व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सदसद्विवेकबुद्धीला प्रतिसाद देणे

सदसद्विवेकबुद्धीला प्रतिसाद देणे

सदसद्विवेकबुद्धीला प्रतिसाद देणे

“शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्‍वास न ठेवणारे ह्‍यांना काहीच शुद्ध नाही.”—तीत १:१५.

१. क्रेत येथील मंडळ्यांच्या संबंधाने पौलाने काय केले?

प्रेषित पौलाच्या तीन मिशनरी दौऱ्‍यांनंतर त्याला अटक करण्यात आली व रोमला पाठवण्यात आले. तेथे तो दोन वर्षे तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने काय केले? त्याची सुटका झाल्यानंतर एकदा तो क्रेत बेटावर तीताबरोबर गेला. तीतास त्याने असे लिहिले: “मी तुला क्रेतांत ह्‍यासाठी ठेऊन आलो की, तू अपुऱ्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे.” (तीत १:५) तीताला अशा लोकांना मदत करण्याची नेमणूक देण्यात आली होती, की ज्यांची सदसद्विवेकबुद्धी कार्य करत होती व ज्यांची कार्य करत नव्हती.

२. तीताला क्रेत बेटावर कोणती समस्या सोडवायची होती?

पौलाने तीताला मंडळीतील वडिलांच्या पात्रतांविषयी सल्ला दिल्यानंतर असे सांगितले, की “अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत.” हे लोक, ‘जे शिकवू नये ते . . . शिकवून संपूर्ण घराण्याच्या विश्‍वासाचा नाश’ करीत होते. तेव्हा तीताला त्यांना “कडकपणे” सुधारण्यास सांगण्यात आले. (तीत १:१०-१४; १ तीमथ्य ४:७) पौलाने म्हटले, की या लोकांची मने व त्यांची सदसद्विवेकबुद्धी ‘विटाळली’ होती; एका स्वच्छ कापडावर डाग पडल्यावर जसे ते कापड विटाळते तसे या लोकांची मने विटाळली होती, या अर्थाचा शब्द त्याने वापरला. (तीत १:१५) यांतील काही लोक यहुदी असावेत कारण ते “सुंता झालेल्यांपैकी” होते. आजच्या ख्रिस्ती मंडळ्या, सुंता होणे आवश्‍यक आहे असा दृष्टिकोन बाळगणाऱ्‍या लोकांमुळे विटाळलेल्या नसल्या, तरी पौलाने तीताला दिलेल्या सल्ल्यावरून आपण सदसद्विवेकबुद्धीविषयी बरेच काही शिकू शकतो.

अशुद्ध सदसद्विवेकबुद्धी असलेले

३. पौलाने तीताला सदसद्विवेकबुद्धीविषयी काय लिहिले?

पौलाने कोणत्या संदर्भात सदसद्विवेकबुद्धीचा उल्लेख केला ते पाहा. “शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्‍वास न ठेवणारे ह्‍यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धि व विवेकभाव ही विटाळलेली आहेत. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात; परंतु कृतींनी त्याला नाकारितात.” त्यामुळे त्या काळातील काहींना “विश्‍वासात खंबीर” होण्याकरता काही बदल करावे लागले. (तीत १:१३, १५, १६) शुद्ध व अशुद्ध यांतला फरक त्यांना समजत नव्हता; त्यांची सदसद्विवेकबुद्धी कार्य करीत नव्हती.

४, ५. मंडळ्यांतील काहींमध्ये कोणता दोष होता आणि याचा त्यांच्यावर कशाप्रकारे परिणाम होत होता?

दहापेक्षा अधिक वर्षांनंतर, ख्रिस्ती नियमन मंडळाने असा निष्कर्ष काढला, की खरा उपासक होण्याकरता सुंता करण्याची गरज उरली नाही. हा निर्णय त्यांनी सर्व मंडळ्यांना कळवला. (प्रेषितांची कृत्ये १५:१, २, १९-२९) तरीसुद्धा क्रेत बेटावरील काही जण ‘सुंता’ झाली पाहिजे, असे मानत होते. ते नियमन मंडळाने दिलेल्या निर्णयाचा उघडपणे विरोध करून, ‘जे शिकवू नये ते शिकवत’ होते. (तीत १:१०, ११) त्यांची विचारशैली विकृत झाली होती त्यामुळे ते अन्‍न व विधीपूर्वक शुद्धतेविषयी नियमशास्त्रातील नियमांचा पुरस्कार करीत होते. ते कदाचित, येशूच्या दिवसांतील धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे नियमशास्त्रातील नियम वाढवत असावेत व यहुदी विचारधारा आणि मानवी आज्ञांचा पुरस्कार करत असावेत.—मार्क ७:२, ३, ५, १५; १ तीमथ्य ४:३.

अशा विचारसरणीमुळे त्यांच्या न्याय व नैतिक बुद्धीवर अर्थात सदसद्विवेकबुद्धीवर विपरित परीणाम झाला. पौलाने लिहिले: विटाळलेले व विश्‍वास न ठेवणारे ह्‍यांना काहीच शुद्ध नाही.” त्यांची सदसद्विवेकबुद्धी इतकी विकृत झाली होती, की ती त्यांच्या कार्यांना मार्गदर्शन देण्याच्या व कार्यांचे परीक्षण करण्यालायक उरली नव्हती. शिवाय, ज्या गोष्टी व्यक्‍तीगत स्वरूपाच्या आहेत जसे की, एका ख्रिस्ती व्यक्‍तीची कार्य करायची एक ठराविक पद्धत असेल आणि दुसऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीची दुसरी पद्धत असेल तर त्याबाबतीत ते सहख्रिश्‍चनांचा न्याय करू लागले होते. याबाबतीत हे क्रेतवासी, जे अशुद्ध नव्हते त्याला अशुद्ध मानत होते. (रोमकर १४:१७; कलस्सैकर २:१६) आपण देवाला ओळखतो असा ते दावा करत असले तरीसुद्धा त्यांची कार्ये मात्र अगदी उलट होती.—तीत १:१६.

“शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे”

६. पौलाने कोणत्या दोन प्रकारच्या लोकांविषयी सांगितले?

पौलाने तीतास जे लिहिले त्यातून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो? पुढील विधानात जो फरक सांगण्यात आला आहे ते पाहा: “शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्‍वास न ठेवणारे ह्‍यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धि व विवेकभाव ही विटाळलेली आहेत.” (तीत १:१५) नैतिकरीत्या शुद्ध असलेल्या ख्रिस्ती व्यक्‍तीला सर्व काही शुद्ध व चालण्याजोगे आहे असे पौल निश्‍चितच म्हणत नव्हता. असे आपण अगदी खात्रीने म्हणू शकतो, कारण पौलाने दुसऱ्‍या एका पत्रात स्पष्टपणे लिहिले, की जारकर्म, मूर्तीपूजा, चेटूक व अशा इतर गोष्टी करणाऱ्‍यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:१९-२१) तेव्हा, आपण असा निष्कर्ष काढला पाहिजे, की पौल दोन प्रकारच्या लोकांविषयी एक सर्वसामान्य सत्यगोष्ट सांगत होता; नैतिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या शुद्ध असलेले व नसलेले.

७. इब्री लोकांस १३:४ मध्ये कोणत्या गोष्टीचे खंडन करण्यात आले आहे, पण यामुळे कोणता प्रश्‍न उभा राहतो?

बायबल ज्या गोष्टींचा विशिष्टपणे निषेध करते केवळ त्याच गोष्टी एका प्रामाणिक ख्रिश्‍चनाने टाळल्या पाहिजेत असे नाही. उदाहरणार्थ, बायबलमधील या सडेतोड विधानाचा विचार करा: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) गैरख्रिस्ती व बायबलची काडीमात्र माहिती नसलेलेसुद्धा हे वचन वाचून उचितपणे असा निष्कर्ष काढतील की हे वचन व्यभिचाराचे खंडन करते. यावरून आणि बायबलमधील इतर उताऱ्‍यांवरून हे स्पष्ट होते, की देव, एका विवाहित पुरुषाचे व स्त्रीचे विवाहबाह्‍य संबंधांचे खंडन करतो. पण मग, दोन अविवाहित व्यक्‍तींतील मौखिक सेक्सविषयी काय? अनेक किशोरवयीन तरुण असा दावा करतात, की मौखिक सेक्स अपायकारक नाही कारण ते लैंगिक समागम नाही. एक ख्रिस्ती व्यक्‍ती मौखिक सेक्सला शुद्ध समजू शकते का?

८. मौखिक सेक्सविषयी खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन, जगातील अनेक लोकांपेक्षा भिन्‍न कसा आहे?

इब्री लोकांस १३:४ आणि १ करिंथकर ६:९ या वचनांनुसार, देव व्यभिचार आणि जारकर्म (ग्रीक, पोर्निया) अशा दोन्ही गोष्टींचे खंडन करतो. जारकर्मात काय काय समाविष्ट आहे? ग्रीक शब्द पोर्निया यात, अश्‍लील हेतूने लैंगिक अवयवांचा नैसर्गिक अथवा अनैसर्गिक मार्गाने उपयोग करणे समाविष्ट आहे. यांत, शास्त्रवचनांनुसार असलेल्या विवाहाच्या बाहेर ठेवले जाणारे सर्व प्रकारचे बेकायदेशीर लैंगिक संबंध समाविष्ट आहेत. यास्तव, त्यात मौखिक सेक्सचा देखील समावेश होतो. जगातील अनेक किशोरवयीन तरुणांना असे सांगण्यात आले आहे किंवा ते स्वतःच या निष्कर्षास पोहंचले आहेत, की मौखिक सेक्स मान्य आहे, तरीपण ते बेकायदेशीर लैंगिक संबंधातच मोडते. खरे ख्रिस्ती, ‘अनावर व व्यर्थ बोलणाऱ्‍यांच्या आणि फसविणाऱ्‍यांच्या’ मतानुसार आपल्या विचारांना व कार्यांना मार्गदर्शन देत नाहीत. (तीत १:१०) ते पवित्र शास्त्रवचनांच्या उच्च दर्जांना उंचावून धरतात. मौखिक सेक्सचे समर्थन करण्याऐवजी त्यांना हे समजते, की मौखिक सेक्स शास्त्रवचनांनुसार जारकर्म अथवा पोर्निया आहे आणि या प्रथेचा निषेध करण्यास ते आपल्या सदसद्विवेकबुद्धीला प्रशिक्षण देतात. *प्रेषितांची कृत्ये २१:२५; १ करिंथकर ६:१८; इफिसकर ५:३.

सदसद्विवेकबुद्धीचे वेगवेगळे आवाज, वेगवेगळे निर्णय

९. जर “सर्व काही शुद्ध आहे” तर मग सदसद्विवेकबुद्धीची काय भूमिका आहे?

“शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे,” असे जेव्हा पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? पौल अशा ख्रिश्‍चनांविषयी बोलत होता ज्यांनी, आपली विचारसरणी आणि नैतिकबुद्धी देवाच्या प्रेरित वचनांतील त्याच्या दर्जांच्या सामंजस्यात आणली होती. देवाने ज्यांचे थेटपणे खंडन केलेले नाही अशा गोष्टींच्या बाबतीत प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, हे खरे ख्रिस्ती जाणतात. इतरांची टीका करण्याऐवजी ते, देव ज्या गोष्टींचे खंडन करीत नाही अशा गोष्टींना “शुद्ध” समजतात. बायबल ज्याविषयी विशिष्ट मार्गदर्शन देत नाही अशा जीवनाच्या पैलूंविषयी आपण जसा विचार करतो तसाच विचार इतरांनी देखील केला पाहिजे, अशी ते अपेक्षा करीत नाहीत. याबाबतीत आपण काही उदाहरणे पाहू.

१०. लग्न समारंभ (किंवा अंत्यविधी) यामुळे पेच कसा निर्माण होऊ शकतो?

१० ख्रिस्ती मंडळीत अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांत, एक विवाह साथीदार ख्रिस्ती आहे परंतु त्याचा सोबती नाही. (१ पेत्र ३:१; ४:३) यामुळे, सत्यात असलेल्या सोबत्यासमोर काही पेच निर्माण होऊ शकतात; जसे की, नातेवाईकाचे लग्न अथवा अंत्यविधी. एका ख्रिस्ती भगिनीचे उदाहरण घ्या, जिच्या पतीचे तिच्याप्रमाणे ख्रिस्ती विश्‍वास नाहीत. पतीच्या एका नातेवाईकाचे लग्न आहे आणि ते ख्रिस्तीधर्मजगताच्या चर्चमध्ये आहे. (किंवा, एखाद्या नातेवाईकाचा, कदाचित पालकाचा मृत्यू झाला आहे आणि अंत्यविधी चर्चमध्ये होणार आहे.) पतीपत्नीला बोलवले जाते. पतीची इच्छा आहे, की पत्नीने त्याच्याबरोबर जावे. हजर राहावे की नाही याबाबतीत पत्नीची सदसद्विवेकबुद्धी तिला काय सांगते? ती काय करेल? दोन शक्यतांचा विचार करा.

११. चर्चमध्ये होणाऱ्‍या विवाहसमारंभाला हजर राहायचे की नाही याबाबतीत एक ख्रिस्ती पत्नी तिच्या पतीला काय समजावून सांगेल व यामुळे काय होईल?

११ खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेल्या ‘मोठ्या बाबेलीतून निघा,’ या बायबलमधील अगदी कडक आज्ञेचा तनुजा ही ख्रिस्ती भगिनी विचार करते. (प्रकटीकरण १८:२, ४) ती पूर्वी त्याच चर्चची सदस्या होती जिथे हा विवाहसमारंभ होणार आहे. त्यामुळे तिला माहीत आहे, की विवाह सोहळ्याच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांना धार्मिक कार्यांत जसे की, प्रार्थना, गीत किंवा काही धार्मिक हावभाव यांत भाग घ्यावा लागतो. यांत भाग घ्यायचा नाही, आपण तिथे हजरच राहायला नको, असा तिने मनाशी पक्का निश्‍चय केला आहे; नाहीतर आपल्या सचोटीचा भंग करण्याचा आपल्यावर दबाव येऊ शकतो, असा ती विचार करते. पण तनुजा शास्त्रवचनांनुसार, तिचे मस्तक असलेल्या तिच्या पतीचा मनापासून आदर करते आणि ती त्याला साथ देऊ इच्छिते; पण त्यासोबतच ती तिच्या शास्त्रवचनांतील तत्त्वांशी हातमिळवणी करू इच्छित नाही. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) त्यामुळे अगदी कुशलतेने ती तिच्या नवऱ्‍याला समजावून सागंते, की त्याने तिथे जाण्यास ठरवले असले तरी ती येणार नाही. कदाचित जर तिथे ती आली परंतु तिने तेथे होणाऱ्‍या कोणत्याही कार्यांत भाग घेण्यास नकार दिला तर ते कदाचित त्याला संकोचल्यासारखे वाटेल; त्यामुळे तिने तिथे न गेलेलेच उत्तम, असे ती त्याला सांगेल. तिच्या या निर्णयामुळे तिचा विवेक शुद्ध राहील.

१२. चर्चमध्ये होणाऱ्‍या विवाहसमारंभाचे आमंत्रण मिळाल्यावर एक व्यक्‍तीचा काय तर्क असेल व तिची प्रतिक्रिया काय असेल?

१२ जाईपुढेही काहीसा असाच पेच निर्माण होतो. ती देखील आपल्या पतीचा आदर करते, देवाशी एकनिष्ठ राहायचा तिने निश्‍चय केला आहे व आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाला ती प्रतिसादही देते. तनुजाने ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होता त्या गोष्टींवर जाईही विचार करते आणि मग टेहळणी बुरूज मे १५, २००२ मधील “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख प्रार्थनापूर्वक वाचून काढते. तिला आठवते, की शद्रक, मेशक व अबेदनगो या तीन हिब्रू तरुणांनी, जिथे मूर्तीपूजा होणार होती त्या ठिकाणी जाण्याची आज्ञा मानली खरी परंतु तिथे होणाऱ्‍या मूर्तीपूजक कार्यांत भाग घेऊन त्यांनी आपल्या सचोटीचा भंग केला नाही. (दानीएल ३:१५-१८) जाई आपल्या पतीबरोबर जाण्याचे ठरवते परंतु तिथे होणाऱ्‍या कोणत्याही धार्मिक कार्यांत भाग घ्यायचा नाही असे ठरवते. जाईही आपल्या विवेकानुसार कार्य करते. कोणत्या गोष्टी करण्यास आपला विवेक परवानगी देईल पण कोणत्या गोष्टी आपण करू शकणार नाही हे ती आपल्या पतीला कुशलपणे परंतु स्पष्टपणे सांगते. आपल्या पतीला खऱ्‍या व खोट्या उपासनेतील फरक दिसून येईल, अशी जाईला आशा असते.—प्रेषितांची कृत्ये २४:१६.

१३. दोन ख्रिस्ती भगिनी वेगवेगळ्या निष्कर्षास येतात तेव्हा त्यात अस्वस्थ होण्याची गरज का नाही?

१३ या दोन ख्रिस्ती भगिनी वेगवेगळ्या निष्कर्षास पोचल्या याचा अर्थ, एक व्यक्‍ती काय करते याने काही फरक पडत नाही किंवा, या दोघींपैकी एकीचा विवेक जरा कमजोर असेल, असा होतो का? नाही. चर्चविधीच्या वेळी वाजवले जाणारे संगीत, तिथल्या वस्तू यांची तनुजाला पूर्वी विशेष ओढ असावी; त्यामुळे आपण जर तिथे उपस्थित राहिलो तर कदाचित आपल्यासाठी ते खास धोकादायक ठरेल, असे तिला वाटते. धार्मिक विषयांवर पूर्वी आपल्या पतीबरोबर झालेल्या चर्चांचा तिच्या विवेकावर प्रभाव पडला असावा. त्यामुळे तिला असे वाटते, की तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी उत्तम आहे.

१४. व्यक्‍तिगत निर्णयांच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे?

१४ जाईने घेतलेला निर्णय अयोग्य होता का? इतरांना हे ठरवण्याचा अधिकार नाही. तिने त्या प्रसंगी हजर राहण्याचा परंतु कोणत्याही धार्मिक कृत्यात भाग न घेण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल कोणालाही तिला दोषी ठरवण्याचा किंवा तिची टीका करण्याचा अधिकार नाही. विशिष्ट अन्‍न खाण्याविषयी किंवा न खाण्याविषयी लोकांच्या व्यक्‍तिगत निर्णयांबद्दल पौलाने कोणता सल्ला दिला तो आठवा: “जो खातो त्याने न खाणाऱ्‍याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्‍याला दोष लावू नये; . . . तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्‍न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.” (रोमकर १४:३, ४) कोणताही खरा ख्रिस्ती, दुसऱ्‍याला त्याच्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या मार्गदर्शनाला धुडकावण्याचे उत्तेजन देणार नाही. त्याने जर असे केले तर, कदाचित ज्याने जीवन वाचू शकेल अशा संदेशाला तो धुडकावेल.

१५. इतरांच्या विवेकाचा व भावनांचा गंभीरपणे विचार करणे महत्त्वाचे का आहे?

१५ वर उल्लेख केलेल्या उदाहरणांचा विचार करा. वरील उदाहरणांतील दोन्ही ख्रिस्ती स्त्रियांनी आणखी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा इतरांवर होणारा परिणाम. पौलाने असा सल्ला दिला: “असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लावण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये.” (रोमकर १४:१३) तनुजाला कदाचित माहीत असावे, की याआधी जेव्हा अशीच परिस्थिती आली होती तेव्हा मंडळीमध्ये किंवा तिच्या कुटुंबात याबाबतीत गोंधळ माजला होता व ती जे काही करेल त्याचा तिच्या मुलांवर देखील परिणाम होऊ शकतो. परंतु, जाईला माहीत असावे, की तिच्या निर्णयांमुळे मंडळीमध्ये किंवा तिच्या नातेवाईकांमध्ये कसलाही गोंधळ झाला नव्हता. या दोन्ही भगिनींना आणि आपणा सर्वांना समजले पाहिजे, की योग्यरीत्या प्रशिक्षित असलेली सदसद्विवेकबुद्धी, इतरांच्या मनावर होणाऱ्‍या परिणामांच्या बाबतीत संवेदनक्षम असते. येशूने म्हटले: “माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्‍यात त्याचे हित आहे.” (मत्तय १८:६) आपल्या कार्यांमुळे काही जण अडखळतील, या गोष्टीकडे जर एखादी व्यक्‍ती दुर्लक्ष करीत असेल तर तिचा क्रेतमधील ख्रिश्‍चनांचा जसा विवेक अशुद्ध होता त्याप्रमाणे असेल.

१६. एका ख्रिस्ती व्यक्‍तीत कालांतराने आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करू?

१६ एका ख्रिश्‍चनाने आध्यात्मिक प्रगती करीत राहिले पाहिजे तसेच, आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकण्याच्या व प्रतिसाद देण्याच्या बाबतीतही प्रगती केली पाहिजे. अलिकडेच, बाप्तिस्मा घेतलेल्या अनिलचे उदाहरण घ्या. त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला, पूर्वी ज्यात तो भाग घेत असे अशा शास्त्रवचनांनुसार नसलेल्या प्रथांपासून दूर राहण्यास सांगते. या प्रथांमध्ये कदाचित मूर्तींचा किंवा रक्‍ताचा वापर होत असावा. (प्रेषितांची कृत्ये २१:२५) एवढेच नव्हे तर तो, अशा गोष्टीही काळजीपूर्वक टाळतो ज्या देवाने मनाई केलेल्या गोष्टींशी ‘थोड्याफार प्रमाणातही मिळत्या-जुळत्या’ आहेत. दुसरीकडे पाहता, काही लोक विशिष्ट गोष्टी का टाळतात, जसे की काही विशिष्ट टीव्ही कार्यक्रम का टाळतात हे त्याला कळत नाही. कारण त्याच्या मते, त्या गोष्टी स्वीकारयोग्य आहेत.

१७. वेळ आणि आध्यात्मिक प्रगतीचा एखाद्या ख्रिश्‍चनाच्या सदसद्विवेकबुद्धीवर व निर्णयांवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो ते समजावून सांगा.

१७ हळूहळू अनिल देवाच्या ज्ञानात वाढतो व देवाच्या जवळ येतो. (कलस्सैकर १:९, १०) याचा परिणाम काय होतो? त्याच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाला बऱ्‍यापैकी प्रशिक्षण मिळते. आता अनिल आपल्या विवेकाचा आवाज ऐकण्यास व शास्त्रवचनीय तत्त्वांचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास अधिक प्रवृत्त होतो. खरे तर, त्याला आता जाणवते, की ज्या गोष्टी त्याला ‘थोड्याफार प्रमाणातही मिळत्या-जुळत्या’ वाटत होत्या व ज्या तो टाळत होता त्या खरे तर देवाच्या विचारांच्या विरोधात नाहीत. शिवाय, बायबल तत्त्वांचे तो अधिक जवळून पालन करत असल्यामुळे व आपल्या उत्तमरीत्या प्रशिक्षित विवेकाला प्रतिसाद देत असल्यामुळे अनिलची सदसद्विवेकबुद्धी त्याला, पूर्वी स्वीकारयोग्य वाटणारे कार्यक्रम टाळण्यास प्रवृत्त करते. होय, त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला शुद्ध करण्यात आले आहे.—स्तोत्र ३७:३१.

१८. आपल्याकडे आनंद करण्याची कोणती कारणे आहेत?

१८ बहुतेक मंडळ्यांमध्ये, असे लोक असतात जे ख्रिस्ती प्रगतीपथावर वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही जण विश्‍वासात नवीनच आहेत. कदाचित काही विषयांच्या बाबतीत त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीचा त्यांच्या निर्णयांवर जास्त प्रभाव नसतो; पण काही विषयांच्या बाबतीत तो लगेच सांगतो. अशा लोकांना यहोवाच्या मार्गदर्शनाची व त्यांच्या स्वतःच्या प्रशिक्षित विवेकाला प्रतिसाद देण्याची सवय करून घेण्यासाठी वेळ व मदत लागेल. (इफिसकर ४:१४, १५) आनंदाची गोष्ट म्हणजे, त्याच मंडळ्यांमध्ये असेही अनेक जण असतात ज्यांच्याजवळ खूप ज्ञान आहे, बायबल तत्त्वांचे पालन करण्याचा अनुभव आहे आणि देवाच्या विचारांच्या सुसंगत असलेला विवेकही आहे. अशा ‘शुद्ध जनांमध्ये’ असणे किती आनंददायक आहे. कारण ते, प्रभूला संतोषकारक वाटणाऱ्‍या गोष्टींना नैतिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या “शुद्ध” असे समजतात! (इफिसकर ५:१०) आपण सर्वजण या स्थितीत येण्याचे व सत्य व ईश्‍वरी भक्‍तीच्या अचूक ज्ञानाच्या अनुषंगात असलेला विवेक प्राप्त करण्याचे ध्येय ठेवू या.—तीत १:१. (w०७ १०/१५)

[तळटीप]

^ परि. 8 टेहळणी बुरूज मार्च १५, १९८३ पृष्ठे ३०-१ वर, विवाहित जोडप्यांना सल्ला देण्यात आला आहे ज्यावर विचार करणे लाभदायक ठरेल.

तुमचे उत्तर काय आहे?

• क्रेतमधील काही ख्रिश्‍चनांची सदसद्विवेकबुद्धी का विटाळली होती?

• उत्तमरीत्या प्रशिक्षित सदसद्विवेकबुद्धी असलेल्या दोन ख्रिस्ती व्यक्‍ती वेगवेगळा निर्णय कसा काय घेतील?

• हळूहळू आपला विवेक कसा झाला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सिसिली

ग्रीस

क्रेत

आशिया मायनर

सायप्रस

भूमध्य समुद्र