पत्ते या पत्रिकेच्या पृष्ठ २ वर सापडतील. चेक असतील तर ते “वॉच टावर”ला देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तुसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजना *

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या देशात कार्य करणाऱ्‍या स्थानिक शाखा दफ्तराशी कृपया संपर्क साधावा.

धर्मादाय योजना *

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात वॉच टावर संस्थेच्या नावावर पैसे किंवा सुरक्षितता केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.

“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानांकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड * हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत. धर्मादाय योजना कार्यालयाशी थेट संपर्क साधून या माहितीपत्रकाची एक प्रत मागवता येऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses,

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka.

Telephone: (०८०) २८४६८०७२

[तळटीपा]

^ परि. 40 भारताला हे लागू होत नाही

^ परि. 42 सूचना: कराच्या बाबत असलेले नियम विविध देशांत वेगवेगळे असतील. कराच्या नियमाविषयी व योजनेविषयी मत घेण्यासाठी कृपया तुमच्या अकाऊंटटशी किंवा वकिलाशी संपर्क साधावा. शेवटचा निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा दफ्तराशी देखील संपर्क साधावा.

^ परि. 50 भारतात उपलब्ध नाही