व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अर्थपूर्ण जीवन शक्य आहे!

अर्थपूर्ण जीवन शक्य आहे!

अर्थपूर्ण जीवन शक्य आहे!

पैसा आणि पैशाने विकत घेता येतात त्या वस्तू मिळवणे, हाच अनेकांच्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. काहींचे, जगात नाव कमावण्याचे ध्येय आहे. इतरांचा आपली कलाकौशल्ये पूर्णत्वास नेण्याचा उद्देश आहे. असेही काही लोक आहेत ज्यांचा उद्देश आहे इतरांना मदत करणे. परंतु अनेकांना, आपण कशासाठी जगत आहोत, आपण अस्तित्वात का आहोत, हे माहीत नाही.

तुमच्याविषयी काय म्हणता येईल? आपण येथे का आहोत, यावर तुम्ही कधी गंभीरपणे विचार केला आहे का? लोक ज्या ध्येयांचा पाठलाग करतात अशा काही सर्वसामान्य ध्येयांची आपण चर्चा करूया व पाहूया की यातून त्यांना काहीतरी साध्य केल्याची भावना व समाधान मिळते का. काय केल्याने जीवन अर्थपूर्ण बनते?

पैसा आणि सुखविलासाची योग्य जागा

बायबलमधील उपदेशक ७:१२ मध्ये आपण असे वाचतो: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” होय, पैसा उपयोगी आहे. जगण्याकरता आणि खासकरून जर तुमचे कुटुंब असेल तर तुम्हाला पैसे हवेतच.—१ तीमथ्य ५:८.

आणि पैशाने विकत घेता येणारे सुख जर जीवनात नसेल तर त्याला कसले जीवन म्हणायचे? ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त याने, आपल्याला डोके टेकवायला जागा नाही, असे कबूल केले असले तरी एखादप्रसंगी त्यानेही उत्तम भोजनाचा व द्राक्षारसाचा आनंद लुटला. शिवाय, त्यानेही उंची पोशाख घातला.—मत्तय ८:२०; योहान २:१-११; १९:२३, २४.

तरीपण सुखविलास मिळवणे हा त्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश नव्हता. त्याने आपल्या जीवनात उचित गोष्टींना प्राधान्य दिले होते. त्याने म्हटले: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” यानंतर त्याने एका धनवान मनुष्याचा दाखला दिला. या मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले व त्याने मनात विचार केला: “मी काय करू? कारण माझे उत्पन्‍न साठवावयास मला जागा नाही. . . . मी असे करीन: मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.” या मनुष्याची विचार करण्याची पद्धत चुकीची का होती? त्याच दाखल्यात पुढे म्हटले आहे: “देवाने [धनवानाला] म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल?” या मनुष्याने त्याच्या शेताचे उत्पन्‍न साठवून ठेवले तरी, तो मेल्यानंतर त्या धनसंचयाचा लाभ घेऊ शकणार नाही. शेवटी मग, येशू आपल्या श्रोत्यांना म्हणतो: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:१३-२१.

आपल्याला पैशांची गरज आहे आणि जीवनात मौजमजा उचित स्थानी असली पाहिजे. परंतु, पैसा अथवा मौजमजा किंवा सुखविलास, याच गोष्टी जीवनात मुख्य नाहीत. देवविषयक बाबतीत धनवान होणे अर्थात देवाची कृपापसंती मिळेल अशाप्रकारचे जीवन जगणे, ही जीवनातली सर्वात मुख्य गोष्ट आहे जिचा आपण पाठलाग केला पाहिजे.

नावलौकिक मिळवणे महत्त्वाचे आहे का?

अनेक लोक स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी जगतात. नावलौकिक मिळवणे अथवा लोकांनी आपली आठवण करावी, अशी इच्छा बाळगण्यात वावगे असे काही नाही. बायबल म्हणते: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.”—उपदेशक ७:१.

एखाद्याच्या मृत्यूच्या दिवशी त्याचा जणू काय इतिहास लिहिला जातो. त्याने जर जीवनात चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा मृत्यूचा दिवस त्याच्या जन्माच्या दिवसापेक्षा बरा, कारण त्याच्या जन्माच्या दिवशी त्याचा जीवन-रेकॉर्ड कोरा असतो.

बायबलमधील उपदेशक पुस्तकाचा लेखक होता राजा शलमोन. शलमोनाचा सावत्र भाऊ अबशालोम याला नावलौकिक मिळवायचा होता. परंतु, त्याचे तीन पुत्र ज्यांच्याद्वारे तो आपले नाव पुढे चालू ठेवू शकत होता अकालीच मरण पावले. त्यामुळे मग अबशालोमाने काय केले? शास्त्रवचनात असे म्हटले आहे: “‘आपले नाव चालविण्यास कोणी पुत्र नाही,’ हे लक्षात आणून अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारिला होता, तो राजाच्या खोऱ्‍यात आहे. त्या मनोऱ्‍यास त्याने आपले नाव दिले.” (२ शमुवेल १४:२७; १८:१८) या मनोऱ्‍याचे किंवा स्तंभाचे अवशेष सापडले नाहीत. पण बायबलचा अभ्यास करणारे विद्यार्थी आज अबशालोम याला ओळखतात ते केवळ एक कुविख्यात बंडखोर म्हणून, ज्याने आपला बाप दावीद याचे सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

पुष्कळ लोक, त्यांनी साध्य केलेल्या गोष्टींच्याद्वारे, स्वतःचे नाव टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात. ते अशा लोकांच्या नजरेत प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करतात ज्यांच्या आवडीनिवडी येणाऱ्‍या प्रत्येक हंगामाबरोबर बदलत असतात. अशा नावलौकिकाचे काय होते? नार्सिसिझमची संस्कृती (इंग्रजी) या पुस्तकात क्रिस्टफर लॉश असे लिहितात: “आपल्या काळात, एका व्यक्‍तीचे यश, तिचे तारुण्य, चमकधमक, नाविन्य, आणि गौरव यांच्या आधारावर ठरवले जाते. पण हे अगदी क्षणिक असते. आणि ज्यांना जनतेकडून अशी प्रसिद्धी मिळते त्यांना, आपण ही प्रसिद्धी गमावणार तर नाही याची चिंता वाटत असते.” यामुळे अनेक ख्यातनाम व्यक्‍ती ड्रग्ज व मादक पेयांच्या आहारी जाऊन आपले जीवन अकालीच समाप्त करतात. होय, नावलौकिक मिळवणे देखील व्यर्थ आहे.

पण मग आपण कोणाच्या दृष्टीत चांगले नाव कमवले पाहिजे? आपल्या नियमशास्त्राचे पालन करणाऱ्‍या काही विशिष्ट जणांविषयी बोलताना यहोवाने संदेष्टा यशया याच्याद्वारे असे म्हटले: “त्याचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत . . . असे स्मारक मी स्थापीन व त्याचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.” (यशया ५६:४, ५) देवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍यांचा तो स्वीकार करतो. त्यांचा एक ‘स्मारक बांधला जाईल व त्यांना नावलौकिक मिळेल.’ देवाच्या स्मरणातून त्यांचे नाव “नाहीसे होणार नाही” अर्थात त्यांचा नाश केला जाणार नाही. अशाप्रकारचे नाव कमावण्याचे अर्थात आपला निर्माणकर्ता यहोवा याच्या नजरेत उत्तम नावलौकिक प्राप्त करण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते.

यशया संदेष्ट्याने त्या काळाविषयी भाकीत केले जेव्हा विश्‍वासू जनांना पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन मिळेल. या नंदनवनातील ‘युगानुयुगाचे जीवन’ हेच ते “खरे जीवन” आहे जे देवाने मानवजातीला निर्माण केले तेव्हा उद्देशिले होते. (१ तीमथ्य ६:१२, १९) तेव्हा, क्षणभंगुर व असमाधानी जीवन जगण्यापेक्षा सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण खटपट करू नये का?

नैपुण्य प्राप्त केल्याने किंवा परोपकार केल्यानेच जीवन समाधानी होत नाही

अनेक कलाकार आपल्या कामात सुधारणा करून, ते ज्याला आपल्या कलेतील पूर्णत्व गाठणे असे म्हणतात ते साध्य करण्याची मनिषा बाळगतात. यासाठी त्यांचे सद्य जीवन अपुरे पडते. मागच्या लेखात हिडिओ नावाच्या एका कलाकराचा उल्लेख करण्यात आला होता. तर, हिडिओने नव्वदाव्या वर्षी आपल्या कलेत नैपुण्य मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. आणि जरी एखादा कलाकार, त्याला त्याच्या कामाचे समाधान वाटू लागते अशा स्थितीपर्यंत पोहचत असला तरी, तोपर्यंत तो आपल्या तरुणपणात जितके साध्य करू शकत होता तितके आता करू शकत नाही. पण समजा त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन असते तर? आपल्या कलेत नैपुण्य मिळवण्याच्या किती शक्यता त्याच्याजवळ असतील याचा विचार करा!

परोपकार करण्यालाच आपल्या जीवनाचा उद्देश बनवण्याविषयी काय? गरिबांच्या गरजांकडे आपण लक्ष वळवणे व गरजू लोकांना मदत करण्याकरता आपल्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे हे कौतुकास्पद आहे. बायबल म्हणते: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) इतरांच्या कल्याणाबद्दल काळजी व्यक्‍त करणे खरोखरच समाधानकारक असू शकते. परंतु, फक्‍त एकच व्यक्‍ती मग तिने या कार्यासाठी आपले संपूर्ण जीवन जरी वाहून दिले तरी सर्वच गरिबांना व गरजू लोकांना मदत करू शकेल का? इतरांच्या दुःखाचा परिहार करण्यात आपण मानव जो काही प्रयत्न करू शकतो तो मर्यादित आहे. मानवजातीची एक मूलभूत गरज आहे जिच्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात व जी त्यांच्या जीवनात अतृप्तच राहते. ही मूलभूत गरज रगड पैशाने देखील भागत नाही. अशी ही कोणती गरज आहे बरे?

जन्मतःच मिळालेली गरज—आवश्‍यकता

येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनात मानवाला जन्मतःच मिळालेल्या मूलभूत गरजेविषयी सांगितले; तो म्हणाला: “आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३, NW) तेव्हा, बायबलनुसार खरा आनंद, धनसंपत्ती, नावलौकिक, कलेत मिळवलेले नैपुण्य किंवा परोपकार यांच्यावर निर्भर नाही. तर, आपली आध्यात्मिक गरज तृप्त करण्यावर—देवाची उपासना करण्याच्या गरजेवर निर्भर आहे.

जे लोक निर्माणकर्त्याला ओळखत नव्हते त्यांना, त्याचा शोध करण्याचे उत्तेजन प्रेषित पौलाने दिले. त्याने म्हटले: “[देवाने] एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही; कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.”—प्रेषितांची कृत्ये १७:२६-२८.

खऱ्‍या देवाची उपासना करण्याची गरज तृप्त करणे, हे जीवनात खरा आनंद मिळवण्याचे रहस्य आहे. आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्याने आपल्याला “खरे जीवन” प्राप्त करण्याची आशा मिळते. टेरेसाचे उदाहरण घ्या. टेरेसाने तिच्या देशात टीव्ही इतिहासात बरेच मोठे नाव कमवले होते. तिनेच बनवलेल्या एक तासाच्या नाटक मालिकेत प्रमुख पात्र म्हणून काम करणारी ती पहिली आफ्रिकन-अमेरिकन नटी होती. परंतु लवकरच तिने हे सर्व सोडून दिले. का? तिने म्हटले: “देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन करणेच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी माझी पूर्ण खात्री पटली आहे.” सेक्स आणि हिंसाचाराचे गौरव करणाऱ्‍या टीव्ही मालिकांत काम करून टेरेसाला देवाबरोबरील तिचा संबंध धोक्यात आणायचा नव्हता. ती जनतेच्या नजरेआड झाली परंतु खरोखर समाधान देणाऱ्‍या जीवनमार्गावर तिने वाटचाल सुरू केली; कारण, तिने देवाच्या राज्याच्या सुवार्तेची पूर्ण वेळेची प्रचारक म्हणून सेवा करून देवाबरोबर उत्तम नातेसंबंध जोडण्यास इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

टेरेसाने जेव्हा चित्रपटांमध्ये काम करायचे सोडून दिले तेव्हा तिच्याबरोबर काम करणाऱ्‍या एकाने असे म्हटल्याचे सांगितले जाते: “यशाच्या शिखरावर पोहचलेली ही, सर्व काही लाथाडून जाते हे पाहून माझं अंतःकरण अगदी पिळवटून गेलं. परंतु, तिला याही पेक्षा अधिक महत्त्वाचं व समाधानकारक काहीतरी मिळालं असावं, म्हणून तर ती हे सर्व सोडून गेली.” टेरेसाचा नंतर, एका अपघातात मृत्यू झाला. तेव्हा याच व्यक्‍तीने असे म्हटले: “ती सुखी होती. आणि जीवनात तुम्हाला तेच तर हवं असतं! आपल्यातील कितीजण असं म्हणू शकतात?” देवाबरोबर नातेसंबंध जोडण्याला जे आपल्या जीवनात प्राधान्य देतात परंतु ज्यांचा मृत्यू होतो त्यांच्यासाठी देवाच्या राज्य शासनात पुनरुत्थानाची अद्‌भुत आशा आहे.—योहान ५:२८, २९.

निर्माणकर्त्याचा पृथ्वीसाठी व तिच्यावरील मानवजातीसाठी एक उद्देश आहे. तुम्ही हा उद्देश समजून घ्यावा आणि पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे. (स्तोत्र ३७:१०, ११, २९) तेव्हा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता यहोवा देव याच्याविषयी आणि तुमच्याबद्दल त्याचा काय उद्देश आहे याविषयी शिकून घेण्याची हीच वेळ आहे. तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. त्यांच्याशी अथवा या मासिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधा. (w०७ ११/१५)

[५ पानांवरील चित्र]

येशूच्या दाखल्यातील धनवान मनुष्याची विचार करण्याची पद्धत चुकीची का होती?

[७ पानांवरील चित्र]

पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटायला तुम्हाला आवडेल का?